व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

छळ होत असूनही आनंदी

छळ होत असूनही आनंदी

छळ होत असूनही आनंदी

“माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.”मत्तय ५:११.

१. आनंद व छळ यांविषयी येशूने आपल्या अनुयायांना कोणते आश्‍वासन दिले?

येशूने आपल्या प्रेषितांना राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरता पहिल्यांदा पाठवताना त्यांना बजावले होते, की या कार्यात त्यांचा विरोध केला जाईल. त्याने त्यांना सांगितले: “माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील.” (मत्तय १०:५-१८, २२) पण याआधीच डोंगरावरील आपल्या प्रवचनात त्याने प्रेषितांना व इतरांना आश्‍वासन दिले की या विरोधामुळे त्यांचा मनस्वी आनंद कमी होणार नाही. उलट, येशूने ख्रिस्ती या नात्याने छळ होण्याचा संबंध आनंदी असण्याशी जोडला! छळामुळे कोणाला आनंद कसा काय मिळू शकेल?

नीतिमत्त्वाकरता दुःख सहन करणे

२. येशू व प्रेषित पेत्रानुसार, कोणत्या प्रकारे दुःख सहन केल्यामुळे आनंद प्राप्त होतो?

धन्य असण्याचे आठवे कारण येशूने या शब्दांत सांगितले: “नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:१०) दुःख सहन करण्यात तसे पाहिल्यास प्रशंसनीय असे काही नाही. प्रेषित पेत्राने लिहिले: “पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.” पुढे त्याने म्हटले: “खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसऱ्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये; ख्रिस्ती ह्‍या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:२०; ४:१५, १६) येशूच्या शब्दांनुसार, नीतिमत्त्वाकरता एखादी व्यक्‍ती दुःख सहन करते तेव्हा तिला यामुळे आनंद प्राप्त होतो.

३. (अ) नीतिमत्त्वाकरता छळले जाण्याचा काय अर्थ होतो? (ब) आरंभीच्या ख्रिश्‍चनांना सहन कराव्या लागलेल्या छळाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला?

खरे नीतिमत्त्व हे देवाच्या इच्छेला अधीन होणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे या आधारावर ठरवता येते. त्याअर्थी, नीतिमत्त्वाकरता दुःख सहन करण्याचा अर्थ, देवाच्या दर्जांचे अथवा आज्ञांचे उल्लंघन करण्याच्या दबावाला प्रतिकार केल्यामुळे दुःख सहन करावे लागणे. प्रेषितांनी येशूच्या नावाने प्रचार करण्याचे न थांबवल्यामुळे यहुदी धर्मपुढाऱ्‍यांकडून त्यांचा छळ झाला. (प्रेषितांची कृत्ये ४:१८-२०; ५:२७-२९, ४०) यामुळे त्यांचा आनंद नाहीसा झाला का किंवा त्यांच्या प्रचार कार्यात खंड पडला का? मुळीच नाही! “ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले; आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ५:४१, ४२) या छळामुळे त्यांना आनंदच मिळाला आणि प्रचार कार्यात त्यांचा आवेश द्विगुणीत झाला. कालांतराने, सम्राटाची उपासना करण्यास नकार दिल्यामुळे रोमनांनी आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा छळ केला.

४. ख्रिश्‍चनांचा छळ होण्यामागे कोणती काही कारणे आहेत?

आधुनिक काळात, यहोवाच्या साक्षीदारांनी ‘राज्याच्या सुवार्तेची’ घोषणा थांबवण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला आहे. (मत्तय २४:१४) त्यांच्या ख्रिस्ती सभांवर प्रतिबंध लावला जातो तेव्हा, एकत्र येण्याविषयीच्या बायबलमधील आज्ञेचे उल्लंघन करण्यापेक्षा ते छळ सहन करण्याचे पत्करतात. (इब्री लोकांस १०:२४, २५) ख्रिस्ती तटस्थतेमुळे व रक्‍ताचा गैरवापर करण्यास नकार दिल्यामुळेही त्यांची छळवणूक झाली आहे. (योहान १७:१४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) पण नीतिमत्त्वाकरता खंबीर भूमिका घेतल्यामुळे आजच्या काळातील देवाच्या सेवकांना विपूल मनःशांती आणि आनंद अनुभवायला मिळतो.—१ पेत्र ३:१४.

ख्रिस्तामुळे निंदा

५. आज कोणत्या मुख्य कारणामुळे यहोवाच्या लोकांचा छळ केला जातो?

डोंगरावरील प्रवचनात येशूने वर्णन केलेले धन्य असण्याचे नववे कारण देखील छळाच्या विषयाशी निगडीत आहे. त्याने म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.” (मत्तय ५:११) यहोवाच्या लोकांचा छळ होण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ते आजच्या दुष्ट व्यवस्थीकरणापासून अलिप्त राहतात. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते.” (योहान १५:१९) त्याचप्रकारे, प्रेषित पेत्राने म्हटले: “तुम्ही त्यांच्या बेतालपणांत त्यांना सामील होत नाही ह्‍याचे त्यास नवल वाटून ते तुमची निंदा करितात.”—१ पेत्र ४:४.

६. (अ) शेषजन व त्यांच्या साथीदारांची निंदा व छळ का केला जातो? (ब) या निंदेमुळे आपला आनंद कमी होतो का?

आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी येशूच्या नावाने प्रचार करण्याचे न थांबवल्यामुळेच त्यांचा छळ करण्यात आला याविषयी आपण आधीच पाहिले. ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ही आज्ञा दिली होती: “पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषितांची कृत्ये १:८) ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांनी ‘मोठ्या लोकसमुदायातील’ आपल्या एकनिष्ठ साथीदारांसोबत या आज्ञेचे मोठ्या आवेशाने पालन केले आहे. (प्रकटीकरण ७:९) त्यामुळे सैतान, “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या [“स्त्रीच्या,” अर्थात देवाच्या संघटनेच्या स्वर्गीय भागातील] संतानापैकी बाकीचे जे लोक” आहेत त्यांच्याशी लढाई करतो. (प्रकटीकरण १२:९, १७) यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण देवाच्या राज्य शासनाचा सध्या राज्य करत असलेला राजा येशू याच्याविषयी साक्ष देतो; हे शासन देवाच्या नीतिमान नव्या जगाच्या स्थापनेच्या आड येणाऱ्‍या सर्व मानवी शासनांचा नाश करील. (दानीएल २:४४; २ पेत्र ३:१३) याकरता आपली निंदा व छळ केला जातो, पण ख्रिस्ताच्या नावाकरता दुःख सहन करण्यास आपण आनंदच मानतो.—१ पेत्र ४:१४.

७, ८. आरंभीच्या ख्रिस्ती लोकांवर, त्यांचा विरोध करणाऱ्‍यांनी कोणते खोटे आरोप लावले?

येशूने म्हटले की लोक माझ्यामुळे जेव्हा “तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.” (मत्तय ५:११) आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत तर हे नक्कीच घडले. प्रेषित पौलाला, सा.यु. ५९-६१ दरम्यान रोममध्ये बंदिवासात ठेवण्यात आले होते तेव्हा तेथील यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी ख्रिश्‍चनांविषयी असे म्हटले: “ह्‍या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये २८:२२) पौल व सिला यांच्यावर “जगाची उलटापालट” करण्याचा व “कैसराच्या हुकमांविरुद्ध [वागण्याचा]” आरोप करण्यात आला.—प्रेषितांची कृत्ये १७:६, ७.

रोमी साम्राज्याच्या काळात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या संदर्भात लिहिताना, इतिहासकार के. एस. लॉट्यूरेट यांनी म्हटले: “आरोप वेगवेगळ्या प्रकारचे होते. ख्रिस्ती विदेश्‍यांच्या मूर्तिपूजक सोहळ्यांत सहभागी होण्यास नकार देत असल्यामुळे त्यांना लोक नास्तिक म्हणत. सामाजिक जीवनाच्या बहुतेक कार्यांपासून—उदाहरणार्थ, मूर्तिपूजक सोहळे, सार्वजनिक करमणुकीचे प्रकार यांपासून ते अलिप्त राहत असल्यामुळे . . .—त्यांना माणूसघाणे असे नाव देऊन त्यांची विटंबना करण्यात आली. . . . त्यांचे स्त्री व पुरुष सदस्य रात्रीच्या वेळी एकत्र येतात . . . आणि त्यानंतर अनैतिक संभोग करतात असे त्यांच्याविषयी बोलले जात. . . . [ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी] केवळ सत्य मानणाऱ्‍यांच्या उपस्थितीत साजरा केला जात असल्यामुळे, लोकांनी अशा अफवा पसरवल्या की ख्रिस्ती नियमितरित्या बाळकांचे बळी देऊन त्यांचे रक्‍त व मांस खातात.” शिवाय, आरंभीचे ख्रिस्ती सम्राटाची उपासना करण्यास नकार देत असल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्राचे शत्रू असल्याचा आरोप करण्यात आला.

९. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आपल्याविरुद्ध लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांना कसा प्रतिसाद दिला आणि आज स्थिती कशी आहे?

या खोट्या आरोपांमुळे आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याविषयीच्या आज्ञेचे पालन करण्यात कधीही खंड पडू दिला नाही. सा.यु. ६०-६१ या काळात पौल असे म्हणू शकला, की “सर्व जगातहि ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे” व “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत [तिची] घोषणा झाली” आहे. (कलस्सैकर १:५, ६, २३) आजही हेच घडत आहे. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांवर लावण्यात आले त्याप्रमाणेच, यहोवाच्या साक्षीदारांवरही खोटे आरोप लावले जात आहेत. पण तरीसुद्धा, राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्याचे कार्य वृद्धिंगत होत आहे आणि जे यात सहभाग घेतात ते आनंदित होतात.

भविष्यवक्‍त्‌यांप्रमाणे छळ होत असूनही आनंदी

१०, ११. (अ) येशूने धन्य असण्याच्या नवव्या कारणाची समाप्ती कशाप्रकारे केली आणि का? (ब) संदेष्ट्यांचा छळ का करण्यात आला? उदाहरणे द्या.

१० धन्य असण्याच्या नवव्या कारणाची समाप्ती येशूने अशाप्रकारे केली: “आनंद करा, . . . कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्तय ५:१२) अविश्‍वासू इस्राएलांना ताकीद देण्याकरता यहोवाने ज्या संदेष्ट्यांना पाठवले त्यांना लोकांनी स्वीकारले नाही, उलट बरेचदा त्यांनी त्यांचा छळ केला. (यिर्मया ७:२५, २६) प्रेषित पौलाने ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले कारण त्याने लिहिले: “आणखी काय सांगू?” . . . [संदेष्ट्यांचे] वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. . . . [ज्यांना] टवाळ्या, मारहाण ह्‍यांचा आणि बंधने व कैद ह्‍यांचाहि अनुभव आला.”—इब्री लोकांस ११:३२-३८.

११ दुष्ट राजा अहाब व त्याची पत्नी ईजबेल यांच्या राज्यात यहोवाच्या अनेक संदेष्ट्यांचा तरवारीने घात करण्यात आला. (१ राजे १८:४, १३; १९:१०) संदेष्टा यिर्मया याला खोड्यांत अडकवून ठेवण्यात आले आणि नंतर त्याला चिखलाच्या विहिरीत नेऊन टाकण्यात आले. (यिर्मया २०:१, २; ३८:६) संदेष्टा दानीएल याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. (दानीएल ६:१६, १७) ख्रिस्तपूर्व काळातील या सर्व संदेष्ट्यांचा छळ यासाठी करण्यात आला कारण त्यांनी यहोवाच्या शुद्ध उपासनेचे समर्थन केले. अनेक संदेष्ट्यांचा यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी छळ केला. येशूने शास्त्री व परूशी यांना “संदेष्ट्याचा घात करणाऱ्‍यांचे पुत्र” म्हटले.—मत्तय २३:३१.

१२. यहोवाचे साक्षीदार या नात्याने प्राचीन काळच्या संदेष्ट्यांसारखाच आपलाही छळ व्हावा यास आपण एक बहुमान का समजतो?

१२ आज यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपला छळ सहसा यासाठी केला जातो की आपण आवेशाने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतो. आपले शत्रू आपल्यावर “जबरदस्तीने धर्मांतर” करण्याचा आरोप करतात, पण आपल्याआधी यहोवाच्या इतर विश्‍वासू उपासकांनाही अशाप्रकारच्या टीकेला तोंड द्यावे लागले होते हे आपल्याला माहीत आहे. (यिर्मया ११:२१; २०:८, ११) प्राचीन काळच्या विश्‍वासू संदेष्ट्यांना ज्या कारणासाठी छळले गेले त्याच कारणासाठी आपल्यालाही दुःख सहन करायला मिळावे हा आपण एक बहुमान समजतो. शिष्य याकोबाने लिहिले: “बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुखःसहन व त्यांचा धीर ह्‍यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.”—याकोब ५:१०, ११.

धन्य असण्याची गहन कारणे

१३. (अ) छळामुळे आपण खचून का जात नाही? (ब) कोणती गोष्ट आपल्याला खंबीरपणे उभे राहण्यास साहाय्य करते आणि हे कशावरून शाबीत होते?

१३ छळामुळे आपण मुळीच निराश होत नाही; उलट आपण संदेष्टे, आरंभीचे ख्रिस्ती व खुद्द ख्रिस्त येशूच्या पाऊलखुणांचे अनुकरण करत आहोत या जाणीवेने आपल्याला सांत्वन मिळते. (१ पेत्र २:२१) शास्त्रवचनांत लिहिलेल्या गोष्टी आपल्याला मनस्वी समाधान देतात, उदाहरणार्थ प्रेषित पेत्राने लिहिलेले पुढील शब्द: “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांवर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका; ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.” (१ पेत्र ४:१२, १४) छळ होत असताना आपण खंबीरपणे उभे राहू शकतो ते केवळ यामुळे, की यहोवाचा आत्मा आपल्यावर असतो आणि आपल्याला बळ देतो हे आपण अनुभवानिशी जाणतो. पवित्र आत्म्याचे साहाय्य एक पुरावा आहे की यहोवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो.—स्तोत्र ५:१२; फिलिप्पैकर १:२७-२९.

१४. नीतिमत्त्वाकरता छळ झाल्यास, आपण कोणत्या कारणांमुळे आनंदी होतो?

१४ नीतिमत्त्वाकरता सहन करावा लागणारा विरोध व छळ आपल्याला आनंद देतो याचे आणखी एक कारण म्हणजे आपण खरे ख्रिस्ती या नात्याने सुभक्‍ती आचरत आहोत याचा हा पुरावा आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) आपण परीक्षेत विश्‍वासू राहतो तेव्हा, यहोवाचे सर्व सेवक केवळ स्वार्थापोटी त्याची सेवा करतात या सैतानाच्या आव्हानाला आणखी एक प्रत्युत्तर पुरवले जाते, हे जाणण्यासारखा आपल्याला दुसरा आनंद नाही. (ईयोब १:९-११; २:३, ४) यहोवाच्या नीतिमान सार्वभौमत्वाच्या समर्थनात, अगदी खारीचा वाटा का होईना, पण आपलाही वाटा आहे हे जाणून आपण हर्ष पावतो.—नीतिसूत्रे २७:११.

प्रतिफळाविषयी उल्हास करा

१५, १६. (अ) येशूने आपल्याला ‘आनंद व उल्हास’ करण्याचे कोणते कारण सांगितले? (ब) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांकरता स्वर्गात कोणते प्रतिफळ राखून ठेवले आहे आणि “दुसरी मेंढरे” यांपैकी असलेल्या त्यांच्या साथीदारांना कोणते प्रतिफळ मिळेल?

१५ प्राचीन काळातील संदेष्ट्यांप्रमाणे निंदा व छळ सहन करावा लागल्यास आनंदी होण्याचे आणखी एक कारण येशूने सांगितले. धन्य असण्याच्या नवव्या कारणाच्या शेवटी त्याने म्हटले: “आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” (मत्तय ५:१२) प्रेषित पौलाने लिहिले: “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) होय, “मोठे प्रतिफळ” म्हणजे जीवन आहे; आणि हे वेतनासारखे नाही जे आपण कमवू शकतो. तर ते एक कृपादान आहे. येशूने हे प्रतिफळ “स्वर्गात” आहे असे म्हटले कारण ते यहोवाकडून मिळते.

