आध्यात्मिक मूल्यांचा पिच्छा करून फायदा मिळवा
आध्यात्मिक मूल्यांचा पिच्छा करून फायदा मिळवा
“ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही.”—उपदेशक ५:१०.
अतिश्रमामुळे ताण येऊ शकतो आणि ताणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात व कधीकधी तर मृत्यू देखील संभवू शकतो. अनेक देशांत, घटस्फोटामुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून विलग होत आहेत. अनेकदा, या सर्व दुःखद घटनांमागचे कारण, भौतिक गोष्टींबद्दल फाजील काळजी, हे असते. आपल्याजवळ जे आहे त्यात सुखी राहण्याऐवजी, भौतिकसंपत्ती मिळवण्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या मनुष्याला आणखी मिळवण्याची हाव असते; त्याला आपल्या कल्याणाची तीळमात्रही काळजी नसते. एका सेल्फ-हेल्प पुस्तकात असे म्हटले आहे: “शेजाऱ्यापेक्षा अधिक भौतिक वस्तू मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची या देशात लोकांना हौस आहे असे वाटते. शेजारच्या गृहस्थाने ओव्हरटाईम करून करून, अवघ्या त्रेचाळीस वर्षांच्या वयात कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा झटका येईल अशा स्थितीत स्वतःला आणलेले असते, आणि अशा माणसाशी स्पर्धा करण्याचा हे लोक प्रयत्न करत असतात.”
अधिकाधिक मिळवण्याच्या अधाशीपणामुळे एखाद्या व्यक्तीला जो आनंद मिळणार असतो तोही तिला मिळत नाही. याबाबतीत आपल्या मानवी कमजोरींचा बहुतेकदा एक
प्रभावशाली शक्ती गैरफायदा घेते; ती शक्ती आहे जाहिरातबाजी! टीव्ही व रेडिओवरील कार्यक्रम, जाहिरातींनी खचाखच भरलेले असतात; तुम्हाला कदाचित ज्यांची गरजही नाही आणि तुम्हाला परवडणार नाहीत अशा गोष्टी घेण्याची गळ घातली जाते. यामुळे तुमची प्रचंड हानी होऊ शकते.बेलगाम सुखविलासाचा आपल्यावर बेमालूमपणे, शारीरिक आणि नैतिक अशा दोन्ही प्रकारे हानीकारक परिणाम होऊ शकतो. जसे की, सुज्ञ राजा शलमोन याच्या पाहणीत आले, की “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीतिसूत्रे १४:३०) याउलट, अतिश्रम, चिंता, भौतिक संपत्ती गोळा करण्याचा दबाव यामुळे आपल्या आरोग्याचा आणि आपल्या आनंदाचा नाश होऊ शकतो. आपल्या जीवनात भौतिक ध्येयांना प्रथम स्थान दिले जाते तेव्हा कौटुंबिक नातेसंबंध बिघडतात. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन बिघडू लागते तेव्हा त्याच्या जीवनाचा दर्जा देखील खालावू लागतो.
आध्यात्मिक मूल्यांची श्रेष्ठता
“या युगाबरोबर समरुप होऊ नका,” असा सल्ला प्रेषित पौलाने अनेक शतकांपूर्वी दिला होता. (रोमकर १२:२) जगाच्या मूल्यांनुसार वागणाऱ्यांवरच हे जग प्रेम करते. (योहान १५:१९) जग तुमच्या पाहण्याच्या, स्पर्श करण्याच्या, चाखण्याच्या, गंध घेण्याच्या आणि ऐकण्याच्या इन्द्रिय-शक्तींचा ठाव घेण्याचा प्रयत्न करते आणि चैनीच्या जीवन-शैलीची निवड करण्यास तुमची खात्री पटवण्याचा प्रयत्न करते. ‘डोळ्यांच्या वासनेवर’ भर दिला जातो जेणेकरून तुम्ही आणि इतर लोक भौतिक संपत्ती मिळवण्याच्या मागे लागाल.—१ योहान २:१५-१७.
परंतु, पैसा, नावलौकिक आणि भौतिक संपत्ती यांच्यापेक्षा वरचढ अशी मूल्ये आहेत. अनेक शतकांआधी, राजा शलमोनाने, त्याच्या काळात उपलब्ध असलेली सर्व भौतिक संपत्ती गोळा केली. त्याने घरेदारे बांधली, त्याच्या मालकीच्या बागा, फळबागा होत्या, त्याच्याकडे चाकरे, गुरेढोरे, पुरुष आणि स्त्री गवय्यै होते; शिवाय, त्याच्याजवळ अमाप सोने-रुपे होते. त्याच्या आधी ज्यांनी संपत्ती मिळवली होती त्यांच्यापेक्षा कैकपटीने शलमोनाने मिळवली. तो खूप खूप श्रीमंत होता. शलमोनाकडे जवळजवळ सर्वच होते. तरीपण जेव्हा त्याने आपल्या साध्यतांकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला: “सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता.”—उपदेशक २:१-११.
शलमोनाला मिळालेल्या श्रेष्ठ बुद्धीमुळे त्याला माहीत होते, की आध्यात्मिक मूल्यांचा पिच्छा केल्यावर अधिक समाधान मिळते. त्याने लिहिले: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
देवाचे वचन, बायबल यात मिळणारे ज्ञान सोन्यारूप्यापेक्षा अधिक मोलवान आहे. (नीतिसूत्रे १६:१६) गहन सत्ये रत्नांसारखी आहेत जी तुम्ही खोदून काढली पाहिजेत. तुम्ही त्यांना खोदून काढाल का? (नीतिसूत्रे २:१-६) खऱ्या मूल्यांचा उगम असलेला आपला निर्माणकर्ता तुम्हाला असे करण्याचे आर्जवतो, नव्हे मदतही करतो. ते कसे?
आपले वचन, आपला आत्मा आणि आपली संघटना यांद्वारे यहोवा आपल्याला सत्याची रत्ने देतो. (स्तोत्र १: १-३; यशया ४८:१७, १८; मत्तय २४:४५-४७; १ करिंथकर २:१०) बेसुमार किमतीच्या या दुर्मिळ रत्नांचे परिक्षण केल्याने तुम्हाला जीवनाचा उत्कृष्ट आणि सर्वात प्रतिफळदायी मार्ग डोळसपणे निवडण्याची संधी मिळेल. आणि ही निवड करायला तुम्हाला कठीण जाणार नाही कारण आपला निर्माणकर्ता यहोवा याला, आपण कशामुळे खरोखर सुखी होऊ शकतो, ते माहीत आहे.
बायबल सर्वोच्च मूल्यांचा पुरस्कार करते
बायबलमधील उत्तम सल्ला व्यावहारिक आणि अतुलनीय आहे. ते ज्या नैतिक दर्ज्यांचा पुरस्कार करते ते दर्जे अपूर्व आहेत. त्यातला सल्ला नेहमीच फायदेकारक असतो. ते खरे आणि व्यावहारिक आहे, हे सिद्ध झाले आहे. आपण कष्ट केले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, पैशाचा सुज्ञपणे उपयोग केला पाहिजे आणि आळशीपणा टाकून दिला पाहिजे, ही बायबलमधील उत्तम सल्ल्याची काही उदाहरणे आहेत.—नीतिसूत्रे ६:६-८; २०:२३; ३१:१६.
याच अनुषंगाने येशूने म्हटले: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ति साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ति साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीहि करीत नाहीत.”—मत्तय ६:१९, २०.
हा समयोचित सल्ला, जसा २००० वर्षांपूर्वी लागू होत होता तसा आजघडीलाही लागू होतो. भौतिकसंपत्ती मिळवण्याच्या भोवऱ्यात अडकण्यापेक्षा आपण आताही सर्वोत्कृष्ट जीवनमार्ग निवडून फायदा मिळवू शकतो. गुरूकिल्ली आहे, स्वर्गात संपत्ती साठवणे; ज्यामुळे आपण खऱ्या सुखाचे व समाधानाचे जीवन जगू. हे आपण कसे करू शकतो? देवाचे वचन बायबल वाचण्याद्वारे आणि ते जे शिकवते त्याचा अवलंब करण्याद्वारे.
