व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आलेखांद्राचे पत्र

आलेखांद्राचे पत्र

राज्य घोषकांचा वृत्तान्त

आलेखांद्राचे पत्र

पत्र लेखन ही बऱ्‍याच काळापासून, साक्ष देण्याची एक परिणामकारक पद्धत असल्याचे दिसून आले आहे. कधीकधी परिणाम कसा असेल हे आधीच सांगता येत नाही, पण जे निराश न होता, या पद्धतीचा सातत्याने उपयोग करतात त्यांना अद्‌भुत आशीर्वाद मिळाले आहेत. ते बायबलचा हा सूज्ञ सल्ला आठवणीत ठेवतात: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.”—उपदेशक ११:६.

जवळजवळ दहा वर्षे मेक्सिकोमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा केल्यानंतर, आलेखांद्रा नावाच्या एका साक्षीदार तरुणीला कर्करोग झाला, व त्यासाठी ती कीमोथेरपी घेत होती. तिची स्थिती अधिकच बिघडली आणि दररोजची कामे करण्याइतपत शक्‍ती तिच्यात उरली नाही. पण आपल्या सेवाकार्याकडे दुर्लक्ष करण्याची तिची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने पत्रे लिहायचे ठरवले. पत्रांत ती बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल माहिती देऊन आपल्या आईचा टेलिफोन नंबर लिहायची. मग ही पत्रे ती आपल्या आईजवळ द्यायची आणि घरोघरच्या सेवेदरम्यान घरी न भेटणाऱ्‍या लोकांच्या दाराजवळ तिची आई ही पत्रे टाकायची.

यादरम्यान, ग्वातेमालाहून द्योहानी नावाची एक मुलगी मेक्सिकोमधील कानकुन येथे घरकाम करण्यासाठी कामाला लागली. येथे असताना ती यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आली. तिला त्यांच्यासोबत बायबलमधून चर्चा करण्यास खूप आवडायचे. नंतर तिच्या मालकांनी मेक्सिको सिटी येथे राहायला जायचे ठरवले आणि तिने देखील आपल्या कुटुंबासोबत यावे अशी त्यांची इच्छा होती. पण साक्षीदारांशी संपर्क तुटण्याच्या भीतीमुळे द्योहानी जायला तयार होईना.

तिच्या मालकांनी तिला समजावले, “काळजी करू नकोस, साक्षीदार सगळीकडे असतात. तिथं जाताच आपण त्यांना शोधून काढू.” हे ऐकून द्योहानीला आनंद झाला व ती जायला तयार झाली. मेक्सिको सिटीत आल्यानंतर द्योहानीच्या मालकांनी साक्षीदारांना शोधण्याचा प्रयत्न केला. का कोणास ठाऊक, त्यांना काही त्यांचा पत्ता लागला नाही. गंमत म्हणजे, या शहरात ४१,००० पेक्षा जास्त साक्षीदार आहेत आणि ७३० मंडळ्या आहेत.

साक्षीदारांना शोधून बायबलवरील चर्चा सुरू ठेवता न आल्यामुळे द्योहानी निराश झाली. पण एके दिवशी, तिची मालकीण येऊन तिला म्हणाली: “अगं, पाहा! तुझ्या देवानं तुझ्या प्रार्थना ऐकल्या!” तिच्या हातात तिने एक पत्र दिले व म्हणाली: “साक्षीदारांनी हे तुझ्यासाठी ठेवले होते.” ते पत्र आलेखांद्राचे होते.

द्योहानीने लगेच आलेखांद्राच्या आईशी व तिची धाकटी बहीण ब्लांका हिच्याशी संपर्क साधला आणि बायबल अभ्यास स्वीकारला. काही आठवड्यांनी ती आलेखांद्राला भेटायला गेली. त्या दोघींना एकमेकींना भेटून खूप आनंद झाला. आलेखांद्राने तिची आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून तिला मन लावून बायबल अभ्यास करण्याचे प्रोत्साहन दिले.

काही महिन्यांनंतर, जुलै २००३ मध्ये आलेखांद्राचा मृत्यू झाला. विश्‍वास व धैर्याचे अप्रतिम उदाहरण तिने आपल्या सहविश्‍वासू बांधवांकरता ठेवले. तिच्या अंत्यविधीच्या वेळी बऱ्‍याच जणांना द्योहानीला भेटण्याची संधी मिळाली. तिचे पुढील शब्द त्यांच्या हृदयाला स्पर्शून गेले: “आलेखांद्रा आणि तिच्या कुटुंबाचे उदाहरण मला खरोखर अनुकरणीय वाटते. मी यहोवाची सेवा करण्याचा निर्धार केला आहे आणि लवकरच मी बाप्तिस्मा घेणार आहे. नव्या जगात मला आलेखांद्राला पुन्हा भेटायचंय!”

होय, एक लहानसेच पत्र. पण त्याचा किती उत्तम व चिरकालिक परिणाम होऊ शकतो!