व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाची मदत स्वीकारता का?

तुम्ही यहोवाची मदत स्वीकारता का?

तुम्ही यहोवाची मदत स्वीकारता का?

“प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही.”इब्री लोकांस १३:६.

१, २. आपल्या जीवनात यहोवाची मदत व मार्गदर्शन स्वीकारणे का महत्त्वाचे आहे?

डोंगरावरील एका पायवाटेवरून तुम्ही चालत आहात अशी कल्पना करा. पण तुम्ही एकटे नाही कारण एक मार्गदर्शक तुमच्यासोबत यायला तयार झाला आहे. आणि हा मार्गदर्शक सर्वात चांगला म्हणून ओळखला जातो. त्याला तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त अनुभव आणि जोम आहे, पण तरीसुद्धा तो पुढे न जाता तुमच्यासोबत चालत राहतो. अधूनमधून तुमचा तोल जातो हे त्याच्या लक्षात येते. त्यामुळे, एका विशेषतः धोकेदायक खड्ड्याजवळ तुम्ही येता, तेव्हा तुमच्या सुरक्षेच्या काळजीमुळे तो तुम्हाला मदत करायला हात पुढे करतो. तुम्ही त्याच्या मदतीला नकार द्याल का? निश्‍चितच नाही! शेवटी, तुमच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे.

आपण ख्रिस्ती देखील एका कठीण मार्गावर वाटचाल करत आहोत. पण या अरुंद वाटेवर आपल्याला एकट्यानेच चालायचे आहे का? (मत्तय ७:१४) नाही, कारण बायबल सांगते की सर्वात उत्तम मार्गदर्शक, अर्थात यहोवा देव मानवांना आपल्यासोबत चालण्यास अनुमती देतो. (उत्पत्ति ५:२४; ६:९) वाटेत आपल्या सेवकांना यहोवा मदत करतो का? तो म्हणतो: “मी परमेश्‍वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.” (यशया ४१:१३) वरील दृष्टान्तातल्या मार्गदर्शकाप्रमाणे, यहोवा अशा सर्व लोकांना मदतीचा व मैत्रीचा हात पुढे करतो जे त्याच्यासोबत चालू इच्छितात. निश्‍चितच आपल्यापैकी कोणीही ही मदत नाकारू इच्छित नाही!

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

याआधीच्या लेखात आपण अशा चार मार्गांविषयी चर्चा केली की ज्यांद्वारे यहोवाने प्राचीन काळातील आपल्या लोकांना साहाय्य पुरवले. आजही तो त्याच मार्गांनी आपल्या लोकांना मदत करतो का? आणि आपण त्याच्या कोणत्याही मदतीचा स्वीकार करत आहोत याची खात्री आपण कशी करू शकतो? हे प्रश्‍न आता आपण विचारात घेऊ या. असे केल्याने, यहोवा खरोखरच आपला साहाय्यकर्ता आहे याविषयी आपला आत्मविश्‍वास वाढेल.—इब्री लोकांस १३:६.

देवदूतांकडून साहाय्य

४. आजच्या काळात देवाचे सेवक देवदूतांच्या साहाय्याविषयी आत्मविश्‍वास का बाळगू शकतात?

आजच्या काळात देवदूत यहोवाच्या सेवकांना साहाय्य करतात का? हो, करतात. अर्थात, आज खऱ्‍या उपासकांना संकटांतून सोडवण्याकरता ते दृश्‍य रूपात प्रकट होत नाहीत. बायबल काळांतही, देवदूतांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन मदत करण्याच्या घटना तशा क्वचितच घडल्या. सहसा त्यांनी अदृश्‍य रूपातच राहून मानवांना मदत केली आणि आजही असेच घडते. तरीसुद्धा, आपल्याला साहाय्य करण्याकरता देवदूत तयार आहेत याची जाणीव असलेल्या देवाच्या सेवकांना यामुळे अतिशय प्रोत्साहन मिळाले. (२ राजे ६:१४-१७) आपणही ते अनुभवू शकतो.

५. आज प्रचार कार्यात देवदूत सामील आहेत हे बायबल कशाप्रकारे दाखवते?

आपण ज्याच्यात सामील आहोत अशा एका खास कार्याबद्दल यहोवाचे देवदूत देखील विशेष स्वारस्य बाळगतात. हे कार्य कोणते आहे? याचे उत्तर आपल्याला प्रकटीकरण १४:६ येथे सापडते: “मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” ही “सार्वकालिक सुवार्ता” स्पष्टपणे ‘राज्याच्या सुवार्तेशी’ संबंधित आहे; येशूने भाकीत केल्याप्रमाणे या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४) अर्थात देवदूत लोकांना प्रत्यक्ष प्रचार करत नाहीत. येशूने ही महत्त्वाची जबाबदारी मानवांना सोपवली आहे. (मत्तय २८:१९, २०) या आज्ञेचे पालन करत असताना, आपल्याला बुद्धिमान व शक्‍तिशाली आत्मिक प्राणी, अर्थात पवित्र देवदूत मदत करतात ही जाणीव दिलासा देणारी नाही का?

६, ७. (अ) प्रचार कार्यात देवदूत साहाय्य करत आहेत हे कशावरून दिसून येते? (ब) यहोवाच्या देवदूतांचा आधार मिळावा म्हणून आपण काय केले पाहिजे?

आपल्या कार्यात देवदूत साहाय्य करतात हे शाबीत करणारा भरपूर पुरावा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, बरेचदा आपण ऐकतो, की कशाप्रकारे सेवाकार्य करत असताना यहोवाच्या साक्षीदारांना अशी व्यक्‍ती भेटते, जिने अलीकडेच, सत्य सापडण्यास आपल्याला मदत करावी अशी देवाकडे प्रार्थना केली होती. असे अनुभव इतक्यांदा घडतात की त्यांना निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. देवदूतांच्या मदतीमुळेच आज अधिकाधिक लोक, ‘अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्‍या’ देवदूताच्या घोषणेनुसार, ‘देवाची भीती बाळगण्यास व त्याचे गौरव करण्यास’ शिकत आहेत.—प्रकटीकरण १४:७.

यहोवाच्या शक्‍तिशाली देवदूतांनी आपल्यालाही साहाय्य करावे असे तुम्हाला मनापासून वाटते का? मग सेवाकार्यात गढून जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. (१ करिंथकर १५:५८) यहोवाकडून मिळालेल्या या खास नेमणुकीत आपण उत्साहाने सहभाग घेतल्यास, त्याचे देवदूत आपल्याला अवश्‍य मदत करतील अशी खात्री आपण बाळगू शकतो.

आद्य देवदूताकडून साहाय्य

८. येशूला स्वर्गात कोणते वैभवशाली स्थान आहे आणि हे जाणून आपल्याला दिलासा का मिळतो?

यहोवा आणखी एक प्रकारे देवदूतांकडून आपल्याला साहाय्य पुरवतो. प्रकटीकरण १०:१ यात एका असाधारण ‘बलवान देवदूताचे’ वर्णन केले आहे; त्याचे ‘तोंड सूर्यासारखे होते.’ दृष्टान्तात दिसलेला हा देवदूत स्पष्टपणे, स्वर्गीय सत्ता प्राप्त झालेल्या गौरवी येशू ख्रिस्ताला सूचित करतो. (प्रकटीकरण १:१३, १६) येशू खरोखरच एक देवदूत आहे का? एका अर्थाने, असे म्हणता येते कारण तो आद्यदिव्यदूत आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१६) आद्यदिव्यदूत या शब्दाचा काय अर्थ होतो? या शब्दाचा अर्थ “मुख्य देवदूत” किंवा “प्रमुख देवदूत” असा होतो. येशू हा यहोवाच्या आत्मिक पुत्रांपैकी सर्वात शक्‍तिशाली आहे. यहोवाने त्याला आपल्या सर्व देवदूतांच्या सैन्यावर अधिपती नेमले आहे. हा आद्यदेवदूत खरोखर अतिशय शक्‍तिशाली रितीने आपले साहाय्य करतो. कोणकोणत्या मार्गांनी आपल्याला त्याची मदत लाभते?

९, १०. (अ) आपल्या हातून पाप घडते तेव्हा येशू कशाप्रकारे आपला “कैवारी” होतो? (ब) येशूच्या उदाहरणामुळे आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते?

वृद्ध प्रेषित योहान लिहितो: “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.” (१ योहान २:१) खासकरून आपण ‘पाप करतो’ तेव्हा येशू आपला “कैवारी” होतो असे योहानाने का सुचवले? दररोज अनेकदा आपल्या हातून पाप घडते आणि पापाचा परिणाम हा मृत्यू आहे. (उपदेशक ७:२०; रोमकर ६:२३) पण येशूने आपल्या पापांकरता त्याचे जीवन अर्पण केले. आणि तो आपल्या दयाळू पित्याजवळ आपल्या वतीने याचना करतो. आपल्यापैकी प्रत्येकालाच या मदतीची गरज आहे. ही मदत आपण कशी स्वीकारू शकतो? आपण आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून येशूच्या बलिदानाच्या आधारावर क्षमा मागितली पाहिजे. तसेच पुन्हा ते पाप न करण्याची आपण काळजी घेतली पाहिजे.

१० आपल्याकरता बलिदान देण्याव्यतिरिक्‍त येशूने आपल्यासमोर एक परिपूर्ण आदर्श ठेवला आहे. (१ पेत्र २:२१) त्याचे उदाहरण आपल्याला योग्य मार्गाने वाटचाल करण्यास मदत करते, जेणेकरून आपण गंभीर पाप करण्याचे टाळून यहोवा देवाला नेहमी संतुष्ट करू शकतो. या मदतीबद्दल आपण कृतज्ञ नाही का? येशूने आपल्या अनुयायांना आणखी एक कैवारी पुरवला जाण्याविषयी सांगितले.

पवित्र आत्म्याचे साहाय्य

११, १२. यहोवाचा आत्मा काय आहे, तो किती शक्‍तिशाली आहे आणि आज आपल्याला त्याची गरज का आहे?

११ येशूने आश्‍वासन दिले: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही.” (योहान १४:१६, १७) “सत्याचा आत्मा” किंवा “पवित्र आत्मा” व्यक्‍ती नसून, एक शक्‍ती—यहोवाची कार्यकारी शक्‍ती आहे. ती सामर्थशाली असून तिला सीमा नाहीत. याच शक्‍तीचा उपयोग करून यहोवाने या विश्‍वाची निर्मिती केली, आश्‍चर्यकारक चमत्कार घडवून आणले आणि दृष्टान्तांकरवी आपली इच्छा प्रकट केली. यहोवा आज या मार्गांनी त्याच्या पवित्र आत्म्याचा उपयोग करत नाही, मग याचा अर्थ आपल्याला आज त्याची गरज नाही असे म्हणता येते का?

१२ मुळीच नाही! उलट, या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ आपल्याला यहोवाच्या आत्म्याची कधी नव्हे इतकी आज गरज आहे. (२ तीमथ्य ३:१) त्याचा आत्मा आपल्याला परीक्षांना तोंड देताना विश्‍वासात टिकून राहण्याचे सामर्थ्य देतो. तो आपल्याला अनेक प्रशंसनीय गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात उत्पन्‍न करण्यास व त्याच्या तसेच आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींच्या जवळ येण्यास मदत करतो. (गलतीकर ५:२२, २३) मग आपण यहोवाकडून मिळणाऱ्‍या या अद्‌भूत मदतीपासून फायदा कसा मिळवू शकतो?

१३, १४. (अ) यहोवा आपल्या लोकांना खुशीने पवित्र आत्मा पुरवतो याची आपण खात्री का बाळगू शकतो? (ब) पवित्र आत्म्याची देणगी आपण स्वीकारली नाही हे कशाप्रकारच्या कृतीवरून दिसून येते?

१३ सर्वप्रथम आपण पवित्र आत्म्याकरता प्रार्थना केली पाहिजे. येशूने म्हटले: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१३) हो, यहोवा सर्वात उत्तम पिता आहे. जर आपण प्रामाणिकपणे त्याच्या पवित्र आत्म्याकरता विनंती केली तर तो निश्‍चितच आपली निराशा करणार नाही. पण प्रश्‍न हा आहे, की आपण त्याकरता विनंती करतो का? दररोज आपल्या प्रार्थनांत आपण पवित्र आत्म्याकरता विनंती केली पाहिजे.

१४ दुसरी गोष्ट म्हणजे, आपण पवित्र आत्म्याच्या सामंजस्यात कार्य करण्याद्वारे या देणगीचा स्वीकार केला पाहिजे. उदाहरणार्थ: एखाद्या ख्रिस्ती पुरुषाला अश्‍लील चित्रे पाहण्याची सवय जडली आहे आणि तिच्यावर मात करण्याचा तो प्रयत्न करत आहे असे समजा. या अशुद्ध प्रवृत्तीवर मात करण्याकरता त्याने पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता प्रार्थना देखील केली आहे. त्याने ख्रिस्ती वडिलांकडे मदतीची विनंती केली आहे आणि त्यांनी त्याला निश्‍चित पावले उचलण्याचा, म्हणजे अशा वाईट साहित्याच्या जवळही न जाण्याचा सल्ला दिला आहे. (मत्तय ५:२९) पण समजा जर त्याने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा मोहात पडून असे साहित्य तो पाहात राहिला तर काय म्हणता येईल? पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता त्याने केलेल्या प्रार्थनेनुसार तो कार्य करत आहे असे म्हणता येईल का? की त्याउलट, देवाच्या आत्म्याला खिन्‍न करून तो ही देणगी पूर्णपणे गमावून बसण्याचा धोका पत्करत आहे? (इफिसकर ४:३०) खरोखर, यहोवाकडील ही अद्‌भूत मदत मिळण्यास आपण कोणत्याही प्रकारे अयोग्य ठरू नये, म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

देवाच्या वचनातून साहाय्य

१५. आपण बायबलला एक सर्वसामान्य पुस्तक समजत नाही हे कसे दाखवू शकतो?

१५ शतकानुशतके यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनी बायबलमधून बळ मिळवले आहे. पण आपण पवित्र शास्त्रवचनांना एक सर्वसामान्य पुस्तक म्हणून पाहू लागण्याची चूक न करता ही शास्त्रवचने किती शक्‍तिशाली आहेत याचा कधीही स्वतःला विसर पडू देऊ नये. बायबलमधून मिळणारे साहाय्य स्वीकारण्याकरता प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपण नियमितपणे बायबल वाचण्याची सवय लावली पाहिजे.

१६, १७. (अ) स्तोत्र १:२, ३ यात देवाचे नियमशास्त्र वाचल्यामुळे होणाऱ्‍या चांगल्या परिणामांचे कशाप्रकारे वर्णन करण्यात आले आहे? (ब) स्तोत्र १:३ यात कठीण परिश्रम करण्याविषयी कशाप्रकारे सुचवण्यात आले आहे?

१६ देवाची संमती ज्याला प्राप्त होते अशा मनुष्याबद्दल स्तोत्र १:२, ३ म्हणते: “[जो] परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” या उताऱ्‍यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला का? ही वचने वाचून, यांत एका शांत ठिकाणाचे—पाण्याच्या प्रवाहाजवळ वाढणाऱ्‍या एका हिरव्यागार वृक्षाचे शब्दचित्र रेखाटले आहे असा काहीजण निष्कर्ष काढतील. दुपारच्या वेळी अशा शांत ठिकाणी झोप घ्यायला मिळाली तर! पण हे स्तोत्र आपल्याला झोप घेण्याविषयी विचार करण्याचे प्रोत्साहन देत नाही. उलट ते एक अतिशय वेगळे चित्र, कठीण परिश्रमाचे चित्र उभे करते. ते कसे?

१७ हा सावली देणारा वृक्ष आपोआप पाण्याच्या प्रवाहांजवळ उगवलेला नाही. तर तो एक फलदायी वृक्ष आहे व त्याला या खास ठिकाणी—“पाण्याच्या प्रवाहाजवळ” मुद्दामहून “लाविलेले असते.” फळझाडांच्या मळ्यात, मळ्याचा मालक पाण्याचे पाट काढून आपल्या बहुमोल वृक्षांच्या मुळांपर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था करू शकत होता. झाला ना आता मुद्दा स्पष्ट! आध्यात्मिक अर्थाने, जर आपण त्या झाडासारखे बहरत असू, तर याचा अर्थ आपल्याकरता कोणीतरी बरीच मेहनत घेतली आहे. आपण अशा एका संस्थेचे सदस्य आहोत की जी सत्याचे पाणी थेट आपल्यापर्यंत आणून देते; पण आपणही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. हे जीवनदायक पाणी शोषून घेण्याकरता आपण मनन व संशोधन केले पाहिजे जेणेकरून देवाच्या वचनातील सत्ये आपल्या मनापर्यंत व अंतःकरणापर्यंत पोचतील. असे केल्यास आपणही उत्तम फळ देऊ.

१८. आपल्या प्रश्‍नांची बायबलमधून उत्तरे शोधण्याकरता आपल्याला काय करावे लागेल?

१८ बायबल केवळ कपाटात बंद करून ठेवले तर त्याचा आपल्याला काहीएक उपयोग होणार नाही. ते एक चमत्कारिक पुस्तक नाही—जणू काय, आपण डोळे बंद करून ते उघडले तर जे पान उघडेल त्या पानावर आपल्या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला मिळेल. आपल्याला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा, आपण ‘देवाच्या ज्ञानाचा’ अशाप्रकारे शोध घ्यावा की जणू तो एक लपवून ठेवलेला खजिना आहे. (नीतिसूत्रे २:१-५) आपल्या खास परिस्थितीकरता उपयुक्‍त असणारा शास्त्रवचनीय सल्ला शोधून काढण्याकरता सहसा परिश्रमपूर्वक व काळजीपूर्वक संशोधन करावे लागेल. आणि हे संशोधन करण्याकरता आपल्याजवळ अनेक सहायक बायबल आधारित प्रकाशने आहेत. देवाच्या वचनातील रत्ने शोधून काढण्याकरता आपण या अवजारांचा उपयोग करतो तेव्हा खरोखर आपण यहोवाकडून मिळणारे साहाय्य स्वीकारत आहोत असे म्हणता येईल.

सहविश्‍वासू बांधवांच्या माध्यमाने साहाय्य

१९. (अ) टेहळणी बुरूज अथवा सावध राहा! यातील लेख सहविश्‍वासू बांधवांच्या माध्यमाने पुरवलेली मदत आहे असे का म्हणता येते? (ब) आपल्या नियतकालिकांमधील एखादा विशिष्ट लेख कशाप्रकारे तुमच्या उपयोगी पडला?

१९ यहोवाच्या मानवी सेवकांनी नेहमीच एकमेकांना साहाय्य केले आहे. या बाबतीत यहोवा बदलला आहे का? निश्‍चितच नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण असे प्रसंग आठवू शकतो की जेव्हा आपल्याला आपल्या सहविश्‍वासू बांधवांकडून अगदी योग्य वेळी मदत मिळाली. उदाहरणार्थ, तुम्हाला सांत्वनाची गरज होती तेव्हा, किंवा एखादी समस्या सोडवण्याकरता किंवा तुमच्या विश्‍वासाची परीक्षा होत असताना, टेहळणी बुरूज अथवा सावध राहा! यातील एखादा लेख तुमच्याकरता अगदी उपयुक्‍त ठरल्याचे तुम्हाला आठवते का? हे साहाय्य “यथाकाळी खावयास” पुरवण्याकरता नेमण्यात आलेल्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने यहोवाने तुम्हाला पुरवले.—मत्तय २४:४५-४७.

२०. ख्रिस्ती वडील कोणत्या मार्गांनी आपण ‘मानवरूपी देणग्या’ असल्याचे दाखवतात?

२० पण सहसा आपल्याला सहविश्‍वासू बांधवांकडून अगदी प्रत्यक्षरित्या साहाय्य मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या ख्रिस्ती वडिलांनी दिलेल्या एखाद्या भाषणाचा आपल्या मनावर विशेष प्रभाव पडतो; किंवा त्यांनी दिलेल्या मेंढपाळ भेटीमुळे आपल्याला एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्य मिळते; किंवा आपल्या एखाद्या दोषाची आपल्याला जाणीव करून देऊन त्यावर मात करण्याकरता ते आपल्याला प्रेमळ सल्ला देतात. वडिलांनी दिलेल्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्‍त करणाऱ्‍या एका ख्रिस्ती बहिणीने असे लिहिले: “सेवाकार्य करत असताना त्यांनी मला माझ्या मनातले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन दिले. आदल्या रात्रीच मी यहोवाला प्रार्थना केली होती की त्याने कोणालातरी पाठवावे की ज्याच्याजवळ मी आपल्या मनातले बोलू शकेन. दुसऱ्‍या दिवशी हे बंधू माझ्याशी अतिशय सहानुभूतीशीलपणे बोलले. यहोवाने अनेक वर्षांपासून कशाप्रकारे माझी काळजी घेतली आहे याची त्यांनी मला आठवण करून दिली. यहोवाने या वडिलांना माझ्याजवळ पाठवले याबद्दल मी यहोवाचे आभार मानते.” या सर्व मार्गांनी ख्रिस्ती वडील दाखवतात की ते खरोखर यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे पुरवलेल्या ‘मानवरूपी देणग्या’ आहेत, जेणेकरून जीवनाच्या मार्गावर आपल्याला धीराने चालत राहण्याकरता साहाय्य मिळावे.—इफिसकर ४:८, NW.

२१, २२. (अ) मंडळीचे सदस्य फिलिप्पैकर २:४ यातील सल्ल्याचे पालन करतात तेव्हा कोणता परिणाम घडून येतो? (ब) दयाळूपणाच्या साध्याशा कृती देखील मोलाच्या का असतात?

२१ केवळ वडिलांनाच नाही, तर प्रत्येक विश्‍वासू ख्रिस्ती व्यक्‍तीला, “आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा,” या प्रेरित सल्ल्यानुसार वागण्याची इच्छा आहे. (फिलिप्पैकर २:४) ख्रिस्ती मंडळीचे सदस्य या सल्ल्याचे पालन करतात तेव्हा दयाळूपणाची सुंदर कृत्ये घडताना पाहायला मिळते. उदाहरणार्थ, एका कुटुंबावर अचानक संकट कोसळले. एक पिता आपल्या लहान मुलीसोबत दुकानातून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला दुर्घटना झाली. मुलीचा मृत्यू झाला आणि पिता गंभीररित्या जखमी झाले. इस्पितळातून घरी आल्यावर सुरुवातीला त्यांची अशी स्थिती होती की ते स्वतःची कोणतीच कामे करू शकत नव्हते. त्यांची पत्नी भावनिकरित्या इतकी भेदरलेली होती की तीसुद्धा एकट्याने त्यांची काळजी घेण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे मंडळीतल्या एका जोडप्याने दुःखात बुडालेल्या या दांपत्याला आपल्या घरी आणले आणि कित्येक आठवड्यांपर्यंत त्यांची काळजी घेतली.

२२ अर्थात दयाळूपणाचे प्रत्येक कृत्य इतक्या टोकाच्या परिस्थितीत घडत नाही व प्रत्येकच वेळी इतका वैयक्‍तिक त्याग करण्याची गरज उद्‌भवत नाही. आपल्याला कधीकधी अगदी साध्याशा कृतीतून दयाळूपणा अनुभवायला मिळतो. पण कृती कितीही साधी असली तरी आपल्याकरता ती मोलाची असते, नाही का? एखाद्या भावाच्या अथवा बहिणीच्या दयाळू शब्दातून किंवा विचारशील कृतीतून तुम्हाला अगदी योग्य वेळी मदत मिळाल्याचे प्रसंग तुम्हाला आठवतात का? कित्येकदा यहोवा अशा मार्गांनी आपली काळजी वाहतो.—नीतिसूत्रे १७:१७; १८:२४.

२३. आपण एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यहोवाचा याविषयी काय दृष्टिकोन असतो?

२३ इतरांना साहाय्य पुरवण्याकरता यहोवाने तुमचा उपयोग करावा अशी तुमची इच्छा आहे का? ही सुसंधी तुम्हाला अवश्‍य मिळू शकते. किंबहुना, या दिशेने तुम्ही केलेल्या प्रयत्नांची यहोवा कदर करतो. त्याचे वचन आपल्याला सांगते: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” (नीतिसूत्रे १९:१७) आपल्या बंधूभगिनींसाठी आत्मत्याग करणे हा अतिशय आनंददायक अनुभव आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) जे मुद्दामहून इतरांपासून फटकून राहतात त्यांना इतरांना मदत करण्याचा आनंदही मिळत नाही आणि इतरांच्या साहाय्यामुळे मिळणारे प्रोत्साहनही अनुभवता येत नाही. (नीतिसूत्रे १८:१) तेव्हा, आपण विश्‍वासूपणे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू या, जेणेकरून आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल.—इब्री लोकांस १०:२४, २५.

२४. गतकाळात यहोवाने केलेले विस्मयकारक चमत्कार पाहायला मिळाले नाही याबद्दल आपल्याला वाईट का वाटू नये?

२४ यहोवा ज्या विविध मार्गांनी आपल्याला साहाय्य पुरवतो त्यांविषयी मनन केल्यावर आपल्याला आनंद होत नाही का? यहोवा आपल्या उद्देशांच्या पूर्तीकरता आज विस्मयकारक चमत्कार करत नसला तरीसुद्धा आपल्याला वाईट वाटण्याचे कारण नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आपण विश्‍वासू राहावे म्हणून आवश्‍यक असलेली सर्व मदत यहोवा आपल्याला पुरवतो. आणि जर आपण सर्वांनी मिळून विश्‍वासूपणे धीर धरला तर, सबंध इतिहासातील यहोवाचे सर्वात विस्मयकारक व अद्‌भूत चमत्कार आपल्याला पाहायला मिळतील! तेव्हा, यहोवाचे प्रेमळ साहाय्य स्वीकारण्याचा आणि त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचा आपण निर्धार करू या. असे केल्यास २००५ सालाच्या आपल्या वार्षिक वचनातील शब्दांप्रमाणे आपल्यालाही म्हणता येईल, की ‘यहोवापासूनच माझे साहाय्य येते.’—स्तोत्र १२१:२, पं.र.भा.

तुम्हाला काय वाटते?

• आज यहोवा आपल्याला लागणारी मदत देवदूतांच्या माध्यमाने कशी पुरवतो?

• पवित्र आत्म्याद्वारे आज यहोवा कशाप्रकारे आपल्याला मदत करतो?

• आपल्याला साहाय्य पुरवण्याकरता यहोवा आज आपल्या वचनाचा कशाप्रकारे उपयोग करतो?

• सहविश्‍वासू बांधवांच्या माध्यमाने यहोवा कशाप्रकारे आपले साहाय्य करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

प्रचार कार्यात देवदूत आपले साहाय्य करतात हे जाणल्याने धैर्य मिळते

[२१ पानांवरील चित्र]

आपल्याला सांत्वनाची गरज असते तेव्हा यहोवा एखाद्या सहविश्‍वासू बांधवाकरवी ते पुरवू शकतो