व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजच्या काळात आदर्श नेता कोण?

आजच्या काळात आदर्श नेता कोण?

आजच्या काळात आदर्श नेता कोण?

१९४० साली ब्रिटिश संसदेत नेतृत्वाचा पेचप्रसंग उद्‌भवला. वाटाघाटी सुरू असताना, सत्याहत्तर वर्षांचे डेव्हिड लॉईड जॉर्ज उपस्थित होते; जॉर्ज यांनी पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटनचे नेतृत्व करून या राष्ट्राला विजय मिळवून दिला होता. शिवाय, राजकीय वर्तुळात अनेक वर्षांच्या अनुभवामुळे त्यांच्याजवळ उच्च अधिकाऱ्‍यांच्या कार्याचे डोळसपणे अवलोकन करण्याची कुवत होती. ८ मे रोजी त्यांनी कॉमन्स सभेपुढे दिलेल्या भाषणात असे म्हटले: “हे राष्ट्र कोणत्याही प्रकारचे बलिदान करण्यास तयार आहे. गरज आहे ती केवळ योग्य नेतृत्वाची, सरकारने आपली ध्येये जनतेपुढे स्पष्टपणे मांडण्याची, आणि नेते उत्तम कामगिरी करत आहेत याची या राष्ट्रातील लोकांना आत्मविश्‍वास वाटण्याची.”

लॉईड जॉर्ज यांच्या शब्दांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. लोक आपल्या नेत्यांकडून कार्यक्षम असण्याची आणि परिस्थितीत सुधारणा करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करण्याची अपेक्षा करतात. निवडणूक प्रचारात सहभागी झालेल्या एका कार्यकर्त्याने असे म्हटले: “लोक राष्ट्राध्यक्षाच्या पदाकरता मतदान करतात तेव्हा ते अशा व्यक्‍तीकरता मतदान करत असतात की जिच्या हाती ते आपले जीवन, आपले भविष्य व आपल्या मुलांचे भविष्य सोपवत असतात.” लोकांच्या या भरवशाचे रक्षण करणे हे काही साधेसोपे काम नाही. का बरे?

हे जग आज अशा समस्यांनी ग्रस्त आहे की ज्यांवर उपाय नाहीत. उदाहरणार्थ, कोणता नेता इतका बुद्धिमान व शक्‍तिशाली आहे की तो गुन्हेगारी व युद्धाचा नायनाट करू शकेल? आजच्या नेत्यांपैकी कोणाजवळ इतकी साधनसंपत्ती आहे व कोणाला इतकी जाणीव आहे की तो प्रत्येक मानवाला अन्‍न, स्वच्छ पाणी व आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊ शकेल? वातावरणाचे रक्षण करून, निसर्गाचे बिघडलेले संतुलन पूर्वस्थितीत आणण्याइतके ज्ञान व जिद्द कोणत्या नेत्याजवळ आहे? सबंध मानवजातीला आनंददायी दीर्घायुष्य उपभोगता येईल याची खात्री करण्याइतकी क्षमता व सामर्थ्य कोणाजवळ आहे?

मानव असमर्थ आहेत

काही नेत्यांच्या प्रयत्नांना थोड्याफार प्रमाणात यश आले आहे हे खरे आहे. पण ते जास्तीतजास्त दोन चार दशके झटू शकतात—पुढे काय? आजवर जन्माला आलेल्या सर्वात कार्यक्षम नेत्यांपैकी एक प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन हा होता. त्याने या प्रश्‍नावर बरेच विचारमंथन केले. शेवटी तो म्हणाला: “माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्यामागून येणाऱ्‍याला ठेवून मला जावे लागणार आहे, हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्‍या भूतलावर संपादिले आहे त्यावर तो ताबा चालविणार; हेहि व्यर्थच!”—उपदेशक २:१८, १९.

आपल्या मागून येणारा आपले चांगले कार्य पुढे चालवेल की ते सर्व व्यर्थ घालवेल याची शलमोनाला खात्री नव्हती. जुन्या राजांची जागा नव्या राजांनी घेण्याचे हे चक्र शलमोनाच्या लेखी “व्यर्थच” होते. बायबलच्या इतर भाषांतरांत याला “निरुपयोगी” अथवा “अर्थहीन” म्हटले आहे.

