व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”

“एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”

“एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”

“बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.”रोमकर १२:१०.

१, २. आधुनिक काळातील एका मिशनरी बंधूचा व प्रेषित पौलाचा बांधवांशी कशाप्रकारचा नातेसंबंध होता?

सुदूर पूर्वेत मिशनरी सेवेच्या सबंध ४३ वर्षांतील काळात, डॉन हे आपल्या प्रेमळ वृत्तीबद्दल नावाजलेले होते. आता मात्र मरणासन्‍न स्थितीत असताना त्यांच्या बायबल विद्यार्थ्यांपैकी काही, शेवटल्या घटकेला त्यांच्या उशाशी येऊन “कामसाहामनीदा कामसाहामनीदा!” (कोरियन भाषेत, आभारी आहोत, आभारी आहोत!) असे म्हणण्याकरता हजारो किलोमीटरचा प्रवास करून आले होते. डॉन यांच्या स्नेहभावाने त्यांचे मन जिंकले होते.

डॉन यांचे उदाहरण एकमेव उदाहरण नाही. पहिल्या शतकात प्रेषित पौलाने ज्यांची सेवा केली त्या बांधवांबद्दल मनस्वी स्नेहभाव व्यक्‍त केला. पौलाने स्वार्थत्यागी मनोवृत्तीने त्यांची सेवा केली. तो दृढनिश्‍चयी वृत्तीचा असला तरीसुद्धा, “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्‍या दाईसारखे” प्रेम व ममता त्याने बांधवांना दाखवली. थेस्सलनीका येथील मंडळीला त्याने असे लिहिले: “आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:७, ८) नंतर, पौलाने इफिसस येथील ख्रिस्ती बांधवांना ही आपली शेवटचीच भेट असल्याचे सांगितले तेव्हा “ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.” (प्रेषितांची कृत्ये २०:२५, ३७) साहजिकच, पौल व त्याच्या बांधवांचा केवळ समान विश्‍वास असण्यापुरताच संबंध नव्हता तर त्यांचे नाते त्यापेक्षा गहिरे होते. त्यांना एकमेकांबद्दल उत्कट स्नेहभाव होता.

स्नेहभाव व प्रीती

३. स्नेहभाव व प्रीती यांच्याशी संबंधित असलेले बायबलमधील शब्द कशाप्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत?

शास्त्रवचनांत कळकळ, स्नेहभाव व सहानुभूती हे गुण, सर्व गुणांपेक्षा श्रेष्ठ अशा प्रीतीशी संबंधित आहेत. (१ थेस्सलनीकाकर २:८; २ पेत्र १:७) एखाद्या सुंदर हिऱ्‍याच्या विविध पैलूंप्रमाणे हे सर्व ईश्‍वरी गुण एकमेकांना पूरक आहेत. ते ख्रिश्‍चनांना एकमेकांच्या आणि त्यांच्या स्वर्गीय पित्याच्या जवळ आणतात. म्हणूनच प्रेषित पौलाने आपल्या सह विश्‍वासू बांधवांना असे आर्जवले: “प्रीतीमध्ये ढोंग नसावे . . . बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.”—रोमकर १२:९, १०.

४. “स्नेहभाव” असे भाषांतर केलेल्या मूळ शब्दाचा काय अर्थ होता?

पौलाने “स्नेहभाव” याकरता वापरलेल्या ग्रीक शब्दाचे मुळात दोन भाग आहेत; एकाचा अर्थ मैत्री आणि दुसऱ्‍याचा स्वाभाविक प्रीती. एका बायबल विद्वानाने स्पष्ट केल्याप्रमाणे, याचा अर्थ असा होतो की ख्रिश्‍चनांच्या “भक्‍तीचे ओळखचिन्ह म्हणजे ते सर्व एका प्रेमळ, घनिष्ठ व परस्पर साहाय्य करणाऱ्‍या कुटुंबासारखे आहेत.” तुम्हाला आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल असेच वाटते का? ख्रिस्ती मंडळीत एक मोकळे प्रेमळ वातावरण—एक आपुलकीची भावना असली पाहिजे. (गलतीकर ६:१०) याच धर्तीवर, जे. बी. फिलिप्प्सा यांचे द न्यू टेस्टमेंट इन मॉडर्न इंग्लिश हे भाषांतर रोमकर १२:१० या वचनाचे असे भाषंतर करते: “भावाभावांत असते त्याप्रकारचे खरे प्रेम आपण एकमेकांबद्दल बाळगावे.” आणि जेरुसलेम बायबल असे भाषांतर करते: “भावांनी करावे इतके प्रेम एकमेकांवर करा.” होय, ख्रिश्‍चनांना एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम हे केवळ असे करणे योग्य आहे म्हणून, किंवा निव्वळ कर्तव्याच्या भावनेने असू नये. ‘निर्दंभ बंधुप्रेमाने’ आपण “एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति” केली पाहिजे.—१ पेत्र १:२२.

