व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शौलाच्या प्रचार कार्यामुळे विरोधाला तोंड फुटते

शौलाच्या प्रचार कार्यामुळे विरोधाला तोंड फुटते

शौलाच्या प्रचार कार्यामुळे विरोधाला तोंड फुटते

दिमिष्काच्या यहुद्यांना प्रश्‍न पडला आहे. कट्टर मतांचा हा आवेशी समर्थक फितुर झालाच कसा? आतापर्यंत, हा शौलच तर जेरूसलेममध्ये येशूच्या नावाचा धावा करणाऱ्‍यांचा छळ करत होता. दिमिष्कातही तो शिष्यांचा छळ करण्याच्या उद्देशाने आला होता. पण आता पाहावे, तर तो स्वतःच असा प्रचार करत होता, की देवाची निंदा करण्याच्या आरोपात ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले तो मशीहा आहे! शौलाला वेड तर लागले नाही?—प्रेषितांची कृत्ये ९:१, २, २०-२२.

शौलाला वेड लागलेले नाही. जेरूसलेमवरून शौलासोबत एकाच काफिल्यात प्रवास केलेल्यांनी वाटेत काय घडले याबद्दल नक्कीच चर्चा केली असावी. दिमिष्काच्या दिशेने येत असताना, अचानक एक मोठा प्रकाश त्यांच्या सभोवती लखलखला आणि ते सर्वजण जमिनीवर पडले. त्याचवेळी एक आवाज देखील ऐकू आला. शौलाशिवाय कोणालाही काही इजा झाली नाही. तो मात्र जमिनीवरच पडून राहिला. काही वेळानंतर तो उठला तेव्हा इतर प्रवाशांना त्याला दिमिष्कापर्यंत आणावे लागले कारण त्याला डोळ्यांनी काहीही दिसत नव्हते.—प्रेषितांची कृत्ये ९:३-८; २६:१३, १४.

विरोधी समर्थक बनतो

दिमिष्काच्या वाटेवर शौलाला नेमके काय झाले होते? लांबच्या प्रवासाने किंवा दुपारच्या रखरखीत उन्हाने गळून गेल्यामुळे तर त्याला असे झाले नसावे? या गोष्टीला काही न काही नैसर्गिक कारण असलेच पाहिजे असे मानणाऱ्‍या आधुनिक संशयवाद्यांनी बरीच संभाव्य कारणे सुचवली आहेत. उदाहरणार्थ, चित्तविभ्रम, भ्रम, विवेकबुद्धीला सतत बोचणी होत असल्यामुळे घडून आलेले तीव्र मानसिक असंतुलन, मनोदौर्बल्य; आणि काहींनी तर असेही सुचवले आहे की शौलाला कदाचित मिर्गीच्या रोगाची काही लक्षणे असावीत.

वास्तविक पाहता, त्या लखलखत्या प्रकाशात येशू ख्रिस्त शौलाला प्रकट झाला होता आणि आपण मशीहा असल्याचे त्याने शौलाला पटवून दिले होते. या घटनेच्या काही काल्पनिक चित्रकृतींत शौल घोड्यावरून पडताना दाखवला आहे. ही शक्यता नाकारता येत नाही, पण बायबल केवळ इतकेच म्हणते की तो ‘जमिनीवर पडला.’ (प्रेषितांची कृत्ये २२:६-११) अर्थात शौलाचे जमिनीवर पडणे इतके विशेष नव्हते; याहून मोठा अपमान म्हणजे त्याला ज्याच्याविषयी अतिशय गर्व होता त्या उच्च स्थानावरून तो आता खाली पडला होता. आता त्याला कबूल करावे लागले की येशूचे अनुयायी जो प्रचार करत होते तो खरा होता. शौलाकडे आता एकच पर्याय होता, अर्थात, त्यांना जाऊन मिळण्याचा. एकेकाळी येशूच्या संदेशाचा कट्टर शत्रू असणारा शौल आता त्याच संदेशाचा खंदा समर्थक बनला. शौलाची दृष्टी परत आल्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला; त्यानंतर “शौलाला अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिष्कात राहणाऱ्‍या यहूदी लोकांना कुंठित करीत राहिला.”—प्रेषितांची कृत्ये ९:२२.

