व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला आम्ही शिकलो

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला आम्ही शिकलो

जीवन कथा

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला आम्ही शिकलो

नताली होलटोर्फ यांच्याद्वारे कथित

एकोणीसशे पंचेचाळीस सालचा तो जून महिना होता. एके दिवशी, पार गळून गेलेला एक अशक्‍त मनुष्य आमच्या दारासमोर येऊन शांत उभा राहिला. माझी धाकटी मुलगी, रुथ त्याच्याकडे आश्‍चर्यानं पाहत ओरडली: “आई, हा बघ कोणी तरी आलाय!” पण तिला काय माहीत की तो मनुष्य तिचे वडील अर्थात माझा प्रिय पती, फर्डीनंट होता. दोन वर्षांआधी, रुथ फक्‍त तीन दिवसांची होती तेव्हा फर्डीनंटला घर सोडावं लागलं; त्यांना अटक करण्यात आली व एका नात्सी छळछावणीत पाठवण्यात आलं. आणि आता कुठं रुथची आपल्या वडिलांबरोबर भेट झाली होती; आमचं कुटुंब पुन्हा एक झालं होतं. फर्डीनंटला आणि मला एकमेकांना कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या!

जर्मनीतील कील शहरात, १९०९ साली फर्डीनंटचा जन्म झाला होता आणि जर्मनीतल्याच ड्रेझडन शहरात १९०७ साली माझा जन्म झाला होता. मी १२ वर्षांची होते तेव्हा माझ्या कुटुंबाची पहिल्यांदा बायबल विद्यार्थ्यांबरोबर ओळख झाली; त्याकाळी यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने ओळखले जात. मी १९ वर्षांची झाल्यावर इवॅन्जिलिकल चर्च सोडलं आणि यहोवाला माझं जीवन समर्पित केलं.

फर्डीनंट नाविक कॉलेजातून पदवीधर झाले व खलाशी बनले. त्यांच्या समुद्रप्रवासाच्या दरम्यान ते, निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाविषयी अनेक प्रश्‍नांवर मनन करायचे. अशा एका प्रवासानंतर फर्डीनंट आपल्या थोरल्या भावाला भेटायला गेले जो एक बायबल विद्यार्थी होता. या एका भेटीतच त्यांची खात्री पटली की बायबलमध्ये, आपल्या मनात असलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरं होती. त्यांनी लूथरन चर्च सोडून दिलं आणि खलाशी म्हणूनही काम करायचं सोडून देण्याचं ठरवलं. प्रचार कार्यात पहिला दिवस घालवल्यानंतर, संपूर्ण आयुष्य हेच काम करायचं म्हणून त्यांना तीव्रपणे वाटलं. त्याच रात्री त्यांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं. ऑगस्ट १९३१ साली त्यांचा बाप्तिस्मा झाला.

खलाशी आणि प्रचारक

नोव्हेंबर १९३१ साली, फर्डीनंट ट्रेननं नेदरलँड्‌सला गेले; तिथं चालणाऱ्‍या प्रचार कार्यात मदत करण्यासाठी ते तिथं गेले. त्या देशात प्रचार कार्याची व्यवस्था पाहणाऱ्‍या बांधवाला जेव्हा फर्डीनंटनं सांगितलं, की मी पूर्वी एक खलाशी होतो, तेव्हा ते बांधव म्हणाले: “अरे व्वा! आम्हाला तर तुमच्यासारखंच कोणीतरी हवं होतं!” तिथल्या बांधवांनी एक नाव भाड्यानं घेतली होती जेणेकरून पायनियरांचा (पूर्ण वेळेचे सेवक) एक गट, देशाच्या उत्तरेकडे पाण्यालगत राहणाऱ्‍या लोकांना प्रचार करू शकेल. पण या पाच जणांपैकी एकालाही नाव वल्हवता येत नव्हती. त्यामुळे मग फर्डीनंट कप्तान बनले.

