व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्ताचे स्मरण कसे केले जावे?

येशू ख्रिस्ताचे स्मरण कसे केले जावे?

येशू ख्रिस्ताचे स्मरण कसे केले जावे?

येशू ख्रिस्त “निश्‍चितच आजवर होऊन गेलेल्या सर्वात प्रभावशाली व्यक्‍तिमत्त्वांपैकी एक होता.”—“द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया.”

महापुरुषांना सहसा त्यांच्या कर्तुत्वाकरता लोक आठवणीत ठेवतात. मग येशूच्या बाबतीत बहुतेक लोक त्याच्या कार्यांपेक्षा त्याच्या जन्माचेच स्मरण का करतात? ख्रिस्ती धर्मजगतातले बहुतेकजण येशूच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटनांचे अचूक वर्णन करू शकतात. पण डोंगरावरील प्रवचनात त्याने दिलेल्या अप्रतिम शिकवणुकी आठवणीत ठेवून त्यांचे पालन किती जण करतात?

येशूचा जन्म ही एक विलक्षण घटना होती याविषयी वाद नाही; पण त्याच्या सुरुवातीच्या शिष्यांनी त्याच्या जन्मापेक्षा त्याने केलेल्या कार्यांना व त्याने शिकवलेल्या तत्त्वांना कितीतरी अधिक महत्त्व दिले. ख्रिस्ताच्या जन्मापुढे त्याच्या प्रौढपणीचे जीवन गौण ठरावे अशी देवाची निश्‍चितच इच्छा नव्हती. पण वास्तवात, नाताळाशी संबंधित असलेल्या असंख्य पारंपरिक कथाकहाण्यांच्या गुंत्यात आज ख्रिस्ताचे व्यक्‍तिमत्त्व लोप पावले आहे.

आणखी एक अस्वस्थ करणारा प्रश्‍न नाताळोत्सवाच्या स्वरूपासंबंधाने उद्‌भवतो. आज जर येशू पुन्हा पृथ्वीवर आला तर नाताळाचे ज्याप्रकारे व्यापारीकरण करण्यात आले आहे ते पाहून तो काय म्हणेल? दोन हजार वर्षांपूर्वी येशू एकदा जेरूसलेमच्या मंदिरात गेला होता. तेथे यहुदी धार्मिक सणाच्या नावाखाली पैसा कमवण्यात गुंतलेल्या सराफांना व विक्रेत्यांना पाहून येशू अतिशय संतापला. तो त्यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” (योहान २:१३-१६) व्यापार व धर्म यांची सरमिसळ करण्यास येशूची संमती नव्हती हे अगदीच स्पष्ट आहे.

बरेच प्रांजळ स्पॅनिश कॅथलिक लोक नाताळाला जे व्यापाराचे स्वरूप आले आहे, त्याविषयी चिंता व्यक्‍त करतात. पण नाताळाचा उगम कोठून झाला हे लक्षात घेतल्यास व्यापारीकरणाचा हा प्रघात ओघाओघानेच आला आहे असे दिसून येते. पत्रकार ख्वॉन आर्यास स्पष्ट करतात: “नाताळाला आज एखाद्या ‘मूर्तिपूजक’ सणाचे रूप आले आहे व नाताळात धार्मिक बाबींपेक्षा मौजमजा आणि व्यापारावरच अधिक जोर दिला जातो अशी टीका करणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांना सहसा हे माहीत नसते की नाताळाची सुरुवात झाली तेव्हापासूनच . . . त्यात रोमच्या मूर्तिपूजक [सूर्यदैवताच्या] सणाशी संबंधित बरेच रितीरिवाज आत्मसात करण्यात आले होते.”—एल पाईस, डिसेंबर २४, २००१.

अलीकडील वर्षांत, अनेक स्पॅनिश पत्रकारांनी व विश्‍वकोशांनी नाताळोत्सवाशी संबंधित असलेल्या रूढीपरंपरांच्या मूर्तिपूजक उगमांविषयी तसेच नाताळाच्या व्यापारीकरणाविषयी माहिती प्रकाशित केली आहे. नाताळातील वेगवेगळ्या उत्सवांच्या तारखांविषयी एन्सीक्लोपेड्या द ला रेलीखॉन कातोलीका यात स्पष्ट सांगितले आहे: “नाताळाची ही तारीख निश्‍चित करण्यामागचे कारण हेच होते की रोमन चर्चला मूर्तिपूजक सणांच्या ठिकाणी ख्रिस्ती सणांची सुरुवात करायची होती. . . . आपल्याला माहीत आहे की त्या काळी रोममध्ये मूर्तिपूजक लोक डिसेंबर २५ या तिथीला नातालिस इन्विक्टी, अर्थात, ‘अजिंक्य सूर्यदैवताची’ जन्मतिथी साजरी करत होते.”

एन्सीक्लोपेड्या ईस्पानीका देखील म्हणतो: “नाताळाची डिसेंबर २५ ही तारीख अचूक कालमापनानुसार नसून हिवाळ्यातील सूर्याच्या दक्षिणायनाच्या निमित्ताने रोममध्ये पाळल्या जाणाऱ्‍या सणांचे ख्रिस्तीकरण केल्यामुळे आली.” हिवाळ्यात सूर्य उत्तरेकडे चढू लागला की रोमी लोक ही घटना कशाप्रकारे साजरी करायचे? तर मेजवान्या, गाणेबजावणे करून आणि एकमेकांना भेटवस्तू देऊन ते आपला आनंद व्यक्‍त करायचे. अशा लोकप्रिय सणावर पूर्णपणे बंदी आणण्याची चर्च अधिकाऱ्‍यांची इच्छा नसल्यामुळे, सूर्याचा जन्मदिवस म्हणण्याऐवजी येशूचा जन्मदिवस म्हणून त्यांनी या सणाचे “ख्रिस्तीकरण” केले.

सुरुवातीला, चवथ्या व पाचव्या शतकात सूर्य उपासना व त्यासंबंधीचे रितीरिवाज सहजासहजी बंद झाले नाहीत. डिसेंबर २५ ही तिथी सूर्याच्या सन्मानार्थ पाळली जात असल्यामुळे आपण ती साजरी करू नये असा कॅथलिक “संत” ऑगस्टीनला (सा. यु. ३५४-४३०) आपल्या सह उपासकांना आग्रह करावा लागला. आजही, प्राचीन रोमी रूढीपरंपरांचा पगडा स्पष्ट दिसून येतो.

मौजमजा व व्यापाराकरता अनुकूल

नाताळ आज सर्वात लोकप्रिय आणि मौजमजा व व्यापाराकरता अगदी अनुकूल असा आंतरराष्ट्रीय उत्सव बनला आहे; पण हे शतकानुशतके बऱ्‍याच गोष्टींचा प्रभाव पडल्यामुळे घडून आले आहे. तसेच, उत्तर युरोपातील इतर हिवाळ्यातील सणांच्या रितीरिवाजांचाही, रोमी पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्‍या नाताळात हळूहळू समावेश करण्यात आला. * आणि २० व्या शतकात व्यापारी व मार्केटिंग तज्ज्ञांनी, भरपूर नफा मिळवून देतील अशा असंख्य रितीभातींचा अतिशय उत्साहीपणे पुरस्कार केला आहे.

या सर्वाचा काय परिणाम घडून आला आहे? ख्रिस्ताच्या जन्माच्या अर्थसूचकतेपेक्षा त्याचा जन्मदिवस साजरा करण्यालाच सर्वात जास्त महत्त्व दिले जाऊ लागले आहे. काही ठिकाणी तर पारंपरिक नाताळोत्सवात ख्रिस्ताचा उल्लेख देखील क्वचितच केला जातो. स्पॅनिश दैनिक एल पाईस यानुसार, “[नाताळ] हा सबंध जगातल्या लोकांचा सण आहे, सबंध कुटुंबाने मिळून साजरा करण्याचा सण आहे आणि प्रत्येक जण वाटेल त्या प्रकारे तो हा सण साजरा करू शकतो.”

हे विधान, स्पेनमध्येच नव्हे तर सबंध जगातील अनेक देशांत वाढत चाललेल्या एका प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहे. नाताळोत्सव दिवसेंदिवस अधिकाधिक भपकेबाज होऊ लागला आहे पण ख्रिस्ताविषयीचे ज्ञान कमी कमी होत चालले आहे. वास्तविक पाहता, रोमी काळात जे केले जात होते तेच आज नाताळाचे सार बनले आहे—गाणेबजावणे, खाणेपिणे आणि एकमेकांना भेटवस्तू देणे.

आपल्यासाठी बाळ जन्मला आहे

जर पारंपरिक नाताळोत्सवाचा ख्रिस्ताशी फारसा संबंध नाही, तर मग खऱ्‍या ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताच्या जन्माचे व जीवनाचे कोणत्या पद्धतीने स्मरणे करावे? येशूच्या जन्माच्या सात शतकांआधी यशयाने त्याच्याविषयी असे भाकीत केले होते: “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील.” (यशया ९:६) येशूचा जन्म आणि नंतरची त्याची भूमिका इतकी अर्थसूचक असल्याचे यशयाने का सूचित केले? कारण कालांतराने येशू एक सामर्थ्यशाली शासक बनेल असे भाकीत करण्यात आले होते. त्याला शांतीचा अधिपती असे म्हटले जाईल व शांतीला व त्याच्या सत्तावृद्धीला अंत नसेल. शिवाय, येशूचे शासन “न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर” केले जाईल.—यशया ९:७.

मरीयेला येशूच्या आगामी जन्माविषयी सांगताना गब्रीएल देवदूताने यशयाच्या घोषणेशी मिळतीजुळती घोषणा केली. त्याने अशी भविष्यवाणी केली: “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) तर येशू भविष्यात देवाच्या राज्याचा नियुक्‍त राजा या नात्याने कार्य करणार असल्यामुळेच त्याचा जन्म अतिशय अर्थसूचक व महत्त्वाचा होता. ख्रिस्ताच्या राज्यामुळे सर्वांना, तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांनाही अनेक आशीर्वाद मिळू शकतात. देवदूतांनी आधीच असे सूचित केले होते की येशूचा जन्म, “ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति” आणेल.—लूक २:१४, इझी टू रीड व्हर्शन.

