व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे

शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे स्वतःचेच लोक जेव्हा त्याच्याकडे पाठ फिरवतात आणि खोट्या दैवतांची उपासना करू लागतात तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असते? ते वारंवार त्याची आज्ञाभंग करतात, पण केवळ संकटात सापडल्यावरच त्याची आठवण करतात हे पाहिल्यावर तो काय करतो? अशा परिस्थितीतही यहोवा आपल्या लोकांना संकटातून सोडवतो का? या व इतर महत्त्वपूर्ण प्रश्‍नांचे उत्तर शास्ते या पुस्तकात सापडते. हे पुस्तक सा.यु.पू. ११०० सालाच्या सुमारास संदेष्टा शमुवेल याने लिहून पूर्ण केले होते. यात यहोशवाच्या मृत्यूपासून इस्राएलातील पहिला राजा सिंहासनावर बसला तेव्हापर्यंतचा म्हणजे जवळजवळ ३३० वर्षांचा इतिहास नोंदलेला आहे.

देवाच्या सामर्थ्यशाली वचनाचा किंवा संदेशाचा भाग असलेले हे पुस्तक आपल्याकरता अतिशय मोलाचे आहे. (इब्री लोकांस ४:१२) यातील चित्तवेधक अहवाल आपल्याला देवाचे व्यक्‍तिमत्त्व जवळून पाहण्यास मदत करतात. या अहवालांतून मिळणारे धडे विश्‍वासाला पुष्टी देतात आणि ते आपल्याला ‘खऱ्‍या जीवनाची’ अर्थात, देवाने वचन दिलेल्या नव्या जगातील सार्वकालिक जीवनाची आशा दृढ धरून ठेवण्यास मदत करतात. (१ तीमथ्य ६:१२, १९; २ पेत्र ३:१३) आपल्या लोकांच्या तारणाकरता यहोवाने जी महत्कृत्ये केली ती, भविष्यात तो आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे जे महान तारण करेल त्याची पूर्वझलक देतात.

शास्त्यांची गरज का पडली?

(शास्ते १:१–३:६)

यहोशवाच्या नेतृत्वाखाली कनान देशातील राजांचा पराभव केल्यानंतर इस्राएलचे वंश आपापल्या वतनांत जाऊन वसतात. पण ते देशांतील रहिवाशांना तेथून हाकलून लावत नाहीत. ही चूक इस्राएलाकरता पाशरूप ठरते.

यहोशवाच्या नंतरच्या पिढीला “परमेश्‍वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्यांची ओळख राहिली नव्हती.” (शास्ते २:१०) शिवाय, इस्राएलांनी कनानी लोकांशी सोयरीक करण्यास व त्यांच्या देवांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे यहोवाने इस्राएलांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. त्यांच्यावर खूपच अत्याचार होऊ लागला तेव्हा मात्र इस्राएल पुत्र खऱ्‍या देवाकडे मदतीची याचना करू लागले. अशा प्रकारच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय वातावरणात, यहोवाने आपल्या लोकांना त्यांच्या शत्रूंपासून बचावण्यासाठी ज्या शास्त्यांना उभे केले त्यांच्याविषयीचा सविस्तर अहवाल आपल्यासमोर शास्ते या पुस्तकातून उलगडतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:२, —वतन म्हणून दिलेल्या देशावर ताबा मिळवण्यासाठी स्वारी करण्याकरता सर्वप्रथम यहुदा वंशाला का निवडले जाते? खरे पाहता हा सन्मान याकोबाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन याला मिळण्यास हवा होता. पण याकोबाने आपल्या मृत्यूशय्येवर केलेल्या भविष्यवाणीत असे भाकीत केले होते की रऊबेनाला श्रेष्ठत्व मिळणार नाही कारण त्याने ज्येष्ठ पुत्राचा अधिकार गमवला होता. शिमोन व लेवी यांनी अत्याचार केल्यामुळे त्यांची सबंध इस्राएलात पांगापांग होणार होती. (उत्पत्ति ४९:३-५, ७) या सन्मानाचा यानंतरचा हक्कदार होता यहुदा, जो याकोबाचा चवथा पुत्र होता. शिमोनानेही यहुदासोबत स्वारी केली आणि त्याला यहुदाच्या विस्तीर्ण प्रदेशात ठिकठिकाणी विखुरलेली स्थाने वतनादाखल देण्यात आली. *यहोशवा १९:९.

१:६, ७—पराभूत झालेल्या राजांच्या हातापायाचे आंगठे का कापून टाकले जायचे? जिच्या हातापायाचे आंगठे कापून टाकले आहेत ती व्यक्‍ती लढाईत भाग घेण्यास असमर्थ होत असे. हाताच्या आंगठ्याशिवाय कोणताही सैनिक तलवार किंवा भाला या शस्त्रांचा उपयोग कसा करू शकत होता? शिवाय, पायाचे आंगठे नसल्यास माणूस आपला तोल सांभाळू शकणार नाही.

आपल्याकरता धडे:

२:१०-१२. ‘परमेश्‍वराचे सर्व उपकार विसरू नये’ म्हणून आपण नियमितपणे बायबल अभ्यास केला पाहिजे. (स्तोत्र १०३:२) आईवडिलांनी आपल्या मुलांच्या मनावर देवाच्या वचनातील सत्य बिंबवले पाहिजे.—अनुवाद ६:६-९.

२:१४, २१, २२. यहोवा काही उद्देशास्तव आपल्या अवज्ञाकारी लोकांना वाईट अनुभव येऊ देतो; त्यांचे ताडन करण्याकरता, त्यांच्यात सुधारणा करण्याकरता आणि त्यांना आपल्याकडे परत येण्यास प्रवृत्त करण्याकरता तो कधीकधी असे घडू देतो.

यहोवा शास्त्यांना उभे करतो

(शास्ते ३:७–१६:३१)

शास्त्यांच्या कर्तृत्वाच्या चित्तवेधक अहवालाची सुरुवात, आठ वर्षे एका मेसोपोटेमियन राजाच्या दास्यात राहिल्यानंतर अथनिएल इस्राएलांना सोडवतो त्या घटनेने होते. एहूद शास्ता अतिशय निर्भयतेने डावपेच रचून मवाब्यांचा लठ्ठ राजा एग्लोन याला जिवे मारतो. शूर शमगार एकटाच बैलाच्या पराणीने ६०० पलिष्ट्यांना ठार मारतो. संदेष्ट्री दबोरा हिचे प्रोत्साहन मिळाल्याने व यहोवाच्या पाठिंब्याने बाराक, दहा हजार माणसांच्या सैन्यासोबत, त्यांच्याजवळ फारशी शस्त्रे नसतानाही, सीसराच्या बलाढ्य सैन्याला हरवतो. यानंतर यहोवा गिदोनाला उभे करतो आणि त्याला व त्याच्या ३०० माणसांना मिद्यानी लोकांवर विजय मिळवून देतो.

इफ्ताह याच्याद्वारे यहोवा इस्राएलांना अम्मोन्यांच्या हातातून सोडवतो. यांव्यतिरिक्‍त, इस्राएलांचा न्यायनिवाडा करणाऱ्‍या १२ मनुष्यांपैकी तोला, याईर, इब्सान, एलोन व अब्दोन हे देखील होते. पलिष्ट्यांविरुद्ध लढणाऱ्‍या शमशोनानंतर शास्त्यांचा काळ संपुष्टात येतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४:८—संदेष्ट्री दबोरा हिला आपल्यासोबत लढाईला येण्याची बाराक गळ का घालतो? सीसराच्या सैन्याला एकट्याने तोंड देण्यास आपण कमी पडू असे बाराकला वाटते. दबोरा संदेष्ट्री सोबत असल्यास, त्याला व त्याच्या माणसांना दिलासा मिळेल की देव आपले मार्गदर्शन करत आहे; आणि त्यांचा आत्मविश्‍वासही वाढेल असे बाराकला वाटते. तेव्हा बाराकचे दबोराला सोबत येण्याची गळ घालणे हे दुर्बलतेचे नव्हे तर मजबूत विश्‍वासाचे चिन्ह आहे.

५:२०—बाराकच्या वतीने आकाशातून तारे लढले ते कोणत्या अर्थाने? देवदूतांनी त्याचे साहाय्य केले, उल्कापात घडून, त्यांना सीसराच्या विद्वान पुरुषांनी अपशकुन मानले किंवा मग सीसराने ज्योतिषविद्येच्या आधारावर केलेले अंदाज चुकीचे निघाले यांपैकी नेमके काय घडले याविषयी बायबल स्पष्ट माहिती देत नाही. पण साहजिकच कोणत्या न कोणत्या प्रकारे देवाने हस्तक्षेप केला होता.

७:१-३; ८:१०—गिदोनाची ३२,००० माणसे शत्रूंच्या १,३५,००० माणसांपुढे फारच आहेत असे यहोवाने का म्हटले? याचे कारण की गिदोन व त्याच्या माणसांना यहोवा विजय मिळवून देणार होता. आपण स्वतःच्या शक्‍तीने मिद्यानी लोकांचा पराभव केला असा त्यांनी विचार करू नये अशी देवाची इच्छा होती.

११:३०, ३१—इप्ताहने देवाला शब्द दिला तेव्हा त्याच्या मनात नरबली देण्याचा विचार होता का? असा विचार इप्ताहच्या मनात येणे शक्यच नव्हते कारण नियमशास्त्रात असा कायदा होता: “आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा . . . असा तुमच्यापैकी कोणी नसावा.” (अनुवाद १८:१०, ११) पण एवढे मात्र खरे की इप्ताहने प्राण्याविषयी नव्हे तर मनुष्याविषयी विचार करूनच देवाला शब्द दिला. बलिदानाकरता दिले जाणारे प्राणी इस्राएली लोकांच्या घरात ठेवले जात नव्हते. आणि प्राण्याचे हवन करणे यात विशेष असे काही नव्हते. आपल्या घरातून सर्वप्रथम आपली मुलगीही येऊ शकते याची इप्ताहला जाणीव होती. जी कोणी ती व्यक्‍ती असेल, तिला उपासनेशी संबंधित यहोवाच्या अनन्य सेवेकरता समर्पित केले जाईल या अर्थाने तिचे “हवन” केले जाणार होते.

आपल्याकरता धडे:

३:१०. आध्यात्मिक कार्यांत सफलता मिळणे हे मानवांच्या बुद्धीवर नव्हे तर यहोवाच्या आत्म्यावर अवलंबून आहे.—स्तोत्र १२७:१.

३:२१. एहूदने आपली तलवार अतिशय शिताफीने व धैर्याने चालवली. आपणही “आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन,” याचा निपुणतेने उपयोग करण्यास शिकले पाहिजे. याचा अर्थ, सेवाकार्यात आपण शास्त्रवचनांचा धैर्याने वापर केला पाहिजे.—इफिसकर ६:१७; २ तीमथ्य २:१५.

६:११-१५; ८:१-३, २२, २३. गिदोनाच्या विनम्रतेवरून आपण तीन महत्त्वाचे धडे शिकू शकतो: (१) आपल्याला सेवेचा एखादा विशेषाधिकार दिला जातो तेव्हा लोकांकडून मिळणाऱ्‍या आदराबद्दल किंवा प्रतिष्ठेबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा त्यासोबत कोणती जबाबदारी आपल्यावर येते याचा आपण विचार केला पाहिजे. (२) ज्यांची भांडण करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्याशी विनम्रतेने वागणे यातच सुज्ञपणा आहे. (३) विनम्रता आपल्याला पद मिळवण्यासाठी उतावीळ होण्यापासून सांभाळते.

६:१७-२२, ३६-४०. आपणही सावध राहून, ‘प्रत्येक प्रेरित वचनावर विश्‍वास ठेवू नये.’ तर “ती प्रेरित वचने खरोखरच देवाकडून आहेत किंवा नाही याची परीक्षा” करावी. (१ योहान ४:१, NW) नव्यानेच नियुक्‍त केलेल्या ख्रिस्ती वडिलाने कोणा बांधवाला सल्ला देण्याआधी तो सल्ला पूर्णतः बायबलवर आधारित आहे याची खात्री करण्याकरता, आपल्यापेक्षा जास्त अनुभवी वडिलांचे मत विचारणे सुज्ञपणाचे ठरेल.

६:२५-२७. आपल्या विरोधकांना विनाकारण राग येऊ नये म्हणून गिदोन समंजसपणे वागला. सुवार्तेचा प्रचार करत असताना आपणही आपल्या बोलण्याद्वारे लोकांना विनाकारण राग येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

७:६. यहोवाची सेवा करण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा आपण गिदोनाच्या ३०० माणसांसारखे—सावध व जागरूक असले पाहिजे.

९:८-१५. गर्विष्ठपणे वागून पद अथवा सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे किती मूर्खपणाचे आहे!

११:३५-३७. निश्‍चितच, इप्ताहच्या उत्तम आदर्शामुळे त्याच्या मुलीलाही दृढ विश्‍वास आणि आत्मत्यागी वृत्ती विकसित करण्यास मदत मिळाली असेल. आजही आईवडील आपल्या मुलांसमोर असाच उत्तम आदर्श ठेवू शकतात.

११:४० (पं.र.भा.). यहोवाच्या सेवेत स्वेच्छेने काम करण्याची वृत्ती दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीची प्रशंसा केल्यामुळे तिला प्रोत्साहन मिळते.

१३:८. आपल्या मुलांना शिकवताना आईवडिलांनी यहोवाच्या मार्गदर्शनाकरता प्रार्थना केली पाहिजे व त्याच्या सूचनांचे पालन केले पाहिजे.—२ तीमथ्य ३:१६.

१४:१६, १७; १६:१६. अश्रू गाळून व एखाद्याच्या मागे टुमणे लावून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतो.—नीतिसूत्रे १९:१३; २१:१९.

इस्राएलातील इतर दुष्कृत्ये

(शास्ते १७:१–२१:२५)

शास्ते या पुस्तकाच्या शेवटल्या भागात दोन लक्षवेधक अहवाल आहेत. यांपैकी पहिला अहवाल मीखा नावाच्या एका मनुष्याबद्दल आहे; त्याने आपल्या घरात एका मूर्तीची स्थापना करून एका लेव्याला आपल्याकरता पुरोहित म्हणून नेमले. लईश किंवा लेशेम या शहराचा नाश केल्यानंतर दान वंशजांनी स्वतःचे शहर वसवून त्याचे नाव दान असे ठेवले. मीखाच्या घरातील मूर्ती व त्याचा पुरोहित यांचा वापर करून त्यांनी दानमध्ये वेगळ्या प्रकारची उपासना सुरू केली. लईश शहर हे यहोशवाच्या मृत्यूच्या आधीच सर करण्यात आले होते.—यहोशवा १९:४७.

दुसरी घटना यहोशवाच्या मृत्यूच्या काही काळानंतरच घडते. गिबा या बन्यामीन वंशजांच्या शहरातील काही पुरुषांनी केलेल्या सामुहिक लैंगिक अपराधामुळे बन्यामीनाच्या सबंध वंशाचा नाश होण्याची पाळी येते—केवळ ६०० पुरुष जिवंत बचावतात. पण एका व्यावहारिक तरतुदीमुळे त्यांना पत्नी मिळवणे शक्य होते; दाविदाचे राज्यशासन सुरू होईपर्यंत त्यांची संख्या इतकी वाढते की त्यांच्यात सुमारे ६०,००० वीरपुरुष असतात.—१ इतिहास ७:६-११.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१७:६; २१:२५—‘ज्याला जसे बरे दिसेल तसे तो करीत’ असल्यामुळे देशात अंधाधुंदी माजण्यास प्रोत्साहन मिळाले का? असे म्हणता येणार नाही, कारण यहोवाने आपल्या लोकांच्या मार्गदर्शनासाठी पुरेशा तरतुदी केल्या होत्या. त्याने त्यांना नियमशास्त्र दिले आणि आपल्या मार्गांचे शिक्षण देण्याकरता याजकगणालाही नेमले होते. उरीम व थुम्मीम याच्या माध्यमाने महायाजक महत्त्वपूर्ण प्रश्‍नांसंबंधी देवाची मसलत घेऊ शकत होता. (निर्गम २८:३०) प्रत्येक शहरात उपयुक्‍त सल्ला पुरवण्याकरता वडीलजन देखील होते. या सर्व तरतुदींचा फायदा घेणाऱ्‍या इस्राएल लोकांजवळ आपल्या विवेकबुद्धीला मार्गदर्शित करण्याकरता पुरेसे मार्गदर्शन उपलब्ध होते. या मार्गाने त्यांनी ‘आपल्याला बरे दिसेल तसे’ केले तेव्हा त्याचा चांगलाच परिणाम घडून आला. उलटपक्षी, जेव्हा एखाद्या व्यक्‍तीने नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करून आचरण व उपासनेच्या संबंधाने आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेतले तेव्हा त्याचा परिणाम वाईटच झाला.

२०:१७-४८—बन्यामीन वंशजांना खरे तर शिक्षा मिळायला हवी होती, मग यहोवाने बन्यामीन वंशजांना इतर इस्राएल वंशांवर दोनदा विजय का मिळवू दिला? विश्‍वासू इस्राएल वंशांना सुरुवातीला मोठी हानी सहन करू देण्याद्वारे, इस्राएलातून दुष्टाईचा नायनाट करण्याचा त्यांचा संकल्प किती पक्का आहे याची यहोवाने परीक्षा केली.

आपल्याकरता धडे:

१९:१४, १५. गिबाच्या लोकांनी पाहुणचार दाखवण्यास मागेपुढे पाहिले हे त्यांची नैतिक स्थिती चांगली नसल्याचे लक्षण होते. ख्रिश्‍चनांना “पाहुणचार करण्यास तत्पर असा” अशी आज्ञा देण्यात आली आहे.—रोमकर १२:१३.

भविष्यातील सुटका

आता फार लवकर, ख्रिस्त येशूच्या हाती असलेले देवाचे राज्य या दुष्ट जगाचा नाश करून नीतिमान व निर्दोष जनांना अतिशय मोठ्या प्रमाणात सुटका मिळवून देईल. (नीतिसूत्रे २:२१, २२; दानीएल २:४४) तेव्हा ‘परमेश्‍वराचे सर्व शत्रु नाश पावतील, पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्‍या सूर्यासमान होतील.’ (शास्ते ५:३१) शास्त्यांच्या या पुस्तकातून आपल्याला जे काही शिकायला मिळाले आहे त्याचे पालन करण्याद्वारे आपण यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांपैकी आहोत हे दाखवू या.

शास्त्यांच्या निरनिराळ्या अहवालांतून वारंवार स्पष्ट झालेले एक मूलभूत सत्य असे आहे: यहोवाच्या आज्ञांचे पालन केल्यास समृद्ध आशीर्वाद लाभतात पण त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केल्याने गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. (अनुवाद ११:२६-२८) म्हणूनच देवाने प्रकट केलेल्या त्याच्या इच्छेप्रमाणे ‘मनापासून करणे’ अत्यंत महत्त्वाचे आहे!—रोमकर ६:१७; १ योहान २:१७.

[तळटीप]

^ परि. 5 लेवीयांना प्रतिज्ञात देशात स्वतंत्र असे वतन देण्यात आले नाही; केवळ सबंध इस्राएलात विखुरलेली ४८ शहरे त्यांना मिळाली.

[२५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

“परमेश्‍वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणाऱ्‍यांच्या हातून सोडवीत.”—शास्ते २:१६

शास्ते

१. अथनिएल

२. एहूद

३. शमगार

४. बाराक

५. गिदोन

६. तोला

७. याईर

८. इप्ताह

९. इब्सान

१०. एलोन

११. अब्दोन

१२. शमशोन

दान

मनश्‍शे

नफताली

आशेर

जबुलून

इस्साखार

मनश्‍शे

गाद

इफ्राईम

दान

बन्यामीन

रऊबेन

यहुदा

[२६ पानांवरील चित्र]

दबोरेने आपल्यासोबत लढाईला यावे अशी बाराकने गळ घातली यावरून तुम्हाला त्याच्याकडून काय शिकायला मिळाले?