व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या आदर्शाचे सदैव अनुकरण करा

येशूच्या आदर्शाचे सदैव अनुकरण करा

येशूच्या आदर्शाचे सदैव अनुकरण करा

“जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—योहान १३:१५.

१. ख्रिश्‍चनांसाठी येशू हा अनुकरण करण्याजोगा आदर्श आहे असे का म्हणता येईल?

सबंध मानव इतिहासात केवळ एक अशी व्यक्‍ती होऊन गेली आहे, की जिने आपल्या सबंध जीवनभर कधीही पाप केले नाही. ती व्यक्‍ती म्हणजे येशू. त्याच्या व्यतिरिक्‍त, “पाप करीत नाही असा कोणीच नाही.” (१ राजे ८:४६; रोमकर ३:२३) म्हणूनच, खरे ख्रिस्ती येशूला अनुकरण करण्याजोगा सर्वोत्तम आदर्श मानतात. सा.यु. ३३ सालच्या निसान १४ तारखेला, आपला मृत्यू होण्याच्या काही वेळाआधी येशूने स्वतः आपल्या अनुयायांना आपले अनुकरण करण्याची आज्ञा दिली. तो म्हणाला: “जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहान १३:१५) त्या शेवटल्या रात्री, येशूने अशा अनेक मार्गांचा उल्लेख केला, की ज्यांद्वारे ख्रिश्‍चनांनी त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या लेखात आपण त्यांपैकी काही मार्गांवर विचार करणार आहोत.

नम्रतेची गरज

२, ३. येशूने घालून दिलेला नम्रतेचा कित्ता कोणत्या अर्थांनी परिपूर्ण होता?

येशूने आपल्या आदर्शाचे अनुकरण करण्यास शिष्यांना सांगितले तेव्हा तो खासकरून नम्रतेविषयी बोलत होता. यापूर्वीही अनेक प्रसंगी त्याने आपल्या अनुयायांना नम्र होण्याविषयी मार्गदर्शन दिले होते; निसान १४ च्या रात्री त्याने प्रेषितांचे पाय धुऊन आपली नम्रता प्रदर्शित केली. मग येशू म्हणाला: “मी प्रभु व गुरु असूनहि जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.” (योहान १३:१४) यानंतर त्याने प्रेषितांना सांगितले, की मी जो कित्ता घालून दिला आहे, त्याचे अनुकरण तुम्ही करा. येशूने घालून दिलेला कित्ता म्हणजेच त्याने दाखवलेली अनुकरणीय नम्रता ही होती!

प्रेषित पौल आपल्याला सांगतो की पृथ्वीवर येण्याअगोदर येशू “देवाच्या स्वरूपाचा” होता. असे असूनही, त्याने स्वतःला रिक्‍त केले व साधारण मनुष्य बनून या पृथ्वीवर आला. इतकेच काय, तर “त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:६-८) जरा विचार करा. सबंध विश्‍वातील सर्वोच्च व्यक्‍तीच्या अर्थात, खुद्द देवाच्या खालोखाल असूनही येशू देवदूतांपेक्षा कनिष्ठ होण्यास तयार झाला. एक असहाय्य बालकाच्या रूपात जन्माला येण्यास; अपरिपूर्ण आईवडिलांच्या आज्ञेत राहून लहानाचा मोठा होण्यास; व शेवटी एखाद्या तुच्छ गुन्हेगाराप्रमाणे मरण्यास तो कबूल झाला. (कलस्सैकर १:१५, १६; इब्री लोकांस २:६, ७) त्याची नम्रता खरोखर किती उल्लेखनीय होती! अशी “चित्तवृत्ती” उत्पन्‍न करणे आणि अशी ‘लीनता’ आपल्या व्यक्‍तिमत्त्वात विकसित करणे शक्य आहे का? (फिलिप्पैकर २:३-५) होय, पण हे सोपे नाही.

४. कोणत्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात गर्व उत्पन्‍न होतो, पण गर्विष्ठ झाल्यास कोणता धोका आहे?

