व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्रेषितांची कृत्ये ७:५९ मध्ये स्तेफनाने काढलेल्या उद्‌गारांवरून, आपण येशूला उद्देशून प्रार्थना केली पाहिजे असे सूचित होते का?

प्रेषितांची कृत्ये ७:५९ म्हणते: “ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभु येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” या शब्दांमुळे काहींच्या मनात प्रश्‍न उभे राहिले आहेत कारण बायबल तर म्हणते, की ‘प्रार्थना ऐकणारा’ यहोवा आहे. (स्तोत्र ६५:२) स्तेफनाने खरोखर येशूला प्रार्थना केली होती का? असल्यास, येशू आणि यहोवा सारखेच आहेत असे यावरून सूचित होते का?

किंग जेम्स व्हर्शन म्हणते की स्तेफन “देवाला धावा” करीत होता. त्यामुळे अनेक जण बायबल भाष्यकार मॅथ्यू हेन्री यांच्याप्रमाणे निष्कर्ष काढतात; त्यांनी म्हटले: “स्तेफन येथे ख्रिस्ताला प्रार्थना करतो, त्यामुळे आपणही ख्रिस्ताला प्रार्थना केली पाहिजे.” परंतु हा दृष्टिकोन चुकीचा आहे. का?

नव्या करारावरील बार्न्स यांच्या नोंदी (इंग्रजी) यात अशी प्रामाणिक कबूली दिली आहे: “देव हा शब्द मूळ लिखाणात नाही व भाषांतरांतही नसायला हवा होता. कोणत्याही प्राचीन [हस्तलिपींमध्ये] किंवा अनुवादांमध्ये तो आढळत नाही.” मग “देव” हा शब्द या वचनात कसा काय घालण्यात आला? विद्वान एबियल ॲबट लिव्हरमोर यांनी याला, “विशिष्ट पंथांच्या भाषांतरकारांच्या धार्मिक विचारांचा परिणाम” असे म्हटले. यास्तव, बहुतेक आधुनिक भाषांतरे, देवाचा उल्लेख करत नाहीत कारण तो चुकीचा होता.

तरीसुद्धा पुष्कळ भाषांतरांमध्ये, स्तेफनाने येशूला “प्रार्थना” केली असे म्हटले आहे. आणि नवीन जग भाषांतर (इंग्रजी) यातील तळटीपेत दाखवण्यात आले आहे, की “धावा करणे” याचा अर्थ “आवाहन; प्रार्थना” असाही होऊ शकतो. मग यावरून येशू सर्वसमर्थ देव आहे हे सूचित होत नाही का? नाही. व्हाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्‌र्स असे स्पष्टीकरण देते, की या संदर्भात, एपीकालिओ या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “धावा करणे, आवाहन; . . . अधिकारपदी असलेल्या व्यक्‍तीकडे मागणी करणे” असा होतो. पौलाने याच अर्थाचा शब्द वापरला जेव्हा तो म्हणाला: “मी कैसराजवळ न्याय मागतो.” (प्रेषितांची कृत्ये २५:११) त्यामुळे द न्यू इंग्लिश बायबल उचितपणे म्हणते, की स्तेफनाने येशूचा “धावा” केला.

स्तेफन अशी विनंती करायला का प्रवृत्त झाला? प्रेषितांची कृत्ये ७:५५, ५६ नुसार स्तेफनाने “पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन . . . आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.” इतर वेळेला, स्तेफनाने आपल्या विनंत्या यहोवाला येशूच्या नावाने केल्या असत्या. पण दृष्टांतात त्याने पुनरुत्थित येशूला पाहिल्यावर त्याला थेट येशूला विनंती करायला कसलाही संकोच वाटला नाही; तो येशूला म्हणाला: “माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मृतांना जिवंत करण्याचा येशूला अधिकार देण्यात आला होता हे स्तेफनाला माहीत होते. (योहान ५:२७-२९) त्यामुळे त्याने येशूला, स्वर्गात अमर जीवनासाठी येशू त्याला जिवंत करेपर्यंत त्याच्या आत्म्याचे अर्थात जीवनी शक्‍तीचे रक्षण करायची विनंती केली.

स्तेफनाची ही लहानशी प्रार्थना, येशूला प्रार्थना करण्यासाठी एक नमुना आहे का? नाही, मुळीच नाही. एक गोष्ट, स्तेफनाने येशू व यहोवा यांच्यामध्ये स्पष्टपणे फरक केला कारण अहवाल म्हणतो, की त्याने येशूला “देवाच्या उजवीकडे . . . उभा असलेला” पाहिला. दुसरी गोष्ट म्हणजे, हा केवळ एक अपवाद आहे. अशी प्रार्थना केल्याचे केवळ दुसरे एकच उदाहरण प्रेषित योहानाचे आहे ज्याने येशूला उद्देशून प्रार्थना केली; त्यानेही येशूला दृष्टांतात पाहिल्यावरच त्याला प्रार्थना केली.—प्रकटीकरण २२:१६, २०.

आज ख्रिस्ती आपल्या सर्व प्रार्थना उचितरीत्या यहोवा देवाला करत असले तरी त्यांचा हा अढळ विश्‍वास आहे, की येशू “पुनरुत्थान व जीवन” आहे. (योहान ११:२५) आपल्या अनुयायांचे मृतांमधून पुनरुत्थान करण्याची येशूला शक्‍ती आहे या विश्‍वासाने जशी स्तेफनाला मदत केली तशीच आपल्यालाही हा विश्‍वास मदत करू शकतो आणि संकटकाळात टिकून राहण्याची शक्‍ती देऊ शकतो.