व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मद्यपानाविषयी माफक दृष्टिकोन बाळगा

मद्यपानाविषयी माफक दृष्टिकोन बाळगा

मद्यपानाविषयी माफक दृष्टिकोन बाळगा

“द्राक्षारस चेष्टा करणारा आहे मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा [“वाहवत जाणारा,” NW] शहाणा नव्हे.”नीतिसूत्रे २०:१.

१. यहोवाकडील काही उत्तम देणग्यांविषयी स्तोत्रकर्त्याने आपली कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्‍त केली?

शिष्य याकोबाने लिहिले: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे . . . ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याकोब १:१७) देवाने दिलेल्या विविध उत्तम देणग्यांविषयी स्तोत्रकर्त्याने आपली कृतज्ञता पुढील शब्दांत व्यक्‍त केली: “तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पति उगवितो; ह्‍यासाठी की, मनुष्याने भूमींतून अन्‍न उत्पन्‍न करावे; म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्‍न करावी.” (स्तोत्र १०४:१४, १५) ज्याप्रमाणे वनस्पति, भाकर, आणि तेल या गोष्टी देवाकडील उत्तम देणग्या आहेत त्याचप्रमाणे द्राक्षारस व इतर मद्ययुक्‍त पेये देखील आहेत. त्यांचा आपण कसा वापर करावा?

२. मद्यपानाविषयी कोणत्या प्रश्‍नांवर आपण विचार करणार आहोत?

आपल्या आनंदाकरता देण्यात आलेली कोणतीही गोष्ट, आपण तिचा योग्यरित्या वापर करतो तोपर्यंतच चांगली असते. उदाहरणार्थ, मध “चांगला आहे,” पण “मधाचे अति सेवन करणे बरे नाही.” (नीतिसूत्रे २४:१३; २५:२७) “थोडा द्राक्षारस” घेण्यात काही गैर नसले तरीसुद्धा अतिमद्यपान करणे ही एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे. (१ तीमथ्य ५:२३) बायबल बजावून सांगते: “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा [“वाहवत जाणारा,” NW] शहाणा नव्हे.” (नीतिसूत्रे २०:१) पण मद्यामुळे वाहवत जाण्याचा काय अर्थ होतो? * मद्यपानाला अतिमद्यपान केव्हा म्हणता येऊ शकते? याविषयीचा माफक दृष्टिकोन काय आहे?

मद्यामुळे ‘वाहवत जाणे’—कसे घडते?

३, ४. (अ) नशा येईपर्यंत पिण्याची बायबलमध्ये निंदा केली आहे हे कशावरून दिसून येते? (ब) दारुडेपणाची काही लक्षणे कोणती आहेत?

प्राचीन इस्राएलात, खादाड व मद्यपी असलेल्या व पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या मुलाला दगडमार करून ठार मारण्याची आज्ञा होती. (अनुवाद २१:१८-२१) प्रेषित पौलाने ख्रिस्ती बांधवांना अशी आज्ञा दिली: “बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्‍तीसहि बसू नये.” नशा येईपर्यंत मद्य पिणाऱ्‍या दारुड्या व्यक्‍तीची बायबलमध्ये निंदा केली आहे हे तर स्पष्टच आहे.—१ करिंथकर ५:११; ६:९, १०.

दारुडेपणाच्या लक्षणांचे बायबलमध्ये असे वर्णन केले आहे: “द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यांत कसा चमकतो, घशांतून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नको. शेवटी तो सर्पासारखा दंश करितो, फुरश्‍याप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनांतून विपरित गोष्टी बाहेर पडतील.” (नीतिसूत्रे २३:३१-३३) दारुडेपणाची तुलना एखाद्या विषारी सापाच्या चाव्याशी केली आहे; यामुळे एखाद्याला मळमळ व ओकारी होऊ शकते, तो संभ्रमित होतो व बेशुद्धही पडू शकतो. दारुड्या व्यक्‍तीला “विलक्षण प्रकार” दिसतात, अर्थात ती भ्रांत होते किंवा कल्पना विश्‍वात वावरते. तसेच सर्वसामान्य व्यक्‍ती ज्या भावना व इच्छा दडपून टाकते, अशा विकृत भावना व इच्छा नशेत असलेली व्यक्‍ती बोलून दाखवते.

