व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे आनंदी सेवक

यहोवाचे आनंदी सेवक

यहोवाचे आनंदी सेवक

“आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे आनंदी आहेत.”मत्तय ५:३, NW

१. खरा आनंद काय आहे व तो कशामुळे उत्पन्‍न होतो?

आनंद हा यहोवाच्या लोकांचा एक मोलवान ठेवा आहे. स्तोत्रकर्त्या दाविदाने असे घोषित केले: “ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी आहेत!” (स्तोत्र १४४:१५, पं.र.भा.) आनंद अथवा सुख म्हणजे सुस्थितीत असण्याची भावना. अत्यानंद, अर्थात अगदी अंतर्यामी जाणवणारा आनंद, यहोवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे या जाणिवेतून उत्पन्‍न होतो. (नीतिसूत्रे १०:२२) अशाप्रकारचा आनंद अनुभवणाऱ्‍या व्यक्‍तीचा आपल्या स्वर्गीय पित्यासोबत एक घनिष्ट नातेसंबंध असतो आणि आपण त्याची इच्छा पूर्ण करत आहोत याची जाणीव तिला असते. (स्तोत्र ११२:१; ११९:१, २) येशूने आनंदी असण्याची नऊ कारणे सांगितली व ती लक्ष देण्याजोगी आहेत. धन्य, अथवा आनंदी असण्याच्या या कारणांचे आपण या व पुढच्या लेखात परीक्षण करणार आहोत. यांचे परीक्षण केल्याने, “धन्यवादित देव” यहोवा याची विश्‍वासूपणे सेवा केल्यामुळे आपण कशाप्रकारे धन्य अथवा आनंदी होऊ शकतो याची आपल्याला जाणीव होईल.—१ तीमथ्य १:११.

आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असणे

२. येशूने धन्य अथवा आनंदी असण्याविषयी केव्हा सांगितले आणि त्याचे पहिले विधान कोणते होते?

सा.यु. ३१ साली येशूने इतिहासातील सर्वात सुप्रसिद्ध असे एक प्रवचन दिले. याला डोंगरावरील प्रवचन म्हणतात कारण येशूने हे प्रवचन गालील समुद्राजवळील एका डोंगरावर बसून दिले होते. मत्तयाच्या शुभवर्तमानात त्याचे असे वर्णन केले आहे: “त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जे आत्म्याने दीन [“आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे,” NW] ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:१-३) टुडेज इंग्लिश व्हर्शन या भाषांतरानुसार: “आपण आध्यात्मिकरित्या दरिद्र आहोत हे ओळखणारे धन्य.”

३. नम्र मनोवृत्तीमुळे आपल्या आनंदात कशाप्रकारे भर पडते?

या डोंगरावरील प्रवचनात येशूने स्पष्ट सांगितले की ज्या व्यक्‍तीला आपण आध्यात्मिक रित्या गरजू असल्याची जाणीव असते ती इतरांपेक्षा कित्येक पटीने जास्त आनंदी असते. आपल्या पापी स्वभावाची पूर्ण जाणीव असणारे नम्र ख्रिस्ती, येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवाच्या क्षमेची याचना करतात. (१ योहान १:९) यामुळे त्यांना मनःशांती व खरा आनंद मिळतो. “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!”—स्तोत्र ३२:१; ११९:१६५.

४. (अ) आपण स्वतःच्या व इतरांच्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक आहोत हे कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो? (ब) आपण आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव बाळगतो तेव्हा आपला आनंद कशामुळे द्विगुणित होतो?

स्वतःच्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असल्यामुळे आपण दररोज बायबल वाचण्यास, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ “यथाकाळी” पुरवलेले आध्यात्मिक अन्‍न आत्मसात करण्यास व ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहण्यास प्रवृत्त होतो. (मत्तय २४:४५; स्तोत्र १:१, २; ११९:१११; इब्री लोकांस १०:२५) इतर मानवांबद्दल असलेल्या प्रीतीमुळे आपल्याला त्यांच्याही आध्यात्मिक गरजेची जाणीव होते आणि यामुळे आपल्याला आवेशाने राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची व त्याविषयी शिक्षण देण्याची प्रेरणा मिळते. (मार्क १३:१०; रोमकर १:१४-१६) इतरांना बायबलमधील सत्ये सांगितल्याने आपल्याला आनंद मिळतो. (प्रेषितांची कृत्ये २०:२०, ३५) शिवाय, आपण देवाच्या राज्याच्या अद्‌भूत आशेविषयी आणि या राज्याद्वारे मिळणाऱ्‍या आशीर्वादांविषयी मनन करतो, तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या ‘लहान कळपाकरता,’ राज्याच्या आशेचा अर्थ, ख्रिस्ताच्या राज्य सरकारात सामील होऊन स्वर्गात अमर जीवन उपभोगणे असा आहे. (लूक १२:३२; १ करिंथकर १५:५०, ५४) तर ‘दुसऱ्‍या मेंढरांकरता’ राज्याच्या आशेचा अर्थ त्या राज्य शासनाधीन पृथ्वीवरील रम्य परादीसात सार्वकालिक जीवन उपभोगणे असा आहे.—योहान १०:१६; स्तोत्र ३७:११; मत्तय २५:३४, ४६.

शोक करणारे कसे आनंदी होऊ शकतात

५. (अ) “जे शोक करीत आहेत” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? (ब) या शोक करणाऱ्‍यांना कशाप्रकारे सांत्वन मिळते?

आनंदी असण्याविषयी येशूने केलेले पुढचे विधान परस्परविरोधी वाटते. त्याने म्हटले: “जे शोक करीत आहेत ते धन्य.” (मत्तय ५:४) एक व्यक्‍ती शोक करत असल्यास, तिला धन्य, किंवा आनंदी कसे म्हणता येईल? येशूच्या या विधानाचा अर्थ समजून घेण्याकरता, तो कोणत्या प्रकारच्या शोकाविषयी बोलत होता हे समजून घेतले पाहिजे. शिष्य याकोब स्पष्ट करतो की आपली स्वतःची पापमय अवस्था आपल्या या शोकाला कारणीभूत असली पाहिजे. त्याने लिहिले: “अहो पापी जनहो, हात निर्मळ करा, अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो. प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांस उच्च करील.” (याकोब ४:८-१०) आपल्या पापमय अवस्थेमुळे खऱ्‍या अर्थाने दुःखी असलेल्यांना जेव्हा कळते, की ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यास त्यांच्या पापांची क्षमा होऊ शकते; आणि जेव्हा ते यहोवाची इच्छा पूर्ण करण्याद्वारे मनःपूर्वक पश्‍चात्ताप व्यक्‍त करतात तेव्हा त्यांना सांत्वन मिळते. (योहान ३:१६; २ करिंथकर ७:९, १०) यानंतर ते यहोवासोबत एक अनमोल नातेसंबंध जोडू शकतात आणि सर्वकाळ जगून त्याची सेवा व स्तुती करण्याची आशा देखील त्यांना मिळते. यामुळे साहजिकच त्यांना गहिरा आंतरिक आनंद मिळतो.—रोमकर ४:७, ८.

६. काहीजण कोणत्या अर्थाने शोक करतात आणि त्यांना कशाप्रकारे सांत्वन प्राप्त होते?

जे पृथ्वीवरील घृणित परिस्थितीमुळे शोक करतात त्यांचाही समावेश, येशूने केलेल्या विधानात होतो. येशूने यशया ६१:१, २ यातील भविष्यवाणी स्वतःला लागू केली, ज्यात असे म्हटले आहे: “प्रभु परमेश्‍वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, . . . सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे.” अद्याप पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना देखील हे कार्य नेमण्यात आले आहे व ते आपले साथीदार अर्थात, “दुसरी मेंढरे” यांच्या साहाय्याने हे कार्य साध्य करतात. हे सर्वजण, “जी माणसे आपल्यात [धर्मत्यागी जेरूसलेमेत अर्थात ख्रिस्ती धर्मजगतात] होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत” त्यांच्या कपाळावर लाक्षणिक अर्थाने चिन्ह करण्याच्या कार्यात सहभागी होतात. (यहेज्केल ९:४) या शोक करणाऱ्‍यांना ‘राज्याच्या सुवार्तेमुळे’ सांत्वन प्राप्त होते. (मत्तय २४:१४) सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा लवकरच नाश होऊन यहोवाचे धार्मिक नवे जग येईल हे समजल्यावर ते आनंदित होतात.

जे सौम्य ते धन्य

७. “सौम्य” हा शब्द कशास सूचित करत नाही?

डोंगरावरील प्रवचनात येशूने पुढे म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५) सौम्यतेचा अर्थ कधीकधी दुबळा स्वभाव असा घेतला जातो. पण ही वस्तुस्थिती नाही. “सौम्य” असे भाषांतर केलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना एका बायबल विद्वानाने असे लिहिले: “[सौम्य] मनुष्याचा सर्वात श्रेष्ठ गुण म्हणजे त्याचे स्वतःवर पूर्ण नियंत्रण असते. सौम्यता ही कणाहीन वृत्ती, किंवा नेभळटपणा, पुळचटपणा, जे घडतेय ते निर्विकारपणे पाहात राहणे यास सूचित करत नाही. तर सौम्यता, पूर्ण नियंत्रणात असलेली ताकद यास सूचित करते.” येशूने स्वतःविषयी म्हटले: “मी . . . मनाचा सौम्य व लीन आहे.” (मत्तय ११:२९) पण, नीतिमान तत्त्वांचे समर्थन करण्याच्या बाबतीत येशूने निर्भीड वृत्ती दाखवली.—मत्तय २१:१२, १३; २३:१३-३३.

८. कोणत्या गुणाशी सौम्यतेचा जवळचा संबंध आहे आणि इतरांसोबतच्या नातेसंबंधांत या गुणाची गरज का आहे?

त्याअर्थी, सौम्यता व आत्मसंयम या गुणांचा जवळचा संबंध आहे. किंबहुना, प्रेषित पौलाने “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” याचे वर्णन केले तेव्हा त्याने सौम्यता व इंद्रियदमन यांचा एकापाठोपाठ उल्लेख केला. (गलतीकर ५:२२, २३) तेव्हा सौम्यतेचा गुण पवित्र आत्म्याच्या साहाय्याने विकसित केला पाहिजे. हा असा ख्रिस्ती गुण आहे जो आपल्याला बाहेरच्या लोकांसोबत व मंडळीतल्या बांधवांसोबत शांतीपूर्ण संबंध राखण्यास साहाय्य करतो. पौलाने लिहिले: “करूणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि . . . आपसात क्षमा करा.”—कलस्सैकर ३:१२, १३.

९. (अ) सौम्य असणे हे केवळ इतर लोकांशी असलेल्या आपल्या संबंधांपुरतेच मर्यादित का नाही? (ब) सौम्य जन कशाप्रकारे या ‘पृथ्वीचे वतन’ भोगतात?

पण सौम्यता केवळ इतर मानवांशी असलेल्या संबंधांतच आवश्‍यक नाही. यहोवाच्या सार्वभौमत्वाला स्वेच्छेने अधीन होण्याद्वारे देखील आपण सौम्य असल्याचे दाखवतो. यासंदर्भात सर्वोत्तम उदाहरण येशू ख्रिस्ताचे आहे; त्याने पृथ्वीवर असताना सौम्यतेने आपल्या पित्याच्या इच्छेला संपूर्ण अधीनता दाखवली. (योहान ५:१९, ३०) सर्वप्रथम येशूच या पृथ्वीच्या वतनाचा वारसदार आहे कारण त्याला या पृथ्वीवर राज्य करण्यास नियुक्‍त करण्यात आले आहे. (स्तोत्र २:६-८; दानीएल ७:१३, १४) या वतनात त्याच्यासोबत ‘पृथ्वीवर राज्य करण्याकरता,’ “माणसातून” निवडलेले १,४४,००० “सोबतीचे वारीस” देखील वाटेकरी आहेत. (रोमकर ८:१७; प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३, ४; दानीएल ७:२७) ख्रिस्त व त्याचे सहशासक, मेंढरांसमान असणाऱ्‍या अशा कोट्यवधी स्त्रीपुरुषांवर राज्य करतील की ज्यांच्यासंबंधाने पुढील भविष्यसूचक स्तोत्राची आनंददायक पूर्णता होईल: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११; मत्तय २५:३३, ३४, ४६.

जे नीतिमत्त्वाचे भुकेले ते धन्य

१०. ‘नीतिमत्त्वाचे तान्हेले व भुकेले’ ज्याद्वारे तृप्त होतील असा एक मार्ग कोणता आहे?

१० गालीलच्या डोंगरावर प्रवचन देताना, एक व्यक्‍ती जिच्यामुळे धन्य होते अशी पुढची गोष्ट येशूने या शब्दांत सांगितली: “जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.” (मत्तय ५:६) ख्रिश्‍चनांसाठी नीतिमत्त्वाचे दर्जे स्वतः यहोवा ठरवतो. त्यामुळे, जे नीतिमत्त्वाकरिता भुकेले व तान्हेले आहेत ते खरे पाहता, देवाच्या मार्गदर्शनाकरता भुकेले व तान्हेले असतात. त्यांना आपल्या पापी व अपरिपूर्ण स्वभावाची पूर्ण जाणीव असण्यासोबतच, यहोवासमोर स्वीकारार्ह स्थितीत उभे राहण्याची त्यांची मनःपूर्वक इच्छा असते. पश्‍चात्ताप करून ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर क्षमा मागितल्यास आपण देवासमोर नीतिमान व्यक्‍ती या नात्याने उभे राहू शकू हे जेव्हा त्यांना देवाच्या वचनातून समजते तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो!—प्रेषितांची कृत्ये २:३८; १०:४३; १३:३८, ३९; रोमकर ५:१९.

११, १२. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे नीतिमत्त्व प्राप्त होते? (ब) अभिषिक्‍तांच्या साथीदारांची नीतिमत्त्वाची उत्कंठा कशाप्रकारे तृप्त केली जाते?

११ येशूने म्हटले की असे लोक धन्य आहेत कारण ते “तृप्त होतील.” (मत्तय ५:६) ख्रिस्तासोबत स्वर्गात ‘राज्य करण्याकरता’ पाचारण करण्यात आलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “जीवनदायी नीतिमत्व” प्रदान करण्यात आले आहे. (रोमकर ५:१, ९, १६-१८) यहोवा त्यांना आध्यात्मिक पुत्र या नात्याने दत्तक घेतो. ते ख्रिस्तासोबत सोबतीचे वारस बनतात. त्याच्या स्वर्गीय राज्य शासनात राजे व याजक बनण्याकरता त्यांना निवडण्यात आले आहे.—योहान ३:३; १ पेत्र २:९.

१२ अभिषिक्‍त जनांच्या साथीदारांना मात्र अद्याप जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त झालेले नाही. पण, ख्रिस्ताने सांडलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवल्यामुळे, काही प्रमाणात यहोवा त्यांना नीतिमान लेखतो. (याकोब २:२२-२५; प्रकटीकरण ७:९, १०) त्यांना यहोवाचे मित्र या नात्याने नीतिमान लेखले जाते व “मोठ्या संकटातून” बचावण्याची आशा आहे. (प्रकटीकरण ७:१४) ‘नव्या आकाशाखाली,’ “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते” अशा नव्या पृथ्वीचे ते रहिवासी बनतील, तेव्हा त्यांची नीतिमत्त्वाची उत्कंठा अधिक पूर्णार्थाने तृप्त केली जाईल.—२ पेत्र ३:१३; स्तोत्र ३७:२९.

जे दयाळू ते धन्य

१३, १४. कोणत्या व्यावहारिक मार्गांनी आपण आपली दया व्यक्‍त करू शकतो आणि हे आपल्याकरता हिताचे का आहे?

१३ डोंगरावरील प्रवचनात येशूने पुढे म्हटले: “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.” (मत्तय ५:७) कायदेविषयक दृष्टिकोनातून पाहिल्यास, दया हा शब्द, कायद्यानुसार विशिष्ट शिक्षा देणे योग्य असूनही एखादा न्यायाधीश गुन्हेगाराला ती पूर्ण शिक्षा न देता नरमाई दाखवतो त्याला सूचित करतो. परंतु, बायबलमध्ये “दया” असे भाषांतर करण्यात आलेले मूळ शब्द सहसा, जे गरजू आहेत त्यांची कीव येऊन त्यांच्या साहाय्याकरता केलेल्या प्रेमळ विचारशील कृतीस सूचित करतात. त्याअर्थी, जे दयाळू आहेत ते आपली करूणा आपल्या कृतींतून व्यक्‍त करतात. चांगल्या शोमरोन्याच्या दृष्टान्तातून येशूने एक उत्तम उदाहरण आपल्यापुढे मांडले; अशा एका व्यक्‍तीचे उदाहरण, की ज्याने गरजू व्यक्‍तीच्या साहाय्याकरता ‘त्याच्यावर दया केली.’—लूक १०:२९-३७.

१४ दयाळूपणे वागल्यामुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवण्याकरता आपण गरजू व्यक्‍तींबद्दल प्रत्यक्ष कृतींतून दया व्यक्‍त करण्याची गरज आहे. (गलतीकर ६:१०) येशूला लोकांकडे पाहून त्यांच्याविषयी करूणा वाटे. “ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३४) मानवांची सर्वात मोठी गरज ही आध्यात्मिक होती याची येशूला जाणीव होती. आजही लोकांना सर्वाधिक गरज आहे, ती ‘देवाच्या राज्याच्या सुवार्तेची.’ तेव्हा त्यांना या सुवार्तेविषयी सांगण्याद्वारे आपण त्यांच्याविषयी वाटणारी करूणा व दया व्यक्‍त करू शकतो. (मत्तय २४:१४) तसेच, वयोवृद्ध ख्रिस्ती बांधवांना, विधवा व अनाथांना लागणारी व्यावहारिक मदत पुरवण्याद्वारे व “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर” देण्याद्वारेही आपण दया व्यक्‍त करू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१४; नीतिसूत्रे १२:२५; याकोब १:२७) यामुळे आपल्याला आनंद तर मिळेलच पण आपल्याला यहोवाची दया देखील अनुभवायला मिळेल.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; याकोब २:१३.

अंतःकरणाचे शुद्ध व शांतीप्रिय

१५. आपण कशाप्रकारे अंतःकरणाचे शुद्ध व शांती करणारे असू शकतो?

१५ धन्य असण्याचे सहावे व सातवे कारण येशूने याप्रकारे सांगितले: “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” (मत्तय ५:८, ९) शुद्ध अंतःकरण हे नैतिकरित्या शुद्ध असण्यासोबतच, आध्यात्मिकरित्या निष्कलंक आणि यहोवाच्या उपासनेत एकाग्र असते. (१ इतिहास २८:९; स्तोत्र ८६:११) शांती करणारे आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबत आणि आपल्या परीने, शक्यतो आपल्या शेजाऱ्‍यांसोबतही शांतीने राहतात. (रोमकर १२:१७-२१) ते ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटतात व तिचा मार्ग धरतात.’—१ पेत्र ३:११.

१६, १७. (अ) अभिषिक्‍तांना “देवाची मुले” का म्हणण्यात आले आहे आणि ते कशाप्रकारे ‘देवाला पाहतात?’ (ब) “दुसरी मेंढरे” कोणत्या अर्थाने ‘देवाला पाहतात?’ (क) “दुसरी मेंढरे” पूर्णार्थाने “देवाची मुले” कशी व केव्हा बनतील?

१६ जे शांतीप्रिय व अंतःकरणाचे शुद्ध आहेत, अशांना वचन देण्यात आले आहे की त्यांना “देवाची मुले म्हणतील” व ते “देवाला पाहतील.” अभिषिक्‍त ख्रिस्ती अद्याप पृथ्वीवर असतानाच त्यांना आत्म्याच्याद्वारे यहोवाचे “पुत्र” या नात्याने दत्तक घेतले जाते. (रोमकर ८:१४-१७) ख्रिस्तासोबत स्वर्गात असण्याकरता त्यांना पुनरुत्थित करण्यात येते तेव्हा ते यहोवाच्या सान्‍निध्यात सेवा करतात व त्याला प्रत्यक्ष पाहतात.—१ योहान ३:१, २; प्रकटीकरण ४:९-११.

१७ शांतीप्रिय “दुसरी मेंढरे,” उत्तम मेंढपाळ अर्थात त्यांचा “सनातन पिता” ख्रिस्त येशू याच्या नेतृत्वाखाली यहोवाची सेवा करतात. (योहान १०:१४, १६; यशया ९:६) ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीनंतरच्या अंतिम परीक्षेत जे खरे उतरतील त्यांना यहोवाचे पृथ्वीवरील पुत्र या नात्याने दत्तक घेतले जाईल व त्यांना “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” प्राप्त होईल. (रोमकर ८:२१; प्रकटीकरण २०:७,) या दिवसाची ते वाट पाहतात; पण तोपर्यंत ते यहोवाला आपला पिता संबोधतात कारण ते आपले जीवन त्याला समर्पित करतात आणि तोच आपला जीवनदाता आहे हे ते ओळखतात. (यशया ६४:८) प्राचीन काळचे ईयोब व मोशे यांच्याप्रमाणे, विश्‍वासाच्या नेत्रांनी ते ‘देवाला पाहू’ शकतात. (ईयोब ४२:५; इब्री लोकांस ११:२७) आपल्या ‘अंत:चक्षुंनी,’ व देवाच्या अचूक ज्ञानायोगे ते यहोवाच्या अद्‌भुत गुणांविषयी समजून घेतात आणि त्याच्या इच्छेनुसार करण्याद्वारे त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.—इफिसकर १:१८; रोमकर १:१९, २०; ३ योहान ११.

१८. येशूने सांगितलेल्या, आनंदी असण्याच्या पहिल्या सात कारणांनुसार आज खऱ्‍या अर्थाने कोण आनंदी आहेत?

१८ आतापर्यंत आपण पाहिले की जे आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखतात, जे शोक करतात, जे सौम्य आहेत, जे नीतिमत्त्वाकरता भुकेले व तान्हेले आहेत, जे दयाळू आहेत, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत आणि जे शांतीप्रिय आहेत ते यहोवाच्या सेवेत खरा आनंद मिळवतात. पण, त्यांना नेहमीच विरोध, इतकेच काय तर छळालाही तोंड द्यावे लागले आहे. यामुळे त्यांचा आनंद कमी होतो का? या प्रश्‍नावर पुढच्या लेखात चर्चा करू.

उजळणी

• जे आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक आहेत त्यांना कोणता आनंद अनुभवायला मिळतो?

• जे शोक करतात त्यांना कोणकोणत्या मार्गांनी सांत्वन मिळते?

• आपण कशाप्रकारे सौम्यता दाखवू शकतो?

• आपण दयाळू, अंतःकरणाचे शुद्ध आणि शांतीप्रिय का असावे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

“आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे आनंदी आहेत”

[१० पानांवरील चित्रे]

“जे दयाळू ते धन्य”

[१० पानांवरील चित्र]

“जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य”