व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने थोमाला आपल्याला स्पर्श करून पाहण्यास सांगितले, पण आधी त्याने मग्दालीया मरीया हिला असे करू दिले नव्हते, असे का?

बायबलची काही जुनी भाषांतरे असे सुचवतात की येशूने मग्दालीया मरीया हिला आपल्याला स्पर्श करू दिला नाही. उदाहरणार्थ, किंग जेम्स व्हर्शन यात येशूच्या शब्दांचे अशाप्रकारे भाषांतर केले आहे: “मला शिवू नकोस; कारण अद्याप मी पित्याजवळ वर गेलो नाही.” (योहान २०:१७) याठिकाणी वापरलेल्या मूळ ग्रीक क्रियापदाचे भाषांतर सहसा “स्पर्श करणे” असे केले जाते. पण त्याचा अर्थ “बिलगणे, चिकटून राहणे, धरणे, कवटाळणे, चाचपडून पाहणे” असाही होतो. येशू मग्दालीया मरीया हिला केवळ आपल्याला स्पर्श करण्यास मनाई करत नव्हता हे तर्कसंगत आहे कारण जेव्हा त्याच्या कबरेवर आलेल्या इतर स्त्रियांनी त्याचे ‘चरण धरले’ तेव्हा त्याने हरकत घेतली नाही.—मत्तय २८:९.

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स, द न्यू जेरूसलेम बायबल, आणि द न्यू इंग्लिश बायबल यांसारखी अनेक आधुनिक भाषेतील भाषांतरे आपल्याला येशूच्या शब्दांचा खरा अर्थ समजण्यास मदत करतात कारण त्यांत सदर वचनाचे भाषांतर अशाप्रकारे केले आहे: “मला बिलगू नकोस.” मग्दालीया मरीया ही येशूच्या चांगल्या परिचयाची होती, मग तो तिला असे का म्हणाला?—लूक ८:१-३.

मग्दालीया मरीया हिला अशी भीती वाटत होती की येशू आता लगेच त्यांना सोडून स्वर्गात जाणार आहे. आपल्या प्रभूसोबत असण्याच्या तीव्र इच्छेमुळे ती येशूला बिलगत होती आणि त्याला सोडायला तयार नव्हती. आपण इतक्यात जाणार नाही असे आश्‍वासन देण्याकरता येशूने मरीयेला म्हटले की तिने त्याला बिलगू नये, तर जाऊन इतर शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाविषयी सांगावे.—योहान २०:१७.

पण येशू आणि थोमा यांच्यात झालेले संभाषण वेगळ्या स्वरूपाचे होते. येशू काही शिष्यांसमोर प्रकट झाला तेव्हा थोमा तेथे नव्हता. नंतर, थोमाने येशूच्या पुनरुत्थानाविषयी शंका व्यक्‍त केली; येशूच्या हातात ठोकलेल्या खिळ्यांचे वण जोपर्यंत आपण पाहात नाही आणि त्याच्या कुशीत खुपसलेल्या भाल्याच्या वणाला जोपर्यंत आपण हात लावून पाहात नाही तोपर्यंत आपण त्याचे पुनरुत्थान झाले आहे यावर विश्‍वास ठेवणार नाही असे थोमा म्हणाला. आठ दिवसांनंतर येशू पुन्हा शिष्यांसमोर प्रकट झाला. यावेळी, थोमा तेथे होता, त्यामुळे येशूने त्याला आपल्या वणांना हात लावून पाहण्यास सांगितले.—योहान २०:२४-२७.

तर, मग्दालीया मरीया हिच्या बाबतीत, येशू आपल्याला सोडून जाणार असा गैरसमज झाल्यामुळे ती त्याला सोडायला तयार नव्हती; आणि म्हणून येशूने तिला आपल्याला धरू नकोस असे म्हटले. तर थोमाच्या बाबतीत त्याच्या मनात शंका असल्यामुळे येशू त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होता. दोन्ही प्रसंगी, येशूच्या विशिष्टप्रकारे वागण्यामागे काहीतरी कारण होते.