व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे

यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे

जीवन कथा

यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे

आना डेन्ट्‌स टर्पिन यांच्याद्वारे कथित

माझी आई कित्येकदा कौतुकानं हसून म्हणायची, “आपली आना म्हणजे एक मोठ्ठं प्रश्‍नचिन्हच आहे.” लहानपणी मी आईबाबांना माझ्या असंख्य प्रश्‍नांनी अक्षरशः भंडावून सोडायचे. पण माझ्या बालसुलभ जिज्ञासेबद्दल ते कधीही माझ्यावर रागावले नाहीत. उलट त्यांनी मला बायबलनुसार प्रशिक्षित केलेल्या विवेकाच्या आधारावर, सारासार विचार करायला आणि वैयक्‍तिक निर्णय घ्यायला शिकवलं. त्यांनी मला जे शिकवलं ते माझ्या जीवनात किती मौल्यवान ठरलं! मी चौदा वर्षांची असताना एक दिवशी नात्झींनी माझ्या प्रिय आईबाबांना माझ्यापासून हिरावून नेलं आणि त्यानंतर आमची पुन्हा कधीच भेट झाली नाही.

माझे वडील, ऑस्कर डेन्ट्‌स आणि माझी आई आन्‍ना मारीया स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ असलेल्या लोराक या जर्मन शहरात राहायचे. तरुणपणी ते दोघेही राजकारणात सक्रिय होते आणि त्यामुळे समाजात बरेच लोक त्यांना ओळखत व त्यांचा आदर करत. पण १९२२ साली, माझ्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाच्या थोड्याच काळानंतर राजकारणाबद्दल आपला दृष्टिकोन आणि आपल्या जीवनातील ध्येये देखील बदलली. आईने बायबल विद्यार्थी अर्थात त्या काळच्या यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली; देवाचं राज्य या पृथ्वीवर शांती आणेल हे तिला कळलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. लवकरच बाबाही आईसोबत अभ्यास करू लागले आणि ते बायबल विद्यार्थ्यांच्या सभांनाही जाऊ लागले. त्यावर्षीच्या नाताळात बाबांनी आईला द हार्प ऑफ गॉड हे पुस्तक भेट म्हणून दिलं. माझा जन्म मार्च २५, १९२३ रोजी झाला; मी त्यांची एकुलती एक मुलगी होते.

आईबाबांसोबतच्या अनेक गोड आठवणी मी जपून ठेवल्या आहेत—ब्लॅक फॉरेस्ट जंगलाच्या निवांत परिसरात आम्ही दर उन्हाळ्यात हमखास फिरायला जायचो. घरात आई मला घरातील कामं शिकवायची. स्वयंपाकघरात मी काही बनवत असताना, ती कशी एका विशिष्ट ठिकाणी उभी राहून देखरेख करायची हे मला अजूनही आठवतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईबाबांनी मला यहोवा देवावर प्रेम करायला व त्याच्यावर भरवसा ठेवायला शिकवलं.

आमच्या मंडळीत जवळजवळ ४० उत्साही राज्य प्रचारक होते. माझ्या आईबाबांजवळ, देवाच्या राज्याबद्दल चर्चा सुरू करण्याचं खास कौशल्य होतं. पूर्वी सामाजिक कार्यांचा अनुभव असल्यामुळे ते अगदी आत्मविश्‍वासानं लोकांशी बोलायचे आणि लोकही त्यांचं आदरपूर्वक ऐकून घ्यायचे. मी सात वर्षांची झाले तेव्हा माझ्या मनातही घरोघरच्या प्रचार कार्यात सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाली. पहिल्या दिवशी, माझ्यासोबत असलेल्या बहिणीने माझ्या हातात काही पत्रिका दिल्या आणि एका घराकडे बोट दाखवून मला म्हणाली, “जा, त्यांना हे हवं आहे का विचारून पाहा.” १९३१ साली आम्ही स्वित्झर्लंडच्या बॅसल शहरात बायबल विद्यार्थ्यांच्या एका अधिवेशनाला गेलो. त्या अधिवेशनात माझ्या आईबाबांचा बाप्तिस्मा झाला.

