व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दिल्याने मिळणारा आनंद तुम्ही कधी अनुभवला आहे का?

दिल्याने मिळणारा आनंद तुम्ही कधी अनुभवला आहे का?

दिल्याने मिळणारा आनंद तुम्ही कधी अनुभवला आहे का?

सक्रिय ख्रिस्ती सेवेत तिने जवळजवळ ५० वर्षे वाहिली होती. वृद्धापकाळामुळे तिची तब्येत नाजूक झाली होती तरीसुद्धा नव्याने बांधलेले राज्य सभागृह पाहण्याचा तिने निश्‍चय केला होता. एका प्रेमळ ख्रिस्ती बांधवाचा आधार घेत तिने या नव्या राज्य सभागृहात प्रवेश केला आणि थेट आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने अर्थात दानपेटीच्या दिशेने ती हळूहळू चालत गेली. या नवीन राज्य सभागृहासाठी आपण जमवलेली लहानशी रक्कम तिने दानपेटीत टाकली. सभागृहाच्या बांधकामात ती भाग घेऊ शकत नव्हती तरीपण तिला मदत करायची होती.

या ख्रिस्ती स्त्रीविषयी वाचल्यावर तुम्हाला आणखी एका विश्‍वासू स्त्रीची आठवण होईल—मंदिराच्या दानपेटीत दोन दमड्या टाकताना येशूने जिला पाहिले होते, ती “गरीब विधवा.” या गरीब विधवेच्या परिस्थितीविषयी आपल्याला काही सांगण्यात आलेले नाही; पण त्याकाळी, पती नसलेल्या एकाकी स्त्रीला सहसा अतिशय गंभीर आर्थिक स्थितीला तोंड द्यावे लागत असे. येशूला तिची स्थिती पूर्णपणे समजल्यामुळे त्याला तिची खूप दया आली. आपल्या शिष्यांना तिचे उदाहरण देत त्याने म्हटले, की तिची ती लहानशी भेट म्हणजे ‘तिच्याजवळ होते नव्हते ते, म्हणजे तिने आपली सर्व उपजीविका टाकली.’—मार्क १२:४१-४४.

त्या गरीब विधवेसारख्या एका गरजू स्त्रीने हा त्याग का केला असावा बरे? कारण जेरुसलेममधील मंदिरात ज्याच्या उपासनेचे केंद्र होते त्या यहोवा देवावर तिची गहरी श्रद्धा होती. ती फार काही करण्याच्या स्थितीत नव्हती, तरीपण पवित्र सेवेला पाठिंबा देण्याची तिची इच्छा होती. तिला जितके दान टाकता येत होते तितके टाकण्यात तिला खरोखरच आनंद वाटला असावा.

यहोवाच्या कार्याला मदत देणे

भौतिक व आर्थिक मदत देणे, हा सुरवातीपासूनच शुद्ध उपासनेचा एक आवश्‍यक भाग आहे आणि त्यामुळे खूप आनंदही मिळतो. (१ इतिहास २९:९) प्राचीन इस्राएलमध्ये दानपेटीतील दानांचा उपयोग केवळ मंदिराची शोभा वाढवण्याकरताच नव्हे तर यहोवाच्या उपासनेत समाविष्ट असलेली सर्व दैनिक कार्ये पार पाडण्यासाठी देखील केला जात असे. मोशेच्या नियमशास्त्रात हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते, की इस्राएल पुत्रांनी, आपल्या उत्पन्‍नातील दशमांश, मंदिरातील सेवा पार पाडणाऱ्‍या लेवीयांना आधार देण्यासाठी दिला पाहिजे. पण, लेवीयांनासुद्धा जो दशमांश मिळत होता त्याचा दशांश यहोवाला अर्पण करायचा होता.—गणना १८:२१-२९.

ख्रिश्‍चनांना, नियमशास्त्र करारातील नियमांतून मुक्‍त करण्यात आलेले असले तरी, देवाचे सेवक खऱ्‍या उपासनेला आर्थिक मदत देतात हे तत्त्व बदललेले नाही. (गलतीकर ५:१) शिवाय, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना, आपल्या बांधवांच्या गरजा पूर्ण करण्याकरता दान देण्यात आनंद वाटत होता. (प्रेषितांची कृत्ये २:४५, ४६) प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना अशी आठवण करून दिली, की देवाने जसे त्यांना उत्तम गोष्टी दिल्या त्याप्रमाणे त्यांनीही इतरांना उदारता दाखवली पाहिजे. त्याने लिहिले: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी; चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान्‌ असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.” (१ तीमथ्य ६:१७-१९; २ करिंथकर ९:११) होय, व्यक्‍तिगत अनुभवावरून पौल येशूच्या या शब्दांना पुष्टी देऊ शकत होता: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

आज ख्रिस्ती कशाप्रकारे देतात

आजही यहोवाचे सेवक, एकमेकांना मदत करण्याकरता आणि देवाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आपल्या भौतिक संपत्तीचा उपयोग करतात. जे गरीब आहेत तेही आपल्या ऐपतीनुसार दान टाकतात. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाला’ या निधीचा होता होईल तितका उत्तम वापर करण्याची यहोवापुढे एक जबाबदारी वाटते. (मत्तय २४:४५) शाखा दफ्तरांचे कार्यवहन, बायबल आणि बायबल साहित्यांचे भाषांतर व उत्पादन, मोठ्या ख्रिस्ती मेळाव्यांचे आयोजन, प्रवासी पर्यवेक्षक आणि मिशनऱ्‍यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पाठवणे, संकटकालीन साहाय्य सामग्री पाठवणे आणि आणखी इतर आवश्‍यक उद्देशांस्तव या निधीचा उपयोग केला जातो. अशाच एका उद्देशावर अर्थात उपासना स्थळांच्या निर्माण कार्यासाठी मदत देण्यावर आपण आपले लक्ष केंद्रित करू या.

यहोवाचे साक्षीदार दर आठवडी अनेकदा आध्यात्मिक शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी व हितकारक संगतीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या राज्य सभागृहात एकत्र जमतात. परंतु पुष्कळ देशांत, आर्थिक अडचणींमुळे स्थानीय साक्षीदारांना, जोपर्यंत त्यांना सुरवातीला काही आर्थिक मदत दिली जात नाही तोपर्यंत स्वतःच्या हिंमतीवर राज्य सभागृहांचे बांधकाम करणे जमत नाही. म्हणूनच, १९९९ साली यहोवाच्या साक्षीदारांनी एक कार्यक्रम सुरू केला ज्यात श्रीमंत देशांतून येणाऱ्‍या निधीचा उपयोग गरीब राष्ट्रांत राज्य सभागृहे बांधण्यासाठी करण्यात येऊ लागला. शिवाय, यासाठी हजारो स्वयंसेवकांनी स्वखुशीने आपला वेळ, आपली कौशल्ये पणाला लावली; बहुतेकदा त्यांना अशा गरीब राष्ट्रांत दूरच्या क्षेत्रात काम करावे लागले. बांधकामाच्या काळादरम्यान, स्थानीय साक्षीदार बांधकाम आणि दुरुस्तीची कामे शिकून घेतात आणि राज्य सभागृह निधीमुळे आवश्‍यक सामग्री आणि साहित्य विकत घेता येते. जे साक्षीदार आता अशा नवीन राज्य सभागृहांचा उपयोग करीत आहेत ते, ज्यांनी आपला वेळ, पैसा दिला अशा आपल्या सहविश्‍वासू बांधवांबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त करतात. आणि नवीन राज्य सभागृह सुस्थितीत ठेवण्याकरता हे स्थानीय साक्षीदार दर महिन्याला अनुदान देतात जेणेकरून ते बांधकामाचा खर्च फेडू शकतात आणि अशाप्रकारे अधिक राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी हातभार लावू शकतात.

स्थानीय पद्धतींचा व साहित्यांचा उपयोग करून राज्य सभागृहे बांधली जात आहेत. ही सभागृहे खूप मोठी नसली तरी आकर्षक, सोयीस्कर आणि आरामदायी आहेत. १९९९ साली बांधकाम कार्यक्रमाची सुरवात झाली होती तेव्हा मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या जवळजवळ ४० देशांना यात समाविष्ट करण्यात आले होते. तेव्हापासून, हा बांधकाम कार्यक्रम वाढत गेला आणि आता यात ११६ अशा देशांना समाविष्ट करण्यात आले आहे; संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या निम्याअधिक मंडळ्यांचा यात समावेश आहे. मागच्या पाच वर्षांत, या कार्यक्रमांतर्गत ९,००० पेक्षा अधिक राज्य सभागृहे बांधण्यात आली आहेत; म्हणजे दररोज सरासरी ५ नवी सभागृहे बांधण्यात आली! तरीसुद्धा या ११६ देशांत अद्याप १४,५०० नव्या राज्य सभागृहांची आवश्‍यकता आहे. यहोवाच्या आशीर्वादामुळे आणि संपूर्ण जगभरातील साक्षीदारांच्या स्वेच्छेमुळे व उदारतेमुळे राज्य सभागृह निधीतून ही आवश्‍यकता पूर्ण करणे शक्य होईल, अशी आशा केली जाते.—स्तोत्र १२७:१.

राज्य सभागृहांमुळे वाढ होते

या प्रचंड कामगिरीचा स्थानीय साक्षीदारांवर आणि राज्य प्रचार कार्यावर काय परिणाम झाला आहे? पुष्कळ भागात, नवीन राज्य सभागृह बांधल्यानंतर तिथल्या सभांच्या उपस्थितीत कमालीची वाढ झाली आहे. एक विशिष्ट उदाहरण आहे बुरूंडीहून आलेला पुढील अहवाल: “राज्य सभागृह बांधून झाले की ते लगेच गच्च भरते. जसे की सरासरी १०० जण उपस्थित राहत असलेल्या एका मंडळीसाठी एक राज्य सभागृह बांधून झाले. या नव्या सभागृहात १५० जण आरामशीर बसू शकत होते. पण सभागृहाचे बांधकाम पूर्ण होईस्तोवर २५० जण सभांना उपस्थित राहू लागले होते.”

अशी ही उपस्थितीत वाढ का झाली? एक कारण म्हणजे, एकत्र जमण्यासाठी ठिकाण नसल्यामुळे एखाद्या झाडाखाली किंवा शेतात जमा होणाऱ्‍या राज्य प्रचारकांच्या गटांकडे कधीकधी संशयाने पाहिले जाते. एका देशात, अशा लहान धार्मिक गटांशी वांशिक हिंसाचाराचा संबंध जोडला जातो आणि कायद्यानुसार सर्व धार्मिक सभा उपासना गृहाच्या आत झाल्या पाहिजेत.

स्वतःचे राज्य सभागृह असल्याने यहोवाच्या साक्षीदारांना समाजातील लोकांना दाखवता येते, की ते अमुक एका पाळकाचे शिष्य नाहीत. यहोवाच्या साक्षीदारांच्या झिंबाब्वे शाखा दफ्तराने असे लिहिले: “पूर्वी, या भागातील बांधवांना एखाद्या बांधवाच्या घरी एकत्र जमावे लागायचे आणि स्थानीय लोक, त्या घराच्या मालकाच्या नावाने या मंडळीला ओळखायचे. ते म्हणायचे, हे चर्च ‘मि. अमुक अमुक’ यांचे आहे. पण आता हे सर्व बदलत चाललं आहे कारण लोक आता ‘यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह’ हे स्पष्ट ओळखचिन्ह पाहू शकतात.”

आनंदी दाते

“संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (२ करिंथकर ९:७) अर्थातच, मोठ्या देणग्या अतिशय मदतदायी असतात. पण यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी दिलेल्या देणग्यातील बहुतेक निधी राज्य सभागृहातील दानपेट्यांतून मिळतो. सर्व देणग्या मग त्या मोठ्या असोत अथवा छोट्या असोत, महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात नाही. त्या गरीब विधवेला दानपेटीत दोन दमड्या टाकताना येशूने पाहिले होते, हे आठवा. देवदूतांनी व यहोवाने देखील तिला पाहिले. आपल्याला त्या विधवेचे नाव माहीत नाही परंतु यहोवाने तिचे निःस्वार्थ कृत्य बायबलमध्ये नेहमीसाठी लिहून ठेवले जाईल याची खात्री केली.

राज्य सभागृह बांधकामाव्यतिरिक्‍त आपल्या देणग्यांमुळे महत्त्वपूर्ण राज्य प्रचार कार्याचे इतर पैलू देखील पार पाडले जातात. या मार्गाने सहकार्य दिल्याने आपल्याला आनंद करण्याचे कारण मिळते आणि ‘देवाचे अधिकाधिक आभार प्रदर्शन करून समृद्ध’ होता येते. (२ करिंथकर ९:१२) बेनीनमधील आपले बांधव असा अहवाल पाठवतात: “आंतरराष्ट्रीय बंधूसमाजाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीसाठी दररोज आभारप्रदर्शनाच्या शेकडो प्रार्थना यहोवाला केल्या जातात.” शिवाय, राज्य कार्याला आर्थिक मदत देण्यात सहभाग घेतलेले आपण सर्व ख्रिस्ती देण्यातून मिळणाऱ्‍या आनंदाचा अनुभव लुटतो!

[२२, २३ पानांवरील चौकट/चित्र]

दान देण्यासाठी काहीजण निवडत असलेले मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान

“जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठी अनुदान—मत्तय २४:१४.” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान देखील सरळ या शाखा दप्तरांना पाठवले जाऊ शकते. शाखा दफ्तरांचे पत्ते या पत्रिकेच्या पृष्ठ २ वर सापडतील. चेक असतील तर ते “वॉच टावर”ला देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

सशर्त-दान योजना

काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी, कृपया स्थानिक शाखेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

धर्मादाय योजना

पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌स देखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधा.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात वॉच टावर संस्थेच्या नावावर पैसे किंवा सुरक्षितता केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.

“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानांकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदे देखील वाढवता आले आहेत. धर्मादाय योजना कार्यालयाशी थेट संपर्क साधून या माहितीपत्रकाची एक प्रत मागवता येऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Jehovah’s Witnesses,

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४,

Karnataka.

Telephone: (०८०) २८४६८०७२

[२०, २१ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या साक्षीदारांची जुनी आणि नवीन उपासना स्थळे

झांबिया

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक