एकनिष्ठ आणि खंबीर गतकाळात आणि सध्या
एकनिष्ठ आणि खंबीर गतकाळात आणि सध्या
पोलंडच्या दक्षिणेकडे, स्लोवाकिया आणि चेक रिपब्लिक यांना लागून असलेल्या सीमेजवळ विश्ला नावाचे एक लहानसे गाव आहे. तुम्ही विश्लाविषयी पूर्वी कधी ऐकले नसावे, परंतु या गावचा एक असा इतिहास आहे जो खऱ्या ख्रिश्चनांना रोचक वाटेल. यहोवाच्या उपासनेसाठी एकनिष्ठता व आवेश दाखवणाऱ्यांचा हा इतिहास आहे. तो कसा?
डोळ्यांचे लाड पुरवणाऱ्या एका अतिशय मनोहर डोंगरी इलाख्यात विश्ला हे लहानसे गाव वसले आहे. वेगाने वाहणारे ओढे आणि दोन ओहळ विश्ला नदीला येऊन मिळतात आणि ही नदी दाट जंगले असलेल्या डोंगरदऱ्यांत नागमोडी वळण घेत वाहते. विश्ला गावातील मैत्रीपूर्ण स्थानीय लोकांमुळे आणि सुखद वातावरणामुळे हे एक लोकप्रिय वैद्यक केंद्र बनले आहे; शिवाय लोक इथं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुटीसाठी येतात.
असे दिसते, की या नावाची पहिली वसाहत १५९० च्या दशकात स्थापन झाली. येथे एक वखार टाकण्यात आली आणि त्यापाठोपाठ शेळ्या-मेंढ्या व गुरेढोर पाळणारे लोकही डोंगराळ प्रदेशात राहायला येऊन शेती करू लागले. पण हे गरीब लोक एका धार्मिक बदलाच्या भोवऱ्यात अडकले होते. या भागावर, मार्टिन ल्यूथरने सुरू केलेल्या धार्मिक सुधारणेचा जबरदस्त पगडा होता; आन्जे ओटशेक या संशोधकानुसार, ल्यूथरवाद “१५४५ मध्ये राज्य धर्म” बनला. पण तीस वर्षांचे युद्ध आणि त्यानंतर आलेल्या कॅथलिक सुधारणा यांमुळे परिस्थितीत नाट्यमय बदल झाला. “१६५४ साली प्रोटेस्टंट लोकांकडून सर्व चर्चेस हिसकावून घेण्यात आले, चर्च सेवांवर बंदी घालण्यात आली आणि बायबल व इतर धार्मिक पुस्तके जप्त करण्यात आली,” असे ओटशेकने पुढे म्हटले. तरीपण, स्थानीय लोकसंख्येतील बहुतेक लोक ल्यूथरनच राहिले.
बायबल सत्याचे पहिले बीज
आनंदाची गोष्ट म्हणजे एक अधिक महत्त्वाची धार्मिक सुधारणा होणार होती. १९२८ साली सर्वप्रथम दोन आवेशी
बायबल विद्यार्थ्यांनी (यहोवाच्या साक्षीदारांना पूर्वी बायबल विद्यार्थी म्हटले जायचे) बायबल सत्याची बियाणे पेरली. पुढील वर्षी, यान गोमोला आपल्या फोनोग्राफसह विश्ला येथे आले आणि तेथे ते बायबल आधारित भाषणे ऐकवू लागले. तेथून मग ते जवळच्या एका खोऱ्यात गेले. तेथे त्यांना हायलँडचे आन्जे राश्क भेटले. बुटक्या परंतु दणकट अंगकाठीचे आन्जे राश्क यांनी भाषणांच्या रेकॉर्डींगकडे लक्ष देऊन ऐकले. आपण ऐकत असलेल्या गोष्टी जशा का तशा आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी लगेच आपले बायबल काढले. मग म्हणाले: “भाऊ, सरतेशेवटी मला सत्य मिळाले! पहिल्या महायुद्धात मी होतो तेव्हापासून या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होतो!”उत्साही राश्कने गोमोला यांची यर्झा आणि आन्जे पिल्क या आपल्या मित्रांशी भेट घालून दिली; यांनी देखील राज्य संदेशाला आनंदाने प्रतिसाद दिला. फ्रान्समध्ये सत्य शिकलेल्या आन्जे तिर्ना यांनी या लोकांना देवाच्या संदेशाविषयीचे अधिक ज्ञान घ्यायला मदत केली. काही काळातच त्यांचा बाप्तिस्मा झाला. विश्लातील बायबल विद्यार्थ्यांच्या या लहानशा गटाला मदत करण्याकरता, १९३० दशकाच्या मध्यात, जवळच्या गावांतील बांधव यायचे. याचा परिणाम थक्क करणारा होता.
नवीन आस्थेवाईक लोकांचा लोंढाच्या लोंढा येऊ लागला. स्थानीय ल्यूथरन कुटुंबांना घरच्या घरी बायबल वाचण्याची सवय होती. त्यामुळे नरकाग्नी, त्रैक्य या शिकवणींबद्दलची खात्रीलायक शास्त्रवचने पाहिल्यावर अनेकांना खोट्या शिकवणी आणि सत्य यांमध्ये फरक दिसून आला. पुष्कळ कुटुंबांनी खोट्या धार्मिक शिकवणुकी मानणे सोडून दिले. अशाप्रकारे, विश्ला येथील मंडळी वाढू लागली आणि १९३९ पर्यंत त्यात सुमारे १४० सदस्य होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंडळीतील बहुतेक प्रौढांचा बाप्तिस्मा झाला नव्हता. “परंतु याचा अर्थ असा नाही, की हे बंधूभगिनी यहोवाच्या बाजूने आपली भूमिका घेऊ शकले नाहीत. त्यांच्यासमोर आलेल्या विश्वासाच्या परीक्षेत त्यांनी आपली एकनिष्ठता सिद्ध करून दाखवली,” असे त्या जुन्या साक्षीदारांपैकी एक असलेल्या हेलेना म्हणतात.
मुलांविषयी काय? आपल्या पालकांना सत्य मिळाल्याचे त्यांना पाहिले. फ्रान्शीस्क ब्रान्ट्झ म्हणतात: “आपल्याला सत्य मिळालं आहे, अशी जेव्हा बाबांना जाणीव झाली तेव्हा ते माझ्यामध्ये आणि भावामध्ये ते बिंबवू लागले. मी तेव्हा आठ वर्षांचा आणि माझा भाऊ दहा वर्षांचा होता. बाबा आम्हाला सोपे प्रश्न विचारायचे, जसे की: ‘देव कोण आहे, त्याचं नाव काय आहे? येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला काय माहीत आहे?’ आम्हाला एका कागदावर आमची उत्तरं आणि त्यांना आधार देणारी बायबलची वचनं लिहायला लागायची.” आणखी एका साक्षीदार बांधवाने म्हटले: “आईबाबांनी राज्य संदेशाला प्रतिसाद दिला आणि १९४० साली ल्यूथरन चर्च सोडल्यामुळे मला शाळेत विरोध, मारहाण सहन करावी लागली. माझ्यामध्ये बायबल तत्त्वे रुजवल्याबद्दल मी माझ्या आईवडिलांचे आभार मानतो. त्या कठीण दिवसांत टिकून राहायला मला यांची अत्यंत गरज होती.”
परीक्षेत असताना विश्वासू
दुसऱ्या महायुद्धाचा उद्रेक झाल्यावर नात्सींनी या क्षेत्रावर कब्जा मिळवला; यहोवाच्या साक्षीदारांचा नायनाट करण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. पहिल्यांदा, प्रौढांना—खासकरून पित्यांना—विशिष्ट लाभ मिळण्याकरता जर्मन देशाच्या सभासदत्व यादीत सही करण्याचे उत्तेजन देण्यात आले. साक्षीदारांनी नात्सींना पाठिंबा देण्यास नकार दिला. लष्करात काम करण्याच्या वयाच्या पुष्कळ बांधवांना व आस्थेवाईक लोकांना एक कठीण निवड करावी लागणार होती: एकतर लष्करात भरती व्हायचे नाहीतर तटस्थ राहून कडक शिक्षा भोगायची. १९४३ साली गेस्टापोंनी ज्यांना अटक केली ते आन्जे शालबोट म्हणतात: “लष्करी सेवा नाकारणे म्हणजे, छळछावणीत रवानगी आणि ती पण ऑश्वीट्झमधली. माझा अद्याप बाप्तिस्मा झाला नव्हता, पण मत्तय १०:२८, २९ मध्ये येशूने दिलेली खात्री मला माहीत होती. मला माहीत होतं, की यहोवावरील विश्वासामुळे मी जर मेलो तर तो नक्की माझं पुनरुत्थान करील.”