अराजकता आणि नंतर जुलूमशाही

त्या काळात जर्मनीत बरीच उलथापालथ चालली होती; वेगवेगळ्या राजकीय गटांच्या, रात्री अपरात्री रस्त्यांवर चकमकी व्हायच्या. एका रात्री आमच्या शेजारच्या घरातून ओरडाओरड ऐकू आल्यामुळे मी झोपेतून जागी झाले. सोळा-सतरा वर्षांच्या दोन मुलांनी आपल्या मोठ्या भावाला, गवत उचलण्याच्या लांब दांडीच्या काट्याने ठार मारले होते; का, तर त्याची राजकीय मते यांना पटत नव्हती म्हणून. यहुदी लोकांविरुद्धही बराच द्वेष व्यक्‍त केला जाऊ लागला होता. आमच्या शाळेत एका मुलीला फक्‍त ती यहुदी होती म्हणून एका कोपऱ्‍यात एकटं उभं राहावं लागायचं. मला त्या बिचारीची खूप दया यायची; पण समाजानं आपल्यावर बहिष्कार टाकल्यावर कसं वाटतं हे लवकरच आपल्यालाही अनुभवावं लागणार हे त्यावेळी मला माहीत नव्हतं.

जानेवारी ३०, १९३३ रोजी ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा चांसलर बनला. आमच्या घरापासून काही अंतरावरच नात्झींनी नगरपालिकेच्या कार्यालयावर मोठ्या थाटामाटानं त्यांचा स्वस्तिकाचा झेंडा उंचावताना आम्ही पाहिला. शाळेत आमच्या आवेशी शिक्षिकेने आम्हाला “हेल हिटलर!” म्हणायला शिकवलं. दुपारी घरी परतल्यावर मी बाबांना याविषयी सांगितलं. ते बेचैन झाले व म्हणाले, “मला हे बरोबर वाटत नाही. ‘हेल’ म्हणजे तारण. आणि ‘हेल हिटलर’ म्हणण्याचा अर्थ असा होईल की यहोवा नव्हे तर हिटलर आपल्याला तारण देईल असं आपण मानतो. मला तरी हे योग्य वाटत नाही, पण तूच ठरव तुला काय करायचंय ते.”

मी हिटलरला सलामी न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझ्या शाळेतील मुलांनी मला अगदी वाळीत टाकलं. काही मुलांनी तर शिक्षिकेचं लक्ष नसताना मला मारलं देखील. शेवटी त्यांनी माझा पिच्छा सोडला, पण अगदी माझ्या मित्रमैत्रिणींनीसुद्धा सांगितलं की त्यांच्या वडिलांनी माझ्यासोबत खेळायचं नाही असं त्यांना बजावून सांगितलं होतं. माझ्यासोबत मैत्री करणं धोक्याचं होतं.

जर्मनीत नात्झी सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी यहोवाचे साक्षीदार राष्ट्राकरता धोकेदायक आहेत असा आरोप करून त्यांच्यावर बंदी आणली. नात्झींच्या निर्दय शिपायांनी मॅग्डेबर्ग येथील कार्यालयाला कुलुपं घातली आणि आमच्या सभांवरही बंदी आणली. पण आम्ही सीमेजवळ राहात असल्यामुळे बाबांनी सीमापार करून बॅसलला जाण्याचा परवाना मिळवला आणि त्यामुळे आम्ही रविवारच्या सभांकरता तिथं जाऊ लागलो. ते बऱ्‍याचदा म्हणायचे की भविष्याला धैर्याने तोंड देण्याकरता जर्मनीतल्या बांधवांनाही आपल्यासारखंच आध्यात्मिक अन्‍न मिळालं तर किती बरं होईल!

धोकेदायक फेऱ्‍या

मॅग्डेबर्गचं कार्यालय बंद पडल्यावर, पूर्वी तिथं कार्य करणारे युल्युस रिफल गुप्त प्रचार कार्यासंबंधी व्यवस्था पाहण्याकरता लोराकला म्हणजे आपल्या मूळच्या गावी आले. बाबांनी लगेच त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली. मग त्यांनी आईला व मला सांगितलं की स्वित्झर्लंडहून जर्मनीत बायबल साहित्य आणण्यात मदत करण्यास त्यांनी तयारी दर्शवली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे काम अत्यंत धोक्याचं आहे आणि त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आमच्याकरताही हे धोक्याचं असल्यामुळे या कार्यात सामील होण्याचा ते आमच्यावर दबाव आणू इच्छित नव्हते. पण आईने लगेच त्यांना म्हटलं: “मी तुमच्या पाठीशी आहे.” मग त्या दोघांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी म्हणाले, “मीसुद्धा!”

