व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आमचा साहाय्यकर्ता आहे

यहोवा आमचा साहाय्यकर्ता आहे

यहोवा आमचा साहाय्यकर्ता आहे

“यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याच्यापासूनच माझे साहाय्य येते.”स्तोत्र १२१:२, पं.र.भा.

१, २. (अ) सर्वांनाच वेळोवेळी मदतीची गरज पडते असे का म्हणता येते? (ब) यहोवा कशाप्रकारचा साहाय्यकर्ता आहे?

इतरांच्या मदतीची ज्याला कधीच गरज पडत नाही असा आपल्यापैकी कोण आहे? सर्वांनाच वेळोवेळी, एखाद्या मोठ्या समस्येला तोंड देताना, एखाद्या दुःखद घटनेच्या धक्क्यातून सावरताना किंवा कठीण परीक्षेत टिकून राहताना इतरांच्या मदतीची गरज पडते. अशावेळी बहुतेक जण, आपल्याबद्दल काळजी वाटणाऱ्‍या एखाद्या मित्राची मदत घेतात. अशा मित्राजवळ मन हलके केल्यावर आपल्यासमोर असलेली समस्या थोडी सुसह्‍य वाटू लागते. पण माणूस माणसाला जी मदत करू शकतो त्याला मर्यादा आहेत. शिवाय, आपल्याला नेमकी मदतीची गरज असते तेव्हा इतरजण कदाचित आपल्याला मदत करण्याच्या स्थितीत नसतील असेही घडू शकते.

पण एक साहाय्यकर्ता असा आहे की ज्याच्याजवळ अमर्याद सामर्थ्य आहे. शिवाय, तो आपल्याला कधीही सोडणार नाही असे तो स्वतः आश्‍वासन देतो. तो कोण आहे हे स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो; पूर्ण भरवशानिशी स्तोत्रकर्ता म्हणतो: ‘यहोवापासूनच माझे साहाय्य येते.’ (स्तोत्र १२१:२) यहोवा आपल्याला मदत करेल याची या स्तोत्रकर्त्याला इतकी खात्री का वाटत होती? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता आपण स्तोत्र १२१ याचे परीक्षण करू या. यामुळे आपल्याला हे समजण्यास मदत मिळेल की आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने यहोवाला आपला साहाय्यकर्ता का मानू शकतो.

तो साहाय्य करण्यास सदैव तयार आहे

३. स्तोत्रकर्त्याने कोणत्या पर्वतांकडे दृष्टी लावली असावी आणि का?

यहोवा हा सबंध विश्‍वाचा निर्माणकर्ता असल्यामुळेच आपण त्याच्या साहाय्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो, असे म्हणून स्तोत्रकर्ता या स्तोत्राची सुरवात करतो. तो म्हणतो: “मी आपली दृष्टी वर पर्वतांकडे लावीन. माझे साहाय्य कोठून येते? यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याच्यापासूनच माझे साहाय्य येते.” (स्तोत्र १२१:१, २, पं.र.भा.) स्तोत्रकर्त्याने ज्या पर्वताकडे दृष्टी लावली, तो एक साधारण पर्वत नव्हता. हे शब्द लिहिण्यात आले त्या काळात, यहोवाचे मंदिर जेरूसलेममध्ये होते. आणि यहुदाच्या पर्वतांवर अगदी उंच ठिकाणी बांधलेले हे जेरूसलेम शहर लाक्षणिक अर्थाने यहोवाचे निवासस्थान होते. (स्तोत्र १३५:२१) तर यहोवाचे मंदिर ज्यांवर बांधलेले होते, त्या जेरूसलेमच्या पर्वतांकडे दृष्टी लावून स्तोत्रकर्त्याने पूर्ण भरवशाने त्याच्याकडून मदतीची अपेक्षा केली असेल. यहोवा आपले साहाय्य करू शकतो याविषयी स्तोत्रकर्त्याला इतकी खात्री का वाटत होती? कारण यहोवा “आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा” आहे. दुसऱ्‍या शब्दांत, स्तोत्रकर्ता असे म्हणत होता की ‘माझे साहाय्य करण्यापासून निश्‍चितच कोणतीही गोष्ट सर्वशक्‍तिमान निर्माणकर्त्याला रोखू शकत नाही!’—यशया ४०:२६.

