व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा न्यायदंड दुष्टांविरुद्ध येईल

यहोवाचा न्यायदंड दुष्टांविरुद्ध येईल

यहोवाचा न्यायदंड दुष्टांविरुद्ध येईल

“आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस.”—आमोस ४:१२.

१, २. देव दुष्टाईचा अंत करेल याची आपण खात्री का बाळगू शकतो?

यहोवा या पृथ्वीवरील दुष्टता व दुःखद परिस्थितीचा कधी अंत करेल का? २१ व्या शतकाच्या सुरवातीला हा प्रश्‍न अतिशय समर्पक वाटतो. सध्या कोठेही पाहावे तर माणूस माणसावर करत असलेल्या क्रूर अत्याचाराचीच उदाहरणे दिसतात. हिंसा, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यांपासून मुक्‍त झालेल्या जगाची आपण किती आतूरतेने वाट पाहात आहोत!

आनंदाची गोष्ट म्हणजे यहोवा दुष्टाईचा अंत करेल याबद्दल आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो. देवाठायी असलेले गुण आपल्याला खात्री देतात की तो दुष्टांविरुद्ध कारवाई करेल. यहोवा नीतिमान आणि न्यायी आहे. स्तोत्र ३३:५ यात त्याचे वचन आपल्याला सांगते: “त्याला नीति व न्याय ही प्रिय आहेत.” दुसऱ्‍या एका स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे यहोवाला “आततायी माणसाचा वीट येतो.” (स्तोत्र ११:५) नक्कीच, नीति व न्याय यांना प्रिय मानणारा सर्वसमर्थ यहोवा देव, ज्या गोष्टींचा त्याला वीट येतो त्या सर्वकाळ चालू देणार नाही.

३. आमोसच्या भविष्यवाणीचा आणखी सखोल अभ्यास करताना कोणत्या गोष्टी स्पष्ट होतील?

यहोवा दुष्टाईचा अंत करेल याची खात्री बाळगण्याचे आणखी एक कारण लक्षात घ्या. यहोवाची गतकाळातील कार्ये याची हमी देतात. दुष्ट जनांशी यहोवा नेहमीच कशाप्रकारे व्यवहार करतो याची लक्षवेधक उदाहरणे आपल्याला बायबलमधील आमोसच्या पुस्तकात आढळतात. आमोसच्या भविष्यवाणीचा आणखी सखोल अभ्यास केल्यावर देवाच्या न्यायदंडाविषयी तीन वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. पहिले म्हणजे, त्याचा न्याय नेहमी योग्य असतो. दुसरे म्हणजे तो अटळ असतो. आणि तिसरे म्हणजे तो अविचारीपणे सर्वांचा नाश करत नाही; कारण यहोवा केवळ दुर्जनांवर आपला न्यायदंड आणतो पण पश्‍चात्तापी व योग्य मनोवृत्तीच्या लोकांना तो दया दाखवतो.—रोमकर ९:१७-२६.

देवाचा न्यायदंड नेहमी योग्य

४. यहोवाने आमोसला कोठे पाठवले आणि कोणत्या उद्देशाने?

आमोसच्या काळात इस्राएल राष्ट्र आधीच दोन राज्यांत विभाजित झाले होते. एक भाग दक्षिणेकडील यहुदाचे दोन गोत्रांचे राज्य होते. दुसरा भाग उत्तरेकडील दहा गोत्रांचे इस्राएलचे राज्य होते. यहोवाने आमोसला एक संदेष्टा या नात्याने कार्य करण्यास नेमले आणि यासाठी त्याने त्याला यहुदा या आपल्या मायदेशातून इस्राएलास जाण्यास सांगितले. येथे देवाच्या न्यायदंडांची घोषणा करण्याकरता आमोसचा उपयोग केला जाणार होता.

५. आमोसने सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाणी केली आणि देवाचा प्रतिकूल न्यायदंड मिळण्याइतकी ही राष्ट्रे दोषी असण्याचे एक कारण कोणते होते?

आमोसने इस्राएलच्या अविश्‍वासू उत्तरेकडील राज्याविरुद्ध न्यायदंडांची घोषणा करण्याद्वारे आपल्या कार्याला सुरवात केली नाही. उलट त्याने जवळपासच्या सहा राष्ट्रांविरुद्ध न्यायदंड घोषित करण्याद्वारे सुरवात केली. ही राष्ट्रे होती अराम, पलेशेत, सोर, अदोम, अम्मोन व मवाब. पण देवाचा प्रतिकूल न्यायदंड मिळण्याइतकी ही राष्ट्रे खरोखर दोषी होती का? निश्‍चितच होती. याचे एक कारण म्हणजे ही राष्ट्रे यहोवाच्या लोकांचे पक्के शत्रू होते.

६. अराम, पलेशेत, सोर या राष्ट्रांवर देव संकट का आणणार होता?

उदाहरणार्थ, यहोवाने अरामी लोकांना दोषी ठरवले कारण “त्यांनी गिलादाला मळिले.” (आमोस १:३) अरामी लोकांनी गिलादाच्या क्षेत्रावर कब्जा केला—हा यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेला प्रदेश होता—आणि तेथे राहणाऱ्‍या देवाच्या लोकांचा त्यांनी भयंकर छळ केला. पलेशेत व सोर यांविषयी काय? पलिष्ट्यांनी इस्राएल बंदिवानांना नेऊन अदोमी लोकांना विकले आणि काही इस्राएल लोक सोरच्या गुलाम व्यापाऱ्‍यांच्या हाती सापडले. (आमोस १:६, ९) कल्पना करा, त्यांनी देवाच्या लोकांना गुलामीत विकले! तेव्हा यहोवा अराम, पलेशेत व सोर यांवर संकट आणणार होता यात काही नवल नव्हते.

७. अदोम, अम्मोन व मवाब कशाप्रकारे संबंधित होते, पण त्यांनी इस्राएलांशी कशाप्रकारे व्यवहार केला?

अदोम, अम्मोन व मवाब या तिन्ही राष्ट्रांचा इस्राएलशी व एकमेकांशी संबंध होता. ही तिन्ही राष्ट्रे इस्राएलांचे नातलग होते. अदोमी लोक याकोबाचा जुळा भाऊ एसाव याच्याद्वारे अब्राहामचे वंशज होते. त्याअर्थी, ते इस्राएलांचे भाऊबंद होते. अम्मोनी व मवाबी हे अब्राहामचा पुतण्या लोट याचे वंशज होते. पण अदोम, अम्मोन व मवाब यांनी आपल्या इस्राएली नातलगांबद्दल बंधूप्रेम दाखवले का? मुळीच नाही! उलट, अदोमने तरवारीने “आपल्या बंधूचा” घात केला आणि अम्मोन्यांनी इस्राएल बंदिवानांवर पाशवी अत्याचार केला. (आमोस १:११, १३) मवाबने देवाच्या लोकांशी कशाप्रकारे दुर्व्यवहार केला याविषयी आमोस स्पष्टपणे उल्लेख करत नाही पण मवाबी लोकांचा इस्राएलांना विरोध करण्याचा दीर्घकाळचा इतिहास होता. त्या तीन संबंधी राष्ट्रांना कठोर शिक्षा भोगावी लागणार होती. यहोवा त्यांच्यावर अग्निमय विनाश आणणार होता.

देवाचा न्यायदंड अटळ आहे

८. सहा राष्ट्रांवरील यहोवाचे शासन अटळ का होते?

आमोसच्या भविष्यवाणीत संबोधलेली तीन राष्ट्रे देवाच्या प्रतिकूल न्यायदंडास योग्य होती यात शंका नाही. शिवाय, त्यांचा नाश अटळ होता. आमोस पहिल्या अध्यायाच्या ३ ऱ्‍या वचनापासून दुसऱ्‍या अध्यायाच्या १ ल्या वचनापर्यंत यहोवा सहा वेळा म्हणतो: “मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही.” आपल्या या वचनानुसार, त्याने या राष्ट्रांचे शासन करण्यापासून आपला हात आवरला नाही. इतिहास दाखवतो की कशाप्रकारे यांपैकी प्रत्येक राष्ट्राला कालांतराने संकटाला तोंड द्यावे लागले. किंबहुना, यांपैकी कमीतकमी चार राष्ट्रे, अर्थात, पलेशेत, मवाब, अम्मोन व अदोम—काळाच्या ओघात नामशेष झाली!

९. यहुदाचे रहिवासी कशास पात्र होते आणि का?

यानंतर आमोसची भविष्यवाणी सातव्या राष्ट्रावर लक्ष केंद्रित करते—आमोसचा मायदेश यहुदा. इस्राएलच्या उत्तर राज्यात, आमोसची भविष्यवाणी ऐकणाऱ्‍या लोकांनी त्याला यहुदाच्या राज्याविरुद्ध न्यायसंदेश घोषित करताना ऐकले तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटले असावे. यहुदाच्या रहिवाशांना प्रतिकूल शासन का सोसावे लागले? आमोस २:४ म्हणते, “कारण त्यांनी परमेश्‍वराचे धर्मशास्त्र धिक्कारिले.” यहोवाच्या नियमशास्त्राचे त्यांनी जाणूनबुजून केलेले उल्लंघन यहोवाने क्षुल्लक लेखले नाही. आमोस २:५ अनुसार, त्याने भाकीत केले: “मी यहूदावर अग्नि पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील.”

१०. यहुदा राष्ट्र अनर्थ का टाळू शकले नाही?

१० अविश्‍वासू यहुदा येणारा अनर्थ टाळू शकले नाहीत. सातव्यांदा यहोवा म्हणाला: “मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही.” (आमोस २:४) सा.यु.पू. ६०७ साली बाबेलोन्यांनी यहुदा राष्ट्राला उध्वस्त केले तेव्हा हे भाकीत केलेले शासन त्यांना मिळाले. पुन्हा एकदा आपण पाहतो की दुष्टांकरता देवाचे शासन अटळ आहे.

११-१३. आमोसने प्रामुख्याने कोणत्या राष्ट्राविरुद्ध भविष्यवाणी केली आणि या राष्ट्रात कोणत्या प्रकारचे अत्याचार चालत होते?

११ संदेष्टा आमोस याने सात राष्ट्रांवर येणार असलेल्या यहोवाच्या शासनाविषयी भाकीत केले. त्याची भविष्यवाणी एवढ्यावरच संपली असा जर कोणी विचार केला असेल तर तो चुकीचा होता. अद्याप आमोसला अनेक गोष्टी भाकीत करायच्या होत्या! मुळात त्याला इस्राएलच्या उत्तर राज्याविरुद्ध दाहक न्यायसंदेश घोषित करण्याकरता नेमण्यात आले होते. आणि इस्राएल या प्रतिकूल शासनास पात्र होते कारण या राष्ट्राचा नैतिक व आध्यात्मिक ऱ्‍हास शोचनीय होता.

१२ आमोसच्या भविष्यवाणीमुळे इस्राएल राष्ट्रात सर्वसामान्य झालेल्या जुलूम व अत्याचाराचा पर्दाफाश करण्यात आला. यासंदर्भात आमोस २:६, ७ असे म्हणते: “इस्राएलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण ते रुप्यासाठी धार्मिकांस विकतात, एका जोड्यासाठी गरिबांस विकतात; गरिबांची मस्तके धुळीत लोळवितात, ते दीनांच्या मार्गांत आडवे येतात.”

१३ धार्मिकांस “रुप्यासाठी” विकले जात होते; याचा अर्थ कदाचित असा असावा की न्यायाधीश लाच म्हणून रुपे स्वीकारून निर्दोष व्यक्‍तींना शिक्षा ठोठावत होते. सावकार लहानशा कर्जासाठी गरिबांना ‘एका जोड्याच्या’ भावाला विकत होते. निर्दयी माणसे ‘गरिबांना’ ‘लोळवित’ होते अर्थात त्यांना इतक्या दयनीय परिस्थितीत आणून सोडत होते की ही गरीब माणसे दुःख, शोक किंवा अपमानाने आपल्याच डोक्यात धूळ घालून घेत होती. भ्रष्टाचार इतका सर्वसामान्य होता की ‘दीनांना’ न्याय मिळण्याची आशाच नव्हती.

१४. इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात कोणत्या प्रकारच्या लोकांवर अत्याचार केले जात होते?

१४ कशाप्रकारच्या लोकांवर अत्याचार केला जात होता याकडे लक्ष द्या. हे या राष्ट्रात राहणारे धार्मिक, गरीब व दीन लोक होते. यहोवाने इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्राच्या करारांतर्गत त्यांना दीनदुबळ्या व गरजू लोकांना दया दाखवण्याची आज्ञा देण्यात आली होती. पण इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात मात्र अशा लोकांची अवस्था अतिशय दयनीय होती.

“आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस”

१५, १६. (अ) “आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस” असे इस्राएलांना का सांगण्यात आले? (ब) आमोस ९:१, २ ही वचने कशाप्रकारे दाखवतात की दुष्टजन देवाचा न्याय चुकवू शकले नाहीत? (क) सा.यु.पू. ७४० साली इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राष्ट्राचे काय घडले?

१५ इस्राएल राष्ट्रात अनैतिकता आणि इतर पाप अतिशय मोठ्या प्रमाणात आचरले जात असल्यामुळे, या विद्रोही राष्ट्राला आमोसने “आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस,” असे बजावून सांगितले हे अगदी योग्य होते. (आमोस ४:१२) अविश्‍वासू इस्राएल देवाचा येणारा न्यायदंड टाळू शकत नव्हते कारण आठव्यांदा यहोवाने असे घोषित केले: “मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही.” (आमोस २:६) जे दुर्जन लपण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याविषयी देव म्हणाला: “त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यातला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही. ते अधोलोक [“खाली शिओलात,” NW] फोडून आत उतरले तरी माझा हात त्यास तेथून ओढून काढील; ते वर स्वर्गात चढले तरी तेथून मी त्यांस खाली ओढून आणीन.”—आमोस ९:१, २.

१६ दुष्ट जन “खाली शिओलात” उतरले तरीसुद्धा, म्हणजे त्यांनी पृथ्वीच्या सर्वात खोल ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला तरी, ते यहोवाचे शासन टाळू शकणार नाहीत. तसेच, ते “स्वर्गात चढले,” अर्थात उंच पर्वतांवर जरी त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते देवाचा न्याय चुकवू शकणार नाहीत. यहोवाचा इशारा अगदी स्पष्ट होता: असे कोणतेही लपण्याचे ठिकाण नाही जेथे त्याचा हात पोचू शकत नाही. देवाच्या न्यायानुसार, इस्राएल राज्याच्या दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना दोषी ठरवले जाणे आवश्‍यक होते. आणि वेळ आली तेव्हा असेच घडले. सा.यु.पू. ७४० साली आमोसच्या भविष्यवाणीनंतर जवळजवळ ६० वर्षांनी इस्राएल राष्ट्राला अश्‍शूरी सैन्याद्वारे पराभूत करण्यात आले.

देव सर्वांचा नाश करत नाही

१७, १८. आमोस अध्याय ९ देवाच्या दयेविषयी काय दाखवतो?

१७ आमोसच्या भविष्यवाणीने आपल्याला हे समजण्यास मदत केली आहे की देवाचा न्यायदंड नेहमीच योग्य आणि अटळ असतो. पण आमोसचे पुस्तक आणखी एक गोष्ट सूचित करते आणि ती म्हणजे, यहोवा अविचारीपणे सर्वांचा नाश करत नाही. दुर्जन कोठेही लपले तरीसुद्धा देव त्यांना शोधून त्यांच्यावर शासन आणण्यास समर्थ आहे. तसेच तो ज्यांच्याप्रती दया दाखवण्याचे निवडतो, अशा पश्‍चात्तापी आणि सरळ मार्गाने चालणाऱ्‍यांनाही तो शोधून काढण्यास समर्थ आहे. आमोसच्या पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायात हे अतिशय सुरेख रितीने स्पष्ट केले आहे.

१८ आमोस नवव्या अध्यायच्या ८ व्या वचनानुसार, यहोवाने म्हटले: “याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही.” १३ ते १५ वचनांत सांगितल्याप्रमाणे यहोवाने वचन दिले की मी आपल्या लोकांतले “पाडाव केलेले परत आणीन.” (पं.र.भा.) त्यांना दया दाखवण्यात येईल आणि ते सुरक्षिततेत व समृद्धतेत राहतील. यहोवाने वचन दिले की “नांगरणारा कापणी करणाऱ्‍याला गाठील.” कल्पना करा—पीक इतके भरपूर असेल, की पुढच्या हंगामात नांगरणी व पेरणी करण्याची वेळ येईस्तोवर कापणी पूर्ण झालेली नसेल!

१९. इस्राएल व यहुदा येथील शेषवर्गाचे काय झाले?

१९ यहुदा व इस्राएल यांतील दुर्जनांवर यहोवाने शासन आणले तेव्हा त्याने सर्वांचा नाश केला नाही आणि या राष्ट्रांतील पश्‍चात्तापी व योग्य मनोवृत्तीच्या लोकांना दया दाखवण्यात आली. आमोस अध्याय ९ यात लिहिलेली पुनर्वसनाची भविष्यवाणी पूर्ण झाली, कारण इस्राएल व यहुदा यांतील पश्‍चात्तापी शेषजन सा.यु.पू. ५३७ साली बाबेलोनी बंदिवासातून परतले. आपल्या प्रिय मायदेशी परतल्यावर त्यांनी खऱ्‍या उपासनेला पुनरुज्जिवित केले. पूर्ण सुरक्षिततेत त्यांनी आपली घरे पुन्हा बांधली आणि द्राक्षीचे मळे व बागा लावल्या.

यहोवाचा प्रतिकूल न्यायदंड अवश्‍य येईल

२०. आमोसने घोषित केलेल्या न्यायसंदेशांचा विचार केल्यावर आपल्याला कशाची खात्री पटते?

२० आमोसने घोषित केलेल्या देवाच्या न्याय संदेशांवर विचार केल्यानंतर आपल्याला याची खात्री पटली पाहिजे की यहोवा आपल्या काळात दुष्टाईचा अंत करेल. आपण यावर विश्‍वास का ठेवू शकतो? सर्वप्रथम, दुष्टांशी देवाने गतकाळात कशाप्रकारे व्यवहार केला याची ही उदाहरणे दाखवतात की तो आपल्या काळात कोणती कारवाई करेल. दुसरे म्हणजे, धर्मत्यागी इस्राएल राष्ट्रावर बजावण्यात आलेल्या देवाच्या न्यायदंडावरून हे खात्रीने म्हणता येते की “मोठी बाबेल,” अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यातील सर्वात दोषी असणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगतावर देव अवश्‍य नाश आणेल.—प्रकटीकरण १८:२.

२१. ख्रिस्ती धर्मजगतावर येणार असलेला देवाचा प्रतिकूल न्यायदंड योग्य का असेल?

२१ ख्रिस्ती धर्मजगत देवाचा प्रतिकूल न्याय मिळण्यास योग्य आहे यात शंका नाही. तिची शोचनीय धार्मिक व नैतिक अवस्था अगदीच उघड आहे. ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध आणि उरलेल्या सैतानाच्या जगावर यहोवाचा न्यायदंड योग्यच असेल. आणि तो अटळ आहे कारण न्यायदंड बजावण्याची वेळ येईल तेव्हा, आमोस अध्याय ९ व वचन १ यांतील शब्द खरे ठरतील: “त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.” होय, दुर्जन कोठेही लपले तरीसुद्धा यहोवा त्यांना शोधून काढील.

२२. देवाच्या न्यायदंडाविषयी २ थेस्सलनीकाकर १:६-८ यावरून कोणते मुद्दे स्पष्ट होतात?

२२ देवाचा न्यायदंड नेहमीच योग्य व अटळ असतो आणि तो अविचारीपणे सर्वांचा नाश करत नाही. हे प्रेषित पौलाच्या पुढील शब्दांवरून दिसून येते: “तुम्हावर संकट आणणाऱ्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्‍या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांति, देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे, म्हणून प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल: तो आपल्या सामर्थ्यवान्‌ दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.” (२ थेस्सलनीकाकर १:६-८) देवाच्या अभिषिक्‍त जनांवर संकट आणल्याबद्दल त्याच्या प्रतिकूल न्यायास पात्र असलेल्यांना शासन करणे “देवाच्या दृष्टीने न्याय आहे.” हा न्याय अटळ आहे कारण “[येशू] आपल्या सामर्थ्यवान्‌ दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल” तेव्हा दुर्जन बचावणार नाहीत. देव शासन करेल तेव्हा सर्वांचा नाश होणार नाही कारण “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” त्यांच्यावर येशू सूड उगवेल. आणि जे संकट सोसतात अशा देवभीरू जनांना हा न्यायदंड आल्यामुळे सांत्वन मिळेल.

सरळांकरता आशा

२३. आमोसच्या पुस्तकातून कोणती आशा व सांत्वन मिळते?

२३ आमोसच्या भविष्यवाणीत योग्य मनोवृत्तीच्या सर्वांकरता आशेचा व सांत्वनाचा एक अद्‌भुत संदेश आहे. आमोसच्या पुस्तकात भाकीत केल्याप्रमाणे यहोवाने प्राचीन काळात आपल्या लोकांचा पूर्णपणे नाश केला नाही. कालांतराने त्याने इस्राएलच्या व यहुदाच्या बंदिवानांना त्यांच्या मायदेशी परत आणले आणि त्यांना विपुल प्रमाणात सुरक्षितता व समृद्धी देऊन आशीर्वादित केले. याचा आपल्या काळाकरता काय अर्थ होतो? यावरून आपल्याला खात्री पटते की देवाचे शासन या दुष्ट व्यवस्थीकरणावर येईल तेव्हा दुष्ट कोठेही लपले तरीसुद्धा यहोवा त्यांना शोधून काढेल आणि ज्यांना तो दया दाखवण्याचे निवडेल, ते या पृथ्वीवर कोठेही राहात असले तरीसुद्धा तो त्यांना शोधून काढेल.

२४. यहोवाच्या आधुनिक काळातील सेवकांना कोणकोणते आशीर्वाद देण्यात आले आहेत?

२४ दुष्टांविरुद्ध यहोवाचा न्यायदंड येण्याची आपण वाट पाहतो त्यादरम्यान त्याचे विश्‍वासू सेवक या नात्याने आपला काय अनुभव आहे? यहोवाने आज आपल्याला आध्यात्मिक अर्थाने अत्यंत समृद्ध केले आहे. ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिकवणुकींमुळे उत्पन्‍न झालेल्या खोट्या व विपर्यस्त विश्‍वासांपासून मुक्‍त अशा उपासनेत आपण आनंदाने सहभागी होतो. तसेच यहोवाने आपल्याला विपुल आध्यात्मिक अन्‍न देऊन तृप्त केले आहे. पण, यहोवाकडून मिळणाऱ्‍या या उदंड आशीर्वादांसोबतच आपल्यावर एक मोठी जबाबदारी येते. येणाऱ्‍या न्यायदंडाविषयी आपण इतरांना खबरदार करावे अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो. तेव्हा “सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना शोधण्याकरता आपण आपल्यापरीने जमेल तो प्रयत्न करण्यास उत्सुक आहोत. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) होय, आज आपल्याला लाभलेली आध्यात्मिक समृद्धी जितक्यांना शक्य होईल तितक्यांना अनुभवण्यास मिळावी म्हणून त्यांना मदत करण्याची आपली इच्छा आहे. आणि दुष्टांवर देवाचा न्यायदंड येईल तेव्हा त्यांचाही बचाव व्हावा अशी आपली इच्छा आहे. अर्थात, या आशीर्वादांचा उपभोग घेण्याकरता आपली योग्य मनोवृत्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील लेखात चर्चा केल्याप्रमाणे हे देखील आमोसच्या भविष्यवाणीतून स्पष्ट होते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाचा प्रतिकूल न्यायदंड नेहमी योग्य असतो हे आमोसच्या भविष्यवाणीवरून कशाप्रकारे दिसून येते?

• देवाचा न्यायदंड अटळ असतो हे दाखवण्याकरता आमोस कोणते पुरावे देतो?

• देव न्याय करतो तेव्हा तो सर्वांचा नाश करत नाही हे आमोसच्या पुस्तकावरून कशाप्रकारे दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्र]

इस्राएल राष्ट्राला देवाचा न्यायदंड चुकवता आला नाही

[१८ पानांवरील चित्र]

सा.यु.पू. ५३७ साली इस्राएल व यहुदाचा शेषवर्ग बाबेलोन्यांच्या बंदिवासातून परतला