व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धर्म मानवसमाजाला जवळ आणू शकतो याबद्दल अनेकजण साशंक का?

धर्म मानवसमाजाला जवळ आणू शकतो याबद्दल अनेकजण साशंक का?

धर्म मानवसमाजाला जवळ आणू शकतो याबद्दल अनेकजण साशंक का?

“शेजाऱ्‍यावर . . . प्रीति कर.” (मत्तय २२:३९) सर्व धर्म या तत्त्वाची प्रशंसा करतात. जर हे धर्म आपल्या अनुयायांना इतरांवर स्वतःसारखे प्रेम करायला शिकवण्यात खरच यशस्वी झाले असते, तर त्यांचे अनुयायी जवळ आले असते, एकजूट झाले असते. पण तुमच्या अनुभवानुसार, असे घडून आले आहे असे तुम्हाला वाटते का? धर्म लोकांना एकमेकांच्या जवळ आणत आहेत का? जर्मनीत करण्यात आलेल्या एका अभ्यासात लोकांना असे विचारण्यात आले: “धर्म लोकांमध्ये मिलाफ घडवून आणतात, की सहसा त्यांच्यात दुरावा निर्माण करतात?” या प्रश्‍नाचे उत्तर देणाऱ्‍यांपैकी २२ टक्के लोकांचे असे मत पडले की धर्म लोकांना जवळ आणतात. तर ५२ टक्के लोक म्हणाले की धर्म लोकांमध्ये फुटी पाडतात किंवा त्यांच्यात दुरावा आणतात. तुमच्या देशातही कदाचित लोकांचे असेच मत असेल.

पण धर्म लोकांना जवळ आणू शकतात याबद्दल बऱ्‍याचजणांना शंका का वाटते? कदाचित इतिहासाकडे पाहून. कारण लोकांमध्ये सलोखा आणण्याऐवजी धर्माने त्यांना एकमेकांपासून दूर केल्याचीच उदाहरणे दिसून येतात. काही ठिकाणी तर धर्माच्या नावाखाली इतिहासातले सर्वात भयंकर अत्याचार घडून आले आहेत. मागच्या १०० वर्षांत घडलेल्या काही घटनांची उदाहरणे विचारात घ्या.

धर्माच्या प्रभावामुळे

दुसऱ्‍या महायुद्धात, बाल्कन प्रदेशातील रोमन कॅथलिक क्रोएशियन व ऑर्थोडॉक्स सर्बियन लोक एकमेकांच्या जिवावर उठले होते. हे दोन्ही गट येशूला आपला गुरू मानत होते; तोच येशू, ज्याने आपल्या अनुयायांना शेजाऱ्‍यावर प्रीती करायला शिकवले होते. आणि तरीसुद्धा, त्यांच्या या संघर्षामुळे, एका संशोधकाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “निष्पाप नागरिकांची इतिहासातील सर्वात भयंकर कत्तल” येथे घडली. ५,००,००० स्त्रीपुरूष व मुलांचा नाहक बळी गेला. सारे जग सुन्‍न होऊन नुसते पाहात राहिले.

१९४७ साली भारतीय उपखंडाची लोकसंख्या जवळजवळ ४० कोटी इतकी—म्हणजे जगाच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एकपंचमांश होती. यांत मुख्यतः हिंदू, मुस्लिम व शीख लोक होते. भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्राचा जन्म झाला. त्यावेळी झालेल्या धार्मिक संघर्षांत दोन्ही देशांतील लाखो निर्वासितांना जिवंत जाळण्यात आले, मारहाण करण्यात आली, यातना देण्यात आल्या आणि कित्येकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

या भयंकर उदाहरणांच्या भरीस भर, २१ व्या शतकाच्या सुरवातीलाच दहशतवादाच्या भीतीने जगास ग्रासले आहे. आज सबंध जगावर दहशतवादाची टांगती तलवार असून, बरेच दहशतवादी गट धार्मिक संघटनांशी संबंधित असल्याचे कबूल करतात. तेव्हा मिलाफ घडवून आणणारा या दृष्टीने निश्‍चितच आज धर्माकडे पाहिले जात नाही. उलट त्याचा संबंध सहसा हिंसाचाराशी, कलहांशी लावला जातो. म्हणूनच की काय, फोकस नावाच्या जर्मन बातमीपत्रकाने—बौद्ध, ख्रिस्ती, कन्फुशियन, हिंदू, मुस्लिम, यहूदी आणि टाओ—या जगाच्या मुख्य धर्मांची तुलना बारुदीशी केली.

अंतर्गत मतभेद

काही धर्म एकमेकांशी संघर्ष करत आहेत तर काही धर्मांना अंतर्गत मतभेदांनी पछाडले आहे. उदाहरणार्थ, अलीकडील वर्षांत ख्रिस्ती धर्मजगतातील निरनिराळ्या चर्चेसमध्ये धर्मसिद्धान्तांसंबंधीच्या मतभेदांमुळे फुटी पडल्या आहेत. संततीनियमनास परवानगी आहे का? गर्भपात करणे योग्य की अयोग्य? स्त्रियांना पाळकपद दिले जावे का? समलिंगी संबंधांविषयी चर्चने कोणती भूमिका घ्यावी? धर्माने युद्धाला संमती द्यावी का? या व अशा अनेक प्रश्‍नांमुळे पाळक आणि चर्चचे सदस्यही गोंधळलेले आहेत. हे मतभेद पाहून बरेचजण विचार करतात, ‘जर एक धर्म स्वतःच्या अनुयायांनाच एकत्र आणू शकत नाही, तर मग तो मानवसमाजाला काय जवळ आणेल?’

एकंदरीत पाहता, धर्म लोकांना जवळ आणण्यात अपयशी ठरले आहेत. पण सगळ्याच धर्मांत अशा फाटाफुटी आहेत का? सर्वांपेक्षा वेगळा असा धर्म, म्हणजेच जो मानवजातीला खरोखर जवळ आणू शकेल असा धर्म अस्तित्वात आहे का?

[३ पानांवरील चित्र]

१९४७ साली धार्मिक गटांतील हिंसाचारात जखमी झालेले पोलीस

[चित्राचे श्रेय]

Photo by Keystone/Getty Images