व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा नेहमी योग्य तेच करतो

यहोवा नेहमी योग्य तेच करतो

यहोवा नेहमी योग्य तेच करतो

“परमेश्‍वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे.”—स्तोत्र १४५:१७.

१. तुमच्याविषयी कोणी चुकीचा निष्कर्ष काढल्यास तुमची काय प्रतिक्रिया असते आणि यावरून आपण काय शिकू शकतो?

तुमच्याविषयी कधी कोणी चुकीचा निष्कर्ष काढला आहे का? खरी माहिती न काढता कधी तुमच्या कृतींबद्दल किंवा हेतूंबद्दल शंका व्यक्‍त केली आहे का? असल्यास, साहजिकच तुम्हाला वाईट वाटले असेल. यावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो: सर्व माहिती आपल्याजवळ असेपर्यंत निष्कर्ष काढण्याची घाई न करण्यातच सुज्ञपणा आहे.

२, ३. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देण्याइतकी सविस्तर माहिती नसलेले बायबल अहवाल वाचल्यावर काहीजण कशी प्रतिक्रिया व्यक्‍त करतात, पण बायबल आपल्याला यहोवाविषयी काय सांगते?

यहोवा देवाबद्दल कोणताही निष्कर्ष काढण्याआधी आपण हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. का? कारण काही बायबल अहवाल असे आहेत जे वाचल्यावर सुरुवातीला आपण गोंधळात पडू शकतो. हे अहवाल कदाचित गतकाळातील देवाच्या उपासकांच्या एखाद्या कृत्याविषयी किंवा एखाद्या प्रसंगी देवाने कशाप्रकारे न्याय केला त्याविषयी असू शकतात. आणि या अहवालांत आपल्या सर्वच प्रश्‍नांचे उत्तर देण्याइतकी माहिती कदाचित पुरवलेली नसेल. खेदाने म्हणावे लागते, की काहीजण अशा अहवालांबद्दल आक्षेप घेतात, इतकेच नव्हे तर देवाच्या नीतिमान व न्यायी असण्यावरही शंका घेतात. पण बायबल आपल्याला सांगते की “परमेश्‍वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे.” (स्तोत्र १४५:१७) तसेच त्याचे वचन आपल्याला आश्‍वासन देते की तो “काही वाईट करीत नाही.” (ईयोब ३४:१२; स्तोत्र ३७:२८) मग लोक त्याच्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढतात तेव्हा त्याला कसे वाटत असेल याची कल्पना करा!

आपण यहोवाचा न्याय का स्वीकारावा याची पाच कारणे आपण लक्षात घेऊ या. मग ही कारणे मनात बाळगून बायबलमधील अशा दोन अहवालांचे परीक्षण करू या, की जे काहींना समजण्यास कठीण वाटतात.

यहोवाचा न्याय आपण का स्वीकारावा?

४. देवाच्या कृत्यांचा विचार करताना आपण नम्र मनोवृत्ती का बाळगावी? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

सर्वप्रथम, कोणत्याही परिस्थितीशी संबंधित सर्व बाबी आपल्याला माहीत नसतात, पण यहोवाला त्या माहीत असतात. त्यामुळे देवाच्या कृत्यांविषयी विचार करताना आपण नम्र मनोवृत्ती बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, नेहमी न्याय्य निवाडा देण्याबद्दल सुविख्यात असलेल्या एका न्यायाधीशाने, एखाद्या खटल्यात विशिष्ट निकाल घोषित केला आहे अशी कल्पना करा. ज्याला पूर्ण प्रकरण माहीत नाही किंवा ज्याला संबंधित कायद्यांविषयी ज्ञान नाही अशा एखाद्या व्यक्‍तीने न्यायाधीशाच्या निकालाची टीका केली तर तुम्ही त्याला काय म्हणाल? पूर्ण माहिती असल्याशिवाय एखाद्या विषयावर टीका करणे मूर्खपणाचे कृत्य ठरेल. (नीतिसूत्रे १८:१३) मग सर्वसामान्य मानवांनी “सर्व जगाचा न्यायाधीश” असलेल्या यहोवाची टीका करणे याहीपेक्षा जास्त मूर्खपणाचे ठरणार नाही का?—उत्पत्ति १८:२५.