नम्रतेच्या उलट आहे गर्विष्ठपणा. (नीतिसूत्रे ६:१६-१९) गर्वामुळेच सैतानाचा अधःपात झाला. (१ तीमथ्य ३:६) मनुष्याच्या हृदयात गर्व उत्पन्‍न व्हायला वेळ लागत नाही. आणि एकदा का तो उत्पन्‍न झाला की मग तो काढून टाकणे अतिशय कठीण जाते. लोक निरनिराळ्या कारणांमुळे गर्विष्ठ बनतात. कोणी आपल्या राष्ट्राचा तर कोणी वंशाचा, कोणी आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा, आपल्या शिक्षणाचा, समाजात मिळवलेल्या यशाचा, प्रतिष्ठित स्थानाचा तर कोणी आपल्या रूपाचा किंवा खेळांतील कौशल्यांचा आणि इतर अनेक गोष्टींचा गर्व बाळगतात. पण यहोवा यांपैकी कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही. (१ करिंथकर ४:७) तेव्हा, जर यांपैकी कोणत्या गोष्टीचा आपण गर्व बाळगत असू, तर यहोवासोबतचा आपला नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. “परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो.”—स्तोत्र १३८:६; नीतिसूत्रे ८:१३.

बांधवांसोबत वागताना नम्रता

५. वडिलांनी नम्र असणे महत्त्वाचे का आहे?

यहोवाच्या सेवेत केलेल्या योगदानाबद्दल किंवा मिळवलेल्या यशाबद्दलही आपण कधीच गर्व बाळगू नये. तसेच मंडळीत आपल्यावर काही जबाबदाऱ्‍या असतील तरीदेखील गर्व बाळगण्याचे कारण नाही. (१ इतिहास २९:१४; १ तीमथ्य ६:१७, १८) उलट, जितक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या आपल्यावर असतील तितकेच अधिक नम्र आपण असायला पाहिजे. प्रेषित पेत्राने वडिलांना निक्षून सांगितले, “तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.” (१ पेत्र ५:२-५) वडिलांना अधिकार व सत्ता गाजवण्यासाठी नव्हे तर इतरांची सेवा करण्यासाठी व त्यांच्याकरता कित्ता होण्यासाठी नेमले जाते.—लूक २२:२४-२६; २ करिंथकर १:२४.

६. ख्रिस्ती जीवनातील कोणकोणत्या क्षेत्रांत आपल्याला नम्रतेची गरज आहे?

फक्‍त वडिलांनी नम्र असले पाहिजे, असे नाही. तरुणांना कदाचित वयस्क व्यक्‍तींच्या तुलनेत आपल्या कुशाग्र बुद्धीचा किंवा ताकदवान शरीराचा गर्व वाटू शकतो. तेव्हा, अशांनाच उद्देशून पेत्राने लिहिले: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारुपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) होय, ख्रिस्तासारखी नम्रता सर्वांच्याठायी असणे आवश्‍यक आहे. नम्र असल्याशिवाय आपण सुवार्तेचा प्रचार करू शकणार नाही; खासकरून लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात किंवा आपला विरोध करतात तेव्हा हा गुण प्रदर्शित करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला सल्ला दिला जातो तेव्हा तो स्वीकारण्यासाठी, किंवा सेवाकार्यात अधिक भाग घेता यावा म्हणून आपल्या जीवनात फेरबदल करून साधी राहणी ठेवण्यासाठीही नम्रतेची गरज आहे. शिवाय, आपल्याविरुद्ध अपप्रचार केला जातो, आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने कायदे बनवले जातात किंवा क्रूरतेने आपला छळ केला जातो तेव्हा देखील या सर्व गोष्टींना तोंड देण्याकरता नम्रतेची व निर्भय विश्‍वासाची गरज आहे.—१ पेत्र ५:६.

७, ८. नम्रतेच्या बाबतीत सुधारणा करण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

एखादी व्यक्‍ती गर्व सोडून “लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना” या सल्ल्याचे पालन कशाप्रकारे करू शकते? (फिलिप्पैकर २:३) यासाठी, तिने स्वतःविषयी यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. स्वतःविषयी आपण कसा विचार करावा यासंदर्भात येशूने म्हटले: “तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.” (लूक १७:१०) नेहमी आठवणीत असू द्या, की आपण कितीही केले तरी येशूने जे केले त्यापेक्षा ते जास्त असू शकत नाही. आणि इतके असूनही येशू नम्र होता.