१९४२ सालच्या सुरवातीला, नात्सींनी विश्लामधील १७ बांधवांना अटक केली. तीन महिन्यांत ऑश्वीट्झमध्ये यांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला. याचा विश्लामध्ये उरलेल्या साक्षीदारांवर काय परिणाम झाला? आपला विश्वास नाकारण्याऐवजी त्यांना कसलीही हातमिळवणी न करता यहोवाशी एकनिष्ठपणे जडून राहण्याची प्रेरणा मिळाली! पुढील सहा महिन्यात विश्लामधील प्रचारकांची संख्या दुप्पट झाली. पण त्यानंतर लवकरच आणखी बांधवांना अटक करण्यात आली. हिटलरच्या कर्दनकाळात एकूण ८३ बांधवांना, आस्थेवाईक लोकांना आणि मुलांना छळ सोसावा लागला. ५३ जणांना छळछावण्यांत (बहुतेककरून ऑश्वीट्झमधली) किंवा पोलंड, जर्मनी आणि बोहेमियातील खाणींत काम करण्यासाठी जबरदस्तीने मजूर छावणीत पाठवण्यात आले.
एकनिष्ठ आणि खंबीर
ऑश्वीट्झमध्ये, नात्सींनी साक्षीदारांना लगेच मुक्त होण्याच्या आशेचे आमीष दाखवून फसवायचा प्रयत्न केला. एका एसएस गार्डने एका बांधवाला म्हटले: “मी बायबल विद्यार्थ्यांशी संबंध तोडत आहे, अशा आशयाच्या एका पत्रावर तुम्ही फक्त सही केल्यास आम्ही तुम्हाला सोडून देऊ आणि तुम्ही पुन्हा घरी जाऊ शकता.” हा प्रस्ताव अनेकदा त्याच्यापुढे ठेवण्यात आला तरीपण त्याने यहोवाला एकनिष्ठा दाखवण्याच्या बाबतीत हातमिळवणी केली नाही. यामुळे ऑश्वीट्झ आणि जर्मनीतील मिटेलबाऊ-डोरा या दोन्ही ठिकाणी त्याला मारहाण, थट्टा सहन करावी लागली, व गुलामांप्रमाणे वागणूक मिळाली. सुटण्याआधी हा बांधव मरता मरता वाचला; त्याला जेथे ठेवले होते तेथे बाँम्बचा वर्षाव होत होता.
अलीकडेच मरण पावलेले पवेल शालबोट यांनी एकदा असे सांगितले: “चौकशीच्यावेळी गेस्टापो मला सारखं विचारायचे, की मी जर्मन सैन्यात भरती होण्यास व ‘हेल हिटलर’ म्हणण्यास नकार का देत होतो.” ख्रिस्ती तटस्थतेविषयी बायबलची काही वचने दाखवल्यावर त्याला शस्रास्रे बनवणाऱ्या कारखान्यात पाठवण्यात आले. “अर्थातच, या प्रकारचे काम करण्यास माझा विवेक मला अनुमती देत नव्हता त्यामुळे त्यांनी मला एका खाणीत कामाला पाठवलं.” तिथेही ते विश्वासू राहिले.
ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले नाही—स्त्रिया व मुले—ते ऑश्वीट्झमध्ये असणाऱ्यांसाठी अन्नाची पाकीटे पाठवायचे. त्यावेळी तरुण असलेला एक बांधव म्हणतो: “उन्हाळ्यात आम्ही रानात जाऊन क्रॅनबेरी गोळा करून त्याच्याबदली गहू घ्यायचो. मग भगिनी, या गव्हाचे पाव बनवायच्या आणि ते पाव मग चरबीत मुरत ठेवायच्या. मग, आम्ही या पावांची लहान लहान पाकीटे करून ती तुरूंगात असलेल्या आमच्या सहबांधवांना पाठवली.”
विश्लाहून एकूण ५३ साक्षीदारांना छळछावण्यांत पाठवण्यात आले व सक्त मजूरी करवून घेण्यात आली. ३८ जण मरण पावले.
नवीन पिढी उदयास येते
नात्सींच्या जुलमी कृत्यांचे चटके यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांनाही सोसावे लागले. काहींना आपल्या आयांबरोबर बोहेमियातील तात्पुरत्या छावणींत पाठवण्यात आले. तर काहींना त्यांच्या पालकांपासून वेगळे करून लोड्झ येथील कुविख्यात बाल छावणीत पाठवण्यात आले.
यांपैकी तिघांनी असे आठवून सांगितले: “लोड्झच्या पहिल्या फेरीत जर्मनांनी पाच ते नऊ वयोगटात असलेल्या आम्हा दहा मुलांना पाठवलं. आम्ही प्रार्थना करून व बायबल विषयांवर चर्चा करून एकमेकांना उत्तेजन द्यायचो. हे सर्व सहन करणं सोपं नव्हतं.” १९४५ साली या सर्व मुलांना घरी पाठवण्यात आले. ही मुले जिवंत होती परंतु कृश झाली होती, व त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. तरीपण, कशानेही त्यांची एकनिष्ठा तुटली नाही.
