व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘ह्‍या प्रकारे तुम्ही प्रार्थना करा’

‘ह्‍या प्रकारे तुम्ही प्रार्थना करा’

‘ह्‍या प्रकारे तुम्ही प्रार्थना करा’

प्रभूच्या प्रार्थनेतील शब्द तुम्हाला माहीत आहेत का? येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या प्रार्थनेचा हा नमुना आहे. त्याच्या नामांकित डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटले: “ह्‍यास्तव तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा.” (मत्तय ६:९) येशूने या प्रार्थनेचा पायंडा घातल्यामुळे तिला प्रभूची प्रार्थना म्हटली जाते; आमच्या स्वर्गातील पित्या, अशी देखील ही प्रार्थना ओळखली जाते.—लॅटिन, पॅटरनोस्टर.

संपूर्ण जगभरातील लाखो लोकांनी प्रभूची प्रार्थना तोंडपाठ केली आहे व ते ती नेहमी कदाचित दररोज म्हणतात. अलीकडच्या काळात तर शाळांमध्ये व सार्वजनिक घडामोडींच्या काळातही ही प्रार्थना म्हटली जाते. प्रभूच्या प्रार्थनेला इतके महत्त्व का आहे?

तिसऱ्‍या शतकातील तत्त्ववेत्ता सायप्रियन याने असे लिहिले: “ख्रिस्ताने आपल्याला दिलेल्या प्रार्थनेपेक्षा कोणती प्रार्थना आणखी आध्यात्मिक असू शकते . . . ? सत्याचे साक्षात रूप असलेल्या पुत्राने पित्याला केलेल्या प्रार्थनेपेक्षा आणखी काय सत्य असू शकते?”—योहान १४:६.

रोमन कॅथलिक चर्च प्रभूच्या प्रार्थनेला आपल्या शिकवणीतील “मूलभूत ख्रिस्ती प्रार्थना” असे समजते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ कबूल करते, की या प्रार्थनेला ख्रिस्ती धर्मजगताच्या सर्व धर्मांमध्ये महत्त्व आहे आणि ती “ख्रिस्ती विश्‍वासाच्या शिकवणींपैकी महत्त्वाची शिकवणूक आहे,” असेही म्हणते.

परंतु हे कबूल करावे लागेल, की प्रभूची प्रार्थना म्हणणाऱ्‍या अनेकांना तिचा अर्थ समजत नाही. “तुम्ही कोणत्याही प्रकारचे ख्रिस्ती असाल तर तुम्ही एका दमात प्रभूची प्रार्थना म्हणून दाखवू शकाल, परंतु हळूहळू, तिचा अर्थ समजून घेऊन ती तुम्हाला म्हणता येणार नाही,” असे ओटावा सिटिझन हे कॅनडाचे बातमीपत्रक म्हणते.

देवाला आपण करत असलेल्या प्रार्थना आपल्याला समजणे खरोखरच महत्त्वाचे आहे का? येशूने आपल्याला प्रभूची प्रार्थना का शिकवली? तिचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो? या प्रश्‍नांवर आता आपण आपले लक्ष केंद्रित करू या.