व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज कोण देवाचे गौरव करत आहेत?

आज कोण देवाचे गौरव करत आहेत?

आज कोण देवाचे गौरव करत आहेत?

“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस.”—प्रकटीकरण ४:११.

१, २. (अ) बायोमिमेटिक्स या शास्त्राची काही उदाहरणे कोणती आहेत? (ब) कोणता प्रश्‍न उद्‌भवतो आणि त्याचे उत्तर काय आहे?

एकोणीसशे चाळीसच्या दशकात, स्विस अभियंते जॉर्ज द मीस्ट्रॉल यांनी एके दिवशी आपल्या कुत्र्याला फिरायला नेले. घरी परतल्यावर आपल्या कपड्यांवर आणि कुत्र्याच्या केसांवर खूप काटेरी कुसळ चिकटल्याचे त्यांना आढळले. उत्सुकतेपोटी त्यांनी हे कुसळ मायक्रोस्कोपखाली ठेवून पाहिले; आकड्याच्या आकाराचे हे कुसळ कोणत्याही फासात अडकतात हे पाहून त्यांचे कुतूहल अधिकच जागृत झाले. शेवटी त्यांनी याच तत्त्वावर आधारित असलेली कृत्रिम व्हेलक्रो चिकटपट्टी शोधून काढली. निसर्गाचे अनुकरण करून नवे शोध लावणारे द मीस्ट्रॉल पहिले नव्हते. संयुक्‍त संस्थानांत राईट बंधूंनी मोठ्या पक्षांच्या उड्डाणाचे निरीक्षण करून पहिल्या विमानाची रचना केली. मांडीचे हाड ज्या तत्त्वांच्या आधारावर मनुष्याच्या शरीराचे वजन पेलते त्याच तत्त्वांचा वापर करून फ्रेंच अभियंते आलेक्सान्द्र-गुइस्ताव आयफल यांनी पॅरिसमध्ये आपल्या नावाने ओळखले जाणारे टॉवर अथवा बुरूज बांधले.

बायोमिमेटिक्स, म्हणजेच निसर्गातील रचनांची नक्कल करणाऱ्‍या शास्त्राची ही अतिशय उत्तम उदाहरणे आहेत. * पण प्रश्‍न उद्‌भवतो, की मानवांचे नवनवीन शोध ज्या उत्कृष्ट नैसर्गिक मूळ रचनांच्या आधारावर लावले जातात, उदाहरणार्थ सूक्ष्म काटेरी कुसळ, मोठाले पक्षी किंवा मानवी मांडीचे हाड आणि इतर अद्‌भुत निर्मितीचे प्रकार, या सर्वांचे श्रेय निर्माण करणाऱ्‍या मूळ रचनाकाराला दिले जाते का? आजच्या जगातील खेदजनक वस्तूस्थिती अशी आहे की देवाला जे श्रेय व गौरव मिळाले पाहिजे ते क्वचितच त्याला दिले जाते.

३, ४. “गौरव” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ काय आहे आणि यहोवाच्या संदर्भात वापरताना हा शब्द कशास सूचित करतो?

पण काहीजण म्हणतील, ‘देवाला गौरव देण्याची काय गरज? तो तर आधीच इतका गौरवशाली आहे.’ यहोवा या विश्‍वातील सर्वात गौरवशाली व्यक्‍ती आहे यात वाद नाही, पण याचा अर्थ तो सर्व मानवांच्या नजरेत गौरवशाली आहे असे म्हणता येणार नाही. बायबलमध्ये “गौरव” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा मूलभूत अर्थ “वजनदारपणा” असा आहे. ज्यामुळे एखादी व्यक्‍ती इतरांच्या नजरेत भारदार किंवा महत्त्वपूर्ण ठरते त्या गोष्टीला हा शब्द सूचित करतो. देवाच्या संदर्भात वापरताना, मानवाच्या नजरेत देव ज्यामुळे प्रभावशाली ठरतो ते या शब्दावरून सूचित होते.