याशिवाय, स्वतःविषयी योग्य मनोवृत्ती बाळगण्यासाठी यहोवाकडे मदतीची विनंती करा. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण अशी प्रार्थना करू शकतो: “विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.” (स्तोत्र ११९:६६) यहोवा आपल्याला स्वतःविषयी सयुक्‍तिकपणे व वाजवीपणे विचार करण्यास मदत करेल आणि नम्र मनोवृत्ती बाळगल्याबद्दल तो आपल्याला आशीर्वाद देईल. (नीतिसूत्रे १८:१२) येशूने म्हटले: “जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.”—मत्तय २३:१२.

चांगले व वाईट यासंबंधी योग्य मनोवृत्ती

९. येशूने चांगले व वाईट यांकडे कशा दृष्टीने पाहिले?

अपरिपूर्ण लोकांमध्ये ३३ वर्षे राहूनही, येशू “निष्पाप राहिला.” (इब्री लोकांस ४:१५) मशीहाविषयी भविष्यवाणी करताना स्तोत्रकर्त्याने फार पूर्वी असे म्हटले होते: “तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे.” (स्तोत्र ४५:७; इब्री लोकांस १:९) या बाबतीतही ख्रिस्ती, येशूचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. चांगले व वाईट यांतला ते केवळ फरक ओळखत नाहीत, तर जे वाईट आहे त्याचा ते द्वेष करतात आणि जे चांगले आहे त्याची आवड धरतात. (आमोस ५:१५) यामुळे त्यांना आपल्या स्वाभाविक पापपूर्ण प्रवृत्तींवर मात करण्यास साहाय्य मिळते.—उत्पत्ति ८:२१; रोमकर ७:२१-२५.

१०. आपण पश्‍चात्ताप न करता “वाईट कृत्ये” करत असू, तर यावरून काय दिसून येईल?

१० निकदेम नावाच्या परूशाला येशूने म्हटले: “जो कोणी वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही; परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, ह्‍यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.” (योहान ३:२०, २१) याकडे लक्ष द्या: योहानाने येशूची ओळख करून देताना म्हटले की ‘जो प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करितो तो खरा प्रकाश’ येशू आहे. (योहान १:९, १०) पण येशूने म्हटले की जर आपण “वाईट कृत्ये” करतो, अर्थात, देवाला न आवडणारी कृत्ये करतो, तर आपण प्रकाशाचा द्वेष करतो. आपल्यापैकी कोणीही येशूचा किंवा त्याच्या शिकवणुकींचा द्वेष करू इच्छितो का? पण पश्‍चात्ताप न करता पाप करत राहणारे अगदी हेच करतात. कदाचित त्यांना असे वाटत नसेल, पण येशू त्यांच्याकडे याच दृष्टीने पाहतो हे स्पष्ट आहे.

चांगले व वाईट यासंबंधी येशूसारखा विचार करण्यास शिकणे

११. चांगले व वाईट यासंबंधी येशूसारखा विचार करायला शिकण्यासाठी कशाची आवश्‍यकता आहे?

११ यहोवाच्या दृष्टिकोनातून चांगले काय व वाईट काय हे आपल्या मनात स्पष्ट असण्याची गरज आहे. हे केवळ देवाचे वचन, बायबल याचा अभ्यास केल्यानेच शक्य होईल. बायबलचा अभ्यास करताना, आपणही स्तोत्रकर्त्याप्रमाणे प्रार्थना करावी: “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर.” (स्तोत्र २५:४) पण सैतान अतिशय कपटी आहे हे कधीही विसरू नका. (२ करिंथकर ११:१४) एखाद्या वाईट गोष्टीचे खरे रूप लपवून, बेसावध ख्रिस्ती व्यक्‍तीला ती गोष्ट चांगलीच आहे असे तो भासवू शकतो. म्हणूनच आपण जे काही शिकतो त्यावर बरेच मनन करण्याची आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान’ दासांच्या मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. (मत्तय २४:४५-४७) अभ्यास, प्रार्थना आणि आपण जे शिकतो त्यावर मनन हे आपल्याला प्रौढतेपर्यंत उन्‍नती करण्यास मदत करेल; असे केल्याने, “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे,” अशा व्यक्‍तींसारखे आपण होऊ. (इब्री लोकांस ५:१४) मग, वाईटाचा द्वेष करण्यास व चांगल्याबद्दल आवड धरण्यास आपण आपोआपच प्रवृत्त होऊ.

१२. बायबलमध्ये दिलेला कोणता सल्ला आपल्याला अनिती आचरण्यापासून रोखू शकतो?

१२ जर आपण वाईटाचा द्वेष करत असू, तर साहजिकच आपण वाईट गोष्टींची इच्छा आपल्या मनात वाढू देणार नाही. येशूच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी योहानाने असे लिहिले: “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीति करु नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.”—१ योहान २:१५, १६.

१३, १४. (क) जगातील गोष्टींची आवड धरणे ख्रिस्ती लोकांकरता धोकेदायक का आहे? (ख) जगातल्या गोष्टींची आवड मनात निर्माण होऊ देण्याचे आपण कसे टाळू शकतो?

१३ काहीजण कदाचित असा विचार करतील, की जगातल्या सगळ्याच गोष्टी काही वाईट नसतात. हे खरे असले तरीसुद्धा, जग व त्यातील आकर्षक गोष्टी यहोवाच्या सेवेतून आपले लक्ष विचलित करू शकतात. जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या जवळ आणण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली नाही. त्यामुळे, आपण जगातल्या गोष्टींवर प्रीती करू लागलो, मगत्या गोष्टी मुळात वाईट नसल्या तरीसुद्धा त्या आपल्याला नाशाकडे नेऊ शकतात. (१ तीमथ्य ६:९, १०) शिवाय, जगातल्या बहुतेक गोष्टी खरोखर वाईट आहेत व त्या आपल्याला दुर्वर्तन करण्यास प्रवृत्त करू शकतात. ज्यांत हिंसाचार, भौतिकवाद किंवा लैंगिक दुराचरण दाखवले जाते, असे चित्रपट अथवा टीव्हीवरील कार्यक्रम आपण पाहिले, तर या गोष्टींत काही गैर नाही असे आपल्याला वाटू लागेल; आणि कालांतराने या गोष्टी करून पाहण्याचा आपल्याला मोह होण्याची शक्यता आहे. जे लोक केवळ आपले राहणीमान सुधारण्यासाठी जगतात किंवा आपला फायदा कसा होईल याचाच सतत विचार करत असतात अशा लोकांच्या सहवासात जर आपण नेहमी राहिलो, तर हळूहळू आपल्यालाही या गोष्टी जीवनात सर्वात महत्त्वाच्या आहेत असे वाटू लागण्याची शक्यता आहे.—मत्तय ६:२४; १ करिंथकर १५:३३.

१४ याउलट, जर यहोवाचे वचन वाचण्यात व त्याचा अभ्यास करण्यात आपण आनंद मानला तर “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” आपल्याला आकर्षक वाटणार नाहीत. शिवाय, जे देवाच्या कार्यांना जीवनात प्राधान्य देतात त्यांच्यासोबत आपण सहवास राखला तर हळूहळू आपणही त्यांच्यासारखे बनू; ते ज्या गोष्टींची आवड धरतात त्यांची आपणही आवड धरू आणि ज्या गोष्टी ते टाळतात त्या आपणही टाळू.—स्तोत्र १५:४; नीतिसूत्रे १३:२०.

१५. येशूच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे, नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट असल्यामुळे आपल्याला कोणती मदत मिळू शकते?

१५ नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट असल्यामुळे येशूला “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यावर लक्ष केंद्रत करणे शक्य झाले. (इब्री लोकांस १२:२) हेच आपल्या बाबतीतही घडू शकते. आपल्याला माहीत आहे की “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत.” त्यामुळे जगातल्या गोष्टी आकर्षक वाटत असल्या तरीसुद्धा त्या फार तात्पुरत्या आहेत. पण “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) येशूने देवाच्या इच्छेप्रमाणे केल्यामुळेच मानवांना सार्वकालिक जीवन मिळणे शक्य झाले. (१ योहान ५:१३) तेव्हा आपण त्याचे सतत अनुकरण करावे व त्याच्या विश्‍वासूपणामुळे शक्य झालेला आशीर्वाद मिळवावा.

