व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘सरळांचा तंबू समृद्ध होईल’

‘सरळांचा तंबू समृद्ध होईल’

‘सरळांचा तंबू समृद्ध होईल’

हर्मगिदोनाची विपत्ती अचानक येऊन दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करेल तेव्हा ‘दुर्जनांचे घर कोसळेल.’ पण ‘सरळांच्या तंबूविषयी’ काय? देवाच्या नव्या जगात तो ‘चांगला राहील’ अर्थात, समृद्ध होईल.—नीतिसूत्रे १४:११.

पण “दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल,” तोपर्यंत मात्र जे निर्दोष आहेत त्यांना दुष्टांच्या सोबत अस्तित्वात राहणे भाग आहे. (नीतिसूत्रे २:२१, २२) या परिस्थितीत सुद्धा सत्मार्गी लोक समृद्ध होऊ शकतात का? बायबलमधील नीतिसूत्रे या पुस्तकातील १४ व्या अध्यायातील १ ते ११ वचने आपल्याला दाखवतात की जर आपण आपल्या संभाषणात व आचरणात सूज्ञतेचा अवलंब केला तर आजही आपण, निदान काही प्रमाणात, समृद्धी व स्थैर्य अनुभवू शकतो.

सुज्ञतेने घर बांधले जाते

कुटुंबाच्या कल्याणात पत्नीच्या योगदानाविषयी विवेचन करताना प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन म्हणतो: “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.” (नीतिसूत्रे १४:१) सुज्ञ स्त्री कशाप्रकारे आपले घर बांधते? तर ती देवाने केलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेचा आदर करते. (१ करिंथकर ११:३) सैतानाच्या जगात सर्वत्र पसरलेल्या स्वैराचारी वृत्तीचा तिच्यावर पगडा नसतो. (इफिसकर २:२) ती आपल्या पतीच्या अधीन असते आणि त्याच्याविषयी आदराने बोलते जेणेकरून इतरांनाही त्याच्याबद्दल अधिक आदर वाटतो. सुज्ञ स्त्री आपल्या मुलांना आध्यात्मिक व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात उत्साहाने सहभाग घेते. आपल्या कुटुंबाच्या भल्याकरता ती परिश्रम घेते व आपल्या कुटुंबीयांना घरात प्रसन्‍न व आरामदायी वाटावे अशाप्रकारचे वातावरण ती तयार करते. ती विचारशीलपणे व काटकसरीने आपल्या घरचा कारभार चालवते. खरोखर सुज्ञ स्त्री आपल्या घराण्याच्या समृद्धीला व स्थैर्याला महत्त्वाचा हातभार लावते.

मुर्ख स्त्रीला मस्तकपदाच्या देवाच्या व्यवस्थेविषयी आदर नसतो. आपल्या पतीविषयी टाकून बोलण्यास ती मागेपुढे पाहात नाही. काटकसरी वृत्ती नसल्यामुळे ती मेहनतीने कमवलेला पैसा व्यर्थ घालवते. तसेच ती वेळेचाही अपव्यय करते. यामुळे अर्थातच तिचे घर स्वच्छ व नीटनेटके नसते आणि तिच्या मुलांचे शारीरिक व आध्यात्मिक आरोग्य बिघडते. होय, मूर्ख स्त्री आपले घर आपल्या हातांनी पाडून टाकते.

पण एक व्यक्‍ती सुज्ञ आहे किंवा मूर्ख हे कशावरून ठरवले जाते? नीतिसूत्रे १४:२ म्हणते: “जो सरळपणे चालतो तो परमेश्‍वराचे भय धरितो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानितो.” सरळपणे चालणारा खऱ्‍या देवाचे भय मानतो आणि “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” (स्तोत्र १११:१०) खऱ्‍या अर्थाने सुज्ञ असणारी व्यक्‍ती ‘देवाचे भय धरण्याचे व त्याच्या आज्ञा पाळण्याचे’ आपले कर्तव्य ओळखते. (उपदेशक १२:१३) दुसरीकडे पाहता, मूर्ख व्यक्‍ती देवाच्या सरळ मार्गांच्या उलट दिशेने वाटचाल करते. तिचे मार्ग वाकडे, कुटील असतात. अशाप्रकारची व्यक्‍ती देवाला तुच्छ लेखून, “देव नाही,” असे आपल्या मनात म्हणते.—स्तोत्र १४:१.

