व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“खरा देव आणि सार्वकालिक जीवन” कोण आहे?

“खरा देव आणि सार्वकालिक जीवन” कोण आहे?

“खरा देव आणि सार्वकालिक जीवन” कोण आहे?

यहोवा अर्थात आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा पिता हाच खरा देव आहे. तो निर्माणकर्ता आहे आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना तो चिरकालिक जीवन देतो. बायबलचे वाचन करणारे आणि त्याच्यावर भरवसा ठेवणारे वरील प्रश्‍नाचे असेच उत्तर देतील. होय, येशू स्वतः म्हणाला होता: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (तिरपे वळण आमचे.)—योहान १७:३.

तरीपण चर्चला जाणारे पुष्कळ जण या वाक्यांशाचा वेगळा अर्थ घेतात. हा वाक्यांश येशू ख्रिस्ताला सूचित होतो असे ते म्हणतात. मथळ्यातील शब्द १ योहान ५:२० या वचनातून आहेत; द होली बायबल मराठी—आर. व्ही. या भाषांतरात, या वचनाच्या शेवटल्या भागात असे म्हटले आहे: “जो सत्य आहे त्याच्या ठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्‍याच्या ठायी, आपण आहो. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.”

या भाषांतरानुसार, “जो सत्य आहे” हा वाक्यांश येशू ख्रिस्ताला लागू होतो. म्हणून त्रैक्याच्या शिकवणुकीवर विश्‍वास ठेवणारे असा दावा करतात, की “खरा देव आणि सार्वकालिक जीवन” येशू ख्रिस्त आहे. परंतु हा अर्थ, बायबलमधील इतर शास्त्रवचनांच्या अगदी विरोधात आहे. मग, अशा संकल्पनेचा समावेश का करण्यात आला? कारण हे भाषांतर, ग्रीक व्याकरणाचा चुकीचा अर्थ घेऊन करण्यात आले आहे. मूळ ग्रीक भाषेत, अगोदरच्या वाक्यात सर्वात शेवटी उल्लेख केलेली व्यक्‍ती येशू ख्रिस्त आहे. त्यामुळे त्रैक्य मानणाऱ्‍यांनी असा निष्कर्ष काढला, की पुढील वाक्यातील “हाच” येशूलाच लागू होत असावा. परंतु, पुष्कळ अधिकृत विद्वान, त्रैक्यवाद्यांचा हा दृष्टिकोन स्वीकारत नाहीत. केंब्रीज विद्यापीठाचे विद्वान बी. एफ. वेसकॉट यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, सर्वात तर्कशुद्ध निष्कर्ष असा आहे, की: “खरा देव आणि सार्वकालिक जीवन” हा वाक्यांश येशूला नव्हे तर येशूच्या पित्याला सूचित करतो. स्पष्टतः, प्रेषित योहानाच्या मनात हेच होते. जर्मन तत्त्ववेत्ता एरिक हाऊप्ट यांनी असे लिहिले: ‘“हाच” हा शब्द येशूला लागू होतो की देवाला हे ठरवताना, २१ व्या वचनातील मूर्तिपूजेविरुद्ध दिलेली ताकीद सहायक ठरते. ही ताकीद लक्षात घेतल्यास, पुढचे वचन हे ख्रिस्ताचे देवपण सिद्ध करण्याऐवजी, एकच खऱ्‍या देवाची साक्ष देते असा निष्कर्ष काढणे जास्त समर्पक वाटते.’

रोमच्या पॉन्टीफिकल बिब्लिकल इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेले अ ग्रमॅटिकल ॲनालिसीस ऑफ द ग्रीक न्यू टेस्टमेंट हे पुस्तक देखील असे म्हणते: ‘१८-२० वचनांचा शेवट ज्याने होतो तो शब्द, “हाच” मूर्तिपूजेच्या (वचन २१) अगदी विरोधात जो वास्तविक, सत्य देव आहे त्याला सूचित करतो यात शंका नाही.’

ग्रीक भाषेत सहसा, “हाच” हा शब्द वाक्यांशाच्या सर्वात जवळ असलेल्या कर्त्याला सूचित होत नाही.

याचे एक उदाहरण आपल्याला द होली बायबल मराठी—आर. व्ही. या भाषांतरात प्रेषितांची कृत्ये ४:१०, ११ मध्ये पाहायला मिळते. तेथे लूक म्हणतो: “ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्‍यांनी तुच्छ मानिलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे.” (तिरपे वळण आमचे.) ११ व्या वचनातील “हाच” हे सर्वनाम बऱ्‍या झालेल्या मनुष्याला लागू होत नाही. ते निश्‍चितच नासोरी येशू ख्रिस्ताला लागू होते जो ख्रिस्ती मंडळी ज्यावर उभारली आहे ती “कोनशिला” आहे.—इफिसकर २:२०; १ पेत्र २:४-८.

म्हणूनच, नवे जग भाषांतर (इंग्रजी) यांत १ योहान ५:२० चा अगदी अचूक अनुवाद करण्यात आला आहे. तिथे असे म्हटले आहे: “आणि आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. आणि त्याच्या पुत्राच्या अर्थात येशू खिस्ताच्या द्वारे आपण जो सत्य आहे त्याच्यामध्ये राहतो. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.”

“जो सत्य आहे”

प्रेषित योहानाने लिहिल्याप्रमाणे, “जो सत्य आहे,” तो येशू ख्रिस्ताचा पिता अर्थात यहोवा आहे. तोच एकमात्र देव व निर्माणकर्ता आहे. प्रेषित पौलाने कबूल केले: “आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले.” (१ करिंथकर ८:६; यशया ४२:८) १ योहान ५:२० मध्ये सांगितल्याप्रमाणे, “जो सत्य आहे,” तो यहोवाच आहे याचे आणखी एक कारण म्हणजे तो सत्याचा उगम आहे. स्तोत्रकर्त्याने यहोवाला ‘सत्यस्वरूप देव’ असे संबोधले कारण यहोवा आपल्या सर्व कार्यात विश्‍वासू आहे आणि तो केव्हाही लबाड बोलू शकत नाही. (स्तोत्र ३१:५; निर्गम ३४:६; तीत १:२) आपल्या स्वर्गीय पित्याला उद्देशून येशूने असे म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.” आणि, आपण जे शिकवतो त्याबद्दल तो असे म्हणाला: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.”—योहान ७:१६; योहान १७:१७.

यहोवा “सार्वकालिक जीवन” देखील आहे. तो जीवनाचा झरा आहे; ख्रिस्ताद्वारे अपात्र भेट म्हणून देणारा आहे. (स्तोत्र ३६:९; रोमकर ६:२३) प्रेषित पौलाने असे म्हटले, की देव ‘त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देणारा आहे.’ (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस ११:६) आपल्या पुत्राला मृतातून उठवण्याद्वारे देवाने त्याला प्रतिफळ दिले; संपूर्ण हृदयाने सेवा करणाऱ्‍यांना पिता सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ देईल.—प्रेषितांची कृत्ये २६:२३; २ करिंथकर १:९.

तेव्हा, आपला काय निष्कर्ष असला पाहिजे? हाच की, दुसरे तिसरे कोणी नव्हे तर यहोवाच “खरा देव आणि सार्वकालिक जीवन” आहे. त्याने ज्यांना निर्माण केले त्या निर्मितीची एकमात्र उपासना मिळण्याचा तोच हक्कदार आहे.—प्रकटीकरण ४:११.