सहा महिन्यांनंतर, फर्डीनंटना दक्षिण नेदरलँड्‌समधील टिलबर्ग येथे पायनियर म्हणून सेवा करण्यास सांगण्यात आलं. जवळजवळ याच दरम्यान मीही पायनियर म्हणून सेवा करायला टिलबर्गला आले आणि तिथं माझी आणि फर्डीनंटची ओळख झाली. पण आम्हाला लगेच नेदरलँड्‌सच्या उत्तरेकडे असलेल्या ग्रोनिंगनला जाण्यास सांगण्यात आलं. तिथं, १९३२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात आमचं लग्न झालं. त्या ठिकाणी, एका घरात अनेक पायनियर राहत होते. आम्ही पण या घरात राहायला गेलो; आमच्या मधुचंद्रासोबत आम्ही पायनियर सेवाही करत होतो!

१९३५ साली, आम्हाला एस्तर झाली. आमची हालाखीची परिस्थिती होती तरीपण आम्ही पायनियरींग सुरू ठेवण्याचा निश्‍चय केला होता. आम्ही एका लहानशा गावात एका लहानशा घरात राहायला गेलो. मी घरी राहून बाळाची काळजी घ्यायचे तेव्हा फर्डीनंट पूर्ण दिवस सेवेत जायचे. दुसऱ्‍या दिवशी मी सेवेत जायचे आणि फर्डीनंट बाळाची काळजी घ्यायचे. एस्तर आमच्याबरोबर सेवेत येऊ शकेल इतकी मोठी होईपर्यंत आम्ही असं करत होतो.

पण युरोपमधील राजनैतिक वातावरण दिवसेंदिवस उपद्रवजनक होत चाललं होतं. जर्मनीत साक्षीदारांना छळलं जात आहे, हे आम्ही ऐकलं तेव्हा लवकरच आपली पण पाळी येईल, असं आम्हाला जाणवलं. कडक छळात आपण टिकून राहू का, असा आमच्या मनात विचार यायचा. १९३८ साली, डच अधिकाऱ्‍यांनी असा हुकूम काढला, की कोणीही विदेशी, धार्मिक प्रकाशनांचे वाटप करून सुवार्तिक कार्य करू शकत नाही. आमची सेवा चालू राहावी म्हणून डच साक्षीदारांनी आम्हाला अशा लोकांची नावं दिली होती, ज्यांनी आपल्या कार्याबद्दल आस्था दाखवली होती; त्यांपैकी काहींबरोबर आम्ही बायबल अभ्यास करू शकलो.

त्याच सुमारास, यहोवाच्या साक्षीदारांचं एक अधिवेशन भरणार होतं. अधिवेशनाला ट्रेननं जायला आमच्याकडे पैसे नव्हते तरीपण आम्हाला अधिवेशनाला जायची इच्छा होती. त्यामुळे आम्ही, सायकलीनं निघालो; आम्हाला तीन दिवस लागले; एस्तरला आम्ही सायकलीच्या पुढच्या लहानशा सीटवर बसवलं. रात्रीच्या वेळी आम्ही मार्गांत राहणाऱ्‍या साक्षीदारांच्या घरी मुक्काम करायचो. आमच्या सर्वात पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहायला आम्हाला किती आनंद झाला होता! या अधिवेशन कार्यक्रमानं आम्हाला पुढे येणाऱ्‍या परिक्षांसाठी बळकटी दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आम्हाला यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्याची आठवण करून देण्यात आली. स्तोत्र ३१:६ [पं.र.भा.] आमचं घोषवाक्य बनलं: “मी यहोवावर भरवसा ठेवतो.”

शोधावर निघालेले नात्सी

१९४० सालच्या मे महिन्यात, नात्सींनी नेदरलँड्‌सवर हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांतच, गेस्टापो अर्थात गुप्त पोलीस आम्ही बायबल साहित्य पाठवण्याची तयारी करत असतानाच आमच्या घरी अचानक आले. फर्डीनंटना गेस्टापो मुख्यालयात नेण्यात आलं. एस्तर आणि मी त्यांना भेटायला जायचो; कधीकधी तर आमच्यासमोरच त्यांची उलटतपासणी केली जायची, त्यांना मारलं जायचं. डिसेंबर महिन्यात, फर्डीनंटना अचानक सोडण्यात आलं; पण त्यांचं हे स्वातंत्र्य जास्त काळ टिकलं नाही. एकदा संध्याकाळी आम्ही घरी येत होतो तेव्हा आम्ही आमच्या घराजवळ गेस्टापोंची एक कार पाहिली. फर्डीनंटनं लगेच तिथून पळ काढला आणि मी व एस्तर घरात गेलो. गेस्टापो आमचीच वाट पाहत थांबले होते. ते फर्डीनंटना न्यायला आले होते. गेस्टापो निघून गेल्यावर त्याच रात्री डच पोलीस आले आणि त्यांनी मला विचारपूस करण्यासाठी नेलं. दुसऱ्‍या दिवशी मी व एस्तर, नव्यानंच बाप्तिस्मा घेतलेल्या एका साक्षीदार कुटुंबाच्या घरात लपून राहिलो; या नॉर्डर परिवारानं आम्हाला आश्रय दिला, संरक्षण दिलं.

१९४१ सालच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस, हाऊसबोटीत (बोटीत असलेले घर) राहणाऱ्‍या एका पायनियर जोडप्याला अटक करण्यात आली. दुसऱ्‍या दिवशी एक विभागीय पर्यवेक्षक (प्रवासी सेवक) आणि फर्डीनंट या जोडप्याच्या बोटीतल्या घरातील काही वस्तु घेण्यासाठी गेले तेव्हा गेस्टापोंच्या साथीदारांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडलं. फर्डीनंट कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटले आणि आपल्या मोटारसायकलीवरून फरार झाले. विभागीय पर्यवेक्षक असलेल्या बांधवाला मात्र तुरुंगात नेण्यात आलं.

जबाबदार बांधवांनी फर्डीनंटना विभागीय पर्यवेक्षकांची जागा घेण्यास सांगितलं. याचा अर्थ, ते महिन्यातून फक्‍त तीनच दिवस घरी येऊ शकत होते. ही आमच्यासाठी एक नवीन परीक्षा होती, पण मी मात्र माझं पायनियरींग सोडलं नाही. गेस्टापोंनी साक्षीदारांचा कसून शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे आम्हाला सतत आमचं घर बदलावं लागायचं. १९४२ साली आम्ही तीनदा घर बदललं. शेवटी एकदाचं आम्ही, रॉटरडमच्या शहरात राहायला आलो; पण फर्डीनंटपासून आम्ही खूप दूर गेलो कारण ते जिथं गुप्तपणे सेवा करत होते ते ठिकाण आमच्यापासून खूप दूर होतं. या वेळेला मला पुन्हा दिवस गेले होते. केंप परिवारानं आम्हाला आश्रय दिला; यांच्या दोन्ही मुलांना अलीकडेच छळछावण्यांत पाठवण्यात आलं होतं.

आमच्या मागे हात धुवून लागलेले गेस्टापो

१९४३ सालच्या जुलै महिन्यात आमच्या दुसऱ्‍या मुलीचा, रुथचा जन्म झाला. रुथच्या जन्मानंतर, फर्डीनंट आमच्याबरोबर फक्‍त तीनच दिवस राहू शकले, त्यांना निघावं लागणार होतं; पण त्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा बऱ्‍याच काळपर्यंत पाहणार नव्हतो. तीन आठवड्यांनंतर, फर्डीनंटना ॲम्स्टरडममध्ये अटक करण्यात आली. त्यांना गेस्टापो ठाण्यात नेण्यात आलं आणि त्यांची ओळख पटली. आपल्या प्रचार कार्यांविषयी त्यांच्याकडून माहिती उगळण्याकरता गेस्टापोंनी मग त्यांची कसून उलट तपासणी सुरू केली. पण फर्डीनंट सारखं हेच म्हणत राहिले की मी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहे आणि माझा कोणत्याही राजकीय कार्याशी संबंध नाही. जर्मन असूनही फर्डीनंट अद्याप सैनिकात भरती झाले नव्हते याचा गेस्टापो अधिकाऱ्‍यांना खूप राग आला होता; गद्दार म्हणून त्यांना फाशी दिली जाईल अशी ते त्यांना सतत धमकी द्यायचे.

पुढील पाच महिन्यांसाठी, फर्डीनंटना तुरुंग कोठडीत ठेवण्यात आलं; तिथं त्यांना, गोळीनं उडवण्याची सतत धमकावणी दिली जायची. तरीपण, यहोवाला एकनिष्ठा दाखवण्याच्या बाबतीत ते डगमगले नाही. कोणत्या गोष्टीनं त्यांना आध्यात्मिकरीत्या खंबीर राहायला मदत केली होती? देवाचं वचन, बायबलनं. साक्षीदार असल्यामुळे फर्डीनंटना बायबल बाळगण्याची परवानगी नव्हतीच. पण इतर कैदी बायबल मागवू शकत होते. त्यामुळे फर्डीनंटनं आपल्या बरोबरच्या कैद्याला त्याच्या घरून एक बायबल मागवण्यास विनंती केली तेव्हा त्यानं लगेच ही विनंती मान्य केली. अनेक वर्षांनंतर, फर्डीनंट जेव्हा जेव्हा हा किस्सा आम्हाला ऐकवत तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक असायची आणि ते म्हणायचे: “बायबलनं मला किती सांत्वन दिलं सांगू!”

१९४४ सालच्या जानेवारी महिन्यात, फर्डीनंटना अचानक नेदरलँड्‌सच्या वुक्ट येथील छळछावणीत नेण्यात आलं. अचानक आलेला हा बदल त्यांच्यासाठी जणू काय एक आशीर्वादाच ठरला कारण तिथं ते इतर ४६ साक्षीदारांना भेटले. मला जेव्हा त्यांचा थांगपत्ता लागला तेव्हा हायसं वाटलं; ते जिवंत होते याचा मला आनंद वाटला.

छळछावणीत प्रचार करण्याचे त्यांनी सोडलं नाही

छावणीतलं जीवन खूपच खडतर होतं. जबरदस्त कुपोषण, गरम कपड्यांची कमी, या गोष्टी तिथं सर्वसामान्य होत्या आणि त्यातल्या त्यात बोचरी थंडी. फर्डीनंटना गंभीर प्रकारचा टॉन्सील्सचा त्रास सुरू झाला. लांबलचक रोलकॉलसाठी कडाक्याच्या थंडीत उभं राहिल्यानंतर ते आजाऱ्‍यांसाठी असलेल्या स्थळी गेले. १०४ किंवा त्याहूनही अधिक ताप असलेल्या रुग्णांना थांबवलं जात. पण फर्डीनंटना पुन्हा कामावर पाठवण्यात आलं, कारण त्यांचा ताप फक्‍त १०२ होता! त्यांना पुन्हा कामावर जावं लागलं. पण, त्यांच्याबरोबरच्या सहकैद्यांना त्यांच्यावर दया आली आणि त्यांनी त्यांना एका उबदार ठिकाणी, अंतराअंतरानं काही वेळ लपवून ठेवून मदत केली. त्यानंतर वातावरणसुद्धा जरा गरम झाल्यामुळे त्यांना बरं वाटलं. शिवाय, काही बांधव, त्यांना मिळालेल्या अन्‍नाच्या पाकीटांमधून फर्डीनंटना खायला देत त्यामुळे फर्डीनंटला थोडीबहुत शक्‍ती मिळाली.

तुरुंगात जाण्याआधीपासूनच फर्डीनंट यांनी प्रचार कार्याला आपलं जीवनध्येय बनवलं असल्यामुळे छळछावणीत गेल्यावरही ते आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगत राहिले. छावणीतले अधिकारी, साक्षीदारांचं ओळखचिन्ह असलेल्या त्यांच्या जांभळ्या त्रिकोणाची टर उडवायचे. पण फर्डीनंट या संधीचा फायदा घेऊन त्यांच्याबरोबर संभाषण सुरू करायचे. सुरुवातीला बांधवांना, साक्षीदारांना ज्या बराकींमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथल्याच सहकैद्यांना प्रचार करता यायचा. ते म्हणायचे: ‘आणखी कैद्यांना कसा काय प्रचार करता येईल?’ तुरुंग व्यवस्थापनेनंच यावर तोडगा काढला. तो कसा?

बांधवांकडे बायबल साहित्यांचा गुप्त साठा आणि १२ बायबल होते. एका रक्षकाला काही साहित्यांचा पत्ता लागला पण हे साहित्य कुणाच्या मालकीचं होतं हे मात्र त्यांना समजलं नाही. त्यामुळे छावणीतील अधिकाऱ्‍यांनी साक्षीदारांची एकी तोडायचं ठरवलं. यासाठी, शिक्षा म्हणून सर्व बांधवांना गैर साक्षीदार असलेल्या कैद्यांच्या बराकींमध्ये पाठवण्यात आलं. शिवाय, त्यांना साक्षीदार नसलेल्या कैद्यांशेजारी जेवायला बसायला लागायचं. ही व्यवस्था एक वरदान ठरली. आता, बांधवांना जे करायच होतं नेमकं तेच करायची, म्हणजे होता होईल तितक्या सहकैद्यांना प्रचार करायची मोकळीक मिळाली होती.

एकटीनं दोन मुलींना सांभाळणं

या सर्व वेळेदरम्यान माझ्या दोन मुली आणि मी रॉटरडममध्येच राहत होतो. १९४३/४४ सालचा हिवाळा खूपच कडक होता. आमच्या घरामागं, जर्मन सैनिकांचा विमानांवर तोफ सोडण्याचा एक मोठा तोफखाना होता. आणि घराच्या समोरच्या बाजूला, वॉल बंदर होते जे मित्र राष्ट्रांकडून बाँम्बमाऱ्‍याचे प्रमुख निशाण होते. त्यामुळे लपून राहण्यासाठी हे योग्य ठिकाण नव्हते. शिवाय, इथं अन्‍नटंचाई देखील होती. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकलो.—नीतिसूत्रे ३:५, ६.

आठ वर्षांच्या एस्तरनंही आमच्या कुटुंबाला मदत केली; गरिबांसाठी असलेल्या अन्‍नवाटप केंद्राच्या बाहेर ती रांगेत उभं राहून आमच्यासाठी अन्‍न आणायची. पण पुष्कळदा असं व्हायचं, की अन्‍न गोळा करायची तिची पाळी यायची तोपर्यंत अन्‍न संपलेलं असायचं. एकदा असंच ती अन्‍नाच्या शोधात गेली होती तेव्हा हवेत गोळीबार सुरू झाला. मी जेव्हा स्फोटांचा आवाज ऐकला तेव्हा माझ्या पोटात भीतीचा गोळाच आला; पण एस्तरला सुखरूप घरी आलेलं पाहून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले; ती घरी रिकाम्या हाती आली नव्हती, तिच्या हातात काही सूगरबीटही (ज्यापासून साखर बनवली जाते ते एकप्रकारचे बीट) होते. “काय झालं?” हा माझा पहिला प्रश्‍न होता. तिनं मला अगदी शांत स्वरात उत्तर दिलं: “बाँम्ब पडले तेव्हा बाबांनी मला जे करायला सांगितलं होतं तेच मी केलं! ‘जमिनीवर पालथं पडायचं, शांत पडून राहायचं आणि प्रार्थना करायची.’ मी तसंच केलं!”

माझ्या बोलण्यावरून कोणीही सहजपणे मी जर्मन असल्याचं ओळखू शकत असल्यामुळे, एस्तरनच दुकानात जाऊन वस्तु आणणं बरं होतं. पण एस्तरही जर्मन सैनिकांच्या नजरेतून सुटली नाही, त्यांनी तिलाही प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. पण तिनं कधीच कोणती गोष्ट सांगितली नाही. घरी मी एस्तरला बायबलचं शिक्षण द्यायचे, तिला शाळेत जाता येत नसल्यामुळे मीच तिला लिहा-वाचायला आणि इतर गोष्टीही शिकवल्या.

एस्तर मला सेवेतही मदत करायची. बायबल अभ्यासाला जायच्या आधी एस्तर पुढं जाऊन, रस्ता साफ आहे की नाही म्हणजे कोणी आपल्याला पाहत तर नाही, हे पाहून यायची. बायबल विद्यार्थ्याबरोबर मी ठरवलेली चिन्हं जशीच्या तशी आहेत की नाही, हे ती पाहायची. जसं की, मी ज्या व्यक्‍तिला भेट द्यायला जाणार आहे त्या व्यक्‍तिनं, मी येऊ शकते का, याचा संकेत देण्यासाठी आपल्या खिडकीत फुलांची कुंडी एका विशिष्ट दिशेनं ठेवली आहे की नाही, वगैरे. आणि बायबल अभ्यास चालत असताना, एस्तर बाहेर पाळत ठेवायची; बाहेर रुथला बाबागाडीतून उगाच फिरवत असल्याचं सोंग करत काही धोका तर नाही हे पाहत असायची.

साक्सेनहाउसनमध्ये

तिकडं फर्डीनंट यांचे काय हाल होते? १९४४ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर पुष्कळांना एका रेल्वे स्थानकाकडे नेण्यात आलं; तिथं उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या एकेका डब्यात ८०-८० कैद्यांना कोंबण्यात आलं. प्रत्येक डब्यात शौचालयासाठी वापरण्यासाठी एक बादली आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक बादली होती. त्यांचा हा प्रवास तीन दिवस आणि रात्र चालला; डबा गच्च भरलेला असल्यामुळे सर्वांना केवळ उभंच राहता येत होतं! डब्यात शुद्ध हवा येण्यासाठी काही मार्गच नव्हता. डब्याची दारं बंद होती; फक्‍त काही काही ठिकाणी लहान लहान छिद्रं होती. डब्यातली ती उष्णता, अन्‍नपाणी नसल्यामुळे व्याकूळ झालेले ते लोक, ती दुर्गंधी—याविषयी न बोललेलच बरं; किती काय काय त्यांना सहन करावं लागलं!

ही मालगाडी सरळ कुविख्यात साक्सेनहाउसन छळछावणीतच जाऊन थांबली. इथं आल्यानंतर तर, कैद्यांकडे जे उरलंसुरलं सामान होतं तेही काढून घेण्यात आलं—फक्‍त साक्षीदारांनी प्रवासाच्या वेळी जे १२ लहान बायबल घेतले होते ते मात्र घेण्यात आले नाहीत!

फर्डीनंट आणि आणखी आठ बांधवांना, युद्ध साम्रगीचं उत्पादन करणाऱ्‍या कारखान्यात काम करण्यासाठी एका उपग्रह छावणीत पाठवण्यात आलं. त्यांना ठार मारण्याची सतत धमकी दिली जात होती तरीसुद्धा या बांधवांनी हे काम करायला नकार दिला. खंबीर राहण्याचे एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी ते दररोज सकाळी बायबलमधलं एखाद वचन, जसं की स्तोत्र १८:२ एकमेकांना सांगायचे; यामुळे दिवसभर त्यांना या वचनावर मनन करता यायचं. अशानं त्यांना आध्यात्मिक गोष्टींवर चिंतन करता यायचं.

सरतेशेवटी, तोफांच्या प्रचंड आवाजाने मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि रशियन सैन्यदल येत असल्याचं घोषित केलं. फर्डीनंट आणि त्यांचे इतर साथीदार होते त्या छावणीतच सर्वात आधी रशियन आले. त्यांनी कैद्यांना काही अन्‍न दिलं आणि छावणी सोडून जाण्यास सांगितलं. १९४५ सालच्या एप्रिलच्या अखेरपर्यंत, रशियन सैन्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

आमचं कुटुंब एक होतं

जून १५ तारखेला फर्डीनंट नेदरलँड्‌सला आले. ग्रोनिंगनमधल्या बांधवांनी त्यांचं खूप प्रेमळपणे स्वागत केलं. आम्ही जिवंत आहोत आणि देशाच्या अमुक भागात आहोत हे फर्डीनंटला कळलं आणि इकडं आम्हाला त्यांच्या आगमनाची बातमी कळली. ते कधी घरी येतात असं आम्हाला वाटत होतं. मग एके दिवशी रूथ म्हणाली: “आई, हा बघ कोणी तरी आलाय!” माझे प्रिय पती आणि मुलींचे लाडके बाबा खरंच घरी आले होते!

कुटुंब या नात्यानं पुन्हा सर्वकाही सुरळीत व्हायच्या आधी आम्हाला पुष्कळ गोष्टी ठरवायच्या होत्या. आम्हाला राहायला घर नव्हतं; आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे स्थायी रहिवासी म्हणून आमच्याकडे परवाना नव्हता. आम्ही जर्मन असल्यामुळे, डच अधिकाऱ्‍यांनी, कित्येक वर्ष आम्हाला बहिष्कृतांसारखं वागवलं. पण हळूहळू आम्ही स्थायीक झालो आणि कुटुंब या नात्यानं एकत्र मिळून यहोवाची सेवा करण्याचं आम्ही जे स्वप्न पाहत होतो ते आमचं स्वप्न पूर्ण झालं.

“मी यहोवावर भरवसा ठेवतो”

फर्डीनंट आणि मी जेव्हा जेव्हा, आमच्याच प्रमाणे हालात दिवस काढलेल्या आमच्या मित्रांबरोबर एकत्र यायचो तेव्हा तेव्हा, त्या कठिण काळात यहोवानं कशाप्रकारे आम्हाला प्रेमळ मार्गदर्शन दिलं याची आठवण करायचो. (स्तोत्र ७:१) या सर्व वर्षांत यहोवानं आम्हाला राज्याची सुवार्ता सांगण्यात सहभाग घेण्याची संधी दिली त्यामुळे आम्ही त्याचे आभार मानले. आम्ही आमच्या तारुण्याची शक्‍ती यहोवाच्या पवित्र सेवेसाठी खर्च केल्याचा आम्हाला आनंद होतो, हे आम्ही कित्येकदा म्हणायचो.—उपदेशक १२:१.

नात्सींच्या छळाच्या काळानंतर, फर्डीनंट आणि मी, आम्ही दोघांनी मिळून ५० पेक्षा अधिक वर्ष यहोवाची सेवा केली; डिसेंबर २०, १९९५ रोजी त्यांनी त्यांची पृथ्वीवरील सेवा समाप्त केली. लवकरच मलाही ९८ वर्षं पूर्ण होतील. मी दररोज यहोवाचे आभार मानते, कारण आमच्या मुलींनी आम्हाला त्या कठिण काळात खूप चांगली साथ दिली आणि आज त्याच्या नावाच्या गौरवासाठी मला जितकी सेवा करता येते तितकी मी त्याची सेवा करत आहे. यहोवानं माझ्यासाठी जे जे केलं त्या सर्वांबद्दल मी त्याचे खूप आभार मानते; व “मी यहोवावर भरवसा ठेवतो” हे जे माझं घोषवाक्य आहे ते पूर्ण करण्याची माझी मनापासून इच्छा आहे.—स्तोत्र ३१:६.

[१९ पानांवरील चित्र]

फर्डीनंटसोबत, १९३२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात

[१९ पानांवरील चित्र]

सुवार्तेच्या प्रचार कार्यात वापरली जाणारी “अल्मीना” नावाची बोट आणि त्यांवरील सदस्य

[२२ पानांवरील चित्रे]

फर्डीनंट आणि मुलींबरोबर