शांती व न्याय असलेल्या जगात राहण्याची उत्कंठा कोणाला नाही? पण ख्रिस्ताच्या शासनामुळे आलेल्या शांतीचा उपभोग घेण्याकरता आपण देवाला संतुष्ट केले पाहिजे व त्याच्यासोबत आपला चांगला नातेसंबंध असला पाहिजे. असा नातेसंबंध जोडण्याकरता येशूने सांगितल्याप्रमाणे, पहिले पाऊल म्हणजे देवाबद्दल व ख्रिस्ताबद्दल ज्ञान घेणे. येशू म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

येशूबद्दल ज्ञान घेतल्यानंतर, आपण त्याचे स्मरण कसे करावे याबद्दल त्याची काय इच्छा असावी, यावर विचार करण्याची काही गरज नाही. एका प्राचीन मूर्तिपूजक सणाच्या तिथीला आपण खाणे, पिणे, एकमेकांना भेटवस्तू देणे इत्यादी करण्याद्वारे त्याचे स्मरण करावे अशी त्याची इच्छा असेल का? हे तर्कसंगत वाटत नाही. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की त्यांनी काय करावे अशी त्याची इच्छा आहे: “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील; मीहि त्याच्यावर प्रीति करीन.”—योहान १४:२१.

यहोवाच्या साक्षीदारांनी पवित्र शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास केला आहे; यामुळे त्यांना देवाच्या व येशूच्या आज्ञा काय आहेत हे समजून घेण्यास मदत झाली आहे. तुम्हालाही या महत्त्वाच्या आज्ञांविषयी समजून घेण्यास मदत करायला त्यांना आनंद वाटेल, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गाने येशूचे स्मरण करता येईल.

[तळटीप]

^ परि. 11 याची दोन उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे, ख्रिसमस ट्री आणि सान्ता क्लॉजचे व्यक्‍तिमत्त्व.

[६, ७ पानांवरील चौकट/चित्रे]

खाणेपिणे अथवा भेटवस्तू देणे बायबलनुसार चुकीचे आहे का?

भेटवस्तू देणे

भेटवस्तू देण्याला बायबल संमती देते; खुद्द यहोवा “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा आहे असे बायबल सांगते. (याकोब १:१७) चांगले आईवडील आपल्या मुलांना भेटवस्तू देतात असे येशूनेही म्हटले होते. (लूक ११:११-१३) ईयोब त्याच्या आजारातून पूर्णपणे बरा झाला तेव्हा त्याच्या मित्रांनी व कुटुंबियांनी त्याला अनेक भेटवस्तू दिल्या. (ईयोब ४२:११) पण यांपैकी कोणत्याही उदाहरणात, भेटवस्तू देण्याकरता एक खास उत्सवाचा दिवस असणे आवश्‍यक नव्हते. तर मनःपूर्वक भावनेने या भेटवस्तू देण्यात आल्या.—२ करिंथकर ९:७.

कुटुंबियांनी एकत्र येणे

कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी राहात असल्यास, अधूनमधून एकत्र आल्याने कुटुंबातील नाती घनिष्ठ होतात. येशू व त्याचे शिष्य काना येथे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले; हा निश्‍चितच एक मोठा समारंभ होता व तेथे अनेक संबंधी व स्नेही एकत्र आले होते. (योहान २:१-१०) आणि येशूने सांगितलेल्या उधळ्या पुत्राच्या दृष्टान्तात, उधळा पुत्र जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याच्या पित्याने घरात मोठी मेजवानी करून आपला आनंद व्यक्‍त केला, शिवाय या प्रसंगी नाच गाणे देखील होते.—लूक १५:२१-२५.

गोडधोड करून खाणे

देवाच्या सेवकांनी आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रपरिवारासोबत किंवा सहविश्‍वासू बांधवांसोबत मिळून उत्तम भोजनाचा आस्वाद घेतल्याच्या अनेक प्रसंगांचे बायबलमध्ये वर्णन आढळते. तीन देवदूतांनी अब्राहामाला भेट दिली तेव्हा त्याने त्यांच्याकरता मेजवानी तयार केली, ज्यात मांस, दूध, लोणी, भाकरी इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश होता. (उत्पत्ति १८:६-८) शलमोनानेही म्हटले की ‘खाणे, पिणे, व चैन करणे’ देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे.—उपदेशक ३:१३; ८:१५.

आपण आपल्या प्रियजनांसोबत मिळून आनंदाने खावे प्यावे अशी देवाची इच्छा आहे आणि एकमेकांना भेटवस्तू देण्यासही त्याची संमती आहे हे देखील स्पष्ट आहे. सबंध वर्षभर कोणत्याही वेळी असे करण्याच्या कित्येक संधी आपल्याला मिळतात.