४. यहोवा आपल्या लोकांच्या गरजांविषयी सदैव जागरूक असतो हे स्तोत्रकर्त्याने कसे स्पष्ट केले आणि हे जाणणे सांत्वनदायक का आहे?

यानंतर स्तोत्रकर्त्याने स्पष्ट केले, की कशाप्रकारे यहोवा आपल्या सेवकांच्या गरजांविषयी सदैव जागरूक असतो: “तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. व तो डुलकीहि घेत नाही.” (स्तोत्र १२१:३, ४) देवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो “ढळू” देईल, किंवा त्यांना पुन्हा उठता येणार नाही अशारितीने खाली पडू देईल हे शक्यच नाही. (नीतिसूत्रे २४:१६) का नाही? कारण यहोवा, डोळ्यांत तेल घालून आपल्या मेंढरांचे रक्षण करणाऱ्‍या मेंढपाळासारखा आहे. हे जाणून आपल्याला सांत्वन मिळत नाही का? आपल्या लोकांच्या गरजांकडे तो क्षणभरही डोळेझाक करणार नाही. उलट, तो अहोरात्र त्यांचे रक्षण करतो.

५. यहोवा “उजव्या हाताला” आहे असे का म्हटले आहे?

यहोवा आपल्या लोकांचा निष्ठावान संरक्षक आहे याविषयी पूर्ण खात्री असल्यामुळे स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्‍वर तुझा रक्षक आहे; परमेश्‍वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही.” (स्तोत्र १२१:५, ६) मध्यपूर्वेकडील प्रदेशांत, पायी चालून थकलेल्या प्रवाशाला सावलीचे ठिकाण सापडल्यास, त्याला प्रखर उन्हापासून संरक्षण मिळत असे. यहोवा आपल्या लोकांकरता सावलीच्या ठिकाणासारखा आहे; तो संकटांच्या प्रखर उन्हापासून त्यांचे संरक्षण करतो. यहोवा त्यांच्या “उजव्या हाताला” आहे असे स्तोत्रकर्ता म्हणतो. प्राचीन काळांतील युद्धांत, सैनिक सहसा डाव्या हातात ढाल धरत होते, त्यामुळे उजव्या हाताकरता तसे फारसे संरक्षण नव्हते. सैनिकाचा निष्ठावान मित्र लढाईत त्याच्या उजवीकडे राहून त्याचे संरक्षण करू शकत होता. अशा मित्रासारखा यहोवा देखील एकनिष्ठपणे आपल्या उपासकांच्या उजवीकडे उभा राहतो, म्हणजेच तो त्यांना साहाय्य करण्याकरता सदैव तयार असतो.

६, ७. (अ) यहोवा आपल्या लोकांना साहाय्य करण्याचे कधीही थांबवणार नाही याविषयी स्तोत्रकर्ता कशाप्रकारे आपल्याला आश्‍वासन देतो? (ब) आपणही स्तोत्रकर्त्यासारखाच आत्मविश्‍वास का बाळगू शकतो?

यहोवा कधी त्याच्या लोकांना साहाय्य करण्याचे थांबवेल का? अशी कल्पनासुद्धा करता येत नाही. स्तोत्रकर्ता शेवटी म्हणतो: “परमेश्‍वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील तुझ्या जिवाचे रक्षण करील. परमेश्‍वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.” (स्तोत्र १२१:७, ८) स्तोत्रकर्त्याने आतापर्यंत वर्तमानकाळात लिहिले पण आता तो भविष्यकाळात लिहितो, याकडे लक्ष द्या. आधी ५ व्या वचनात त्याने म्हटले: “परमेश्‍वर तुझा रक्षक आहे.” पण या वचनांत त्याने लिहिले: “परमेश्‍वर . . .तुझे रक्षण करील.” (तिरपे वळण आमचे.) अशारितीने तो खऱ्‍या उपासकांना आश्‍वासन देतो की यहोवा भविष्यातही त्यांना साहाय्य करत राहील. ते कोठेही जावोत आणि त्यांच्यावर कोणतेही संकट येवो, पण यहोवाचा मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही अशी स्थिती कधीही येणार नाही.—नीतिसूत्रे १२:२१.