जबरदस्तीने शासनात बदल घडवून आणण्याकरता प्रसंगी हिंसाचाराचाही मार्ग अवलंबला जातो. कित्येक गुणी नेत्यांना जिवे मारण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांचे कार्य अधुरेच राहिले. संयुक्‍त संस्थानांचे एक अतिशय नावाजलेले राष्ट्राध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी एकदा एका सभेला उद्देशून असे म्हटले: “मला थोडक्या अवधीसाठी एका महत्त्वाच्या पदावर कार्य करण्याकरता निवडण्यात आले आहे आणि आता तुमच्या देखत मला असा अधिकार सुपूर्द करण्यात आला आहे जो लवकरच माझ्या हातातून निघून जाईल.” त्यांचे कार्य खरोखरच अल्पावधीचे ठरले. राष्ट्राध्यक्ष लिंकन यांनी बरेच काही साध्य केले आणि लोकांच्या हितासाठी आणखी बरेच काही करण्याचा त्यांचा मानस होता, पण तरीसुद्धा ते जेमतेम चारच वर्षे आपल्या राष्ट्राचे नेतृत्व करू शकले. अध्यक्षपदाच्या त्यांच्या दुसऱ्‍या कार्यावधीच्या सुरवातीलाच त्यांचा खून करण्यात आला; खून करणाऱ्‍या इसमाला वेगळा नेता यावा असे वाटत होते.

सर्वात उत्तम मानवी नेता देखील स्वतःच्या भविष्याची शाश्‍वती देऊ शकत नाही. मग तुमचे भविष्य तुम्ही त्यांच्या हातात सोपवावे का? बायबल म्हणते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” मराठीतील इजी टू रीड व्हर्शननुसार ४ थ्या वचनाच्या शेवटी असे म्हटले आहे: “नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.”—स्तोत्र १४६:३, ४.

मानवी नेत्यांवर भरवसा न ठेवण्याचा सल्ला कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. पण मानवजातीला कधीच चांगले व टिकाऊ नेतृत्व लाभणार नाही असे बायबल म्हणत नाही. यशया ३२:१ म्हणते: “पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील.” मानवांच्या निर्माणकर्त्या यहोवा देवाने एक “राजा,” उभा केला आहे, एक नेता जो लवकरच पृथ्वीवरील कारभार पूर्णपणे आपल्या हातात घेईल. हा राजा कोण आहे? बायबलमधील भविष्यवाद त्याची ओळख करून देतात.

नेतृत्व करण्यास खरोखर योग्य

दोन हजार वर्षांआधी एका देवदूताने मरीया नावाच्या एका यहुदी तरुणीला असे सांगितले: “तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३१-३३) होय, नासरेथचा येशू हाच बायबलमधील भविष्यवादात सांगितलेला राजा आहे.

धार्मिक कलाकृतींत सहसा येशूला तान्ह्या बाळाच्या रूपात दाखवले जाते; किंवा एखाद्या अशक्‍त, दुर्बळ तपस्वीच्या रूपात, जो आपल्यावर येणारे प्रत्येक संकट निमूटपणे सोसतो. पण अशाप्रकारचे चित्रण येशूच्या शासक या भूमिकेबद्दल आपल्या मनात आत्मविश्‍वास उत्पन्‍न करत नाही. खरे पाहता, बायबलमध्ये वर्णन केलेला येशू मोठा होऊन एक उत्साही, सुदृढ तरुण बनला जो आवेशी व निर्भीड होता. शिवाय, ज्यांमुळे त्याला आदर्श नेता म्हणता येईल असे इतर गुणही त्याच्याठायी होते. (लूक २:५२) खाली त्याच्या असाधारण व्यक्‍तिमत्त्वाचे काही पैलू स्पष्ट करण्यात आले आहेत.

येशू परिपूर्णरित्या विश्‍वासू राहिला. त्याचे वर्तन इतके प्रामाणिक, व नेक होते की आपल्यात काही दोष असल्यास तो दाखवावा असे तो आपल्या शत्रूंना जाहीररित्या आव्हान करू शकला. पण ते त्याचा कोणताही दोष दाखवू शकले नाहीत. (योहान ८:४६) त्याच्या निर्भेळ शिकवणुकींनी प्रामाणिक अंतःकरणाच्या अनेक व्यक्‍तींना त्याचे अनुयायी होण्यास प्रवृत्त केले.—योहान ७:४६; ८:२८-३०; १२:१९.

येशू देवाला पूर्णतः समर्पित होता. देवाने आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्याचा येशूचा निर्धार इतका पक्का होता की कोणताही विरोधी, मानव अथवा दुरात्मा त्याला या निर्धारापासून परावृत्त करू शकला नाही. हिंसाचारी हल्ल्यांमुळे तो कधीही घाबरला नाही. (लूक ४:२८-३०) थकवा व भूकेने व्याकूळ झाला असतानाही त्याचे मनोधैर्य खचले नाही. (योहान ४:५-१६, ३१-३४) त्याच्या मित्रांनी त्याला एकटे पाडले तरीसुद्धा तो आपल्या ध्येयापासून विचलित झाला नाही.—मत्तय २६:५५, ५६; योहान १८:३-९.

येशूला लोकांविषयी कळकळ होती. त्याने भुकेल्यांना अन्‍न पुरवले. (योहान ६:१०, ११) खिन्‍न असलेल्यांना त्याने सांत्वन दिले. (लूक ७:११-१५) त्याने अंधळ्यांना दृष्टी, बहिऱ्‍यांना श्रवणशक्‍ती आणि आजारी लोकांना त्यांचे आरोग्य परत दिले. (मत्तय १२:२२; लूक ८:४३-४८; योहान ९:१-६) आपल्या परिश्रमी प्रेषितांचे त्याने मनोबल वाढवले. (योहान, अध्याय १३-१७) आपल्या मेंढरांची काळजी वाहणारा “उत्तम मेंढपाळ” असल्याचे त्याने शाबीत केले.—योहान १०:११-१४.

येशू खपण्यास तयार होता. एक महत्त्वाचा धडा आपल्या शिष्यांच्या मनावर बिंबवण्याकरता त्याने त्यांचे पाय धुतले. (योहान १३:४-१५) सुवार्तेची घोषणा करण्याकरता तो इस्राएलच्या कच्च्या धुळकट रस्त्यांवर दूरदूर पर्यंत फिरला. (लूक ८:१) “एकांती” विश्राम घेण्याचे मनात असतानाही, जेव्हा लोकांची गर्दी आणखी शिकण्यासाठी त्याला शोधत त्याच्यापर्यंत आली तेव्हा त्याने त्यांची निराशा केली नाही. (मार्क ६:३०, ३४) अशारितीने, आपल्या आदर्शातून त्याने सर्व ख्रिश्‍चनांना कष्टाळू असण्याचे प्रोत्साहन दिले.—१ योहान २:६.

आपल्याला नेमलेले कार्य पूर्ण करून येशू या पृथ्वीवरून गेला. त्याच्या विश्‍वासूपणाचे प्रतिफळ म्हणून, यहोवा देवाने त्याला स्वर्गात राज्यपद व अमरत्त्व बहाल केले. पुनरुत्थित येशूबद्दल बायबल म्हणते: “मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्‍यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्‍यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.” (रोमकर ६:९) मानवजातीकरता त्याच्यापेक्षा उत्तम नेता कोणी असूच शकत नाही याची तुम्ही खात्री बाळगू शकता. एकदा का ख्रिस्त येशूने या पृथ्वीची सर्व सूत्रे हाती घेतली, की मग दुसऱ्‍या कोणाच्या हाती सत्ता देण्याची किंवा नेतृत्वात बदल करण्याची गरजच उरणार नाही. त्याला त्याच्या पदावरून कोणीही हटवू शकणार नाही आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकणार नाही; त्यामुळे त्याने साध्य केलेले कार्य एखाद्या अक्षम उत्तराधिकाऱ्‍यामुळे व्यर्थ ठरण्याचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही. पण मानवांच्या हिताकरता तो नेमके काय करेल?

हा नवा नेता काय करेल

हा परिपूर्ण, अमर राजा काय काय करेल याविषयी स्तोत्र ७२ (पं.र.भा.) आपल्याला सविस्तर भविष्यसूचक माहिती देते. ७ व ८ वचनात असे म्हटले आहे: “त्याच्या दिवसांत न्यायी भरभराटीस येईल आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत उदंड शांती होईल. आणि समुद्रापासून समुद्रापर्यंत व नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत तो धनीपण चालवील.” त्याच्या समृद्ध शासनात पृथ्वीवरील रहिवाशांना सार्वकालिक व अखंड सुरक्षितता लाभेल. तो अस्तित्वात असलेली सर्व शस्त्रास्त्रे नष्ट करेल आणि एकमेकांशी लढण्याची भावनासुद्धा तो मनुष्याच्या मनातून नाहीशी करेल. आज जी माणसे भुकेल्या सिंहांसारखी इतरांवर हल्ला करतात किंवा चवताळलेल्या अस्वलांसारखी इतर माणसांशी वागतात त्यांची मनोवृत्ती पूर्णपणे बदलेल. (यशया ११:१-९) शांतीसुखाला अंत नसेल.

स्तोत्र ७२ यात पुढे १२-१४ वचनांत असे म्हटले आहे: “दरिद्री ओरडतो तेव्हा त्याला, आणि ज्या दीनाला कोणी साहाय्य करणारा नाही त्यालाही तो सोडवील. दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील, आणि दरिद्र्‌यांचे जीव तो वाचवील. जुलूम व बलात्कार यांपासून तो त्यांचा जीव खंडून घेईल, आणि त्यांचे रक्‍त त्याच्या दृष्टीने मोलवान होईल.” दीन, दुबळे, गरीब व असहाय्य जन सर्व एकाच आनंदी मानवी कुटुंबाचे सदस्य बनतील. त्यांचा राजा येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली ते सर्व एकजूट होतील. त्यांच्या जीवनात दुःख व निराशा नव्हे तर केवळ आनंद असेल.—यशया ३५:१०.

शिवाय, १६ वे वचन असे आश्‍वासन देते: “पृथ्वीवरील डोंगरांच्या माथ्यांवर भरपूर धान्य होईल.” आज पृथ्वीवरील कोट्यवधी लोक रोज उपाशी झोपी जातात. राजकीय धोरणांमुळे व स्वार्थामुळे बरेचदा पुरेसे अन्‍न उपलब्ध असूनही ते गरजूंपर्यंत पोचत नाही, ज्यामुळे लाखो लोक, विशेषतः निष्पाप मुले उपासमारीला बळी पडतात. पण येशू ख्रिस्ताच्या राज्यात ही समस्या नाहीशी होईल. पृथ्वी भरपूर सकस, स्वादिष्ट अन्‍न उपजेल. सर्व मानवजात तृप्त होईल.

आदर्श नेतृत्वाचे हे अद्‌भुत आशीर्वाद उपभोगण्याची तुम्हाला इच्छा आहे का? मग, आम्ही तुम्हाला त्या नेत्याविषयी शिकून घेण्याचे प्रोत्साहन देतो, की जो लवकरच सबंध पृथ्वी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेईल. यहोवाचे साक्षीदार तुम्हाला हे शिक्षण घेण्यास आनंदाने मदत करतील. तुमची मुळीच निराशा होणार नाही कारण यहोवा देव स्वतः आपल्या पुत्राविषयी म्हणतो: “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”—स्तोत्र २:६.

[५ पानांवरील चौकट]

अचानक सत्तेवरून पडलेले

एखादा शासक आपल्या प्रजाजनांना माफक प्रमाणात शांती व सुरक्षितता मिळवून देतो तेव्हा आपोआपच ते त्याचा आदर करतात व त्याला आपला पाठिंबा देतात. पण कोणत्याही कारणामुळे त्यांच्या विश्‍वासाला तडा गेल्यास, लवकरच सत्तास्थानी दुसऱ्‍या कोणालातरी बसवले जाते. मोठमोठ्या सत्ताधीशांना कोणत्या परिस्थितीत सत्तेवरून डावलण्यात आले याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

असमाधानकारक राहणीमान. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, अनेक फ्रेंच नागरिकांचे जीवन अतिशय खडतर झाले होते कारण खायला पुरेसे अन्‍न उपलब्ध नव्हते पण त्यांच्याकडून कर मात्र भरपूर आकारले जात होते. या परिस्थितीची निष्पत्ती फ्रेंच क्रांतीत झाली, ज्यामुळे १७९३ साली लुई सोळावा याचा शिरच्छेद करण्यात आला.

युद्ध. पहिल्या महायुद्धात इतिहासातील अतिशय शक्‍तिशाली सम्राटांना आपली सत्ता गमवावी लागली. उदाहरणार्थ, १९१७ साली रशिया येथील सेंट पिटर्सबर्ग शहरात, युद्धामुळे आलेल्या दुष्काळाच्या परिणामस्वरूप फेब्रुवारी क्रांती झाली. या उठावात झार निकलस दुसरा याची राज्यसत्ता अस्तास गेली व कम्युनिस्ट शासन उदयास आले. नोव्हेंबर १९१८ मध्ये जर्मनीला शांती हवी होती पण शासनात बदल होईपर्यंत मित्र राष्ट्रे लढाई बंद करण्यास तयार नव्हती. त्यामुळे नाईलाजाने जर्मन सम्राट विल्हेल्म याला नेदरलंड्‌सला हद्दपार करण्यात आले.

वेगळ्या सरकारी यंत्रणेची जनतेला गरज भासणे. १९८९ साली पोलादी पडदा काढून टाकण्यात आला. अतिशय शक्‍तिशाली वाटणाऱ्‍या राज्यसत्ता देखील कोसळल्या कारण जनतेने कम्युनिझमचा धिक्कार करून वेगळ्या प्रकारचे शासन स्थापित केले.

[७ पानांवरील चित्रे]

येशूने उपाशी लोकांना अन्‍न पुरवले, रोग्यांना बरे केले आणि सर्व ख्रिश्‍चनांपुढे उत्तम आदर्श ठेवला

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

लॉइड जॉर्ज: छायाचित्र Kurt Hutton/Picture Post/Getty Images