‘एकमेकांवर प्रीति करण्यास देवाने शिकविले’

५, ६. (अ) आंतरराष्ट्रीय अधिवेशनांच्या माध्यमाने यहोवाने कशाप्रकारे आपल्या लोकांना ख्रिस्ती स्नेहभावाबद्दल शिकवले आहे? (ब) काळाच्या ओघात बांधवांमधील नाते कशाप्रकारे अधिक मजबूत होते?

या जगात “पुष्कळांची प्रीति” थंडावली असली तरीसुद्धा, यहोवा आपल्या आधुनिक काळातील लोकांना ‘एकमेकांवर प्रीती करण्यास’ शिकवत आहे. (मत्तय २४:१२; १ थेस्सलनीकाकर ४:९) यहोवाच्या साक्षीदारांची आंतरराष्ट्रीय अधिवेशने, हे प्रशिक्षण मिळवण्याकरता उत्तम संधी पुरवतात. या अधिवेशनांत, स्थानिक साक्षीदार दूर दूरच्या देशांतून आलेल्या आपल्या बांधवांना भेटतात आणि बऱ्‍याच जणांनी आपल्या घरांत या विदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले आहे. अलीकडेच झालेल्या एका अधिवेशनात काहीजण अशा एका देशातून आले होते, जेथे लोक आपल्या भावना व्यक्‍त करण्यात थोडे संकोचवृत्तीचे असतात. या बांधवांच्या मुक्कामाची व्यवस्था पाहणाऱ्‍या एका बांधवाने सांगितले: “प्रतिनिधी येथे आले तेव्हा ते अतिशय लाजाळू व संकोची होते. पण फक्‍त सहा दिवसांनंतर ते जायला निघाले तेव्हा, ज्यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला होता त्या बांधवांच्या गळ्यात पडून ते चक्क रडत होते. त्यांनी येथे अनुभवलेले ख्रिस्ती प्रेम ते कधीही विसरणार नाहीत.” निरनिराळ्या पार्श्‍वभूमींच्या आपल्या बांधवांचे आदरातिथ्य केल्याने, आतिथ्य करणाऱ्‍यांचे आणि ते अनुभवणाऱ्‍यांचेही उत्तम गुण प्रकट होतात.—रोमकर १२:१३.

अधिवेशनांत येणारे हे रोमांचक अनुभव तर अविस्मरणीय असतातच, पण जेव्हा ख्रिस्ती बांधव दीर्घकाळापर्यंत एकमेकांच्या सहवासात यहोवाची सेवा करतात तेव्हा त्यांच्यात आणखीनच घनिष्ट असे नाते निर्माण होते. आपल्या बांधवांना आपण चांगल्याप्रकारे ओळखू लागतो, तेव्हा त्यांच्या अमूल्य गुणांची आपण आणखीनच मनापासून कदर बाळगू शकतो; उदाहरणार्थ, त्यांचा खरेपणा, विश्‍वासूपणा, निष्ठा, दयाळूपणा, औदार्य, विचारीपणा, सहानुभूतीशीलता आणि त्यांची निःस्वार्थी वृत्ती. (स्तोत्र १५:३-५; नीतिसूत्रे १९:२२) पूर्व आफ्रिकेत मिशनरी या नात्याने सेवा केलेल्या मार्क नावाच्या बांधवाने असे म्हटले: “आपल्या भावांसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्याने त्यांच्यासोबत एक अतूट नाते जुळते.”

७. मंडळीत ख्रिस्ती प्रीति अनुभवण्याकरता काय करणे गरजेचे आहे?

मंडळीत असे नाते जोडून ते कायम ठेवण्याकरता मंडळीच्या सदस्यांनी एकमेकांशी जवळीक केली पाहिजे. ख्रिस्ती सभांना नियमितरित्या येऊन आपण आपल्या बंधू भगिनींशी असलेले नाते बळकट करत असतो. सभांच्या आधी, सभेदरम्यान व सभेनंतर उपस्थित राहून हिरीरीने सहभाग घेतल्यामुळे आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो आणि “प्रीति व सत्कर्मे करावयास” एकमेकांना उत्तेजन देतो. (इब्री लोकांस १०:२४, २५) संयुक्‍त संस्थानांतील एका वडिलाने सांगितले: “मला आठवते, मी लहान असताना आमचे कुटुंब नेहमी राज्य सभागृहातून बाहेर पडणारे शेवटचे असायचे. आम्ही अगदी शेवटपर्यंत सर्वांशी आनंदाने बोलायचो व उत्तेजनदायक संभाषणे करायचो.”

आपले अंतःकरण ‘विशाल करण्याची’ गरज आहे का?

८. (अ) पौलाने करिंथकरांना आपली अंतःकरणे ‘विशाल करण्याचे’ उत्तेजन दिले ते कोणत्या अर्थाने? (ब) मंडळीतील स्नेहभाव वाढीस लावण्याकरता आपण काय करू शकतो?

मंडळीतल्या बांधवांशी स्नेहसंबंध वाढवण्याकरता आपली अंतःकरणे कदाचित ‘विशाल करण्याची’ गरज असू शकते. करिंथ येथील मंडळीला प्रेषित पौलाने लिहिले: ‘आमचे अंतःकरण विशाल झाले आहे. आमचे अंतःकरण संकुचित नाही.’ पौलाने आपल्या या प्रेमाला प्रतिसाद देण्याकरता त्यांनाही आपली अंतःकरणे ‘विशाल करण्याचे’ उत्तेजन दिले. (२ करिंथकर ६:११-१३) तुम्हाला देखील प्रेम व्यक्‍त करण्याकरता आपले अंतःकरण ‘विशाल करता’ येईल का? इतरांनी पुढाकार घेऊन तुमच्याशी जवळीक करावी अशी अपेक्षा करत थांबून राहण्याची गरज नाही. रोमनांना लिहिलेल्या पत्रात खरा स्नेहभाव असण्याच्या गरजेवर भर देण्यासोबतच पौलाने हा सल्ला देखील दिला: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) इतरांना आदर दाखवण्याकरता सभांमध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना नमस्कार अथवा अभिवादन करू शकता. तसेच क्षेत्र सेवेत किंवा सभांची तयारी करण्यास आपल्याबरोबर सहभागी होण्याचे तुम्ही त्यांना सुचवू शकता. असे केल्यामुळे मंडळीत खरा स्नेहभाव बहरण्याकरता मार्ग मोकळा होतो.

९. सहख्रिस्ती बांधवांशी जवळीक वाढवण्याकरता काहींनी कोणती पावले उचलली आहेत? (एखादे स्थानिक उदाहरण असल्यास सांगावे.)

मंडळीतील कुटुंबे आणि व्यक्‍ती एकमेकांच्या घरी जाऊन भेटी देण्याद्वारे, साधेसे जेवणाचे निमंत्रण एकमेकांना देण्याद्वारे आणि निकोप मनोरंजनाचा सोबत मिळून आनंद लुटण्याद्वारे आपली अंतःकरणे ‘विशाल करू’ शकतात. (लूक १०:४२; १४:१२-१४) हाकोप नावाचे एक बंधू सहसा लहान लहान गटांकरता सहलींचे आयोजन करतात. ते सांगतात, “या सहलींत सर्व वयोगटातील बांधव, तसेच एकट्याने कुटुंब चालवणारे भाऊ बहिणी देखील सहभागी होतात. परतताना सगळेजण आपल्यासोबत गोड आठवणी नेतात आणि साहजिकच एकमेकांशी त्यांची जवळीक वाढते.” ख्रिस्ती या नात्याने केवळ सह विश्‍वासू बांधव असणे पुरेसे नाही; तर जिवलग मित्र किंवा स्नेही असण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.—३ योहान १४.