५. देवाने विशिष्ट व्यक्‍तींचा कसा न्याय केला याविषयी जेव्हा आपण बायबलमधील अहवाल वाचतो तेव्हा आपण कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे?

देवाचा न्याय स्वीकारण्याचे दुसरे कारण असे की मनुष्यांजवळ इतरांच्या मनात काय आहे हे जाणण्याची शक्‍ती नसली तरी देवाजवळ ही शक्‍ती आहे. (१ शमुवेल १६:७) देवाचे वचन आपल्याला सांगते: “प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्‍वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखितो.” (यिर्मया १७:१०) म्हणूनच देवाने विशिष्ट व्यक्‍तींचा कसा न्याय केला याविषयी आपण बायबलमधील अहवाल वाचतो, तेव्हा आपण नेहमी हे आठवणीत ठेवू या, की तो सर्वकाही पाहू शकत असल्यामुळे काही गुप्त विचारांचा, हेतूंचा व इराद्यांचा त्याच्या वचनात उल्लेख करण्यात आलेला नसला तरीसुद्धा तो त्या सर्व गोष्टी विचारात घेतो.—१ इतिहास २८:९.

६, ७. (क) स्वतःला भारी किंमत मोजावी लागली तरीसुद्धा यहोवा आपल्या न्याय्य व नीतिमान आदर्शांना जडून राहतो हे कशावरून दिसून येते? (ख) बायबलचा एखादा अहवाल वाचताना, देवाने योग्य व न्याय्य पद्धतीने कार्य केले का असा प्रश्‍न आपल्या मनात आल्यास आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

यहोवाचा न्याय स्वीकारण्याचे तिसरे कारण हे आहे की तो नेहमी आपल्या नीतिमान आदर्शांना जडून राहतो, मग त्यासाठी त्याला स्वतःला मोठी किंमत मोजावी लागली तरीसुद्धा. एक उदाहरण लक्षात घ्या. आज्ञाधारक मानवजातीला पाप व मृत्यूच्या दास्यातून सोडवण्याकरता आपल्या पुत्राला खंडणी म्हणून अर्पण करताना यहोवा आपल्या न्याय्य व नीतिमान आदर्शांनुसार वागत होता. (रोमकर ५:१८, १९) अर्थात, आपल्या प्रिय पुत्राला यातना सोसून वधस्तंभावर मरताना यहोवाने पाहिले तेव्हा त्याला अकथनीय दुःख झाले असेल. यावरून देवाबद्दल आपल्याला काय कळते? ‘ख्रिस्त येशूने भरलेल्या खंडणीविषयी’ बायबल म्हणते की हे यासाठी होते की “[देवाने] आपले नीतिमत्व व्यक्‍त करावे.” (रोमकर ३:२४-२६) एका वेगळ्या भाषांतरात रोमकरांस ३:२५ यात असे म्हटले आहे: “यावरून दिसून येते की देव नेहमी जे योग्य व न्याय्य तेच करतो.” (न्यू सेंच्युरी व्हर्शन) होय, खंडणी पुरवण्याकरता यहोवा जे करण्यास तयार होता त्यावरून “जे योग्य व न्याय्य” त्याला तो किती महत्त्व देतो हे दिसून येते.

तेव्हा बायबलमधील एखादा अहवाल वाचताना, देवाने योग्य किंवा न्याय्य पद्धतीने कार्य केले का असा जर आपल्या मनात प्रश्‍न आला तर आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे: नीतीमत्त्व व न्यायाच्या आपल्या स्वतःच्या आदर्शांना एकनिष्ठ राहण्याकरता यहोवाने आपल्या पुत्रालाही यातनामय मृत्यूपासून वाचवले नाही. इतर बाबतींत तो या आदर्शांचे उल्लंघन करेल का? खरे पाहता, यहोवा कधीही आपल्या नीतिमान व न्याय्य आदर्शांचे उल्लंघन करत नाही. त्यामुळे तो जे काही करतो ते नेहमी योग्य आणि न्याय्य असते याची आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो.—ईयोब ३७:२३.

८. न्याय व नीतिमत्त्वाच्या बाबतीत यहोवा कोठेतरी कमी पडतो अशी मानवाने कल्पनाही करणे अतर्क्य का ठरेल?

यहोवाचा न्याय आपण का स्वीकारावा याचे चौथे कारण असे की यहोवाने मनुष्याला त्याच्याच प्रतिरूपात निर्माण केले. (उत्पत्ति १:२७) त्याअर्थी मानवांना देवाच्या ठायी असलेले गुण देण्यात आले आहेत; यांत न्याय व नीतिमत्त्वाची जाणीव देखील समाविष्ट आहे. न्याय व नीतिमत्त्वाच्या आपल्या जाणिवेमुळे जर आपल्याला असे वाटू लागले की हेच गुण यहोवामध्ये नाहीत, तर ते अतर्क्य ठरेल. जर बायबलमधील एखाद्या अहवालामुळे आपण गोंधळात पडलो तर आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की आपल्या उपजत पापी स्वभावामुळे योग्य व न्याय्य याबद्दलची आपली समजशक्‍ती अपरिपूर्ण आहे. ज्याच्या प्रतिरूपात आपल्याला निर्माण करण्यात आले आहे तो यहोवा देव न्याय व नीतिमत्त्व यांच्याबाबतीत परिपूर्ण आहे. (अनुवाद ३२:४) मानव, खुद्द देवापेक्षा जास्त न्यायी व नीतिमान असू शकतात असा विचार करणेही अर्थहीन आहे!—रोमकर ३:४, ५; ९:१४.

९, १०. आपल्या कृत्यांविषयी मनुष्याला कोणतेही स्पष्टीकरण अथवा समर्थन देण्यास यहोवा बाध्य का नाही?

यहोवाचा न्याय स्वीकारण्याचे पाचवे कारण असे की तो “सर्व पृथ्वीवर परात्पर” आहे. (स्तोत्र ८३:१८) तसे पाहता, आपल्या कृत्यांविषयी मानवांना कोणतेही स्पष्टीकरण किंवा समर्थन पुरवण्यास तो बाध्य नाही. तो महान घडविणारा आहे आणि आपण त्याच्या हातातल्या मातीसारखे आहोत, जिला तो पात्रांचा आकार देतो आणि आपल्या मनाप्रमाणे उपयोग करू शकतो. (रोमकर ९:१९-२१) त्याच्या हातातली मातीची पात्रे या नात्याने त्याच्या निर्णयांबद्दल किंवा कृत्यांबद्दल कोणताही प्रश्‍न विचारण्याचा आपल्याला काय हक्क? पुरातन काळात, देवाने मानवांशी केलेल्या व्यवहारांसंबंधी ईयोबाची गैरसमजूत झाली तेव्हा यहोवाने त्याची चूक त्याच्या लक्षात आणून दिली व त्याला असा सवाल केला: “तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवितोस काय?” आपण अविचारीपणे बोललो याची जाणीव झाल्यावर ईयोबाने पश्‍चात्ताप केला. (ईयोब ४०:८; ४२:६) देवाला दोषी ठरवू पाहण्याची तीच चूक आपण कधीही करता कामा नये!

१० निश्‍चितच, यहोवा नेहमी जे योग्य तेच करतो असा विश्‍वास बाळगण्याची आपल्याकडे बरीच कारणे आहेत. यहोवाचे मार्ग आपण कशाप्रकारे समजून घेऊ शकतो याचा एक आधार आपल्याला मिळाला आहे; तर आता या दृष्टिकोनातून आपण बायबलमधील अशा दोन अहवालांचे परीक्षण करू या, की जे काहींना गोंधळात पाडतात. यांपैकी पहिला अहवाल देवाच्या उपासकांपैकी असलेल्या एका व्यक्‍तीच्या कार्यांविषयी आहे आणि दुसरा स्वतः देवाने दिलेल्या न्यायाबद्दल आहे.

लोटाने संतप्त जमावाला आपल्या मुली का देऊ केल्या?

११, १२. (क) देवाने दोन देवदूतांना मानवरूपात सदोम शहरात पाठवले तेव्हा काय घडले याचे वर्णन करा. (ख) या अहवालामुळे काहींच्या मनात कोणते प्रश्‍न उद्‌भवले आहे?

११ उत्पत्तीच्या १९ व्या अध्यायात, देवाने सदोम शहरात दोन देवदूतांना मानवांच्या रूपात पाठवले तेव्हा काय घडले याचा अहवाल आपल्याला वाचायला मिळतो. लोटाने त्यांना आपल्याच घरी मुक्काम करण्याचा आग्रह केला. पण त्या रात्री शहरातल्या माणसांनी येऊन त्याच्या घराला गराडा घातला आणि अनैतिक उद्देशाकरता त्यांना बाहेर आणण्याची ते लोटाला मागणी करू लागले. लोटाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आपल्या पाहुण्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने लोट त्यांना म्हणाला: “बांधवहो, असले दुष्कर्म करु नका. हे पाहा, माझ्या दोन मुली आहेत, त्यांनी अद्यापि पुरुष पाहिलेला नाही; मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्याजशी वर्तन करा, पण ह्‍या पुरुषास काही करु नका, कारण ते आसऱ्‍यासाठी माझ्या छपराखाली आले आहेत.” पण जमावाने काही ऐकले नाही आणि ते लोटाच्या घराचे दार तोडण्यास सरसावले. शेवटी पाहुणे म्हणून आलेल्या देवदूतांनी त्या पिसाळलेल्या माणसांना अंधळे करून टाकले.—उत्पत्ति १९:१-११.

१२ साहजिकच या अहवालामुळे काही जणांच्या मनात अनेक प्रश्‍न आले आहेत. ते विचार करतात: ‘पाहुण्यांना वाचवण्यासाठी आपल्या मुलींना एका कामसंतप्त जमावाच्या हाती देण्याचे लोटाने कसे काय सुचवले? हे त्याचे कृत्य अयोग्य नव्हते का, भेकडपणाचे नव्हते का?’ हा अहवाल लक्षात घेतल्यावर, प्रश्‍न येतो की लोटाला “नीतिमान” म्हणण्यास देवाने पेत्राला का प्रेरित केले? लोटाच्या कृत्याला देवाची संमती होती का? (२ पेत्र २:७, ८) या विषयावर आपण विचार करू या जेणेकरून आपण चुकीचा निष्कर्ष काढणार नाही.

१३, १४. (क) लोटाच्या कृत्यांविषयी बायबलमधील अहवालाविषयी कोणती गोष्ट आपण लक्षात घ्यावी? (ख) लोट भेकडपणे वागला नाही हे कशावरून दिसून येते?

१३ सर्वप्रथम, हे लक्षात घेतले पाहिजे की बायबलमध्ये लोटाच्या कृत्याचे समर्थनही करण्यात आलेले नाही आणि टीकाही करण्यात आलेली नाही, तर केवळ काय घडले याचे वृत्त त्यात दिले आहे. तसेच लोट कशाप्रकारे विचार करत होता किंवा कशामुळे तो असे करण्यास प्रवृत्त झाला हे देखील बायबल आपल्याला सांगत नाही. “नीतिमानांचे . . . पुनरुत्थान होईल” व लोट परत येईल तेव्हा कदाचित तो याविषयी अधिक माहिती पुरवेल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

१४ लोटाला भेकड म्हणता येणार नाही. तो एका पेचप्रसंगात अडकला होता. आपल्याकडे आलेली माणसे, आपल्या ‘छपराखाली आलेली आहेत’ असे म्हणण्याद्वारे लोट असे सांगू इच्छित होता की त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण व आश्रय देण्याची जबाबदारी आपली आहे असे तो मानत होता. पण अर्थातच हे त्याला सोपे जाणार नव्हते. यहुदी इतिहासकार जोसीफस सांगतो की सदोमचे लोक “माणसांवर अन्याय आणि देवाचा अनादर” करणारी होती. “अनोळखी लोकांचा त्यांना तिटकारा होता आणि सदोमी चालीरितींनुसार ते स्वतःस भ्रष्ट करीत.” तरीसुद्धा, लोट या द्वेषपूर्ण जमावाला घाबरून घरात बसला नाही. उलट त्याने बाहेर जाऊन त्या संतप्त पुरुषांशी बुद्धिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्याने ‘आपल्यामागून दारही लावून घेतले.’—उत्पत्ति १९:६.

१५. लोटाला विश्‍वास असल्यामुळेच त्याने असे केले असावे असे का म्हणता येईल?

१५ ‘तरीसुद्धा,’ काहीजण म्हणतील, ‘आपल्या मुली त्यांना देण्याचे लोटाने का सुचवले?’ लोटाचे हेतू वाईट होते असे गृहित धरण्याऐवजी काही संभाव्य कारणांचा आपण विचार करून पाहू या का? सर्वप्रथम, कदाचित लोटाला विश्‍वास असल्यामुळेच त्याने असे केले असावे. असे का म्हणता येईल? यहोवाने आपला काका अब्राहाम याच्या पत्नीला, साराला कसे वाचवले होते याविषयी साहजिकच लोटाला माहीत होते. तुम्हाला हेही आठवत असेल, की सारा अतिशय सुंदर असल्यामुळे अब्राहामाने तिला आपण बहिणभाऊ आहोत असे लोकांना सांगण्याची विनंती केली होती; नाहीतर लोक तिला मिळवण्याकरता आपल्याला ठार मारतील अशी त्याला भीती होती. * नंतर, साराला फारोच्या घराण्यात नेण्यात आले. पण यहोवाने फारोला, साराला आपली पत्नी म्हणून घेण्यापासून अडवले. (उत्पत्ति १२:११-२०) कदाचित लोटालाही असा विश्‍वास वाटत असेल, की आपल्या मुलींनाही अशाचप्रकारे सुरक्षित ठेवले जाईल. विशेष म्हणजे, खरोखरच यहोवाने देवदूतांच्या माध्यमाने त्या माणसांना अडवले आणि अशारितीने लोटाच्या मुलींचे संरक्षण झाले.

१६, १७. (क) लोट कशाप्रकारे सदोमच्या माणसांना धक्का बसेल किंवा ते गोंधळात पडतील असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असावा? (ख) लोटने कसा विचार केला हे माहीत नसले तरी, आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१६ आणखी एका शक्यतेचा विचार करा. कदाचित, त्या माणसांना धक्का बसेल किंवा ते गोंधळात पडतील असे काहीतरी म्हणण्याचा लोटाचा इरादा असावा. सदोमच्या पुरुषांच्या समलिंगी वासनेमुळे आपल्या मुलींना ते नाहीतरी स्वीकारणार नाहीत असे गृहीत धरून कदाचित लोट चालला असेल. (यहुदा ७) शिवाय, शहरातल्याच दोन पुरुषांशी त्याच्या मुलींची मागणी झालेली होती; त्यामुळे त्याच्या भावी जावयांचे नातलग, मित्र किंवा व्यापारातील साथीदार त्या जमावात असतील. (उत्पत्ति १९:१४, NW) लोटाला कदाचित वाटले असेल, की जमावात असलेले आपल्या जावयांचे संबंधी नक्कीच आपल्या मुलींच्या समर्थनात काहीतरी बोलतील. आणि जमावात अशाप्रकारे मतभेद निर्माण झाल्यामुळे ते आपल्या मुलींना काही वाईट करणार नाहीत. *

१७ लोटने नेमका कसा विचार केला असावा आणि त्याचा नेमका हेतू काय होता हे आपल्याला माहीत नाही, पण एका गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो: यहोवा नेहमी जे योग्य तेच करतो, त्याअर्थी लोटला “नीतिमान” लेखण्याचे त्याच्याकडे निश्‍चितच चांगले कारण असावे. आणि सदोमच्या त्या पिसाळलेल्या जमावाची दुष्कृत्ये लक्षात घेतल्यावर त्या दुष्ट शहराच्या रहिवाशांचा त्याने जो नाश केला तो योग्यच होता याविषयी कोणी शंका घेऊ शकतो का?—उत्पत्ति १९:२३-२५.

यहोवाने उज्जाला ठार का मारले?

१८. (क) दाविदाने कराराचा कोश जेरूसलेमला आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय घडले? (ख) यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

१८ काहींना गोंधळात टाकणारा आणखी एक अहवाल, दाविदाने कराराचा कोश जेरूसलेमला आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय घडले याविषयीचा आहे. देवाचा कोश एका गाडीत ठेवण्यात आला. उज्जा व त्याचा भाऊ ती गाडी हाकीत होते. बायबल सांगते: “नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरिला. तेव्हा परमेश्‍वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्‍या चुकीमुळे परमेश्‍वराने त्यास ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला.” काही महिन्यांनंतर दुसऱ्‍यांदा कराराचा कोश नेण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा देवाने सांगितलेल्या पद्धतीने, कहाथवंशजांनी तो खांद्यावर उचलून नेला व यशस्वीरित्या तो नेण्यात आला. (२ शमुवेल ६:६, ७; गणना ४:१५; ७:९; १ इतिहास १५:१-१४) काहीजण म्हणतील, ‘उज्जा तर देवाच्या कोशालाच पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता, मग यहोवाने इतक्या कठोरपणे प्रतिक्रिया का व्यक्‍त केली?’ चुकीचा निष्कर्ष आपण काढू नये, म्हणून हा अहवाल समजून घेण्यास मदत करणारी काही माहिती आपण लक्षात घेतली पाहिजे.

१९. यहोवा अन्यायीपणे वागेल हे अशक्य आहे असे आपण का म्हणू शकतो?

१९ आपण आठवणीत ठेवले पाहिजे की यहोवा अन्यायीपणे वागेल हे शक्यच नाही. (ईयोब ३४:१०) असे करणे निश्‍चितच प्रेमळपणाचे कृत्य ठरणार नाही, आणि बायबलच्या आपल्या अभ्यासातून आपल्याला हे माहीत झाले आहे की “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) शिवाय, शास्त्रवचनांतून आपल्याला कळते की “नीति व न्याय ही [देवाच्या] राजासनाचा पाया आहेत.” (स्तोत्र ८९:१४) मग यहोवा अन्यायीपणे कसा वागू शकतो? जर त्याने असे केले तर त्याने आपल्याच सार्वभौमत्वाचा पाया ढासळवला असता.

२०. उज्जाला कोशाशी संबंधित नियमांविषयी माहिती का असायला हवी होती?

२० उज्जाला देवाच्या नियमशास्त्रात काय सांगितले आहे हे माहीत असायला हवे होते. कराराचा कोश यहोवाच्या उपस्थितीचे प्रतीक होते. नियमशास्त्रात स्पष्ट सांगितले होते की ज्यांना अधिकार देण्यात आलेला नव्हता त्यांनी कोशाला स्पर्श करू नये; केल्यास मृत्यूदंड दिला जाईल हे देखील स्पष्टपणे सांगितले होते. (गणना ४:१८-२०; ७:८९) त्यामुळे, या पवित्र कोशाला नेण्याचे कार्य क्षुल्लक समजण्यासारखे कार्य नव्हते. उज्जा (याजक नव्हता तरी) लेवीय वंशाचा होता, त्यामुळे त्याला नियमशास्त्र माहीत असायला हवे होते. शिवाय अनेक वर्षांपूर्वी कराराचा कोश सुरक्षित ठेवण्याकरता तो त्याच्या पित्याच्या घरात ठेवण्यात आला होता. (१ शमुवेल ६:२०-७:१) जवळजवळ ७० वर्षांपर्यंत तो तेथे ठेवला होता; यानंतर दाविदाने त्यास नेण्याचे ठरवले. तेव्हा, लहानपणापासून उज्जाला कोशाशी संबंधित नियमांची कल्पना होती.

२१. उज्जाच्या अहवालात, यहोवा मनातील हेतू पाहतो हे आठवणीत ठेवणे का महत्त्वाचे आहे?

२१ याआधी सांगितल्याप्रमाणे, यहोवा एका व्यक्‍तीच्या मनातले विचारही ओळखू शकतो. त्याच्या वचनात ज्याअर्थी उज्जाच्या कृत्याला “अनादरशील कृत्य” म्हणण्यात आले आहे त्याअर्थी यहोवाने त्याच्या मनातला स्वार्थी हेतू ओळखला असावा, ज्याविषयी या अहवालात स्पष्ट उल्लेख नाही. उज्जा स्वभावानेच गर्विष्ठ, मर्यादा ओलांडून वागण्याची सवय असलेला माणूस असावा का? (नीतिसूत्रे ११:२) आपल्या कुटंबाने ज्या कराराच्या कोशाचे संरक्षण केले होते तो चारचौघांसमोरून नेत असताना त्याला कदाचित याचा गर्व वाटला असावा का? (नीतिसूत्रे ८:१३) यहोवाच्या उपस्थितीचे प्रतीक असणाऱ्‍या पवित्र कोशाला सांभाळण्याकरता त्याचा हात तोकडा पडणार नाही हे त्याला माहीत नव्हते का, इतकाही त्याला विश्‍वास नव्हता का? काहीही असो, आपण खात्री बाळगू शकतो की यहोवाने योग्य तेच केले. त्याने उज्जाच्या अंतःकरणात असे काहीतरी पाहिले की ज्यामुळे तो लगेच त्याला शिक्षा देण्यास प्रवृत्त झाला.—नीतिसूत्रे २१:२.

खात्री बाळगण्याचे ठोस कारण

२२. देवाच्या वचनात काही माहिती दिलेली नाही यावरून यहोवाची बुद्धी कशाप्रकारे दिसून येते?

२२ यहोवाच्या वचनात काही अहवालांत विशिष्ट माहिती गाळलेली आहे यातून यहोवाची अतुलनीय बुद्धी दिसून येते. याद्वारे यहोवा आपल्याला हे दाखवण्याची संधी देतो की आपल्याला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. आपण येथे जे विचारात घेतले त्यावरून हेच स्पष्ट होत नाही का, की यहोवाचा न्याय स्वीकारण्याकरता आपल्याकडे ठोस कारणे आहेत? होय, आपण प्रामाणिक व खुल्या मनाने देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला यहोवाविषयी भरपूर ज्ञान मिळते; असे ज्ञान जे आपल्याला खात्री पटवून देते की यहोवा नेहमी जे न्याय्य व योग्य तेच करतो. तेव्हा, जर एखाद्या बायबल अहवालामुळे तुमच्या मनात प्रश्‍न उद्‌भवले आणि त्यांची उत्तरे लगेच तुम्हाला सापडली नाहीत तरीसुद्धा यहोवाने जे केले ते योग्यच होते असा पूर्ण भरवसा बाळगा.

२३. यहोवाच्या भविष्यातील कृत्यांविषयीही आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?

२३ यहोवाच्या भविष्यातील कृत्यांविषयीही आपण हाच भरवसा बाळगू शकतो. आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो की येणाऱ्‍या महासंकटात जेव्हा तो न्यायदंड बजावेल तेव्हा तो “दुर्जनांबरोबर नीतिमानाचाहि संहार” करणार नाही. (उत्पत्ति १८:२३) त्याला नीतिमत्त्व व न्याय प्रिय असल्यामुळे तो असे करूच शकत नाही. येणाऱ्‍या नव्या जगातही तो आपल्या सर्व गरजा सर्वात उत्तमप्रकारे पूर्ण करेल याचीही आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो.—स्तोत्र १४५:१६.

[तळटीपा]

^ परि. 15 अब्राहामाला अशी भीती वाटण्याचे कारण होते; एका प्राचीन पपायरस लेखात एका फारोविषयी सांगितले आहे की त्याने आपल्या शस्त्रधारी माणसांकडून एका रूपवान स्त्रीला जबरदस्तीने धरून आणले आणि तिच्या पतीला ठार मारले.

^ परि. 16 आणखी माहितीकरता टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९७९ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ ३१ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• कोणत्या कारणांमुळे आपण यहोवाचा न्याय स्वीकारावा?

• लोटाने संतप्त जमावाला आपल्या मुली देण्याचे सुचवले याविषयी अयोग्य निष्कर्ष काढण्याचे आपण कसे टाळू शकतो?

• यहोवाने उज्जाला का जिवे मारले हे समजून घेण्याकरता कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतात?

• भविष्यातील यहोवाच्या कृत्यांविषयी आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]