व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनभर चाललेलं शिक्षण

जीवनभर चाललेलं शिक्षण

जीवन कथा

जीवनभर चाललेलं शिक्षण

हॅरल्ड ग्लुयस यांच्याद्वारे कथित

माझ्या बालपणचं एक दृश्‍य गेल्या ७० वर्षांपासून माझ्या आठवणीत राहिलं आहे. मी स्वयंपाक घरात बसून “सिलोन टी” असं लिहिलेल्या एका लेबलकडे बघत होतो. त्यावर, सिलोनच्या (आता श्रीलंका) हिरव्यागार चहाच्या मळ्यांतून चहाची पानं खुडणाऱ्‍या स्त्रियांचा फोटो होता. चित्रातलं दृश्‍य, दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या कोरड्या भूमीवरील आमच्या घरापासून कितीतरी लांब होतं तरीपण या दृश्‍यानं मी मोहीत झालो. सिलोन किती देखणा आणि अजब देश असावा! माझ्या जीवनातले ४५ वर्षं एक मिशनरी म्हणून मी या देखण्या द्वीपावर असेन, अशी मला तेव्हा मुळीच कल्पना नव्हती.

एप्रिल १९२२ साली, आजच्या जगापासून अगदी वेगळ्या असलेल्या जगात माझा जन्म झाला. माझं कुटुंब, विस्तृत ऑस्ट्रेलियन खंडाच्या अगदी मध्यभागी असलेल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड वाळवंटाच्या दक्षिणेकडील किनाऱ्‍यावरील दूरवर वसलेल्या किंबा शहराजवळच्या आडवळणी धान्याच्या मळ्यात काम करायचे. जीवन तेव्हा इतकं सोपं नव्हतं; पाणीटंचाई, कीटकांचा रोग, जीव नकोसा करणारा उकाडा यांचा सतत सामना करावा लागायचा. बाबा आणि आम्हा सहा मुलांची काळजी घेण्यासाठी आई रक्‍ताचं पाणी करायची; आम्ही पत्र्याच्या एका लहानशा घरात राहायचो.

माझ्यासाठी मात्र हे ठिकाण मुक्‍त जीवनाचं आणि मौजमजेचं होतं. शक्‍तिशाली गवे रानटी झुडुपे कसे साफ करतात, धुळीच्या घोंघावणाऱ्‍या वादळानं संपूर्ण वातावरण कसं धूळकट व्हायचं हे पाहून मला खूप आश्‍चर्य वाटायचं. आमच्या घरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर एक लहानशी शाळा होती; तिथं एकच शिक्षक होते. पण या शाळेत जायच्या आधीच माझं शिक्षण सुरू झालं होतं.

आईबाबा तसे धार्मिक प्रवृत्तीचे होते पण ते सहसा चर्चला जायचे नाहीत—मुख्य कारण म्हणजे चर्च आमच्या घरापासून खूपच लांब होते. पण, १९३० दशकाच्या सुरवातीला आई, अडलएडमधील एका रेडिओ स्टेशनहून दर आठवडी जज रदरफोर्ड यांची जी बायबल आधारित व्याख्याने प्रक्षेपित व्हायची ते ऐकायची. मला वाटायचं, की जज रदरफोर्ड हे अडलएडमधील कोणीतरी प्रचारक असावेत; आणि मला त्यात इतका काही रस नव्हता. पण दर आठवडी आई रदरफोर्ड यांच्या व्याख्यानांची वाट पाहायची आणि बॅटरीवर चालणाऱ्‍या आमच्या जुन्या रेडिओवरून ऐकू येणारं ते अस्पष्ट व्याख्यान ती मन लावून ऐकायची.

एके दिवशी, भर उन्हातान्हात एक जुना पिकअप ट्रक धूळ उडवत आमच्या घरासमोर येऊन उभा राहिला आणि त्यातून दोन सुटाबुटातले पुरुष खाली उतरले. ते यहोवाचे साक्षीदार होते. आईनं त्यांचा संदेश ऐकला आणि त्यांच्याकडून घेतलेल्या अनेक पुस्तकांसाठी बऱ्‍यापैकी वर्गणी देखील दिली; तिनं लगेच ही पुस्तके वाचायला सुरू केलं. ही पुस्तकं वाचून तिच्या मनावर इतका खोल प्रभाव पडला, की तिनं लगेच बाबांना सांगितलं, मला गाडीनं शेजारच्या लोकांपर्यंत पोहंचवा म्हणजे मला, मी जे काही शिकत आहे ते त्यांना सांगता येईल.

सकारात्मक प्रभावाचा लाभ

आमच्या दूरदस्त ग्रामीण भागात जगणं कठीण होऊ लागल्यामुळे काही दिवसांतच आम्हाला आमचं घर सोडून, ५०० किलोमीटर दूर असलेल्या अडलएडच्या शहरात जाऊन राहावं लागलं. आमचं कुटुंब यहोवाच्या साक्षीदारांच्या अडलएड मंडळीशी सहवास राखू लागलं आणि आध्यात्मिक प्रगती करू लागलं. घर बदल्यामुळे माझं शिक्षणही थांबलं. वयाच्या १३ वर्षापर्यंत मी शाळा केली; मी सातवीपर्यंत शिकलो. मी चंचल स्वभावाचा होतो, त्यामुळे मी सहज आध्यात्मिक गोष्टींपासून भरकटत गेलो असतो; पण अनेक पायनियर किंवा पूर्ण वेळेचे सेवक असलेल्या बांधवांनी माझ्याकडे जातीनं लक्ष दिल्यामुळं बरं झालं.

काळाच्या ओघात या आवेशी बांधवांच्या प्रभावानं, माझ्यातील सुप्त आध्यात्मिकता जागी झाली. मला त्यांच्याबरोबर राहायला आवडू लागलं, त्यांच्या कष्टाळू वृत्तीचं मला कौतुक वाटायचं. त्यामुळे १९४० साली, अडलएडमध्ये भरवलेल्या एका अधिवेशनात जेव्हा पूर्ण वेळेच्या सेवेत प्रवेश करण्याविषयी घोषणा करण्यात आली तेव्हा आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मी माझं नाव दिलं! त्या वेळी माझा अजून बाप्तिस्माही झाला नव्हता आणि साक्षकार्यात मला फार कमी अनुभव होता. तरीपण काही दिवसांतच मला वॉरनमबुलमधील पायनियरांच्या एका लहानशा गटात सामील होण्याचं आमंत्रण मिळालं; वॉरनमबुल हे शहर, शेजारच्या व्हिक्टोरिया राज्यात अडलएडपासून जवळजवळ ५०० मैल दूर होते.

मी सुरवातीला असा चलबिचल होतो तरी नंतर मात्र क्षेत्र सेवेत जायला मला आवडू लागलं आणि त्यानंतर ही आवड कमी झालेली नाही, हे सांगायला मला आनंद वाटतो. हा खरं तर माझ्या जीवनातला एक महत्त्वाचा क्षण होता; मी खरी आध्यात्मिक प्रगती करू लागलो. आध्यात्मिक गोष्टींबद्दल आवड बाळगणाऱ्‍यांबरोबर जवळीक साधणे किती महत्त्वाचं आहे हे मी शिकलो. आपलं कितीही शिक्षण झालेलं असलं तरी, या अनुभवी बंधूभगिनींच्या प्रभावामुळे आपल्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर कशा येऊ शकतात आणि या सर्वांचा आपल्याला आयुष्यभर लाभ कसा होऊ शकतो, हे मला समजलं.

परीक्षांमुळे मजबूत झालो

मी पायनियर सेवा सुरू करून जास्त काळ झाला नव्हता तेवढ्यात ऑस्ट्रेलियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घालण्यात आली. आता काय करायचं हे माहीत नसल्यामुळे मी बांधवांना याबाबतीत मार्गदर्शन विचारलं, तेव्हा ते म्हणाले, की लोकांबरोबर बायबलविषयी बोलायला बंदी नाही. त्यामुळे इतर पायनियर बंधूभगिनींबरोबर मी देखील घरोघरी जाऊन बायबलमधला एक साधासा संदेश लोकांना सांगू लागलो. यामुळे पुढे आमच्यावर येणाऱ्‍या परीक्षांसाठी मी तयार झालो.

चार महिन्यांनंतर जेव्हा मला १८ वर्षं पूर्ण झाली तेव्हा मला लष्करी सेवेसाठी बोलावण्यात आलं. यामुळे मला अनेक लष्करी अधिकाऱ्‍यांसमोर आणि एका मॅजिस्ट्रेटसमोर माझ्या विश्‍वासाचे समर्थन करण्याची संधी मिळाली. त्या वेळी, जवळजवळ २० बांधव त्यांच्या तटस्थ भूमिकेसाठी अडलएड तुरुंगात होते; मलाही तुरुंगात टाकण्यात आलं. आम्हाला सर्वात कष्टाचं काम—दगड फोडायचं आणि रस्ते दुरूस्त करायचं काम देण्यात आलं. यामुळे मी धीर, दृढनिश्‍चय यांसारखे गुण स्वतःमध्ये उत्पन्‍न करू शकलो. आमच्या चांगल्या वर्तनामुळे व करारी भूमिकेमुळे सरतेशेवटी तुरुंग रक्षक आमचा आदर करू लागले.

अनेक महिन्यांनी माझी सुटका झाल्यानंतर मला चवीचं जेवण खायला मिळालं आणि पुन्हा पायनियर सेवा सुरू केली. त्या काळी पायनियर सोबती कमी होते त्यामुळे दक्षिण ऑस्ट्रेलियात मळे असलेल्या दूरदस्त क्षेत्रात एकट्याने सेवा करणार का असं मला विचारण्यात आलं. मी होकार दिला आणि यॉर्क पेनिनसुलाला जाण्यासाठी, साक्षीकार्याकरता लागणारं साहित्य आणि माझी सायकल इतकंच सामान घेऊन जहाजात बसलो. तिथं पोहंचल्यावर, सत्यात आवड दाखणाऱ्‍या एका कुटुंबानं मला एका लहानशा गेस्टहाऊसकडे जाण्यास सांगितलं; तिथली बाई प्रेमळ होती, ती मला आपला मुलगा समजायची. दिवसा मी धुळीच्या रस्त्यांवरून सायकलीनं द्वीपकल्पावर इतरत्र विखुरलेल्या लहान लहान गावांमध्ये प्रचार करायचो. लांबच्या क्षेत्रात गेल्यावर मी बहुतकेदा रात्रीचं तिथल्याच एखाद्या हॉटेलमध्ये किंवा गेस्टहाऊसमध्ये राहायचो. अशाप्रकारे मी सायकलीवर शेकडो किलोमीटर प्रवास केला आणि मला अनेक उत्तम अनुभव आले. सेवेत मी एकटा जायचो तर मला कधी काळजी वाटली नाही, कारण यहोवा माझी काळजी घेत होता आणि मी त्याच्या जवळ आलो होतो.

अपुरेपणाच्या भावनांचा सामना

१९४६ साली मला, बांधवांची सेवा करणारा सेवक म्हणून (आता प्रवासी पर्यवेक्षक म्हटलं जातं) प्रवासी कार्य स्वीकारण्याचं आमंत्रण मिळालं. यासाठी मला एका नेमलेल्या विभागातील अनेक मंडळ्यांना भेटी द्याव्या लागणार होत्या. या नेमणूकीतील जबाबदाऱ्‍या कठीण होत्या, हे मी कबूल करतो. एकदा मी एका बांधवाला असं म्हणताना ऐकलं: “हॅरल्डला स्टेजवर भाषण द्यायला इतकं जमत नाही, पण तो प्रचार कार्य चांगलं करतो.” हे ऐकल्यामुळे मला खूप उत्तेजन मिळालं. मी भाषण देण्यात, कार्याचं संघटन करण्यात इतका काही निपुण नव्हतो याची मला जाणीव होती, पण मला असं वाटायचं, की प्रचार कार्य हे ख्रिश्‍चनांसाठी सर्वात महत्त्वाचं कार्य आहे.

१९४७ साली, ब्रुकलिनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातून बंधू नेथन नॉर आणि मिल्टन हेन्शल यांच्या भेटीबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. १९३८ साली बंधू रदरफोर्ड येऊन गेल्यानंतर, मुख्यालयातून येणाऱ्‍या बांधवांची ही पहिलाच भेट होती. या भेटीच्या वेळी सिडनीत एक मोठं अधिवेशन आयोजण्यात आलं. इतर अनेक तरुण पायनियरांप्रमाणे मलाही, अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील साऊथ लॅन्सींग इथं नव्यानं सुरू झालेल्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेत मिशनऱ्‍यांना मिळणारं प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती. या प्रशालेत नाव दाखल करण्याकरता, खूप शिक्षणाची आवश्‍यकता लागेल की काय असं उपस्थित असलेल्या आम्हा बहुतेकांना वाटतं होतं. पण, टेहळणी बुरूज मधील एखादा लेख आम्ही वाचू शकत असलो व मुख्य मुद्दे लक्षात ठेवू शकत असलो तर गिलियडमध्ये आम्ही यशस्वी होऊ, असं बंधू नॉर यांनी स्पष्टीकरण दिलं.

मला वाटलं, की माझ्या कमी शिक्षणामुळे मी कदाचित गिलियडसाठी पात्र ठरणार नाही. पण, अनेक महिन्यांनंतर मला गिलियड प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याचं आमंत्रण मिळालं. कालांतरानं मला विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यात आलं आणि १९५० साली झालेल्या १६ व्या वर्गात मी उपस्थित राहिलो. हा माझ्यासाठी एक सुरेख अनुभव होता ज्यामुळे माझा भरवसा दुप्पट झाला आहे. यश मिळण्यासाठी शैक्षणिक पात्रता हे प्रमुख कारण नाही, हे मला समजलं. त्याऐवजी, मनःपूर्वक प्रयत्न आणि आज्ञाधारकपणा हे मुख्य गुण हवे होते. आमच्या शिक्षकांनी आम्हाला सर्व प्रयत्न पणाला लावण्याचं उत्तेजन दिलं. मी जसजसं त्यांच्या सल्ल्याचं अनुकरण करत राहिलो तसतसं सतत प्रगती करत गेलो आणि तेथील प्रशिक्षण बऱ्‍यापैकी समजू शकलो.

कोरड्या प्रदेशातून रत्नासारख्या द्वीपाकडे

पदवीदानानंतर, ऑस्ट्रेलियातील दोन बांधवांना आणि मला सिलोनला (आता श्रीलंका) नेमण्यात आलं. १९५१ सालच्या सप्टेंबर महिन्यात आम्ही राजधानी शहर कोलंबो येथे पोहंचलो. तेथे खूप उकाडा होता आणि दमट वातावरण होतं; आम्हाला नवीन दृश्‍य, नवीन आवाज, नवीन सुवास असा मिश्र अनुभव आला. जहाजातून उतरल्याबरोबर, तिथं आधीपासूनच राहत असलेल्या मिशनऱ्‍यांपैकी एक बंधू जे आम्हाला भेटायला आले होते त्यांनी एक हॅण्डबील देऊनच माझं स्वागत केलं; त्यात पुढच्या रविवारी शहरातल्या चौकात होणाऱ्‍या जाहीर भाषणाची जाहिरात होती. आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, त्या हॅण्डबीलवर वक्‍ता म्हणून माझंच नाव होतं! मला किती भीती वाटली असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. पण ऑस्ट्रेलियात पायनियरींग केलेल्या इतक्या वर्षांनी मला, मिळेल ती नेमणूक स्वीकारायला शिकवलं होतं. त्यामुळे यहोवाच्या मदतीनं मी अगदी धैर्यानं ते भाषण दिलं. त्याकाळी, कोलंबो मिशनरी गृहात आधीपासूनच असलेल्या चार अविवाहित बांधवांबरोबर आम्ही तिघंही सिन्हाला ही अवघड भाषा शिकू लागलो आणि क्षेत्र सेवेत जाऊ लागलो. बहुतेकदा आम्ही एकट्याने कार्य करायचो; स्थानीय लोक आमच्याशी आदरानं वागायचे, आमचा पाहुणचार करायचे. बघता बघता, सभांची उपस्थिती वाढायला लागली.

वेळ जसजशी सरत गेली तसतसं मी, सीबल नावाच्या एका आकर्षक पायनियर भगिनीबद्दल गंभीरपणे विचार करू लागलो. तिला मी गिलियड प्रशालेला जहाजातून जात असताना भेटलो होतो. ती न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी चालली होती. नंतर, ती गिलियडच्या २१ व्या वर्गात उपस्थित राहिली आणि १९५३ साली तिला हाँगकाँगला नेमणूक मिळाली. मी तिला पत्र लिहिण्याचं ठरवलं आणि १९५५ सालापर्यंत आम्ही एकमेकांना पत्र लिहित होतो; त्यानंतर ती सिलोनला आली आणि आमचं तिथंच लग्न झालं.

मिशनरी जोडपं या नात्यानं आमची पहिली नेमणूक, श्रीलंकेच्या उत्तरेकडे दूरवर वसलेल्या जाफना नावाच्या एका शहरात होती. १९५० दशकाच्या मध्यात, राजकीय मतभेदांमुळे सिन्हाला आणि तामीळ समाजांमध्ये फुटी पडू लागल्या; ज्यामुळे नंतरच्या दशकांमध्ये सशस्त्र झगडे सुरू झाले. पण, या कठीण काळांत सिन्हाला व तामीळ साक्षीदारांनी कधी कधी महिनोंमहिने एकमेकांना आसरा दिल्याचे आम्ही पाहिलं; हा अनुभव खरोखर हृदयस्पर्शी होता. या परीक्षांमुळे बांधवांचा विश्‍वास कसास उतरला आणि मजबूत झाला.

श्रीलंकेत प्रचारकाम व शिकवणे

हिंदू-मुस्लिम समाजाबरोबर जुळवून घेण्याकरता धीर आणि चिकाटीची आवश्‍यकता होती. हळूहळू आम्हाला दोन्ही संस्कृतींबद्दल आदर वाटू लागला आणि त्यांच्या चांगल्या गुणांचा आम्हाला परिचय झाला. स्थानीय बसेसमध्ये आमच्यासारख्या विदेशी लोकांना पाहून लोकांना खूप आश्‍चर्य वाटायचं; ते आमच्याकडे कुतूहलानं एकटक बघत राहायचे. सीबलनं मग अशा लोकांकडे स्मितहास्य करण्याचं ठरवलं. यामुळे, मग लोकही तिला पाहून स्मितहास्य करू लागले.

एकदा आम्हाला एका रोडब्लॉकला थांबवण्यात आलं. तुम्ही कुठून आलात आणि आता कुठं चालला आहात, असं रक्षकानं आम्हाला विचारल्यावर तो आमच्याविषयी आणखीच जास्त खोदून विचारू लागला.

“ही स्त्री कोण आहे?”

“माझी बायको आहे,” मी त्याला म्हणालो.

“किती वर्षं झालीत तुमच्या लग्नाला?” त्यानं विचारलं.

“आठ वर्षं.”

“मुलं आहेत का?”

“नाही.”

“अरे बापरे! डॉक्टरकडे गेला नाहीत का मग?”

लोकांच्या या उत्सुकतेचं सुरवातीला आम्हाला जरा विचित्र वाटलं; पण नंतर आम्हाला समजलं, की स्थानीय लोकांना इतरांबद्दल अशी कळकळ व्यक्‍त करण्याची सवयच आहे. खरं तर त्यांचा हा स्वभाव आम्हाला अत्यंत आवडला. सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्‍ती जरा जास्त वेळ उभी राहिलेली दिसली की, कोणीतरी लगेच जवळ येऊन, काही मदत हवी का, असं विचारायचं.

बदल आणि पुनरावलोकन

या सर्व वर्षांत आम्ही श्रीलंकेतील मिशनरी कार्याबरोबर इतर अनेक नेमणुकांचा आनंद उपभोगला आहे. मला विभागीय आणि जिल्हा पर्यवेक्षक म्हणून तसेच शाखा समितीचा सदस्य म्हणून कार्य करण्याची नेमणूक मिळाली. १९९६ सालापर्यंत मी सत्तरीच्या मध्यात होतो तेव्हा, श्रीलंकेत ४५ वर्षे मिशनरी कार्य करण्याचा आनंद मला लाभला होता. मी कोलंबोत पहिल्यांदा सभेला गेलो तेव्हा केवळ २० जण उपस्थित होते. ही संख्या वाढून ३,५०० पेक्षा अधिक झाली होती! यांतील पुष्कळ प्रिय जणांना सीबल आणि मी आमची आध्यात्मिक मुलं, नातवंडं समजायचो. तरीपण अजून पुष्कळ कार्य करणं बाकी होतं—आमच्यापेक्षा तरुण असलेल्यांना या कार्यात आपली शक्‍ती, आपली कला कामी लावण्याची गरज होती. हे लक्षात ठेवून आम्ही, नियमन मंडळानं आम्हाला पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाण्यास सांगितलं तेव्हा आम्ही त्यांच्या सूचनेचं पालन केलं. यामुळे, अनुभवी असलेल्या तरुण जोडप्यांना श्रीलंकेत आमच्या जागी मिशनरी म्हणून जाण्यास वाव मिळाला आहे.

आता मला ८२ वे वर्षं चालू आहे आणि सीबल आणि मी अजूनही अडलएडच्या माझ्या जुन्या ठिकाणी खास पायनियर सेवा करण्यास सुदृढ आहोत. सेवेमुळे आम्ही दोघंही मानसिकरीत्या सतर्क राहतो आणि येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो. या देशातल्या अगदी वेगळ्याच जीवनशैलीशी जुळवून घ्यायला देखील आम्हाला मदत झाली आहे.

यहोवा आतापर्यंत आमच्या सर्व आर्थिक गरजा भागवत आला आहे आणि आमच्या स्थानीय मंडळीतले सर्व बंधूभगिनी आमच्यावर खूप प्रेम करतात, आम्हाला आधार देतात. अलीकडेच मला एक नवीन नेमणूक मिळाली. मला आमच्या मंडळीत सेक्रटरीचं काम पाहायचं आहे. यहोवाची सेवा विश्‍वासूपणे करीत राहण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे माझं शिक्षण अद्यापही चालूच आहे. सरलेल्या वर्षांकडे मी पाहतो तेव्हा मला नेहमी या गोष्टीचं आश्‍चर्य वाटतं, की माझ्यासारख्या खेड्यातल्या एका साध्यासुध्या, बिनधास्त स्वभावाच्या मुलाला इतकं अद्‌भुत प्रकारचं शिक्षण मिळालं—असं शिक्षण की जे आयुष्यभर कामी आलं!

[२६ पानांवरील चित्र]

१९५५ साली, आमच्या लग्नाच्या दिवशी

[२७ पानांवरील चित्र]

१९५७ साली, क्षेत्र सेवेत राजन कादीरगामार नावाच्या एका स्थानीय बांधवाबरोबर

[२८ पानांवरील चित्र]

आज सीबल बरोबर