व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशूने आपल्या अनुयायांना जेव्हा “परतफेड होण्याची आशा न बाळगता, त्यांना उसने द्या,” असे म्हटले तेव्हा तो दिलेली रक्कमसुद्धा न मागण्याविषयी बोलत होता का?

लूक ६:३५ (सुबोध भाषांतर) मधील येशूच्या शब्दांचा अर्थ, मोशेचे नियमशास्त्र लक्षात ठेवल्यास योग्यप्रकारे समजतो. मोशेच्या नियमशास्त्रात देवाने इस्राएलांना, आर्थिक अडचणीत सापडलेल्या व मदतीची गरज असलेल्या सहइस्राएलांना बिनव्याजावर उसने पैसे देण्याची आज्ञा दिली होती. (निर्गम २२:२५; लेवीय २५:३५-३७; मत्तय ५:४२) कर्ज देण्यामागे पैसा कमावणे हा हेतू नव्हता. तर, एखाद्याला दारिद्र्‌यातून वर येण्यास किंवा आलेल्या संकटातून निभावण्यास मदत करण्याकरता बिनव्याजावर कर्ज दिले जात असे. शेजाऱ्‍याच्या आर्थिक टंचाईतून स्वतःचा स्वार्थ साधणे हे मुळीच प्रेमळपणाचे कृत्य नाही. तरीपण, जो कर्ज देतो त्याला, दिलेली रक्कम पुन्हा मिळण्याचा हक्क होता; यासाठी कधीकधी तो कर्ज देणाऱ्‍या व्यक्‍तीकडून एखादी वस्तू गहाण ठेवू शकत होता.—अनुवाद १५:७, ८.

येशूने नियमशास्त्राचे केवळ समर्थनच केले नाही तर, जो मदत देत आहे त्याने “परतफेड होण्याची आशा” बाळगू नये असे म्हणून त्याला बहुव्यापक अर्थ दिला. इस्राएली लोकांप्रमाणे ख्रिश्‍चनांना कधीकधी आर्थिक अडचणींचा किंवा इतर परिस्थितींचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांची दरिद्रदशा होईल किंवा कदाचित ते कंगालही होतील. अशा बिकट परिस्थितीत अडकलेला ख्रिस्ती बांधव आर्थिक मदत मागत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे प्रेमळपणा नाही का? होय, खरे प्रेम एखाद्या सहख्रिश्‍चनाला, आर्थिक अडचणीत सापडलेल्या बांधवास मदत करण्याकरता प्रवृत्त करेल. (नीतिसूत्रे ३:२७) अशा गरजू बांधवाला कर्ज म्हणून मोठी रक्कम देण्याच्या स्थितीत नसलो तरीसुद्धा, आपण भेट म्हणून थोडीफार आर्थिक मदत देऊ शकतो.—स्तोत्र ३७:२१.

सा.यु. पहिल्या शतकात, प्रेषित पौलाला व बर्णबाला आशिया मायनरमधील ख्रिश्‍चनांकडून दान गोळा करून ते, यहुदियात पडलेल्या दुष्काळामुळे बांधवांना देण्याची कामगिरी सोपवली होती. (प्रेषितांची कृत्ये ११:२८-३०) तसेच आजही, जेव्हा एखादे संकट येते तेव्हा ख्रिस्ती बंधूभगिनी बहुतेकदा आपल्या गरजू बंधूभगिनींसाठी भेटवस्तू पाठवतात. असे करण्याद्वारे ते इतरांना एक उत्तम साक्षही देतात. (मत्तय ५:१६) अर्थात, मदत घेणाऱ्‍या बांधवाच्या मनोवृत्तीचा देखील विचार करणे आवश्‍यक आहे. त्याला पैशांची गरज का आहे? पौलाचे शब्द लक्ष देण्याजोगे आहेत: “कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊहि नये.”—२ थेस्सलनीकाकर ३:१०.

कर्ज मागणारा बांधव, हालाखीत नाही परंतु त्याला बसलेल्या आर्थिक फटक्यानंतर पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्याकरता तात्पुरत्या काळासाठी पैशांची गरज असेल तर अशा बांधवाला बिनव्याजावर कर्ज देणे उचित ठरू शकेल. अशा परिस्थितीत, दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची अपेक्षा करणे, लूक ६:३५ मधील येशूच्या शब्दांच्या विरोधात नसेल. याबाबतीत सर्व व्यवहार लेखी केला पाहिजे; आणि कर्ज घेणाऱ्‍याने ठरलेल्या अटींप्रमाणे कर्ज फेडण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. कर्ज देणाऱ्‍याने जसे मोठ्या मनाने कर्ज दिले तसेच कर्ज घेणाऱ्‍याने ख्रिस्ती प्रेमाने प्रवृत्त होऊन कर्जदाराचे पैसे पुन्हा दिले पाहिजेत.

जो कर्ज देतो (किंवा भेट म्हणून पैसे देऊ इच्छितो) त्याने आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचा देखील विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, कर्ज दिल्यामुळे, आपल्या कौटुंबिक सदस्यांची काळजी घेण्याबाबतीत असलेली शास्त्रवचनीय जबाबदारी पूर्ण करणे त्याला कठीण तर जाणार नाही? (२ करिंथकर ८:१२; १ तीमथ्य ५:८) काही असो, ख्रिस्ती मात्र एकमेकांना प्रेम दाखवण्यासाठी मार्ग शोधतात; बायबल तत्त्वांच्या अनुषंगात असलेल्या व्यावहारिक मार्गांद्वारे ते आपले प्रेम व्यक्‍त करतात.—याकोब १:२७; १ योहान ३:१८; ४:७-११.