१०. संबंध तितके सुरळीत नसतात तेव्हा आपण काय करू शकतो?

१० अर्थात, कधीकधी अपरिपूर्णतेमुळे मैत्री व स्नेहभाव वाढवणे म्हणावे तितके सोपे नसते. अशा वेळी आपण काय करू शकतो? सर्वप्रथम आपण आपल्या बांधवांसोबत चांगले संबंध असण्याकरता प्रार्थना करू शकतो. देवाची इच्छा आहे की त्याच्या सर्व सेवकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, तेव्हा अशा प्रामाणिक प्रार्थनांचे तो नक्कीच उत्तर देईल. (१ योहान ४:२०, २१; ५:१४, १५) या प्रार्थनांच्या सामंजस्यात कृती करणेही गरजेचे आहे. पूर्व आफ्रिकेत प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने सेवा करणारे रिक हे एका बांधवाबद्दल सांगतात. या बांधवाच्या फटकळ स्वभावामुळे त्याच्याशी मैत्री करणे तितके सोपे नव्हते. रिक सांगतात, “या भावाला टाळण्याऐवजी मी त्याच्याशी अधिक चांगल्याप्रकारे ओळख करून घेण्याचे ठरवले. तेव्हा मला कळले की या भावाचे वडील अतिशय कडक शिस्तीचे होते. अशा प्रकारच्या पार्श्‍वभूमीच्या परिणामांवर मात करण्याकरता त्याने आजवर किती संघर्ष केला होता आणि आतापर्यंत जी प्रगती केली होती हे समजून घेतल्यानंतर मात्र मला त्याचे कौतुक वाटू लागले. आम्ही चांगले मित्र बनलो.”—१ पेत्र ४:८.

मन मोकळे करा!

११. (अ) मंडळीतील स्नेहभाव वाढण्याकरता कशाची गरज आहे? (ब) इतरांजवळ मोकळेपणाने भावना व्यक्‍त न करण्याची वृत्ती आध्यात्मिकरित्या अपायकारक का ठरू शकते?

११ काहीजणांचे सबंध आयुष्य निघून जाते, तरीसुद्धा ते कोणाशी जवळची मैत्री करू शकत नाहीत. ही किती दुःखाची गोष्ट आहे! पण ख्रिस्ती मंडळीत असे घडण्याचे कारण नाही—किंबहुना, असे घडूच नये. खरे बंधूप्रेम म्हणजे केवळ औपचारिक संभाषण आणि सभ्य वर्तन नव्हे; तसेच भावनातिरेक किंवा प्रेमाचा उमाळा म्हणजेही खरे बंधूप्रेम नव्हे. याउलट, पौलाने करिंथकर ख्रिश्‍चनांबद्दल ज्याप्रकारे आपले अंतःकरण विशाल केले त्याचप्रकारे आपण देखील आपल्या सहविश्‍वासू बांधवांकरता करावे; त्यांच्या हिताची आपल्याला खरोखर काळजी आहे हे त्यांना आपण कळू द्यावे. सगळेच स्वभावाने संगतीप्रिय किंवा मनमोकळे नसतात हे कबूल आहे; पण खूपच फटकून राहणे देखील आपल्याकरता अपायकारक ठरू शकते. बायबल ताकीद देते, “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.”—नीतिसूत्रे १८:१.

१२. मंडळीत घनिष्ट संबंध निर्माण होण्याकरता उत्तम सुसंवादाची गरज का आहे?

१२ खऱ्‍या मैत्रीकरता प्रामाणिक सुसंवाद असणे अनिवार्य आहे. (योहान १५:१५) आपल्या सर्वांना अशा मित्रमैत्रिणींची गरज आहे की ज्यांच्याजवळ आपण आपल्या अगदी मनातले विचार व भावना व्यक्‍त करू शकतो. शिवाय, आपण एकमेकांना जितक्या चांगल्याप्रकारे ओळखू, तितक्याच एकमेकांच्या गरजा पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल. जेव्हा आपण अशाप्रकारे एकमेकांच्या हितांबद्दल कळकळ व्यक्‍त करतो तेव्हा आपोआपच स्नेहभाव वाढतो; तसेच आपल्याला येशूच्या पुढील शब्दांची प्रचिती येईल: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५; फिलिप्पैकर २:१-४.

१३. आपल्याला आपल्या बांधवांबद्दल खरा स्नेहभाव आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

१३ आपल्या स्नेहभावामुळे इतरांना फायदा होण्याकरता आपण तो व्यक्‍त केला पाहिजे. (नीतिसूत्रे २७:५) आपला स्नेहभाव प्रामाणिक असल्यास, तो आपल्या चेहऱ्‍यावर दिसून येईल आणि यामुळे इतरांना मनापासून प्रतिसाद देण्यास प्रेरणा मिळेल. बायबलमधील नीतिसूत्र म्हणते: “नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्लासविते.” (नीतिसूत्रे १५:३०) विचारशील कृत्यांमुळेही स्नेहभाव वाढतो. खरे प्रेम विकत घेता येत नाही पण मनापासून दिलेली भेटवस्तू अतिशय अर्थपूर्ण असू शकते. एखादे कार्ड, पत्र किंवा “समयोचित भाषण” हे सर्व उत्कट स्नेहभाव व्यक्‍त करू शकतात. (नीतिसूत्रे २५:११; २७:९) इतरांशी मैत्री जोडल्यानंतर आपण निःस्वार्थ कृतींनी ती कायम ठेवली पाहिजे. खासकरून गरजेच्या वेळेस आपण आपल्या मित्रांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. बायबल म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.

१४. एखादी व्यक्‍ती आपल्या स्नेहीपणाला प्रतिसाद देत नसल्यास आपण काय करावे?

१४ अर्थात मंडळीतल्या सर्वांशीच असा जवळचा संबंध असण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. साहजिकच, इतरांच्या तुलनेत काहीजण आपल्याला जास्त जवळचे वाटतील. तेव्हा, मंडळीतल्या कोणाशी तुम्हाला जितका जवळचा संबंध ठेवावासा वाटतो तितका जवळचा संबंध जोडण्याची त्यांची इच्छा नसल्याचे भासते तेव्हा नक्कीच त्यांच्यात किंवा आपल्यात काहीतरी समस्या असावी असा निष्कर्ष काढू नका. आणि जबरदस्तीने त्या व्यक्‍तीशी जवळचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नका. ती व्यक्‍ती जितका वाव देते तितकीच मैत्री तिच्याशी केल्यास तुम्ही भविष्यात जवळचा संबंध जोडण्याचा मार्ग मोकळा ठेवता.

“तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे”

१५. प्रशंसा केली जाते, किंवा केली जात नाही तेव्हा इतरांवर कोणता परिणाम होतो?

१५ “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे” हे शब्द येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी, त्याने स्वर्गातून ऐकले तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. (मार्क १:११) हे पसंतीवाचक शब्द ऐकून येशूला आपल्या पित्याच्या प्रेमाची अधिकच खात्री वाटली असेल. (योहान ५:२०) पण दुःखाची गोष्ट म्हणजे बऱ्‍याच जणांना, ते ज्यांचा आदर करतात व ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्याकडून अशी स्तुती कधीच मिळत नाही. ॲन नावाची एक मुलगी म्हणते, “माझ्यासारख्या अनेक मुलामुलींचे कौटुंबिक सदस्य ख्रिस्ती विश्‍वासात नसतात. घरात आम्हाला फक्‍त त्यांची टीका ऐकायला मिळते. अर्थातच आम्हाला यामुळे फार वाईट वाटते.” पण जेव्हा अशा व्यक्‍ती मंडळीत सहभागी होतात तेव्हा त्यांना एका प्रेमळ आध्यात्मिक कुटुंबाचा सहवास लाभतो; एक असे कुटुंब, की ज्यात एकाच विश्‍वासाचे, त्यांच्याबद्दल कळकळ असलेले व त्यांना मदत करण्यास उत्सुक असणारे पिता व माता, भाऊ व बहिणी असतात.—मार्क १०:२९, ३०; गलतीकर ६:१०.

