व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

केवळ मानवांमध्ये दिसून येणारा स्वभावगुण

केवळ मानवांमध्ये दिसून येणारा स्वभावगुण

केवळ मानवांमध्ये दिसून येणारा स्वभावगुण

ज्योडीचा ईस्टेट सेल्सचा व्यापार आहे. तो एका स्त्रीला तिच्या मृत बहिणीच्या घरातील वस्तू वेगळ्या करून त्या विकण्यास मदत करत आहे. खोलीत असलेल्या एका जुन्या शेकोटीजवळ त्याला दोन जुन्या पेट्या सापडतात. यांपैकी एक पेटी तो उघडून पाहतो तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्‍वास बसत नाही. त्याला १०० डॉलरच्या नोटा, म्हणजे ८२,००० डॉलर रोख रक्कम फॉईल कागदात गुंडाळून ठेवलेली सापडते! ज्योडी खोलीत एकटाच आहे. त्याने काय करावे? गुपचुप पेटी ठेवून घ्यावी, की आपल्याला पैसे सापडले हे आपल्या क्लायंटला सांगावे?

ज्योडीसमोर आलेल्या पेचामुळे, पाशवी प्राण्यांपेक्षा आपल्याला वेगळे करणारा एक स्वभावगुण उठून दिसतो. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “माणसाच्या खास स्वभावगुणांपैकी एक म्हणजे, आपण काय करावे किंवा काय करू नये याविषयी विचारपूर्वक प्रश्‍न विचारणे.” पोटात भुकेचा डोंब उसळलेला कुत्रा, टेबलावर ठेवलेले मांस पाहिल्यावर, ते खावे की खाऊ नये याचा मुळीच विचार करणार नाही. परंतु, ज्योडीकडे आपल्या निर्णयाचे नीतिमूल्य तोलून पाहण्याची क्षमता आहे. त्याने जर ती रक्कम ठेवून घेतली तर ती चोरी होईल; पण कदाचित तो पकडला जाणार नाही. ते पैसे त्याचे नाहीत; पण त्याच्या क्लायंटला त्या पैशाविषयी काहीच माहीत नाही. शिवाय, ज्योडीने ते पैसे त्याच्या क्लायंटला दिले तर, त्याच्या समाजातले पुष्कळ लोक त्याला वेड्यात काढतील.

तुम्ही ज्योडीच्या जागी असता तर काय केले असते? तुम्ही ज्या प्रकारच्या नीतितत्त्वांनुसार चालण्यास निवडले आहे याच्या आधारावर तुम्ही या प्रश्‍नाचे उत्तर द्याल.

योग्य आणि अयोग्य याविषयीचे दर्जे

लोकांनी जीवनात कोणत्या नीतितत्त्वांनुसार चालावे हे बऱ्‍याच काळापासून धर्माने ठरवले आहे. देवाचे वचन बायबल याचाही अनेक समाजांतील लोकांवर परिणाम पडला आहे. परंतु, आज विविध धार्मिक दर्जे अव्यावहारिक आहेत असे म्हणून ते नाकारणाऱ्‍या व बायबलची नैतिक तत्त्वप्रणाली जुनी आहे असे म्हणणाऱ्‍या लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्याऐवजी लोक काय स्वीकारत आहेत? एथिक्स ईन बिझनेस लाईफ नावाच्या पुस्तकात म्हटले आहे: ‘एकेकाळी धर्माचे वर्चस्व होते पण आज धर्मनिरपेक्ष बुद्धीचे राज्य आहे.’ धर्माकडे वळण्याऐवजी आज लोक, कोणत्याही धर्माशी संबंध नसलेल्या नीतिशास्त्राच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात. जैव-नीतिशास्त्राचे प्राध्यापक पॉल मॅकनील म्हणतात: “माझ्या मते, नीतिशास्त्रज्ञच लौकिक पुजारी झाले आहेत. . . . जे लोक पूर्वी धार्मिक आदर्शांची गोष्ट करायचे आज तेच लोक धर्मनिरपेक्ष नीतितत्त्वांची गोष्ट करतात.”

तुमच्यासमोर एखादा कठीण निर्णय घेण्याचा प्रसंग येतो, तेव्हा योग्य काय व अयोग्य काय हे तुम्ही कसे ठरवता? तुमचे नैतिक दर्जे हे देवाने ठरवले आहेत की तुम्ही स्वतः?