व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवावरील प्रेमामुळे जवळ आलेले

देवावरील प्रेमामुळे जवळ आलेले

देवावरील प्रेमामुळे जवळ आलेले

सामान्य युगाच्या पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली. मंडळीतील सदस्य अनेक वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींचे होते; पण तरीसुद्धा या मंडळीच्या उल्लेखनीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, त्यांच्यामध्ये असलेली एकता. खऱ्‍या देवाचे ते उपासक आशिया, युरोप व आफ्रिकेच्या निरनिराळ्या देशांतून आलेले होते. यांपैकी कोणी पूर्वी याजक, तर कोणी सैनिक, गुलाम, निर्वासित, कारागीर, व्यवसाय करणारे व व्यापारी होते. काही यहूदी होते, इतर विदेशी. यांपैकी अनेकजण पूर्वी जारकर्मी, समलिंगी, दारुडे, चोर व इतरांना लुबाडणारे होते. पण ख्रिस्ती बनल्यानंतर त्यांनी आपले पूर्वीचे दुर्वर्तन सोडून दिले आणि विश्‍वासात एकजूट झाले.

पहिल्या शतकातील ख्रिस्ती धर्म या सर्व लोकांना एकत्र कसा आणू शकला? या सर्व लोकांमध्ये आपापसांत आणि इतर लोकांसोबतही सलोख्याचे संबंध कशामुळे होते? त्यांनी निरनिराळ्या आंदोलनांत व संघर्षांत भाग का घेतला नाही? ते सुरुवातीचे ख्रिस्ती आजच्या मुख्य धर्मांच्या सदस्यांपेक्षा इतके वेगळे का होते?

कोणत्या गोष्टीने मंडळीतल्या सदस्यांना जवळ आणले?

पहिल्या शतकातील त्या सहविश्‍वासू जनांना जवळ आणणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवावरील त्यांचे प्रेम. एकच खरा देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रेम करणे यास ते आपले आद्य कर्तव्य मानत होते. उदाहरणार्थ, स्वतः यहुदी असणाऱ्‍या प्रेषित पेत्राला एका विदेशी माणसाच्या घरी जाण्याची आज्ञा देण्यात आली. त्याकाळी यहुदी लोक विदेश्‍यांशी सहसा जवळचे संबंध ठेवत नव्हते. पण तरीसुद्धा पेत्राने यहोवाबद्दल प्रेम असल्यामुळेच या आज्ञेचे पालन केले. पेत्र व सुरुवातीच्या इतर ख्रिश्‍चनांचा देवासोबत घनिष्ट नातेसंबंध होता; देवाचे व्यक्‍तिमत्त्व, व त्याला काय आवडते, काय आवडत नाही हे जाणून घेतल्यामुळेच त्यांना हा नातेसंबंध जोडणे शक्य झाले. कालांतराने सर्व उपासकांना कळले की त्यांनी “एकचित्ताने व एकमताने” उपासना करावी अशी यहोवाची त्यांच्याकरता इच्छा होती.—१ करिंथकर १:१०; मत्तय २२:३७; प्रेषितांची कृत्ये १०:१-३५.

येशू ख्रिस्तावरील विश्‍वासामुळे ते उपासक एकमेकांच्या आणखी जवळ आले. जीवनातल्या सर्व गोष्टींत ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास ते इच्छुक होते. ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली होती: “जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) ही केवळ एक वरकरणी भावना नव्हे तर आत्मत्यागास प्रवृत्त करणारे प्रेम होते. यामुळे काय घडणार होते? आपल्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांसंबंधी येशूने अशी प्रार्थना केली: “मी . . . विनंती करितो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीहि तुझ्यामाझ्यामध्ये [एक] व्हावे.”—योहान १७:२०, २१; १ पेत्र २:२१.

यहोवाने आपल्या खऱ्‍या सेवकांवर आपला पवित्र आत्मा ओतला अर्थात त्यांना आपली कार्यकारी शक्‍ती दिली. या आत्म्याने त्यांना एकजूट होण्यास मदत केली. आत्म्याच्याद्वारे बायबलमधील शिकवणुकींचा त्यांना उलगडा झाला आणि सर्व मंडळ्यांनी आत्म्याद्वारे मिळालेले हे ज्ञान स्वीकारले. यहोवाचे उपासक एकच संदेशाचा प्रचार करत होते. देवाच्या मशीही राज्याद्वारे, अर्थात सबंध मानवजातीवर शासन करणाऱ्‍या एका स्वर्गीय सरकाराद्वारे यहोवाच्या नावाचे पवित्रिकरण केले जाईल असा हा संदेश होता. आपण ‘जगाचे नाही’ त्याअर्थी आपण जगापासून वेगळे राहिले पाहिजे हे सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी ओळखले होते. त्यामुळे, कधीही आंदोलने किंवा लष्करी लढाया इत्यादी व्हायच्या तेव्हा ख्रिस्ती तटस्थ राहात. सर्वांसोबत शांतीने राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता.—योहान १४:२६; १८:३६; मत्तय ६:९, १०; प्रेषितांची कृत्ये २:१-४; रोमकर १२:१७-२१.