सुज्ञतेने नियंत्रित असणारी वाणी

यहोवाचे भय मानणाऱ्‍याच्या व दुसरीकडे, त्याला तुच्छ लेखणाऱ्‍याच्या वाणीबद्दल काय म्हणता येईल? शलमोन राजा म्हणतो, “मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञांची वाणी त्याचे रक्षण करिते.” (नीतिसूत्रे १४:३) मूर्ख व्यक्‍तीजवळ देवाकडून मिळणारा सुज्ञपणा नसल्यामुळे अशी व्यक्‍ती शांतीप्रिय व समंजस नसते. तिला नियंत्रित करणारे ज्ञान हे ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडचे असते. अशा व्यक्‍तीचे बोलणे भांडखोरपणाचे व उद्धट असते. आपल्या गर्विष्ठपणाच्या वाणीने ती स्वतःकरताच नव्हे तर इतरांकरताही अनावश्‍यक समस्या निर्माण करते.—याकोब ३:१३-१८.

सुज्ञ व्यक्‍तीची वाणी तिचे रक्षण करते व अशी व्यक्‍ती जीवनात समाधानी असते. ते कसे? शास्त्रवचन म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८) सुज्ञ व्यक्‍तीचे शब्द कधीही अविचारीपणाचे किंवा दुसऱ्‍यांना बोचतील अशाप्रकारचे नसतात. असा मनुष्य विचार करून उत्तर देतो. (नीतिसूत्रे १५:२८) त्याच्या विचारशील वाणीने आरोग्यदायी परिणाम घडून येतो—खिन्‍न मनस्थितीच्या व्यक्‍तींना दिलासा आणि जुलूमाखाली भरडल्या जाणाऱ्‍यांना तजेला मिळतो. इतरांना चीड येण्याऐवजी सुज्ञाचे बोल शांततेचे वातावरण निर्माण करतात.

सुज्ञता मानवी प्रयत्नांना नियंत्रित करते तेव्हा

यानंतर शलमोन आणखी एक अर्थभरीत नीतिसूत्र आपल्यापुढे मांडतो. कोणतेही कार्य हाती घेण्याआधी त्याचे फायदे व तोटे विचारात घेणे किती गरजेचे आहे हे या नीतिसूत्रावरून सुचित होते. शलमोन म्हणतो: “बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धि होते.”नीतिसूत्रे १४:४.

या नीतिसूत्राच्या अर्थाविषयी स्पष्टीकरण देताना एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे: “गोठा रिकामा असेल तर याचा अर्थ चारा घालण्याकरता त्यात बैल नाहीत; त्यामुळे गोठा स्वच्छ करण्याची व जनावरांची काळजी घेण्याची कटकट नाही. शिवाय, खर्चही वाचतो. पण हा ‘फायदा’ खरोखर फायद्याचा नाही हे चवथ्या वचनाच्या नंतरच्या भागावरून स्पष्ट होते: यात सुचवल्याप्रमाणे बैलांशिवाय साहजिकच भरपूर पीक मिळणार नाही.” तेव्हा शेतकऱ्‍याने सूज्ञतेने निर्णय घेतला पाहिजे.

हेच तत्त्व, जेव्हा आपण आपला व्यवसाय बदलण्याचा, नवे घर घेण्याचा, कार विकत घेण्याचा किंवा घरात एखादा पाळीव प्राणी आणण्याचा विचार करतो तेव्हाही समर्पक ठरणार नाही का? सुज्ञ व्यक्‍ती कोणत्याही निर्णयामुळे जे फायदे व तोटे होऊ शकतात याचा विचार करून, त्या कार्यासाठी लागणारी मेहनत व खर्च खरोखर सार्थ ठरेल किंवा नाही याचा अंदाज घेते.

सुज्ञाची साक्ष

शलमोन पुढे म्हणतो, “विश्‍वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो.” (नीतिसूत्रे १४:५) खोट्या साक्षीदाराने दिलेली खोटी साक्ष अतिशय हानीकारक ठरू शकते. इज्रेलकर नाबोथ याच्याविरुद्ध दोन अधम माणसांनी खोटी साक्ष दिल्यामुळे त्याला मरेपर्यंत दगडमार करण्यात आला. (१ राजे २१:७-१३) तसेच, येशूला मृत्यूदंड देण्यात आला त्याआधी खोट्या साक्षीदारांनीच पुढे येऊन त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती, नाही का? (मत्तय २६:५९-६१) आपल्या विश्‍वासामुळे ज्याला जिवे मारण्यात आले असा येशूचा पहिला शिष्य स्तेफन याच्याविरुद्धही खोट्या साक्षीदारांनी साक्ष दिली होती.—प्रेषितांची कृत्ये ६:१०, ११.

खोटे बोलणारा काही काळ आपला खोटेपणा लपवू शकतो, पण त्याच्या भविष्याबद्दल विचार करा. बायबल सांगते, की “लबाड बोलणारा खोटा साक्षी” यहोवाच्या द्वेषास पात्र ठरतो. (नीतिसूत्रे ६:१६-१९) खून करणारे, जारकर्मी व मूर्तीपूजक यांच्यासह खोटी साक्ष देणाऱ्‍या माणसाच्या वाट्यासही अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, अर्थात, दुसरे मरण.—प्रकटीकरण २१:८.

विश्‍वासू साक्षीदार खरे बोलण्याची शपथ घेऊन खोटी साक्ष देत नाही. त्याच्या साक्षीत खोटेपणाचा लवलेशही नसतो. परंतु, यहोवाच्या लोकांचे कोणत्या न कोणत्या मार्गाने नुकसान करू इच्छिणाऱ्‍यांना सर्व माहिती देण्यास तो बाध्य आहे असाही याचा अर्थ होत नाही. अब्राहाम व इसहाक यांनी यहोवाची उपासना न करणाऱ्‍या काही व्यक्‍तींपासून विशिष्ट माहिती गुप्त ठेवली. (उत्पत्ति १२:१०-१९; २०:१-१८; २६:१-१०) यरीहोच्या राहाबनेही राजाच्या माणसांना भलत्याच दिशेने पाठवले. (यहोशवा २:१-७) विशिष्ट माहिती दिल्याने अनावश्‍यक दुष्परिणाम होण्याची शक्यता होती तेव्हा स्वतः येशू ख्रिस्तानेही पूर्ण माहिती न देण्याचे निवडले. (योहान ७:१-१०) त्याने म्हटले: “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका.” का बरे? कारण कदाचित “[ती] उलटून तुम्हास फाडितील.”—मत्तय ७:६.

जेव्हा “ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते”

बुद्धी सर्वांना प्राप्त होते का? नीतिसूत्रे १४:६ म्हणते: “धर्मनिंदक ज्ञानाचा शोध करितो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते.” निंदक अथवा उपहास करणारा बुद्धीचा शोध घेतो पण खरी बुद्धी त्याच्या हाती लागत नाही. निंदक उर्मटपणे देवाच्या मार्गांचा उपहास करत असल्यामुळे त्याला बुद्धी मिळवण्याकरता आवश्‍यक असणारी सर्वात प्रमुख गोष्ट, अर्थात खऱ्‍या देवाचे अचूक ज्ञान प्राप्त करता येत नाही. त्याचा गर्विष्ठपणा आणि उर्मट वृत्ती त्याला देवाबद्दल शिकून घेण्यापासून व सुज्ञता मिळवण्यापासून वंचित ठेवते. (नीतिसूत्रे ११:२) पण मग तो ज्ञानाचा शोध तरी का घेतो? नीतिसूत्रात याचे उत्तर नाही, पण कदाचित इतरांनी त्याला सुज्ञ समजावे म्हणून तो कदाचित असे करत असावा.

समंजसाला “ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते.” समजशक्‍तीची व्याख्या, “मानसिक आकलन: बोध,” “विशिष्ट गोष्टींतील संबंध समजून घेण्याची क्षमता” अशी करण्यात आली आहे. एखाद्या विषयाच्या विविध पैलूंचा एकमेकांशी संबंध जोडून, केवळ त्या एकेकट्या पैलूंचा नव्हे तर संपूर्ण विषयाचा एकंदरीत बोध होणे याला समज म्हणतात. तर या नीतिसूत्रानुसार, ज्या व्यक्‍तीजवळ ही क्षमता असते तिला ज्ञानप्राप्ती सोपी असते.

या संदर्भात, तुम्ही बायबलमधील सत्याचे ज्ञान कशाप्रकारे मिळवले याचा विचार करा. तुम्ही बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा कदाचित सुरवातीला तुम्ही देवाविषयी, त्याच्या प्रतिज्ञांविषयी व त्याच्या पुत्राविषयी अगदीच मूलभूत शिकवणुकी आत्मसात केल्या असतील. काही काळपर्यंत या सर्व शिकलेल्या गोष्टी तुमच्या मनात वेगवेगळ्या मुद्द्‌यांच्या रूपात राहिल्या असतील. पण जसजसा तुम्ही आणखी अभ्यास केला तसतसा या मुद्द्‌यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे तुम्हाला समजू लागले आणि मग हे वेगवेगळे मुद्दे, मानवांकरता व पृथ्वीकरता देवाच्या मुख्य उद्देशाशी कशाप्रकारे संबंधित आहेत हे तुम्हाला स्पष्टपणे समजले. बायबलमधील सत्य मग तुम्हाला अगदी तर्कशुद्ध आणि सुसंबद्ध वाटू लागले. आता नवीन मुद्दे शिकून ते आठवणीत ठेवणे तुम्हाला आणखी सोपे वाटू लागले कारण बायबलमधील एकंदरीत सत्याच्या मोठ्या चित्रात या नव्या माहितीचे तुकडे कोठे बसवायचे हे तुम्हाला समजले.

ज्ञान कोठे मिळणे शक्य नाही याविषयी सुज्ञ राजा सांगतो. “मूर्ख मनुष्याच्या वाऱ्‍यास जाऊ नको, कारण त्याच्या ठायी तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही.” (नीतिसूत्रे १४:७) मूर्ख व्यक्‍तीजवळ खरे ज्ञान नसते. त्याच्या वाणीत ज्ञानाची वचने नसतात. तेव्हा अशा मनुष्यासमोरून निघून जाणे आणि त्याच्यापासून दूर राहणेच उत्तम असा सल्ला येथे देण्यात आला आहे. “मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

शलमोन पुढे म्हणतो, “शहाण्याने आपला मार्ग जाणणे यात त्याची सुज्ञता असते पण मूढांची मूढता कपटरूप होय.” (नीतिसूत्रे १४:८) सुज्ञ मनुष्य कोणतेही पाऊल उचलण्याआधी विचार करतो. आपल्यापुढे कोणकोणते पर्याय आहेत हे तो लक्षात घेतो आणि प्रत्येकाचा काय परिणाम होईल याविषयीही तो चिंतन करतो. मगच तो सुज्ञपणे यांपैकी एक मार्ग निवडतो. पण मुर्ख मनुष्य काय करतो? आपल्याला सर्व समजते आणि आपली निवड अर्थातच चांगलीच असेल अशी खात्री असल्यामुळे तो मूर्खपणाचा मार्ग निवडतो. आपल्या मूर्खपणामुळे तो स्वतःचीच फसवणूक करतो.

सुज्ञता नातेसंबंधांना नियंत्रित करते तेव्हा

जो सुज्ञतेने चालतो त्याचे इतरांशी शांतीपूर्ण संबंध असतात. “मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळांत परस्पर प्रेमभाव असतो.” (नीतिसूत्रे १४:९) दोषभावना, किंवा पश्‍चात्ताप मूर्खाला थट्टेचे विषय वाटतात. घरात आणि बाहेरही त्याचे इतरांशी सुरळीत संबंध नसतात कारण “तो अतिशय गर्विष्ठ असल्यामुळे समेट करायला पाहात नाही.” (द न्यू इंग्लिश बायबल) सरळ मनाचा माणूस इतरांच्या चुका पदरात घेण्यास तयार असतो. शिवाय त्याच्या हातून चूक घडते तेव्हा तो क्षमा मागून समेट करण्याकरता प्रयत्न करायला तयार असतो. अशाप्रकारे शांती कायम राखण्याकरता झटल्यामुळे त्याचे इतरांशी आनंदी व टिकाऊ नातेसंबंध असतात.—इब्री लोकांस १२:१४.

यानंतर शलमोन मानवी नातेसंबंधांतील एक उणीव आपल्या लक्षात आणून देतो. तो म्हणतो: “हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही.” (नीतिसूत्रे १४:१०) आपल्या मनातील सर्वात गहिऱ्‍या भावना—मग त्या दुःखाच्या असोत व आनंदाच्या—आपल्याला नेहमीच इतरांजवळ पूर्णपणे व्यक्‍त करता येतात का, किंवा आपल्याला नेमके काय वाटते ते त्यांना सांगता येते का? आणि दुसऱ्‍या व्यक्‍तीला नेमके कसे वाटते हे इतर कोणाला प्रत्येक वेळी पूर्णपणे समजते का? या दोन्ही प्रश्‍नांचे उत्तर नाही असेच आहे.

उदाहरणार्थ, आत्महत्या करण्याच्या भावनांचे उदाहरण घ्या. ज्या व्यक्‍तीच्या मनात अशा भावना येतात ती सहसा आपल्या कुटुंबीयांपैकी कोणाला अथवा आपल्या मित्र अथवा मैत्रिणाला या भावनांविषयी स्पष्टपणे सांगू शकत नाही. आणि आपल्या स्नेह्‍यांपैकी कोणाच्या मनात अशा भावना घोळत आहेत हे सहसा इतरांनाही ओळखता येत नाही. अशी लक्षणे एखाद्याच्या स्वभावात ओळखता न आल्यामुळे त्या व्यक्‍तीला मदत न केल्याबद्दल आपण स्वतःला दोषी समजू नये. हे नीतिसूत्र आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घेण्यास मदत करते—एखाद्या सहानुभूती दाखवणाऱ्‍या मित्राकडून मिळणारा भावनिक आधार जरी सांत्वनदायक असला तरीसुद्धा, मानवांनी दाखवलेल्या सांत्वनाला मर्यादा असतात. कधीकधी काही समस्यांना तोंड देताना आपल्याला केवळ यहोवावरच विसंबून राहावे लागू शकते.

“धनसंपदा त्याच्या घरी असते”

इस्राएलचा राजा शलमोन म्हणतो: “दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो.” (नीतिसूत्रे १४:११) दुष्ट मनुष्य या व्यवस्थीकरणात काही काळपर्यंत सुखसमृद्धी मिळवू शकतो, प्रशस्त घरात राहू शकतो; पण तो स्वतःच नाहीसा झाल्यावर या सर्वाचा त्याला काय उपयोग? (स्तोत्र ३७:१०) दुसरीकडे पाहता, सरळाचे निवास अतिशय साधे असेल. पण स्तोत्र ११२:३ यानुसार, “धनसंपदा त्याच्या घरी असते.” (स्तोत्र ११२:३) या धनसंपदेत कशाचा समावेश आहे?

आपण आपल्या संभाषणात व आचरणात सुज्ञतेचा अवलंब केल्यास, सुज्ञतेमुळे मिळणारी “संपत्ति व मान” आपल्याजवळ असेल. (नीतिसूत्रे ८:१८) अर्थात, देवासोबत व आपल्या सहमानवांसोबत शांतीपूर्ण संबंध, समाधानाची भावना आणि निदान काही प्रमाणात जीवनात स्थैर्य आपल्याला लाभेल. होय, आजच्या काळातही “सरळांचा तंबू” समृद्ध होऊ शकतो.

[२७ पानांवरील चित्र]

सुज्ञ स्त्री आपले घर बांधते

[२८ पानांवरील चित्र]

“सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे”