व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?

परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?

परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?

“ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, . . . त्या मनुष्याला सुखलोकात [“परादीसमध्ये,” NW] उचलून नेण्यात आले.”—२ करिंथकर १२:२-४.

१. बऱ्‍याच जणांना बायबलमधील कोणत्या प्रतिज्ञा प्रिय आहेत?

परादीस. या पृथ्वीवर परादीस आणण्याच्या देवाच्या प्रतिज्ञेविषयी तुम्ही पहिल्यांदा ऐकले तेव्हा तुम्हाला कसे वाटले हे तुम्हाला आठवते का? तुम्हाला सांगण्यात आले, की कशाप्रकारे ‘अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील व वाळवंटात झरे फुटतील.’ तसेच, ‘लांडगा कोंकराजवळ राहील, व चिता करडाजवळ बसेल,’ ही भविष्यवाणी ऐकल्याची तुम्हाला आठवते का? आपले मृत प्रियजन देखील परत जिवंत होतील व त्या परादीसमध्ये आपल्यासोबत राहण्याची त्यांनाही संधी दिली जाईल हे तुम्ही वाचले तेव्हा तुम्हाला आनंद वाटला नाही का?—यशया ११:६; ३५:५, ६; योहान ५:२८, २९.

२, ३. (अ) बायबलवर आधारित असणारी तुमची परादीसविषयीची आशा निराधार नाही असे का म्हणता येईल? (ब) ही आशा बाळगण्याकरता आणखी कोणते सबळ कारण आपल्याजवळ आहे?

तुमची आशा निराधार नाही. त्या परादीसविषयी बायबलमधील प्रतिज्ञांवर विश्‍वास ठेवण्याजोगी अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, येशूने आपल्या शेजारी वधस्तंभावर खिळलेल्या गुन्हेगाराला जे वचन दिले होते त्यावर तुम्हाला भरवसा आहे: “तू माझ्याबरोबर परादीसमध्ये असशील.” (लूक २३:४३, NW) तसेच, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो,” या प्रतिज्ञेवरही तुम्हाला विश्‍वास आहे. शिवाय देव सर्वांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकील; मरण, शोक, विलाप व कष्ट राहणार नाही, या देवाच्या वचनावर देखील तुम्हाला भरवसा आहे. याचा अर्थ खरोखर पृथ्वीवर एक परादीस पुन्हा एकदा अस्तित्वात येईल!—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:४.

परादीसच्या या आशेकरता आणखी एक सबळ कारण म्हणजे आज सबंध जगातील ख्रिस्ती एका आध्यात्मिक परादीसमध्ये आहेत. देवाने हे आध्यात्मिक परादीस निर्माण करून त्यात लोकांना आणले आहे. “आध्यात्मिक परादीस” ही संज्ञा काहीशी तात्विक, समजण्यास कठीण वाटते; पण असे एक परादीस अस्तित्वात येईल याविषयी भाकीत करण्यात आले होते आणि ते आज खरोखरच अस्तित्वात आहे.

परादीसचा दृष्टान्त

४. दुसरे करिंथकर १२:२-४ येथे कोणत्या दृष्टान्ताविषयी सांगितले आहे आणि हा दृष्टान्त कोणी पाहिला असावा?

या संदर्भात प्रेषित पौलाने काय लिहिले हे लक्षात घ्या: “ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला . . . तिसऱ्‍या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; . . . त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात [“परादीसमध्ये,” NW] उचलून नेण्यात आले, (सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे) आणि माणसाने ज्यांचा उच्चारहि करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.” (तिरपे वळण आमचे.) (२ करिंथकर १२:२-४) पौलाने आपल्या प्रेषित असण्याविषयी प्रतिवाद सादर केल्यानंतर लगेच हा अहवाल वाचायला मिळतो. बायबलमध्ये आणखी कोणत्याही व्यक्‍तीला असा अनुभव आल्याचे सांगितलेले नाही आणि या ठिकाणी पौल आपल्याला त्याविषयी सांगतो. त्याअर्थी पौलालाच हा दृष्टान्त झाला असल्याची शक्यता आहे. या अलौकिक अनुभवात त्याला कोणत्या “परादीसमध्ये” नेण्यात आले?—२ करिंथकर ११:५, २३-३१.

५. पौलाने काय पाहिले नाही आणि त्याअर्थी हे कशाप्रकारचे ‘परादीस’ होते?