सर्व उपासकांनी मंडळीतल्या एकतेला हातभार लावण्याची आपली वैयक्‍तिक जबाबदारी स्वीकारली होती. ती कशी? तर स्वतःचे आचरण बायबलच्या तत्त्वांच्या सामंजस्यात आहे याची खात्री करण्याद्वारे. म्हणूनच प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना लिहिले: “तुमच्या पुर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा” आणि “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे.”—इफिसकर ४:२२-३२.

एकता टिकून राहिली

अर्थात, पहिल्या शतकातील उपासक देखील अपरिपूर्ण होते. त्यामुळे त्यांच्यातही वेळोवेळी असे प्रसंग उद्‌भवले की ज्यांमुळे त्यांची एकता भंग होऊ शकत होती. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये ६:१-६ यात, ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या व इब्री भाषा बोलणाऱ्‍या यहुदी ख्रिश्‍चनांमध्ये उत्पन्‍न झालेल्या मतभेदाबद्दल सांगितले आहे. ग्रीक भाषा बोलणाऱ्‍यांना आपल्याला दुजाभावाने वागवले जाते असे वाटत होते. पण प्रेषितांच्या कानावर ही बाब घालण्यात आल्यावर, या समस्येचे तातडीने व निष्पक्षतेने निरसन करण्यात आले. कालांतराने, धर्मसिद्धान्तासंबंधी उद्‌भवलेल्या एका प्रश्‍नामुळे, ख्रिस्ती मंडळीत गैर यहुद्यांवर कोणत्या गोष्टी बंधनकारक होत्या यासबंधी वादविवाद निर्माण झाला. बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेण्यात आला तेव्हा सर्वांनी तो स्वीकारला.—प्रेषितांची कृत्ये १५:१-२९.

ही उदाहरणे हेच दाखवतात की पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत मतभेद आले तरीसुद्धा त्यांमुळे जातीभेद किंवा धर्मसिद्धान्तांवरून फाटाफुटी निर्माण झाल्या नाहीत. का नाही? कारण ख्रिस्ती मंडळीत एकतेला कारणीभूत ठरणाऱ्‍या गोष्टी, अर्थात यहोवावरील प्रेम, येशू ख्रिस्तावर विश्‍वास, एकमेकांबद्दल आत्मत्यागी प्रेम, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारण्याची प्रवृत्ती, बायबल शिकवणुकींसंबंधी एकसारखी समज आणि आपल्या आचरणात बदल करण्याची तयारी; या गोष्टी सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीत एकता व शांती कायम राखण्यास समर्थ होत्या.

आधुनिक काळात एकजूट उपासना

आजही याच पद्धतीने एकता निर्माण करणे शक्य आहे का? एकतेला कारणीभूत ठरणाऱ्‍या वर उल्लेखलेल्या गोष्टी आजही एका विश्‍वासाच्या सदस्यांना जवळ आणू शकतात का? व त्यांना जगातल्या सर्व भागांत, सर्व जातीवंशांच्या लोकांशी शांतीने राहण्यास प्रवृत्त करू शकतात का? होय, अवश्‍य करू शकतात! यहोवाच्या साक्षीदारांचा २३० पेक्षा अधिक राष्ट्रे, द्वीपे व प्रदेश व्यापणारा एकजूट, जागतिक बंधूसमाज आहे. आणि पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांमध्ये ज्या गोष्टींमुळे एकता होती त्याच गोष्टी आज यहोवाच्या साक्षीदारांतील ऐक्यालाही कारणीभूत आहेत.

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असलेल्या एकतेचे मुख्य कारण म्हणजे ते यहोवा देवाला समर्पित आहेत. त्याअर्थी ते कोणत्याही परिस्थितीत त्याला एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच, यहोवाचे साक्षीदार येशू ख्रिस्तावर आणि त्याच्या शिकवणुकींवर विश्‍वास ठेवतात. हे ख्रिस्ती आपल्या सह विश्‍वासू बांधवांबद्दल आत्मत्यागी प्रेम व्यक्‍त करतात आणि ज्या ज्या देशांत ते सक्रिय आहेत त्या त्या देशांत ते देवाच्या राज्याची तीच सुवार्ता घोषित करतात. त्यांना सर्व विश्‍वासांच्या, वंशांच्या, देशांच्या व सामाजिक गटांच्या लोकांशी देवाच्या राज्याविषयी बोलण्यास आनंद वाटतो. यहोवाचे साक्षीदार जगाच्या कारभारांत तटस्थ राहतात; यामुळे, आज मानवजातीत फूट पाडत असलेल्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दबावांना तोंड देणे त्यांना शक्य होते. सर्व साक्षीदार, बायबलच्या नियमांनुसार आचरण करण्याद्वारे आपल्यांतील एकता कायम राखण्याची वैयक्‍तिक जबाबदारी स्वीकारतात.

एकता इतरांना आकर्षित करते

या एकतेमुळे अनेकदा, साक्षीदार नसलेल्या व्यक्‍ती त्यांच्याकडे आकर्षित झाल्याची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, इल्झा * ही एकेकाळी जर्मनीतल्या एका कॅथलिक मठात जोगिणी म्हणून राहात होती. ती यहोवाच्या साक्षीदारांकडे कशामुळे आकर्षित झाली? इल्झा सांगते: “इतके चांगले लोक मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाहीत. ते युद्धात भाग घेत नाहीत. कधी कुणाचं वाईट करत नाहीत. उलट सर्व लोकांनी देवाच्या राज्यात शांतीपूर्ण परिस्थितीत या पृथ्वीवर आनंदाने राहावे म्हणून ते त्यांना मदत करू इच्छितात.”

आणखी एक उदाहरण गुंटर नावाच्या एका भूतपूर्व जर्मन सैनिकाचे आहे. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान गुंटर यांना फ्रांसमध्ये नेमण्यात आले होते. एके दिवशी एका प्रोटेस्टंट पाळकाने गुंटर यांच्या तुकडीतील सैनिकांसाठी धार्मिक सभा आयोजित केली. पाळकाने सैनिकांवर आशीर्वाद द्यावा, त्यांना सुरक्षित ठेवावे व विजय मिळवून द्यावा अशी देवाकडे प्रार्थना केली. या सभेनंतर गुंटर परत आपल्या ठिकाणी जाऊन गस्त घालू लागले. दुर्बिणीतून पाहात असताना त्यांना शत्रू सैन्याच्या छावणीतही अशाच प्रकारची धार्मिक सभा एक पाळक घेत असल्याचे दिसले. गुंटर नंतर म्हणाले: “कदाचित त्या पाळकानेही सैनिकांवर आशीर्वाद द्यावा, त्यांना सुरक्षित ठेवावे व विजय मिळवून द्यावा अशी देवाकडे विनंती केली असावी. मी विचार करू लागलो, हे कसं शक्य आहे? दोन ख्रिस्ती चर्चेस एकाच युद्धात एकमेकांच्या विरोधात कसे लढू शकतात?” हे विचार गुंटर यांच्या मनात कायम घोळत राहिले. कालांतराने ते यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आले. लवकरच, ते युद्धात भाग न घेणाऱ्‍या साक्षीदारांच्या जागतिक बंधुसमाजात सामील झाले.

अशोक व फीमा एका पौर्वात्य धर्माचे अनुयायी होते. त्यांच्या घरातच देव्हारा होता. त्यांचे कुटुंब एका भयानक रोगाला बळी पडले तेव्हा अशोक व फीमा आपल्या धर्माविषयी साशंक बनले. यहोवाच्या साक्षीदारांशी चर्चा करताना, बायबलच्या शिकवणुकींनी तसेच साक्षीदारांमध्ये असलेले प्रेम पाहूनही ते खूप प्रभावित झाले. आज ते दोघेही यहोवाच्या राज्याच्या सुवार्तेचे उत्साही प्रचारक आहेत.

इल्झा, गुंटर, अशोक व फीमा लाखो यहोवाच्या साक्षीदारांसोबत एक जागतिक बंधुसमाजासोबत एकजूट आहेत. आज ज्या गोष्टींमुळे ते एकजूटपणे उपासना करतात, त्याच गोष्टी लवकरच सर्व आज्ञाधारक मानवांना एकतेच्या बंधनात बांधतील या बायबलमधील प्रतिज्ञेवर त्यांना पूर्ण विश्‍वास आहे. तेव्हा धर्माच्या नावाखाली पुन्हा कधीही अत्याचार, मतभेद व फाटाफुटी होणार नाही. सबंध जगातील लोक एकच खरा देव यहोवा याची एकजूटपणे उपासना करतील.—प्रकटीकरण २१:४, ५.

[तळटीप]

^ परि. 16 या लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.

[४, ५ पानांवरील चित्रे]

सुरुवातीचे ख्रिस्ती निरनिराळ्या पार्श्‍वभूमींचे असूनही त्यांच्यामध्ये ऐक्य होते