खरोखर, स्तोत्र १२१ लिहिणाऱ्‍याला पूर्ण खात्री होती की जसा एक प्रेमळ मेंढपाळ आपल्या मेंढरांची कोमलतेने काळजी घेतो आणि जसा एक जागरूक रक्षक सावधपणे पहारा देतो तसाच सर्वसमर्थ निर्माणकर्ता यहोवा देखील आपल्या सेवकांवर सतत लक्ष ठेवतो. आपणही स्तोत्रकर्त्यासारखाच विश्‍वास बाळगू शकतो कारण यहोवा बदलत नाही. (मलाखी ३:६) पण याचा अर्थ आपल्याला सर्वप्रसंगी शारीरिक संरक्षण मिळेलच असे समजावे का? नाही, पण जोपर्यंत आपण यहोवाला आपला साहाय्यकर्ता मानू तोपर्यंत तो अशा सर्व गोष्टींपासून आपले संरक्षण करेल की ज्यांमुळे आध्यात्मिकरितीने आपले नुकसान होऊ शकते. तेव्हा, साहजिकच असा प्रश्‍न उद्‌भवतो की ‘यहोवा कशाप्रकारे आपले साहाय्य करतो?’ आपण चार मार्गांचे परीक्षण करू या की ज्यांद्वारे यहोवा आपले साहाय्य करतो. या लेखात आपण पाहू या की त्याने बायबल काळांत आपल्या सेवकांना कशी मदत पुरवली. आणि पुढच्या लेखात, आज तो आपल्या लोकांना कशी मदत करतो हे आपण विचारात घेऊ.

देवदूतांकडून साहाय्य

८. देवदूतांना देवाच्या पृथ्वीवरील सेवकांच्या कल्याणाविषयी कळकळ वाटते हे आश्‍चर्याचे का नाही?

कोट्यवधी देवदूत यहोवाच्या हुकुमाचे पालन करण्याकरता सदैव सुसज्ज असतात. (दानीएल ७:९, १०) हे आत्मिक पुत्र विश्‍वासूपणे त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात. (स्तोत्र १०३:२०) त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे की यहोवाचे आपल्या मानवी उपासकांवर नितान्त प्रेम असून तो त्यांचे साहाय्य करू इच्छितो. त्यामुळे, देवदूतांनाही देवाच्या पृथ्वीवरील सेवकांच्या कल्याणाविषयी कळकळ वाटते ही आश्‍चर्याची गोष्ट नाही. (लूक १५:१०) त्याअर्थी, यहोवा जेव्हा मानवांना साहाय्य पुरवण्याकरता देवदूतांचा उपयोग करतो तेव्हा निश्‍चितच या देवदूतांना आनंद वाटतो. प्राचीन काळी यहोवाने आपल्या मानवी सेवकांना साहाय्य करण्याकरता देवदूतांचा कशाप्रकारे उपयोग केला?

९. विश्‍वासू मानवांचे संरक्षण करण्याकरता देवाने कशाप्रकारे देवदूतांना सामर्थ्य दिले याचे एखादे उदाहरण सांगा.

देवाने देवदूतांना विश्‍वासू मानवांचे, संरक्षण करण्याचे व त्यांना संकटातून सोडवण्याचे सामर्थ्य दिले. सदोम व गमोरा शहरांच्या नाशातून बचावण्याकरता दोन देवदूतांनी लोट व त्याच्या मुलींना मदत केली. (उत्पत्ति १९:१, १५-१७) केवळ एका देवदूताने जेरूसलेमवर हल्ला करणाऱ्‍या १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांचा नाश केला. (२ राजे १९:३५) दानीएलाला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले तेव्हा यहोवाने “आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली.” (दानीएल ६:२१, २२) प्रेषित पेत्र तुरुंगात असताना, एका देवदूताने त्याला सोडवले. (प्रेषितांची कृत्ये १२:६-११) देवदूतांकडून मानवांना मिळालेल्या संरक्षणाची आणखी अनेक उदाहरणे बायबलमध्ये आहेत; ही सर्व उदाहरणे हेच दाखवतात की स्तोत्र ३४:७ येथे जे म्हटले आहे ते अगदी खरे आहे: “परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.”

१०. यहोवाने संदेष्टा दानीएलाचे मनोधैर्य वाढवण्याकरता कशाप्रकारे एका देवदूताचा उपयोग केला?

१० प्रसंगी, यहोवाने विश्‍वासू मानवांचे धैर्य व मनोबल वाढवण्याकरताही देवदूतांचा उपयोग केला. याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण दानीएल पुस्तकातील १० व्या अध्यायात वाचायला मिळते. त्या वेळी, संदेष्टा दानीएल जवळजवळ १०० वर्षांचा असावा. जेरूसलेमच्या ओसाड स्थितीमुळे आणि मंदिराच्या बांधकामाला उशीर लागत असल्यामुळे तो अगदीच खचून गेला होता. तसेच, एक भयावह दृष्टान्त पाहिल्यामुळे देखील तो हादरून गेला होता. (दानीएल १०:२, ३, ८) देवाने त्याचे मनोधैर्य वाढवण्याकरता प्रेमळपणे एका देवदूताला पाठवले. या देवदूताने अनेकदा दानीएलाला आठवण करून दिली की तो देवाच्या नजरेत “परमप्रिय” होता. याचा काय परिणाम झाला? वृद्ध दानीएलाने देवदूतास म्हटले: “तू माझ्यात हिंमत आणिली आहे.”—दानीएल १०:११, १९.

११. सुवार्तेच्या प्रचारकार्याचे मार्गदर्शन करण्याकरता देवदूतांचा कसा उपयोग करण्यात आला याचे एक उदाहरण सांगा.

११ सुवार्तेच्या प्रचार कार्याविषयी मार्गदर्शन पुरवण्याकरताही यहोवाने देवदूतांचा उपयोग केला. एका देवदूताने फिलिप्पाला एका कूशी षंढाला ख्रिस्ताविषयी प्रचार करण्याचा निर्देश दिला; या कूशी षंढाने लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रेषितांची कृत्ये ८:२६, २७, ३६, ३८) काही काळानंतर, सुवार्तेचा प्रचार सुंता न झालेल्या विदेश्‍यांमध्येही केला जावा अशी देवाची इच्छा होती. एका दृष्टान्तात कर्नेल्य नावाच्या एका देवभीरू माणसाला एक देवदूत दिसला व त्याने कर्नेल्याला प्रेषित पेत्राला बोलावून घेण्याची आज्ञा दिली. कर्नेल्याने पाठवलेल्या निरोप्यांनी पेत्राला शोधून काढले तेव्हा ते त्याला म्हणाले: ‘कर्नेल्याला . . . पवित्र देवदूताने सुचविले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.’ पेत्राने या मार्गदर्शनाचे पालन केले, जेणेकरून सुंता न झालेले पहिले विदेशी सदस्य ख्रिस्ती मंडळीत सामील झाले. (प्रेषितांची कृत्ये १०:२२, ४४-४८) एखाद्या योग्य मनोवृत्तीच्या व्यक्‍तीच्या संपर्कात येण्याकरता एका देवदूताने आपल्याला मदत केली आहे असे तुम्हाला कळले तर तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा!

पवित्र आत्म्याचे साहाय्य

१२, १३. (अ) पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करू शकतो याविषयी खात्री बाळगण्याकरता येशूच्या प्रेषितांजवळ कोणता उत्तम आधार होता? (ब) पवित्र आत्म्याने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे सामर्थ्य दिले?

१२ आपला मृत्यू होण्याच्या थोड्याच काळाआधी येशूने त्याच्या शिष्यांना आश्‍वासन दिले की त्यांना कधीही एकटे सोडले जाणार नाही. तर पिता त्यांना “कैवारी म्हणजे पवित्र आत्मा” देईल. (योहान १४:२६) पवित्र आत्मा आपला कैवारी होऊ शकतो, अर्थात आपले साहाय्य करू शकतो असे मानण्याकरता प्रेषितांकडे अनेक कारणे होती. कारण यहोवाने आपल्या लोकांना मदत करण्याकरता, विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍तीचा अर्थात पवित्र आत्म्याचा कसा उपयोग केला याची असंख्य उदाहरणे प्रेरित शास्त्रवचनांत आढळतात.