देव कशामुळे इतका प्रभावशाली आहे याचा फार कमी लोक आज विचार करतात. (स्तोत्र १०:४; १४:१) किंबहुना, आजच्या समाजातील सुप्रसिद्ध व्यक्‍ती स्वतः तर देवावर विश्‍वास ठेवतच नाहीत, पण लोकांनासुद्धा ते या विश्‍वाच्या गौरवशाली निर्माणकर्त्याचा अनादर करण्यास प्रवृत्त करतात. कोणकोणत्या मार्गांनी त्यांनी असे केले आहे?

‘त्यांना कसलीहि सबब नाही’

५. सृष्टीतील आश्‍चर्यांविषयी अनेक शास्त्रज्ञ कोणते स्पष्टीकरण देऊन मोकळे होतात?

अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे की देव अस्तित्वात नाही. मग सजीव सृष्टीतील निरनिराळ्या आश्‍चर्यांविषयी (ज्यांत मानवजातीचा समावेश आहे) ते कोणते स्पष्टीकरण देतात? तर अशा आश्‍चर्यांचे श्रेय ते उत्क्रांतीला देतात अर्थात, योगायोगावर आधारित असलेल्या आकस्मिक प्रक्रियेला. उदाहरणार्थ, स्टीफन जे गोल्ड या उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञाने असे लिहिले: “आपण अस्तित्वात का व कसे आलो याचे उत्तर म्हणजे, एक गटाच्या माशांचे विशिष्ट प्रकारचे पंख होते, आणि या पंखांचे, जमिनीवर चालणाऱ्‍या प्राण्यांच्या पायांत रूपांतर होऊ शकत होते . . . यापेक्षा ‘उच्च प्रतीचे’ स्पष्टीकरण असावे अशी आपण अपेक्षा करतो—पण ते अस्तित्वात नाही.” तसेच, रिचर्ड ई. लीकी व रॉजर ल्युइन यांनी लिहिले: “कदाचित मानवी वंशाची उत्पत्ति हा एक भयंकर जीवशास्त्रीय अपघात असावा.” अर्थात काही शास्त्रज्ञ निसर्गातील सौंदर्याचे आणि कल्पकतेचे कौतुक करतात; पण ते देखील याचे श्रेय देवाला देत नाहीत.

६. निर्माणकर्ता या नात्याने जे श्रेय देवाला मिळाले पाहिजे, ते त्याला देण्यापासून अनेकजण का परावृत्त होतात?

उत्क्रांतीवाद एक वास्तविकता आहे असा जेव्हा बुद्धिजीवी अट्टहास करतात, तेव्हा ते असे सुचवीत असतात की जे यावर विश्‍वास ठेवत नाहीत ते सर्व अज्ञानी आहेत. असा अट्टहास करण्याविषयी सर्वांचे एकमत आहे का? काही वर्षांआधी, उत्क्रांतीवादात पारंगत असलेल्या एकाने या तत्त्वाचे समर्थन करणाऱ्‍या अनेकांची मुलाखत घेतली. त्याने म्हटले: “मला असे दिसून आले की उत्क्रांतीवादाचे समर्थन करणारे बहुतेक जण त्याचे समर्थन करतात, कारण प्रत्येक बुद्धिमान व्यक्‍ती उत्क्रांतीवाद मानते असे त्यांना सांगण्यात आले आहे.” होय, सुशिक्षित व्यक्‍ती आपली नास्तिक मते व्यक्‍त करतात तेव्हा देवाला निर्माणकर्ता या नात्याने जे श्रेय मिळाले पाहिजे ते त्याला देण्यापासून इतरजणही परावृत्त होतात.—नीतिसूत्रे १४:१५, १८.

७. रोमकर १:२० यानुसार, दृश्‍य सृष्टीच्या माध्यमातून काय स्पष्टपणे दिसून येते आणि का?

शास्त्रज्ञ ज्या निष्कर्षावर पोचले आहेत, त्याला वस्तूस्थिती व पुरावे दुजोरा देतात का? मुळीच नाही. आपल्या सभोवताल निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वत्र आढळतो. त्याच्याविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीहि सबब राहू नये.” (रोमकर १:२०) निर्माणकर्त्याच्या हस्तकृतीतून त्याच्या अस्तित्वाचा पुरावा स्पष्ट दिसून येतो. तेव्हा खरे पाहता पौल असे म्हणत होता की मानवाच्या अस्तित्वाच्या सुरवातीपासूनच दृश्‍य सृष्टीच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्व मानवांना ‘ज्ञात’ होणे शक्य होते. हा पुरावा कोठे आहे?

८. (अ) आकाश देवाच्या सामर्थ्याची व बुद्धीची कशाप्रकारे ग्वाही देते? (ब) विश्‍वाचे आदिकारण होते हे कशावरून सूचित होते?

तारकामय आकाशात देवाच्या अस्तित्वाचा पुरावा दिसून येतो. स्तोत्र १९:१ म्हणते: “आकाश देवाचा महिमा वर्णिते.” “आकाश,” अर्थात सूर्य, चंद्र व तारे देवाच्या सामर्थ्याची व त्याच्या बुद्धीची ग्वाही देतात. ताऱ्‍यांच्या संख्येचाही विचार केला तर माणूस विस्मित होतो. आणि या सर्व खज्योती अंतराळात दिशाहीनपणे नव्हे तर अचूक भौतिक नियमांनुसारच फिरतात. * (यशया ४०:२६) अशा विस्मयकारक सुव्यवस्थेचे श्रेय एखाद्या आकस्मिक अपघाताला देणे रास्त ठरेल का? लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे बऱ्‍याच शास्त्रज्ञांचे मत आहे की या विश्‍वाची अकस्मात सुरवात झाली. या विचारधारेची अर्थसूचकता समजावत एका प्राध्यापकांनी असे लिहिले: “नास्तिकवादी अथवा अज्ञेयवादी तत्त्वांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, अनादीकाळापासून चालत आलेल्या विश्‍वाची कल्पना जास्त सोयीस्कर आहे. जर विश्‍वाला सुरवात आहे तर मग ही सुरवात होण्यामागचे आदिकारण काय होते असा प्रश्‍न उद्‌भवेल; पुरेसे कारण असल्याशिवाय असा विलक्षण परिणाम घडून येणे कसे शक्य आहे?”

९. प्राणी विश्‍वात यहोवाची बुद्धी कशाप्रकारे दिसून येते?

पृथ्वीवरही देवाच्या अस्तित्वाचा पुरावा दिसून येतो. स्तोत्रकर्त्याने आश्‍चर्य व्यक्‍त करीत म्हटले: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” (स्तोत्र १०४:२४) यहोवाची “कृत्ये,” ज्यांत प्राणीजगताचाही समावेश आहे, ती त्याच्या बुद्धीची प्रचिती देते. सुरवातीला आपण पाहिल्याप्रमाणे, सजीव सृष्टीतील विविध रचना इतक्या अप्रतिम आहेत की शास्त्रज्ञ कित्येकदा त्यांची नक्कल करतात. आणखी काही उदाहरणे विचारात घ्या. अधिक मजबूत हेल्मेट्‌सची रचना करण्याकरता अभ्यासक सांबर शिंगांचा अभ्यास करत आहेत; सुधारित प्रतीची कर्णयंत्रे निर्माण करण्याकरता, अतिशय तीव्र श्रवणशक्‍ती असलेल्या एका माशीचा अभ्यास केला जात आहे; आणि रेडिओ तरंगांनाही शोध लावता येणार नाही अशा गुप्त विमानांच्या कल्पनेचा विकास करण्यासाठी घुबडांच्या पिसांचा अभ्यास केला जात आहे. पण कितीही प्रयत्न केला तरीही मनुष्य निसर्गातील निर्दोष मूळ रचनांची नक्कल करू शकत नाही. बायोमिमिक्री—इनोव्हेशन इनस्पायर्ड बाय नेचर हे पुस्तक म्हणते: “आपण जे जे करू इच्छितो ते सर्व काही जीवजंतूंनी आधीच केले आहे; पण त्यांनी हे सर्वकाही खनिजसंपत्तीचा व्यय न करता, पृथ्वी ग्रहाला प्रदूषणाने जर्जर न करता व आपलेच भविष्य धोक्यात न घालता केले आहे हे विशेष.” खरोखर देवाची बुद्धी अतुलनीय आहे!”

