व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हृदय पारखणाऱ्‍या यहोवाचा शोध घ्या

हृदय पारखणाऱ्‍या यहोवाचा शोध घ्या

हृदय पारखणाऱ्‍या यहोवाचा शोध घ्या

“मला शरण या म्हणजे वाचाल.”आमोस ५:४.

१, २. यहोवा “हृदय पाहतो” असे जे शास्त्रवचनांत म्हटले आहे त्याचा काय अर्थ होतो?

यहोवा देवाने संदेष्टा शमुवेल यास सांगितले: “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) यहोवा कोणत्या अर्थाने “हृदय पाहतो?”

शास्त्रवचनांत, हृदय या शब्दाचा उपयोग बरेचदा लाक्षणिक अर्थाने केला आहे; एखाद्या व्यक्‍तीच्या आंतरिक स्वरूपाला—तिच्या इच्छा, विचार, भावना व आवडीनिवडी यांना तो सूचित करतो. त्याअर्थी, देव हृदय पाहतो असे जेव्हा बायबल म्हणते त्याचा अर्थ असा होतो की तो बाहेरच्या स्वरूपाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्‍ती खरोखर कशी आहे यावर लक्ष देतो.

देव इस्राएलांना पारखतो

३, ४. आमोस ६:४-६ या वचनांनुसार इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राष्ट्रात कशाप्रकारची परिस्थिती होती?

आमोसच्या काळात जेव्हा हृदय पारखणाऱ्‍या यहोवा देवाने इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राष्ट्राकडे आपली नजर वळवली तेव्हा त्याला काय दिसले? आमोस ६:४-६ सांगते की ‘हस्तिदंती पलंगावर निजलेली व मंचकांवर ताणून पडलेली’ माणसे त्याला दिसली. हे लोक ‘कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खात होते.’ ते “वीणेच्या सुरावर काहीतरी गात” होते आणि “घागरीच्या घागरी द्राक्षारस पीत” होते.

पहिल्या नजरेत या दृश्‍यात वाईट असे काहीच आढळत नाही. आपापल्या प्रशस्त सुखवस्तू घरांत उत्तम खाण्यापिण्याच्या वस्तूंचा आणि संगीत वाद्यांवर उत्तम प्रतीच्या करमणुकीचा आनंद लुटणाऱ्‍या श्रीमंत लोकांचे हे दृश्‍य होते. त्यांच्याजवळ ‘हस्तिदंती पलंग’ देखील होते. इस्राएल राष्ट्राची राजधानी, शोमरोन या ठिकाणी पुरातन वस्तूंचा शोध घेणाऱ्‍यांना अतिशय सुरेख नक्षीकाम केलेल्या हस्तिदंती वस्तूंचे तुकडे सापडले आहेत. (१ राजे १०:२२) कदाचित हे लाकडी सामानांचे किंवा सुशोभित लाकडी तावदानांचे तुकडे असावेत.

५. आमोसच्या काळातील इस्राएल लोकांवर देव नाराज का झाला?

इस्राएल लोक आरामात राहात होते, चांगले खातपीत होते, उत्तम द्राक्षारस व सुरेल संगीताचा आनंद लुटत होते म्हणून देव त्यांच्यावर नाराज झाला का? मुळीच नाही! शेवटी, या सर्व गोष्टी मनुष्याच्या आनंदासाठी खुद्द त्यानेच पुरवल्या आहेत. (१ तीमथ्य ६:१७) यहोवा नाराज झाला, तो या लोकांच्या अयोग्य इच्छांमुळे, त्यांच्या हृदयातील दुष्ट हेतूंमुळे, देवाप्रती त्यांच्या अपमानजनक मनोवृत्तीमुळे आणि आपल्या सह इस्राएली बांधवांप्रती त्यांना प्रेम नसल्यामुळे..

६. आमोसच्या काळात इस्राएलची आध्यात्मिक परिस्थिती कशी होती?

