व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन अनमोल की कवडीमोल?

जीवन अनमोल की कवडीमोल?

जीवन अनमोल की कवडीमोल?

“ज्याअर्थी मनुष्याची सृष्टी देवाच्या प्रतिरूपात करण्यात आली आहे, त्याअर्थी मनुष्याची हत्या करणे म्हणजे जगातल्या सर्वात अनमोल आणि सर्वात पवित्र वस्तूचा नाश करणे होय.”—सर्वसामान्य माणसाचे नैतिक मार्गदर्शक, (इंग्रजी) लेखक विल्यम बार्क्ले.

‘जगातली सर्वात अनमोल वस्तू.’ जीवनाविषयीच्या या अभिप्रायाशी तुम्ही सहमत आहात का? बहुतेक लोकांच्या वर्तणुकीवरून त्यांना या लेखकाचे मत पटते असे दिसत नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी, इतरांची जराही पर्वा न करता कित्येक दुष्ट लोकांनी लाखो लोकांचा निर्दयपणे जीव घेतला आहे.—उपदेशक ८:९.

क्षुल्लक व टाकाऊ

याचे सर्वात नमुनेदार उदाहरण म्हणजे, पहिले महायुद्ध. इतिहासकार ए.जी.पी. टेलर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, या भयानक युद्धादरम्यान वारंवार “माणसांच्या देहांचा नाहक बळी देण्यात आला.” प्रतिष्ठा व गौरव मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्‍या लष्करी अधिकाऱ्‍यांनी सैनिकांचा अक्षरशः वापर केला; जणू त्यांचे जीवन अगदीच कवडीमोल व टाकाऊ होते. फ्रांसमधील व्हर्डनच्या लढाईत पाच लाखाहून जास्त सैनिकांचा बळी गेला. टेलर लिहितात, की या लढाईमागे तसे पाहता “[निर्णायक महत्त्वाचा] असा कोणताही उद्देश नव्हता; केवळ माणसांची कत्तल करून गौरव प्राप्त करणे एवढाच काय तो उद्देश होता.”

मनुष्याचे जीवन कवडीमोल लेखण्याची ही वृत्ती सर्वत्र पाहायला मिळते. केव्हिन बेल्झ हे विद्वान यासंदर्भात एक मुद्दा लक्षात आणून देतात. ते म्हणतात की अलीकडे “लोकसंख्येतील असामान्य वाढीमुळे जगातल्या रोजगार क्षेत्रात लाखो गरीब व असाहाय्य लोकांचा प्रवेश झाला आहे.” या लोकांना आयुष्यभर केवळ जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो; ते एका निर्दयी व्यावसायिक यंत्रणेत भरडले जातात, जेथे “जीवनाला काहीही किंमत उरत नाही.” त्यांचे शोषण करणारे त्यांना अक्षरशः गुलामांसारखे वागवतात, असे बेल्झ

पुढे सांगतात. त्यांच्या लेखी हे लोक म्हणजे “नफा मिळवण्याकरता उपयोगात आणायच्या टाकाऊ वस्तू” असतात.—टाकाऊ लोक.

“वायफळ”

आणखीही कित्येक कारणांमुळे, लाखो लोक जीवनात अगदी निराश झाले आहेत; आपण जगलो काय किंवा मेलो काय, यामुळे कोणालाही फरक पडणार नाही असे त्यांना वाटते. युद्धे व अन्याय यांव्यतिरिक्‍त सबंध मानवजात दुष्काळ, रोगराई, शोक आणि अशा असंख्य दुःखांना तोंड देत आहे. या परिस्थितीमुळे लोक विचार करू लागले आहेत, की जगण्यात खरच काही अर्थ आहे का?—उपदेशक १:८, १४.

अर्थात, सर्वांनाच अशा टोकाच्या दुःखदायक व खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. पण ज्यांना कोणत्याही भयंकर अत्याचाराला तोंड द्यावे लागले नाही ते देखील प्राचीन इस्राएलातील शलमोन राजाच्या भावनांना दुजोरा देतात; ज्याने म्हटले: “मनुष्य जे काही परिश्रम करितो व आपला जीव उलथापालथा करून या भूतलावर खटाटोप करितो त्याचा त्याला काय लाभ?” आपण जीवनात काय मिळवले याचा विचार केल्यावर बरेचजण याच निष्कर्षावर येतात, की त्यांपैकी बहुतेक गोष्टी “व्यर्थ व वायफळ” आहेत.—उपदेशक २:२२, २६.

जीवनाकडे मागे वळून पाहताना बरेच लोक म्हणतात, ‘बस्स, इतकेच?’ पुरातन काळात कुलपिता अब्राहाम ज्याप्रकारे पूर्णतः समाधानी होऊन मरण पावला त्याप्रकारे किती लोकांना आपल्या आयुष्याच्या शेवटी वाटते? (उत्पत्ति २५:८) बहुतेकांना ही व्यर्थतेची भावना सतावते. पण जीवन व्यर्थ आहे असे समजण्याचे कारण नाही. देवाच्या नजरेत प्रत्येक मानवाचे जीवन अनमोल आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने जीवनाचा पुरेपूर आनंद लुटावा व समाधानी जीवन जगावे असे त्याला वाटते. पण ही त्याची इच्छा कशी पूर्ण होईल? या संदर्भात आणखी प्रकाश टाकणारा पुढील लेख वाचून पाहा.