व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले

चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले

चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले

“यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रेषितांची कृत्ये १:८.

१, २. पेत्राला कोणती आज्ञा देण्यात आली होती आणि हे कार्य त्याच्यावर कोणी सोपवले होते?

‘नासोरी [येशूने] आम्हाला अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’ (प्रेषितांची कृत्ये १०:३८, ४२) या शब्दांत प्रेषित पेत्राने सुवार्तिक या नात्याने आपल्याला देण्यात आलेल्या आज्ञेविषयी कर्नेल्य व त्याच्या कुटुंबाला स्पष्टीकरण दिले.

येशूने ही आज्ञा केव्हा दिली होती? पुनरुत्थित येशूने आपले स्वर्गारोहण होण्याआधी जे म्हटले होते त्याची कदाचित पेत्राला आठवण झाली असावी. त्या प्रसंगी येशूने आपल्या विश्‍वासू शिष्यांना सांगितले: “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषितांची कृत्ये १:८) पण येशूवर असलेल्या आपल्या विश्‍वासासंबंधी आपल्याला इतरांना सांगावे लागेल हे काही काळाआधीपासूनच पेत्राला माहीत होते.

तीन वर्षांचे प्रशिक्षण

३. येशूने कोणता चमत्कार केला आणि पेत्र व अंद्रिया यांना त्याने कोणते आमंत्रण दिले?

सा.यु. २९ साली येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर काही महिन्यांनी तो, पेत्र व त्याचा भाऊ आंद्रियास गालील समुद्रात जेथे मासेमारीचा व्यवसाय करत होते तेथे प्रचार करण्यास आला. पेत्र व आंद्रियास यांनी रात्रभर परिश्रम केले होते पण त्यांच्या जाळ्यांत काही आले नाही. तरीसुद्धा येशूने त्यांना म्हटले: “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले तेव्हा “माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली.” हा चमत्कार पाहून पेत्र भयभीत झाला पण येशू त्याला म्हणाला: “भिऊ नको; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”—लूक ५:४-१०.

४. (क) येशूने आपल्या शिष्यांना चांगल्याप्रकारे साक्ष देण्याकरता कशाप्रकारे तयार केले? (ख) येशूच्या व त्याच्या शिष्यांच्या सेवाकार्यात कोणता फरक असणार होता?

लगेच, पेत्र व आंद्रियास, तसेच जब्दीचे मुलगे याकोब व योहान यांनी आपापल्या नावा सोडून दिल्या व ते येशूच्या मागे गेले. जवळजवळ तीन वर्षे ते येशूसोबत त्याच्या प्रचार दौऱ्‍यांवर त्याच्यासोबत फिरले; या काळात त्यांना सुवार्तिक कार्याचे प्रशिक्षण मिळाले. (मत्तय १०:७; मार्क १:१६, १८, २०, ३८; लूक ४:४३; १०:९) हा प्रशिक्षणाचा काळ संपुष्टात आल्यानंतर, सा.यु. ३३ निसान १४ रोजी येशूने त्यांना सांगितले: “मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्‍वास ठेवणाराहि करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.” (योहान १४:१२) येशूचे शिष्य त्याच्यासारखेच चांगल्याप्रकारे साक्ष देणार होते पण त्याच्यापेक्षाही फार मोठ्या प्रमाणावर. त्यांना लवकरच याची जाणीव झाली की आपण व भविष्यातील येशूचे सर्व शिष्य ‘सर्व राष्ट्रांत,’ “युगाच्या समाप्तीपर्यंत” साक्ष देतील.—मत्तय २८:१९, २०.

५. येशूने आपल्या अनुयायांना दिलेल्या प्रशिक्षणातून आपण कशाप्रकारे फायदा मिळवू शकतो?

आज आपण ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत. (मत्तय २४:३) त्या सुरवातीच्या शिष्यांप्रमाणे आपण तर येशूसोबत जाऊन, लोकांना तो कशाप्रकारे प्रचार करतो हे प्रत्यक्ष पाहू शकत नाही. पण तरीसुद्धा, त्याने दिलेल्या प्रशिक्षणाचा आपण फायदा करून घेऊ शकतो. त्याने कशाप्रकारे प्रचार केला व आपल्या अनुयायांना त्याने कोणत्या सूचना दिल्या याविषयी बायबलमधून वाचण्याद्वारे आपण असे करू शकतो. (लूक १०:१-११) पण, येशूने आपल्या स्वतःच्या उदाहरणातून शिष्यांना दाखवलेल्या आणखी एका महत्त्वाच्या गुणाविषयी अर्थात प्रचार कार्याप्रती योग्य मनोवृत्ती बाळगण्याबद्दल या लेखात आपण विचार करणार आहोत.

लोकांबद्दल कळकळ

६, ७. येशूच्या कोणत्या गुणामुळे त्याचे साक्षकार्य परिणामकारक ठरले आणि याबाबतीत आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?

येशूचे साक्षकार्य इतके परिणामकारक का होते? याचे एक कारण म्हणजे त्याला लोकांमध्ये स्वारस्य व त्यांच्याबद्दल कळकळ होती. स्तोत्रकर्त्याने त्याच्याविषयी असे भाकीत केले होते की “दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील.” (स्तोत्र ७२:१३) येशूने निश्‍चितच आपल्याविषयी करण्यात आलेले हे भाकीत पूर्ण केले. बायबलमध्ये एका प्रसंगाचे अशाप्रकारे वर्णन केले आहे: “लोकसमुदायांना पाहून त्याचा [येशूला] कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) घोर पापे केलेल्यांनाही येशूला आपल्याबद्दल किती कळकळ वाटते हे जाणवायचे आणि ते त्याच्याकडे ओढले जायचे.—मत्तय ९:९-१३; लूक ७:३६-३८; लूक १९:१-१०.

आपणही लोकांबद्दल तशीच कळकळ व्यक्‍त केली तर आपले साक्षकार्य देखील परिणामकारक होऊ शकते. साक्षकार्यासाठी घराबाहेर पडण्याआधी, आपण लोकांपर्यंत जी माहिती नेत आहोत त्या माहितीची त्यांना किती नितान्त गरज आहे याचा क्षणभर थांबून तुम्हाला विचार करता येईल का? त्यांच्यासमोर असलेल्या अशा समस्यांविषयी विचार करा, की ज्या केवळ देवाच्या राज्याद्वारेच सोडवल्या जातील. सेवाकार्य करताना तुम्हाला भेटणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीबद्दल आशावादी असा कारण राज्याच्या संदेशाला कोण प्रतिसाद देईल हे तुम्हाला ठाऊक नाही. कदाचित तुम्हाला भेटणारी पुढचीच व्यक्‍ती, तुमच्यासारख्या कोणा व्यक्‍तीने येऊन आपल्याला मदत करावी अशी प्रार्थना करत असावी!

प्रीतीने प्रेरित होऊन सेवा करणे

८. येशूप्रमाणेच त्याच्या अनुयायांना कशामुळे सुवार्ता घोषित करण्याची प्रेरणा मिळते?

येशूने घोषित केलेली सुवार्ता यहोवाच्या इच्छेच्या पूर्णतेशी, त्याच्या नावाच्या पवित्रिकरणाशी व त्याच्या सार्वभौमत्वाच्या दोषनिवारणाशी—अर्थात मानवजातीपुढे असलेल्या सर्वात महत्त्वाच्या वादविषयांशी संबंधित होती. (मत्तय ६:९, १०) येशूचे आपल्या पित्यावर प्रेम होते म्हणूनच तो शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्यास व हे वादविषय ज्यांद्वारे कायमचे सोडवले जातील त्या राज्याबद्दल लोकांना चांगल्याप्रकारे साक्ष देण्यास प्रेरित झाला. (योहान १४:३१) येशूच्या अनुयायांना देखील याच गोष्टी आज प्रेरित करत असल्यामुळे ते परिश्रमाने सेवाकार्यात सहभाग घेतात. प्रेषित योहानाने म्हटले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” देवाच्या आज्ञांमध्ये सुवार्तेचा प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या आज्ञेचाही समावेश आहे.—१ योहान ५:३; मत्तय २८:१९, २०.

९, १०. देवाबद्दल असलेल्या प्रेमाव्यतिरिक्‍त आणखी कोणते प्रेम आपल्याला चांगल्याप्रकारे साक्ष देण्यास प्रेरित करते?

येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “माझ्यावर तुमची प्रीति असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे.” (योहान १४:१५, २१) तर येशूबद्दल असलेल्या प्रीतीने, सत्याविषयी साक्ष देण्याची व त्याने दिलेल्या इतर आज्ञांचे पालन करण्याची आपल्याला प्रेरणा दिली पाहिजे. पुनरुत्थानानंतर एकदा जेव्हा येशू आपल्या शिष्यांना प्रकट झाला तेव्हा त्याने पेत्राला म्हटले: “माझी कोकरे चार. . . . माझी मेंढरे पाळ . . . माझी मेंढरे चार.” कशामुळे प्रेरित होऊन पेत्राने हे करायचे होते? येशूने पेत्राला वारंवार विचारलेल्या एका प्रश्‍नातून आपल्याला वरील प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकते. त्याने पेत्राला विचारले: “तू माझ्यावर . . . प्रीति करितोस काय? . . . माझ्यावर प्रीति करितोस काय? . . . माझ्यावर प्रेम करितोस काय?” होय, पेत्राला येशूबद्दल प्रेम असल्यामुळे त्याला चांगल्याप्रकारे साक्ष देण्याची, येशूच्या ‘कोकरांना’ शोधून त्यांचे आध्यात्मिकरित्या पालन करण्याची प्रेरणा मिळणार होती.—योहान २१:१५-१७.

१० आज पेत्राप्रमाणे आपण वैयक्‍तिकरित्या येशूला ओळखत नाही. तरीसुद्धा येशूने आपल्याकरता जे काही केले त्याबद्दल आपल्याला सविस्तर ज्ञान मिळाले आहे. ज्या अद्‌भूत प्रेमाने प्रेरित होऊन त्याने ‘प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घेतला’ त्या प्रेमाने आपल्या अंतःकरणाला स्पर्श केला आहे. (इब्री लोकांस २:९; योहान १५:१३) आपल्या भावनाही पौलासारख्या आहेत, ज्याने म्हटले: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. . . . तो सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर . . . त्याच्याकरिता जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५) येशूने आपल्याकरता दाखवलेल्या प्रेमाची आपण कदर करतो हे आपण आपल्या कृतींतून दाखवतो; आणि आपलेही त्याच्यावर प्रेम आहे हे आपण चांगल्याप्रकारे साक्ष देण्याच्या त्याच्या आज्ञेचे गांभीर्याने पालन करण्याद्वारे दाखवतो. (१ योहान २:३-५) प्रचार कार्याबद्दल आपण कधीही हलगर्जीपणाची वृत्ती दाखवू नये, कारण असे केल्यास आपल्याला येशूच्या बलिदानाची कदर नाही असे दिसून येईल.—इब्री १०:२९.

लक्ष विचलित न होऊ देणे

११, १२. येशू या जगात कोणत्या उद्देशाने आला व हे कार्य आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे कार्य आहे हे त्याने कशाप्रकारे दाखवले?

११ येशूला पंतय पिलातासमोर नेण्यात आले तेव्हा तो म्हणाला: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) सत्याविषयी साक्ष देण्यापासून येशूने कोणत्याही गोष्टीमुळे आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्याच्याकरता देवाची हीच इच्छा होती.

१२ या बाबतीत सैतानाने निश्‍चितच येशूची परीक्षा घेतली. त्याच्या बाप्तिस्म्याच्या काही काळानंतर सैतानाने त्याला जगाच्या दृष्टीत एक प्रतिष्ठित व्यक्‍ती बनवण्याचे आमीष दाखवले; “सर्व राज्ये व त्यांचे वैभव” मी तुला देईन असे तो येशूला म्हणाला. (मत्तय ४:८, ९) नंतर यहुदी लोकांनीही येशूला राजा बनवण्याचा प्रयत्न केला. (योहान ६:१५) काहीजण कदाचित विचार करतील की येशूने हे प्रस्ताव स्वीकारले असते, तर एक मानवी राजाच्या भूमिकेत तो मानवजातीकरता बरेच काही करू शकला असता. पण येशूने अशाप्रकारे विचार केला नाही. सत्याविषयी साक्ष देणे हे त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे कार्य होते.

१३, १४. (क) कशामुळे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या कार्यापासून येशूचे लक्ष विचलित झाले नाही? (ख) भौतिकरित्या येशू गरीब असला तरीही त्याने काय साध्य केले?

१३ शिवाय, धनसंपत्तीच्या मोहानेही येशू कधी विचलित झाला नाही. त्यामुळे, त्याच्याजवळ धनसंपत्ती नव्हती. किंबहुना, त्याच्याजवळ स्वतःचे घर देखील नव्हते. एके प्रसंगी त्याने म्हटले: “खोकडांस बिळे व आकाशातील पांखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (मत्तय ८:२०) येशूचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्याजवळ असलेली एकमेव मोलवान वस्तू, त्याचे वस्त्र होते ज्यांवर रोमी शिपायांनी चिठ्ठ्या टाकल्या. (योहान १९:२३, २४) पण याचा अर्थ येशूने जीवनात काही साध्य केले नाही का? नक्कीच असे म्हणता येणार नाही!

१४ जगातल्या सर्वात धनाढ्य दानशूर व्यक्‍तीनेही जे केले असते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने येशूने केले. पौलाने म्हटले: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे; तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्‌याने तुम्ही धनवान व्हावे.” (२ करिंथकर ८:९; फिलिप्पैकर २:५-८) भौतिकरित्या गरीब असूनही येशूने नम्र व्यक्‍तींकरता परिपूर्ण सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत! आणि देवाची इच्छा करण्यापासून तो कधीही विचलित न झाल्यामुळे त्याला स्वर्गात गौरव मिळाले याकरता आपण किती आनंदी आहोत!—स्तोत्र ४०:८; प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३ ३६.

१५. धनसंपत्तीपेक्षा अधिक मोलाचे काय आहे?

१५ आज येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणारे ख्रिस्ती देखील धनसंपत्तीच्या मागे लागून आपले लक्ष विचलित होऊ देत नाहीत. (१ तीमथ्य ६:९, १०) धनसंपत्तीमुळे मनुष्य ऐषोआरामात जीवन जगू शकतो पण त्यामुळे सार्वकालिक भविष्याच्या दृष्टीने कोणताही फायदा होत नाही हे त्यांना माहीत आहे. येशूचे वस्त्र ज्याप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या काहीच कामाचे नव्हते, त्याचप्रमाणे ख्रिस्ती व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यानंतर, तिची भौतिक संपत्ती तिच्या उपयोगाची राहात नाही. (उपदेशक २:१०, ११, १७-१९; ७:१२) त्यावेळी, केवळ एकच गोष्ट खऱ्‍या मोलाची असते आणि ती म्हणजे, यहोवा व येशू ख्रिस्तासोबतचा तिचा नातेसंबंध.—मत्तय ६:१९-२१; लूक १६:९.

विरोधामुळे माघार न घेणे

१६. येशूने विरोधाला कशाप्रकारे तोंड दिले?

१६ येशूला विरोधाला तोंड द्यावे लागले तेव्हा देखील त्याने सत्याविषयी साक्ष देण्यापासून आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. पृथ्वीवरील साक्षकार्याच्या शेवटी आपला मृत्यू होईल हे माहीत असूनही तो निरुत्साहीत झाला नाही. पौलाने येशूबद्दल म्हटले: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री लोकांस १२:२) येशूने ‘लज्जा तुच्छ मानली,’ याकडे लक्ष द्या. विरोधकांचे आपल्याबद्दल काय मत आहे याची त्याने चिंता केली नाही. त्याचे पूर्ण लक्ष केवळ देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यावर होते.

१७. येशूच्या सहनशीलतेवरून आपण काय शिकू शकतो?

१७ येशूच्या सहनशीलतेचे उदाहरण देऊन पौल ख्रिश्‍चनांना असे प्रोत्साहन देतो: “तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.” (इब्री लोकांस १२:३) अर्थात, निरंतर विरोधाला व उपहासाला तोंड देणे सोपे नाही, यामुळे आपण खचून जातो, हे अगदी खरे आहे. जगातील आकर्षक गोष्टींचा व जीवनात “काहीतरी” करून दाखवण्याचे सतत प्रोत्साहन देणाऱ्‍या नातलगांचा प्रतिकार करता करता आपण थकून जाऊ शकतो. पण येशूप्रमाणे आपण यहोवाकडून साहाय्याची अपेक्षा करतो आणि ठामपणे राज्यालाच जीवनात प्राधान्य देतो.—मत्तय ६:३३; रोमकर १५:१३; १ करिंथकर २:४.

१८. येशूने पेत्राला जे म्हटले त्यावरून कोणता चांगला धडा आपल्याला शिकायला मिळतो?

१८ येशूने कधीच आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही हे, लवकरच होणार असलेल्या आपल्या मृत्यूबद्दल त्याने पहिल्यांदा शिष्यांस सांगितले त्याप्रसंगी स्पष्ट दिसून आले. पेत्र येशूला म्हणाला “प्रभुजी, आपणावर दया असो,” व त्याने त्याला असे म्हणून दिलासा दिला की “असे आपल्याला होणारच नाही.” पण यहोवाची इच्छा पूर्ण करण्याच्या आपल्या निर्धारापासून विचलित करेल अशी कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यास येशू तयार नव्हता. त्याने पेत्राकडे पाठ करून म्हटले: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.” (मत्तय १६:२१-२३) येशूप्रमाणे आपणही इतक्याच दृढनिश्‍चयाने मनुष्यांचे विचार धुडकावून लावू या व त्याऐवजी देवाच्या विचारांचे मार्गदर्शन स्वीकारू या.

खऱ्‍या मोलाचे आशीर्वाद

१९. येशूने चमत्कार केले तरीसुद्धा त्याच्या सेवाकार्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते होते?

१९ आपणच मशीहा आहोत हे सिद्ध करण्याकरता येशूने अनेक चमत्कार केले. त्याने मृतांनाही उठवले. हे चमत्कार पाहून लोक त्याच्याकडे आकर्षित झाले, पण येशू केवळ अशी समाजसेवा करण्यासाठी या पृथ्वीवर आला नव्हता. तो सत्याविषयी साक्ष देण्याकरता आला होता. त्याला माहीत होते की आपण भौतिक गोष्टी पुरवल्या तरीसुद्धा त्या तात्पुरत्या असतील. पुनरुत्थान झालेल्या व्यक्‍ती देखील पुन्हा मरतील. पण केवळ सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे आपण लोकांना सार्वकालिक जीवन मिळवण्यास मदत करू शकतो.—लूक १८:२८-३०.

२०, २१. चांगली कार्ये करण्यासंबंधी खरे ख्रिस्ती कशाप्रकारे संतुलन दाखवतात?

२० आज काहीजण नवी इस्पितळे बांधून व जगातल्या गरीब लोकांच्या कल्याणाकरता इतर सेवा करून येशूच्या चांगल्या कार्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी तर या सेवेसाठी ते बराच स्वार्थत्याग देखील करतात. त्यांची ही सेवाभावी वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. पण त्यांनी कितीही मदत केली तरीसुद्धा ती तात्पुरतीच आहे. केवळ देवाचे राज्य कायमची सुटका देऊ शकते. म्हणूनच, यहोवाचे साक्षीदार येशूप्रमाणेच त्या राज्याच्या सत्याविषयी साक्ष देण्याकडे प्रामुख्याने लक्ष देतात.

२१ अर्थात खरे ख्रिस्तीही चांगली कार्ये करतात. पौलाने लिहिले: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) संकटाच्या काळी किंवा एखादी व्यक्‍ती गरजू असते तेव्हा आपणही सहमानवांचे किंवा आपल्या ख्रिस्ती बांधवांचे ‘बरे करण्यास’ मागेपुढे पाहत नाही. पण तरीसुद्धा जे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे, अर्थात सत्याविषयी साक्ष देणे याकडेच आपण प्रामुख्याने लक्ष देतो.

येशूच्या उदाहरणावरून शिका

२२. ख्रिस्ती आपल्या सहमानवांना प्रचार का करतात?

२२ पौलाने लिहिले: “जर मी शुभवर्तमान सांगत नाही तर मला हायहाय!” (१ करिंथकर ९:१६, पं.र.भा.) पौलाने सुवार्तेविषयी बेपर्वा मनोवृत्ती बाळगली नाही कारण यावरच त्याचे आणि त्याचे ऐकणाऱ्‍यांचेही जीवन अवलंबून होते. (१ तीमथ्य ४:१६) आपणही आपल्या सेवाकार्याविषयी हाच दृष्टिकोन बाळगतो. आपल्याला आपल्या सहमानवांना मदत करण्याची इच्छा आहे. आपल्याला यहोवाबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करण्याची इच्छा आहे. आपण येशूबद्दल असलेले प्रेम आपल्या कृत्यांवरून दाखवू इच्छितो आणि त्याने आपल्याबद्दल दाखवलेल्या अद्‌भुत प्रेमाची आपण कदर करतो हे देखील आपण दाखवू इच्छितो. म्हणूनच आपण सुवार्तेची घोषणा करतो आणि अशारितीने “माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे” जगतो.—१ पेत्र ४:१, २.

२३, २४. (क) माशांच्या चमत्कारावरून आपण काय शिकतो? (ख) आज कोण चांगल्याप्रकारे साक्ष देत आहेत?

२३ येशूप्रमाणेच, इतरजण आपली थट्टा करतात किंवा संतप्त होऊन आपला संदेश झिडकारतात तेव्हाही आपण आपले लक्ष विचलित होऊ देत नाही. येशूने पेत्राला व अंद्रियाला आपल्यामागे येण्याची आज्ञा केली तेव्हा त्याने जो चमत्कार केला होता, त्यावरून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. ज्या क्षेत्रांत उत्तम परिणाम मिळत नाहीत असे भासते, तेथे जर आपण येशूच्या आज्ञेचे पालन करून आपली जाळी खाली सोडली तर आपल्या मासेमारीच्या कार्यात आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतात. ख्रिस्ती मासेमारीच्या कार्यात अनेकांनी काहीच फळ न मिळणाऱ्‍या क्षेत्रांत बरीच वर्षे कार्य केल्यावर त्यांना आपल्या कार्याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत. काहीजण अशा क्षेत्रांत राहायला गेले आहेत जेथे कार्य अधिक फलदायी आहे आणि तेथे त्यांना उत्तम परिणाम प्राप्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत आपण आपली जाळी पाण्यात सोडण्याचे थांबवू नये. पृथ्वीवरील कोणत्याही भागात प्रचार कार्य संपुष्टात आल्याचे येशूने अद्याप जाहीर केलेले नाही हे आपल्याला माहीत आहे.—मत्तय २४:१४.

२४ सध्या २३० पेक्षा अधिक देशांत ६० लाख पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार उत्साहीपणे प्रचार कार्य करत आहेत. टेहळणी बुरूजच्या फेब्रुवारी १, २००५ अंकात २००४ सेवा सालच्या त्यांच्या कार्याविषयीचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला जाईल. यहोवा प्रचार कार्याला कशाप्रकारे आशीर्वादित करत आहे हे या अहवालावरून दिसून येईल. या व्यवस्थीकरणाचा जो काही काळ उरला आहे, त्यात आपण पौलाच्या प्रेरक शब्दांकडे सतत लक्ष देऊ या: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) कार्य पूर्ण झाले आहे असे यहोवा आपल्याला सांगत नाही तोवर चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे आपण कधीही सोडू नये.

या वर्षापासून जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक सेवा अहवाल टेहळणी बुरूजच्या जानेवारी १ अंकात प्रकाशित न होता फेब्रुवारी १ अंकात प्रकाशित होईल.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

• येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा आपणही फायदा कशाप्रकारे करून घेऊ शकतो?

• येशूने ज्या लोकांना प्रचार केला त्यांच्याविषयी त्याची कशी मनोवृत्ती होती?

• चांगल्याप्रकारे साक्ष देण्यास कोणती गोष्ट आपल्याला प्रेरित करते?

• येशूप्रमाणे, कोणकोणत्या मार्गांनी आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

येशूसारखी आपणही लोकांबद्दल कळकळ व्यक्‍त केली तर आपलेही सेवाकार्य परिणामकारक ठरेल

[१६, १७ पानांवरील चित्र]

येशू या पृथ्वीवर प्रामुख्याने सत्याविषयी साक्ष देण्याकरता आला होता

[१७ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार चांगल्याप्रकारे साक्ष देण्यावर आपले लक्ष केंद्रित करतात