व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“एक अति मोलवान मोती” आढळला

“एक अति मोलवान मोती” आढळला

“एक अति मोलवान मोती” आढळला

“स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत.”—मत्तय ११:१२.

१, २. (क) राज्यासंबंधीच्या एका दृष्टान्तातून येशूने कोणत्या दुर्मिळ गुणाकडे लक्ष वेधले? (ख) मौल्यवान मोत्याच्या दृष्टान्तात येशूने काय म्हटले?

तुम्हाला एखादी गोष्ट इतकी महत्त्वाची वाटते का, की ती मिळवण्याकरता तुम्ही आपल्याजवळ असलेले सर्वकाही द्यायला तयार व्हाल? लोकांची निरनिराळी ध्येये असतात, उदाहरणार्थ पैसा, प्रसिद्धी किंवा सत्ता अथवा एखादे पद मिळवण्याचे ध्येय; आणि ही ध्येये मिळवण्याकरता आपण पूर्णपणे समर्पित आहोत असे बरेच लोक म्हणतात. पण एखाद्याला विशिष्ट गोष्ट इतकी हवीहवीशी वाटते की ती मिळवण्याकरता तो आपले सर्वस्व देतो, अशी घटना क्वचितच घडते. येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याच्या संबंधाने दिलेल्या अनेक विचारप्रवर्तक दृष्टान्तांपैकी एका दृष्टान्तात या दुर्मिळ पण प्रशंसास्पद गुणाविषयी सांगितले.

हा दृष्टान्त किंवा दाखला येशूने लोकांच्या जमावापुढे नव्हे तर केवळ आपल्या शिष्यांना सांगितला आणि हा दृष्टान्त एका मौल्यवान मोत्याचा आहे. येशूने असे म्हटले: “स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्‍या कोणा एका व्यापाऱ्‍यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते [लगेच] विकत घेतले.” (मत्तय १३:३६, ४५, ४६) या दृष्टान्तातून येशू आपल्या ऐकणाऱ्‍यांना काय सांगू इच्छित होता? आणि येशूचे हे शब्द आपल्याला कशाप्रकारे उपयोगी पडू शकतात?

मोत्यांचे मोल

३. प्राचीन काळात उत्कृष्ट मोती इतके मौल्यवान का होते?

अगदी प्राचीन काळापासूनच अलंकारिक उपयोगासाठी मोत्यांना मोलवान वस्तूंपैकी एक मानण्यात आले आहे. एका ग्रंथानुसार रोमी विद्वान, मोठा प्लीनी याच्या मते मोत्यांना “सर्वात उच्च श्रेणीच्या मोलवान वस्तू” म्हणता येईल. सोने, रूपे किंवा अनेक रत्नांच्या तुलनेत मोती हे सजीव वस्तूंपासून तयार झालेले असतात. विशिष्ट प्रकारची कालवे त्यांच्यात बाहेरून शिरलेल्या लहानशा वाळूच्या कणावर मुक्‍ताद्रव्याचे थर घालून त्यास चमकदार मोती बनवतात हे सर्वज्ञात आहे. प्राचीनकाळी, सर्वात उत्कृष्ट मोती इस्राएलपासून दूर असलेल्या तांबड्या समुद्रातून, पर्शियन आखातातून व हिंद महासागरातून पकडली जात. म्हणूनच येशूने “मोत्यांचा शोध करणाऱ्‍या” व्यापाऱ्‍याविषयी सांगितले. खरोखर मौल्यवान असा मोती मिळवण्याकरता बरेच परिश्रम करावे लागतात.

४. मोत्यांचा शोध घेणाऱ्‍या व्यापाऱ्‍याविषयीच्या येशूच्या दृष्टान्ताचा मुख्य मुद्दा कोणता होता?

पूर्वीपासूनच मोती हे महागड्या वस्तूंपैकी असले तरीपण येशूने त्यांच्या मूल्याविषयी सांगण्याकरता हा दाखला दिला नाही. या दाखल्यात, येशूने देवाच्या राज्याची तुलना केवळ एका मौल्यवान मोत्याशी केली नाही; त्याने “मोत्यांचा शोध करणाऱ्‍या” एका व्यापाऱ्‍याकडे आणि मोती मिळाल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती याकडे लक्ष वेधले. मोत्यांचा शोध घेणारा व्यापारी हा केवळ एक सर्वसाधारण विक्रेता नव्हता; तर तो मोत्यांचा पारखी होता. असाधारण मोत्याची वैशिष्ट्ये व बारकावे त्याला चांगले माहीत होते. अस्सल चीज पाहताक्षणीच ओळखणाऱ्‍यांपैकी तो होता. हलक्या किंवा बनावट वस्तू दाखवून त्याला फसवणे शक्यच नव्हते.

५, ६. (क) येशूच्या दाखल्यातील व्यापाऱ्‍याविषयी कोणती गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे? (ख) शेतात लपविलेल्या ठेवीच्या दाखल्यावरून मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याविषयी कोणती गोष्ट स्पष्ट होते?

या विशिष्ट व्यापाऱ्‍याविषयी आणखी एक गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे. सर्वसाधारण व्यापारी मोत्याची बाजारात काय किंमत असावी याचा अंदाज घेऊन त्यासाठी किती मोल द्यावे हे ठरवेल जेणेकरून त्याला त्यातून नफा मिळवता यावा. मोती विकत घेतल्यावर तो लवकरात लवकर विकता यावा म्हणून, अशा मोत्याची बाजारात मागणी आहे किंवा नाही हे देखील तो विचारात घेईल. दुसऱ्‍या शब्दांत त्याला केवळ आपल्या गुंतवणुकीतून लगेच फायदा मिळवण्याशीच कारण असते, तो मोती स्वतःकरता ठेवण्याचा त्याचा विचार नसतो. पण येशूच्या दाखल्यातील व्यापारी वेगळा आहे. त्याला किंमत मिळवण्याची काळजी नाही. किंबहुना आपण जे शोधत होतो ते मिळवण्याकरता तो “आपले सर्वस्व,” म्हणजे आपल्या मालकीच्या सर्व वस्तू व मालमत्ता देखील विकून टाकण्यास तयार होतो.

बहुतेक व्यापाऱ्‍यांना येशूच्या दाखल्यातल्या माणसाने जे केले ते अविचारीपणाचे कृत्य वाटेल. कोणताही धूर्त व्यापारी इतकी मोठी जोखीम पत्करणार नाही. पण येशूच्या दाखल्यातील व्यापाऱ्‍याच्या जीवनातील मूल्ये वेगळी होती. आर्थिक फायदा हे त्याचे प्रतिफळ नव्हते, तर अतिमोलवान वस्तू मिळवल्याचा आनंद व संतुष्टी हेच त्याचे प्रतिफळ होते. येशूने याच आशयाचा आणखी एक दृष्टान्त दिला त्यावरून हा मुद्दा स्पष्ट होतो. त्याने म्हटले: “स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेविली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.” (मत्तय १३:४४) होय, मोलवान ठेव सापडण्याचा आणि ती स्वतःकरता मिळवण्याचा आनंद इतका मोठा होता की त्यासाठी आपले सर्वकाही देण्यास तो मनुष्य प्रवृत्त झाला. आज अशाप्रकारच्या व्यक्‍ती आहेत का? जिच्याकरता आपले सर्वस्व द्यावे इतकी मोलवान ठेव आहे का?

ज्यांनी खरे मोल ओळखले

७. राज्याचे श्रेष्ठ मोल आपण ओळखले आहे हे येशूने कशाप्रकारे दाखवले?

हा दाखला सांगताना येशू ‘स्वर्गाच्या राज्याविषयी’ बोलत होता. निश्‍चितच त्याने स्वतः राज्याचे श्रेष्ठ मोल ओळखले होते. शुभवर्तमानांतील वृत्तान्तातून या गोष्टीचा पुरेसा पुरावा मिळतो. सा.यु. २९ साली येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तो “घोषणा करीत सांगू लागला की, ‘पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” यानंतर जवळजवळ साडेतीन वर्षे तो लोकांच्या जमावांना राज्याविषयी शिकवत राहिला. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत तो “उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता.”—मत्तय ४:१७; लूक ८:१.

८. राज्याद्वारे काय साध्य केले जाईल हे दाखवण्याकरता येशूने काय केले?

सबंध देशात रोग्यांना बरे करणे, उपाशी लोकांना अन्‍न देणे, नैसर्गिक तत्त्वांवर नियंत्रण करणे यांसारखे अनेक चमत्कार करण्याद्वारेही येशूने दाखवले की देवाचे राज्य काय साध्य करेल. (मत्तय १४:१४-२१; मार्क ४:३७-३९; लूक ७:११-१७) शेवटी, आपले जीवन देऊन, वधस्तंभावर स्वमतार्थ प्राणार्पण करून त्याने देवाप्रती व राज्याप्रती आपली निष्ठा प्रदर्शित केली. मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याने ज्या प्रमाणे एक “अति मोलवान मोती” सापडल्यावर आपले सर्वस्व त्याकरता दिले त्याचप्रमाणे येशू देवाच्या राज्याकरता जगला व त्याकरताच मरण पावला.—योहान १८:३७.

९. येशूच्या आरंभीच्या शिष्यांत कोणता दुर्मिळ गुण आढळतो?

येशूने केवळ स्वतःचेच जीवन राज्यावर केंद्रित केले नाही, तर त्याने अनुयायांच्या एका लहानशा गटालाही एकत्रित केले. या देखील अशा व्यक्‍ती होत्या की ज्यांनी राज्याचे श्रेष्ठ मोल ओळखले होते. यांपैकी एक होता आंद्रिया, जो पूर्वी बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाचा शिष्य होता. येशू “देवाचा कोकरा” आहे ही योहानाची साक्ष ऐकल्यानंतर आंद्रिया व योहानाच्या शिष्यांपैकी आणखी एक (कदाचित हा जब्दीच्या पुत्रांपैकी योहान नावाचा असावा) असे दोघेजण लगेच येशूकडे आले व त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. पण एवढ्यावरच ते थांबले नाही. लगेच आंद्रिया आपला भाऊ शिमोन याच्याकडे गेला व त्याने त्याला सांगितले: “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे.” त्यानंतर लगेच, शिमोन (जो नंतर केफा किंवा पेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला) आणि फिलिप्प तसेच त्याचा मित्र नथनेल, यांनीही येशूला मशीहा म्हणून ओळखले. खरे पाहता, नथनेल येशूला असे म्हणण्यास प्रवृत्त झाला: “आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.”—योहान १:३५-४९.

पाऊल उचलण्याची प्रेरणा

१०. पहिल्या भेटीनंतर येशूने पुन्हा येऊन शिष्यांपैकी काहींना बोलावले तेव्हा त्यांनी काय केले?

१० आंद्रिया, पेत्र व योहान यांना मशीहा सापडला तेव्हा त्यांना जो आनंद झाला त्याची तुलना मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याला अति मोलवान मोती सापडल्यावर झालेल्या आनंदाशी करता येते. आता ते पुढे काय करणार होते? येशूशी झालेल्या या पहिल्या भेटीनंतर त्यांनी लगेच काय केले याविषयी शुभवर्तमानांत फारशी माहिती दिलेली नाही. त्यांच्यापैकी बहुतेकजण आपापल्या घरी परतले व दैनंदित कार्यांत पुन्हा गुंतले असे दिसते. पण जवळजवळ वर्षभरानंतर आंद्रिया, पेत्र व योहान आणि योहानाचा भाऊ याकोब गालील समुद्रावर आपल्या मच्छिमारीच्या व्यवसायात गर्क असताना पुन्हा एकदा येशू त्यांना भेटला. * त्यांना पाहिल्यावर येशूने म्हटले: “माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” यावेळी त्यांची काय प्रतिक्रिया होती? पेत्र व आंद्रिया यांच्याविषयी मत्तयाच्या अहवालात असे सांगितले आहे: “लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.” याकोब व योहान यांच्याबद्दल असे म्हटले आहे: “लागलेच ते तारू व आपला बाप ह्‍यांना मागे सोडून त्याला अनुसरले.” लूकच्या अहवालात आणखी स्पष्टपणे सांगितले आहे: “सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.”—मत्तय ४:१८-२२; लूक ५:१-११.

११. येशूने बोलवल्यावर शिष्य लगेच प्रतिसाद कशामुळे देऊ शकले?

११ शिष्यांची प्रतिक्रिया त्याच क्षणी केलेल्या तडकाफडकी निर्णयाचा परिणाम होती का? मुळीच नाही! येशूशी पहिल्यांदा भेट झाल्यानंतर जरी ते आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात परत गुंतले तरीसुद्धा त्या पहिल्याच भेटीत त्यांनी जे पाहिले व ऐकले होते, ते त्यांच्या मनावर एक अमिट छाप टाकून गेले होते. त्या घटनेला आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेले होते, त्याअर्थी त्यांना या सर्व विषयांवर सविस्तर विचार करण्याची पुरेशी संधी मिळाली असेल. आता निर्णय घेण्याचा क्षण आला होता. अतिमोलवान मोती मिळाल्यावर अतिशय उत्साहित झालेल्या व येशूने वर्णन केल्यानुसार, ‘लगेच जाऊन’ तो मिळवण्याकरता आवश्‍यक पावले उचलणाऱ्‍या व्यापाऱ्‍यासारखे ते असणार होते का? होय. जे त्यांनी ऐकले व पाहिले होते त्यामुळे ते अतिशय उत्साहित झाले होते. निर्णय घेण्याची घडी आली आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच अहवालात सांगितल्यानुसार, मागेपुढे न पाहता, त्यांनी आपले सर्वस्व त्यागले आणि ते येशूचे अनुयायी बनले.

१२, १३. (क) येशूच्या शिकवणुकी ऐकणाऱ्‍या बहुतेक जणांनी कसा प्रतिसाद दिला? (ख) आपल्या विश्‍वासू शिष्यांविषयी येशूने काय म्हटले आणि त्याच्या शब्दांवरून काय सूचित होते?

१२ शुभवर्तमानात नंतर ज्या लोकांचे वर्णन केले त्यांच्यापेक्षा हे विश्‍वासू शिष्य किती वेगळे होते! असे अनेक लोक होते की ज्यांना येशूने बरे केले होते किंवा खाऊ घातले होते, पण ते पूर्वीसारखेच आपल्या दैनंदिन जीवनात व्यग्र राहिले. (लूक १७:१७, १८; योहान ६:२६) येशूने त्यांना आपले अनुयायी होण्यास बोलावले तेव्हा यांच्यापैकी काहींनी अंग चोरले. (लूक ९:५९-६२) याउलट विश्‍वासू शिष्यांविषयी येशूने नंतर म्हटले: “बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत.”—मत्तय ११:१२.

१३ “आक्रमण” या शब्दाचा या ठिकाणी काय अर्थ होतो? येथे वापरलेल्या मूळ ग्रीक क्रियापदाच्या संदर्भात व्हाईन्स एक्पोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲन्ड न्यू टेस्टमेंट वड्‌र्स यात असे म्हटले आहे: “हे क्रियापद जोरदार प्रयत्नांना सूचित करते.” या वचनासंबंधी बायबल विद्वान हाइनरिक मेयर म्हणतात: “मशीहाच्या येणाऱ्‍या राज्याकरता अतिशय आतुरतेने, उत्साहाने यत्न व संघर्ष करण्याच्या अर्थाने हे वर्णन केले आहे. . . . राज्याची ओढ वाटणे, (पूर्वीप्रमाणे शांतपणे किंवा वाट पाहण्याच्या भावनेने नव्हे तर) आतुरतेने आणि आवेशाने, असा अर्थ यातून सूचित होतो.” मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याप्रमाणे, खरोखर मोलवान काय आहे, हे ते थोडके शिष्य लगेच ओळखतात आणि राज्य मिळवण्याकरता आपल्याजवळ असलेले सर्वकाही देण्यास तयार होतात.—मत्तय १९:२७, २८; फिलिप्पैकर ३:८.

इतरही शोधात सहभागी झाले

१४. येशूने प्रेषितांना राज्याच्या प्रचार कार्याकरता कशाप्रकारे तयार केले आणि याचा काय परिणाम झाला?

१४ आपले सेवाकार्य पुढे चालवण्यासोबतच येशूने इतरांनाही राज्य मिळवण्याकरता प्रशिक्षण व साहाय्य पुरवले. सर्वप्रथम त्याने आपल्या शिष्यांतून १२ जणांना निवडून त्यांना प्रेषित, अर्थात पाठवण्यात आलेले असे होण्याकरता निवडले. त्यांना येशूने सेवाकार्य करण्याविषयी सविस्तर सूचना दिल्या, तसेच त्यांना मार्गात कोणत्या आव्हानांना व अडचणींना तोंड द्यावे लागेल याविषयी इशारे दिले. (मत्तय १०:१-४२; लूक ६:१२-१६) पुढच्या दोन वर्षांपर्यंत ते येशूसोबत सबंध देशात प्रचार यात्रांना गेले. त्यामुळे येशूचा जवळचा सहवास त्यांना लाभला. येशूचे बोलणे त्यांनी ऐकले, त्याची महत्कृत्ये पाहिली आणि त्याच्या जीवनाचे जवळून निरीक्षण केले. (मत्तय १३:१६, १७) साहजिकच या सर्व गोष्टींचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला असेल, जेणेकरून मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याप्रमाणे ते राज्याच्या ध्येयाकडे आवेशाने व मनःपूर्वक वाटचाल करत राहिले.

१५. येशूने आपल्या अनुयायांना आनंद करण्याचे कोणते खरे कारण असल्याचे सांगितले?

१५ बारा प्रेषितांव्यतिरिक्‍त, येशूने “आणखी बहात्तर [“सत्तर,” तळटीप] जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले.” यांनाही त्याने मार्गात कोणत्या आव्हानांना व अडचणींना तोंड द्यावे लागेल याविषयी सांगितले. त्याने त्या लोकांना असे सांगण्याची सूचना दिली की “देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.” (लूक १०:१-१२) हे सत्तर जण अतिशय आनंदी होऊन परतले आणि त्यांनी येशूला असे वृत्त दिले: “प्रभुजी, आपल्या नावाने भुते देखील आम्हाला वश होतात.” पण येशूची प्रतिक्रिया पाहून त्यांना कदाचित आश्‍चर्य वाटले असावे. येशूने त्यांना सांगितले की राज्याकरता त्यांचा जो आवेश होता त्यामुळे भविष्यात त्यांना यापेक्षा आनंददायक अनुभव येणार होते. त्याने त्यांना सांगितले: “भुते तुम्हाला वश होतात ह्‍याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्‍याचा आनंद माना.”—लूक १०:१७, २०.

१६, १७. (क) विश्‍वासू प्रेषितांसोबतच्या शेवटल्या रात्री येशूने त्यांना काय सांगितले? (ख) येशूच्या शब्दांतून प्रेषितांना कशामुळे आनंद व दिलासा मिळाला?

१६ शेवटी, आपल्या प्रेषितांसोबत शेवटल्या रात्री, सा.यु. ३३ च्या निसान १४ रोजी येशूने एक खास विधी स्थापन केला व आपल्या स्मरणार्थ हा विधी करत राहण्यास त्याने आपल्या शिष्यांना सांगितले; याला प्रभूचे सांज भोजन म्हणण्यात आले. त्या संध्याकाळी येशूने उरलेल्या ११ शिष्यांना सांगितले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो. ह्‍यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.”—लूक २२:१९, २०, २८-३०.

१७ येशूच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर प्रेषितांना किती आनंद व समाधान वाटले असावे! कोणत्याही मानवाकरता सर्वात श्रेष्ठ असा सन्मान व सुहक्क त्यांना देऊ करण्यात आला होता. (मत्तय ७:१३, १४; १ पेत्र २:९) मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याप्रमाणे त्यांनीही राज्याकरता, येशूचे अनुयायी होण्याकरता बराच त्याग केला होता. पण त्यांना आश्‍वासन देण्यात आले होते की आतापर्यंत त्यांनी केलेले त्याग व्यर्थ ठरणार नव्हते.

१८. अकरा प्रेषितांशिवाय आणखी कोणाला कालांतराने राज्याकरवी फायदा होणार होता?

१८ त्या रात्री येशूसोबत उपस्थित असलेल्या प्रेषितांनाच केवळ राज्याकरवी फायदा मिळणार नव्हता. यहोवाची अशी इच्छा होती की एकूण १,४४,००० जणांना राज्याच्या करारात सामील करावे जेणेकरून ते येशू ख्रिस्तासोबत सहशासक म्हणून वैभवी स्वर्गीय राज्यात राज्य करतील. यासोबतच प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात “कोणाला मोजता आला नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला” पाहिला. “ते . . . म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून, तारण आहे.’” हे राज्याच्या पृथ्वीवरील प्रजेतील सदस्य आहेत. *प्रकटीकरण ७:९, १०; १४:१,.

१९, २०. (क) सर्व राष्ट्रांच्या लोकांकरता कोणती संधी आहे? (ख) पुढील लेखात कोणता प्रश्‍न विचारात घेतला जाईल?

१९ स्वर्गात जाण्याआधी काही काळापूर्वी येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना अशी आज्ञा दिली होती: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) अशारितीने सर्व राष्ट्रांतील लोकही येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणार होते. मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याने उत्तम मोती सापडल्यावर केले त्याप्रमाणेच, ते देखील राज्याचा ध्यास घेतील, मग त्यांचे प्रतिफळ स्वर्गीय जीवनाचे असो अथवा पृथ्वीवरील जीवनाचे असो.

२० येशूच्या शब्दांवरून असे दिसून येते की शिष्य बनवण्याचे कार्य अगदी “युगाच्या समाप्तीपर्यंत” चालणार होते. तर मग आपल्या काळातही त्या मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍यासारख्या देवाच्या राज्याकरता आपले सर्वस्व देण्यास तयार असलेल्या व्यक्‍ती आहेत का? या प्रश्‍नावर पुढील लेखात चर्चा करू या.

[तळटीपा]

^ परि. 10 जब्दीचा पुत्र योहान याने कदाचित पहिल्या भेटीनंतर येशूच्या मागोमाग जाऊन त्याने केलेल्या काही गोष्टी पाहिल्या असतील. म्हणूनच तो आपल्या शुभवर्तमानात त्यांचे इतक्या स्पष्टपणे वर्णन करू शकला. (योहान अध्याय २-५) अर्थात, येशूने त्याला बोलवण्याआधी काही काळ तो देखील आपल्या घरी परतून कुटुंबाच्या मच्छिमारीच्या व्यवसायात सहभागी झाला होता.

^ परि. 18 अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील अध्याय १० पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• मोत्यांच्या शोधात फिरणाऱ्‍या व्यापाऱ्‍याच्या दाखल्याचे तात्पर्य काय आहे?

• येशूने राज्याचे श्रेष्ठ मोल आपण ओळखले असल्याचे कसे दाखवले?

• आंद्रिया, पेत्र, योहान व इतरांना येशूने बोलावले तेव्हा त्यांना लगेच प्रतिसाद का देता आला?

• सर्व राष्ट्रांच्या लोकांजवळ कोणती अद्‌भुत सुसंधी आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

“सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले”

[१२ पानांवरील चित्र]

स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली