व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईश्‍वरी बुद्धीने आपल्या मुलांचे संरक्षण कसे कराल

ईश्‍वरी बुद्धीने आपल्या मुलांचे संरक्षण कसे कराल

ईश्‍वरी बुद्धीने आपल्या मुलांचे संरक्षण कसे कराल

आपल्या शरीराला दररोज झगडावे लागते. असंख्य सूक्ष्मरोगजंतुंचा, परजीवींचा, विषाणूंचा आपल्या शरीरावर हल्ला होत असतो तेव्हा शरीराला त्यांचा प्रतिकार करावा लागतो. आपल्यातील बहुतेकांना एक प्रतिकार क्षमता लाभलेली आहे जिच्याबद्दल आपण आभार मानतो; ही प्रतिकार क्षमता, अशा हल्ल्यांचा प्रतिकार करते आणि असंख्य संसर्गजन्य रोगांना बळी पडण्यापासून आपले संरक्षण करते.

अशाचप्रकारे, ख्रिश्‍चनांना अशास्त्रवचनीय विचारसरणीविरुद्ध व मूल्यांविरुद्ध तसेच आपल्या आध्यात्मिक आरोग्याचा नाश करू शकणाऱ्‍या दबावांविरुद्ध लढले पाहिजे. (२ करिंथकर ११:३) आपल्या मनावर व हृदयावर दररोज होणाऱ्‍या या हल्ल्याचा प्रतिकार करण्याकरता आपण आपली आध्यात्मिक प्रतिकार क्षमता मजबूत करायला हवी.

अशाप्रकारच्या प्रतिकार क्षमता खासकरून मुलांसाठी आवश्‍यक आहेत कारण मुलांमध्ये जन्मतःच जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्याची क्षमता नसते. (इफिसकर २:२) मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसतसे पालकांनी, त्यांना त्यांची प्रतिकार क्षमता मजबूत करण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. कशाच्या आधारावर ही क्षमता मजबूत होते? बायबल म्हणते: “बुद्धी यहोवा देतो. . . . तो आपल्या भक्‍तांचा मार्ग संभाळेल.” (नीतिसूत्रे २:६, ८, NW) ईश्‍वरी बुद्धी ही हानीकारक संगती, साथीदारांचा दबाव किंवा अहितकारक मनोरंजन यांना बळी पडू शकणाऱ्‍या तरुणांच्या मार्गाचे रक्षण करू शकते. तेव्हा, पालक कशाप्रकारे यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करू शकतात व आपल्या मुलांमध्ये ईश्‍वरी बुद्धी रुजवू शकतात?

उभारणीकारक संगती शोधणे

किशोरवयीनांना त्यांच्याच वयाच्या मित्रमैत्रिणींबरोबर संगती करायला आवडते हे समजण्याजोगे आहे; पण, फक्‍त अननुभवी लोकांबरोबर संगती केल्याने त्यांना ईश्‍वरी बुद्धी मिळणार नाही. “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते,” अशी ताकीद एक नीतिसूत्र देते. (नीतिसूत्रे २२:१५) तेव्हा, काही पालकांनी संगतीच्या बाबतीत आपल्या मुलांना ईश्‍वरी बुद्धीने कार्य करण्यास कशाप्रकारे मदत केली आहे?

डॉन * नावाचा एक पिता म्हणतो: “आमची मुलं त्यांच्या वयाच्या मित्रांबरोबर पुरेसा वेळ घालवायचे पण ते बहुतेककरून आमच्याच घरात, आमच्या उपस्थितीतच. आमचं घर नेहमी खुलं असायचं, घरात सतत तरुण मुलं असायची; आम्ही त्यांना खाऊ-पिऊ घालायचो, त्यांना आपल्याच घरात असल्यासारखं भासवायचो. आमच्या मुलांना त्यांच्या आवडीचं सुरक्षित वातावरण देण्याकरता आम्ही, मुलांचा तो गोंधळ आणि गोंगाट सहन करायला तयार होतो.”