आईने टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या आकाराची एक पिशवी विणली. या पिशवीच्या एका बाजूला मासिकं लपवून ती वरून पुन्हा विणून तो भाग बंद करायची. तिने बाबांच्या कपड्यांतही असे चोर खिसे शिवले होते आणि आमच्या दोघींसाठी बायबल अभ्यासाची लहान पुस्तकं लपवता येतील असे दोन कंबरपट्टे तयार केले होते. आमचं हे गुप्त धन सुखरूप घरी आणल्यावर प्रत्येक वेळी आम्ही सुटकेचा निःश्‍वास टाकून यहोवाचे आभार मानायचो. हे सर्व साहित्य आम्ही आमच्या माडीवरच्या खोलीत लपवून ठेवलं.

सुरवातीला नात्झींना आमच्या हालचालींबद्दल मागमूसही नव्हता. त्यांनी कधी आम्हाला काही विचारलं नाही आणि कधी आमच्या घराची झडती घेतली नाही. पण तरीसुद्धा वेळ पडल्यास आमच्या आध्यात्मिक बांधवांना धोक्याची सूचना देता यावी म्हणून आम्ही एक सांकेतिक संख्या ठरवली—४७११, हे एका सुप्रसिद्ध कोलोनचं (सुवासिक अत्तर) नाव होतं. जर आमच्या घरी येणं धोकेदायक असेल तर आम्ही ही संख्या वापरून कसेतरी करून त्यांना सावध करू असं ठरलं. बाबांनी त्यांना आमच्या इमारतीत शिरताना वरती आमच्या बैठकीच्या खिडक्यांकडे एक नजर टाकण्याची देखील ताकीद देऊन ठेवली. जर खिडक्या उघड्या असतील तर त्यांनी असं समजावे की काहीतरी गडबड आहे आणि परत जावं.

१९३६ व १९३७ साली गेस्टापोंनी सामूहिक अटक मोहीम सुरू केली आणि हजारो साक्षीदारांना तुरुंगात व नजरबंदी शिबिरांत डांबून त्यांना अतिशय क्रूर व अमानुष वागणूक दिली. स्वित्झर्लंड येथील बर्न शहरात असलेल्या शाखा दफ्तराने, नात्झींच्या काळ्या करतूदींचा पर्दाफाश करणाऱ्‍या क्रॉइत्सुग गेगन दास क्रिस्तनतुम (ख्रिस्ती धर्माविरुद्ध धर्मयुद्ध) या पुस्तकाकरता नजरबंदी शिबिरांत काय काय घडत होतं याची वृत्ते गोळा करण्यास सुरवात केली; यांपैकी काही अहवाल तर थेट या शिबिरांतूनच गुप्तपणे आणण्यात आले. हे गुप्त अहवाल सीमेपलीकडे बॅसलला नेण्याचं अत्यंत धोक्याचं काम आम्ही पत्करलं. जर या निषिद्ध कागदपत्रांसह नात्झींनी आम्हाला रंगे हात पकडलं असतं तर आम्हाला लगेच अटक करण्यात आली असती. आपल्या बांधवांना सोसाव्या लागणाऱ्‍या यातनांच्या करुण कथा वाचल्यावर मी खूप रडले. पण मला भिती वाटली नाही. यहोवा आणि माझे आईवडील, अर्थात माझे सर्वात जवळचे मित्र, माझी काळजी घेतील याविषयी मला पूर्ण भरवसा होता.

मी चौदा वर्षांची झाले तेव्हा माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि मला एका हार्डवेअरच्या दुकानात क्लर्कची नोकरी मिळाली. साहित्याची ने आण करण्याच्या आमच्या फेऱ्‍या सहसा शनिवारी रविवारी असायच्या कारण तेव्हा बाबांना रजा असायची. आम्ही साधारण दोन आठवड्यांतून एकदा जायचो. आम्हाला पाहून कोणीही असंच म्हटलं असतं की हे आठवड्याच्या सुटीनिमित्तानं बाहेर फिरायला निघालेलं कुटुंब आहे. त्यामुळे जवळजवळ चार वर्षे सीमारक्षक जवानांनी आम्हाला कधीही थांबवलं नाही किंवा आमची झडती घेतली नाही. मग, १९३८ च्या फेब्रुवारी महिन्यात जे घडू नये ते घडलं!

