व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

किती मौल्यवान आहे तुमचे जीवन?

किती मौल्यवान आहे तुमचे जीवन?

किती मौल्यवान आहे तुमचे जीवन?

पहिल्या महायुद्धात असंख्य जिवांचा नाहक बळी जात असतानाच, ॲन्टार्टिका येथे मात्र जीव वाचवण्याकरता एका व्यक्‍तीचे असाधारण प्रयत्न चालले होते. अँग्लो-आयरिश शोधक अर्नेस्ट शॅकल्टन व त्याच्या साथीदारांवर संकट कोसळले होते. ज्या एन्ड्योरन्स नावाच्या जहाजातून ते प्रवास करत होते ते बर्फाच्या ढिगाऱ्‍यावर आदळून बुडाले. शॅकल्टनने कसेतरी करून आपल्या माणसांना, निदान काही प्रमाणात सुरक्षित असलेल्या दक्षिण अटलांटिक समुद्रातील एलिफंट द्विपावर नेले. पण संकट अद्याप टळले नव्हते.

शॅकल्टनला जाणीव होती की जिवंत वाचण्याचा त्यांच्यापुढे एकच मार्ग आहे. तो म्हणजे, साऊथ जॉर्जियाच्या बेटावर देवमासे पकडण्याचे जे केंद्र होते तेथे काही माणसांना पाठवून मदत मिळवणे. हे ठिकाण १,१०० किलोमीटर दूर होते आणि शॅकल्टनजवळ एन्ड्योरन्स जहाजातून मिळवलेली ६.७ मीटरची एक लाईफबोटच तेवढी होती. परिस्थिती निश्‍चितच आशादायक नव्हती.

पण १७ दिवसांच्या भयानक संघर्षानंतर, मे १०, १९१६ रोजी शॅकल्टन आणि त्याची काही माणसे कशीबशी साऊथ जॉर्जिया येथे येऊन पोचली. पण समुद्र अतिशय वादळी असल्यामुळे त्यांना बेटावर दुसऱ्‍याच बाजूने प्रवेश करणे भाग पडले. मग नेमक्या स्थळी पोचण्याकरता त्यांना, नकाशावर ज्यांचा उल्लेखही नाही अशा बर्फाच्छादित पर्वतांवरून ३० किलोमीटरचे अंतर पायी पार करावे लागले. तापमान शून्य डिग्रीपेक्षा कितीतरी खाली गेलेले होते, शिवाय त्यांच्याजवळ बर्फाळ डोंगर चढून जाण्याकरता लागणारी सामग्रीही नव्हती. पण या सर्व संकटांवर मात करून शॅकल्टन व त्याचे साथीदार आपल्या इच्छित स्थळी पोचले आणि शेवटी तो आपल्या सर्व माणसांना एलिफंट बेटावरून सुखरूप वाचवू शकला. शॅकल्टनने एवढा संघर्ष का केला? त्याचे चरित्र लिहिणारे रोलँड हन्टफोर्ड आपल्या पुस्तकात सांगतात: “आपल्या एकूण एक माणसाला जिवंत वाचवण्याचा त्याने संकल्प केला होता.”

“त्यांपैकी कोणी उणा पडत नाही”

‘एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत, ३० किलोमीटर फक्‍त बर्फ आणि खडक असलेल्या त्या ओसाड, अगम्य बेटावर’ एकमेकांना खेटून बसण्याखेरीज आणि वाट पाहण्याखेरीज शॅकल्टनची माणसे काहीच करू शकत नव्हती. पण अशा परिस्थितीतही त्यांनी पूर्णपणे आशा सोडून दिली नाही. का? कारण आपला म्होरक्या आपल्याला दिलेला शब्द पाळेल आणि आपल्याला जरूर वाचवेल याची त्यांना खात्री होती.

आज मानवजातीची दशा एलिफंट बेटावर अडकून पडलेल्या त्या माणसांसारखी आहे. बरेचजण अगदीच खडतर परिस्थितीत दिवस काढत आहेत, फक्‍त जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत आहेत. पण ते पूर्ण खात्री बाळगू शकतात की देव “दुःखितांस” त्यांच्या संकटांतून व विपत्तीतून ‘सोडवील.’ (ईयोब ३६:१५) देवाच्या नजरेत प्रत्येक व्यक्‍तीचे जीवन मौल्यवान आहे याविषयी कधीही शंका घेऊ नका. सृष्टिकर्ता यहोवा देव म्हणतो, “संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्‍त करीन आणि तू माझे गौरव करिशील.”—स्तोत्र ५०:१५.

पृथ्वीवर राहणाऱ्‍या कोट्यवधी लोकांपैकी, सृष्टिकर्ता व्यक्‍तिशः तुम्हाला मौल्यवान समजतो हे मानणे तुम्हाला जड जाते का? मग आपल्या या विश्‍वातील अब्जावधी आकाशगंगांमधील अब्जावधी ताऱ्‍यांविषयी संदेष्टा यशया याने काय लिहिले याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “आपले डोळे वर करून पाहा; ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वास नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.”—यशया ४०:२६.

याचे तात्पर्य तुम्हाला कळले का? आपली ग्रहमाला ही एका प्रचंड मोठ्या आकाशगंगेचा केवळ एक भाग आहे. या आकाशगंगेत कमीतकमी १०,००० कोटी तारे आहेत. आणि अशा किती आकाशगंगा आहेत? नक्की किती हे कोणालाही माहीत नाही पण काही अंदाजांप्रमाणे विश्‍वात १२,५०० कोटी आकाशगंगा असाव्यात. मग ताऱ्‍यांच्या संख्येबद्दल तर विचारायलाच नको! तरीसुद्धा बायबल आपल्याला सांगते की सृष्टिकर्ता प्रत्येक ताऱ्‍याला नावाने जाणतो.

‘तुमच्या डोक्यावरले सर्व केस मोजलेले आहेत’

पण एखादा कदाचित असे म्हणेल, की ‘अब्जावधी ताऱ्‍यांचे—किंवा व्यक्‍तींचे नाव माहीत असणे आणि यांपैकी प्रत्येक व्यक्‍तीबद्दल काळजी वाटणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.’ खरंय, अब्जावधी लोकांची नावे तर पुरेशी मेमरी असलेल्या एखाद्या कंप्युटरमध्येही नोंदलेली असू शकतात. पण म्हणून त्या कंप्युटरला त्यांच्यापैकी कोणाबद्दलही काळजी वाटते असे म्हणता येत नाही. यहोवा देवाला मात्र अब्जावधी लोकांची केवळ नावेच माहीत नाहीत, तर त्याला व्यक्‍तिशः त्यांच्याबद्दल काळजीही वाटते, असे बायबल सांगते. प्रेषित पेत्राने लिहिले: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.

येशू ख्रिस्ताने म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” (मत्तय १०:२९-३१) चिमण्यांना किंवा माणसांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याची देवाला केवळ माहिती असते असे येशूने म्हटले नाही. तर त्याने म्हटले: “पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” तुमचे मोल अधिक का? कारण तुम्हाला ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण करण्यात आले आहे. म्हणजेच, खुद्द देवाच्या ठिकाणी असलेल्या उदात्त गुणांचे प्रतिबिंब असलेले नैतिक, बौद्धिक व आध्यात्मिक गुण प्रदर्शित करण्याची तुमच्याठायीही कुवत आहे.—उत्पत्ति १:२६, २७.

“बुद्धिमत्तेने उत्पन्‍न झालेले”

निर्माणकर्ता नाही असे ठासून सांगणाऱ्‍या लोकांमुळे आपली फसगत होऊ देऊ नका. त्यांच्या मते, कोणत्यातरी अंधळ्या, निराकार नैसर्गिक शक्‍तींनी तुम्हाला बनवले. त्यांच्या मते तुम्हाला ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण करण्यात आलेले नसून तुम्ही या ग्रहावरील इतर सर्व पशूपक्षांसाखेच, चिमण्यांसारखे आहात.

या पृथ्वीवर जीवन निव्वळ योगायोगाने किंवा अंधळ्या शक्‍तीने आले हे तुमच्या तर्कबुद्धीला खरच पटते का? रेणवीय जीववैज्ञानिक मायकल जे. बीही यांच्या मते, “सजीव सृष्टीवर नियंत्रण करणाऱ्‍या आश्‍चर्यकारक व गुंतागुंतीच्या जैवरासायनिक प्रक्रियांचा” अभ्यास केल्यावर हे अगदीच अशक्य वाटते. त्यांच्या मते जीवरसायनशास्त्रातील पुरावा याच निर्विवाद निष्कर्षावर आपल्याला आणतो की “पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील अगदी मूलभूत जीवही बुद्धिमत्तेने उत्पन्‍न झालेले आहेत.”—डार्व्हिन्स ब्लॅक बॉक्स—द बायोकेमिकल चॅलेंज टू एव्हल्युशन.

बायबल आपल्याला सांगते की पृथ्वीवरील सगळ्याच पातळींवरील जीव बुद्धिमत्तेने उत्पन्‍न झालेले आहेत. आणि ते आपल्याला हेही सांगते की विश्‍वाचा सृष्टिकर्ता यहोवा देव यानेच हे सर्व काही बुद्धिमत्तेने निर्माण केले आहे.—स्तोत्र ३६:९; प्रकटीकरण ४:११.

आजच्या जगात आपल्याला दुःखाला व कष्टाला तोंड द्यावे लागते हे खरे आहे; पण म्हणून या पृथ्वीची रचना व निर्मिती करणाऱ्‍या सृष्टिकर्त्याच्या अस्तित्वावर शंका घेऊ नका. दोन मूलभूत सत्ये आठवणीत असू द्या. पहिले म्हणजे, आपल्या सभोवती दिसणारी अपरिपूर्ण परिस्थिती देवाने घडवून आणली नाही. आणि दुसरी म्हणजे, आपल्या निर्माणकर्त्याने काही खास कारणांसाठी काही काळ ही परिस्थिती अस्तित्वात राहू दिली आहे. या नियतकालिकात बरेचदा चर्चा करण्यात आल्याप्रमाणे, यहोवा देवाने दुष्टाईला केवळ एका मर्यादित काळापर्यंतच अनुमती दिली आहे; मनुष्याने स्वतः त्याच्या सार्वभौमत्वाला धिक्कारल्यामुळे जे नैतिक वादविषय उपस्थित झाले त्यांचा कायमचा शहानिशा करण्यासाठी त्याने असे केले आहे. *उत्पत्ति ३:१-७; अनुवाद ३२:४, ५; उपदेशक ७:२९; २ पेत्र ३:८, ९.

“धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील”

अर्थात, आजच्या काळात बऱ्‍याच जणांना अतिशय कष्टदायक परिस्थितीत राहावे लागते तरीसुद्धा, जीवन एक अद्‌भूत देणगी आहे. आणि त्याचे रक्षण आपण पूर्ण शक्‍तिनिशी करतो. देवाने भविष्यातील ज्या जीवनाचे वचन दिले आहे ते एलिफंट बेटावर शॅकल्टनच्या माणसांनी केला तसा खडतर, दुःखदायक परिस्थितीत केवळ जिवंत राहण्याकरता केलेला संघर्ष नसेल. देव आपल्याला सध्याच्या दुःखदायक व व्यर्थ अस्तित्वातून यासाठी सोडवू इच्छितो, की आपल्याला ‘खरे जीवन बळकट धरता यावे.’ मानवजातीची निर्मिती करताना, हेच जीवन त्यांना देण्याचा देवाचा उद्देश होता.—१ तीमथ्य ६:१९.

देव हे सर्वकाही करेल, कारण आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच्या नजरेत मौल्यवान आहे. आपले मूळ मातापिता आदाम व हव्वा यांच्यापासून वारशाने आपल्याला मिळालेल्या पाप, अपरिपूर्णता व मृत्यूपासून सोडवण्याकरताच देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या खंडणी बलिदानाची तरतूद केली. (मत्तय २०:२८) येशू ख्रिस्ताने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो . . . त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

ज्यांचे जीवन आज दुःख व अत्याचारामुळे विस्कळीत झाले आहे त्यांच्याकरता देव काय करेल? देवाचे प्रेरित वचन आपल्याला त्याच्या पुत्राविषयी सांगते: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील.” तो हे सर्व का करेल? कारण “त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त [किंवा, त्यांचे जीवन] अमोल ठरेल.”स्तोत्र ७२:१२-१४.

कित्येक शतकांपासून मानवजात पाप व अपरिपूर्णतेच्या ओझ्याखाली दबून, जणू दुःखी, कष्टी होऊन “कण्हत आहे.” यामुळे घडून येणारे कोणतेही नुकसान आपण भरून काढू शकतो हे जाणून देवाने केवळ या परिस्थितीला अनुमती दिली आहे. (रोमकर ८:१८-२२) आता फार लवकरच, तो आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या हाती असलेल्या आपल्या राज्य शासनाच्या माध्यमाने ‘सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचवील.’—प्रेषितांची कृत्ये ३:२१; मत्तय ६:९, १०.

यात गतकाळात दुःख सोसून मरण पावलेल्या लोकांचे पुनरुत्थानही समाविष्ट आहे. हे सर्व लोक देवाच्या स्मृतीत सुरक्षित आहेत. (योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५) लवकरच त्यांना दुःखाचा लवलेशही नसलेल्या एका परादीस पृथ्वीवर परिपूर्ण, सार्वकालिक जीवनाचा “विपूलपणे” उपभोग घ्यायला मिळेल. (योहान १०:१०; प्रकटीकरण २१:३-५) तेव्हा जिवंत असलेले सर्वजण जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील आणि ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण केलेल्या मनुष्याला शोभणारे अद्‌भुत गुण व कौशल्ये संपादन करतील.

यहोवाने वचन दिलेल्या या जीवनाचा उपभोग घेण्याकरता तुम्ही तेथे असाल का? हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे सर्व आशीर्वाद मिळवून देण्याकरता देवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा फायदा करून घेण्याचे आम्ही तुम्हाला निमंत्रण देत आहोत. या नियतकालिकाच्या प्रकाशकांना यासंदर्भात तुम्हाला मदत करण्यास आनंद वाटेल.

[तळटीप]

^ परि. 17 या मुद्द्‌याची सविस्तर चर्चा, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील “देवाने दुष्टाईला अनुमती का दिली?” असे शीर्षक असलेल्या ८ व्या अध्यायात केली आहे.

[४, ५ पानांवरील चित्र]

संकटात सापडलेल्या शॅकल्टनच्या माणसांना खात्री होती की त्यांना सुखरूप वाचवण्याचा त्याने दिलेला शब्द तो अवश्‍य पाळेल

[चित्राचे श्रेय]

© CORBIS

[६ पानांवरील चित्र]

“पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे”