व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो—आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी आईवडिलांची मदत स्वीकारा!

तरुणांनो—आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी आईवडिलांची मदत स्वीकारा!

तरुणांनो—आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी आईवडिलांची मदत स्वीकारा!

जहाजाच्या कप्तानासमोर असलेले सर्वात कठीण आव्हान कोणते असेल असे तुम्हाला वाटते? अथांग समुद्रातून सुरक्षितपणे पार होणे? नेहमीच नाही, कारण सहसा जहाज फुटण्याच्या दुर्घटना समुद्राच्या मधोमध नव्हे तर समुद्रकिनाऱ्‍याजवळ घडतात. जहाज सुरक्षितपणे गोदीत आणून उभे करणे तितके सोपे नसते; किंबहुना हे विमान जमिनीवर उतरवण्यापेक्षा धोकेदायक असू शकते. का?

जहाज सुरक्षितपणे नांगरताना, कप्तानाला विशिष्ट बंदरातील सर्व संभाव्य धोके लक्षात घ्यावे लागतात. पाण्याच्या प्रवाहाविषयी माहिती असण्यासोबतच त्याला गोदीत नांगरलेल्या इतर जहाजांशी टक्कर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. तसेच पाण्याखाली असलेले वाळूचे बांध, खडक किंवा फुटलेल्या गलबताच्या मोडतोडीचे ढीग इत्यादी यांना बगल देऊन त्याला जहाज न्यावे लागते. त्यातल्या त्यात जर या बंदरावर येण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल तर हे काम आणखीनच कठीण होऊन बसते.

या सर्व समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्याकरता एखादा विचारशील कप्तान अशा नाविकाची मदत घेऊ शकतो की ज्याला त्या विशिष्ट बंदराविषयी चांगली माहिती आहे. हा नाविक कप्तानाच्या खोलीत त्याच्या शेजारी उभा राहून त्याला योग्य मार्गदर्शन करतो. ते दोघे मिळून संभाव्य धोके लक्षात घेतात आणि अगदी अरुंद पाटांतूनही जहाज सुरक्षितपणे बंदरात नेतात.

ज्याप्रकारे जहाजाच्या कप्तानाला नाविकाच्या मोलवान अनुभवामुळे फायदा होतो त्याचप्रमाणे जीवनसागरातून योग्य मार्ग शोधणाऱ्‍या ख्रिस्ती तरुणांनाही फायदा होऊ शकेल अशाप्रकारची मदत त्यांना उपलब्ध आहे. ही मदत काय आहे? आणि तारुण्यात पदार्पण करणाऱ्‍या कोवळ्या मुलामुलींना या मदतीची गरज का असते?

जहाजाचे उदाहरण पुन्हा विचारात घेऊ या. किशोरवयीन या नात्याने तुम्ही जहाजाच्या कप्तानासारखे आहात कारण शेवटी तुमच्या जीवनाकरता तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या आईवडिलांची भूमिका ही त्या नाविकासारखी आहे; जीवनातल्या सर्वात कठीण प्रसंगांत तेच तुम्हाला योग्य दिशा शोधण्यास मदत करणार आहेत. पण किशोरवयात कधीकधी आईवडिलांनी दिलेला सल्ला स्वीकारणे तुम्हाला जड जात असेल. असे का घडते?