पकडलो गेलो!

बॅसलजवळ ज्या ठिकाणाहून आम्ही साहित्य घ्यायचो तिथं आल्यावर आमच्याकरता ठेवलेला साहित्याचा मोठा गठ्ठा पाहून, बाबांच्या चेहऱ्‍यावर जो भाव आला तो मी कधीच विसरू शकत नाही. साहित्य जर्मनीत नेणाऱ्‍या आणखी एका कुटुंबाला अटक झाल्यामुळं आम्हाला जादा पुस्तकं न्यावी लागणार होती. सीमेवरील एका जकात अधिकाऱ्‍यानं आमच्याकडे संशयानं पाहिलं आणि आमची झडती घेण्याचा हुकूम केला. पुस्तकं सापडल्यावर त्यानं बंदूकीचा धाक दाखवून आम्हाला पोलीसांच्या गाड्यांपर्यंत चालत नेलं. गाडीतून त्या अधिकाऱ्‍यांसोबत जाताना, बाबांनी माझा हात घट्ट दाबला आणि माझ्या कानात कुजबुजले: “गद्दार होऊ नकोस. कोणाचीही नावं सांगू नकोस!” “नाही सांगणार,” मी त्यांना खात्री दिली. परत लोराकला पोचल्यावर ते लोक माझ्या लाडक्या बाबांना घेऊन गेले. तुरुंगाचं दार बंद होण्याआधी मी त्यांना शेवटचं पाहिलं.

चार तासांपर्यंत गेस्टापोंच्या माणसांनी माझी चौकशी घेतली; इतर साक्षीदारांची नावे व पत्ते देण्याचा ते माझ्यावर दबाव आणू लागले. मी नकार दिला तेव्हा एक अधिकारी अतिशय संतापला आणि धमकीच्या स्वरात म्हणाला, “तुला बोलकं करण्याच्या बऱ्‍याच पद्धती आमच्याजवळ आहेत, कळलं का?” तरीसुद्धा मी काहीही सांगितलं नाही. मग त्यांनी आईला आणि मला आमच्या घरी नेलं आणि पहिल्यांदा आमच्या घराची झडती घेतली. आईला अटक करून त्यांनी मला माझ्या मावशीच्या ताब्यात दिलं. तीसुद्धा साक्षीदार होती हे त्यांना माहीत नव्हतं. मला कामाला जाण्याची मुभा होती. पण चार गेस्टापो आमच्या घरासमोर माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सतत एका गाडीत बसून असायचे आणि एक पोलीस गल्लीत पहारा द्यायचा.

काही दिवसांनंतर दुपारी जेवणाच्या सुटीत मी घराबाहेर आले तेव्हा मला एक तरुण बहीण सायकलीवर आमच्या घराकडे येताना दिसली. ती जवळ आली तेव्हा मला लक्षात आलं की ती माझ्या दिशेने एक चिट्ठी फेकणार आहे. ती चिट्ठी धरताच, गेस्टापोंनी पाहिलं की काय या भितीने मी त्यांच्याकडे पाहिलं. पण काय आश्‍चर्य, त्याच क्षणी काहीतरी विनोद झाल्यामुळे ते सर्वजण डोकी मागे घेऊन मोठमोठ्यानं हसत होते!

त्या बहिणीने लिहिलेल्या चिट्ठीत मला दुपारी तिच्या आईबाबांच्या घरी जाण्यास सांगण्यात आलं होतं. पण गेस्टापोंची नजर सतत माझ्यावर खिळलेली असताना मी तिच्या आईबाबांनाही या प्रकरणात कशी ओढू शकत होते? मी कारमध्ये बसलेल्या चार गेस्टापोंकडे आणि रस्त्यावर गस्त घालणाऱ्‍या पोलिसाकडे पाहिलं. काय करावं मला सुचत नव्हतं, म्हणून मी यहोवाला मदतीकरता कळकळीची प्रार्थना केली. अचानक, तो पोलीस गेस्टापोंच्या कारजवळ जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलला. मग तो कारमध्ये बसला आणि ते सर्वजण निघून गेले!

तेव्हाच माझी मावशी बाहेरून परत आली. दुपार होऊन गेली होती. तिने ती चिट्ठी वाचली आणि त्यात लिहिल्याप्रमाणे आम्ही त्या बांधवांच्या घरी जावं असं तिचंही मत पडलं. बांधवानी कदाचित मला स्वित्झर्लंडला नेण्याची व्यवस्था केली असावी असा तिचा अंदाज होता. आम्ही तिथं गेलो तेव्हा त्या कुटुंबाने माझी ओळख हाइनरिक राइफ नावाच्या एका माणसाशी करून दिली. मी त्याला पहिल्यांदाच पाहात होते. मी गेस्टापोंची नजर चुकवून तिथं येऊ शकले याचा त्याला आनंद वाटला. त्याने सांगितलं की तो मला स्वित्झर्लंडला पलायन करण्यास मदत करू शकतो. अर्ध्या तासानंतर मी त्याला एका जंगलाजवळ भेटावं असं त्यांने सांगितलं.

हद्दपारीत राहणं

ठरल्याप्रमाणे मी ब्रदर राइफ यांना भेटायला गेले तेव्हा माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आईबाबांना सोडून आपण दूर जाताहोत या विचाराने मी कासावीस होत होते. सगळं काही किती अचानक घडलं होतं. थोडावेळ आम्ही काहीसे चिंतातूर होतो, पण मग आम्ही पर्यटकांच्या एका घोळक्यात मिसळलो आणि अशारितीने स्वित्झर्लंडची सीमा सुखरूप पार केली.

बर्न येथील शाखा दफ्तरात मी पोचले तेव्हा मला कळलं की इथं राहणाऱ्‍या बांधवांनीच माझ्या पलायनाची व्यवस्था केली होती. त्यांनी मला राहायला जागा दिली. मी शाखा दफ्तरातल्या स्वयंपाक घरात काम करू लागले आणि या कामात मी चांगलीच रमले. पण माझ्या आईबाबांचं पुढे काय होईल हे कळायला मार्ग नव्हता; त्या दोघांनाही दोन दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यांच्या काळजीमुळे, इथे हद्दपारीत राहणं मला अगदी दुर्धर झालं होतं! कधीकधी दुःख आणि चिंता इतकी अनावर व्हायची की मी बाथरूममध्ये स्वतःला कोंडून मनसोक्‍त रडून घेई. पण नंतर मला नियमितपणे आईबाबांशी पत्रव्यवहार करणं शक्य झालं आणि त्यांनी मला सतत, एकनिष्ठ राहण्याचं प्रोत्साहन दिलं.

माझ्या आईबाबांच्या विश्‍वासू उदाहरणाने प्रेरित होऊन मी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आणि जुलै २५, १९३८ रोजी माझा बाप्तिस्मा झाला. एक वर्ष बेथेलमध्ये राहिल्यानंतर, मी शानेला इथं काम करू लागले. बेथेल कुटुंबाकरता भाज्या, फळे इत्यादी पुरवण्याकरता आणि छळापासून पलायन केलेल्या बांधवांच्या मुक्कामाची सोय करण्याकरता स्वित्झर्लंडच्या शाखा दफ्तराने या ठिकाणी एक फार्म विकत घेतला होता.

१९४० साली आईबाबांच्या कारावासाचा अवधी संपला तेव्हा त्यांना आपला विश्‍वास नाकारून स्वतंत्र होण्याचं सुचवण्यात आलं. त्यांनी हा प्रस्ताव नाकारला तेव्हा त्यांची छळ छावण्यांत रवानगी करण्यात आली. बाबांना डाकाऊ आणि आईला रावेन्सब्रुक इथं पाठवण्यात आले. १९४१ सालच्या हिवाळ्यात, माझ्या आईने व त्या छावणीत राहणाऱ्‍या इतर साक्षीदार बहिणींनी सैन्याकरता काम करण्यास नकार दिला. शिक्षा म्हणून, त्यांना ३ दिवस व ३ रात्री बाहेर थंडीत उभं राहायला लावण्यात आलं. त्यानंतर त्यांना अंधार कोठड्यांमध्ये कोंडून ४० दिवसांपर्यंत अगदी थोडं अन्‍न देऊन त्यांची उपासमार करण्यात आली. मग त्यांना फटके मारण्यात आले. अशाच अमानुष मारहाणीनंतर, जानेवारी ३१, १९४२ रोजी माझी आई दगावली.

बाबांना डाकाऊमधून ऑस्ट्रिया येथील मावथाऊसन इथं पाठवण्यात आलं. या छावणीत नात्झी अधिकारी, कैद्यांची उपासमार करून आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने ढोरमेहनत करवून घेऊन त्यांची पद्धतशीरपणे हत्या करीत होते. पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी नात्झींनी माझ्या बाबांची एका वेगळ्या पद्धतीने हत्या केली—त्यांच्यावर वैद्यकीय प्रयोग करून. छावणीतल्या डॉक्टरांनी मनुष्यांवर प्रयोग करण्यासाठी मुद्दामहून त्यांच्या शरीरात क्षयरोगाचे (टी.बी.) जंतू टोचले. मग, या कैद्यांच्या हृदयात एक प्राणघातक इंजेक्शन टोचण्यात आलं. अधिकृत वृत्तानुसार, माझ्या बाबांचा मृत्यू “हृदयाचे स्नायू कमजोर” झाल्यामुळे घडला. ते ४३ वर्षांचे होते. त्यांना क्रूर पद्धतीने मारण्यात आलं हे काही महिन्यांनंतरच मला कळलं. माझ्या प्रिय आईबाबांच्या आठवणीने आजही माझ्या डोळ्यात अश्रू येतात. पण तेव्हा आणि आजही मला याच जाणिवेने सांत्वन मिळते की माझे आई व बाबा यहोवाच्या पंखांखाली सुखरूप आहेत; त्या दोघांनाही स्वर्गीय जीवनाची आशा होती.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर, मला न्यू यॉर्क इथं वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ११ व्या वर्गाला उपस्थित राहण्याची सुसंधी मिळाली. पाच महिने पूर्णपणे बायबलच्या अभ्यासात गढून जाणं किती आनंददायक होतं! प्रशालेतून पदवीधर झाल्यावर १९४८ साली मला स्वित्झर्लंड इथं मिशनरी सेवेकरता पाठवण्यात आलं. याच्या काही काळानंतरच माझी भेट जेम्स. एल. टर्पिन यांच्याशी झाली. ते गिलियड प्रशालेच्या पाचव्या वर्गातून पदवीधर झाले होते आणि विश्‍वासूपणे सेवा करत होते. टर्की इथं पहिले शाखा दफ्तर स्थापन करण्यात आलं तेव्हा त्यांनी तिथं पर्यवेक्षक म्हणून सेवा केली होती. १९५१ सालच्या मार्च महिन्यात आमचं लग्न झालं आणि काही काळानंतरच आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार असल्याची आम्हाला चाहूल लागली! आम्ही संयुक्‍त संस्थानांत राहायला गेलो आणि त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात आमच्या लाडक्या मुलीचा, मार्लीनचा जन्म झाला.

आतापर्यंत अनेक वर्षे जिम व मी अतिशय आनंदानं राज्य सेवा केली आहे. मला माझी एक बायबल विद्यार्थिनी आठवते. तिचे नाव पेनी. ती एक तरुण चिनी मुलगी होती आणि तिला बायबलचा अभ्यास करण्यास अतिशय आनंद वाटे. तिचा बाप्तिस्मा झाला आणि नंतर तिचं लग्न गाय पिअर्स यांच्याशी झालं, जे आता यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात सेवा करत आहेत. माझ्या आईवडिलांना गमावल्याचं दुःख अशा प्रेमळ बायबल विद्यार्थ्यांमुळे सुसह्‍य झालं आहे.

२००४ सालच्या सुरवातीला, आईबाबांचं मूळ गाव लोराक, येथील बांधवांनी श्‍टीक स्ट्रीट नावाच्या रस्त्यावर एक नवं राज्य सभागृह बांधलं. यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला आपली मान्यता दर्शवण्याकरता नगर पालिकेने या रस्त्याचं नाव बदलून माझ्या आईबाबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डेन्झश्‍ट्रासा (डेन्ट्‌स मार्ग) असं ठेवण्याचं ठरवलं. बाडीशा सायटुंग या स्थानिक दैनिकाने “हत्या करण्यात आलेल्या डेन्ट्‌स दंपत्तीच्या स्मृतीप्रीत्यर्थ: रस्त्याचं नामकरण,” या ठळक मथळ्याखाली असं म्हटलं की माझ्या आईबाबांची “तिसऱ्‍या राईखदरम्यान एका छळ छावणीत त्यांच्या विश्‍वासामुळे हत्या करण्यात आली.” नगर पालिकेचं हे कृत्य माझ्याकरता अगदीच अनपेक्षित होतं पण ते माझ्या मनाला स्पर्शून गेलं.

बाबा नेहमी म्हणायचे की आपल्या योजना अशा असाव्यात की जणू काही हर्मगिदोन आपल्या आयुष्यात येणार नाही, पण आपण जीवन अशाप्रकारे जगावं की जणू काही ते उद्याच येणार आहे. त्यांच्या या मोलाच्या सल्ल्याचं पालन करण्याचा मी आजपर्यंत सतत प्रयत्न केला आहे. एकीकडे धीर धरणे आणि दुसरीकडे उत्सुकपणे वाट पाहणं तसं सोपं नाही; खासकरून आता म्हातारपणामुळे मला घराबाहेर पडता येत नाही, त्यामुळे कधीकधी जड जातं. पण यहोवाने त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांना दिलेल्या या आश्‍वासनावर मी आजपर्यंत कधीही शंका घेतली नाही: “आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, . . . आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.

[२९ पानांवरील चौकट/चित्र]

गतकाळातील सुवर्णाक्षरे

एकोणीसशे ऐंशीच्या दशकात, जवळच्याच गावातून एक स्त्री लोराक इथं आली. त्यावेळी, गावातले लोक नको असलेल्या आपल्या काही वस्तू एका सार्वजनिक ठिकाणी आणून ठेवत होते आणि लोक या वस्तू पाहून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू घेऊ शकत होते. या स्त्रीला त्या वस्तूंमध्ये शिवणकामाला लागणाऱ्‍या वस्तूंचा एक डबा दिसला आणि तिने तो घरी आणला. नंतर तिला या डब्ब्याच्या खाली एका लहान मुलीचे फोटो आणि छळ छावणीच्या कागदांवर लिहिलेली पत्रं सापडली. पत्रं पाहून त्या स्त्रीला आश्‍चर्य वाटलं आणि वेण्या घातलेली ही लहानशी मुलगी कोण असावी असा ती विचार करू लागली.

एके दिवशी, २००० साली या स्त्रीने लोराकमध्ये भरवण्यात आलेल्या एका ऐतिहासिक प्रदर्शनाविषयी वृत्तपत्रात एक लेख वाचला. या लेखात नात्झी युगात यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासाविषयी वर्णन होते आणि त्यात आमच्या कुटुंबाबद्दलही माहिती होती. मी तेरा-चौदा वर्षांची असतानाचे माझे काही फोटो देखील होते. लेखातली माहिती आणि आपल्याजवळ असलेल्या फोटोंत साम्य असल्याचं पाहून त्या स्त्रीने लेख लिहिणाऱ्‍या महिला पत्रकाराशी संपर्क साधून तिला त्या पत्रांविषयी सांगितलं—तिच्याजवळ एकूण ४२ पत्रं होती! एखाद दोन आठवड्यांनंतर ती पत्रं माझ्या हातात आली. खुद्द आईबाबांच्या अक्षरांत, त्यांनी माझ्या मावशीकडे माझ्याबद्दल सतत केलेली विचारपूस मी प्रत्यक्ष वाचू शकत होते. शेवटपर्यंत त्यांना माझ्याबद्दल खूप काळजी होती. तब्बल ६० वर्षांपर्यंत ती पत्रं टिकली आणि उजेडात आली हा खरोखर एक चमत्कार आहे!

[२५ पानांवरील चित्रे]

हिटलर सत्तेवर आला आणि आमच्या आनंदी कुटुंबाच्या चिंध्या झाल्या

[चित्राचे श्रेय]

हिटलर: U.S. Army photo

[२६ पानांवरील चित्रे]

१. मॅग्डेबर्ग ऑफिस

२. गेस्टापोंनी हजारो साक्षीदारांना अटक केली

[२८ पानांवरील चित्र]

जिम व मी अतिशय आनंदानं राज्य सेवा केली आहे