व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

खादाडपणाविषयी ख्रिस्ती मंडळीचा कोणता दृष्टिकोन आहे?

देवाचे वचन, दारूबाजी आणि अतिभक्षण या दोन्ही गोष्टींचा निषेध करते आणि ते देवाची सेवा करणाऱ्‍यांना न शोभणारे वर्तन आहे असे म्हणते. म्हणूनच, ख्रिस्ती मंडळी, खादाड मनुष्याला, दारूचे व्यसन लागलेल्या मनुष्याप्रमाणेच लेखते. दारूडा किंवा खादाड व्यक्‍ती ख्रिस्ती मंडळीचा भाग असू शकत नाही.

नीतिसूत्रे २३:२०, २१ म्हणते: “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्‍यास उभा राहू नको; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो.” अनुवाद २१:२० मध्ये आपण एका “हट्टी व अनावर” व्यक्‍तीविषयी वाचतो जी मोशेच्या नियमशास्त्रानुसार मृत्यूदंडास पात्र होती. या वचनानुसार, या हट्टी व अनावर व्यक्‍तीच्या दोन सवयी होत्या; ती “खादाड व मद्यपी” होती. स्पष्टतः, प्राचीन इस्राएलमध्ये खादाडपणा हे, देवाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीला न शोभणारे वर्तन होते.

परंतु खादाड असण्याचा नेमका काय अर्थ होतो आणि या विषयावर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने काय म्हणतात? “हावऱ्‍यासारखे गपागपा खाण्याची व बेलगाम पिण्याची सवय असलेला,” असे खादाड व्यक्‍तीचे वर्णन केले जाते. म्हणजेच, खादाडपणा एकप्रकारचा लोभ आहे आणि देवाचे वचन म्हणते, की “लोभी” माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. (१ करिंथकर ६:९, १०; फिलिप्पैकर ३:१८, १९; १ पेत्र ४:३) याशिवाय, प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना ‘देहाची कर्मे’ करण्याविरुद्ध ताकीद दिली तेव्हा त्याने “दारूबाजी, रंगेलपणा [“धिंगाणा,” NW] आणि अशा इतर गोष्टी” यांचा उल्लेख केला. (गलतीकर ५:१९-२१) अतिसेवनासोबत दारूबाजी आणि धिंगाणा सहसा होतोच. शिवाय, पौलाने जेव्हा “अशा इतर गोष्टी” असे म्हटले तेव्हा त्यात खादाडपणाचा देखील निश्‍चितच समावेश होतो. ‘देहाच्या इतर कर्मांप्रमाणेच’ खादाड म्हणून सर्वत्र ओळखली जाणारी ख्रिस्ती व्यक्‍ती जर आपले हावरट वर्तन बदलण्यास तयार नसेल तर तिला मंडळीतून काढून टाकले पाहिजे.—१ करिंथकर ५:११, १३. *

देवाच्या वचनात, दारूड्या मनुष्याला, खादाड मनुष्याप्रमाणेच लेखले जाते; पण खादाड मनुष्यापेक्षा दारूड्या मनुष्याला ओळखायला सोपे जाते. दारूड्या व्यक्‍तीची चिन्हलक्षणे लगेच दिसून येतात. परंतु, एका व्यक्‍तीला खादाड केव्हा म्हणता येईल हे ठरवणे कठीण आहे कारण केवळ बाहेरील स्वरूप पाहून हे ठरवता येत नाही. यास्तव, मंडळीतील वडिलांनी, काळजीपूर्वक व समंजसपणे ही लक्ष देण्याजोगी परिस्थिती हाताळली पाहिजे.

उदाहरणार्थ, लठ्ठपणा हे खादाडपणाचे एक चिन्ह असू शकते; परंतु असे नेहमीच नसते. एखादी व्यक्‍ती अमुक एखाद्या आजारपणामुळे लठ्ठ असू शकते. आनुवंशिक कारणांमुळे देखील एखादी व्यक्‍ती लठ्ठ असेल. आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे, की लठ्ठपणा शारीरिक अवस्था आहे परंतु खादाडपणा मानसिक प्रवृत्ती आहे. लठ्ठपणाचा अर्थ, “शरीरात प्रमाणापेक्षा अधिक चरबी साठल्यामुळे झालेली अवस्था” असा होतो तर खादाडपणाचा अर्थ, “हावऱ्‍यासारखे किंवा अधाशासारखे खाणे” असा होतो. तेव्हा, एखादी व्यक्‍ती तिच्या शरीराच्या आकारामुळे खादाड ठरत नाही तर अन्‍नाबाबत तिच्या मनोवृत्तीमुळे ठरते. एखादी व्यक्‍ती सर्वसामान्य आकाराची किंवा कदाचित अगदी सडपातळ असेल परंतु ती खादाड असेल. शिवाय, शरीराचे आदर्श वजन किंवा आकार यांविषयीचे मत, एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी वेगळे असू शकते.

खादाडपणाची चिन्हे काय आहेत? खादाड व्यक्‍तीला असंयमी वागण्याची सवय असते; अस्वस्थ वाटेपर्यंत किंवा उलटी येईपर्यंत ती अन्‍नावर तुटून पडते. तिच्या असंयमीपणावरून तिला, आपल्या या अशा वागण्यामुळे यहोवाच्या नावावर आणि त्याच्या लोकांच्या चांगल्या नावावर कलंक येईल याची खरी काळजी नसते, हे दिसून येते. (१ करिंथकर १०:३१) दुसऱ्‍या बाजूला पाहता, एखाददोन वेळा अतिसेवन करणाऱ्‍या व्यक्‍तीला “लोभी” म्हणता येणार नाही. (इफिसकर ५:५) तरीपण, गलतीकर ६:१ वचनाच्या तत्त्वानुसार अशा ख्रिश्‍चन व्यक्‍तीला मदतीची गरज असू शकते. पौलाने म्हटले: “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.”

प्रमाणापेक्षा अधिक अन्‍नसेवन करण्याविषयी बायबल देत असलेला सल्ला आज खासकरून महत्त्वाचा का आहे? कारण, खासकरून आपल्या दिवसांविषयी येशूने अशी ताकीद दिली होती: “संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.” (लूक २१:३४, ३५) आपल्या आध्यात्मिकतेला धक्का पोहंचेल अशी जीवनशैली जाणीवपूर्वक टाळण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे, अतिसेवन टाळणे.

नेमस्तपणा हा ख्रिस्ती सद्‌गुण आहे. (१ तीमथ्य ३:२, ११) यास्तव, खाण्यापिण्याच्या सवयींविषयी माफक असण्याविषयी बायबलच्या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना यहोवा निश्‍चित मदत करेल.—इब्री लोकांस ४:१६.

[तळटीप]

^ परि. 5 टेहळणी बुरूज मे १, १९८६ (इंग्रजी) अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.