संदर्भावरून, ‘तिसरा स्वर्ग’ ही संज्ञा पृथ्वी ग्रहाभोवती असलेल्या वातावरणाला किंवा अंतराळाला किंवा खगोलीय भौतिकीचा अभ्यास करणाऱ्‍यांनी गृहित धरलेल्या संभाव्य विश्‍वांनाही सूचित करत नाही. बायबलमध्ये सहसा तीन ही संख्या जोर देण्याकरता किंवा एखादी गोष्ट अधिक जोरदारपणे सांगण्याकरता वापरलेली आढळते. (उपदेशक ४:१२; यशया ६:३; मत्तय २६:३४, ७५; प्रकटीकरण ४:८) त्याअर्थी पौलाने दृष्टान्तात जे पाहिले ते अत्युच्च व उदात्त असे होते. ते आत्मिक होते.

६. पौलाने जे पाहिले ते समजण्याकरता कोणत्या ऐतिहासिक घटना आपली मदत करतात?

बायबलमध्ये याआधी नमूद केलेल्या भविष्यावाण्या याविषयी अधिक सखोल माहिती देतात. देवाचे प्राचीन लोक अविश्‍वासूपणे वागले तेव्हा देवाने बॅबिलोनी लोकांना येऊन यहुदा व जेरुसलेमवर हल्ला करू देण्याचे ठरवले. बायबलच्या कालगणनेनुसार, याची परिणती सा.यु.पू. ६०७ साली झालेल्या विध्वंसात झाली. भविष्यवाणीनुसार इस्राएलांचा देश ७० वर्षे ओसाड राहणार होता: त्यानंतर देव पश्‍चात्तापी यहुद्यांना परत येऊन खऱ्‍या उपासनेची स्थापना करण्यास अनुमती देणार होता. सा.यु.पू. ५३७ सालानंतर असेच घडले. (अनुवाद २८:१५, ६२-६८; २ राजे २१:१०-१५; २४:१२-१६; २५:१-४; यिर्मया २९:१०-१४) पण या दरम्यान देशाची काय अवस्था झाली होती? त्या ७० वर्षांदरम्यान तो अगदी वैराण, ओसाड झाला व तेथे कोल्हे राहू लागले. (यिर्मया ४:२६; १०:२२) तरीसुद्धा हे अभिवचन अद्यापही होते: ‘पाहा, परमेश्‍वर सीयोनाचे सांत्वन करील; त्याच्या सर्व ओसाड स्थळाचे सांत्वन करील; त्याचे रान एदेनासारखे करील, त्याचा निर्जल प्रदेश परमेश्‍वराच्या बागेसारखा [किंवा परादीससारखा, सेप्टुअजिन्ट] करील; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनि त्याजमध्ये होईल.’—यशया ५१:३.

७. सत्तर वर्षांच्या ओसाडीनंतर काय घडणार होते?

हे ७० वर्षांनंतर घडले. देवाच्या आशीर्वादाने देशाचा कायापालट झाला. आपल्या डोळ्यांपुढे हे चित्र उभे करा: “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; . . . तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीचे ठिकाणी उपळते झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.”—यशया ३५:१-७.

पुनर्वसित व रूपांतरित झालेले लोक

८. यशया पुस्तकातील ३५ व्या अध्यायातील वर्णन मुख्यतः लोकांविषयी आहे असे आपण का म्हणू शकतो?

केवढे अद्‌भूत रूपांतर! ओसाड भूमीच्या जागी एक रम्य बाग. होय, या व इतर विश्‍वासार्ह भविष्यवाण्या दाखवतात की वैराण भूमी ज्याप्रकारे फलदायी झाली त्याचप्रमाणे लोकांच्या मनोवृत्तीतही बदल घडून येईल. असे आपण का म्हणतो? यशया मुख्यतः ‘मुक्‍त केलेल्या परमेश्‍वराच्या लोकांविषयी’ बोलत होता; हे लोक “जयजयकार करीत” आपल्या मायदेशी परतून ‘आनंद व हर्ष पावणार होते.’ (यशया ३५:१०) हे केवळ भूमीविषयी नव्हे तर लोकांविषयी सांगण्यात आले होते. शिवाय इतर ठिकाणीही यशयाने सियोनास परतणाऱ्‍यांविषयी भाकीत केले: “त्यांस धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्‍वराने लाविलेले रोप [म्हणतील] . . . कारण भूमि जशी आपले अंकुर उगविते . . . तसा प्रभु परमेश्‍वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता व कीर्ति अंकुरित करील.” देवाच्या लोकांविषयी यशयाने असेही म्हटले: “परमेश्‍वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल . . . [तो] तुझ्या हाडांस मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील.” (यशया ५८:११; ६१:३, ११; यिर्मया ३१:१०-१२) अशाप्रकारे, भूमीत बदल घडून येतील तसतसा पुनर्वसित यहुदी लोकांमध्येही बदल घडेल.

