व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या नम्रतेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो

यहोवाच्या नम्रतेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो

यहोवाच्या नम्रतेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो

दाविदाला संकट म्हणजे काय असते हे माहीत होते. त्याचा मत्सरी सासरा राजा शौल याने त्याला खूप छळले होते. तीनदा शौलाने दाविदाला एका भाल्याने ठार मारण्याचा प्रयत्न केला; एका शिकाऱ्‍यासारखा तो कित्येक वर्षे त्याच्या मागे लागला होता; त्यामुळे दावीद सतत भटकत होता. (१ शमुवेल १८:११; १९:१०; २६:२०) पण यहोवा दावीदाच्या पाठीशी होता. यहोवाने त्याला केवळ शौलाच्या तावडीतूनच सोडवले नाही तर इतर शत्रूंच्या हातूनही सोडवले. त्यामुळे आपण दाविदाच्या या भावना समजू शकतो ज्या त्याने एका गीतात व्यक्‍त केल्या आहेत: “परमेश्‍वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडविणारा, . . . तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (२ शमुवेल २२:२, ३६) दावीदाने इस्राएलमध्ये बरीच थोरवी प्राप्त केली. पण मग याचा यहोवाच्या लीनतेशी अर्थात नम्रतेशी काय संबंध?

यहोवा नम्र आहे असे जेव्हा शास्त्रवचनात म्हटले जाते तेव्हा, तो कोणत्या न कोणत्या प्रकारे मर्यादित आहे किंवा तो इतरांच्या अधीन आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उलट या सर्वोत्कृष्ट गुणावरून हेच सूचित होते, की जे त्याची स्वीकृती प्राप्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात अशा मानवांबद्दल त्याला मनापासून कळवळा आहे आणि तो त्यांना दया दाखवतो. स्तोत्र ११३:६, ७ मध्ये आपण वाचतो: “जो आकाश व पृथ्वी ह्‍यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांस धुळींतून उठवितो.” तो “लवतो” याचा अर्थ आपल्याला बघण्यासाठी तो ‘खाली वाकतो,’ किंवा आपल्याला पाहायला तो स्वतःस “नम्र करतो.” (ईजी टू रीड; पं.र.भा.) तेव्हा, देवाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या अपरिपूर्ण परंतु नम्र मनुष्याकडे अर्थात दावीदाकडे लक्ष देण्यासाठी यहोवा ‘खाली वाकला’ किंवा त्याने स्वतःला ‘नम्र केले.’ म्हणूनच दावीद अशी हमी देतो: “परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो.” (स्तोत्र १३८:६) यहोवा दावीदाशी दयाळुपणे, धीराने व कनवाळूपणे वागला; यामुळे आपल्याला यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

सार्वभौम या नात्याने यहोवा विश्‍वात सर्वथोर असला तरी आपल्यातील प्रत्येकाबरोबर तो नातेसंबंध जोडू इच्छितो. यावरून आपल्याला असा भरवसा मिळतो, की आपण सर्वात कठीणातल्या कठीण परिस्थितीतही त्याच्या अटळ मदतीची अपेक्षा करू शकतो. तो आपल्याला विसरून जाईल अशी भीती बाळगण्याचे आपल्याला काहीही कारण नाही. प्राचीन इस्राएलातील त्याच्या लोकांसंबंधी त्याच्याविषयी अगदी उचितरीत्या म्हटले आहे की ‘त्याने [त्यांच्या] दैन्यावस्थेत [त्यांची] आठवण केली कारण त्याची दया सनातन आहे.”.—स्तोत्र १३६:२३.

दाविदाप्रमाणे आपणही आज यहोवाचे आधुनिक सेवक या नात्याने संकटांचा सामना करत असू. जे देवाला ओळखत नाहीत असे लोक कदाचित आपली थट्टा करत असतील किंवा आपण आजारी असू अथवा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी, जर आपले अंतकरण प्रामाणिक असेल, तर आपण प्रार्थनेद्वारे यहोवाकडे जाऊ शकतो आणि त्याच्या दयेची भीक मागू शकतो. आपल्याकडे लक्ष देण्यासाठी यहोवा ‘खाली वाकेल’ आणि आपल्या प्रार्थना ऐकेल. स्तोत्रकर्त्याने ईश्‍वरप्रेरणेने असे लिहिले: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” (स्तोत्र ३४:१५) यहोवाच्या नम्रता या अतिप्रिय गुणावर मनन केल्याने आपण भारावून जात नाही का?

[३० पानांवरील चित्रे]

यहोवाने दाविदाच्या प्रार्थना ऐकल्या तसेच आज तो आपल्याही प्रार्थना ऐकायला तयार आहे