मुळात या समस्येचा संबंध हृदयाशी आहे. तुमचे लाक्षणिक हृदय, जे निषिद्ध आहे ते करण्याची ओढ तुमच्या मनात निर्माण करू शकते; किंवा, आपल्या स्वातंत्र्यावर बंधने लावली जात आहेत असे भासताच त्याविरुद्ध बंड पुकारण्यास ते तुम्हाला उद्युक्‍त करू शकते. बायबल म्हणते, “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१) यहोवाचे वचन स्पष्टपणे सांगते की तुमच्यापुढे एक मोठे आव्हान आहे. ते ताकीद देते, “हृदय हे इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक कपटी आणि भयंकर स्वच्छंदी आहे.” (यिर्मया १७:९, रॉदरहम) अयोग्य इच्छांना थारा देण्यासोबत हृदय आणखी एका मार्गाने तरुण व्यक्‍तीची दिशाभूल करू शकते. आईवडिलांना बऱ्‍याच वर्षांचा अनुभव आहे ही वस्तुस्थिती असताना, तरुण व्यक्‍तीचे हृदय तिला असा विचार करण्यास प्रवृत्त करते, की आपल्याला आईवडिलांपेक्षा जास्त समज आहे. पण किशोरावस्थेची कठीण वर्षे पार करताना तुम्ही तुमच्या आईवडिलांची मदत घ्यावी यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत.

आईवडिलांच्या आज्ञा का पाळाव्या?

सर्वात मुख्य कारण म्हणजे, यहोवा, जो कुटुंबव्यवस्थेचा जनक आहे, तो तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या आईवडिलांचे ऐकावे. (इफिसकर ३:१४) देवाने तुमच्या आईवडिलांवर तुमची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली असल्यामुळे तो तुम्हाला हा सल्ला देतो: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.” (इफिसकर ६:१-३; स्तोत्र ७८:५) तुम्ही आता किशोरावस्थेत आला आहात हे खरे आहे, पण तरीसुद्धा तुमच्या आईवडिलांवर तुम्हाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे आणि त्याकडे लक्ष देणे हे तुमचे कर्तव्य आहे. आपल्या आईवडिलांचे ऐकावे असे प्रेषित पौलाने मुलांना लिहिले, तेव्हा त्याने ज्या ग्रीक शब्दाचा वापर केला तो कोणत्याही वयोगटातील मुलांना सूचित करू शकतो. उदाहरणार्थ, मत्तय २३:३७ येथे आपण वाचतो की येशूने जेरूसलेमच्या रहिवाशांना तिची ‘मुलेबाळे’ असे म्हटले; खरे पाहता त्यांच्यापैकी बहुतेकजण प्रौढ होते.

प्राचीन काळातील अनेक विश्‍वासू जनांनी प्रौढ झाल्यानंतरही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या. याकोब हा एक मोठा माणूस असूनही त्याला जाणीव होती की यहोवाची उपासक नसलेल्या स्त्रीशी त्याने लग्न करू नये या त्याच्या पित्याच्या आज्ञेचे त्याने पालन केले पाहिजे. (उत्पत्ति २८:१, २) अर्थात, आपल्या भावाने कनानी स्त्रियांशी लग्न केल्यामुळे आपल्या आईवडिलांना किती दुःख सोसावे लागले हे देखील याकोबाने पाहिलेच असेल.—उत्पत्ति २७:४६.

तुमचे मार्गदर्शन करण्याची देवाने दिलेली जबाबदारी असण्यासोबतच, ख्रिस्ती पालक तुमचे सल्लागार असण्यास सर्वात योग्य व्यक्‍ती आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ते तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे जाणतात आणि इतकी वर्षे त्यांनी तुमच्यावर आपल्या निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव केला आहे. जहाजाच्या नाविकाप्रमाणे, ते अनुभवानिशी बोलतात. त्यांनी स्वतः ‘तरुणपणाच्या वासना’ अनुभवल्या आहेत. आणि खरे ख्रिस्ती असल्यामुळे बायबलच्या तत्त्वांनुसार चालणे किती हितकारक आहे याची देखील त्यांनी प्रचिती घेतली आहे.—२ तीमथ्य २:२२.

इतक्या अनुभवी व्यक्‍तींची मदत तुम्हाला सहज उपलब्ध असताना जीवनातल्या सर्वात कठीण परिस्थितीलाही तुम्हाला एकट्याने तोंड द्यावे लागणार नाही. उदाहरणार्थ, विरुद्धलिंगी व्यक्‍तींसोबतच्या व्यवहारासंबंधीचे उदाहरण घ्या. या नाजूक विषयावर ख्रिस्ती पालक तुम्हाला कशाप्रकारे मार्गदर्शन देऊ शकतात?

विरुद्धलिंगी व्यक्‍तींचे आकर्षण

पाण्याखाली वाळूचे बांध आढळल्यास, नाविक जहाजाच्या कप्तानांना त्यांच्यापासून अगदी दुरून जहाज नेण्याचा सल्ला देतात. वाळूचे बांध तसे ठिसूळ असतात, पण त्यांचा आकारमान सतत बदलत असल्यामुळे ते अतिशय फसवे असतात. त्याचप्रकारे, ज्यांमुळे कालांतराने तुमच्या भावना दुखावण्याचा संभव आहे अशा प्रसंगांपासून तुम्ही आधीपासूनच अंतर ठेवावे असे तुमचे आईवडील तुम्हाला सांगतील. विरुद्धलिंगी व्यक्‍तीबद्दल असणाऱ्‍या भावना सहसा अतिशय उत्कट असतात आणि काहीशा अस्पष्ट असतात, त्यांचे सहजपणे वर्णन करता येत नाही. पण एकदा का या भावना उफाळल्या की मग त्या तुम्हाला पूर्णपणे गिळंकृत करू शकतात.

दीनाचे उदाहरण दाखवते की धोकेदायक परिस्थिती दिसत असूनही तिच्या जवळ जाण्याची जोखीम पत्करल्यास किती भयंकर परिणाम घडू शकतो. दीनाने ज्या कनानी मुलींशी मैत्री केली होती, त्यांची नैतिकता निश्‍चितच आदर्श म्हणता येईल अशी नव्हती. पण दीनाने कदाचित उत्सुकतेपोटी किंवा थोडीबहुत मौज करायला मिळावी या उद्देशाने त्यांच्याशी जवळीक केली असावी. सुरवातीला तिला जी मौजमजा निर्धोक वाटली असावी ती लवकरच एका शोकांतिकेत बदलली—गावातल्या ‘सर्वाहून मोठ्या’ अशा तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.—उत्पत्ति ३४:१, २, १९.

आज आपण लैंगिकतेने झपाटलेल्या जगात राहात आहोत, त्यामुळे अशाप्रकारचे धोके अधिकच वाढले आहेत. (होशेय ५:४) बहुतेक तरुण तुम्हाला असे भासवतील की विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत मौजमजा करण्यासारखी दुसरी रोमांचक गोष्ट नाही. तुम्हाला शारीरिकरित्या आकर्षक वाटणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत एकांतात असण्याच्या नुसत्या कल्पनेनेही कदाचित तुम्ही रोमांचित होत असाल. पण ज्यांना देवाच्या आदर्शांविषयी आदर नाही अशा तरुणांशी मैत्री करण्यापासून प्रेमळ आईवडील तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील.

उत्सुकतेपोटी किशोर मुलेमुली कधीकधी जणू अंधळी होतात, त्यांना आपल्यासमोर असलेला धोका दिसत नाही; लॉरा नावाची मुलगी ही गोष्ट कबूल करते. ती सांगते, “माझ्या वर्गातल्या मुली अगदी रंगवून सांगतात, की कसा त्यांनी [एखाद्या पार्टीत] देखण्या आकर्षक मुलांसोबत अख्खी रात्र डान्स केला; त्यांच्या वर्णनावरून, काय अफलातून अनुभव असेल असं वाटू लागतं. अर्थात, त्या जरा तिखटमीठ लावूनच सांगतात हे मला माहीताय, पण तरीसुद्धा उत्सुकता वाटतेच. आपण कदाचित जीवनात बरीच मौजमजा गमावत आहोत असं वाटू लागतं. अशा पार्ट्यांना माझे आईवडील मला जाऊ देत नाही हे योग्यच आहे हे मला कळतं, पण तरीसुद्धा मोह आवरत नाही.”

जहाजाला ब्रेक्स नसतात, त्यामुळे ते पूर्णपणे थांबायला बराच वेळ लागतो. वासना देखील अशीच असते, हे आईवडिलांना ठाऊक आहे. वासनेच्या आहारी गेलेल्या पुरुषाची तुलना नीतिसूत्रे या पुस्तकात, ज्याला कत्तलखान्याकडे नेले जात असते अशा बैलाशी केली आहे. (नीतिसूत्रे ७:२१-२३) अशाप्रकारचा अनुभव, अर्थात, भावनिक आणि आध्यात्मिक नाशाकडे नेणारा अनुभव स्वतःवर कधी ओढवू नका. या बाबतीत तुमचे हृदय तुमची दिशाभूल करू लागले आहे हे कदाचित तुमचे आईवडील ओळखतील आणि त्यानुसार तुम्हाला सल्लाही देतील. पण त्यांचे ऐकून धोका टाळण्याचा सूज्ञपणा तुम्ही दाखवाल का?—नीतिसूत्रे १:८; २७:१२.

मित्रांच्या दबावाला तोंड देण्याकरताही तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या आधाराची गरज पडेल. ते तुम्हाला कशी मदत करू शकतात?

तुमच्या मित्रमैत्रिणींचा पगडा

भरतीओहोटीमुळे किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जोरामुळे जहाज आपल्या मार्गातून विचलित होण्याची शक्यता असते. असे घडू नये म्हणून जहाजाला वेगळ्या दिशेला वळवणे आवश्‍यक असते. त्याचप्रकारे, इतर तरुणांचा प्रभाव तुम्हाला आध्यात्मिक अर्थाने पथभ्रष्ट करू शकतो; असे घडू नये म्हणून पावले उचलण्याची गरज आहे.

दीनाच्या अनुभवावरून स्पष्ट होते की “मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) बायबलमध्ये ‘मूर्ख’ हा शब्द सहसा अशा व्यक्‍तीला सूचित करतो की जो यहोवाला ओळखत नाही किंवा जो त्याच्या मार्गांत न चालण्याचे स्वतःहून निवडतो.

हे सर्व खरे असले तरीसुद्धा, आपल्या वर्गसोबत्यांच्या मतांना किंवा सवयींना धुतकारणे तितके सोपे नसते. मारीया होसे खुलासा करते: “इतर तरुणांनी मला पसंत करावे अशी माझी इच्छा होती. मी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे असा त्यांनी विचार करू नये म्हणून मी होईल तितके त्यांचे अनुकरण करायचे.” कदाचित तुमच्यावरही नकळत तुमच्या मित्रांचा—कोणते संगीत ऐकायचे, कशाप्रकारचे कपडे घालायचे किंवा कशा पद्धतीने बोलायचे या बाबतींत प्रभाव पडल असेल. कदाचित तुम्हाला फक्‍त तुमच्या वयाच्या मुलामुलींसोबतच उठायबसायला आवडत असेल. हे स्वाभाविक आहे पण यामुळे तुमच्यावर त्यांचाच जास्तीतजास्त प्रभाव पडतो आणि हे तुमच्याकरता नाशकारक ठरू शकते.—नीतिसूत्रे १:१०-१६.

कॅरोलीन, आपल्याला काही वर्षांआधी तोंड द्याव्या लागलेल्या एका समस्येविषयी सांगते: “१३ वर्षांच्या वयातच माझ्यासोबतच्या बहुतेक मुलींचे प्रियकर होते आणि कित्येक वर्षांपर्यंत, त्यांचे अनुकरण करण्याचा दबाव सतत माझ्यावर होता. पण या कठीण परिस्थितीत माझ्या आईने मला योग्य दिशा दाखवली. ती कित्येक तास बसून माझे ऐकून घेत असे, मला समजावून सांगत असे आणि आणखी परिपक्व होईपर्यंत अशाप्रकारचे संबंध न जोडणेच हितावह आहे याची मला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असे.”

कॅरोलीनच्या आईप्रमाणेच, तुमचे आईवडीलही आपले कर्तव्य ओळखून मित्रमैत्रिणींच्या कुप्रभावाबद्दल तुम्हाला वेळीच सावध करतील किंवा तुमच्या काही कृतींवर व मैत्रिसंबंधांवर बंधने घालतील. यांसारख्याच समस्यांवरून नेथन नावाच्या एका मुलाचे त्याच्या आईवडिलांशी बरेचदा खटके उडत. तो सांगतो, “माझे मित्र कुठेही जायला निघाले की मला हमखास बोलवायचे पण माझ्या आईवडिलांचे म्हणणे होते की मी अशा मोठ्या घोळक्यात राहू नये, शिवाय, लक्ष द्यायला मोठी माणसे नसतील, तर अशा पार्ट्यांना मी जाऊ नये. तेव्हा मला प्रश्‍न पडायचा की इतर मुलांचे आईवडील त्यांना मोकळीक देऊ शकतात तर माझे आईवडील का नाही देत?”

नंतर मात्र नेथनला जाणीव झाली. तो कबूल करतो: “‘बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते’ हे शब्द माझ्या बाबतीत अगदी खरे ठरले. एकाच वयाची मुले घोळके करून राहतात, तेव्हा ही मूर्खता सहज दिसून येते. एकजण काहीतरी वाईट करायला सुरवात करतो, दुसरा त्याच्या आणखी एक पाऊल पुढे जातो, तिसरा आणखी पुढे, असे करत करत सर्वजण त्यात सामील होण्यास प्रवृत्त होतात. यहोवाची सेवा करणारी मुले देखील या जाळ्यात अडकू शकतात.”—नीतिसूत्रे २२:१५.

नेथन आणि मारीया होसे या दोघांच्या आईवडिलांनी त्यांना त्यांच्या मित्रांनी सुचवल्याप्रमाणे वागू दिले नाही तेव्हा त्यांना आपल्या मनाशीच संघर्ष करावा लागला. पण त्यांनी आपल्या आईवडिलांचे ऐकले आणि नंतर त्यांना याविषयी समाधान वाटले. नीतिसूत्र म्हणते: “ज्ञान्याची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव.”—नीतिसूत्रे २२:१७.

आदरास पात्र

एकीकडे झुकणारे जहाज चालवणे कठीण असते आणि जर ते खूपच झुकले तर ते बुडण्याचीही भीती असते. आपल्या अपरिपूर्ण अवस्थेमुळे आपल्या सर्वांचाच स्वार्थी व निषिद्ध प्रवृत्तींकडे कल आहे. पण या प्रवृत्ती असूनही, जर तरुणांनी जाणीवपूर्वक आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाचे पालन केले तर ते जीवनसागरातील प्रवास सुखरूप पार करू शकतात.

तुमचे आईवडील तुम्हाला काही चुकीच्या विचारांपासून दूर राहण्यास मदत करू शकतात; उदाहरणार्थ, जीवनाची अरुंद वाट आणि नाशाचा रुंद मार्ग यांव्यतिरिक्‍त एक मधला रस्ताही आहे हा एक चुकीचा विचार आहे. (मत्तय ७:१३, १४) जे वाईट आहे त्याचाही आपण थोड्याबहुत प्रमाणात आनंद घेऊ शकतो, फक्‍त त्यात पूर्णपणे गुरफटून जायचे नाही, इतकेच; म्हणजे, गिळलेच पाहिजे असे नाही, पण “चाखून पाहायला” काय हरकत आहे—या आशयाचा विचार करणेही निरर्थक आहे. जे अशाप्रकारे विचार करतात ते खरे तर ‘दोहो मतांमध्ये लटपटत आहेत.’ म्हणजे काही अंशी ते यहोवाची सेवाही करत आहेत आणि दुसरीकडे पाहिल्यास त्यांना या जगाबद्दल आणि त्यातील निरनिराळ्या गोष्टींबद्दल आकर्षणही वाटते. अशा प्रकारचे लोक आध्यात्मिकरित्या कोणत्याही क्षणी बुडू शकतात. (१ राजे १८:२१; १ योहान २:१५) असे का घडते? आपल्या पापपूर्ण प्रवृत्तींमुळे.

आपल्या अपरिपूर्ण मनातील इच्छा अशा असतात, की जर आपण त्यांना थारा दिला तर त्या उत्तरोत्तर बळावत जातात. आपले ‘कपटी हृदय’ फक्‍त एक घास घेऊन तृप्त होणार नाही. ते आणखी मिळण्याची लालसा करू लागेल. (यिर्मया १७:९) एकदा का आपण आध्यात्मिकरित्या भरकटू लागलो, की मग जगाचा आपल्यावरील प्रभाव हळूहळू वाढतच जाईल. (इब्री लोकांस २:१) आध्यात्मिक अर्थाने आपण एकीकडे झुकायला लागलो आहोत हे कदाचित तुमच्या लगेच लक्षात येणार नाही पण तुमच्या ख्रिस्ती आईवडिलांच्या ते लक्षात येईल. कंप्युटर शिकण्याच्या बाबतीत म्हणालात, तर कदाचित ते तुमच्यासारखे भराभर शिकणार नाहीत हे कबूल आहे, पण मन कसे हळूहळू भरकटते याविषयी त्यांना नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. आणि तुम्हाला जीवन मिळावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे, ते तुमचे “मन सरळ मार्गांत [राखण्यास]” तुम्हाला मदत करू इच्छितात.—नीतिसूत्रे २३:१९.

अर्थात संगीत, करमणूक, पेहराव इत्यादी कठीण विषयांवर तुम्हाला मार्गदर्शन पुरवाताना तुमचे आईवडील प्रत्येक समस्या अगदी अचूक रितीने हाताळतील अशी अपेक्षा करू नका. कदाचित त्यांच्याजवळ शलमोनाइतकी बुद्धी किंवा ईयोबाइतकी सहनशक्‍ती नसेल. जहाजाच्या नाविकाप्रमाणे कधीकधी अति सावधगिरीमुळे त्यांच्या हातूनही चुका होऊ शकतात. तरीसुद्धा, जर तुम्ही ‘आपल्या बापाच्या बोधाकडे व आपल्या आईच्या शिस्तीकडे’ लक्ष दिले तर त्यांचे मार्गदर्शन किती अमूल्य आहे याची तुम्हाला प्रचिती येईल.—नीतिसूत्रे १:८, ९.

इतर तरुण कदाचित आपल्या आईवडिलांबद्दल अपमानाने बोलत असतील. पण जर तुमचे आईवडील शास्त्रवचनांतील मार्गदर्शनाचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतील तर मग ते सर्व प्रकारच्या परिस्थितीत, जीवनातल्या सर्व वादळांत तुमच्या पाठीशी उभे राहतील. जहाजाच्या कप्तानाला ज्याप्रकारे अनुभवी नाविकाच्या सल्ल्याची गरज असते त्याप्रमाणेच, तुम्हालाही सूज्ञतेच्या मार्गांत वाटचाल करण्याकरता तुमच्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाची नितान्त गरज आहे. त्यांचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे तुम्हाला अकथनीय लाभ होईल.

‘ज्ञान तुमच्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुमच्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुमचे रक्षण करील, समंजसपणा तुम्हाला संभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून, तो तुम्हाला दूर ठेवील; ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात. . . . कारण सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील.’—नीतिसूत्रे २:१०-१३, २१.

[२२ पानांवरील चित्र]

इतर तरुणांच्या कुप्रभावामुळे आध्यात्मिकरित्या तुमची दिशाभूल होऊ शकते

[२३ पानांवरील चित्र]

दीनाचा अनुभव आठवणीत असू द्या

[२४ पानांवरील चित्र]

अनुभवी नाविकाचा सल्ला घेणाऱ्‍या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे, तरुणांनी आपल्या आईवडिलांचे मार्गदर्शन स्वीकारावे

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

फोटो: www.comstock.com