व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या प्रथांपासून सावध राहा

देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या प्रथांपासून सावध राहा

देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या प्रथांपासून सावध राहा

आफ्रिकाच्या तळपत्या उन्हात, एका लहानशा अंगणात एक उघडी शवपेटी आहे. शोकग्रस्त आपले दुःख व्यक्‍त करत पेटीच्या बाजूने चालत जातात; पण एक वृद्ध मनुष्य थांबतो. दुःखाने भरलेल्या डोळ्यांनी तो मृत मनुष्याच्या अगदी चेहऱ्‍याजवळ येऊन म्हणतो: “तू चालला आहेस, हे मला का सांगितलं नाहीस? तू मला असं का सोडून दिलंस? आता तू गेलाच आहेस तर मला मदत करत राहशील ना?”

आफ्रिकाच्या आणखी एका भागात एका बाळाचा जन्म होतो. कोणालाही त्या बाळाला पाहण्याची परवानगी नाही. विशिष्ट काळानंतरच त्याला लोकांसमोर आणले जाते आणि विधीवत त्याला नाव दिले जाते.

काही लोकांना, मृत व्यक्‍तीबरोबर बोलणे किंवा नवजात बालकाला इतरांपासून लपवून ठेवणे हे विचित्र वाटेल. परंतु, काही संस्कृतींमध्ये व समाजांमध्ये मृत्यू आणि जन्माबद्दल लोकांचे वर्तन आणि दृष्टिकोन यांच्यावर एका जबरदस्त विश्‍वासाचा परिणाम झालेला असतो; असा विश्‍वास की, मृत खरोखर मृत नसतात तर ते जिवंत आणि शुद्धीवर असतात.

हा विश्‍वास इतका पक्का आहे, की तो जीवनाच्या प्रत्येक पैलूला समाविष्ट करणाऱ्‍या प्रथांमध्ये व विधींमध्ये घट्ट विणलेला आहे. उदाहरणार्थ, लक्षावधी लोकांचा असा विश्‍वास आहे, की मनुष्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे—जसे की जन्म, वयात येणे, विवाह, मुलांना जन्म देणे आणि मृत्यू—हे सर्व पूर्वजांच्या आत्मिक क्षेत्रात नेणाऱ्‍या मार्गावरील बदल आहेत. या आत्मिक क्षेत्रात मृत माणूस, तो ज्यांना मागे सोडून आला आहे त्यांच्या जीवनात सक्रिय भूमिका निभावत राहतो, असा विश्‍वास केला जातो. आणि पुनर्जन्माद्वारे त्याचे जीवनचक्र चालू राहू शकते.

या चक्रात, एका टप्प्यातून दुसऱ्‍या टप्प्यात जाण्याची क्रिया सुरळीत व्हावी म्हणून असंख्य प्रथा व विधी पार पाडले जातात. या प्रथांवर व विधींवर, आपल्या शरीरातले काहीतरी मृत्यूनंतर जिवंत राहते या विश्‍वासाचा परिणाम झालेला असतो. परंतु खरे ख्रिस्ती या विश्‍वासाशी निगडीत असलेल्या कोणत्याही प्रथांपासून चार हात दूर राहतात. का?

मृतांची अवस्था काय आहे?

बायबल मृतांच्या स्थितीचे वर्णन अगदी स्पष्ट शब्दांत करते. ते साध्या-सोप्या शब्दांत असे म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; . . . त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ज्या अधोलोकाकडे [शिओल, अर्थात मानवजातीची सर्वसाधारण कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, ६, १०) देवाच्या खऱ्‍या उपासकांनी हे मूलभूत बायबल सत्य केव्हाच स्वीकारले आहे. त्यांनी हे समजून घेतले आहे, की आत्मा, अमर होत नाही तर तोही मरू शकतो, त्याचाही नाश होऊ शकतो. (यहेज्केल १८:४) त्यांना हेही माहीत झाले आहे, की मृतात्मे अस्तित्वात नाहीत. (स्तोत्र १४६:४) प्राचीन काळी यहोवाने आपल्या लोकांना अशी सक्‍त आज्ञा दिली होती, की मृत शुद्धीवर आहेत आणि जिवंतांवर प्रभाव पाडू शकतात या विश्‍वासाशी संबंधित असलेल्या कोणत्याही प्रथांपासून अथवा विधींपासून त्यांनी स्वतःला पूर्णपूणे वेगळे केले पाहिजे.—अनुवाद १४:१; १८:९-१३; यशया ८:१९, २०.

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी देखील, खोट्या धार्मिक शिकवणुकीशी संलग्न असलेल्या सर्वप्रकारच्या पारंपरिक प्रथा अथवा विधी टाळले. (२ करिंथकर ६:१५-१७) आज, यहोवाचे साक्षीदार मग ते कोणत्याही वंशाचे, जातीचे, पार्श्‍वभूमीचे असली तरी, मानवातील काहीतरी मृत्यूनंतर जिवंत राहते या खोट्या शिकवणुकीशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या रुढी-परंपरा व प्रथा टाळतात.

ख्रिस्ती या नात्याने, एखादी प्रथा पाळायची की नाही हे कसे ठरवायचे यासंबंधाने आपल्याला मार्गदर्शन कसे मिळू शकेल? एखाद्या प्रथेचा अशास्त्रवचनीय शिकवणुकींशी संबंध असू शकतो का, जसे की मृतांचे आत्मे जिवंत व्यक्‍तींच्या जीवनावर प्रभाव पाडतात यासारख्या अशास्त्रवचनीय शिकवणुकींशी संबंध असू शकतो का, याचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. शिवाय, अशा प्रथेत किंवा विधीत भाग घेतल्याने, यहोवाचे साक्षीदार काय विश्‍वास करतात व शिकवतात हे माहीत असणाऱ्‍यांना अडखळण होणार नाही, याचाही आपण विचार केला पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवून आपण दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा विचार करू या—जन्म आणि मृत्यू.

जन्म आणि नामकरण विधी

जन्माशी संबंधित असलेल्या अनेक प्रथा उचित आहेत. परंतु, जन्म म्हणजे पितरांच्या आत्म्यांच्या क्षेत्रातून मानव समाजात येणे, असा विश्‍वास जिथे केला जातो त्या ठिकाणी राहणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी याबाबतीत खबरदारी बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील काही भागांत, एका नवजात बालकाला, घराच्या आतच ठेवले जाते आणि विशिष्ट दिवसांनंतरच त्याला नाव दिले जाते. प्रत्येक स्थानानुसार, हा थांबण्याचा कालावधी वेगवेगळा असला तरी, नामकरण विधीने तो समाप्त होतो; या विधीत बालकाला घराबाहेर आणले जाते आणि मग नातेवाईकांना व मित्रपरिवारांना औपचारिकरीत्या दाखवले जाते. त्याच वेळेस, उपस्थित असलेल्या सर्वांना त्याचे नाव सांगितले जाते.

या प्रथेच्या महत्त्वाचे स्पष्टीकरण देताना, घाना—लोक आणि समाजजीवन समजून घेणे (इंग्रजी), या पुस्तकात असे म्हटले आहे: “बालकाच्या जीवनाचे पहिले सात दिवस, ते ‘पाहुणा’ असते आणि आत्मिक जगातून पार्थिव जीवनात स्थलांतरण करत असते, असे समजले जाते. . . . बाळाला सहसा घरातच ठेवले जाते आणि कुटुंबाचे सदस्य नसलेल्या लोकांना त्याला पाहण्याची परवानगी नसते.”

बाळाच्या विधीपूर्वक नामकरणाआधी हा थांबण्याचा कालावधी काय असतो? घानाचे सिंहावलोकन (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “आठव्या दिवसाच्या आधी, ते बाळ मानव नसते. ते जेथून आले आहे अर्थात आत्मिक क्षेत्रातल्यांशी संबंधित असते.” हेच पुस्तक पुढे म्हणते: “नाव दिल्याने बाळाला जणू काय माणसांत सामावले जात असल्यामुळे, ज्या जोडप्याला, आपले बाळ जगणार नाही अशी भीती वाटत असते ते सहसा, ते बाळ जगेल अशी जोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही तोपर्यंत त्याला नाव देत नाहीत. . . . त्यामुळे, या विधीला कधीकधी बाळाला सादर करण्याचा विधी असेही म्हटले जाते आणि बाळ व त्याचे पालक यांच्यावर या विधीचा खूप मोठा परिणाम होतो, असा विश्‍वास केला जातो. हा विधी, बाळाला मानवांच्या संपर्कात किंवा जगात आणतो.”

कुटुंबातील वडीलधारी सहसा हा नामकरण विधी पार पाडतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा विधी पार पाडला जात असला तरी, त्यात प्रामुख्याने, पेयार्पण वाहणे, बाळाच्या सुरक्षित आगमनाबद्दल आभार प्रदर्शन करण्याकरता पितरांच्या आत्म्यांना प्रार्थना करणे आणि इतर विधी असतात.

विधीतील महत्त्वाचा टप्पा, बाळाचे नाव घोषित केले जाते तेव्हा असतो. आपल्या बाळाचे नाव ठेवण्याची पालकांची जबाबदारी असली तरी, इतर नातेवाईकांचा बहुधा निवडलेल्या नावावर बराच प्रभाव असतो. काही नावांचा स्थानीय भाषेत एक लाक्षणिक अर्थ असू शकतो; जसे की, “गेला आणि पुन्हा आला,” “आई दुसऱ्‍यांदा आली आहे,” किंवा “बाबा पुन्हा आले आहेत.” इतर नावांचा असा अर्थ असू शकतो, जो, पितरांना नवजात बालकाला मृतांच्या दुनियेत पुन्हा नेण्यापासून परावृत्त करू शकतो.

बाळाच्या जन्माच्या प्रसंगी आनंद करण्यात काहीच गैर नाही. कोणाच्या तरी नावावरून नाव ठेवणे किंवा जन्माच्या वेळी जन्माशी संबंधित असलेली परिस्थिती दर्शवणारे नाव ठेवणे, यासारख्या प्रथा स्वीकारयोग्य आहेत आणि बाळाचे नाव केव्हा ठेवायचे हा व्यक्‍तिगत निर्णय आहे. परंतु, देवाला संतुष्ट करणारे ख्रिस्ती, त्या सर्वप्रकारच्या प्रथा किंवा विधी टाळतात ज्या, नवजात बालक पितरांच्या आत्मिक दुनियेतून जिवंतांच्या समाजात भेट द्यायला आलेला “पाहुणा” आहे या विश्‍वासाच्या एकमतात असल्याची छाप देतात.

शिवाय, समाजातील अनेक जण नामकरण विधी एक महत्त्वपूर्ण विधी समजत असले तरी, ख्रिश्‍चनांनी इतरांच्या विवेकाचा विचार केला पाहिजे व सत्यात नसलेले आपल्याबद्दल काय विचार करतील याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती परिवाराने त्यांच्या नवजात बालकाला, त्याचे नामकरण विधी होईपर्यंत इतरांपासून लपवून ठेवल्यास काही जण कोणता निष्कर्ष काढतील? बायबल सत्याचे शिक्षक असल्याच्या विरोधात असलेली नावे त्यांनी आपल्या बाळासाठी ठेवलीत तर लोक त्यांच्याविषयी काय समजतील?

यास्तव, आपल्या बाळाला कसे आणि केव्हा नाव दिले पाहिजे हे ठरवताना, ख्रिश्‍चनांनी “सर्व [काही] देवाच्या गौरवासाठी” करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून कोणाला ठोकर बसणार नाही. (१ करिंथकर १०:३१-३३) मृतांच्या आदराप्रीत्यर्थ असलेले ‘संप्रदाय पाळण्याकरता ते देवाची आज्ञा मोडत’ नाहीत. तर ते जिवंत देव यहोवा याचा आदर आणि गौरव करतात.—मार्क ७:९, १३.

मृत्यूनंतर जीवन

जन्माप्रमाणे मृत्यू देखील एक बदल आहे असे पुष्कळ लोक समजतात; मृत व्यक्‍ती दृश्‍य जगातून मृतांचे आत्मे असतात त्या अदृश्‍य जगात जाते असा ते विश्‍वास करतात. पुष्कळांचा असाही विश्‍वास आहे, की एका व्यक्‍तीच्या मृत्यूनंतर विशिष्ट दफनविधी आणि प्रथा पार पाडल्या नाहीत तर पितरांचे आत्मे क्रोधीत होतील कारण, पितरांजवळ जिवंतांना शिक्षा देण्याची किंवा प्रतिफळ देण्याची शक्‍ती आहे. या विश्‍वासाचा, दफनविधींची ज्याप्रकारे योजना केली जाते व त्या ज्याप्रकारे पार पाडल्या जातात त्यावर जबरदस्त प्रभाव आहे.

मृतांचे शमन करण्यासाठी केलेल्या दफनविधीच्या वेळी सहसा वेगवेगळ्या प्रकारे भावप्रदर्शन केले जाते—प्रेतासमोर विलाप करणे व उर बडवून आक्रोश करण्यापासून दफन केल्यानंतर आनंदोत्सव करण्यापर्यंतच्या भावनांचा आविष्कार असतो. अशा दफनविधींत, बेधुंद मेजवानी झोडणे, मद्यपान करणे आणि मोठ्याने असलेल्या संगीताच्या तालावर नाचणे, चाललेले असते. या दफनविधींना इतके महत्त्व दिले जाते, की सर्वात गरीब कुटुंबेसुद्धा, “सन्मानीय दफन” देण्यासाठी भरपूर पैसा गोळा करतात; मग यासाठी त्यांना नंतर हलाखीत दिवस काढावे लागले किंवा त्यांच्यावर कर्जाचे ओझे आले तरी चालेल.

अनेक वर्षांपासून, यहोवाच्या साक्षीदारांनी मात्र, सर्व गैरशास्त्रवचनीय दफनविधींचा पर्दाफाश केला आहे. * अशा विधींमध्ये, जागरणे, पेयार्पणे वाहणे, मृतांबरोबर बोलणे किंवा त्यांना विनंती करणे, पुण्यतिथी विधीपूर्वक साजऱ्‍या करणे आणि व्यक्‍तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातले काहीतरी जिवंत राहते या विश्‍वासावर आधारित असलेल्या इतर प्रथांचा समावेश होतो. अशा देव-निंदक प्रथा “अशुद्ध” आहेत, “पोकळ भुलथापा” आहेत ज्या देवाच्या सत्य वचनावर नव्हे तर ‘माणसांच्या संप्रदायावर’ आधारित आहेत.—यशया ५२:११; कलस्सैकर २:८.

अनुकरण करण्याचा दबाव

मृतांचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असा विश्‍वास असलेल्या देशांत पारंपरिक प्रथा टाळणे काहींना अतिशय जड गेले आहे. अशा प्रथांचे पालन न केल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांकडे संशयाने पाहिले जाते किंवा ते माणूसघाणे लोक आहेत, त्यांना मृतांबद्दल आदर नाही, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. टीकेच्या भीतीमुळे व जबरदस्त दबावामुळे काही ख्रिश्‍चनांना, बायबल सत्याची अचूक समज असूनही, आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्याची भीती वाटते. (१ पेत्र ३:१४) काहींना वाटले आहे, की या प्रथा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहेत व त्यामुळे त्या अगदीच टाळता येणे शक्य नाही. आणखी इतरांचे असे म्हणणे आहे, की प्रथांचे पालन करण्यास नकार दिल्याने, समाजातले लोक देवाच्या लोकांचा द्वेष करू लागतील.

आपण लोकांना विनाकारण नाराज करू इच्छित नाही. तरीपण, बायबल आपल्याला अशी ताकीद देते, की सत्याची बाजू घेतल्यामुळे देवापासून दूर गेलेले जग आपला द्वेष करेल. (योहान १५:१८, १९; २ तीमथ्य ३:१२; १ योहान ५:१९) आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे; आध्यात्मिक अंधकारात असलेल्यांपासून आपण वेगळे असले पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. (मलाखी ३:१८; गलतीकर ६:१२) येशूने जसे, देवाला असंतुष्ट करणारी गोष्ट करण्याचा सैतानाच्या मोहाचा प्रतिकार केला तसेच आपणही, देवाला असंतुष्ट करणारे कोणतेही कार्य करण्याच्या दबावाचा प्रतिकार केला पाहिजे. (मत्तय ४:३-७) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मनुष्याची भीती नसते तर त्यांना यहोवा देवाला संतुष्ट करण्याची आणि सत्य देव म्हणून त्याचा आदर करण्याची इच्छा आहे. ही इच्छा ते, इतरांकडून येणाऱ्‍या दबावाला बळी न पडता शुद्ध उपासनेच्या बाबतीत असलेल्या बायबल तत्त्वांशी हातमिळवणी न करता प्रकट करतात.—नीतिसूत्रे २९:२५; प्रेषितांची कृत्ये ५:२९.

मृतांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगून यहोवाचा आदर करणे

आपली प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा आपल्याला तीव्र मानसिक वेदना व दुःख होते, हे साहजिक आहे. (योहान ११:३३, ३५) आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या आठवणी जपून ठेवणे व तिचे सन्मानीय दफन करणे उचित आहे आणि ते आपल्या प्रेमाचे प्रदर्शनही आहे. परंतु, यहोवाचे साक्षीदार मृत्यूमुळे आलेले प्रचंड दुःख, देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या कोणत्याही प्रथांपासून दूर राहून सहन करतात. मृतांबद्दल तीव्र भय बाळगणाऱ्‍या समाजात लहानाचे मोठे झालेल्यांसाठी हे सोपे नाही. आपल्या अगदी जवळच्या व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्‍या मानसिक दुःखात संतुलन राखणे कठिण वाटू शकते. तरीपण, विश्‍वासू ख्रिश्‍चनांना “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा बळकट करतो आणि सहविश्‍वासू बांधवांकडून मिळणाऱ्‍या प्रेमळ पाठिंब्याचा फायदा होतो. (२ करिंथकर १:३, ४) देवाच्या स्मरणात असलेले व कोणतीही जाणीव नसलेले मृत, एके दिवशी पुन्हा जिवंत केले जातील, असा त्यांचा पक्का विश्‍वास आहे; यामुळे, पुनरुत्थानाच्या वास्तविकतेचा नकार करणाऱ्‍या अख्रिस्ती दफनविधींपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवण्यासाठी खऱ्‍या ख्रिश्‍चनांजवळ ठोस कारण आहे.

यहोवाने आपल्याला “अंधकारांतून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले” आहे म्हणून आपण आनंदी नाही का? (१ पेत्र २:९) जन्मामुळे होणाऱ्‍या आनंदाचा आणि मृत्यूमुळे होणाऱ्‍या दुःखाचा अनुभव घेत असताना, जे उचित आहे ते करण्याची तीव्र इच्छा आणि यहोवा देवाबद्दलचे मनापासूनचे प्रेम आपल्याला, “प्रकाशाच्या प्रजेसारखे” चालत राहण्यास प्रवृत्त करो. देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या अख्रिस्ती प्रथांद्वारे आपण स्वतःला केव्हाही आध्यात्मिकरीत्या भ्रष्ट होऊ देऊ नये.—इफिसकर ५:८.

[तळटीप]

^ परि. 23 कृपया, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का (इंग्रजी), आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारा मार्ग—तुम्हाला तो सापडला आहे का? (इंग्रजी), ही माहितीपत्रके पाहा.