ब्रायन आणि मेरी यांना तीन सुस्वभावी मुले आहेत; पण यांना प्रशिक्षण देणे नेहमीच सोपे नव्हते हे ते दोघेही कबूल करतात. ते म्हणतात: “आमच्या मंडळीत, आमची मुलगी जेन हिच्याबरोबर मैत्री करायला तिच्या वयाचे फार तुरळक किशोरवयीन होते. पण तिची सूझन नावाची एक मैत्रीण होती. सूझन, मनमिळाऊ, हसमुख मुलगी होती. पण तिच्या आईवडिलांनी तिला जरा मोकळीक दिली होती. जेनला संध्याकाळी लवकर घरी यायला आम्ही सांगितलं होतं; पण सुझनला रात्री उशिरा यायची, तोकडे स्कर्ट घालायची, आक्षेपार्ह संगीत ऐकायची, न शोभणारे चित्रपट पाहण्याची मुभा होती. कित्येक दिवसांपर्यंत जेनला आमचा दृष्टिकोन समजत नव्हता. तिला वाटायचं, सुझनचे आईवडील जास्त समजदार आहेत आणि आम्ही खूपच कडक आहोत. पण सुझन जेव्हा एका फंदात पडली तेव्हा जेनचे डोळे उघडले; तिला तेव्हा समजलं, की आमचा कडकपणा तिच्याच संरक्षणासाठी होता. आमच्या मुलीसाठी काय बरोबर आहे याबाबतीत आम्ही घेतलेल्या ठाम भूमिकेत आम्ही डगमगलो नाही, ते बरं झालं.”

जेनप्रमाणे पुष्कळ तरुण, संगतीच्या बाबतीत आईवडिलांच्या मार्गदर्शनाचे पालन करून सुज्ञता दाखवण्यास शिकले आहेत. एक नीतिसूत्र असे म्हणते: “जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करितो.” (नीतिसूत्रे १५:३१) ईश्‍वरी बुद्धी तरुणांना उभारणीकारक असलेले मित्र शोधण्यास प्रवृत्त करते.

अनुकरण करण्याच्या दबावाचा सामना करणे

मैत्री, संगती या गोष्टींचा संबंध साथीदारांच्या दबावाशी आहे. इतर मुलामुलींचे अनुकरण करण्याच्या दबावाचा, आपल्या मुलाच्या प्रतिकार क्षमतेवर सतत हल्ला होत असतो. तरुणांना आपल्याच वयोगटातील मित्रमैत्रीणींची मर्जी राखायची इच्छा असल्यामुळे, साथीदारांचा दबाव त्यांना, जग ज्याला आकर्षक समजते त्या साच्यात कोंबू शकते.—नीतिसूत्रे २९:२५.

बायबल आपल्याला आठवण करून देते, की “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत.” (१ योहान २:१७) त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांवर जगाच्या विचारसरणीचा फार परिणाम होऊ देऊ नये. आपल्या मुलांना ख्रिस्ती मार्गाने विचार करण्यास ते कशाप्रकारे मदत करू शकतात?

रिचर्ड म्हणतो: “माझ्या मुलीला इतर मुलं जे कपडे घालतात तसेच कपडे घालायची इच्छा असायची. त्यामुळे आम्ही तिच्या प्रत्येक मागणीचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत यावर तिच्याशी अगदी धीराने तर्क करायचो. ज्या फॅशन्स स्वीकारयोग्य आहेत त्या फॅशन्सच्या बाबतीतही आम्ही, काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या पुढील सल्ल्यानुसार विचार करायचो, ‘जी व्यक्‍ती, नवीन फॅशन सर्वात आधी अनुसरत नाही किंवा ती सोडून देण्यात शेवटली नसते, ती व्यक्‍ती सुज्ञ आहे.’”

पॉलीन नावाच्या एका आईने साथीदारांच्या दबावाच्या समस्येला एका वेगळ्या प्रकारे हाताळले. तिने आठवून सांगितले: “मी माझ्या मुलांच्या कल्याणात मनापासून आवड घेतली; मी त्यांच्याशी बोलायला नेहमी त्यांच्या खोलीत जायचे. त्यांच्याबरोबर खूप वेळपर्यंत मारलेल्या गप्पांमुळे मी त्यांच्या कल्पनांना आकार देऊ शकले आणि एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या प्रकारे पाहण्यास शिकवू शकले.”

साथीदारांचा दबाव हा नाहीसा होणार नाही त्यामुळे पालकांना कदाचित, ‘जगिक तर्कवितर्कांना पाडायचा’ सतत प्रयत्न करावा लागेल आणि आपल्या मुलांच्या विचारसरणीला, “अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास” त्यांना मदत करावी लागेल. (२ करिंथकर १०:५) पण “प्रार्थनेत तत्पर” राहिल्याने आईवडील आणि मुले या दोघांना हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्याची शक्‍ती मिळेल.—रोमकर १२:१२; स्तोत्र ६५:२.

मनोरंजनाचे जबरदस्त आकर्षण

पालकांना मार्गदर्शन पुरवण्यास कठीण वाटणारी आणखी एक गोष्ट मनोरंजन. लहान मुलांना खेळायला आवडते, हे साहजिक आहे. पुष्कळ तरुणांनाही करमणूक हवीहवीशी वाटते. (२ तीमथ्य २:२२) पण चुकीच्या मार्गाने ही इच्छा पूर्ण केल्यास, त्यांची आध्यात्मिक प्रतिकार क्षमता कमजोर होऊ शकते. दोन मार्गांनी प्रामुख्याने धोका संभावू शकतो.

सर्वप्रथम, पुष्कळशा मनोरंजनातून जगाचे खालावलेले नैतिक दर्जे दिसून येतात. (इफिसकर ४:१७-१९) तरीपण ते अतिशय रोमांचक व आकर्षक पद्धतीने मांडले जाते. हे तरुणांसाठी खरोखरच धोकादायक ठरू शकते कारण त्यांना यात दडलेले खाचखळगे दिसत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे, मनोरंजनात घालवलेल्या वेळामुळे देखील समस्या निर्माण होऊ शकतात. काहींसाठी, मौजमजा करणे जीवनात सर्वात महत्त्वाचे असते; यांत ते त्यांचा भरपूर वेळ आणि शक्‍ती खर्च करतात. पण एक नीतिसूत्रे अशी ताकीद देते: “मधाचे अति सेवन करणे बरे नाही.” (नीतिसूत्रे २५:२७) तसेच, अति मनोरंजनामुळे, आध्यात्मिक अन्‍नासाठी आपली भूख कमी होऊ शकते व आपण मानसिकरीत्या आळशी बनू शकतो. (नीतिसूत्रे २१:१७; २४:३०-३४) या जगाचा पुरेपूर आनंद लुटल्यामुळे तरुणांना देवाच्या नव्या जगातील सार्वकालिक जीवन अर्थात ‘खरे जीवन बळकट धरता’ येणार नाही. (१ तीमथ्य ६:१२, १९) पालकांनी या समस्येवर कशाप्रकारे मात केली आहे?

तीन मुलींची आई असलेल्या मारी कारमनने म्हटले: “आमच्या मुलींना हितकारक मनोरंजन मिळावे, त्यांनी त्यातून मनसोक्‍त आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही कुटुंब मिळून बाहेर जायचो; त्याही मंडळीतील त्यांच्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवायच्या. पण मनोरंजनाला आम्ही जागच्या जागी ठेवलं होतं. आम्ही मनोरंजनाची तुलना आपण जेवल्यानंतर जो गोड पदार्थ खातो त्याच्याशी करायचो—गोड आहे परंतु ते मुख्य जेवण नाही. यामुळे त्या कामासू वृत्तीच्या बनल्या; घरी, शाळेत, मंडळीत त्या काम करायच्या.”

डॉन आणि रूथने देखील मनोरंजनाच्या बाबतीत खास प्रयत्न केले. ते म्हणाले: “आम्ही शनिवारचा दिवस ‘आपल्या कुटुंबाचा दिवस’ म्हणून ठरवून टाकला. त्या दिवशी आम्ही सकाळी क्षेत्र सेवेत जायचो, दुपारी पोहायला जायचो आणि मग संध्याकाळी खास जेवणाचा बेत करायचो.”

या पालकांनी आपले जे मनोगत व्यक्‍त केले त्यावरून, आपल्या मुलांना हितकारक मनोरंजन करू देण्यात समतोल राखण्याचे व ख्रिस्ती लोकांच्या जीवनात त्याला उचित जागी ठेवण्याचे मूल्य दिसून येते.—उपदेशक ३:४; फिलिप्पैकर ४:५.

यहोवावर भरवसा ठेवा

आध्यात्मिक प्रतिकार क्षमता विकसित व्हायला बरीच वर्षे लागतात, हे कबूल आहे. मुलांना ईश्‍वरी बुद्धी देणारा, त्यांना त्यांच्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करणारा असा झटपट उपाय नाही. तर, पालकांनी ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवत राहिले’ पाहिजे. (इफिसकर ६:४) सतत ‘शिक्षण’ देण्याचा अर्थ, मुलांना, निरनिराळ्या गोष्टींबद्दल देवाचा दृष्टिकोन बाळगण्यास शिकवणे. पालक हे कसे करू शकतात?

नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास यशाची गुरूकिल्ली आहे. अभ्यासामुळे मुलांचे ‘नेत्र उघडतील. म्हणजे देवाच्या नियमशास्त्रातील अद्‌भुत गोष्टी त्यांच्या दृष्टीस पडतील.’ (स्तोत्र ११९:१८) थिएगो यांनी कौटुंबिक अभ्यास अतिशय गंभीरपणे घेतला आणि अशाप्रकारे आपल्या मुलांना यहोवाच्या जवळ येण्यास मदत केली. ते म्हणाले: “मी अभ्यासाची अगदी चांगल्याप्रकारे तयारी करायचो. शास्त्रवचनीय प्रकाशनांत संशोधन केल्यामुळे मी बायबलमधील पात्रांचे अगदी वास्तविक वर्णन करायला शिकलो. तुमच्या जीवनात व बायबलमधील विश्‍वासू जनांच्या जीवनात काय साम्य दिसते का, हे पाहण्यासाठी मी मुलांना उत्तेजन द्यायचो. यामुळे माझ्या मुलांना, यहोवा कशामुळे संतुष्ट होतो याची स्पष्टपणे आठवण करून दिली जायची.”

अनौपचारिक मार्गांनी देखील मुले शिकतात. मोशेने पालकांना, यहोवाच्या सूचनांविषयी “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत” राहण्यास आर्जवले. (अनुवाद ६:७) एका पित्याने म्हटले: “माझ्या मुलाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला, आपल्या भावना व्यक्‍त करायला जरा वेळ लागतो. आम्ही जेव्हा फिरायला जातो किंवा कुठलं तरी काम सोबत करत असतो तेव्हा तो हळूहळू आपलं मन माझ्यापुढे हलकं करू लागतो. अशाप्रसंगी, आम्ही अशा उभारणीकारक गोष्टी करतो ज्यामुळे आम्हा दोघांनाही फायदा होतो.”

पालकांनी केलेल्या प्रार्थनांचा देखील मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. आपल्या पालकांना, देवाकडे नम्रपणे मदतीची याचना करताना, क्षमा मागताना मुले पाहतात तेव्हा तेही “तो आहे” असा विश्‍वास करण्यास प्रवृत्त होतात. (इब्री लोकांस ११:६) पुष्कळ यशस्वी पालकांनी, कौटुंबिक प्रार्थनांच्या महत्त्वावर जोर दिला आहे; यांत अशाही प्रार्थनांचा समावेश होतो ज्या, शाळेतील गोष्टींबाबत किंवा ज्या गोष्टींमुळे मुले अस्वस्थ झाली आहेत अशा गोष्टींबाबत केल्या जातात. एका पित्याने म्हटले, की त्यांची पत्नी आपली मुले शाळेला निघण्याआधी त्यांच्याबरोबर नेहमी प्रार्थना करते.—स्तोत्र ६२:८; ११२:७.

“चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये”

सर्व पालक चुका करतात आणि आपण विशिष्ट गोष्ट अशी हाताळायला नको होती म्हणून पस्तावत असतील. तरीपण, बायबल आपल्याला प्रयत्न करीत राहण्यास, ‘चांगले करण्याचा कंटाळा न करण्यास’ आर्जवते.—गलतीकर ६:९.

पंरतु, कधीकधी ते, आपण मुलांना समजूच शकत नाहीत म्हणून आशा सोडून देतील. ते असा सहजपणे निष्कर्ष काढतील, की आजची तरुण पिढी वेगळी आणि कठीण आहे. पण खरेतर, पूर्वीच्या पिढीतल्या मुलांमध्ये ज्या उणीवा होत्या त्याच उणीवा आजच्या पिढीच्या मुलांमध्ये देखील आहेत, त्यांनाही त्याच मोहांचा सामना करावा; फरक इतकाच की चुका करण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे आपल्या मुलाला शिक्षा दिल्यानंतर एका पित्याने त्याला प्रेमळ शब्दांत सांगितले: “मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला जे करावसं वाटतं होतं तेच तुलाही करावंसं वाटतयं.” पालकांना कंप्यूटर्सची फारशी माहिती नसेल परंतु, अपरिपूर्ण शरीराचा कल कोठे असतो याविषयी त्यांना सर्व माहीत आहे.—मत्तय २६:४१; २ करिंथकर २:११.

कदाचित काही मुले, आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाविषयी नाखूष असतील किंवा त्यांना मिळत असलेल्या शिक्षेविरुद्ध कदाचित बंडही करतील. पुन्हा सहनशीलता दाखवणे गरजेचे आहे. सुरवातीला ते कचरतील किंवा कदाचित काही काळपर्यंत नाराज असतील; परंतु पुष्कळ मुले कालांतराने अनुकूल प्रतिसाद देतात. (नीतिसूत्रे २२:६; २३:२२-२५) यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करणारा मॅथ्यू म्हणतो: “मी किशोर होतो तेव्हा मला वाटायचं, की माझ्या आईवडिलांनी घातलेली बंधनं चुकीची होती. मी विचार करायचो, माझ्या मित्राचे आईवडील त्याला अमूक गोष्ट करायला परवानगी देतात, मग मला का परवानगी नाही. आणि कधीकधी तर ते मला शिक्षा द्यायचे, काय तर, नाव वल्हवायला जायचं नाही; तेव्हा तर मला त्यांचा खूप राग यायचा, कारण नाव वल्हवायला मला खूप आवडचं. पण आता जेव्हा मी त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला कळतं की, माझ्या आईवडिलांनी दिलेली शिक्षा परिणामकारक आणि आवश्‍यक होती. मला जेव्हा मार्गदर्शन हवं होतं तेव्हा त्यांनी मला ते दिलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो.”

कधीकधी आपल्या मुलांना अहितकारक आध्यात्मिक वातावरणात राहावे लागते. तरीसुद्धा ते उत्तम ख्रिस्ती बनू शकतात. बायबल असे वचन देते, की ईश्‍वरी बुद्धी त्यांना आध्यात्मिक प्रतिकार क्षमता देऊ शकते. “ज्ञान [बुद्धी] तुझ्या चित्तांत प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील.”—नीतिसूत्रे २:१०-१२.

बाळाला नऊ महिने पोटात वागवणे सोपे नाही. आणि त्यानंतरच्या २० वर्षांतही दुःख आणि आनंद दोन्हींचा अनुभव मिळतो. पण आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असल्यामुळे ख्रिस्ती पालक ईश्‍वरी बुद्धीने त्यांचे संरक्षण करण्याचा आपल्या सर्व शक्‍तीनिशी प्रयत्न करतात. वृद्ध प्रेषित योहानाला जसे आपल्या आध्यात्मिक मुलांबद्दल वाटले होते, तसेच पालकांनाही आपल्या मुलांविषयी असे वाटते: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.”—३ योहान ४.

[तळटीप]

^ परि. 7 लेखातील काहींची नावे बदलण्यात आली आहेत.

[२४ पानांवरील चित्र]

“आमचं घर नेहमी खुलं असायचं, घरात सतत तरुण मुलं असायची”

[२५ पानांवरील चित्र]

आपल्या मुलांच्या कल्याणात रस घ्या

[२६ पानांवरील चित्रे]

“मी अभ्यासाची अगदी चांगल्याप्रकारे तयारी करायचो”