१०. एका महान रचनाकाराचे अस्तित्व नाकारणे असमर्पक का आहे? स्पष्ट करा.

१० वर आकाशात पाहा किंवा खाली पृथ्वीवर सृष्टीचे निरीक्षण करा; कोठेही पाहिले तरी निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा अगदी सुस्पष्ट आहे. (यिर्मया १०:१२) आपण स्वर्गीय प्राण्यांच्या या गीतात मनापासून आपला स्वर जोडला पाहिजे: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:११) शारीरिक डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींबद्दल जरी शास्त्रज्ञ आश्‍चर्य व्यक्‍त करत असले तरीसुद्धा ‘अंतःचक्षुंनी’ दिसणारा पुरावा मात्र त्यांना दिसत नाही. (इफिसकर १:१८) हे स्पष्ट करण्याकरता आपण एक उदाहरण देऊ शकतो: निसर्गातील सौंदर्य व कल्पकता पाहून तिची प्रशंसा करणे आणि त्याच वेळेस एका महान रचनाकाराच्या अस्तित्वाला नाकारणे, हे एखाद्या अप्रतिम पेंटींगची प्रशंसा करून, कोऱ्‍या कॅनव्हसचे त्या अप्रतिम कलाकृतीत रूपांतर करणाऱ्‍या कलाकाराच्या अस्तित्वाला नाकारण्याइतकेच असमर्पक ठरेल. म्हणूनच तर जे देवावर विश्‍वास ठेवू इच्छित नाहीत त्यांना ‘कसलीहि सबब नाही’ असे म्हटले आहे!

“अंधळे वाटाडी” अनेकांची दिशाभूल करतात

११, १२. दैवाच्या शिकवणुकीच्या मुळाशी कोणती धारणा आहे आणि या शिकवणुकीने देवाचे गौरव होत नाही असे का म्हणता येईल?

११ अनेक धार्मिक लोक प्रामाणिकपणे असे मानतात की आपल्या उपासनेद्वारे आपण देवाचे गौरव करतो. (रोमकर १०:२, ३) पण मानवी समाजातील इतर अनेक गोष्टींप्रमाणे एकंदरीत पाहता, धर्माने देखील कोट्यवधी लोकांना देवाचे गौरव करण्यापासून परावृत्तच केले आहे. ते कसे? दोन मार्गांचा विचार करू या.

१२ पहिले म्हणजे, खोट्या शिकवणुकींद्वारे धर्म लोकांना देवाचे गौरव करण्यापासून परावृत्त करतात. उदाहरणार्थ, दैवाची शिकवणूक. या सिद्धान्तानुसार ज्याअर्थी देवाला भविष्य जाणण्याचे सामर्थ्य आहे त्याअर्थी त्याला प्रत्येक गोष्टीचा परिणाम काय होणार हे आधीपासूनच माहीत असले पाहिजे असे गृहित धरले जाते. म्हणजे, प्रत्येक व्यक्‍तीच्या भविष्यात चांगले वाईट जे काही घडणार ते सर्वकाही देवाने फार पूर्वीच लिहून ठेवले आहे असे सुचविण्यात येते. या धारणेनुसार, आजच्या जगातील सर्व दुःख व दुष्टाई यांकरता देवालाच जबाबदार धरता येईल. ही शिकवणूक देवाचे मुळीच गौरव करत नाही कारण यामुळे देवावर एक दोष लावला जातो. आणि मुळात हा दोष देवाचा नसून सैतानाचा, म्हणजेच देवाच्या आद्य शत्रूचा आहे, ज्याला बायबल या “जगाचा अधिपती” म्हणते.—योहान १४:३०; १ योहान ५:१९.

१३. भविष्य जाणून घेण्याच्या आपल्या सामर्थ्यावर देव नियंत्रण करू शकत नाही असा विचार करणे तर्काला धरून नाही असे का म्हणता येईल? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१३ दैवाची शिकवणूक ही शास्त्रावर आधारित नसून तिच्यामुळे देवाची निंदा होते. तो जे करू शकतो ते तो करतो असे भासवले जाते. देवाला घटना घडण्याआधीच त्या जाणून घेण्याचे सामर्थ्य आहे असे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. (यशया ४६:९, १०) पण भविष्य जाणण्याच्या या सामर्थ्यावर त्याला नियंत्रण करता येत नाही, किंवा तो प्रत्येक घटनेकरता जबाबदार आहे असा विचार करणे तर्काला धरून नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती खूप बलवान आहे असे समजा. बलवान असल्यामुळे, तिला डोळ्यासमोर येणारी प्रत्येक जड वस्तू उचलावीशी वाटेल का? नाही! त्याचप्रकारे भविष्य जाणून घेण्याची क्षमता देवाला आहे पण ही क्षमता त्याला तो सर्वकाही घडण्याआधीच जाणून घेण्यास आणि काय घडेल हे आधीपासूनच ठरवण्यास भाग पाडत नाही. भविष्याविषयीच्या ज्ञानाचा उपयोग तो निवडक पद्धतीने आणि विचारपूर्वक करतो. * तर, दैवासारख्या खोट्या शिकवणुकी नक्कीच देवाचे गौरव करत नाहीत.

१४. संघटित धर्माने कशाप्रकारे देवाचा अनादर केला आहे?

१४ संघटित धर्म आणखी एका मार्गाने देवाचा अनादर करतात आणि तो म्हणजे त्यांच्या अनुयायांचे आचरण. ख्रिश्‍चनांनी येशूच्या शिकवणुकींचे पालन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. येशूने तशा अनेक गोष्टी शिकवल्या पण त्यांपैकी एक म्हणजे त्याच्या अनुयायांनी ‘एकमेकांवर प्रेम करावे’ आणि त्यांनी ‘या जगाचे नसावे.’ (योहान १५:१२; १७:१४-१६) ख्रिस्ती धर्मजगताच्या अनुयायांबद्दल काय म्हणता येईल? त्यांनी खऱ्‍या अर्थाने या शिकवणुकींचे पालन केले आहे का?

१५. (अ) युद्धांच्या संदर्भात पाळकवर्गाचा इतिहास काय दाखवतो? (ब) पाळकांच्या आचरणामुळे लाखो लोकांवर कोणता परिणाम झाला आहे?

१५ युद्धांच्या संदर्भात पाळकांचा इतिहास काय सांगतो? त्यांनी कित्येक युद्धांना पाठिंबा दिला, त्यात होणाऱ्‍या अत्याचाराकडे दुर्लक्ष केले, इतकेच नव्हे तर बऱ्‍याच युद्धांचे त्यांनी स्वतः नेतृत्व केले आहे. सैन्यांना आशीर्वाद देऊन त्यांनी मानवहत्येचे समर्थन केले. मनात सहज विचार येतो, की शत्रू पक्षाचे पाळक देखील आपल्या सैन्यांना असेच आशीर्वाद देत असतील हे या पाळकांना कधी सुचले नसावे का?’ (“देव कोणाच्या पक्षाने लढतो?” ही चौकट पाहा.) रक्‍तपात घडवून आणणाऱ्‍या या युद्धांत देव आमचे साहाय्य करतो असे म्हणून हे पाळक देवाचे गौरव करत नाहीत; तसेच बायबलचे नीतिनियम कालबाह्‍य ठरवताना आणि सर्व प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेकडे डोळेझाक करतानाही ते देवाचे गौरव करत नाहीत. त्यांच्याकडे पाहून खरे तर येशूच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांची आठवण होते, ज्यांना येशूने ‘अनाचार करणारे’ व “अंधळे वाटाडी” म्हटले. (मत्तय ७:१५-२३; १५:१४) पाळकवर्गाच्या अशा या आचरणामुळे अनेकांना देवाबद्दल वाटणारी प्रीती थंडावली आहे.—मत्तय २४:१२.

कोण खरोखर देवाचे गौरव करत आहेत?

१६. आज कोण खरोखर देवाचे गौरव करत आहेत या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता आपण बायबलकडे का लक्ष दिले पाहिजे?

१६ जगातल्या प्रमुख व प्रभावशाली व्यक्‍तींनी तर देवाचे गौरव केलेले नाही, पण मग कोण खऱ्‍या अर्थाने असे करत आहेत? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता आपण बायबलकडे लक्ष दिले पाहिजे. शेवटी, कशामुळे देवाचे गौरव होते हे सांगण्याचा देवालाच अधिकार आहे आणि त्याचे वचन बायबल यात त्याने आपले आदर्श प्रकट केले आहेत. (यशया ४२:८) आपण देवाचे गौरव करण्याच्या तीन मार्गांचा विचार करू या आणि प्रत्येक मार्गाचा विचार करताना, आज कोण खरोखरी असे करत आहेत हा प्रश्‍नही आपण पाहू.

१७. आपल्या नावाचे गौरव करणे हा आपल्या इच्छेचा एक महत्त्वाचा भाग आहे हे यहोवाने स्वतः कशाप्रकारे दाखवले आणि आज सबंध पृथ्वीवर कोण देवाच्या नावाची स्तुती करत आहेत?

१७ देवाचे गौरव करण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्याच्या नावाची स्तुती करणे. देवाची अशी इच्छा आहे आणि असे करणे महत्त्वाचे आहे हे यहोवाने येशूला जे म्हटले त्यावरून स्पष्ट होते. आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी येशूने अशी प्रार्थना केली: “बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” तेव्हा एका वाणीने असे उत्तर दिले: “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.” (योहान १२:२८) उत्तर देणारा अर्थातच स्वतः यहोवा होता. या उत्तरावरून स्पष्ट होते की देवाच्या लेखी त्याच्या नावाचे गौरव केले जाणे हे महत्त्वाचे आहे. मग आज यहोवाचे नाव घोषित करून व सबंध पृथ्वीवर त्याची स्तुती करण्याद्वारे कोण देवाचे गौरव करत आहेत? जगातल्या २३५ देशांत, यहोवाचे साक्षीदार असे करत आहेत!—स्तोत्र ८६:११, १२.

१८. देवाची “खरेपणाने” उपासना करणाऱ्‍यांना आपण कसे ओळखू शकतो आणि कोणता गट एका शतकापेक्षा अधिक काळापासून बायबलमधील सत्य शिकवत आला आहे?

१८ देवाचे गौरव करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याच्याविषयी सत्य शिकवणे. येशूने म्हटले की खऱ्‍या उपासकांनी “त्याची उपासना . . . खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) देवाची उपासना कोण “खरेपणाने” करत आहेत हे आपण कसे ओळखू शकतो? जे असे करतात त्यांनी बायबलचा आधार नसलेल्या, आणि देवाविषयी व त्याच्या इच्छेविषयी खोटी माहिती पसरविणाऱ्‍या सिद्धान्तांना कधीही थारा देऊ नये. त्याऐवजी त्यांनी देवाच्या वचनातील शुद्ध सत्ये शिकवली पाहिजेत. यांत पुढील सत्यांचा समावेश आहे: यहोवा परात्पर देव आहे आणि ही गौरवान्वित पदवी केवळ त्याची आहे (स्तोत्र ८३:१८); येशू देवाचा पुत्र आणि देवाच्या मशीही राज्याचा नियुक्‍त राजा आहे (१ करिंथकर १५:२७, २८); देवाचे राज्य यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करील आणि या पृथ्वीविषयी व तिजवरील मानवांविषयी देवाचा उद्देश पूर्णत्वास नेईल (मत्तय ६:९, १०); या राज्याविषयीची सुवार्ता सर्व पृथ्वीवर घोषित केली पाहिजे. (मत्तय २४:१४) जवळजवळ एका शतकापेक्षा अधिक काळापासून ही अमूल्य सत्ये विश्‍वासूपणे शिकवत आलेला केवळ एकच गट आहे—यहोवाचे साक्षीदार!

१९, २०. (अ) ख्रिस्ती व्यक्‍तीच्या उत्तम आचरणामुळे कशाप्रकारे देवाचे गौरव होते? (ब) आज उत्तम आचरण राखण्याद्वारे कोण देवाचे गौरव करत आहेत हे कोणत्या प्रश्‍नांच्या साहाय्याने आपण ठरवू शकतो?

१९ देवाचे गौरव करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याच्या आदर्शांच्या सामंजस्यात आचरण करणे. प्रेषित पेत्राने लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) एका ख्रिस्ती व्यक्‍तीचे आचरण त्याच्या धर्माविषयी बरेच काही सांगते. लोक जेव्हा याचा संबंध लावतात, म्हणजे जेव्हा ते ख्रिस्ती व्यक्‍तीच्या धार्मिक विश्‍वासांमुळे त्याच्या आचरणावर हा परिणाम झाला आहे असे पाहतात तेव्हा यामुळे साहजिकच देवाचे गौरव होते.

२० आपल्या उत्तम आचरणाने देवाचे गौरव आज कोण करत आहेत? अनेक राष्ट्रांच्या सरकारांनी शांतीपूर्ण, कायदेनिष्ठ आणि कर भरण्याच्या बाबतीत प्रामाणिक असण्याबद्दल कोणत्या धार्मिक गटाची प्रशंसा केली आहे? (रोमकर १३:१, ३, ६, ७) वेगवेगळ्या जातीय, राष्ट्रीय आणि वांशिक पार्श्‍वभूमींचे अनुयायी असूनही ज्यांच्यात सबंध जगभरात एकता आहे असे कोण लोक आहेत? (स्तोत्र १३३:१; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) कायद्याविषयी, कौटुंबिक मूल्यांविषयी आणि बायबलआधारित नैतिकतेविषयी आदर वाढविणारे बायबल शिक्षण पुरवण्याचे काम करण्याबद्दल कोणत्या गटाची सबंध जगात ख्याती आहे? या आणि इतर क्षेत्रांत ज्यांचे उत्तम आचरण बरेच काही सांगून जाते असा केवळ एकच गट आहे—यहोवाचे साक्षीदार!

तुम्ही देवाचे गौरव करत आहात का?

२१. आपण वैयक्‍तिकरित्या यहोवाचे गौरव करत आहोत का हे विचारात घेणे का गरजेचे आहे?

२१ आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, ‘वैयक्‍तिकरित्या मी यहोवाचे गौरव करत आहे का?’ स्तोत्र १४८ यानुसार बहुतेक सर्व निर्मितीकृत्ये देवाचे गौरव करतात. स्वर्गदूत, आकाश, पृथ्वी आणि त्यावरील प्राणी सर्व यहोवाची स्तुती करतात. (वचने १-१०) पण मानवजातीपैकी बहुतेकजण देवाचे गौरव करत नाहीत ही किती खेदजनक वस्तुस्थिती आहे! देवाला गौरव मिळेल अशाप्रकारे आपले जीवन व्यतीत करण्याद्वारे तुम्ही यहोवाची स्तुती करत असलेल्या बाकीच्या निर्मित वस्तूंसोबत सामील होत असता. (वचने ११-१३) आपल्या जीवनाचा उपयोग करण्याचा हाच सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे.