१३ कित्येकदा, मानवांना यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास समर्थ करण्यासाठी पवित्र आत्म्याचा उपयोग करण्यात आला. पवित्र आत्म्याने इस्राएल राष्ट्राला संकटांतून सोडवण्याकरता शास्त्यांना समर्थ केले. (शास्ते ३:९, १०; ६:३४) याच आत्म्याने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना सर्व प्रकारच्या विरोधाला तोंड देऊन निर्भयतेने प्रचार कार्य करत राहण्याचे सामर्थ्य दिले. (प्रेषितांची कृत्ये १:८; ४:३१) सेवाकार्यात त्यांना मिळालेले यश, पवित्र आत्म्याच्या कार्याचा खात्रीलायक पुरावा होता. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय, “निरक्षर व अज्ञानी” व्यक्‍ती खरोखरच त्याकाळी ज्ञात असलेल्या सबंध जगात राज्याच्या संदेशाची घोषणा करू शकले असते का?—प्रेषितांची कृत्ये ४:१३; कलस्सैकर १:२३.

१४. यहोवाने आपल्या लोकांच्या ज्ञानवृद्धीकरता कशाप्रकारे पवित्र आत्म्याचा उपयोग केला आहे?

१४ यहोवाने आपल्या लोकांची ज्ञानवृद्धी करण्याकरताही पवित्र आत्म्याचा उपयोग केला. देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने योसेफ फारोच्या भविष्यसूचक स्वप्नांचा अचूक अर्थ सांगू शकला. (उत्पत्ति ४१:१६, ३८, ३९) यहोवाने आपल्या आत्म्याच्या माध्यमाने आपल्या उद्देशांविषयीचे ज्ञान गर्विष्ठांपासून लपवून ठेवले आहे पण नम्र जनांना ते प्रकट केले आहे. (मत्तय ११:२५) अशारितीने, “आपणावर प्रीती करणाऱ्‍यांसाठी” यहोवाने जे पुरवले आहे त्याविषयी प्रेषित पौलाने म्हटले: “देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले.” (१ करिंथकर २:७-१०) कोणतीही व्यक्‍ती केवळ पवित्र आत्म्याच्या मदतीनेच देवाच्या इच्छेविषयी खऱ्‍या अर्थाने ज्ञान मिळवू शकते.

देवाच्या वचनातून साहाय्य

१५, १६. सुज्ञपणे वागण्याकरता यहोशवाला काय करण्यास सांगण्यात आले?

१५ यहोवाचे प्रेरित वचन ‘सद्‌बोधाकरता उपयोगी’ असून ते देवाच्या सेवकांना “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” करते. (२ तीमथ्य ३:१६, १७) प्राचीन काळातील व्यक्‍तींना त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या देवाच्या वचनाच्या लिखित भागांतून कशी मदत मिळाली याची अनेक उदाहरणे आपण बायबलमध्ये वाचतो.

१६ शास्त्रवचनांनी देवाच्या उपासकांना सुज्ञ मार्गदर्शन पुरवले. यहोशवाला जेव्हा इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा त्याला असे सांगण्यात आले: “हे नियमशास्त्राचे पुस्तक [जे मोशेने लिहून ठेवले होते] तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव, अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करिशील, आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील.” यहोशवाला चमत्कारिक रित्या बुद्धी दिली जाईल असे देवाने म्हटले नाही, याकडे लक्ष द्या. जर यहोशवाने “नियमशास्त्राचे पुस्तक” वाचले व त्यावर मनन केले, तर तो सुज्ञतेने वागू शकेल असे त्याने म्हटले.—यहोशवा १:८, पं.र.भा.; स्तोत्र १:१-३.

१७. दानीएल व राजा योशीया या दोघांनाही त्यांच्या काळात उपलब्ध असलेल्या शास्त्रवचनांच्या भागांतून कशाप्रकारे साहाय्य मिळाले?

