व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही तुमच्या नशीबावर नियंत्रण ठेवू शकता?

तुम्ही तुमच्या नशीबावर नियंत्रण ठेवू शकता?

तुम्ही तुमच्या नशीबावर नियंत्रण ठेवू शकता?

आपले अंतिम नशीब पूर्वनियोजित आहे का? जीवनात आपण ज्या निवडी करतो त्यांचा आपल्या भवितव्यावर काहीच परिणाम होत नाही का?

समजा, माणूस त्याच्या दैवाचा धनी आहे. मग, एक विशिष्ट कार्य करण्यासाठी किंवा विशिष्ट जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याला आधीच नेमले जाऊ शकते का? आपले भविष्य घडवण्यास जर माणूस स्वतंत्र असेल, तर पृथ्वीबद्दल देव आपली इच्छा कशी पूर्ण करेल? बायबल या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देते.

पूर्वनियोजन आणि स्वतंत्र इच्छा—दोन्ही संकल्पना बरोबर असू शकतील का?

यहोवा देवाने आपल्याला कसे निर्माण केले त्याचा आपण विचार करू या. बायबल म्हणते: “देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला . . . नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्पत्ति १:२७) देवाच्या प्रतिरुपात आपल्याला निर्माण करण्यात आले आहे त्यामुळे आपल्यामध्ये प्रेम, न्याय, बुद्धी, शक्‍ती यासारखे त्याचे गुण प्रतिबिंबित करण्याची क्षमता आहे. देवाने आपल्याला एक देणगी देखील दिली आहे, अर्थात स्वतंत्र इच्छा किंवा निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे, पृथ्वीवरील सृष्टीत आपण एकमेव ठरतो. देवाचे नैतिक मार्गदर्शन स्वीकारायचे की नाही, हे आपण ठरवू शकतो. म्हणूनच संदेष्टा मोशे असे म्हणू शकला: “आकाश व पृथ्वी ह्‍यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.”—अनुवाद ३०:१९, २०.

परंतु, निवड करण्याचे स्वातंत्र्य याचा अर्थ पूर्ण स्वातंत्र्य असा होत नाही. विश्‍वाच्या स्थैर्यासाठी व शांतीसाठी देवाने स्थापित केलेल्या भौतिक व नैतिक नियमांतून आपण मुक्‍त होत नाही; हे नियम आपल्या लाभासाठी घालून देण्यात आले होते. यांपैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम घडू शकतात. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाकडे दुर्लक्ष करून आपण एका उंच इमारतीच्या छतावरून खाली उडी मारायचे ठरवल्यास काय होऊ शकते याचा विचार करा!—गलतीकर ६:७.

निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला एक मर्यादाही घालते; ही मर्यादा अशाप्रकारचे स्वातंत्र्य नसलेल्या प्राण्यांमध्ये दिसून येत नाही. लेखक कोरलस लामॉन्ट असे विचारतात: “मानवाच्या निवडी व कार्ये पूर्वनियोजित आहेत . . . असा जर आपण विश्‍वास केला तर आपण त्याला नैतिकरित्या जबाबदार कसे ठरवू शकतो व त्याने जर काही चूक केली तर शिक्षा कशी देऊ शकतो?” नाही, आपण देऊ शकणार नाही. उपजतबुद्धीने वागणाऱ्‍या प्राण्यांना त्यांच्या कार्यांसाठी नैतिकरीत्या जबाबदार धरले जात नाही. जे कार्य करण्यासाठी पूर्वयोजित करण्यात आले आहे त्या कार्यांसाठी संगणकाला जबाबदार धरता येत नाही. त्यामुळे, निवड करण्याच्या स्वातंत्र्यामुळे आपल्यावर गंभीर जबाबदारी येते आणि ती आपल्या कार्यांबद्दल आपल्याला जबाबदार ठरवते.

आपण कोणता मार्ग निवडणार आहोत हे जर यहोवा देवाने आपल्या जन्माआधीच ठरवले असते आणि नंतर आपल्या कार्यांबद्दल आपल्याला जबाबदार धरले असते तर तो दुष्ट आणि अन्यायी देव ठरला असता. पण तो असे करत नाही कारण “देव प्रीति आहे” आणि “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” (१ योहान ४:८; अनुवाद ३२:४) एकीकडे आपल्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य देऊन, दुसरीकडे, पूर्वनियोजनाचा सिद्धांत मानणारे लोक दावा करतात त्याप्रमाणे देवाने ‘तो कोणाला वाचवेल आणि कोणाचा नाश करेल हे अनादिकालापासुनच’ ठरवलेले नाही. निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर पूर्वनियोजन हे तर्काला पटत नाही.

बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते, की आपण करत असलेल्या निवडींमुळे आपले भवितव्य बदलू शकते. उदाहरणार्थ, देव दुष्कर्म्यांना अशी विनंती करतो: “तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे . . . मी तुमचे वाईट करणार नाही.” (यिर्मया २५:५, ६) देवाने प्रत्येक व्यक्‍तीचे भवितव्य आधीच ठरवले असेल तर त्याची ही विनंती निरर्थक ठरली असती. शिवाय, देवाचे वचन म्हणते: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे.” (प्रेषितांची कृत्ये ३:१९) लोक आपले भवितव्य किंवा आपले नशीब कोणत्याही परिस्थितीत बदलू शकत नाहीत हे जर देवाला आधीच माहीत असते तर त्यांना पश्‍चात्ताप करून आपल्या वाईट कार्यांपासून वळा असे त्याने का सांगितले असते?

येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राजे म्हणून राज्य करण्यासाठी देवाने काही लोकांना आमंत्रित केले आहे, असे शास्त्रवचनात सांगितले आहे. (मत्तय २२:१४; लूक १२:३२) परंतु, ते जर शेवटपर्यंत टिकून राहिले नाहीत तर ते हा विशेषाधिकार गमावतील, असे बायबल सांगते. (प्रकटीकरण २:१०) पण देवाने जर त्यांना न निवडण्याचे आधीच ठरवले असते तर तो त्यांना हे आमंत्रण देईलच कसे? प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बंधूभगिनींना काय लिहिले त्याचाही जरा विचार करा. त्याने लिहिले: “सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापाबद्दल ह्‍यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही.” (इब्री लोकांस १०:२६) देवाने यांचे भवितव्य आधीच ठरवले असेल तर हा इशारा देण्यात काही अर्थच राहिला नसता. परंतु मग, निदान काही लोकांना तरी देवाने येशू ख्रिस्ताबरोबर राजे होण्याकरता आधीच नेमलेले नाही का?

पूर्वनियोजित—व्यक्‍ती की एक गट?

प्रेषित पौलाने लिहिले: “[देवाने] स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, . . . म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले, त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते.” (इफिसकर १:३-५) देवाने काय पूर्वीच नेमले आहे आणि “जगाच्या स्थापनेपूर्वी” निवडून घेतल्याचा काय अर्थ होतो?

या उताऱ्‍यात असे म्हटले आहे, की देवाने पहिला मनुष्य आदाम याच्या वंशातून काहींना, ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राज्य करण्याकरता निवडले आहे. (रोमकर ८:१४-१७, २८-३०; प्रकटीकरण ५:९, १०) परंतु, यहोवा देवाने हजारो वर्षांपूर्वीच विशिष्ट व्यक्‍तींना, त्यांचा जन्म होण्याआधीच हा विशेषाधिकार देण्याचे ठरवले आहे, असे गृहीत धरणे, मानवांना निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे या वस्तुस्थितीच्या विरोधात आहे. देवाने प्रत्येक व्यक्‍तीला नव्हे तर एका गटाला, किंवा लोकांच्या एका वर्गाला पूर्वीच निवडले.

हे समजण्यासाठी पुढील उदाहरणाचा विचार करा: समजा एक सरकार एक खास संस्था स्थापन करू इच्छिते. म्हणून ते, ती संस्था कोणकोणते काम करील, तिला कोणकोणते अधिकार असतील, ती किती मोठी असेल, हे सर्व आधीच ठरवते. आणि सरतेशेवटी ती संस्था स्थापन होऊन काही काळ लोटल्यानंतर ती तिचे कार्य सुरू करते; त्या संस्थेतील सदस्य म्हणतात: “आमचं काय काम असेल, हे सरकारनं अनेक वर्षांपूर्वीच ठरवलं होतं. आता आम्ही आम्हाला दिलेलं काम सुरू करत आहोत.” या संस्थेत कोणकोणत्या व्यक्‍ती कामाला असतील, हे सरकारने काही वर्षांपूर्वीच ठरवले असावे, असे तुम्ही म्हणाल का? मुळीच नाही. तसेच, यहोवाने हे आधीच ठरवले, की तो आदामाच्या पापांचे निवारण करण्यासाठी एक खास माध्यम स्थापन करील. यात सहभागी होणाऱ्‍या लोकांचा गट देखील त्याने निवडला—पण गटातील विशिष्ट व्यक्‍तींना निवडले नाही. त्यांची निवड नंतर केली जाणार होती; आणि हे लोक आपल्या जीवनात करत असलेल्या निवडींचा मग, त्यांना शेवटी निवडण्यात आले आहे किंवा नाही यावर परिणाम होणार होता.

“[देवाने] जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले,” असे जेव्हा प्रेषित पौलाने म्हटले तेव्हा तो कोणत्या जगाविषयी बोलत होता? आदाम आणि हव्वेला निर्माण करून देवाने ज्या जगाची सुरुवात केली त्या जगाविषयी पौल बोलत नव्हता. ते जग “फार चांगले”—अर्थात पाप आणि भ्रष्टता यांपासून पूर्णपणे मुक्‍त होते. (उत्पत्ति १:३१) त्याला पापापासून ‘मुक्‍तीची’ गरज नव्हती.—इफिसकर १:७.

पौल ज्या जगाविषयी बोलत होता ते जग, आदाम आणि हव्वेने एदेन बागेत बंडाळी केल्यानंतर अस्तित्वात आले; एक असे जग जे देवाच्या मूळ उद्देशापेक्षा अगदी वेगळे होते. आदाम आणि हव्वेच्या मुलांपासून या जगाची सुरुवात झाली. या जगातील लोक देवापासून दुरावलेले व पाप आणि अनीतीच्या दास्यत्वात होते. ते अशा लोकांचे जग होते ज्यांना सोडवता येऊ शकत होते; ते आदाम आणि हव्वेसारखे जाणूनबुजून पाप करणाऱ्‍यांसारखे नव्हते.—रोमकर ५:१२; ८:१८-२१.

एदेन बागेतील बंडाळीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीवर यहोवा देव लगेच नियंत्रण करू शकला. गरज उद्‌भवताच, त्याने एक खास माध्यम स्थापन करण्याचे ठरवले—मशीही राज्य ज्याचा राजा येशू ख्रिस्त असेल. या माध्यमामार्फत तो आदामाकडून आलेल्या पापातून मानवजातीला मुक्‍त करणार होता. (मत्तय ६:१०) हे त्याने, जिला मुक्‍त केले जाणार होते त्या मानवजातीच्या “जगाच्या स्थापनेपूर्वी” केले; म्हणजे, बंडखोर आदाम आणि हव्वेला मुले व्हायच्या आधीच केले.

मानव जे करू इच्छितात ते पूर्ण करण्यासाठी सहसा त्यांना आधी योजना करावी लागते. देवाने या विश्‍वासाठी एक योजना केली असावी आणि या विश्‍वातील प्रत्येक व्यक्‍तीचे भवितव्य आधीच ठरवले असावे, ही पूर्वनियोजनाची शिकवण आहे. “पुष्कळ तत्त्ववेत्त्यांना असे वाटते, की सर्वशक्‍तीमान देवाकडे, प्रत्येक घटनेची सविस्तर पूर्वयोजना आखलेली असलीच पाहिजे,” असे रॉय वेदरफोर्ड यांनी लिहिले. पण देवाला प्रत्येक घटनेची सविस्तर पूर्वयोजना आखण्याची खरोखरच गरज आहे का?

यहोवाकडे असीम सामर्थ्य आणि अतुलनीय बुद्धी असल्यामुळे, आपली सृष्टी असलेल्या मानवांनी त्यांच्या स्वतंत्र इच्छेचा उपयोग केल्यामुळे उद्‌भवणाऱ्‍या कोणत्याही तातडीच्या किंवा आकस्मिक परिस्थितीला अथवा घटनेला यशस्वीरीत्या हाताळण्याची त्याच्याकडे शक्‍ती आहे. (यशया ४०:२५, २६; रोमकर ११:३३) तो ताबडतोब आणि पूर्वनियोजन न करताही हे करू शकतो. मानवाकडे मर्यादित क्षमता आहेत, पण सर्वसमर्थ देवाकडे अमर्यादित क्षमता आहेत त्यामुळे त्याला, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्‍तीचे भवितव्य ठरवणाऱ्‍या सविस्तर आणि ठराविक योजनेची गरज नाही. (नीतिसूत्रे १९:२१) अनेक बायबल भाषांतरांमध्ये, इफिसकर ३:११ [NW] या वचनात देवाने ठराविक योजना बनवली आहे असे म्हणण्यापेक्षा देवाचा “चिरकालिक उद्देश” आहे, असे म्हटले आहे.

तुम्ही तुमचे भवितव्य कसे ठरवू शकता

देवाचा पृथ्वीसाठी एक उद्देश आहे आणि तो उद्देश त्याने आधीच ठरवला आहे. प्रकटीकरण २१:३, ४ म्हणते: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” होय, यहोवाने मुळात जसे उद्देशिले होते त्याप्रमाणे ही पृथ्वी परादीस होणार आहे. (उत्पत्ति १:२७, २८) पण मग प्रश्‍न असा येतो, की तुम्ही तेथे असाल का? तुम्ही आता जी निवड कराल त्यावर हे अवलंबून आहे. यहोवाने तुमचे भवितव्य ठरवलेले नाही.

देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर जो कोणी विश्‍वास ठेवतो त्याला त्याच्या खंडणी बलिदानाद्वारे सार्वकालिक जीवन मिळणे शक्य आहे. (योहान ३:१६, १७; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) बायबल म्हणते, “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही.” (योहान ३:३६) बायबलमधून, देवाविषयी, त्याच्या पुत्राविषयी आणि देवाच्या इच्छेविषयी शिकून घेण्याद्वारे व शिकलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब करण्याद्वारे तुम्ही जीवन निवडू शकता. देवाच्या वचनातील खऱ्‍या बुद्धीनुसार वागणाऱ्‍या व्यक्‍तीला ही शाश्‍वती आहे, की “तो सुरक्षित [राहील] आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ [असेल].”—नीतिसूत्रे १:२०, ३३.

[५ पानांवरील चित्रे]

मानव प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत; आपल्या कार्यांबद्दल ते नैतिकरीत्या जबाबदार आहेत

[चित्राचे श्रेय]

गरूड: Foto: Cortesía de GREFA