घात करण्याचा कट फसला

मतपरिवर्तन झाल्यानंतर शौल ज्याला नंतर पौल म्हणण्यात आले तो कोठे गेला? गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो: “मी लागलाच अरबस्तानांत निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.” (गलतीकर १:१७) “अरबस्तानांत” या संज्ञेवरून, तो अरबी द्वीपकल्पावरील कोणत्याही भागात गेला असावा असा अर्थ घेतला जाऊ शकतो. काही अभ्यासक असे सुचवतात की पौल सूरियाच्या वाळवंटात किंवा अरेतास चौथा याच्या नेबेशियन साम्राज्यातील दुसऱ्‍या कोणत्या ठिकाणी गेला असावा. कदाचित, येशूचा पाण्याने बाप्तिस्मा झाल्यानंतर जसा तो अरण्यात निघून गेला तसाच शौलही कदाचित आपल्या बाप्तिस्म्यानंतर मनन करता यावे म्हणून एखाद्या शांत ठिकाणी निघून गेला असावा.—लूक ४:१.

शौल दिमिष्कात परतल्यावर “यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला.” (प्रेषितांची कृत्ये ९:२३) दिमिष्कात अरीतास राजाचा प्रतिनिधी असलेल्या अधिकाऱ्‍याने शौलाला धरण्याकरिता नगरावर पहारा ठेवला होता. (२ करिंथकर ११:३२) पण शौलाचे वैरी त्याचा घात करण्याचा मनसुबा रचत होते त्यादरम्यान येशूच्या शिष्यांनी त्याला पलायन करण्यास मदत केली.

पलायन करण्यास ज्यांनी शौलाची मदत केली त्यांच्यामध्ये हनन्या व इतर शिष्य होते; मतपरिवर्तनानंतर काहीकाळ शौल यांच्याचसोबत होता. * (प्रेषितांची कृत्ये ९:१७-१९) दिमिष्कात शौलाच्या प्रचारामुळे जे विश्‍वासी बनले होते त्यांनी देखील मदत केली असावी कारण प्रेषितांची कृत्ये ९:२५ म्हणते: “त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीतून गावकुसावरून खाली सोडून उतरले.” “त्याच्या शिष्यांनी” ही संज्ञा ज्यांना शौलाने शिकवले त्यांच्या संदर्भात वापरण्यात आली असावी. वास्तवात काहीही असो, पण एवढे मात्र निश्‍चित की शौलाच्या सेवाकार्याच्या सफलतेमुळे त्याच्याविरुद्ध यहुद्यांना आधीच असलेल्या दुराग्रहाला अधिकच खतपाणी मिळाले.

शिकण्यासारखा धडा

शौलाचे मतपरिवर्तन व बाप्तिस्मा याच्याशी संबंधित काही घटनांचे परीक्षण केले असता हे स्पष्टपणे दिसून येते की इतरजण आपल्याविषयी कसा विचार करतात याची शौलाला अनावश्‍यक चिंता नव्हती. तसेच तीव्र विरोध झाल्यामुळे त्याने माघार घेतली नाही. शौलाकरता केवळ एक गोष्ट महत्त्वाची होती, आणि ती म्हणजे त्याला मिळालेली प्रचार करण्याची आज्ञा.—प्रेषितांची कृत्ये २२:१४, १५.

तुम्हालाही अलीकडेच सुवार्तेच्या प्रचाराचे महत्त्व पटले आहे का? तर मग, तुम्हाला याची जाणीव असेल की सर्व खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तींनी राज्याचे प्रचारक असणे आवश्‍यक आहे. तुमच्या सेवाकार्याला काहीवेळा विरोध केला जातो तेव्हा तुम्हाला आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. (मत्तय २४:९; लूक २१:१२; १ पेत्र २:२०) विरोधाला शौलाने ज्याप्रकारे तोंड दिले ते अनुकरण करण्यासारखे आहे. जे ख्रिस्ती हार न मानता परीक्षांना तोंड देतात त्यांना देवाची कृपा लाभते. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करितील.” पण त्याने त्यांना एक आश्‍वासनही दिले: “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.”—लूक २१:१७-१९.

[तळटीप]

^ परि. 10 दिमिष्कात ख्रिस्ती धर्म येशूच्या गालीलातील प्रचारानंतर किंवा सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर आला असावा.—मत्तय ४:२४; प्रेषितांची कृत्ये २:५.

[२८ पानांवरील चित्र]

येशू शौलाला प्रकट झाला तेव्हा शौल ‘जमिनीवर पडला’

[२९ पानांवरील चित्र]

दिमिष्कात शौलाचा घात करण्याचा कट केला जात होता पण तो निसटला