५. अतिमद्यपान कशाप्रकारे एक घातक पाश ठरू शकते?

कदाचित एखादी व्यक्‍ती मद्य पीत असेल, पण आपल्याला नशा चढली आहे हे लोकांच्या लक्षात येईल इतके न पिण्याची ती काळजी घेत असेल. हे योग्य आहे का? काही व्यक्‍तींमध्ये, मद्याचे बरेच प्याले प्यायल्यानंतरही नशा चढली आहे हे अजिबात दिसून येत नाही. पण ही सवय अनपायकारक आहे असा विचार करणे म्हणजे एकप्रकारे स्वतःलाच फसवण्यासारखे आहे. (यिर्मया १७:९) हळूहळू, वाढत वाढत, त्या व्यक्‍तीचे मद्यावर अवलंबित्व निर्माण होऊ शकते आणि शेवटी ती “मद्यपानासक्‍त” बनते. (तीत २:३) मद्यासक्‍त बनण्याच्या प्रक्रियेविषयी लेखिका कॅरलाइन नॅप म्हणतात: “ही एक संथ, हळुवार, बेमालूमपणे घडणारी प्रक्रिया आहे.” अतिमद्यपान खरोखर किती घातक पाश आहे!

६. खाणे व पिणे याबाबतीत अतिरेक का टाळला पाहिजे?

येशूने दिलेला इशाराही लक्षात घ्या: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.” (लूक २१:३४, ३५) एक व्यक्‍ती नशा चढेपर्यंत मद्य पीत नसली तरीसुद्धा शारीरिकरित्या, तसेच आध्यात्मिकरित्या तिला गुंगी व आळस येऊ शकतो. विचार करा, ही व्यक्‍ती अशा अवस्थेत असताना यहोवाचा दिवस अकस्मात आला तर?

मद्यपानाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम

७. मद्याचा अतिरेक २ करिंथकर ७:१ यातील आदेशाशी सुसंगत का नाही?

मद्याच्या अतिरेकी वापरामुळे एक व्यक्‍ती शारीरिक व आध्यात्मिक स्वरूपाचे अनेक धोके पत्करते. अतिमद्यपानामुळे होणाऱ्‍या आजारांत यकृत-सूत्रण, यकृतावर येणारी सूज, आणि कंपनमय मुग्धभ्रांती यासारख्या तंत्रिका विकृतीचा समावेश आहे. दीर्घकाळ मद्याच्या अतिसेवनामुळे कर्करोग, मधुमेह, आणि हृदय व जठराचे काही रोगही होऊ शकतात. निश्‍चितच मद्याचा अतिरेकी वापर करणारी व्यक्‍ती, “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू,” या शास्त्रवचनातील निर्देशाच्या विरोधात जाते.—२ करिंथकर ७:१.

८. नीतिसूत्रे २३:२०, २१ यानुसार मद्याच्या अतिसेवनामुळे काय घडू शकते?

मद्याच्या अतिसेवनामुळे पैशाचा अपव्यय तर होतोच, पण एखाद्याची नोकरीही गमावण्याचा संभव आहे. प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने अशी ताकीद दिली: “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्‍यास उभा राहू नको.” का? तो सांगतो: “कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो.”—नीतिसूत्रे २३:२०, २१.

९. एखादी व्यक्‍ती गाडी चालवणार असेल तर तिने मद्य न पिणेच सुज्ञपणाचे का ठरेल?

आणखी एका धोक्याकडे लक्ष वेधताना दी एन्सायक्लोपिडिया ऑफ अल्कोहॉलिझम म्हणतो: “अभ्यासांवरून दिसून आले आहे की मद्यप्राशनामुळे, वाहन चालनाकरता आवश्‍यक असलेले गुण जसे, प्रतिक्रिया दाखवण्याचा वेळ, संयोजनक्षमता, एकाग्रता, दृष्टी व जागरुकता आणि निर्णयक्षमता इत्यादींचा ऱ्‍हास होतो.” पिऊन गाडी चालवणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. मद्यप्राशनाशी संबंधित दुर्घटनांमध्ये एकट्या भारतातच हजारो व्यक्‍ती दर वर्षी मृत्यूमुखी पडतात अथवा जखमी होतात. या धोक्याला सहसा तरुण बळी पडतात कारण वाहन चालविण्याच्या आणि मद्यप्राशनाच्या बाबतीत त्यांचा अनुभव कमी असतो. बरेचसे मद्य प्राशन केल्यानंतर गाडी चालवणारी व्यक्‍ती यहोवा देवाकडून मिळालेल्या जीवनाच्या देणगीचा आपण आदर करतो असे खरेच म्हणू शकते का? (स्तोत्र ३६:९) जीवनाचे पावित्र्य लक्षात घेऊन, जी व्यक्‍ती गाडी चालवणार असेल तिने त्याआधी मद्ययुक्‍त पेये अजिबात न पिणेच सर्वात उत्तम ठरेल.

१०. मद्याचा आपल्या मनावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो आणि हे धोक्याचे का आहे?

१० मर्यादेबाहेर पिण्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक हानी देखील होऊ शकते. बायबल म्हणते: “द्राक्षारस व नवा द्राक्षारस . . . विवेक नष्ट करितात.” (होशेय ४:११) मद्य माणसाच्या मनावर परिणाम करते. यु.एस. नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ ड्रग अब्यूज या संस्थेच्या एका प्रकाशनानुसार, “माणूस जेव्हा मद्य पितो, तेव्हा पचन संस्थेतून त्याचे अभिशोषण होऊन ते रक्‍तात मिसळते आणि लगेच मेंदूपर्यंत पोचते. मनुष्याचे विचार व भावना यांवर नियंत्रण करणारे मेंदूतील विशिष्ट भाग धीमे पडू लागतात. तेव्हा आपोआप त्या व्यक्‍तीला आपल्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत असे भासू लागते.” अशा अवस्थेत आपण ‘वाहवत जाण्याची,’ मर्यादा सोडून वागण्याची आणि अनेक मोहांना बळी पडण्याची अधिक शक्यता असते.—नीतिसूत्रे २०:१.

११, १२. अतिमद्यपानामुळे कशाप्रकारे आध्यात्मिक हानी होऊ शकते?

११ शिवाय, बायबल आपल्याला आज्ञा देते: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) अधिक प्रमाणात मद्य प्राशन केल्याने कधीही देवाचे गौरव होणे शक्य आहे का? लोकांनी आपल्याला, खूप पिणारा असे म्हणून ओळखावे अशी कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीची इच्छा असू शकत नाही. असे नाव कमवल्यामुळे यहोवाच्या नावाला गौरव मिळण्याऐवजी त्याच्या नावाला कलंक लागेल.

१२ पिण्याच्या बाबतीत एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने अतिरेक केल्यामुळे, सहविश्‍वासू बांधवांपैकी कोणाला, उदाहरणार्थ सत्य शिकणाऱ्‍या एखाद्या नवोदित व्यक्‍तीला अडखळणाचे कारण झाले तर? (रोमकर १४:२१) यासंदर्भात येशूने अशी ताकीद दिली होती: “माझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या ह्‍या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्‍यात त्याचे हित आहे.” (मत्तय १८:६) अतिमद्यपानामुळे एका व्यक्‍तीचे मंडळीतील विशेषाधिकार देखील काढून घेतले जाऊ शकतात. (१ तीमथ्य ३:१-३, ८) याशिवाय, अतिमद्यप्राशनामुळे कुटुंबावर होणाऱ्‍या दुष्परिणामांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

धोके टाळा—कसे?

१३. अतिमद्यपान टाळण्याकरता सर्वात महत्त्वाचे काय आहे?

१३ अतिमद्यपानाचे धोके टाळण्याकरता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मर्यादा ओळखणे. खूप पिणे आणि दारूडेपणा यांमधली मर्यादा नव्हे, तर माफक प्रमाणात पिणे आणि खूप पिणे यांमधली मर्यादा ओळखणे आवश्‍यक आहे. तुमच्याकरता ही मर्यादा कोणी ठरवावी? बऱ्‍याच गोष्टींचा यात अंतर्भाव असल्यामुळे, किती मद्य पिणे म्हणजे अतिमद्यपान आहे यासंबंधी कोणताही काटेकोर नियम बनवता येत नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून त्या मर्यादेत राहिले पाहिजे. तुमच्याबाबतीत, किती प्यायल्यावर त्याला अतिमद्यपान म्हणता येईल हे तुम्ही स्वतः कसे ठरवू शकता? हे ठरवण्याकरता एखादे मार्गदर्शक तत्त्व आहे का?

१४. माफकपणा आणि अतिमद्यपान यांतली मर्यादा ओळखण्यास कोणते मार्गदर्शक तत्त्व तुमच्या उपयोगी पडेल?

१४ बायबल सांगते: “चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील.” (नीतिसूत्रे ३:२१, २२) तेव्हा मार्गदर्शक तत्त्व हेच आहे: जर विशिष्ट प्रमाणात मद्य घेतल्यानंतर तुमची निर्णयक्षमता क्षीण होत असेल आणि तुमचा विवेक अर्थात विचारक्षमता मंदावत असेल तर मग मद्याचे ते प्रमाण तुमच्याकरता वाजवीपेक्षा जास्त झाले असे समजावे. पण आपली वैयक्‍तिक मर्यादा ओळखण्याकरता तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहावे लागेल!

१५. कोणत्या परिस्थितीत एक प्याला देखील अपायकारक ठरू शकेल?

१५ विशिष्ट परिस्थितीत एक प्याला देखील अपायकारक ठरू शकेल. उदाहरणार्थ, गर्भाला धोका संभवण्याची शक्यता असल्यामुळे गरोदर स्त्री कोणत्याही प्रकारचे मद्ययुक्‍त पेय न पिण्याचा निर्णय घेऊ शकते. तसेच, ज्याला पूर्वी मद्यासक्‍तीची समस्या होती किंवा ज्याचा विवेक त्याला मद्य पिण्यास परवानगी देत नाही अशा व्यक्‍तीसमोर आपणही मद्य न पिणेच अधिक समंजसपणाचे ठरणार नाही का? निवासमंडपात याजक या नात्याने वेगवेगळी कामे करणाऱ्‍यांना यहोवाने अशी आज्ञा दिली होती: “दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीहि द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल.” (लेवीय १०:८, ९) यानुसार, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याअगोदर तसेच, सेवाकार्य व इतर कोणत्याही आध्यात्मिक जबाबदाऱ्‍या पार पाडण्याअगोदर मद्ययुक्‍त पेये पिण्याचे टाळावे. शिवाय, ज्या देशांत मद्ययुक्‍त पेये पिण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत किंवा केवळ विशिष्ट वयानंतरच ती पिण्याची परवानगी आहे, त्या देशांतील या कायद्यांविषयी योग्य आदर दाखवला जावा.—रोमकर १३:१.

१६. तुमच्यासमोर मद्ययुक्‍त पेय ठेवले जाते, तेव्हा काय करावे हे तुम्ही कसे ठरवू शकता?

१६ तुम्हाला कोणी मद्ययुक्‍त पेय दिल्यास, किंवा तुमच्यासमोर ते ठेवल्यास सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्‍न विचारा: ‘हे पिणे आवश्‍यक आहे का?’ जर तुम्ही ते प्यायचे ठरवलेच, तर मग तुमची वैयक्‍तिक मर्यादा विसरू नका आणि त्यापलीकडे न जाण्याची काळजी घ्या. यजमानांच्या आग्रहापुढे झुकून आपला निर्णय बदलू नका. आणि मोठमोठ्या समारंभांत, उदाहरणार्थ लग्नाच्या रिसेपशन्समध्ये मद्ययुक्‍त पेये दिली जात असतील तर विशेषतः सावध राहा कारण सहसा अशा प्रसंगी कोण किती पिऊ शकतो यावर कोणतेही बंधन नसते. बऱ्‍याच ठिकाणी, अल्पवयीन मुलांनी मद्ययुक्‍त पेये विकत घेण्याविरुद्ध कोणतेही कायदेशीर निर्बंध नसतात. तेव्हा मद्याच्या योग्य वापरासंबंधी आईवडिलांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन द्यावे आणि यासंदर्भात त्यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवावे.—नीतिसूत्रे २२:६.

या समस्येवर तुम्ही मात करू शकता

१७. आपल्याला अतिमद्यपानाची समस्या आहे की नाही, हे तुम्हाला कसे ओळखता येईल?

१७ तुम्हाला अतिमद्यपानाची (वाईन किंवा इतर मद्ययुक्‍त पेयांचा यात समावेश होतो) समस्या आहे का? लक्षात असू द्या, जर तुमच्या जीवनात अतिमद्यपान एक गुप्त पाप बनण्यास सुरवात झाली असेल, तर आज न उद्या त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तेव्हा, प्रामाणिकपणे व विचारपूर्वक आत्मपरीक्षण करा. यासाठी स्वतःला काही प्रश्‍न विचारा: ‘पूर्वीपेक्षा आता मी अधिकवेळा पितो का? अलीकडे मी ड्रिंक्स घेतो तेव्हा त्यात मद्याचे प्रमाण जास्त असते का? चिंता, काळजी, व समस्यांपासून सुटका मिळण्याकरता मी मद्याचा उपयोग करतो का? माझ्या पिण्याच्या सवयीबद्दल कुटुंबातील एखाद्या सदस्याने किंवा एखाद्या मित्राने काळजी व्यक्‍त केली आहे का? माझ्या पिण्यामुळे कुटुंबात काही समस्या निर्माण झाल्या आहेत का? आठवडाभर, महिनाभर किंवा बऱ्‍याच महिन्यांपर्यंत मद्य प्यायला मिळाले नाही तर मी अस्वस्थ होतो का? मी किती वाईन किंवा इतर मद्ययुक्‍त पेये पितो हे इतरांपासून लपवतो का?’ यांपैकी काही प्रश्‍नांचे उत्तर हो असे असेल तर काय? ‘आरशांत आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जाणाऱ्‍या’ माणसासारखे होऊ नका. (याकोब १:२२-२४) या समस्येवर मात करण्याकरता आवश्‍यक पावले उचला. तुम्ही कोणती पावले उचलू शकता?

१८, १९. तुम्ही अतिमद्यपान कशाप्रकारे थांबवू शकता?

१८ प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना अशी आज्ञा केली: “द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा.” (इफिसकर ५:१८) वैयक्‍तिकरित्या आपल्याकरता किती मद्य वाजवीपेक्षा जास्त आहे हे ठरवा आणि स्वतःवर योग्य मर्यादा घाला. कोणत्याही परिस्थितीत या मर्यादेपलीकडे जायचे नाही असा दृढ निश्‍चय करा; आत्मसंयमाने वागा. (गलतीकर ५:२२, २३) तुमचे मित्र व संबंधी तुमच्यावर जास्त पिण्याचा दबाव आणतात का? मग सांभाळून राहा. बायबल सांगते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

१९ जर तुम्ही एखाद्या समस्येपासून पळ काढण्याच्या प्रयत्नात मद्य पीत असाल तर, त्याऐवजी त्या समस्येला धैर्याने सामोरे जा. देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन करण्याद्वारे समस्यांना तोंड देणे शक्य आहे. (स्तोत्र ११९:१०५) ख्रिस्ती वडिलांपैकी जे तुम्हाला जवळचे वाटतात अशा एखाद्या वडिलांची मदत घेण्यास कचरू नका. तुमच्या आध्यात्मिक उन्‍नतीकरता यहोवाने केलेल्या सर्व तरतुदींचा चांगला उपयोग करा. देवासोबत आपला नातेसंबंध बळकट करा. नियमित प्रार्थना करा—खासकरून ज्यांबाबतीत आपण कमी पडतो असे तुम्हाला वाटते, त्या गोष्टींसंबंधी यहोवाला प्रार्थना करा. ‘माझे गुरदे व माझे हृदय शुद्ध कर’ अशी देवाला याचना करा. (स्तोत्र २६:२, NW) याआधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे सात्विकपणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करा.

२०. अतिमद्यपानाची सवय न सुटल्यास तुम्हाला कोणती पावले उचलावी लागतील?

२० इतके करूनही जर अतिमद्यपानाची तुमची समस्या सुटली नाही तर काय? तर मग तुम्हाला येशूच्या या सल्ल्याचे पालन करावे लागेल: “तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकात (“गेहेन्‍नात,” NW) . . . जावे, ह्‍यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.” (मार्क ९:४३) स्पष्ट सांगायचे झाल्यास: अजिबात पिऊ नका. एका स्त्रीने असाच निर्णय घेतला. आपण तिला आयरीन म्हणूया. ती सांगते: जवळजवळ अडीच वर्षे मी मद्याला शिवलेही नाही. पण त्यानंतर मी विचार करू लागले, फक्‍त एक ड्रिंक घेऊन पाहायला काय हरकत आहे. पण असा विचार मनात येताच मी लगेच यहोवाला प्रार्थना करते. नवे व्यवस्थीकरण येईपर्यंत, आणि कदाचित त्यानंतरही, मद्याला स्पर्शच करायचा नाही असे मी ठरवले आहे.” देवाच्या नीतिमान नव्या जगातील जीवनाच्या मोबदल्यात मद्यपान पूर्णपणे सोडून देण्याची किंमत निश्‍चितच क्षुल्लक आहे.—२ पेत्र ३:१३.

“असे धावा की तुम्हाला ते मिळेल”

२१, २२. कोणता अडथळा आपल्याला जीवनाच्या शर्यतीत अंतिम रेषेपर्यंत पोचण्यापासून रोखू शकतो आणि आपल्याला त्यावर कशाप्रकारे मात करता येईल?

२१ प्रेषित पौलाने ख्रिस्ती जीवनाची तुलना शर्यतीशी केली व म्हटले: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षिस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो; ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी असे करितो. म्हणून मीहि तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धहि करितो, म्हणजे वाऱ्‍यावर मुष्टिप्रहार करीत नाही; तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथकर ९:२४-२७.

२२ केवळ जे यशस्वीरित्या शर्यत संपवतात त्यांनाच बक्षीस मिळू शकते. अतिमद्यपानाची समस्या, जीवनाच्या शर्यतीत अंतिम रेषेपर्यंत पोचण्यापासून आपल्याला रोखू शकते. त्यामुळे, आपण आत्मसंयम दाखवलाच पाहिजे. बक्षिसावर नजर ठेवून धावायचे असेल, तर “मद्यासक्‍ति” सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. (१ पेत्र ४:३) अर्थात, आपण सर्वच बाबतीत आत्मसंयम दाखवणे गरजेचे आहे. मद्ययुक्‍त पेये पिण्याच्या संबंधाने, “आपण अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्‍तीने वागावे,” हेच सुज्ञपणाचे ठरेल.—तीत २:१३.

[तळटीप]

^ परि. 2 या लेखात, “मद्य” हा शब्द बिअर, वाईन व इतर मद्ययुक्‍त पेयांकरता वापरलेला आहे.

तुम्हाला आठवते का?

• अतिमद्यपानाचे वर्णन कसे करता येईल?

• अतिमद्यपानामुळे कोणते दुष्परिणाम होतात?

• अतिमद्यपानाचे धोके तुम्ही कसे टाळू शकता?

• अतिमद्यपानाच्या समस्येवर एक व्यक्‍ती कशाप्रकारे मात करू शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चित्र]

द्राक्षारस, “मनुष्याचे अंत:करण आनंदित” करतो

[२० पानांवरील चित्र]

आपण आपली वैयक्‍तिक मर्यादा ओळखून तिचे पालन केले पाहिजे

[२१ पानांवरील चित्र]

मर्यादा आधीपासूनच ठरवून घ्या

[२२ पानांवरील चित्र]

ज्यांबाबतीत आपण कमजोर आहोत अशा गोष्टींबद्दल यहोवाला नियमित प्रार्थना करा

[२३ पानांवरील चित्र]

मद्याच्या उपयोगासंबंधाने मुलांना मार्गदर्शन देण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे