व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज “अति मोलवान मोती” मिळवण्याकरता यत्न करणे

आज “अति मोलवान मोती” मिळवण्याकरता यत्न करणे

आज “अति मोलवान मोती” मिळवण्याकरता यत्न करणे

“सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”मत्तय २४:१४.

१, २. (क) येशूच्या काळातील यहुद्यांच्या देवाच्या राज्यासंबंधी कशा भावना होत्या? (ख) राज्याविषयी योग्यप्रकारे समजून घेण्याकरता येशूने शिष्यांना कशाप्रकारे मदत केली आणि यामुळे काय घडले?

येशू या पृथ्वीवर आला तेव्हा यहुद्यांमध्ये देवाचे राज्य हा एक अत्यंत लोकप्रिय विषय होता. (मत्तय ३:१, २; ४:२३-२५; योहान १:४९) प्रथम बहुतेक जणांना हे राज्य किती व्यापक असेल किंवा ते किती शक्‍तिशाली असेल याची कल्पना नव्हती; तसेच ते स्वर्गीय राज्य असेल हे देखील त्यांना समजलेले नव्हते. (योहान ३:१-५) जे येशूचे अनुयायी बनले त्यांच्यापैकीही काहीजणांना देवाचे राज्य नेमके काय आहे आणि या राज्यात ख्रिस्तासोबत सहशासक बनण्याचा आशीर्वाद मिळवण्याकरता आपण काय केले पाहिजे हे समजले नव्हते.—मत्तय २०:२०-२२; लूक १९:११; प्रेषितांची कृत्ये १:६.

येशूने अत्यंत धीराने आपल्या शिष्यांना अनेक गोष्टी शिकवल्या; याआधीच्या लेखात चर्चा केलेल्या अतिमोलवान मोत्याचा दाखला याचेच एक उदाहरण आहे. या दाखल्यातून येशूने, स्वर्गीय राज्य मिळवण्याकरता यत्न करणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिले. (मत्तय ६:३३; १३:४५, ४६; लूक १३:२३, २४) याचा त्यांच्या मनावर गहिरा प्रभाव पडला असावा कारण यानंतर काही काळातच ते देवाच्या राज्याची सुवार्ता पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत धैर्याने गाजवण्याकरता अथक परिश्रम घेऊ लागले; प्रेषितांची कृत्ये या पुस्तकावरून ही गोष्ट अगदी स्पष्ट होते.—प्रेषितांची कृत्ये १:८; कलस्सैकर १:२३.

३. आपल्या काळाच्या संदर्भात, येशूने राज्याविषयी काय म्हटले?

मग आजच्याविषयी काय? देवाच्या राज्यशासनाखाली पृथ्वीवरील परादीसात आशीर्वाद उपभोगण्याची संधी कोट्यवधी लोकांना उपलब्ध आहे. ‘युगाच्या समाप्तीविषयीच्या’ महान भविष्यवाणीत येशूने स्पष्टपणे सांगितले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:३, १४; मार्क १३:१०) त्याने हे देखील स्पष्ट केले की ही भव्य कामगिरी अनेक संकटे, आव्हाने व छळ यांना तोंड देऊन पार पाडावी लागेल. पण त्याने असे आश्‍वासन दिले की, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:९-१३) या सर्वाकरता येशूच्या दाखल्यातील व्यापाऱ्‍याने दाखवलेल्या आत्मत्यागाच्या व समर्पणाच्या भावनेची गरज आहे. राज्याकरता असाच विश्‍वास व आवेश दाखवणाऱ्‍या व्यक्‍ती आजच्या काळातही आहेत का?

सत्य सापडल्याचा आनंद

४. राज्याविषयीच्या सत्याचा आज लोकांवर कसा परिणाम होतो?

येशूच्या दाखल्यातील व्यापाऱ्‍याला “अति मोलवान मोती” सापडला तेव्हा त्याला अत्यानंद झाला. या आनंदामुळेच, तो मोती मिळवण्याकरता त्याने जमेल ते केले. (इब्री लोकांस १२:१) त्याचप्रकारे आजही देव व त्याचे राज्य याविषयीचे सत्य लोकांना आकर्षित करते व त्यांना प्रेरित करते. यावरून बंधू ए. मॅकमिलन यांच्या शब्दांची आठवण होते. देवाचा व मानवजातीकरता त्याच्या उद्देशाचा आपण व्यक्‍तिशः केलेल्या शोधाविषयी फेथ ऑन द मार्च या पुस्तकात ते असे म्हणतात: “जे मला सापडले ते अजूनही दर वर्षी हजारो लोकांना सापडते. आणि ते तुमच्या माझ्यासारखेच लोक आहेत कारण ते सर्व राष्ट्रांतून, जातींतून, पार्श्‍वभूमींतून येतात व सर्व वयोगटातील व्यक्‍तींचा यात समावेश आहे. सत्य लोकांचा दर्जा पाहात नाही. ते सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करते.”

५. दोन हजार चार सेवा वर्षातील अहवालात कोणत्या उत्तम बाबी दिसून येतात?

दर वर्षी, देवाच्या राज्याच्या सुवार्तेमुळे प्रेरित होऊन लाखो प्रांजळ मनोवृत्तीच्या व्यक्‍ती यहोवाला, त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता आपले जीवन समर्पित करतात; यावरून बंधू मॅकमिलन यांच्या शब्दांच्या सत्यतेचा प्रत्यय येतो. सप्टेंबर २००३ ते ऑगस्ट २००४ पर्यंतचे २००४ सेवा वर्षही याला अपवाद नव्हते. या १२ महिन्यांच्या काळादरम्यान २,६२,४१६ जणांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन यहोवाला केलेले समर्पण जाहीर केले. हे २३५ देशांत घडले; या सर्व ठिकाणी यहोवाचे साक्षीदार दर आठवडी ६०,८५,३८७ बायबल अभ्यास चालवतात; अशाप्रकारे ते समाजाच्या सर्व थरांतील लोकांना व अनेक देशांच्या, जातींच्या व भाषांच्या लोकांना देवाच्या वचनातील जीवनदायक सत्य आत्मसात करण्यास मदत करत आहेत.—प्रकटीकरण ७:९.

६. मागील वर्षांत झालेल्या सातत्यपूर्ण वाढीमागे काय कारण आहे?

हे सर्व कशामुळे शक्य झाले? ज्यांची योग्य मनोवृत्ती आहे त्यांना यहोवा स्वतःकडे आकर्षित करतो यात शंका नाही. (योहान ६:६५; प्रेषितांची कृत्ये १३:४८) पण राज्याकरता ज्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे त्यांची आत्मत्यागी मनोवृत्ती व अथक परिश्रम यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वयाच्या ७९ व्या वर्षी बंधू मॅकमिलन यांनी लिहिले: “रोगट व मरणासन्‍न मानवजातीकरता देवाने केलेल्या प्रतिज्ञांची पहिली झलक मी पाहिली होती तेव्हापासून बायबलमधील संदेशातून मिळालेली माझी आशा जराही मंदावली नाही. बायबलमध्ये शिकवलेल्या गोष्टींविषयी अधिक जाणून घेण्याचा मी त्याच क्षणी निर्धार केला; यासाठी की माझ्यासारखेच जे इतर लोक सर्वसमर्थ देव यहोवा याच्याविषयी व मानवजातीकरता त्याच्या उत्तम उद्देशांविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांना मला मदत करता यावी.”

७. बायबल सत्य मिळालेल्या व्यक्‍तीला कशाप्रकारे आनंद होतो आणि इतरांना सत्य सांगण्याची उत्सुकता वाटते हे कोणत्या अनुभवावरून दिसून येते?

ही उत्सुकता आज यहोवाच्या सेवकांमध्येही दिसून येते. व्हिएन्‍ना, ऑस्ट्रिया येथे राहणाऱ्‍या डॅन्येला हिचे उदाहरण घ्या. ती म्हणते: “लहानपणापासूनच मी देवाला आपला सर्वात जवळचा मित्र मानले आहे. मला त्याचे नाव जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती कारण नुसते ‘देव’ म्हटले तर कोणा दूरच्या व्यक्‍तीबद्दल आपण बोलत आहोत असे वाटायचे. पण मी १७ वर्षांची झाल्यावर यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी येईपर्यंत मला थांबावे लागले. त्यांनी देवाविषयी माझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. शेवटी मला सत्य सापडले होते. ते किती अद्‌भुत होते! मी तर इतकी रोमांचित झाले होते की जो सापडेल त्याला मी सुवार्ता सांगू लागले.” तिच्या या उत्साही वृत्तीमुळे लवकरच तिचे शाळासोबती तिची टर उडवू लागले. पण डॅन्येला सांगते, “मला तर बायबलची भविष्यवाणी आपण प्रत्यक्षात पूर्ण होताना पाहात आहोत असे वाटले. येशूने आपल्या अनुयायांचा द्वेष केला जाईल आणि आपल्या नावाकरता त्यांचा छळ केला जाईल असे सांगितल्याचे मी अभ्यासात शिकले होते. त्यामुळे मला फार आनंद झाला आणि आश्‍चर्यही वाटले.” लवकरच डॅन्येलाने आपले जीवन यहोवाला समर्पित केले, तिचा बाप्तिस्मा झाला आणि ती मिशनरी सेवेच्या ध्येयाकडे वाटचाल करू लागली. लग्न झाल्यावर, ती आपले पती हेल्मुट यांच्यासह व्हिएन्‍ना येथे राहणाऱ्‍या आफ्रिकन, चिनी, फिलिपिनो व भारतीय लोकांमध्ये प्रचार कार्य करू लागली. डॅन्येला व हेल्मुट हे दोघे आता नैर्ऋत्य आफ्रिकेत मिशनरी सेवा करत आहेत.

ते खचून जात नाहीत

८. अनेकांनी देवाबद्दल आपले प्रेम आणि त्याच्या राज्याप्रती आपली निष्ठा कोणत्या मार्गाने व्यक्‍त केली आहे?

यहोवाचे लोक ज्या अनेक मार्गांनी त्याच्याबद्दल आपले प्रेम आणि त्याच्या राज्याप्रती आपली निष्ठा व्यक्‍त करतात, त्यांपैकी एक आहे मिशनरी सेवा. येशूच्या दाखल्यातल्या व्यापाऱ्‍याप्रमाणे ही सेवा हाती घेणारे राज्याच्या वाढीकरता दूर देशी जाण्यास तयार असतात. अर्थात, हे मिशनरी राज्याच्या सुवार्तेच्या शोधात दूर देशी जात नाहीत, उलट पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत राहणाऱ्‍या लोकांकडे ते स्वतः सुवार्ता घेऊन जातात आणि या लोकांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्याकरता ज्ञान देण्याद्वारे साहाय्य करतात. (मत्तय २८:१९, २०) अनेक देशांत त्यांना अत्यंत कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागते. पण धीराने आपले कार्य करत राहिल्यामुळे त्यांना अनेक आशीर्वाद लाभतात.

९, १०. दूरदूरच्या देशांत, उदाहरणार्थ मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकात मिशनऱ्‍यांना कोणते रोमांचक अनुभव येतात?

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाचे उदाहरण घ्या. येथे मागच्या वर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला १६,१८४ जण उपस्थित राहिले. ही संख्या या देशातील प्रचारकांच्या एकूण संख्येपेक्षा सात पटीने जास्त आहे. या देशातल्या अनेक भागांत वीजपुरवठा नसल्यामुळे लोक सहसा घराबाहेर झाडाच्या सावलीत बसून आपली रोजची कामे करतात. त्यामुळे साहजिकच मिशनरीही तेच करतात—झाडाच्या सावलीत बसून ते बायबल अभ्यास चालवतात. घराबाहेर जास्त प्रकाश आणि गार वारा तर असतोच पण बाहेर बसण्याचा आणखी एक फायदा आहे. इथल्या लोकांना जात्याच बायबलविषयी खूप आदर आहे; इतर संस्कृतींत ज्याप्रमाणे लोक खेळक्रीडा व हवामान यांसारख्या विषयांवर चर्चा करतात त्याप्रमाणे इथे देवाधर्माविषयी चर्चा करणे सर्वसामान्य आहे. त्यामुळे बाहेर बसून अभ्यास करणाऱ्‍यांना पाहिल्यावर रस्त्याने ये-जा करणारे काय चालले आहे हे पाहायला थांबतात आणि कधीकधी ते देखील येऊन बसतात.

१० असेच, एकदा एक मिशनरी बंधू बाहेर बसून बायबल अभ्यास संचालित करत होते. तेव्हा पलीकडच्या रस्त्यावर राहणारा एक तरुण त्यांच्याजवळ आला व म्हणाला, की माझ्या घरी तर कोणीही आले नाही, तेव्हा तुम्ही माझ्या घरीही या आणि माझ्यासोबतही असाच बायबल अभ्यास घ्या. अर्थात मिशनरी बंधूने आनंदाने त्याची विनंती मान्य केली आणि तेव्हापासून हा तरुण भराभर प्रगती करत आहे. त्या देशात पोलीस बरेचदा साक्षीदारांना रस्त्यावर अडवतात; समन्स देण्याकरता किंवा दंड वसूल करण्याकरता नव्हे तर टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकांच्या अलीकडच्या प्रती मागण्यासाठी किंवा आपल्याला विशेष आवडलेल्या एखाद्या लेखविषयी आभार व्यक्‍त करण्यासाठी.

११. कठीण परिस्थितीतही अनेक वर्षांपासून मिशनरी सेवेत असलेल्यांना आपल्या या सेवेविषयी कसे वाटते?

११ चाळीस किंवा पन्‍नास वर्षांआधी मिशनरी सेवेत प्रवेश केलेले अनेकजण आजही विश्‍वासूपणे आपल्या नियुक्‍त क्षेत्रात सेवा करत आहेत. त्यांच्या विश्‍वासाचे व चिकाटीचे उदाहरण आपल्याकरता खरोखर अनुकरणीय नाही का? एक जोडपे मागच्या ४२ वर्षांपासून तीन वेगवेगळ्या देशांत मिशनरी या नात्याने सेवा करत आहेत. पती म्हणतो: “आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उदाहरणार्थ ३५ वर्षांपासून मलेरिया रोगाचा सामना केला आहे. पण मिशनरी सेवा हाती घेतल्याचा आम्हाला कधीच पस्तावा झाला नाही.” पत्नी म्हणते: “यहोवाचे आभार मानण्याजोगे कितीतरी आशीर्वाद आम्हाला लाभले आहेत. क्षेत्र सेवाकार्य करताना खूप समाधान मिळते आणि इथे बायबल अभ्यास सहज सुरू करता येतात. बायबल शिकणाऱ्‍या व्यक्‍ती सभांना येतात आणि एकमेकांची ओळख करून घेतात तेव्हा प्रत्येक वेळी एक मोठे कुटुंब एकत्र आल्याचा भास होतो.”

ते ‘सर्व काही हानी असे समजतात’

१२. राज्याचे मोल आपण खऱ्‍या अर्थाने ओळखले आहे हे एक व्यक्‍ती कशाप्रकारे दाखवते?

१२ मोत्यांचा शोध घेणाऱ्‍या व्यापाऱ्‍याला अतिमोलवान मोती सापडल्यावर “त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.” (मत्तय १३:४६) आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची ही तयारी, राज्याचे खरे मोल ओळखणाऱ्‍यांचे वैशिष्ट्य आहे. ख्रिस्तासोबत राज्याच्या वैभवात सामील होणाऱ्‍यांपैकी एक या नात्याने प्रेषित पौलाने असे म्हटले: “ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्‍यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.”—फिलिप्पैकर ३:८.

१३. चेक प्रजासत्ताकातील एका व्यक्‍तीने राज्याबद्दलचे आपले प्रेम कसे व्यक्‍त केले?

१३ त्याचप्रकारे, आजही अनेकजण राज्याचे आशीर्वाद मिळवण्याकरता आपल्या जीवनात बऱ्‍याच तडजोडी करण्यास तयार असतात. उदाहरणार्थ, २००३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात चेक प्रजासत्ताकात एका शाळेच्या ६० वर्षीय मुख्याध्यापकांना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे बायबल अभ्यासाचे साधन असलेले पुस्तक मिळाले. ते वाचल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या क्षेत्रातल्या यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधला आणि बायबल अभ्यासाची विनंती केली. त्यांनी उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि लवकरच ते सर्व सभांना उपस्थित राहू लागले. पण महापौरपदासाठी होणाऱ्‍या निवडणुकीत उभे राहण्याच्या आणि नंतर मंत्रिपदासाठी प्रयत्न करण्याच्या त्यांच्या योजनांचे काय झाले? आता त्यांच्यासमोर एक वेगळेच ध्येय होते, राज्य प्रचारक बनण्याचे. ते म्हणतात, “माझ्या विद्यार्थ्यांना मी बरेच बायबल साहित्य देऊ शकलो.” जुलै २००४ च्या अधिवेशनात त्यांनी पाण्यात बाप्तिस्मा घेऊन यहोवाला केलेले आपले समर्पण जाहीर केले.

१४. (क) राज्याच्या सुवार्तेमुळे प्रेरित होऊन लाखो लोकांनी काय केले आहे? (ख) प्रत्येकाने स्वतःला कोणते गंभीर प्रश्‍न विचारावेत?

१४ जगभरात लाखो लोकांनी राज्याच्या सुवार्तेला असाच प्रतिसाद दिला आहे. दुष्ट जगाशी आपला संबंध तोडून त्यांनी आपले जुने व्यक्‍तिमत्त्व टाकून दिले आहे, पूर्वीच्या सोबत्यांना सोडले आहे आणि जगिक ध्येयांचाही त्याग केला आहे. (योहान १५:१९; इफिसकर ४:२२-२४; याकोब ४:४; १ योहान २:१५-१७) हे सर्व ते का करतात? कारण सध्याच्या या जगातून आपल्याला जे काही मिळू शकते त्यापेक्षा देवाच्या राज्याचे आशीर्वाद त्यांना जास्त हवेहवेसे वाटतात. राज्याच्या सुवार्तेबद्दल तुमच्याही अशाच भावना आहेत का? यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आपल्या जीवनशैलीत, आचारविचारांत आणि ध्येयांत आवश्‍यक बदल करण्याची प्रेरणा या सुवार्तेने तुम्हाला दिली आहे का? असे केल्यास आता व भविष्यातही तुम्हाला समृद्ध आशीर्वाद लाभतील.

कापणीचे कार्य पूर्ण होत आले आहे

१५. देवाचे लोक शेवटल्या काळात काय करतील असे भाकीत करण्यात आले होते?

१५ स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात.” पुढे झालेल्यांमध्ये ‘पहाटेच्या दहिंवरासारखे असणारे तरुण’ आणि “मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना” देखील आहे. (स्तोत्र ६८:११; ११०:३) यहोवाच्या सर्व लोकांनी—स्त्रीपुरुष, आबालवृद्धांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे व आत्मत्यागामुळे या शेवटल्या दिवसांत काय साध्य झाले आहे?

१६. इतरांना राज्याबद्दल शिकून घेण्यास मदत करण्याकरता देवाचे सेवक कशाप्रकारे यत्न करत आहेत याचे एक उदाहरण सांगा.

१६ भारतात एक पायनियर म्हणजेच पूर्ण वेळेची राज्य उद्‌घोषक असलेल्या बहिणीला बरेचदा काळजी वाटायची, की या देशातल्या २० लाखापेक्षा जास्त कर्णबधिर लोकांना राज्याविषयी शिकून घेता यावे म्हणून काय करता येईल? (यशया ३५:५) तिने संकेत भाषा शिकवणाऱ्‍या संस्थेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. तेथे ती अनेक कर्णबधिर व्यक्‍तींना राज्य आशेविषयी सांगू शकली. याचा परिणाम असा झाला की अनेक बायबल अभ्यास गट तयार करण्यात आले. काही आठवड्यांतच, बारा-तेरा जण राज्य सभागृहांतील सभांना येऊ लागले. नंतर एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या पायनियर बहिणीची भेट कोलकाताच्या (कलकत्ता) एका कर्णबधिर तरुणाशी झाली. त्याला अनेक प्रश्‍न होते आणि यहोवाबद्दल अधिक जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. पण समस्या अशी होती, की हा तरुण शिक्षणासाठी लवकरच १,६०० किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्याला परत जाणार होता. आणि तिथे संकेत भाषा येत असलेले कोणीही साक्षीदार नव्हते. बायबल अभ्यास पुढेही करता यावा म्हणून, बऱ्‍याच मुश्‍किलीने त्याने आपल्या वडिलांना बंगलोरमध्येच शिकण्याची परवानगी मागितली. या तरुणाने उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि जवळजवळ एका वर्षाने त्याने आपले जीवन यहोवाला समर्पित केले. यानंतर त्यानेही अनेक कर्णबधिर व्यक्‍तींसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला; यांपैकी एकजण त्याचा लहानपणीचा मित्र आहे. सध्या भारतातील शाखा दफ्तर या क्षेत्रात साहाय्य करण्याकरता पायनियरांना संकेत भाषा शिकून घेण्याकरता मदत करत आहे.

१७. पृष्ठे १९-२२ यांत दिलेल्या २००४ सेवा वर्षाच्या अहवालात तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे विशेष प्रोत्साहन मिळाले?

१७ या नियतकालिकाच्या १९-२२ पृष्ठांवर यहोवाच्या साक्षीदारांच्या २००४ सेवा वर्षाच्या क्षेत्र सेवाकार्याचा जागतिक अहवाल आहे. या अहवालाचा लक्षपूर्वक अभ्यास केल्यास, जगभरात यहोवाचे लोक “अति मोलवान मोती” शोधण्याकरता किती जिवेभावे कार्य करत आहेत याची तुम्हाला खात्री पटेल.

‘राज्य मिळवण्यास झटत राहा’

१८. व्यापाऱ्‍याच्या दाखल्यात येशूने कोणती माहिती दिली नाही आणि का?

१८ पुन्हा एकदा, मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याच्या दाखल्याचा विचार करा. आपले सर्वस्व विकल्यानंतर तो व्यापारी आपला उदरनिर्वाह कसा चालवेल याविषयी येशूने काहीही सांगितले नाही. साहजिकच काहीजण म्हणतील: ‘सर्वकाही विकल्यानंतर हा व्यापारी अन्‍न, वस्त्र, निवारा कसा मिळवेल? अतिमोलवान मोती जवळ असून त्याचा त्याला काय फायदा?’ दैहिक दृष्टिकोनातून विचार केल्यास हे प्रश्‍न वाजवी आहेत. पण “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील,” असे येशूने आपल्या शिष्यांना आग्रहपूर्वक सांगितले नव्हते का? (मत्तय ६:३१-३३) या दृष्टान्ताचा मुख्य मुद्दा हाच आहे, की देवाची मनःपूर्वक उपासना करणे आणि राज्याबद्दल आवेशी असणे गरजेचे आहे. यातून आपण काय शिकू शकतो?

१९. अतिमोलवान मोत्याच्या येशूने दिलेल्या दाखल्यातून आपण कोणता मुख्य धडा शिकू शकतो?

१९ कदाचित आपण राज्याच्या अद्‌भुत सुवार्तेविषयी नुकतेच शिकलो असू. किंवा, अनेक दशकांपासून कदाचित आपण राज्याकरता कार्य करत असू व इतरांना त्याच्या आशीर्वादांबद्दल सांगत असू. दोन्ही परिस्थितीत आपण राज्याला आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे, आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित असले पाहिजे. दिवस वाईट आहेत, पण आपल्याला हा विश्‍वास बाळगण्याकरता पुरेशी कारणे आहेत की आपण जे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ते अगदी वास्तविक आहे आणि त्यासारखे मौल्यवान आणखी काहीही नाही; अगदी त्या व्यापाऱ्‍याला सापडलेल्या मोत्यासारखेच. जागतिक घटना आणि पूर्ण झालेल्या बायबलच्या भविष्यवाण्या या गोष्टीची खात्री देतात की आज आपण ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत. (मत्तय २४:३) मोत्याच्या शोधात फिरणाऱ्‍या त्या व्यापाऱ्‍यासारखेच आपणही देवाच्या राज्याबद्दल मनःपूर्वक आवेश बाळगू या आणि सुवार्तेची घोषणा करण्याचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याची कदर करून या कार्यात आनंदाने सहभाग घेऊ या.—स्तोत्र ९:१, २.

तुम्हाला आठवते का?

• गतकाळात, खऱ्‍या उपासकांच्या संख्येत कशामुळे वाढ झाली आहे?

• मिशनरी सेवा करणाऱ्‍यांमध्ये कोणती मनोवृत्ती पाहायला मिळते?

• अनेक व्यक्‍तींनी राज्याच्या सुवार्तेमुळे कोणत्या तडजोडी केल्या आहेत?

• येशूने दिलेल्या अतिमोलवान मोत्याच्या दाखल्यातून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९-२२ पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांचा २००४ चा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल

(बाऊंड व्हॉल्यूम पाहा)

[१४ पानांवरील चित्र]

“सत्य . . . सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करते.”—ए. एच. मॅकमिलन

[१५ पानांवरील चित्र]

डॅन्येला व हेल्मुट यांनी व्हिएन्‍ना येथील परदेशी भाषा बोलल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात प्रचारकार्य केले

[१६, १७ पानांवरील चित्रे]

मोत्यांचा शोध घेणाऱ्‍या व्यापाऱ्‍याप्रमाणे आज मिशनऱ्‍यांना अनेक समृद्ध आशीर्वाद लाभतात

[१७ पानांवरील चित्र]

“तुझे लोक संतोषाने पुढे होतात”