व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमची उचित मार्गाने वाट पाहण्याची मनोवृत्ती आहे का?

तुमची उचित मार्गाने वाट पाहण्याची मनोवृत्ती आहे का?

तुमची उचित मार्गाने वाट पाहण्याची मनोवृत्ती आहे का?

आजच्या जगात लोकांना थांबून राहायला आवडत नाही. त्यांच्या धीराची परीक्षा होत आहे असे त्यांना वाटते. परंतु शास्त्रवचने देवाच्या लोकांना “वाट पाहत” राहण्याची मनोवृत्ती विकसित करण्याचे उत्तेजन देते. संदेष्टा मीखा त्याच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा वेगळा होता; त्याने असे म्हटले: “मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन.”—मीखा ७:७; विलापगीत ३:२६.

यहोवासाठी वाट पाहत राहण्याचा काय अर्थ होतो? ख्रिश्‍चनांनी देवाची कशाप्रकारे वाट पाहिली पाहिजे? वाट पाहण्याचे योग्य आणि अयोग्य मार्ग आहेत का? सा.यु.पू. नवव्या शतकातला संदेष्टा योना याचा अनुभव याबाबतीत आपल्याला एक धडा शिकवतो.

चुकीच्या कारणासाठी वाट पाहत राहण्याचे उदाहरण

यहोवा देवाने योनाला अश्‍शूरी साम्राज्याची राजधानी निनवे येथे जाऊन तेथील लोकांना प्रचार करण्यास सांगितले. निनवेत राजरोसपणे होणाऱ्‍या निर्घृणतेमुळे व क्रूरतेमुळे तिला ‘रक्‍तपाती नगरी’ असे ओळखले जायचे; इतिहासकार आणि पुरातत्त्ववेत्तेही या वस्तुस्थितीला दुजोरा देतात. (नहूम ३:१) योनाने सुरवातीला या नेमणुकीपासून दूर पळून जायचा प्रयत्न केला पण सरतेशेवटी यहोवाने त्याला निनवेला पाठवलेच.—योना १:३–३:२.

“योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, ‘चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.’” (योना ३:४) योनाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता: “निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली, त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोणताट नेसले.” (योना ३:५) त्यामुळे, ‘कोणाचा नाश व्हावा अशी ज्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे,’ त्या देवाने अर्थात यहोवाने निनवेचा नाश केला नाही.—२ पेत्र ३:९.

यावर योनाची काय प्रतिक्रिया होती? अहवाल म्हणतो: “योनाला ह्‍यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला.” (योना ४:१) राग आला? योनाला कदाचित असे वाटले, की त्याने एका विशिष्ट तारखेला येणाऱ्‍या ज्या नाशाची घोषणा केली होती तो नाश न आल्यामुळे संदेष्टा या नात्याने आपण खोटे ठरलो. त्याला इतरांची दया वाटण्याऐवजी किंवा इतरांचे तारण होण्यापेक्षा स्वतःच्या नावाची फिकीर होती.

अर्थात योनाने संदेष्टा म्हणून सेवा करण्याचे सोडून दिले नाही. तरीपण ‘शहराचे काय होते ते पाहण्यासाठी’ तो थांबून राहिला. होय, त्याला हे मुळीच आवडले नाही, पुढे काय होते हे बघतोच, अशाप्रकारची त्याची मनोवृत्ती झाली होती. आपल्या अपेक्षेप्रमाणे काही होत नाही हे पाहून त्याने एक मांडव घातला आणि पुढे काय होते हे पाहण्यासाठी तो त्या मांडवाच्या सावलीत उदास होऊन बसला. परंतु यहोवाला योनाची ही मनोवृत्ती आवडली नाही म्हणून त्याने आपल्या या चुकणाऱ्‍या संदेष्ट्याच्या विचारसरणीत प्रेमळपणे सुधारणा केली.—योना ४:५, ९-११.