१६. टीका करण्याची वृत्ती इतरांच्या उपयोगाची का नाही?

१६ काही संस्कृतींत आईवडील, वडीलजन आणि शिक्षक क्वचितच तरुणांची मनापासून प्रशंसा करतात; त्यांच्या मते अशी स्तुती केल्यामुळे मुले आळशी किंवा गर्विष्ठ बनतील. अशाप्रकारच्या विचारसरणीचा प्रभाव ख्रिस्ती कुटुंबांवर व मंडळीवरही होऊ शकतो. एखाद्या भाषणाविषयी किंवा एखाद्याने केलेल्या इतर प्रयत्नांविषयी काही मोठी माणसे असे म्हणतील: “ठीक होते, पण आणखी चांगले करता येईल!” किंवा दुसऱ्‍या मार्गांनी ते एखाद्या तरुणाबद्दल आपली नापसंती व्यक्‍त करतील. असे केल्यामुळे आपण तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देत आहोत असे बऱ्‍याच जणांना वाटते. पण यामुळे सहसा उलटच परिणाम होतो कारण आपण कधीही चांगले करू शकणार नाही अशा भावनेने ती तरुण व्यक्‍ती प्रयत्नच करण्याचे सोडून देण्याची शक्यता आहे.

१७. इतरांची प्रशंसा करण्याच्या संधी आपण का शोधाव्यात?

१७ पण प्रशंसा ही नेहमी काहीतरी सल्ला देण्याच्या आधी प्रस्तावना म्हणून केली जाऊ नये. प्रामाणिक प्रशंसा केल्यामुळे कुटुंबात व मंडळीत प्रेमळ वातावरण निर्माण होते आणि तरुणांना अनुभवी भाऊबहिणींकडून सल्ला आपणहूनच मागण्याचे प्रोत्साहन मिळते. तेव्हा, इतरांशी वागताना आपल्या वर्तनावर विशिष्ट संस्कृतीचा प्रभाव न पडू देता, आपण “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” यहोवाचे अनुकरण करून इतरांची प्रशंसा करा.—इफिसकर ४:२४.

१८. (अ) तरुणांनो, तुम्ही मोठ्यांकडून मिळणाऱ्‍या सल्ल्याविषयी कसा दृष्टिकोन ठेवावा? (ब) सल्ला देताना आपण तो कशाप्रकारे मांडतो याविषयी मोठी माणसे का विचार करतात?

१८ दुसरीकडे पाहता, तरुणांनो, मोठी माणसे तुमच्या चुका सुधारतात किंवा तुम्हाला सल्ला देतात याचा अर्थ ते तुमचा द्वेष करतात असा निष्कर्ष काढू नका. (उपदेशक ७:९) उलट ते तुमच्यावर प्रेम करतात, आणि त्यांना तुमची मनापासून काळजी आहे. नाहीतर त्यांनी एखाद्या विषयावर तुमच्याशी बोलण्याची तसदीच का घेतली असती? शब्दांमुळे किती मोठा परिणाम होऊ शकतो हे ओळखून मोठी माणसे—विशेषतः मंडळीतील वडील अनेकदा, कोणालाही सल्ला देण्याअगोदर बराच विचार व प्रार्थना करतात कारण आपल्या सल्ल्यामुळे केवळ फायदा व्हावा अशी त्यांची इच्छा असते.—१ पेत्र ५:५.

यहोवा कनवाळू व स्नेही आहे

१९. पूर्वी ज्यांना निराशजनक अनुभव आले आहेत, ते यहोवाकडून आधाराची अपेक्षा का करू शकतात?

१९ गतकाळातील काही अनुभवांमुळे काहीजणांना असे वाटत असेल की इतरांना स्नेहभाव दाखवल्याने निराशाच पदरी पडते. तेव्हा पुन्हा एकदा इतरांकरता आपल्या अंतःकरणाची दारे उघडण्याकरता त्यांना धैर्याची व दृढ विश्‍वासाची गरज आहे. पण त्यांनी कधीही विसरू नये की यहोवा “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” तो आपल्याला त्याच्या जवळ येण्याचे आवाहन करतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२७; याकोब ४:८) तसेच आपले मन दुखावले जाण्याची आपल्याला भीती वाटते हेही तो समजून घेतो आणि आपल्या पाठीशी राहून आपल्याला साहाय्य करण्याचे तो आश्‍वासन देतो. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो त्याप्रमाणे: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तोत्र ३४:१८.

२०, २१. (अ) आपण यहोवासोबत घनिष्ट नाते जोडू शकतो असे कशावरून म्हणता येईल? (ब) यहोवाचे सख्य अनुभवण्याकरता कशाची गरज आहे?

२० इतर कोणत्याही संबंधापेक्षा यहोवासोबतचा आपला घनिष्ट नातेसंबंध जास्त महत्त्वाचा आहे. पण असा नातेसंबंध जोडणे शक्य आहे का? होय. बायबल आपल्याला दाखवते की धार्मिक स्त्रीपुरुषांचे यहोवासोबत किती जवळचे नाते होते. देवाबद्दल त्यांचे हृद्य उद्‌गार आपल्याकरता राखून ठेवण्यात आले आहेत जेणेकरून आपल्याला ही खात्री मिळावी की आपणही देवाच्या समीप येऊ शकतो.—स्तोत्र २३, ३४, १३९; योहान १६:२७; रोमकर १५:४.

२१ यहोवासोबत घनिष्ट संबंध जोडू इच्छिणाऱ्‍यांकडून तो काही अपेक्षा करतो पण या अपेक्षा कोणालाही पूर्ण करता येण्याजोग्या आहेत. दाविदाने म्हटले: “हे परमेश्‍वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? . . . जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो.” (स्तोत्र १५:१, २; २५:१४) देवाची सेवा केल्याने उत्तम फळ प्राप्त होते आणि आपल्याला त्याचे मार्गदर्शन व संरक्षण लाभते हे आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला यहोवा किती “कनवाळू” अर्थात स्नेही आहे याची प्रचिती येईल.—याकोब ५:११.

२२. आपल्या लोकांमध्ये कशाप्रकारचा संबंध असावा अशी यहोवाची इच्छा आहे?

२२ यहोवा आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांसोबत असा वैयक्‍तिक संबंध ठेवू इच्छितो हा आपल्याकरता किती मोठा आशीर्वाद आहे! मग आपणही एकमेकांप्रती स्नेहभाव व्यक्‍त करू नये का? हा स्नेहभाव आपल्या ख्रिस्ती बंधूसमाजाचे ओळखचिन्ह आहे. आणि यहोवाच्या मदतीने आपल्यापैकी प्रत्येक जण यात आपले योगदान देऊ शकतो व हा स्नेहभाव अनुभवू शकतो. देवाच्या राज्यात पृथ्वीवर सर्वजण या स्नेहाचा सर्वकाळ अनुभव घेतील.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• ख्रिस्ती मंडळीत कशाप्रकारचे वातावरण असावे?

• मंडळीत स्नेहभाव वाढण्याकरता आपण प्रत्येकजण कशाप्रकारे योगदान देऊ शकतो?

• प्रामाणिक प्रशंसेमुळे ख्रिस्ती स्नेहभाव कशाप्रकारे वाढीस लागतो?

• यहोवाचा कनवाळूपणा अर्थात स्नेह कशाप्रकारे आपले साहाय्य व संरक्षण करते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

ख्रिश्‍चनांमध्ये दाखवले जाणारे प्रेम हे केवळ कर्तव्याच्या भावनेतून नसते

[१६, १७ पानांवरील चित्रे]

स्नेहभाव दाखवण्याकरता तुम्ही आपले अंतःकरण “विशाल” करू शकता का?

[१८ पानांवरील चित्र]

तुमची टीका करण्याची वृत्ती आहे की प्रोत्साहन देण्याची?