आध्यात्मिक मूल्यांमुळे प्रतिफळ मिळते
आध्यात्मिक मूल्ये उचितरीत्या लागू केल्याने आपल्याला शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या फायदा होऊ शकतो. पृथ्वीच्या वर असलेला ओझोन थर जसा सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक किरणांपासून आपले संरक्षण करतो तसेच उत्तम नैतिक तत्त्वे, भौतिकवादाच्या घातक परिणामांपासून आपले संरक्षण होण्यास मदत करतात. ख्रिस्ती प्रेषित पौल याने असे लिहिले: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.
द्रव्याच्या लोभामुळे लोक, अमाप संपत्ती, हुद्दा, सत्ता मिळवण्याच्या मागे लागतात. यासाठी अनेकदा, लबाड व अप्रामाणिक मार्गांचा अवलंब केला जातो. भौतिकवादाच्या मागे लागलेल्या व्यक्तीचा, वेळ, तिची शक्ती, तिची कौशल्ये व्यर्थ जातात. त्यामुळे कदाचित तिची झोपही उडू शकते. (उपदेशक ५:१२) भौतिक गोष्टींच्या मागे लागल्याने आध्यात्मिक प्रगतीत नक्कीच बाधा येते. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य येशू ख्रिस्त याने उत्तम मार्ग स्पष्ट दाखवला: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.” (मत्तय ५:३, NW) आध्यात्मिक धनामुळे कायमची प्रतिफळे मिळतात आणि तात्पुरत्या भौतिक लाभापेक्षा ते कैक पटीने महत्त्वपूर्ण आहेत.—लूक १२:१३-३१.
आध्यात्मिक धन मिळण्याचा प्रयत्न खरोखरच लाभदायक आहे का?
“आध्यात्मिक मूल्ये अव्यावहारिक आहेत हे मला पटवून देण्याकरता माझ्या आईवडिलांनी नाही नाही तो प्रयत्न
केला,” असे ग्रेग आठवून सांगतो; पुढे तो म्हणतो: “तरीपण, आध्यात्मिक ध्येयांचा पाठलाग केल्यामुळेच मला खूप मनःशांती मिळाली आहे कारण धनाच्या मागे लागल्यामुळे येणाऱ्या तणावापासून मी मुक्त आहे.”आध्यात्मिक मुल्यांमुळे व्यक्तिगत नातेसंबंधही वाढतात. खरे मित्र तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंमुळे नव्हे तर तुमच्या स्वभावामुळे आकर्षित होतात. बायबल म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.” (नीतिसूत्रे १३:२०) शिवाय, एक यशस्वी कुटुंब हे बुद्धी आणि प्रेमाच्या आधारावर उभे राहते, भौतिक गोष्टींच्या आधारावर नव्हे.—इफिसकर ५:२२–६:४.
जीवनात खरोखर मौल्यवान किंवा लाभदायक काय आहे हे आपल्याला उपजतच कळत नसते. आपल्या साथीदारांकडून किंवा एका उच्च उगमाकडून ते आपण शिकले पाहिजे. म्हणूनच, बायबलच्या आधारावर असलेले शिक्षण, भौतिक गोष्टींबद्दलचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकते. भूतपूर्व बँकर डॉन यांनी असे म्हटले: “जीवनात खरोखर मौल्यवान काय आहे याचा पुन्हा एकदा विचार करायला मला मदत करण्यात आली आणि जितके लागते तितक्याच गोष्टींत समाधानी राहण्यास मी शिकलो.”
चिरकाल टिकणाऱ्या आध्यात्मिक धनाचा पाठलाग करणे
आध्यात्मिक मूल्यांमुळे क्षणिक सुख मिळत नाही तर दीर्घकाळची प्रतिफळे मिळतात. पौलाने लिहिले: “दृश्य गोष्टी [भौतिक] क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी [आध्यात्मिक] सार्वकालिक आहेत.” (२ करिंथकर ४:१८) भौतिक गोष्टींमुळे तात्पुरत्या इच्छा पूर्ण होतात हे खरे आहे, परंतु लोभामुळे कायम फायदा मिळत नाही. आध्यात्मिक मूल्ये चिरकाल असतात.—नीतिसूत्रे ११:४; १ करिंथकर ६:९, १०.
आजच्या काळात भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित ठेवण्याच्या सर्रास दिसून येणाऱ्या मनोवृत्तीचा बायबल निषेध करते. ते आपल्याला, आपला डोळा निर्दोष ठेवण्याद्वारे स्वार्थी इच्छांवर ताबा कसा ठेवायचा, अधिक फिलिप्पैकर १:१०) लोभ नेमके आत्म-पूजा आहे, ही गोष्ट ते उघडकीस आणते. देवाच्या वचनातून आपण जे शिकतो ते आपल्या जीवनात लागू करतो तेव्हा आपण अत्यानंद अनुभवतो. आपले विचार बदलतात—आधी आपण घेणारे असतो नंतर आपण देणारे होतो. भोगासक्तीऐवजी आध्यात्मिक मूल्यांना महत्त्व देण्याची केवढी ही शक्तिशाली प्रेरणा!
महत्त्वाच्या गोष्टींवर अर्थात आध्यात्मिक धनावर लक्ष केंद्रित कसे करायचे ते शिकवते. (हे खरे आहे, की पैशामुळे काही प्रमाणात आपले संरक्षण होऊ शकते. (उपदेशक ७:१२) परंतु बायबल एक वास्तविक विधान करते: “पैसा फार लवकर जातो. जणूकाही त्याला पंख फुटतात आणि तो पक्ष्यासारखा उडून जातो.” (नीतिसूत्रे २३:५, ईजी टू रीड) भौतिकवादाच्या वेदीवर लोकांनी आरोग्य, कुटुंबे आणि एक चांगला विवेक यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी अर्पण करून अतिशय वाईट परिणाम भोगले आहेत. परंतु दुसरीकडे पाहता, आध्यात्मिकता असल्याने आपल्या सर्वात महत्त्वाच्या गरजा भागवल्या जातात—प्रेमाची गरज पूर्ण होते, आपल्या जीवनात उद्देश असावा ही आपली इच्छा पूर्ण होते आणि प्रेमळ देव यहोवा याची उपासना करण्याची गरज देखील भागवली जाते. आध्यात्मिकता, सार्वकालिक जीवनाकडे जाणारा मार्ग देखील दाखवते जेथे परादीस पृथ्वीवर मानवांना परिपूर्णता लाभू शकते; देवाने आपल्या सर्वांसाठी ही आशा ठेवली आहे.
लवकरच, समृद्ध जीवन जगण्याचे मानवजातीचे स्वप्न देवाच्या नव्या जगात पूर्णपणे साकार होईल. (स्तोत्र १४५:१६) तेव्हा “परमेश्वराच्या ज्ञानाने [संपूर्ण] पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) आध्यात्मिक मूल्यांची भरभराट होईल. भौतिकवाद आणि त्यामुळे आलेले दुष्परिणाम पूर्णपणे नाहीसे केले जातील. (२ पेत्र ३:१३) मग, जीवन ज्यामुळे अधिक सुखकारक होते, जसे की परिपूर्ण आरोग्य, समाधानकारक काम, हितकारक मनोरंजन, प्रेमळ कौटुंबिक नातेसंबंध आणि देवाबरोबर कायमची मैत्री या सर्व गोष्टींमुळे मानवजात कायमची आनंदी होईल.
[६ पानांवरील चौकट/चित्र]
पैशाचा सुज्ञपणे उपयोग करा!
आपल्या गरजा ओळखा. येशूने आपल्याला अशी प्रार्थना करायला शिकवले: “आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे.” (तिरपे वळण आमचे.) (लूक ११:३) तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्याजवळ असल्याच पाहिजे, असा दृष्टिकोन बाळगू नका. तुमचे जीवन, तुमच्याजवळ असलेल्या मालमत्तेवर अवलंबून नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा.—लूक १२:१६-२१.
बजेट तयार करा. ठरवलेले नसताना, केवळ मोहात पडून खरेदी करू नका. बायबल म्हणते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.” (नीतिसूत्रे २१:५) येशूने आपल्या श्रोत्यांना, कोणताही प्रकल्प हाती घेण्याआधी बसून खर्चाचा अंदाज काढण्यास सांगितले.—लूक १४:२८-३०.
अनावश्यक कर्ज करण्याचे टाळा. उधारीवर खरेदी करण्याऐवजी, शक्यतो आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंसाठी अगोदर पैसा साठवण्याची सवय लावा. एक नीतिसूत्र असे म्हणते: “ऋणको धनकोचा दास होतो.” (नीतिसूत्रे २२:७) आत्मसंयम बाळगल्यास व चादर पाहून पाय पसरल्यास तुम्ही, मोठ्या वस्तूंची खरेदी करण्याची यशस्वीपणे योजना करू शकाल.
अनावश्यक खर्च टाळा. तुमच्याजवळ आधीपासूनच असलेल्या वस्तू सांभाळून वापरण्याद्वारे अनावश्यक खर्च कमी करा. येशूने त्याच्याजवळ जे होते ते जपून वापरण्याचे महत्त्व पटवून दिले.—योहान ६:१०-१३.
महत्त्वाच्या गोष्टींना पहिले स्थान द्या. सुज्ञ व्यक्ती, अधिक महत्त्वाच्या ध्येयांचा पाठलाग करण्यासाठी “वेळेचा सदुपयोग” करेल.—इफिसकर ५:१५, १६.
[७ पानांवरील चौकट/चित्र]
अनुभवातून शिकण्यापेक्षा—एक चांगला मार्ग
वैयक्तिक अनुभव, मग ते चांगले असोत अथवा वाईट, ते आपल्याला बरेच महत्त्वाचे धडे देऊ शकतात. पण अनुभवाचीच शाळा सर्वात उत्तम असे जे म्हणतात ते खरे आहे का? नाही, मार्गदर्शन मिळवण्याचे त्यापेक्षा श्रेष्ठ असे एक माध्यम आहे. ते कोणते, हे स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांवरून कळते: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” (तिरपे वळण आमचे.)—स्तोत्र ११९:१०५.
स्वतःच्या अनुभवांपासून शिकण्यापेक्षा देवाच्या मार्गदर्शनाचा अवलंब करणे जास्त हितकारक का आहे? एक तर केवळ अनुभवाने, म्हणजे चुकतमाकत शिकणे अतिशय खर्चिक आणि कष्टदायक ठरू शकते. शिवाय, हे मुळातच अनावश्यक आहे. प्राचीन इस्राएलांना देवाने म्हटले: “तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती.”—यशया ४८:१८.
मार्गदर्शनाकरता देवाचे वचनच सर्वश्रेष्ठ माध्यम आहे यामागचे एक कारण असे की हा मानवी अनुभवाचा सर्वात प्राचीन व सर्वात अचूक लिखित अहवाल आहे. साहजिकच, इतरांच्या यशापयशांतून शिकणे हे पुन्हा त्याच चुका स्वतः करून त्यातून धडे शिकण्यापेक्षा कमी कष्टदायक आहे हे समजण्याजोगे आहे. (१ करिंथकर १०:६-११) त्यापेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे बायबलमध्ये स्वतः देवाने आपल्याला सर्वोत्कृष्ट नियम व मार्गदर्शक तत्त्वे पुरवली आहेत जी आजवर पूर्णपणे विश्वासार्ह शाबीत झाली आहेत. “परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, . . . परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो.” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र १९:७) निश्चितच, आपल्या प्रेमळ व बुद्धिमान निर्माणकर्त्याचे मार्गदर्शन आत्मसात करणेच सर्वात उत्तम आहे.
[४ पानांवरील चित्रे]
जगाची इच्छा आहे की तुम्ही भौतिकवादी जीवनशैली आत्मसात करावी
[५ पानांवरील चित्र]
सोन्या-रुप्यापेक्षा बायबलमधील धन मौल्यवान आहे