व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे वचन धैर्याने घोषित करा

देवाचे वचन धैर्याने घोषित करा

देवाचे वचन धैर्याने घोषित करा

‘जा, माझ्या लोकांस संदेश सांग.’आमोस ७:१५.

१, २. आमोस कोण होता आणि बायबल त्याच्याविषयी कोणती माहिती प्रकट करते?

सेवाकार्य करत असताना, यहोवाविषयी साक्ष देणाऱ्‍या एकाला, एका याजकाने अडवले. याजक ओरडून म्हणाला: ‘हा प्रचार बंद कर! इथून निघून जा!’ यहोवाच्या त्या सेवकाने मग काय केले? याजकाच्या म्हणण्यानुसार त्याने केले का, की तो देवाचे वचन धैर्याने घोषित करत राहिला? या प्रश्‍नाचे उत्तर तुम्ही मिळवू शकता कारण त्या सेवकाने आपल्याच नावाच्या एका पुस्तकात आपले अनुभव लिहून ठेवले. हे पुस्तक म्हणजेच बायबलमधील आमोसचे पुस्तक. त्या याजकाशी संबंधित घटनेविषयी अधिक माहिती घेण्याआधी आपण आमोसविषयी थोडीफार माहिती घेऊ या.

आमोस कोण होता? तो कोणत्या काळात आणि कोठे राहात होता? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला आमोस १:१ यात मिळतात, जेथे असे लिहिले आहे: “तकोवा येथील मेंढपाळातला आमोस याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम यांच्या काळी, . . . प्राप्त झालेली वचने.” आमोस हा यहुदाचा रहिवासी होता. त्याचे मूळ गाव, जेरुसलेमपासून दक्षिणेकडे १६ किलोमीटर अंतरावर वसलेले तकोवा हे होते. सा.यु.पू. नवव्या शतकात, यहुदात राजा उज्जीया आणि इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात यराबाम दुसरा राज्य करत असताना तो हयात होता. आमोस हा एक मेंढपाळ होता. आमोस ७:१४ तर म्हणते की तो केवळ “गुराखी” नव्हे, तर “उंबराच्या झाडांची निगा करणारा” देखील होता. तेव्हा वर्षातील काही महिने तो हंगामी कामगार म्हणून काम करत असे. त्याचे काम उंबरांना छिद्र पाडण्याचे होते. फळे लवकर पिकावी म्हणून असे करण्याची प्रथा होती. हे काम कष्टाचे होते.

‘जा, संदेश सांग’

३. प्रचार करण्यास आपण लायक नाही असे आपल्याला वाटत असल्यास आमोसविषयी माहिती घेतल्याने आपल्याला कशाप्रकारे मदत मिळू शकेल?

आमोस प्रामाणिकपणे सांगतो: “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही.” (आमोस ७:१४) तो संदेष्ट्याचा पुत्र नव्हता किंवा संदेष्टा होण्याचे प्रशिक्षणही त्याला मिळाले नव्हते. पण, यहुदातील सर्व लोकांपैकी यहोवाने आपले कार्य करण्यासाठी आमोसला निवडले. त्या काळात देवाने कोणत्या शक्‍तिशाली राजाला, विद्वान याजकाला किंवा एखाद्या धनाढ्य सरदाराला निवडले नाही. यावरून आपल्याला एक दिलासा देणारा धडा मिळतो. जगातील प्रतिष्ठेच्या अथवा औपचारिक शिक्षणाच्या रूपात आपल्याजवळ फार काही नसेल. पण यामुळे देवाच्या वचनाची घोषणा करण्यास आपण लायक नाही असे आपण समजावे का? मुळीच नाही! यहोवा आपल्याला त्याचा संदेश घोषित करण्यास—अगदी कठीण प्रकारच्या क्षेत्रातही हे कार्य करण्यास सुसज्ज करू शकतो. यहोवाने आमोसच्या बाबतीत अगदी हेच केले; त्यामुळे जे कोणी देवाचे वचन धैर्याने घोषित करू इच्छितात त्यांच्याकरता निर्भय संदेष्टा आमोस याच्या उदाहरणाचे परीक्षण करणे अतिशय उद्‌बोधक ठरेल.

४. इस्राएलात संदेश घोषित करण्याचे काम आमोसला कठीण का गेले असावे?

यहोवाने आमोसला अशी आज्ञा दिली: “जा, माझे लोक इस्राएल यांस संदेश सांग.” (आमोस ७:१५) हे काम अतिशय कठीण होते. त्या काळी इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात शांती, सुरक्षितता व भौतिक सुबत्ता होती. बऱ्‍याच जणांनी आपल्याकरता ‘हिवाळ्याचे महाल’ तसेच ‘उन्हाळ्याचे महाल’ बांधून घेतले होते. हे महाल सर्वसाधारण मातीच्या विटांपासून बनलेले नव्हते तर ते चिरेबंदी होते. काहींच्या महालांत हस्तिदंताने मढवलेल्या महागड्या वस्तू होत्या आणि हे लोक ‘द्राक्षाच्या रमणीय मळ्यांत’ तयार केलेला द्राक्षारस पीत होते. (आमोस ३:१५; ५:११) परिणामस्वरूप अनेकजण देवाधर्माप्रती अरसिक होते. किंबहुना आमोसला नेमण्यात आलेले क्षेत्र हे आज आपल्यापैकी काहीजण ज्याप्रकारच्या क्षेत्रात सेवाकार्य करतो त्याच प्रकारचे असावे.

५. काही इस्राएल लोक कोणती अन्यायी कृत्ये करत होते?

इस्राएलांनी भौतिक वस्तू मिळवल्या होत्या हे चुकीचे नव्हते. पण काही इस्राएल लोक अप्रामाणिक मार्गांनी धनसंचय करत होते. श्रीमंत लोक ‘दीनांस नाडून, गरिबांस ठेचून’ धन मिळवत होते. (आमोस ४:१) मोठे व्यापारी, न्यायाधीश व याजक आपसांत मसलत करून गरिबांचे शोषण करत होते. आपण त्या काळात आहोत अशी कल्पना करून ही माणसे नेमकी काय करत होती हे आता पाहूया.

देवाच्या नियमाचे उल्लंघन

६. इस्राएली व्यापारी इतरांना कशाप्रकारे लुबाडत होते?

सर्वप्रथम आपण बाजारपेठेत जाऊ या. येथे बेइमान व्यापारी “एफा लहान,” व “शेकेल मोठा” करत होते; इतकेच नव्हे तर ते धान्याच्या नावाखाली निव्वळ “भूस” विकत होते. (आमोस ८:५, ६) हे व्यापारी माल तोलताना आपल्या ग्राहकांना लुबाडत होते; वस्तूंच्या किंमती जास्त लावून हलक्या दर्जाचा माल ते विकत होते. व्यापाऱ्‍यांनी गरिबांना अशाप्रकारे लुबाडल्यामुळे ते अक्षरशः कंगाल व्हायचे आणि नाईलाजाने त्या बिचाऱ्‍यांना स्वतःला गुलाम म्हणून विकावे लागायचे. आणि हेच व्यापारी “एक जोडा देऊन” त्यांना विकत घ्यायचे. (आमोस ८:६) कल्पना करा! या स्वार्थी व्यापाऱ्‍यांच्या नजरेत त्यांच्या सह इस्राएली बांधवाची किंमत काय होती, तर फक्‍त पादत्राणांच्या एका जोडाइतकी! गोरगरिबांची केवढी ही कुचंबणा आणि देवाच्या नियमशास्त्राचे किती हे घोर उल्लंघन! आणि तरीसुद्धा हे व्यापारी “शब्बाथ” मात्र पाळायचे. (आमोस ८:५) होय ते धार्मिक होते, पण केवळ दिखाव्यापुरते!

७. इस्राएलचे व्यापारी देवाच्या नियमाचे उल्लंघन कसे काय करू शकले?

पण देवाच्या नियमशास्त्रात, “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर” अशी स्पष्ट आज्ञा असताना, या व्यापाऱ्‍यांना अशाप्रकारची लुबाडणूक करण्याबद्दल शिक्षा कशी मिळाली नाही? (लेवीय १९:१८) कारण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे ज्यांचे कर्तव्य होते, अर्थात न्यायाधीश, ते स्वतःच या गुन्हेगारीत सामील होते. नगराच्या वेशीजवळ जेथे न्यायिक प्रश्‍न हाताळले जायचे तेथे हे न्यायाधीश ‘लाच घेत व वेशीत दरिद्र्‌यांचा न्याय बुडवीत.’ गोरगरिबांचे रक्षण करण्याऐवजी हे न्यायाधीश लाच घेऊन त्यांचा विश्‍वासघात करत होते. (आमोस ५:१०, १२) अशारितीने न्यायाधीश देखील देवाच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करत होते.

८. दुष्ट याजक कशाप्रकारच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत होते?

यादरम्यान, इस्राएलच्या याजकांची काय भूमिका होती? याचे उत्तर मिळवण्याकरता आपल्याला आपले लक्ष दुसरीकडे वळवावे लागेल. याजक “आपल्या दैवतांच्या मंदिरांत” कोणती पापे चालू देत होते ते पाहा! आमोसद्वारे देवाने म्हटले: “माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरिता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.” (आमोस २:७, ८) कल्पना करा! इस्राएलातील एक पिता व त्याचा पुत्र एकाच वेश्‍येकडे जाऊन लैंगिक अनैतिकता आचरत होते. आणि ते दुष्ट याजक अशा या घोर अनैतिकतेकडे चक्क दुर्लक्ष करत होते!—लेवीय १९:२९; अनुवाद ५:१८; २३:१७.

९, १०. देवाच्या नियमशास्त्रातील कोणत्या नियमांचे इस्राएल लोक उल्लंघन करत होते आणि आजच्या काळाशी कशाप्रकारे याची तुलना केली जाऊ शकते?

इतर प्रकारच्या पापपूर्ण वर्तनाबद्दल यहोवाने म्हटले: “गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या मंदिरांत घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करितात.” (आमोस २:८) होय, याजक व सर्वसामान्य लोक निर्गम २२:२६, २७ येथे देवाने दिलेल्या आज्ञेकडे दुर्लक्ष करत होते. तेथे अशी आज्ञा दिली होती की गहाण घेतलेली वस्त्रे रात्र होण्याआधी परत केली जावीत. असे करण्याऐवजी ते या वस्त्रांचे अंथरूण करून त्यांवर पसरून खोट्या दैवतांपुढे मेजवानी करत व द्राक्षारस पीत होते. आणि गोरगरिबांकडून जबरदस्तीने घेतलेल्या दंडाच्या पैशाने ते या खोट्या धार्मिक सोहळ्यांकरता द्राक्षारस विकत घेत होते. खऱ्‍या उपासनेच्या मार्गापासून ते किती दूर भरकटले होते!

१० इस्राएल लोक नियमशास्त्रातील सर्वात मोठ्या दोन आज्ञांचे—यहोवावर प्रीती करण्याच्या व आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याच्या आज्ञांचे निर्लज्जपणे उल्लंघन करत होते. म्हणूनच देवाने त्यांच्या अविश्‍वासूपणाबद्दल त्यांना दोषी ठरवण्याकरता आमोसला पाठवले. आज ख्रिस्ती धर्मजगताच्या राष्ट्रांसहित जगातील इतर राष्ट्रे प्राचीन इस्राएलची नीतिभ्रष्ट परिस्थिती प्रतिबिंबित करतात. एकीकडे काही लोक समृद्ध होत आहेत तर दुसरीकडे मोठमोठे व्यापार, राजकारण व खोटा धर्म यांतील पुढाऱ्‍यांच्या अनैतिक कृत्यांमुळे असंख्य लोकांना आर्थिक कंगाली आणि भावनिकरित्या दुःख सहन करावे लागत आहे. पण दुःख सोसणाऱ्‍या आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या सर्वांबद्दल यहोवाला काळजी आहे. म्हणूनच त्याने आपल्या सध्याच्या काळातील सेवकांना आमोससारखेच कार्य—अर्थात, त्याचे वचन धैर्याने घोषित करण्याचे कार्य करण्यास नेमले आहे.

११. आमोसच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

११ आपल्या कार्यात व आमोसच्या कार्यात साम्य आहे. त्यामुळे त्याच्या उदाहरणाचे परीक्षण केल्याने आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. आमोस आपल्याला हे समजण्यास मदत करतो की (१) आपण कशाविषयी प्रचार करावा, (२) कशाप्रकारे प्रचार करावा आणि (३) आपला विरोध करणारे आपले प्रचार कार्य का थांबवू शकत नाहीत. या मुद्द्‌यांचा एकेक करून विचार करू या.

आपण आमोसचे अनुकरण कसे करू शकतो

१२, १३. इस्राएलांविरुद्ध आपण नाराज आहोत हे यहोवाने कशाप्रकारे व्यक्‍त केले आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?

१२ यहोवाचे साक्षीदार या नात्याने, राज्याच्या प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य आपल्या ख्रिस्ती सेवाकार्यातील प्रमुख कार्ये आहेत असे आपण मानतो. (मत्तय २८:१९, २०; मार्क १३:१०) पण यासोबत, आमोसने ज्याप्रकारे दुष्टांवर येणार असलेल्या यहोवाच्या प्रतिकूल न्यायदंडाची घोषणा केली त्याप्रकारे आपण देवाच्या इशाऱ्‍यांबद्दलही लोकांना सांगतो. उदाहरणार्थ, आमोस ४:६-११ यात यहोवाने इस्राएलविरुद्ध आपली नाराजी कशी वारंवार व्यक्‍त केली हे आपण पाहतो. त्याने या लोकांवर “भाकरीची वाण” पाडली, ‘त्यांच्यावर पाऊस पडू नये म्हणून तो आवरून धरला,’ “तांबेरा व भेरड” तसेच ‘मरी पाठवून’ त्यांचे ताडण केले. या गोष्टींमुळे इस्राएल लोकांना पश्‍चात्ताप करावासा वाटला का? देवाने म्हटले: “तरी तुम्ही मजकडे वळला नाही.” होय, इस्राएलांनी वारंवार यहोवाकडे पाठ फिरवली.

१३ यहोवाने या अपश्‍चात्तापी इस्राएलांना शिक्षा दिली. पण त्याआधी त्यांना संदेष्ट्याकडून पूर्वसूचना देण्यात आली. देवाने अशी घोषणा केली: “प्रभु परमेश्‍वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” (आमोस ३:७) जलप्रलय आणण्याआधी देवाने नोहाला त्याविषयी सांगितले होते आणि इतरांना याविषयी पूर्वसूचना देण्यासही त्याने नोहाला सांगितले. त्याप्रकारे, यहोवाने आमोसला एक शेवटला इशारा देण्यास सांगितले. दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएलांनी देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष केले आणि योग्य पाऊल उचलले नाही.

१४. आमोसच्या व आपल्या काळात कोणत्या साम्यता आहेत?

१४ आमोसच्या काळात व आपल्या काळात काही लक्षवेधक साम्यता आहेत हे तुम्हीही नक्कीच मान्य कराल. येशू ख्रिस्ताने भाकीत केले होते की अंतसमयात अनेक संकटमय घटना घडतील. त्याने जागतिक पातळीवर प्रचार कार्य होईल असेही भाकीत केले. (मत्तय २४:३-१४) आमोसच्या दिवसाप्रमाणेच आजही बरेच लोक अंतसमयाचे चिन्ह आणि राज्याच्या प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अपश्‍चात्तापी इस्राएलांना जे परिणाम भोगावे लागले तेच अशा व्यक्‍तींनाही भोगावे लागतील. यहोवाने त्यांना इशारा दिला: “आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस.” (आमोस ४:१२) अस्सिरियाने त्यांच्यावर विजय मिळवला तेव्हा या लोकांना देवासमोर येऊन त्याच्या प्रतिकूल न्यायदंडाला तोंड द्यावे लागले. आजच्या या अभक्‍त जगाला हर्मगिदोनात “देवासमोर” यावे लागेल. (प्रकटीकरण १६:१४, १६) तरीसुद्धा, जोपर्यंत यहोवाच्या सहनशक्‍तीचा काळ चालेल तोपर्यंत आपण शक्य तितक्या लोकांना हेच सांगत राहू, की “परमेश्‍वरास शरण जा, म्हणजे वाचाल.”—आमोस ५:६.

आमोससारखेच विरोधाला तोंड देणे

१५-१७. (अ) अमस्या कोण होता आणि आमोसच्या प्रचाराला त्याने कशाप्रकारे प्रतिसाद दिला? (ब) अमस्याने आमोसवर कोणते आरोप लावले?

१५ कशाविषयी प्रचार करावा याबाबतीतच नव्हे, तर कशाप्रकारे प्रचार करावा याबाबतीतही आपण आमोसचे अनुकरण करू शकतो. ही गोष्ट ७ व्या अध्यायात आपल्या लक्षात आणून दिली जाते. आपल्या या चर्चेच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या याजकाविषयी या अध्यायात आपण वाचतो. हा याजक म्हणजे, “बेथेल येथील याजक अमस्या” होता. (आमोस ७:१०) बेथेल हे शहर इस्राएलच्या धर्मत्यागी धर्माचे, ज्यात वासरांच्या उपासनेचाही समावेश होता, त्याचे केंद्रस्थान होते. त्याअर्थी अमस्या हा राष्ट्रीय धर्माचा याजक होता. आमोसच्या निर्भय घोषणेला त्याची काय प्रतिक्रिया होती?

१६ अमस्याने आमोसला म्हटले: “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर; पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नको; कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे.” (आमोस ७:१२, १३) दुसऱ्‍या शब्दांत अमस्या म्हणत होता, ‘आल्या वाटेने परत जा! आमच्याजवळ आमचा धर्म आहे.’ तसेच त्याने आमोसच्या कार्यावर बंदी आणण्याकरता सरकारी हुकूम जारी करण्याचाही प्रयत्न केला; त्याने राजा यराबाम दुसरा यास असे सांगितले: “इस्राएली घराण्याच्या भरवस्तीत आमोसाने फितुरी केली आहे.” (आमोस ७:१०) होय अमस्याने आमोसवर चक्क देशद्रोहाचा आरोप लावला! त्याने राजाला सांगितले: “आमोस म्हणतो, ‘यराबाम तरवारीने मरेल, व इस्राएलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील.’”—आमोस ७:११.

१७ असे म्हणताना अमस्याने तीन खोटी विधाने केली. त्याने म्हटले: “आमोस म्हणतो.” खरे पाहता, तो संदेश आपण देत आहोत असे आमोसने कधीही म्हटले नव्हते. उलट त्याने नेहमी असेच म्हटले, की “परमेश्‍वर म्हणतो.” (आमोस १:३) याशिवाय, “यराबाम तरवारीने मरेल,” असे आमोसने म्हटल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. आमोस ७:९ येते सांगितल्याप्रमाणे, आमोसने असे भाकीत केले होते: “मी [यहोवा] तरवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.” यराबामच्या “घराण्यावर” अर्थात त्याच्या वंशजांवर अशाप्रकारचे संकट येईल असे देवाने भाकीत केले होते. अमस्याचे आरोप इतक्यावर थांबले नाहीत. “इस्राएलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील,” असे आमोसने म्हटल्याचा अमस्याने त्याच्यावर आळ घेतला. पण आमोसने असेही भाकीत केले होते की जे इस्राएल लोक देवाकडे परत येतील त्यांना देवाचे आशीर्वाद लाभतील. अमस्याने मुद्दामहून सत्याचा विपर्यास करून व अर्धसत्ये सांगून आमोसच्या प्रचार कार्यावर अधिकृतरित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केला हे उघड आहे.

१८. अमस्याने ज्या पद्धतींचा वापर केला आणि आजच्या काळात पाद्री ज्या पद्धतींचा वापर करतात त्यात कोणते साम्य आढळते?

१८ अमस्याने ज्या पद्धतीने आपला उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला, व आज यहोवाच्या लोकांचा विरोध करणारे ज्या पद्धतीचा वापर करतात त्यात तुम्हाला काही साम्य आढळले का? ज्याप्रकारे अमस्याने आमोसचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रकारे आपल्या काळातील काही पाद्री, उपाध्याय आणि धर्माधिकारी यहोवाच्या सेवकांच्या प्रचार कार्यात अडथळा आणू पाहतात. अमस्याने आमोसवर राजद्रोहाचा खोटा आरोप लावला. आज काही पाद्री देखील, यहोवाचे साक्षीदार राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका आहेत असा त्यांच्यावर खोटा आरोप लावतात. आणि ज्याप्रकारे आमोसचा विरोध करण्याकरता अमस्याने राजाची मदत घेण्याचा प्रयत्न केला त्याचप्रकारे, आजचे पाद्री यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्याकरता सहसा आपल्या राजकीय साथीदारांचा उपयोग करतात.

विरोधी आपले प्रचार कार्य थांबवण्यास असमर्थ

१९, २०. अमस्याच्या विरोधाला आमोसची काय प्रतिक्रिया होती?

१९ अमस्याच्या विरोधाला आमोसची काय प्रतिक्रिया होती? सर्वप्रथम आमोसने त्या याजकाला म्हटले: “तू म्हणतोस इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नको.” मग त्याने बेधडक अमस्याला अशी वचने सांगितली जी ऐकण्याची त्याला निश्‍चितच इच्छा नसावी. (आमोस ७:१६, १७) आमोस घाबरला नाही. आपल्याकरता हे एक अप्रतिम उदाहरण नाही का? अनेक देशांत आज आधुनिक काळातील अमस्यासारखे लोक देवाच्या लोकांचा क्रूरपणे छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण देवाच्या वचनाची घोषणा करण्याच्या बाबतीत, आपण आपल्या देवाच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन करणार नाही. आमोससारखेच, “परमेश्‍वर म्हणतो,” असे म्हणून आपण त्याचे संदेश घोषित करत राहतो. आणि विरोध करणारे कधीही आपले प्रचार कार्य थांबवू शकत नाहीत कारण “प्रभूचा हात,” अर्थात यहोवाचा पाठिंबा आपल्याबरोबर आहे.—प्रेषितांची कृत्ये ११:१९-२१.

२० आपल्या धमक्या व्यर्थ आहेत हे स्वतः अमस्यालाच कळायला हवे होते. देवाचे संदेश घोषित करण्यापासून पृथ्वीवरील कोणतीही शक्‍ती आपल्याला का रोखू शकणार नाही हे आमोसने आधीच स्पष्ट केले होते—आणि हा आपल्या चर्चेचा तिसरा मुद्दा आहे. आमोस ३:३-८ येथे आमोसने एकापाठोपाठ अनेक प्रश्‍नांचा व रूपकांचा उपयोग करून हे दाखवले की कोणताही परिणाम घडण्याकरता काहीतरी कारण असावे लागते. मग त्याने खुलासा केला: “सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभु परमेश्‍वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?” दुसऱ्‍या शब्दांत, आमोसने आपले ऐकणाऱ्‍यांना असे सांगितले: ‘सिंहाची गर्जना ऐकल्यावर जसे तुम्ही घाबरल्यावाचून राहत नाही, तसेच मी देखील देवाच्या वचनांची घोषणा केल्यावाचून राहू शकत नाही कारण मी स्वतः असे करण्याची यहोवाची आज्ञा ऐकली आहे.’ देवाबद्दल वाटणाऱ्‍या मनस्वी, आदरयुक्‍त भयाने आमोसला धैर्याने त्याचे संदेश घोषित करण्यास प्रेरित केले.

२१. सुवार्तेचा प्रचार करण्याच्या देवाच्या आज्ञेला आपण कसा प्रतिसाद देतो?

२१ प्रचार करण्याची यहोवाची आज्ञा आपणही ऐकतो. मग, आपण कसा प्रतिसाद देतो? आमोस व येशूच्या सुरवातीच्या अनुयायांप्रमाणे यहोवाच्या मदतीने आपण त्याचे संदेश धैर्याने घोषित करतो. (प्रेषितांची कृत्ये ४:२३-३१) विरोध करणाऱ्‍यांनी घडवून आणलेला छळ, किंवा आपण ज्यांना प्रचार करतो त्यांची अनास्था कधीही आपल्याला देवाचे वचन घोषित करण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. आमोसने जो आवेश दाखवला, त्याच आवेशाने सबंध जगातील यहोवाचे साक्षीदार धैर्याने सुवार्तेची घोषणा करत आहेत. यहोवाच्या येणाऱ्‍या न्यायाविषयी लोकांना इशारा देण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. या न्यायात कशाचा समावेश असेल? या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात दिले जाईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आमोसने कोणत्या परिस्थितीत देवाने दिलेले कार्य पार पाडले?

• आमोसप्रमाणे आपण कशाविषयी प्रचार केला पाहिजे?

• आपण कोणत्या मनोवृत्तीने आपले प्रचार कार्य केले पाहिजे?

• विरोध करणारे आपले साक्षकार्य का थांबवू शकत नाहीत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

आपले कार्य करण्यासाठी देवाने उंबरांची निगा राखणाऱ्‍या आमोसला निवडले

[१३ पानांवरील चित्रे]

आमोसप्रमाणे तुम्हीही यहोवाचा संदेश धैर्याने घोषित करत आहात का?