१७ देवाने आपल्या लिखित वचनाद्वारे आपली इच्छा व उद्देश देखील प्रकट केला. उदाहरणार्थ, यिर्मयाच्या लिखाणांवरून दानीएलाला हे समजून घेण्यास मदत मिळाली की जेरूसलेम किती काळ ओसाड राहील. (यिर्मया २५:११; दानीएल ९:२) तसेच यहुदाचा राजा योशीया याच्या शासनादरम्यान काय घडले हेही विचारात घ्या. त्याकाळापर्यंत, यहुदा राष्ट्र यहोवाच्या मार्गातून भटकले होते आणि राजांनी नियमशास्त्राची वैयक्‍तिक प्रत बनवण्याची व त्याचे पालन करण्याची आज्ञा पाळली नव्हती. (अनुवाद १७:१८-२०) पण मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू असताना, “नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.” ही कदाचित मोशेने स्वतः लिहिलेली नियमशास्त्राची मूळ प्रत असावी, की जिचे लिखाण ८०० वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. त्यातील मजकूर वाचून दाखवण्यात आला तेव्हा योशीयाला समजले की यहुदा राष्ट्राने यहोवाच्या इच्छेचे किती मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले होते. तेव्हा राजा योशीयाने, त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे करण्याकरता निश्‍चित पावले उचलली. (२ राजे २२:८; २३:१-७) प्राचीन काळात, देवाच्या लोकांना पवित्र शास्त्रवचनांचे जे भाग त्यांना उपलब्ध होते त्यांतून बरेच साहाय्य मिळाले हेच यावरून स्पष्ट होत नाही का?

सहविश्‍वासू बांधवांकडून साहाय्य

१८. खऱ्‍या उपासकांपैकी जेव्हाही एकजण दुसऱ्‍यास मदत करतो तेव्हा ती मदत यहोवाकडून येते असे आपण का म्हणू शकतो?

१८ यहोवा बरेचदा सहविश्‍वासू बांधवांकडून मदत पुरवतो. कोणताही खरा उपासक जेव्हा आपल्या बांधवाला मदत करतो तेव्हा ती मदत खरे पाहता देवाकडून येते. आपण असे का म्हणू शकतो? दोन कारणांमुळे. पहिले कारण म्हणजे, देवाचा पवित्र आत्मा यात सामील असतो. कारण या आत्म्याच्या प्रभावाला जे प्रतिसाद देतात त्यांच्यात तो प्रीती व चांगुलपणा यांसारखी फळे उत्पन्‍न करतो. (गलतीकर ५:२२, २३) त्याअर्थी, देवाच्या सेवकांपैकी जेव्हा एकजण दुसऱ्‍याला मदत करण्यास प्रेरित होतो तेव्हा हा यहोवाच्या आत्म्याच्या कार्याचा पुरावा असतो. दुसरे कारण म्हणजे आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२६) याचा अर्थ आपल्याठायी देवाचे गुण, उदाहरणार्थ दयाळूपण व करूणा दाखवण्याची क्षमता आहे. तेव्हा यहोवाच्या सेवकांपैकी जेव्हा एकजण दुसऱ्‍याला मदत करतो, तेव्हा या मदतीचा खरा स्रोत देव असतो कारण या कृतीत त्याच्याच गुणांचे प्रतिबिंब असते.

१९. बायबलनुसार, यहोवाने सहविश्‍वासू बांधवांच्या माध्यमाने कशाप्रकारे साहाय्य पुरवले?

१९ बायबल काळांत, यहोवाने सह विश्‍वासू बांधवांच्या माध्यमाने कशाप्रकारे साहाय्य पुरवले? यहोवाने बरेचदा आपल्या सेवकांपैकी एकाला, दुसऱ्‍या एखाद्यास सल्ला देण्यास प्रेरित केले. उदाहरणार्थ, यिर्मयाने बारूखला सल्ला दिला, जो त्याच्याकरता जीवनदायक ठरला. (यिर्मया ४५:१-५) वेळोवेळी खऱ्‍या उपासकांना आपल्या सहविश्‍वासू बांधवांना भौतिक मदत पुरवण्यास प्रेरित करण्यात आले. उदाहरणार्थ, मासेदोनिया व अखया येथील ख्रिस्ती, जेरूसलेममधील आपल्या गरजू बांधवांना मदत करण्याकरता उत्सुकतेने पुढे आले. प्रेषित पौलाने म्हटले की अशा औदार्यामुळे उचितपणे, “देवाचे आभार प्रदर्शन होते.”—२ करिंथकर ९:११.

२०, २१. प्रेषित पौलाला कोणत्या परिस्थितीत रोममधील बांधवांचा आधार लाभला?

२० यहोवाच्या सेवकांनी कशाप्रकारे एकमेकांना मनोबल व धैर्य दिले, याचे अहवाल खरोखरच हृदयस्पर्शी आहेत. प्रेषित पौलाविषयीचे एक उदाहरण पाहा. पौलाला कैदी बनवून रोमला नेण्यात येत होते तेव्हा, तो अप्पिया मार्ग म्हटलेल्या रोमी महामार्गावरून प्रवास करत होता. या प्रवासाचा शेवटला टप्पा खासकरून खडतर होता कारण प्रवाशांना एका दलदलीच्या सखल प्रदेशातून जावे लागायचे. * रोममधील बांधवांना पौल येणार असल्याचे माहीत होते. मग त्यांनी काय केले? पौल येऊन त्यांची भेट घेईपर्यंत, ते आपापल्या घरी आरामात बसून राहिले का?

२१ या प्रवासात पौलासोबत असणारा बायबल लेखक लूक आपल्याला काय घडले ते सांगतो: “तेथले [रोमचे] बंधुजन आम्हाविषयी ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथपर्यंत आम्हास सामोरे आले.” तुम्ही हे दृश्‍य डोळ्यांपुढे उभे करू शकता का? पौल येणार आहे हे समजल्यावर बांधवांचा एक गट रोमवरून प्रवास करून त्याला भेटण्यास आला. त्यांच्यापैकी काहीजण अप्पियाच्या बाजारपेठेत थांबले होते; हे रोमपासून ७४ किलोमीटर अंतरावर असलेले एक सुपरिचित प्रवास स्थानक होते. बाकीचे बंधू शहराबाहेर जवळजवळ ५८ किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन उतारशाळा नावाच्या विश्रामस्थळी थांबले होते. यावर पौलाची काय प्रतिक्रिया होती? लूक सांगतो: “त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुति करून धैर्य धरले.” (प्रेषितांची कृत्ये २८:१५) कल्पना करा—एवढे अंतर पार करून येण्याची तसदी घेणाऱ्‍या बांधवांना पाहताक्षणीच, पौलाला धैर्य व सांत्वन मिळाले! आणि या साहाय्याबद्दल त्याने कोणाचे आभार मानले? ही मदत मुळात ज्याने पुरवली होती त्याचे, अर्थात यहोवा देवाचे.

२२. आपले २००५ सालाचे वार्षिक वचन कोणते असेल आणि पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२२ देवाच्या व्यवहारांविषयीचा प्रेरित अहवाल स्पष्टपणे दाखवतो की तोच आपला साहाय्यकर्ता आहे. खरोखर, त्याच्यासारखे साहाय्य इतर कोणीही पुरवू शकत नाही. म्हणूनच, यहोवाच्या साक्षीदारांचे २००५ सालाचे वार्षिक वचन स्तोत्र १२१:२ (पं.र.भा.) हे असेल: ‘यहोवापासूनच माझे साहाय्य येते.’ पण आज यहोवा कशाप्रकारे आपले साहाय्य करतो? हा विषय पुढच्या लेखात विचारात घेत आहोत.

[तळटीपा]

^ परि. 20 हॉरस नावाच्या रोमी कवीनेही हाच प्रवास केला होता व त्याने प्रवासातील या टप्प्यातील असुविधाजनक परिस्थितीचे वर्णन केले आहे. अप्पियाच्या बाजारपेठेचे वर्णन करताना हॉरस सांगतो की येथे “खलाशांची व उतारशाळांच्या कंजूष मालकांची गर्दी” होती. तसेच त्याने “जिवघेणी चिलटे व बेडकं” आणि “तोंडात धरवत नाही” अशा पाण्याबद्दलही तक्रार केली.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाने देवदूतांच्या माध्यमाने कशाप्रकारे मदत पुरवली?

• पवित्र आत्म्याद्वारे यहोवाने कशाप्रकारे मदत पुरवली?

• आपल्या सेवकांना साहाय्य पुरवण्याकरता यहोवाने आपल्या प्रेरित वचनाचा कसा उपयोग केला?

• सहविश्‍वासू बांधवांच्या माध्यमाने यहोवाने कशाप्रकारे साहाय्य पुरवले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

२००५ सालाचे वार्षिकवचन हे असेल: ‘यहोवापासूनच माझे साहाय्य येते.’—स्तोत्र १२१:२, पं.र.भा.

[१६ पानांवरील चित्र]

रोममधील बांधवांकडून मिळालेल्या साहाय्याबद्दल पौलाने देवाचे आभार मानले