९. पौलाने कोणते ‘परादीस’ पाहिले आणि याची पूर्णता कधी झाली?

या ऐतिहासिक नमुन्यावरून आपल्याला पौलाचा दृष्टान्त समजून घेण्यास मदत होते. हा दृष्टान्त ख्रिस्ती मंडळीच्या संबंधाने आहे. पौलाने ख्रिस्ती मंडळीला “देवाचे शेत” म्हटले आणि तिला फलदायी असावयाचे होते. (१ करिंथकर ३:९) हा दृष्टान्त केव्हा पूर्ण होणार होता? पौलाने जे पाहिले त्याला त्याने “प्रकटीकरण” म्हटले, त्याअर्थी ते भविष्यात असणार होते. पौलाला जाणीव होती की त्याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात धर्मत्याग घडेल. (२ करिंथकर १२:१; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनीकाकर २:३, ७) धर्मत्यागी व्यक्‍तींची संख्या वाढत जाऊन खऱ्‍या ख्रिश्‍चनांपेक्षाही जास्त झाली तेव्हा ख्रिस्ती मंडळीला एखाद्या हिरव्यागार बगिच्याची उपमा देणे अर्थातच शक्य नव्हते. पण तरीसुद्धा अशी वेळ पुन्हा एकदा येणार होती, जेव्हा खऱ्‍या उपासनेचा उत्कर्ष होईल. देवाच्या लोकांना पुन्हा पूर्वीसारख्या स्थितीत आणले जाणार होते जेणेकरून “नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” (मत्तय १३:२४-३०, ३६-४३) स्वर्गात देवाच्या राज्याच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच हे घडून आले. आणि जसजशी तपे उलटली आहेत तसतसे हे अधिकाधिक स्पष्ट होत गेले आहे की पौलाने त्या दृष्टान्तात पाहिल्यानुसार, देवाचे लोक खरोखरच एका आध्यात्मिक परादिसाचा आनंद लुटत आहेत.

१०, ११. अपरिपूर्ण असलो तरीसुद्धा, आपण एक आध्यात्मिक परादीसमध्ये आहोत असे का म्हणता येईल?

१० अर्थात, व्यक्‍तिशः आपण अपरिपूर्ण आहोत याची आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे अधूनमधून आपल्यामध्येही समस्या निर्माण होतात याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही; पौलाच्या काळातील ख्रिश्‍चनांमध्येही समस्या या होत्याच. (१ करिंथकर १:१०-१३; फिलिप्पैकर ४:२, ३; २ थेस्सलनीकाकर ३:६-१४) पण, आता आपल्याला लाभलेल्या आध्यात्मिक परादीसचा विचार करा. एकेकाळी आपण रोगट स्थितीत होतो, पण आपल्याला आध्यात्मिक अर्थाने बरे करण्यात आले आहे. तसेच आपण एकेकाळी कसे उपाशी होतो याचा विचार करा आणि आज आध्यात्मिक अर्थाने आपल्या तृप्ततेशी त्याची तुलना करा. एखाद्या वैराण भूमीत कष्ट करण्याऐवजी देवाच्या लोकांना त्याची संमती मिळाली असून तो त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. (यशया ३५:१, ७) आध्यात्मिक अंधारात चाचपडण्याऐवजी आज आपण स्वातंत्र्याचा व देवाच्या कृपेचा प्रकाश पाहू शकतो. बरेचजण जे पूर्वी बायबलमधील भविष्यवाण्यांप्रती बहिरे होते, त्यांनी शास्त्रवचनांतून त्यांचा अर्थ ऐकून व समजून घेतला आहे. (यशया ३५:५) उदाहरणार्थ, जगभरातील लाखो यहोवाच्या साक्षीदारांनी दानीएलाच्या भविष्यवाणीतील एकूणएक वचनाचा अभ्यास केला आहे. यानंतर त्यांनी बायबलमधील यशया या पुस्तकातील प्रत्येक अध्यायाचाही सखोल अभ्यास केला आहे. हे पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न आपल्या आध्यात्मिक परादीसची प्रचिती करून देत नाही का?

११ तसेच, विविध पार्श्‍वभूमींच्या प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्‍तींनी देवाच्या वचनातील ज्ञान आत्मसात करून त्याचे पालन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे बदल त्यांच्या मनोवृत्तीत घडून आले आहेत त्यांचाही विचार करा. पूर्वी त्यांच्या स्वभावात असलेल्या सर्व पशूतुल्य गुणांचा त्याग करण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. कदाचित तुम्हालाही असे करण्यात यश आले असेल; तसेच तुमच्या आध्यात्मिक भाऊ बहिणींनाही आले आहे. (कलस्सैकर ३:८-१४) तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीसोबत तुमचा संबंध असल्यास तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात आहात की जे अधिक शांतीप्रिय व प्रेमळ बनले आहेत. अर्थात, ते परिपूर्ण नाहीत पण त्यांची तुलना क्रूर सिंह किंवा हिंस्र पशूंशी निश्‍चितच करता येणार नाही. (यशया ३५:९) तर असा हा शांतीपूर्ण आध्यात्मिक बंधूभाव काय सूचित करतो? निश्‍चितच यावरून हे दिसून येते की आपण ज्या आध्यात्मिक स्थितीत आज आहोत त्याचे वर्णन आध्यात्मिक परादीस असे करता येईल. आणि हे आध्यात्मिक परादीस भविष्यात येणाऱ्‍या पृथ्वीवरील परादीसकडेही संकेत करते; आपण शेवटपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिलो तर या पृथ्वीवर आपणही त्या परादीसचा आनंद लुटू.

१२, १३. आध्यात्मिक परादीसमध्ये टिकून राहण्याकरता आपण काय केले पाहिजे?

१२ पण जिच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये अशी आणखी एक गोष्ट आहे. देवाने इस्राएलांना सांगितले: “जी आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी . . . जात आहा त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल.” (अनुवाद ११:८) लेवीय २०:२२, २४ येथे पुन्हा त्याच देशाचा उल्लेख करण्यात आला आहे: “तुम्ही माझे सर्व विधि व माझे सर्व नियम मान्य करून पाळावे म्हणजे ज्या देशी वसाहत करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही. त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हाला सांगितले आहे.” होय, प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्यासाठी यहोवा देवासोबत एक उत्तम नातेसंबंध असणे गरजेचे होते. आणि इस्राएलांनी देवाच्या आज्ञांचे पालन केले नाही म्हणूनच देवाने बाबेलोनी लोकांना येऊन त्यांच्यावर विजय मिळवण्यास व त्यांच्या राहत्या देशातून त्यांचा उच्छेद करण्यास अनुमती दिली.

१३ आपणही कदाचित आपल्या आध्यात्मिक परादीसमध्ये अगदी संतुष्ट असू. येथील वातावरण पाहणे व अनुभवणे अतिशय सुखावह आहे. आपल्या ख्रिस्ती बांधवांनी बरीच मेहनत घेऊन त्यांच्या पशूतुल्य गुणांवर विजय मिळवला आहे व त्यांच्यासोबत आज आपले शांतीपूर्ण संबंध आहेत. ते सर्वजण आपल्याशी प्रेमळपणे वागण्याचा व गरज पडल्यास आपल्या मदतीला धावून येण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा, आपल्या या आध्यात्मिक परादीसमध्ये टिकून राहण्याकरता केवळ या लोकांशी उत्तम नातेसंबंध असणे पुरेसे नाही. यासाठी आपला यहोवासोबत चांगला नातेसंबंध असणे आणि आपण त्याची इच्छा पूर्ण करणे अत्यावश्‍यक आहे. (मीखा ६:८) या आध्यात्मिक परादीसमध्ये आपण स्वेच्छेने प्रवेश केला खरा, पण जर आपण देवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यास झटलो नाही, तर आपण हळूहळू त्यापासून वाहवत जाऊ शकतो—किंबहुना आपल्याला त्यातून हाकलून दिले जाऊ शकते.

१४. आध्यात्मिक परादीसमध्ये टिकून राहण्याकरता कोणती गोष्ट सहायक ठरेल?

१४ आपल्याला सहायक ठरू शकेल अशी एक गोष्ट म्हणजे, देवाच्या वचनातून बळ मिळवणे. स्तोत्र १:१-३ यात कशाप्रकारे हे अलंकारिक भाषेत समजावले आहे याकडे लक्ष द्या: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही . . . तर परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” शिवाय, आपल्या आध्यात्मिक परादीसमध्ये, विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या बायबल आधारित प्रकाशनांतून आपल्याला आत्मिक अन्‍न मिळते.—मत्तय २४:४५-४७.

परादीसची आशा मनात ताजी ठेवणे

१५. मोशे इस्राएलांना प्रतिज्ञात देशात का नेऊ शकला नाही, पण त्याला काय पाहायला मिळाले?

१५ परादीसची पूर्वझलक देणारी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. ४० वर्षे अरण्यात भटकल्यानंतर मोशे इस्राएलांना यार्देन नदीच्या पूर्वेकडे मवाबाच्या पठारावर नेतो. मोशेने गतकाळात केलेल्या एका चुकीमुळे यहोवाने ठरवलेले असते की यार्देनच्या पलीकडे इस्राएलांचे नेतृत्त्व मोशे करणार नाही. (गणना २०:७-१२; २७:१२, १३) मोशे देवाला विनवणी करतो: “मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश . . . माझ्या दृष्टीस पडू दे.” मोशे प्रतिज्ञात देशात प्रवेश करणार नव्हता; पण पिसगाच्या शिखरावर जाऊन त्या देशाचे विविध प्रदेश पाहिल्यावर मोशेची खात्री पटली असेल, की खरोखरच तो एक “उत्तम देश” होता. ते प्रदेश कसे होते हे तुम्हाला ठाऊक आहे का?—अनुवाद ३:२५-२७.

१६, १७. (अ) प्राचीन काळातील प्रतिज्ञात देश अलीकडील काळात त्याच प्रदेशापेक्षा कसा वेगळा होता? (ब) प्रतिज्ञात देश एकेकाळी रम्य परादीससारखा होता असे आपण का म्हणू शकतो?

१६ सध्या या प्रदेशांची स्थिती पाहिल्यास, तुम्ही कदाचित उत्तम देश हा वाळवंटाचा, खडकाळ आणि भयंकर उष्णतेचा रुक्ष प्रदेश होता अशी कल्पना कराल. पण बायबल लिहिण्यात आले त्या काळात हा सबंध प्रदेश अगदी वेगळा होता असे पुराव्यावरून दिसते. साइंटिफिक अमेरिकन या नियतकालिकात, पाणी व शेतजमिनीचे अभ्यासक डॉ. वॉल्टर सी. लाउडरमिल्क खुलासा करतात की या प्रदेशातील जमिनीला “बऱ्‍याच वर्षांपासून झालेल्या दुरुपयोगामुळे नुकसान झाले आहे.” त्यांनी लिहिले: “एकेकाळी अगदी सुपीक जमीन असलेला हा प्रदेश ‘वाळवंट’ बनला याकरता निसर्ग नव्हे तर मनुष्य जबाबदार आहे.” किंबहुना त्यांच्या अभ्यासावरून असे सूचित होते की एकेकाळी “हा प्रदेश रम्य, हिरवागार बगिचा होता.” तर एकेकाळी “रम्य, हिरवागार बगिचा” असलेला हा प्रदेश मानवी दुरुपयोगामुळेच खराब झाला हे स्पष्ट होते. *

१७ तुम्ही बायबलमध्ये या देशाबद्दल जे वाचले आहे त्यावरून हा निष्कर्ष पटण्याजोगा आहे असे तुम्हाला आढळेल. यहोवाने मोशेद्वारे आपल्या लोकांना कोणते आश्‍वासन दिले होते हे आठवणीत घ्या: “जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहा तो डोंगरखोऱ्‍यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो; तुझा देव परमेश्‍वर त्या देशाची काळजी वाहतो.”—अनुवाद ११:८-१२.

१८. बंदिवासात गेलेल्या इस्राएलांना प्रतिज्ञात देश कसा असावा याविषयी यशया ३५:२ यातून कशाप्रकारे कल्पना आली असावी?

१८ प्रतिज्ञात देशाचे वनसौंदर्य आणि सुपीकता इतकी विलक्षण होती की या देशातील काही प्रदेशांच्या नुसत्या उल्लेखानेही डोळ्यांपुढे निसर्गरम्य परादीसचे चित्र उभे होत असे. यशया अध्याय ३५ यातील भविष्यवाणीवरून हे स्पष्ट होते; या भविष्यवाणीची पहिल्यांदा पूर्णता इस्राएल लोक बॅबिलोनहून परतले तेव्हा झाली. यशयाने भाकीत केले: “ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन यांचे ऐश्‍वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्‍वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्‍वर्य, पाहतील.” (यशया ३५:२) लबानोन, कर्मेल व शारोन या ठिकाणांच्या उल्लेखाने इस्राएलांच्या मनात अतिशय आनंददायक व सुंदर आठवणी जागृत झाल्या असाव्यात.

१९, २०. (अ) प्राचीन शारोनच्या प्रदेशाचे वर्णन करा. (ब) परादीसची आपली आशा बळकट करण्याचा एक मार्ग कोणता आहे?

१९ शोमरोनची डोंगरे व भूमध्य सागराच्या मधल्या क्षेत्रातील समुद्रतटाला लागून असलेला मैदानी प्रदेश शारोन याचा विचार करा. (पृष्ठ १० वरील छायाचित्र पाहावे.) या प्रदेशाचे सौंदर्य व सुपीकता सर्वश्रुत होती. भरपूर पाणीपुरवठा असल्यामुळे गुरे चारण्याकरता हे क्षेत्र उत्तम होते; पण उत्तर क्षेत्रांत ओक वृक्षांची जंगले होती. (१ इतिहास २७:२९; गीतरत्न २:१; यशया ६५:१०) त्याअर्थी, यशया ३५:२ येथे देशाचे पुनर्वसन होऊन ते शोभिवंत वनसौंदर्याने भरपूर असे परादीस बनेल असे भाकीत करण्यात आले होते. पौलाने नंतर दृष्टान्तात पाहिलेल्याप्रमाणे, ही भविष्यवाणी एका आनंददायक आध्यात्मिक परादीसकडेही संकेत करत होती. शेवटी, ही भविष्यवाणी इतर अनेक भविष्यावाण्यांसोबत, मानवांकरता येणाऱ्‍या पृथ्वीवरील परादीसची आपली आशा देखील बळकट करते.

२० आध्यात्मिक परादीसमध्ये राहत असताना आपण त्याकरता आपली कदर वाढवू शकतो आणि पृथ्वीवर येणाऱ्‍या परादीसची आपली आशा अधिक बळकट करू शकतो. कशाप्रकारे? बायबलमध्ये आपण जे काही वाचतो ते अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करण्याद्वारे. बायबलमधील वर्णनांत व भविष्यवाण्यांत सहसा विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख केलेला असतो. ही ठिकाणे नेमकी कोठे होती आणि इतर भौगोलिक प्रदेशांशी त्यांचा काय संबंध होता हे अधिक स्पष्टपणे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? हे तुम्हाला कशाप्रकारे करता येईल व असे करणे किती फायदेकारक ठरू शकते हे पुढील लेखात आपण पाहणार आहोत.

[तळटीप]

^ परि. 16 डेनिस बाली हे द जियोग्राफी ऑफ द बायबल यात म्हणतात: “बायबल काळांपासून आतापर्यंत येथील वनस्पतिजीवनात फार लक्षणीय बदल घडले असावेत.” याचे कारण? “मनुष्याला केवळ इंधनासाठीच नव्हे तर बांधकामासाठीही लाकडाची आवश्‍यकता होती . . . त्यामुळे त्याने वृक्षतोडीस आरंभ केला आणि अशाप्रकारे जमीन ही हवामानाच्या प्रतिकूल प्रभावांना बळी पडली. निसर्गात अशाप्रकारे हस्तक्षेप केल्यामुळे हवामान हे या जमिनीचा नाश करणारे सर्वात मुख्य घटक बनले.”

तुम्हाला आठवते का?

• प्रेषित पौलाने दृष्टान्तात कोणते ‘परादीस’ पाहिले?

यशया अध्याय ३५ याची पहिल्यांदा पूर्णता केव्हा झाली आणि याचा पौलाच्या दृष्टान्ताशी काय संबंध आहे?

• आध्यात्मिक परादीसबद्दल आपली कदर आपण कशी वाढवू शकतो आणि पृथ्वीवरील परादीसची आपली आशा अधिक बळकट कशी करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

शारोनचे खोरे, प्रतिज्ञात देशातील एक सुपीक प्रदेश

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[१२ पानांवरील चित्र]

प्रतिज्ञात देश हा एक “उत्तम देश” असल्याची मोशेला खात्री पटली