१६ अभिषिक्‍त जनांना “जीवनाचा मुगूट,” मिळतो; त्यांच्या बाबतीत, हे स्वर्गात ख्रिस्तासोबत अमर जीवन आहे. (याकोब १:१२, १७) ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे, ते अर्थात “दुसरी मेंढरे,” पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवन मिळवण्याची आस धरतात. (योहान १०:१६; प्रकटीकरण २१:३-५) दोन्ही गटांच्या बाबतीत हे “प्रतिफळ” कमवता येण्याजोगे नाही. अभिषिक्‍त जनांना व “दुसरी मेंढरे” यांना देखील यहोवाच्या ‘अपार कृपेमुळेच’ हे प्रतिफळ मिळते. म्हणूनच प्रेषित पौल असे लिहिण्यास प्रेरित झाला: “देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुति होवो.”—२ करिंथकर ९:१४, १५.

१७. आपला छळ होतो तेव्हाही आपण आनंद व उल्हास का करू शकतो?

१७ सम्राट नेरोच्या हाती लवकरच ज्यांचा क्रूरतेने छळ होणार होता, अशा ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने लिहिले: “[आपण] संकटांचाहि अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि आशा लाजवीत नाही.” तो असेही म्हणाला: “आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा.” (रोमकर ५:३-५; १२:१२) आपली आशा स्वर्गीय असो वा पृथ्वीवरील, परीक्षेत विश्‍वासू राहिल्याबद्दल आपल्याला मिळणार असलेले प्रतिफळ हे आपल्या पात्रतेपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. आपला राजा ख्रिस्त येशू याच्या राज्यात, आपल्या प्रेमळ पित्या यहोवाची सेवा व स्तुती करण्याकरता सर्वकाळ जगण्याच्या आशेचा आनंद अवर्णनीय आहे. म्हणूनच आपण ‘उल्हास करतो.’

१८. अंत जवळ येत असता राष्ट्रांकडून आपण कोणती अपेक्षा करू शकतो आणि यहोवा काय करेल?

१८ काही देशांत, यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यात आला आहे व अजूनही केला जात आहे. या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयीच्या भविष्यवाणीत येशूने खऱ्‍या ख्रिश्‍चनांना असे सांगून वेळीच सावध केले: “माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:९) अंताच्या आपण जसजसे जवळ येतो तसतसा सैतान राष्ट्रांना यहोवाच्या लोकांविरुद्ध त्यांचा द्वेष व्यक्‍त करण्यास उद्युक्‍त करेल. (यहेज्केल ३८:१०-१२, १४-१६) यहोवाने कारवाई करण्याचा समय आला आहे याचा हा इशारा असेल. “मी आपणास थोर करीन, आणि मी पवित्र मानला जाईन असे करीन, आणि पुष्कळ राष्ट्रांच्यादेखत मी आपली ओळख पटवीन, आणि ती जाणतील की मी यहोवा आहे.” (यहेज्केल ३८:२३, पं.र.भा.) अशारितीने यहोवा आपले महान नाम पवित्र करेल आणि छळल्या जाणाऱ्‍या आपल्या लोकांना सोडवेल. म्हणूनच, “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य.”—याकोब १:१२.

१९. ‘देवाच्या महान दिवसाची’ वाट पाहताना आपण काय केले पाहिजे?

१९ ‘देवाचा महान दिवस’ जसजसा जवळ येत आहे, तसतसे आपण आनंदित होऊ या कारण येशूच्या नावासाठी “आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो.” (२ पेत्र ३:१०-१३; प्रेषितांची कृत्ये ५:४१) यहोवाच्या नीतिमान नव्या जगात आपले प्रतिफळ मिळण्याची वाट पाहत असताना, आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे, आपणही “येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे” व त्याच्या राज्य शासनाविषयी लोकांना “शिकविण्याचे” सोडू नये.—प्रेषितांची कृत्ये ५:४२; याकोब ५:११.

उजळणी

• नीतिमत्त्वाकरता दुःख सहन करण्याचा काय अर्थ होतो?

• आरंभीच्या ख्रिश्‍चनांवर छळाचा काय परिणाम झाला?

• यहोवाच्या साक्षीदारांना प्राचीन काळच्या संदेष्ट्यांप्रमाणे छळले जात आहे असे का म्हणता येईल?

• छळ झाला तरीसुद्धा आपण “आनंद व उल्हास” का करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्रे]

“लोक तुमची निंदा व छळ करितील . . . तेव्हा तुम्ही धन्य”

[चित्राचे श्रेय]

तुरुंगातील गट: Chicago Herald-American