छळाला तोंड देणे

१६. येशूने आपल्या अनुयायांना एकमेकांवर प्रीती करण्याची आज्ञा का दिली?

१६ आपले शिष्य ज्यात आपले अनुकरण करतील असा आणखी एक मार्ग असल्याचे येशूने सूचित केले. त्याने म्हटले: “जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी माझी आज्ञा आहे.” (योहान १५:१२, १३, १७) ख्रिस्ती आपल्या बांधवांवर प्रीती करतात, यामागे अनेक कारणे आहेत. पण या विशिष्ट प्रसंगी येशू खासकरून त्यांना जगाकडून जो द्वेष सहन करावा लागेल त्यासंदर्भात विचार करत होता. तो म्हणाला: “जग तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाहि केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. दास धन्यापेक्षा मोठा नाही. . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहान १५:१८, २०) होय, छळ सोसण्यातही ख्रिस्ती येशूसारखे आहेत. जगाकडून केल्या जाणाऱ्‍या द्वेषाला तोंड देण्यासाठी त्यांनी आपसात अतिशय मजबूत प्रेमाचे बंधन निर्माण केले पाहिजे.

१७. जग खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा द्वेष का करते?

१७ पण जग ख्रिश्‍चनांचा द्वेष का करते? कारण येशूप्रमाणेच ते देखील “जगाचे नाहीत.” (योहान १७:१४, १६) राष्ट्रांच्या लढायांत व राजकीय बाबींत ते तटस्थ राहतात; ते बायबलच्या तत्त्वांचे पालन करतात, जीवनाच्या पावित्र्याचा आदर करतात आणि उच्च नैतिक आचरण राखतात. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; १ करिंथकर ६:९-११) ते जीवनात भौतिक नव्हे तर आध्यात्मिक ध्येयांना प्राधान्य देतात. जगात राहूनही पौलाने लिहिल्याप्रमाणे, ते ‘जगाचा पूर्णपणे उपयोग करत नाहीत.’ (१ करिंथकर ७:३१) जगातल्या काही लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या उच्च स्तरांविषयी प्रशंसाही व्यक्‍त केली आहे. पण केवळ लोकांची प्रशंसा मिळवण्यासाठी, किंवा त्यांची मर्जी राखण्यासाठी यहोवाचे साक्षीदार हातमिळवणी करत नाहीत. त्यामुळे जगातले बहुतेक लोक त्यांना समजू शकत नाहीत व बरेच जण त्यांचा द्वेष करतात.

१८, १९. येशूप्रमाणेच विरोध व छळाला ख्रिस्ती कशाप्रकारे तोंड देतात?

१८ येशूला अटक करण्यात आली व नंतर त्याला जिवे मारण्यात आले तेव्हा त्याच्या शिष्यांना जगाचा द्वेष प्रत्यक्ष पाहायला मिळाला; आणि येशूने या द्वेषाला कसे तोंड दिले हे देखील त्यांनी पाहिले. गथशेमाने बागेत येशूचे धार्मिक विरोधक त्याला अटक करण्यास आले. पेत्राने त्याचा बचाव करण्याच्या प्रयत्नात तलवार चालवली, पण येशूने पेत्राला म्हटले: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२; लूक २२:५०, ५१) पूर्वीच्या काळी, इस्राएल लोकांनी आपल्या शत्रूंविरुद्ध लढाईत तलवार चालवली होती. पण आता परिस्थिती बदलली होती. देवाचे राज्य “ह्‍या जगाचे” नव्हते आणि त्याअर्थी ज्यांचे रक्षण केले जावे अशा राष्ट्रीय सीमा या राज्याला नव्हत्या. (योहान १८:३६) लवकरच पेत्र एका आध्यात्मिक राष्ट्राचा सदस्य बनणार होता; या राष्ट्राच्या सदस्यांचे नागरिकत्व स्वर्गातील होते. (गलतीकर ६:१६; फिलिप्पैकर ३:२०, २१) त्यामुळे, यापुढे येशूच्या अनुयायांनाही द्वेषाला व छळाला येशूने ज्याप्रमाणे तोंड दिले त्याचप्रमाणे तोंड द्यायचे होते, अर्थात, निर्भयपणे पण शांतीने. ते सर्व गोष्टी पूर्ण विश्‍वासानिशी यहोवाच्या हातात सोपवतील व छळाला तोंड देण्याकरता त्याच्याच सामर्थ्यावर विसंबून राहतील.—लूक २२:४२.

१९ कित्येक वर्षांनी पेत्राने लिहिले: “ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे; . . . त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२१-२३) येशूने ताकीद दिल्याप्रमाणे, आजवर ख्रिश्‍चनांना क्रूर छळाला तोंड द्यावे लागले आहे. पहिल्या शतकाप्रमाणेच आपल्या काळातही त्यांनी येशूचे अनुकरण केले आहे आणि धीर धरून विश्‍वासू असल्याचे सुरेख उदाहरण मांडले आहे. यावरून त्यांनी दाखवले आहे, की ते शांतीपूर्णरितीने शेवटपर्यंत विश्‍वासू राहतात. (प्रकटीकरण २:९, १०) अशाप्रकारची परिस्थिती आपल्यावर आल्यास आपणही त्यांचे अनुकरण करू या.—२ तीमथ्य ३:१२.

“प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करा”

२०-२२. ख्रिस्ती कोणत्या अर्थाने “प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान” करतात?

२० रोममध्ये असलेल्या मंडळीला पौलाने लिहिले: “प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.” (रोमकर १३:१४) ख्रिस्ती एखाद्या वस्त्राप्रमाणे येशूला परिधान करतात. त्याच्या गुणांचे व कृतींचे अनुकरण करण्याचा ते इतका प्रयत्न करतात की अपरिपूर्ण असूनही ते जणू काय आपल्या धन्याचे प्रतिबिंब होतात.—१ थेस्सलनीकाकर १:६.

२१ येशू ख्रिस्ताच्या अर्थात आपल्या धन्याच्या जीवनाशी सुपरिचित होऊन, तो जगला त्याचप्रकारे जगण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आपणही ‘प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करण्यात’ यशस्वी होऊ शकतो. त्याची नम्रता, त्याची नीतिमत्त्वाची आवड, दुष्टाईविषयी त्याला असलेला वीट, आपल्या बांधवांकरता त्याला वाटणारे प्रेम, त्याचे या जगाचे नसणे आणि छळ होताना त्याने धीराने दाखवलेली सहनशीलता; या सर्व बाबतीत आपण त्याचे अनुकरण करतो. आपण “देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद” करत नाही, म्हणजेच प्रापंचिक ध्येये गाठणे व दैहिक इच्छा पूर्ण करणे यास आपण जीवनात प्राधान्य देत नाही. त्याउलट, कोणताही निर्णय घेताना किंवा कोणत्याही समस्येला तोंड देताना आपण असा विचार करतो, की ‘येशू या ठिकाणी असता तर त्याने काय केले असते? मी काय करावे अशी त्याची इच्छा असती?’

२२ शेवटी, आपण “सुवार्तेची घोषणा” करण्यात व्यग्र राहण्याद्वारे येशूचे अनुकरण करतो. (मत्तय ४:२३; १ करिंथकर १५:५८) या मार्गानेही ख्रिस्ती, येशूने जो कित्ता घालून दिला आहे त्याप्रमाणे चालतात. कशाप्रकारे याविषयी पुढील लेखात आपण चर्चा करू या.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• ख्रिस्ती व्यक्‍तीने नम्र होणे का जरूरीचे आहे?

• चांगले वा वाईट यासंदर्भात योग्य मनोवृत्ती आपण कशाप्रकारे अवलंबू शकतो?

• विरोध व छळाला तोंड देण्यासंबंधात ख्रिस्ती कशाप्रकारे येशूचे अनुकरण करतात?

• आपण कशाप्रकारे “प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान” करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७ पानांवरील चित्र]

येशूने नम्रतेचा परिपूर्ण कित्ता घालून दिला

[८ पानांवरील चित्र]

प्रचार कार्यासहित, ख्रिस्ती व्यक्‍तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत नम्रतेची गरज आहे

[९ पानांवरील चित्र]

अयोग्य प्रकारची करमणूकही योग्य आहे असे सैतान भासवू शकतो

[१० पानांवरील चित्र]

बांधवांबद्दल असणारे प्रेम आपल्याला विरोधाला तोंड देण्याचे सामर्थ्य देऊ शकते