‘पलंगांवर ताणून कळपांतील कोकरे खाणाऱ्‍या, द्राक्षारस पिणाऱ्‍या व वीणेच्या सुरावर गाणाऱ्‍या’ या लोकांना लवकरच आश्‍चर्याचा धक्का बसणार होता. त्यांना असे म्हणण्यात आले: “अहो तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकिता.” इस्राएलातील परिस्थितीकडे पाहून त्यांनी खरे तर अत्यंत दुःखी व्हायला हवे होते पण ‘योसेफावरील आपत्तीबद्दल त्यांनी खेद केला नाही.’ (आमोस ६:३-६) देवाने या राष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेकडे पाहिले नाही; पण देवाने त्यापलीकडे पाहिले आणि योसेफ, अर्थात इस्राएल आध्यात्मिक संकटात सापडल्याचे त्याला दिसले. असे असूनही लोक आपापल्या दैनंदिन कामांत व्यग्र होते, त्यांना कसलीही पर्वा नव्हती. आजही अनेक लोकांची अशीच मनोवृत्ती आहे. आपण कठीण काळांत राहात आहोत हे ते कबूल करतील, पण जोपर्यंत वैयक्‍तिकरित्या त्यांना काही फरक पडत नाही तोपर्यंत ते इतरांच्या कठीण परिस्थितीविषयी बेपर्वा असतात आणि आध्यात्मिक गोष्टींत त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नसते.

इस्राएल—अधोगतीच्या मार्गाला लागलेले राष्ट्र

७. इस्राएलच्या लोकांनी देवाच्या इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय घडणार होते?

आमोसचे पुस्तक अशा एक राष्ट्राचे चित्र आपल्यापुढे रेखाटते की जे बाहेरून अतिशय समृद्ध दिसत असले तरीसुद्धा खरे पाहता ते अधोगतीच्या मार्गाला लागले होते. देवाच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि आपल्या मनोवृत्तीत बदल न केल्यामुळे यहोवा त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती सोपवणार होता. अश्‍शूरी लोक येऊन त्यांना त्यांच्या हस्तिदंती पलंगांवरून ओढून बंदिवासात फरफटत नेणार होते. त्यांचे आरामशीर जीवन तेथेच संपणार होते!

८. इस्राएलची आध्यात्मिक अवनती कशाप्रकारे घडून आली?

पण मुळात, इस्राएल लोक अशा स्थितीत आलेच कसे? याची सुरवात सा.य.पू. ९९७ मध्ये झाली, जेव्हा राजा शलमोनाचा पुत्र रहबाम गादीवर आला आणि इस्राएलची दहा गोत्रे, यहुदा व बन्यामीन या दोन गोत्रांपासून विलग झाली. दहा गोत्रांच्या इस्राएल राष्ट्रांचा पहिला राजा “नबाट याचा पुत्र” यराबाम पहिला हा होता. (१ राजे ११:२६) यराबाम याने आपल्या राज्यातील लोकांना असे पटवून सांगितले की यहोवाची उपासना करण्याकरता जेरूसलेमपर्यंत जाणे खूपच दगदगीचे आहे. पण लोकांची मनापासून काळजी असल्यामुळे त्याने असे म्हटले नाही. तर यामागे त्याचा स्वार्थ होता. (१ राजे १२:२६) यराबाम यास अशी भीती होती की जर इस्राएल लोक यहोवाची स्तुती करण्याकरता दर वर्षी जेरुसलमेमच्या मंदिरात वार्षिक उत्सव साजरे करण्यासाठी जात राहिले तर कालांतराने ते यहुदा राष्ट्राला जाऊन मिळतील. असे घडू नये म्हणून यराबामने दोन सोनेरी वासरांच्या मूर्ती स्थापित केल्या. यांपैकी एक मूर्ती दान तर दुसरी बेथेल येथे होती. अशारितीने वासरांच्या उपासनेला इस्राएल राष्ट्रात राजकीय धर्माचे स्थान मिळाले.—२ इतिहास ११:१३-१५.

९, १०. (अ) राजा यराबाम पहिला याने कोणते धार्मिक विधी स्थापन केले? (ब) इस्राएलमध्ये राजा यराबाम दुसरा याच्या राज्यातील सणांविषयी देवाचा कसा दृष्टिकोन होता?

यराबाम याने या नव्या धर्माला मोठेपणाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्याने जेरूसलेममध्ये होणाऱ्‍या वार्षिक उत्सवांच्याच धर्तीवर काही धार्मिक विधी स्थापित केले. १ राजे १२:३२ यात आपण असे वाचतो: “यराबामाने आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यहूदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबलि अर्पिले; त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे . . . यज्ञ केले.”

१० अशा या खोट्या धार्मिक सणांना यहोवाची कधीही संमती नव्हती. एक शतकापेक्षा अधिक काळानंतर आमोसद्वारे यहोवाने हे अगदीच स्पष्ट केले; या काळात सा.यु.पू. ८४४ साली दहा गोत्रांच्या इस्राएल राष्ट्रावर यराबाम दुसरा हा राज्य करत होता. (आमोस १:१) आमोस ५:२१-२४ यानुसार देवाने म्हटले: “तुमच्या उत्सवांचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानितो; तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासहि मला खपत नाही. तुम्ही मला होम व अन्‍नार्पणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही; तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणांकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या, तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो.”

सध्याच्या काळातील समान परिस्थिती

११, १२. प्राचीन इस्राएलाच्या आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या उपासनेत कोणते साम्य आढळते?

११ इस्राएलातील त्या सणांत सहभागी होणाऱ्‍यांचे हृदय यहोवाने पारखले हे स्पष्टच आहे, म्हणूनच त्याने त्यांच्या धार्मिक विधी व अर्पणांना झिडकारले. त्याचप्रकारे आज, ख्रिस्ती धर्मजगताच्या नाताळ व ईस्टर यांसारख्या मूर्तिपूजक उत्सवांना आज देव झिडकारतो. यहोवाच्या उपासकांच्या दृष्टिकोनात नीती व स्वैराचार यांत काहीही संबंध नाही, उजेड व अंधार यात काहीही भागिदारी नाही.—२ करिंथकर ६:१४-१६.

१२ वासरांची उपासना करणाऱ्‍या इस्राएल लोकांत व ख्रिस्ती धर्मजगतात आणखी अनेक बाबतींत साम्य आढळते. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे काहीजण देवाच्या वचनातील सत्य स्वीकारतात हे खरे असले तरीसुद्धा, खुद्द ख्रिस्तीधर्मजगताची उपासना ही देवाबद्दल मनस्वी प्रेमाने प्रेरित झालेली नाही. असती तर त्यांनी यहोवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करण्याचा प्रयत्न केला असता कारण अशाचप्रकारची उपासना यहोवाला प्रिय आहे. (योहान ४:२४) शिवाय, ख्रिस्ती धर्मजगत “न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे” वाहू देत नाही. उलट ते देवाच्या नैतिक नियमांबद्दल सहसा हातमिळवणी करते. ख्रिस्ती धर्मजगतात व्यभिचार आणि इतर गंभीर पापांकडे दुर्लक्ष केले जाते, इतकेच काय तर समलिंगी बंधनांवरही आशीर्वाद दिला जातो!

“बऱ्‍याची आवड धरा”

१३. आमोस ५:१५ यातील शब्दांनुसार कार्य करण्याची का गरज आहे?

१३ जे कोणी यहोवाची उपासना त्याला आवडेल अशा पद्धतीने करू इच्छितात त्यांना आमोस म्हणतो: “वाइटाचा द्वेष करा, बऱ्‍याची आवड धरा.” (आमोस ५:१५) द्वेष व आवड या दोन्ही तीव्र भावना मनुष्याच्या लाक्षणिक हृदयातून उत्पन्‍न होतात. हृदय हे कपटी असल्यामुळे, आपण त्याचे रक्षण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. (नीतिसूत्रे ४:२३; यिर्मया १७:९) जर आपण आपल्या हृदयात अयोग्य इच्छांना थारा दिला तर आपण कदाचित वाईटाची आवड धरून, बऱ्‍याचा द्वेष करू लागण्याची शक्यता आहे. आणि जर अशा इच्छा तृप्त करण्यासाठी आपण पाप करू लागलो तर मग आवेशाचा कितीही आव आणला तरीसुद्धा आपल्याला देवाची संमती पुन्हा मिळू शकणार नाही. तेव्हा ‘वाईटाचा द्वेष करून बऱ्‍याची आवड धरण्यास’ आपल्याला मदत करण्याची आपण देवाकडे नेहमी प्रार्थना करावी.

१४, १५. (अ) इस्राएलात कोण चांगली कार्ये करत होते पण त्यांच्यापैकी काहीजणांशी इतरजण कशाप्रकारे व्यवहार करत होते? (ब) आज जे पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत त्यांना आपण कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?

१४ अर्थात सगळेच इस्राएली लोक यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत नव्हते. उदाहरणार्थ, होशेय व आमोस यांनी ‘बऱ्‍याची आवड धरली’ आणि त्यांनी देवाचे संदेष्टे या नात्याने विश्‍वासूपणे सेवा केली. इतरांनी नाजीराचा नवस घेतला. नाजीर म्हणून जितके दिवस त्यांनी स्वतःला वाहून घेतले असेल, तितके दिवस ते द्राक्षवेलीपासून उत्पादन केलेल्या कोणत्याही वस्तू, खातपीत नव्हते, विशेषतः ते द्राक्षारस वर्ज्य करत होते. (गणना ६:१-४) अशी चांगली कामे करणाऱ्‍या आत्मत्यागी व्यक्‍तींबद्दल इतर इस्राएल लोकांचा कसा दृष्टीकोन होता? या प्रश्‍नाचे उत्तर ऐकून आपल्याला धक्का बसतो आणि यावरून कळते की या राष्ट्राचा आध्यात्मिक दृष्ट्या कितपत ऱ्‍हास झाला होता. आमोस २:१२ म्हणते: “तुम्ही नाजीरांस द्राक्षारस पाजिला व संदेष्ट्यांस संदेश देऊ नका अशी आज्ञा केली.”

१५ नाजीरांचा व संदेष्ट्यांचा विश्‍वासूपणा पाहिल्यावर खरे तर त्या इस्राएल लोकांना लाज वाटायला हवी होती आणि त्यांना आपले मार्ग बदलण्याची प्रेरणा मिळायला हवी होती. उलट त्यांनी अविचारीपणे या निष्ठावान जनांनाच देवाचे गौरव करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आपणही आपल्या सह ख्रिस्ती बांधवांपैकी जे पायनियर, मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक किवा बेथेल कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांना आपली पूर्ण वेळेची सेवा थांबवून तथाकथित सर्वसामान्य जीवन सुरू करण्याचे प्रोत्साहन देऊ नये. उलट, त्यांचे चांगले कार्य करत राहण्याचे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ या!

१६. आमोसच्या काळाच्या तुलनेत मोशेच्या काळात इस्राएलांची स्थिती अधिक चांगली का होती?

१६ आमोसच्या काळात अनेक इस्राएल लोक भौतिक रितीने समाधानी होते तरीसुद्धा ते “देवविषयक बाबतीत धनवान” नव्हते. (लूक १२:१३-२१) त्यांच्या पूर्वजांनी चाळीस वर्षे अरण्यात केवळ मान्‍ना खाल्ला होता. त्यांनी कळपातील पुष्ट वासरे खालली नव्हती किंवा हस्तिदंती पलंगांवर ते निजले नव्हते. तरीसुद्धा, मोशेने त्यांना अगदी योग्यपणे सांगितले होते: “तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; . . . आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्‍वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीहि वाण पडली नाही.” (अनुवाद २:७) होय, अरण्यात इस्राएलांना ज्याची गरज होती ते सर्वकाही त्यांना पुरवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना देवाची प्रीती, संरक्षण व आशीर्वाद लाभला होता!

१७. मूळ इस्राएलांना यहोवाने प्रतिज्ञात देशात का नेले होते?

१७ यहोवाने आमोसच्या समकालीन लोकांना आठवण करून दिली की त्याने त्यांच्या पूर्वजांना प्रतिज्ञात देशात आणून त्यांच्या सर्व शत्रूंवर विजय मिळवण्यास त्यांना मदत केली होती. (आमोस २:९, १०) पण देवाने त्या मूळ इस्राएल लोकांना ईजिप्तमधून सोडवून प्रतिज्ञात देशात कशाकरता आणले होते? त्यांनी ऐषोआरामात जगावे व आपल्या निर्माणकर्त्याला विसरून जावे म्हणून? नाही! उलट त्यांना मुक्‍त व आध्यात्मिकरित्या शुद्ध लोक या नात्याने त्याची उपासना करता यावी म्हणून त्याने असे केले होते. पण दहा गोत्रांच्या इस्राएल राष्ट्राने वाईटाचा द्वेष केला नाही व बऱ्‍याची आवड धरली नाही. उलट, ते यहोवा देवाला गौरव देण्याऐवजी कोरीव मूर्तींना गौरव देत होते. खरोखर हे किती लज्जास्पद होते!

यहोवा झडती घेतो

१८. यहोवाने आपल्याला आध्यात्मिकरित्या मुक्‍त का केले आहे?

१८ इस्राएलांच्या या लाजिरवाण्या वर्तणुकीकडे देव अर्थातच दुर्लक्ष करणार नव्हता. त्याने हे स्पष्ट केले व म्हटले: “तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन.” (आमोस ३:२) हे शब्द वाचून, आधुनिक काळातील ईजिप्तमधून अर्थात सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणातून आपल्या स्वतःच्या सुटकेचा आपण विचार केला पाहिजे. यहोवाने आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या मुक्‍त केले आहे, पण आपण आपले स्वार्थ साध्य करावेत म्हणून नव्हे. उलट त्याने असे यासाठी केले आहे की आपण शुद्ध उपासना करणारे मुक्‍त लोक यानात्याने त्याची मनापासून स्तुती करावी. आणि देवाने दिलेल्या स्वातंत्र्याचा आपण कशाप्रकारे उपयोग करतो याबद्दल आपल्या सर्वांना जाब द्यावा लागेल.—रोमकर १४:१२.

१९. आमोस ४:४, ५ यानुसार बहुतेक इस्राएलांनी कशाची आवड धरली होती?

१९ दुःखाची गोष्ट म्हणजे आमोसने दिलेल्या जोरदार संदेशांकडे इस्राएलातील बहुतेक लोकांनी दुर्लक्ष केले. संदेष्टा आमोस याने त्यांच्या आध्यात्मिक हृदयाच्या रोगट स्थितीचे आमोस ४:४, ५ यात असे वर्णन केले: “बेथेलास जाऊन पातक करा, गिल्गालास जाऊन पातकाची वृद्धि करा; . . . इस्राएल वंशजहो; तुम्हांस हे आवडते.” इस्राएलांनी आपल्या मनात योग्य इच्छा उत्पन्‍न केल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या हृदयाचे रक्षण केले नव्हते. यामुळे त्यांच्यापैकी बहुतेक जण वाईटाबद्दल आवड धरून बऱ्‍याचा द्वेष करू लागले होते. वासरांची उपासना करणाऱ्‍या त्या निगरगट्ट लोकांनी आपले मार्ग बदलले नाहीत. यहोवा त्यांची झडती घेणार होता आणि त्यांना आपल्या पापांत मरावे लागणार होते!

२०. आमोस ५:४ यात सांगितलेल्या मार्गाने एक व्यक्‍ती कशाप्रकारे चालू शकते?

२० त्याकाळी इस्राएलात राहणाऱ्‍या कोणालाही यहोवाला विश्‍वासू राहणे सोपे गेले नसेल. प्रवाहाच्या उलट दिशेने पोहणे कधीही सोपे नसते; आजच्या काळात लहानमोठ्या सर्व ख्रिश्‍चनांना याची जाणीव आहे. तरीसुद्धा देवाबद्दल प्रेम असल्यामुळे व त्याला संतुष्ट करण्याच्या इच्छेमुळे काही इस्राएलांनी खरी उपासना केली. यहोवाने त्यांना आमोस ५:४ यात लिहिल्याप्रमाणे हे प्रेमळ निवेदन केले: “मला शरण या म्हणजे वाचाल.” त्याचप्रकारे आज जे कोणी पश्‍चात्ताप करतात आणि देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याद्वारे त्याला शरण येतात त्यांना तो दया दाखवतो. या मार्गाने चालणे सोपे नाही पण असे केल्यामुळे सार्वकालिक जीवन मिळते.—योहान १७:३.

आध्यात्मिक दुष्काळ असूनही समृद्धी

२१. जे खरी उपासना करत नाहीत त्यांच्यावर कशाप्रकारचा दुष्काळ येतो?

२१ ज्यांनी खऱ्‍या उपासनेला पाठिंबा दिला नाही त्यांच्या वाट्यात काय होते? सर्वात वाईट प्रकारचा दुष्काळ—आध्यात्मिक दुष्काळ! सार्वभौम प्रभू यहोवाने म्हटले: “पाहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्‍नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्‍वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल.” (आमोस ८:११) ख्रिस्ती धर्मजगत आज अशा दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहे. पण त्यांच्यापैकी जे प्रामाणिक हृदयाचे आहेत, ते देवाच्या लोकांची आध्यात्मिक सुबत्ता पाहू शकतात आणि ते यहोवाच्या संस्थेकडे येत आहेत. ख्रिस्ती धर्मजगताची परिस्थिती आणि आज खऱ्‍या ख्रिस्ती लोकांमध्ये असलेल्या परिस्थितीत किती फरक आहे हे यहोवाच्या या शब्दांवरून स्पष्ट होते: “पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करितील पण तुम्ही फजीत व्हाल.”—यशया ६५:१३.

२२. आनंदी असण्याचे कोणते कारण आपल्याजवळ आहे?

२२ यहोवाचे सेवक या नात्याने, त्याने ज्या आध्यात्मिक तरतुदी आणि आशीर्वाद आपल्याला दिले आहेत त्यांची आपण वैयक्‍तिकरित्या कदर बाळगतो का? आपण जेव्हा बायबलचा व ख्रिस्ती प्रकाशनांचा अभ्यास करतो, आपल्या सभा, संमेलने व अधिवेशनांना उपस्थित राहतो तेव्हा खरोखर आपल्याला हर्षित चित्ताने यहोवाचा जयजयकार करावासा वाटतो. आमोसच्या या प्रेरित भविष्यवाणीसहित देवाच्या वचनाचे स्पष्ट ज्ञान मिळाल्याबद्दल आपण आनंदी आहोत.

२३. जे देवाचे गौरव करतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

२३ देवावर ज्यांचे प्रेम आहे व जे त्याचे गौरव करू इच्छितात अशा सर्व मानवांकरता आमोसची भविष्यवाणी आशेचा एक संदेश आहे. आपली सध्याची आर्थिक स्थिती कशीही असली, किंवा समस्यांनी भरलेल्या या जगात आपल्याला कोणत्याही परीक्षेला तोंड द्यावे लागले तरीपण देवावर प्रेम करणारे आपण त्याच्या अनेक आशीर्वादांचा आणि सर्वोत्तम आध्यात्मिक अन्‍नाचा आनंद लुटत आहोत. (नीतिसूत्रे १०:२२; मत्तय २४:४५-४७) तेव्हा सर्व गौरव देवाचेच आहे कारण तो आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो. तेव्हा आपण त्याची सर्वकाळ मनःपूर्वक स्तुती करण्याचा निर्धार करू या. हृदय पारखणाऱ्‍या यहोवा देवाला आपण शरण आल्यास आपल्याला हा आनंददायक विशेषाधिकार अवश्‍य मिळेल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आमोसच्या काळात इस्राएलमध्ये कशी परिस्थिती होती?

• दहा गोत्रांच्या इस्राएल राष्ट्रातील परिस्थितीचे आजच्या काळात कशाशी साम्य आहे?

• पूर्वभाकीत केलेला कोणत्या प्रकारचा दुष्काळ आज अस्तित्वात आहे पण कोणावर त्याचा परिणाम होत नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्रे]

अनेक इस्राएली लोक ऐषोआरामात राहत होते पण आध्यात्मिक अर्थाने ते समृद्ध नव्हते

[२३ पानांवरील चित्र]

पूर्ण वेळेच्या सेवकांना त्यांचे चांगले कार्य करत राहण्याचे प्रोत्साहन द्या

[२४, २५ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या आनंदी लोकांमध्ये आध्यात्मिक दुष्काळ नाही