व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिने तिच्या वर्गमित्रांना तिच्या विश्‍वासांविषयी सांगितले

तिने तिच्या वर्गमित्रांना तिच्या विश्‍वासांविषयी सांगितले

तिने तिच्या वर्गमित्रांना तिच्या विश्‍वासांविषयी सांगितले

तुमच्या बायबल आधारित विश्‍वासांबद्दलची अधिक चांगल्याप्रकारची माहिती तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांना द्यायला आवडेल का? पोलंडमधील, मॅग्डलेना नावाची १८ वर्षांची उच्च शालेय विद्यार्थीनी यहोवाची साक्षीदार या नात्याने वर्गातील मित्रमैत्रिणांना सहसा आपल्या विश्‍वासांविषयी सांगते. यामुळे, तिला नेहमी ‘यहोवाचा साक्षीदार बनण्याचा अर्थ काय?’ आणि ‘तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवत नाही का?’ यांसारखे प्रश्‍न विचारले जातात. तिने त्यांना कशी मदत केली? तिने मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केली आणि तिच्या प्रार्थनांनुसार कार्य केले.—याकोब १:५.

एके दिवशी, मॅग्डलेनाने, तिच्या विश्‍वासांचा आदर करणाऱ्‍या तिच्या शिक्षिकेला जेहोवाज विटनेसस—द ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम हा व्हिडिओ वर्गाला दाखवण्याची परवानगी मागितली. * शिक्षिकेने तिला परवानगी दिली. मॅग्डलेनाने मग तिच्या वर्गमित्रांना सांगितले: “मी माझ्या परिचयाच्या एका व्यक्‍तीला ९० मिनिटांचा एक कार्यक्रम वर्गापुढे सादर करण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये यहोवाच्या साक्षीदारांविषयीचा एक व्हिडिओपट आणि चर्चा असेल. तुम्हाला यायला आवडेल का?” सर्वांनी होकार दिला. मग मॅग्डलेना आणि पूर्ण वेळेचा एक अनुभवी सेवक, वोयत्स्येख, या दोघांनी मिळून एक कार्यक्रम बनवण्यास सुरवात केली.

यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे?* (इंग्रजी) या माहितीपत्रकाच्या आधारावर २० मिनिटांचे एक भाषण आणि त्यानंतर मग प्रश्‍न आणि उत्तरांची एक चर्चा अशी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. मग शाळेच्या लायब्ररीत तो व्हिडिओ दाखवला जाणार होता. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोठे पाकीट भेट म्हणून दिले जाणार होते; या पाकीटात, काही माहितीपत्रके, तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे* आणि काही पत्रिका व काही नियतकालिके होती.

कार्यक्रमाच्या दिवशी श्रोत्यांमध्ये १४ विद्यार्थी, शिक्षक आणि लायब्ररीत तेव्हा आलेले आणखी ४ विद्यार्थी असे सर्व होते. वोयत्स्येखने आधी असे सांगितले, की पुष्कळ पोलीश कवींनी, लेखकांनी आपल्या काव्यांत, लेखांत यहोवा या ईश्‍वराच्या नावाचा वापर केला होता. काही जुन्या कॅथलिक धर्मशिक्षणाच्या साहित्यात देखील ईश्‍वरी नाव असल्याचे त्याने सांगितले. यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक दिवसांतील कार्यांचे स्पष्टीकरण देताना त्याने विविध शाखा दफ्तरांच्या माहितीची माहितीपत्रके आणि अनेक संमेलन गृहांचे फोटोही दाखवले.

सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. मॅग्डलेना आणि वोयत्स्येखने बायबलच्या आधारावर सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. याचा श्रोत्यांवर खूप प्रभाव पडला आणि त्यांना ही खात्री पटली की यहोवाचे साक्षीदार आपल्या मनच्या कल्पनांचा प्रचार करीत नाहीत. त्यांना कोणकोणते प्रश्‍न विचारण्यात आले आणि या प्रश्‍नांची कशाप्रकारे उत्तरे देण्यात आली?

प्रश्‍न: बायबलची भाषा अस्पष्ट आहे, त्यात रूपकात्मक शैलीचा पुष्कळ वापर आहे ज्याचा अनेक प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो. मग बायबलच्या सामंजस्यात जगणे कसे शक्य आहे?

उत्तर: काहींचे असे म्हणणे आहे, की बायबल हे एका व्हायोलीनप्रमाणे आहे, त्यातून वाटेल तो सूर काढता येतो. पण जरा विचार करा: एखाद्या लेखकाने केलेल्या विधानाचा अर्थ काय होतो हे समजण्यासाठी त्यालाच थेट विचारणे सोयीस्कर नाही का? मनुष्यांनी पुस्तके लिहिली आणि आज ते हयात नाहीत, परंतु बायबलचा लेखक यहोवा देव जिवंत आहे. (रोमकर १:२०; १ करिंथकर ८:५, ६) एखाद्या वचनाच्या संदर्भावरून त्या वचनाचा अचूक अर्थ समजू शकतो. शिवाय, बायबलमध्ये अनेक ठिकाणी एकाच विषयाबद्दल लिहिण्यात आले आहे, त्यामुळे या सर्वांची तुलना केल्यावर आपल्याला एखाद्या वचनाचा काय अर्थ होतो हे समजू शकेल. अशाप्रकारे आपण देवाला आपल्या विचारांना मार्गदर्शित करू देऊ शकतो, जणू काय तोच आपल्याला शास्त्रवचनांचा अर्थ समजावून सांगत आहे. असे केल्यामुळे आपण बायबलमध्ये प्रकट केलेली त्याची इच्छा माहीत करून घेऊन त्यानुसार वागू शकतो, नाही का?

प्रश्‍न: इतर ख्रिश्‍चनांमध्ये आणि यहोवाच्या साक्षीदारांमध्ये काय फरक आहे?

उत्तर: आम्ही ख्रिश्‍चनच आहोत. परंतु केवळ ख्रिश्‍चन असण्याचा दावा करण्यापेक्षा यहोवाचे साक्षीदार, ते जो विश्‍वास करतात आणि त्यांच्या भल्यासाठी देव त्यांना जे शिकवत आहे त्यानुसार वागण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. (यशया ४८:१७, १८) त्यांच्या सर्व शिकवणुकी बायबलवर आधारित असल्यामुळे त्यांच्याजवळ सत्य आहे हे त्यांना माहीत आहे.—मत्तय ७:१३, १४, २१-२३.

प्रश्‍न: तुम्ही अनोळखी लोकांकडे का जाता व त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न का करता? म्हणजे तुम्ही इतरांवर तुमचा विश्‍वास लादत नाही का?

उत्तर: रस्त्यावर तुमच्याशी कोणी सभ्यपणे बोलत असेल आणि एखाद्या विषयावर त्यांचे काय मत आहे हे विचारत असेल तर त्यात चूक आहे असे तुम्हाला वाटते का? (यिर्मया ५:१; सफन्या २:२, ३) (पोलंडमध्ये अलीकडेच आलेल्या पुरामुळे ज्यांना दुःख सहन करावे लागले अशांबद्दल देवाला काळजी आहे का, असे रस्त्यावरील लोकांना त्यांनी कसे विचारले त्याचे प्रात्यक्षिक वोयत्स्येखने व मॅग्डलेनाने करून दाखवले.) त्या व्यक्‍तीचे मत ऐकल्यावर आम्ही बायबलकडे त्यांचे लक्ष वेधतो. पण जर ती व्यक्‍ती आमच्याशी बोलू इच्छित नाही तर आम्ही तिला जाऊ देतो आणि पुढे जातो. (मत्तय १०:११-१४) याला, संभाषण करण्यास बळजबरी करणे म्हणतात का? म्हणजे लोकांनी कधी एकमेकांबरोबर बोलूच नये का?

प्रश्‍न: तुम्ही सणवार का साजरा करीत नाही?

उत्तर: बायबल आम्हाला देत असलेला एकच सण आम्ही साजरा करतो—येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकदिन. (१ करिंथकर ११:२३-२६) इतर सणांच्या बाबतीत पाहू जाता, या सणांचा उगम कोठून झाला आहे हे तुम्ही विविध विश्‍वकोश आणि इतर विश्‍वसनीय ग्रंथ पडताळून पाहू शकता. मग तुम्हाला लगेच समजेल की आम्ही हे सर्व सणवार का पाळत नाही.—२ करिंथकर ६:१४-१८.

असे अनेक प्रश्‍न विचारण्यात आले व त्यांची उत्तरे देण्यात आली. ही चर्चा इतका वेळ चालू राहिली की व्हिडिओ दुसऱ्‍या वेळेला दाखवण्याची योजना करावी लागली.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय होती? मॅग्डलेना आपल्याला सांगते: “मला आश्‍चर्य वाटलं, की काही विद्यार्थी जे नेहमी मूर्खासारखे वागत व इतरांची टिंगल करत त्यांनी अगदी गहन प्रश्‍न विचारले. आपण नास्तिक आहोत असा त्यांनी दावा केला तरी, चर्चेदरम्यान मात्र त्यांनी देवावर विश्‍वास असल्याचे मत व्यक्‍त केले!” उपस्थित असलेल्यांनी आपले आभार व्यक्‍त करत भेट स्वीकारली. एकूण ३५ पुस्तके, ६३ माहितीपत्रके आणि ३४ नियतकालिके यांचे वाटप करण्यात आले.

एका शालेय प्रकल्पाची किती ही उत्तम फलश्रुती! यामुळे मॅग्डलेनाच्या वर्गमित्रांना यहोवाच्या साक्षीदारांची ओळख करून घ्यायला आणि त्यांना समजून घ्यायलाच फक्‍त मदत मिळाली नाही तर अनेक तरुणांना जीवनाच्या उद्देशाचा गंभीरपणे विचार करायला चालना मिळाली. तेव्हा तुम्ही जो विश्‍वास करता त्याविषयी आणखी शिकून घ्यायला तुमच्या वर्गमित्रांना मदत करायचा प्रयत्न कराल का?

[तळटीप]

^ परि. 3 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[३१ पानांवरील चित्र]

मॅग्डलेना आणि वोयत्स्येख चर्चेची तयारी करताना