२२. यहोवाचे गौरव केल्यामुळे तुम्हाला कोणकोणते आशीर्वाद मिळतात आणि तुम्ही कोणता निर्धार करावा?

२२ यहोवाचे गौरव केल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात. ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवल्यामुळे तुमचा देवाशी समेट होतो आणि तुमच्या स्वर्गीय पित्यासोबत तुम्ही एक शांतीपूर्ण व समाधानदायक संबंध कायम करू शकता. (रोमकर ५:१०) देवाचे गौरव करण्याच्या संधी तुम्ही शोधाल तसतसे तुम्ही अधिक सकारात्मक आणि कृतज्ञ मनोवृत्ती बाळगण्यास शिकता. (यिर्मया ३१:१२) मग तुम्ही इतरांनाही आनंदी, समाधानदायक जीवन जगण्यास मदत करू शकता आणि यामुळे तुमच्याही आनंदात भर पडते. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) देवाचे गौरव करण्याचा दृढ निर्धार केलेल्यांपैकी एक असण्याचा प्रयत्न करत राहा—केवळ आजच नव्हे तर सर्वकाळ!

[तळटीपा]

^ परि. 2 “बायोमिमेटिक्स” हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून उत्पन्‍न झाला आहे, बीऑस म्हणजे, “जीवन” आणि मिमेसिस म्हणजे “अनुकरण.”

^ परि. 8 आकाश देवाच्या बुद्धीसामर्थ्याचा कशाप्रकारे पुरावा देते याविषयी अधिक सविस्तर चर्चेकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) या पुस्तकातील अध्याय ५ व १७ पाहावेत.

^ परि. 13 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स खंड १, पृष्ठ ८५३ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• सामूहिकरित्या शास्त्रज्ञांनी लोकांना देवाचे गौरव करण्यास साहाय्य केलेले नाही असे का म्हणता येईल?

• संघटित धर्माने कोणत्या दोन मार्गांनी लोकांना देवाचे गौरव करण्यापासून परावृत्त केले आहे?

• आपण कोणत्या मार्गांनी देवाचे गौरव करू शकतो?

• वैयक्‍तिकरित्या तुम्ही यहोवाचे गौरव करत आहात का याचा विचार का केला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चौकट]

“देव कोणाच्या पक्षाने लढतो?”

दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान जर्मन वायूसेनेत असलेल्या पण नंतर यहोवाचा साक्षीदार बनलेल्या एकाने असे सांगितले:

“त्या युद्धाच्या काळात मला एक गोष्ट खूप अस्वस्थ करायची—कॅथलिक, ल्यूथरन, एपिस्कोपल इत्यादी, जवळजवळ सर्व पंथांचे पाळक लढाऊ विमानांवर आणि त्यातील सैनिकांच्या तुकडींवर प्रार्थना करून त्यांना आशीर्वाद द्यायचे; काही वेळानंतर ही विमाने व हे सैनिक शत्रूंवर आपल्या घातक हत्यारांचा वर्षाव करणार होती. मी सहसा विचार करायचो, ‘देव कोणाच्या पक्षाने लढतो?’

“जर्मन सैनिक एक बेल्ट लावायचे ज्यावरील बक्कलवर गॉट मिट उन्स (देव आमच्यासोबत आहे) असे कोरलेले होते. पण मी विचार करायचो, ‘विरुद्ध पक्षाचे व त्याच धर्माचे सैनिकसुद्धा त्याच देवाला प्रार्थना करीत होते, मग त्यांना देव का म्हणून साथ देणार नाही?’”

[१० पानांवरील चित्र]

सबंध पृथ्वीवर यहोवाचे साक्षीदार खरोखर देवाचे गौरव करत आहेत