यहोवा धीर का धरतो

निनवेतील लोकांनी पश्‍चात्ताप केला आणि त्यांना नाशापासून वाचवण्यात आले असले तरी ते पुन्हा कुमार्गाला लागले. संदेष्टा नहूम आणि सफन्या यांच्याद्वारे यहोवाने निनवेच्या नाशाविषयी भाकीत केले. ‘रक्‍तपाती नगरीविषयी’ बोलताना यहोवाने म्हटले, की तो अश्‍शुराचा नाश करेल आणि निनवेला वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील. (नहूम ३:१; सफन्या २:१३) सा.यु.पू. ६३२ मध्ये निनवेचा असा नाश झाला की ते पुन्हा कधीच वर आले नाही.

त्याचप्रकारे, आजचे जग प्राचीन निनवेपेक्षा मोठ्या प्रमाणात द्वेषभावनेने केलेल्या रक्‍तपातासाठी दोषी आहे. या आणि इतर कारणांसाठी यहोवाने असा हुकूम दिला आहे, की सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा एका अभूतपूर्व ‘मोठ्या संकटात’ अंत होईल.—मत्तय २४:२१, २२.

पण यहोवाने अद्यापपर्यंत हा नाश रोखून धरला आहे जेणेकरून प्रामाणिक लोकांना आज, निनवेतील पश्‍चात्तापी लोकांप्रमाणे, पश्‍चात्ताप करून आपला जीव वाचवण्याची संधी मिळेल. प्रेषित पेत्र देवाच्या धीराचे वर्णन अशा शब्दांत करतो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.”—२ पेत्र ३:९, १०, १३.

वाट पाहण्याची योग्य पद्धत

पेत्र पुढे म्हणतो: “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११, १२) यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण निष्क्रिय नव्हे तर सक्रिय राहून ‘पवित्र वर्तन व सुभक्‍तीची कार्ये’ करीत राहिले पाहिजे.

होय, वाट पाहत राहण्याची योग्य मनोवृत्ती म्हणजे, यहोवाचा दिवस क्षणभरही विलंब लावणार नाही असा भक्कम विश्‍वास असणे. अशा विश्‍वासामुळे आपण पवित्र व सुभक्‍तीची कार्ये करू ज्यामध्ये देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे प्रथम आहे. येशूने प्रचार कार्यात उत्तम उदाहरण मांडले आणि त्याने आपल्या अभिषिक्‍त अनुयायांना अशी सूचना दिली: “तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य आहेत.”—लूक १२:३५-३७.

पहिल्या शतकातील दास, अंग मेहनीचे काम करता यावे म्हणून आपल्या अंगरख्याचे टोक वर कमरपट्ट्यात खोचून ‘कंबरा बांधत’ असत. अशाचप्रकारे ख्रिश्‍चनांनी उत्तम कार्यांत उत्साही, आवेशी असले पाहिजे. सुखविलास किंवा भौतिक गोष्टींच्या मागे लागण्यासाठी आपली शक्‍ती खर्च करून आध्यात्मिक अर्थाने “मंद” अथवा निष्क्रिय होण्याच्या कोणत्याही प्रवृत्तीचा त्यांनी प्रतिरोध करावा. त्याऐवजी त्यांनी यहोवाच्या महान व भयप्रेरित दिवसाची वाट पाहत असताना “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असावे.—रोमकर १२:११; १ करिंथकर १५:५८.

वाट पाहत असताना कार्यशील असणे

यहोवाचे साक्षीदार, यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना व्यग्र राहतात. जसे की, २००३ सेवा वर्षात त्यांनी यहोवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी दररोज सरासरी ३३,८३,००० तास खर्च केले. विचार करा, एका दिवसात जे साध्य झाले ते एका साक्षीदाराला पूर्ण करण्यासाठी ३८६ वर्ष लगातार प्रचार करावा लागला असता!

तरीपण आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘माझी वाट पाहण्याची कोणती मनोवृत्ती आहे?’ येशूने विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांकडून अपेक्षा केल्या जाणाऱ्‍या उद्योगीपणाचे वर्णन करण्याकरता एक दाखला दिला. त्याने तीन दासांविषयी असे सांगितले: “एकाला त्याने [धन्याने] पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळविले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेहि आणखी दोन हजार मिळविले; परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला.”—मत्तय २५:१५-१९.

तिन्ही दास धन्याच्या परतीची वाट पाहत राहिले. आपल्या धन्याच्या परतीची वाट पाहत असताना कामात व्यग्र असलेल्या दोन दासांना, धन्याने आल्यावर असे म्हटले: “शाबास, भल्या व विश्‍वासू दासा!” परंतु एक जण जो धन्याची वाट पाहत होता खरा परंतु आळशी होता त्याला वेगळ्याप्रकारे वागणूक मिळाली. धनी म्हणाला: “ह्‍या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका.”—मत्तय २५:२०-३०.

हा दाखला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होत असला तरी, यात एक असा धडा आहे जो आपल्या सर्वांसाठी आहे; मग आपली कोणतीही आशा असली तरी. धनी अर्थात येशू ख्रिस्त, आपल्या प्रत्येकाकडून अशी अपेक्षा करतो, की आपण यहोवाच्या महान दिवशी त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना त्याच्या सेवेत मन लावून कार्य केले पाहिजे. प्रत्येकाने “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” आणि परिस्थितीप्रमाणे केलेल्या कष्टाची तो कदर करतो. वाट पाहण्याचे संपल्यावर धन्याकडून “शाबास” ऐकायला आपल्या सर्वांना किती आनंद वाटेल!

प्रभूची सहनशीलता तारणच आहे

हे व्यवस्थीकरण, आपण एकेकाळी विचार केला होता किंवा आशा केली होती त्यापेक्षा अधिक काळ टिकून राहिले असेल तर? तर ते विनाकारण टिकून राहिले नाही. प्रेषित पेत्र लिहितो: “आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” (२ पेत्र ३:१५) देवाच्या उद्देशाचे अचूक ज्ञान असल्याने आणि त्या उद्देशांपेक्षा आपण महत्त्वाचे नाही हे नम्रपणे कबूल केल्याने, यहोवा जोपर्यंत या जुन्या व्यवस्थीकरणाविषयी धीर धरू इच्छितो तोपर्यंत आपणही धीर धरू.

ख्रिश्‍चनांना धीर धरण्याचे उत्तेजन देण्याकरता बायबल लेखक याकोब याने एक उदाहरण दिले. त्याने लिहिले: “पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीहि धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.”—याकोब ५:७, ८.

आपण वाट पाहत असताना थकून जावे किंवा हार मानावी, अशी यहोवा देवाची इच्छा नाही. त्याने आपल्याला एक काम दिले आहे आणि वाट पाहाव्या लागणाऱ्‍या काळाचा उपयोग आपण जर या कामासाठी कष्टाळूपणे करीत राहिलो तर तो आनंदी होतो. प्रेषित पौलाने इब्रीकरांना लिहिलेल्या पत्रात ज्यांचे वर्णन केले अशा लोकांपैकी आपण एक व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे; पौलाने लिहिले होते: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्‍त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.”—इब्री लोकांस ६:११, १२.

तेव्हा आपण निराश होऊ नये. त्याऐवजी, यहोवा देवासोबतचा आपला व्यक्‍तिगत नातेसंबंध, येशूच्या खंडणी बलिदानावरील आपला विश्‍वास आणि नवीन व्यवस्थीकरणातील आपली उज्ज्वल आशा, आपल्या जीवनांतील प्रेरणादायक शक्‍ती होवोत. येशूच्या दाखल्यातील “भल्या व विश्‍वासू” दासांप्रमाणे आपणही, “मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन,” असे ज्याने म्हटले त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्या देवाची स्तुती करण्यात गुंग ठेवण्याद्वारे स्वतःला प्रशंसा आणि प्रतिफळ याच्या पात्र ठरवू या.—स्तोत्र ७१:१४.

[२१ पानांवरील चित्र]

निराश झालेला योना, निनवे शहराचे काय होते हे पाहण्यासाठी थांबून राहिला

[२२, २३ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण ईश्‍वरी भक्‍ती दाखवत राहू या