नंतर काय झाले?
दुसऱ्या महायुद्धाच्या अंताच्या वेळी, विश्ला येथील साक्षीदार विश्वासात मजबूत होते आणि पूर्ण आवेशाने व दृढनिश्चयाने आपले प्रचार कार्य पुन्हा सुरू करण्यास तयार होते. बांधवांचे गट, विश्लापासून जवळजवळ ४० किलोमीटर दूर राहत असलेल्या लोकांना प्रचार करायला आणि बायबल साहित्य द्यायला जाऊ लागले. “काही दिवसांतच आमच्या गावात तीन सक्रिय मंडळ्या स्थापन झाल्या,” असे यान ख्झोक म्हणाले. परंतु हे धार्मिक स्वातंत्र्य जास्त काळ टिकले नाही.
नात्सींनंतर सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट सरकारने १९५० साली पोलंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आणली. त्यामुळे स्थानीय बांधवांना सेवेत नाना युक्त्यांचा उपयोग करावा लागायचा. कधीकधी ते गुरेढोरे किंवा धान्यधुन्य विकत घेण्याचे निमित्त करून लोकांच्या घरी जायचे. ख्रिस्ती सभा सहसा रात्रीच्या आणि तेही लहान लहान गटांत होत असत. तरीपण, सुरक्षा एजंटांनी यहोवाच्या पुष्कळ उपासकांना अटक करून त्यांच्यावर, विदेशी माहिती खात्यासाठी काम करत असल्याचा आरोप लावला; हा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा होता. काही अधिकाऱ्यांनी कुचेष्टेने पवेल पिल्ख यांना अशी धमकी दिली: “हिटलर तुमची एकनिष्ठा तोडू शकला नाही, आम्ही तोडू.” बंधू पिल्ख, तुरुंगात पाच वर्ष होते तरी यहोवाशी एकनिष्ठ राहिले. काही तरुण साक्षीदारांनी जेव्हा एका समाजवादी राजकीय दस्ताऐवजावर सही करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना एकतर शाळेतून काढून टाकण्यात आले किंवा नोकरीहून.
यहोवा सदोदीत त्यांच्याबरोबर होता
१९८९ साली राजकीय वातावरण बदलले आणि पोलंडमधील यहोवाच्या साक्षीदारांना कायदेशीर मान्यता मिळाली. विश्लामधील यहोवाच्या खंबीर साक्षीदारांनी आपल्या कार्याची गती वाढवल्याचे, पायनियरांच्या संख्येवरून किंवा पूर्ण वेळेच्या सेवकांच्या संख्येवरून दिसून येते. या भागातील सुमारे १०० बंधूभगिनींनी पायनियर सेवा सुरू केली आहे. यास्तव, या गावाला पायनियर कारखाना असे जे नाव पडले ते उगाच पडले नाही.
गत काळात यहोवा आपल्या सेवकांच्या पाठीशी होता याविषयी बायबल असे म्हणते: “लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमचा पक्षाचा नसता, तर . . . त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकिले असते.” (स्तोत्र १२४:२, ३) आपल्या दिवसांत, सामान्य जनतेतील उदासीनता आणि अनैतिक जगिक प्रवृत्ती असूनही विश्लातील यहोवाचे उपासक आपली सचोटी टिकवून ठेवण्यास झटत आहेत आणि त्याचे त्यांना प्रतिफळही मिळत आहे. या भागातील साक्षीदारांच्या पिढ्यान्पिढ्या, प्रेषित पौलाच्या या विधानाच्या सत्यतेला पुष्टी देऊ शकतात, की “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”—रोमकर ८:३१.
[२६ पानांवरील चित्र]
एमिल्या ख्झोकला आपली मुले, हेलिना, एमिल्या आणि यान यांच्यासोबत बोहेमियातील तात्पुरत्या छावणीत पाठवण्यात आले
[२६ पानांवरील चित्र]
लष्करी सेवेत भाग घेण्यास नकार दिल्याबद्दल पवेल शालबोट यांना एका खाणीत काम करायला पाठवण्यात आले
[२७ पानांवरील चित्र]
बांधवांना ऑश्वीट्झमध्ये पाठवले जाई व तेथे त्यांचा मृत्यू होई विश्ला येथील कार्याची वाढ मात्र थांबली नाही
[२८ पानांवरील चित्र]
पवेल पिल्ख आणि यान पोलक यांना लोड्झ येथील एका बाल छावणीत नेण्यात आले
[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]
बेरी आणि फुले: © R.M. Kosinscy / www.kosinscy.pl