व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोक किती काळ जगू शकतात?

लोक किती काळ जगू शकतात?

लोक किती काळ जगू शकतात?

मार्च ३, १५१३ रोजी, स्पॅनिश शोधक ख्वान पॉनसे दे लेओन, एका उल्लेखनीय सफरीवर निघाला. बिमीनीच्या द्वीपावर पोंहचण्याच्या उद्देशाने तो प्वेर्टो रिकोहून जहाजाने निघाला. असे म्हणतात, की तो एका चमत्कारिक झऱ्‍याच्या अर्थात तारुण्याच्या झऱ्‍याच्या शोधात होता. पण तो, आता अमेरिकेतील फ्लोरिडा राज्य आहे तेथे पोहंचला. अर्थात, जे अस्तित्वातच नाही ते त्याला सापडलेच नाही.

आज मानव सर्वसामान्यपणे ७० किंवा ८० वर्षांपेक्षा अधिक काळ जगत नाहीत. बायबलमध्ये दीर्घ आयुष्य जगलेल्यांची यादी देण्यात आलेली असली तरी, २००२ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्‌र्स असे म्हणते, की सर्वात जास्त आयुष्य जगलेल्या स्त्रीचे वय १२२ वर्षे आणि १६४ दिवस इतके होते. (उत्पत्ति ५:३-३२) परंतु, जैवनीतिशास्त्रज्ञ जॉन हॅरिस म्हणाले: “नवनवीन संशोधनांमुळे आता, आपल्याला अशा एक जगाची झलक मिळत आहे ज्यात वृद्धापकाळ—आणि मृत्यू देखील—अटळ नसेल.” २१ शतकातील अनेक संशोधक, “प्रत्यक्षात अमरत्व,” “२०९९ सालापर्यंत मानव जातीच्या आयुष्याला मर्यादा नसेल,” “कोशिकांच्या अमर वाढीची क्षमता,” अशा गोष्टी करू लागले आहेत.

द ड्रीम ऑफ इटरनल लाईफ नावाच्या पुस्तकात, मार्क बेनके अशी नोंद करतात: “एका व्यक्‍तीच्या जीवनकाळात शरीरातील जवळजवळ सर्वच कोशिकांचे अनेकदा नविनीकरण होत असते. . . . सुमारे सात वर्षांनंतर, आपले शरीर खऱ्‍या अर्थाने नवीन असते.” परंतु, हे असे अखंड चालत नाही कारण एका पूर्वनियोजित विभाजनानंतर कोशिकांची पैदास थांबते. असे झाले नसते तर, “मानवी शरीरात दीर्घकाळापर्यंत—चिरकालापर्यंतसुद्धा कोशिकांचे पुर्नजनन होऊ शकले असते,” असे बेनके म्हणतात.

मानवी मेंदूच्या थक्क करणाऱ्‍या क्षमतेचा देखील विचार करा; आपल्या अल्प जीवनकाळात आपण करत असलेल्या त्याच्या वापराच्या तुलनेत ही क्षमता कित्येकपटीने जास्त आहे. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका नुसार मानवी मेंदूत “एखादी व्यक्‍ती आपल्या जीवनकाळादरम्यान तिच्या मेंदूचा जितका उपयोग करू शकते त्याहीपेक्षा अधिक वापर होण्याची क्षमता आहे.” (१९७६ आवृत्ती, खंड १२, पृष्ठ ९९८) हाऊ द ब्रेन लर्न्स या पुस्तकात, डेव्हीड ए. साउसा म्हणतात: “जवळजवळ सर्वच उद्देशांसाठी माहिती साठवून ठेवण्याची मेंदूची क्षमता अमर्यादित आहे.”—पृष्ठ ७८, दुसरी आवृत्ती, सर्वाधिकार २००१.

मग, आपण का मरतो याचे शरीरविज्ञानासंबंधी कारण संशोधकांना का सापडत नाही? आणि मानवी मेंदूत इतकी विशाल क्षमता का आहे? आपण अनंतकाळ ज्ञान घेत राहावे या उद्देशाने आपल्याला निर्माण करण्यात आल्याची शक्यता आहे का? आपण सार्वकालिक जीवनाचा विचारच का करतो?

बायबल म्हणते: “[देवाने] मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” (उपदेशक ३:११) या शब्दांवरून सूचित होते, की अनंतकाळ जगण्याची कल्पना देवानेच आपल्या मनात रूजवली आहे. तसे पाहिल्यास, देवाविषयी आणि त्याच्या कार्यांविषयी शिकण्यासारखे काही न काही आपल्याजवळ नेहमीच असेल. आपण जर कोट्यवधी वर्षे—नव्हे चिरकाल—जिवंत राहिलो तरी आपल्याला देवाच्या निर्मिती कार्यांच्या अद्‌भुत गोष्टींविषयी सर्वकाळ अधिकाधिक शिकता येईल.

येशू ख्रिस्ताच्या शब्दांवरूनही हे दिसते, की मानवांकरता चिरकालिक जीवन शक्य आहे. तो म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (तिरपे वळण आमचे.) (योहान १७:३) तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला अनंतकाळ जगायचे आहे का?

[३ पानांवरील चित्रे]

ख्वान पॉनसे दे लेओन, तारुण्याच्या झऱ्‍याच्या शोधात निघाला होता

[चित्राचे श्रेय]

पॉनसे दे लेओन: Harper’s Encyclopædia of United States History