व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘कोणी तुला वेठीस धरल्यास’

‘कोणी तुला वेठीस धरल्यास’

‘कोणी तुला वेठीस धरल्यास’

“ए, इकडे ये! ते हातातलं काम टाक आणि आधी हे माझं सामान उचल.” पहिल्या शतकात एखादा यहुदी आपल्या कामात गर्क असताना एका रोमी सैनिकाने त्याला असे म्हटले असते, तर त्याची काय प्रतिक्रिया असती असे तुम्हाला वाटते? डोंगरावरील प्रवचनात येशूने असा सल्ला दिला: “जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्तय ५:४१) येशूचे बोलणे ऐकणाऱ्‍यांनी या सल्ल्याचा कसा अर्थ घ्यायचा होता? आणि याचे आपल्याकरता काय तात्पर्य आहे?

या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता आपल्याला जुन्या काळातल्या वेठबिगारीविषयी थोडी माहिती घ्यावी लागेल. ही प्रथा येशूच्या काळातल्या इस्राएली लोकांच्या चांगल्या परिचयाची होती.

वेठबिगार

जवळच्या पौर्वात्य देशांत सा.यु.पू १८ व्या शतकापासून वेठबिगारी (किंवा कॉर्वी) करवून घेतली जात होती असे दाखवणारा पुरावा उपलब्ध आहे. अलालाख नावाच्या प्राचीन सिरियन शहरातील प्रशासकीय लेखांत सरकारी अधिकाऱ्‍यांनी स्वतःची कामे करवून घेण्याकरता ठेवून घेतलेल्या बिगारी लोकांचा उल्लेख आहे. सिरियन किनारपट्टीवरील युगॅरिट शहरात, जमीनदारांच्या शेतांत काम करणाऱ्‍या कामगारांनाही अशाप्रकारेच सक्‍तीचे काम करावे लागत. फक्‍त राजाच एका व्यक्‍तीला अशा कामातून मुक्‍त करू शकत होता.

अर्थात, युद्धात पराजित झालेल्या किंवा गुलाम बनलेल्या राज्यातील लोकांकडूनही सहसा सक्‍तीची मजूरी करवून घेतली जायची. ईजिप्तच्या अंमलदारांनी इस्राएली लोकांना दास बनवून त्यांच्याकडून विटा तयार करण्याचे काम करवून घेतले. कालांतराने, इस्राएली लोकांनी प्रतिज्ञात देशात राहणाऱ्‍या कनानी रहिवाशांना आपले दास्य करायला लावले; दावीद व शलमोनाच्या राज्यातही वेठबिगारीची प्रथा प्रचलित होती.—निर्गम १:१३, १४; २ शमुवेल १२:३१; १ राजे ९:२०, २१.

इस्राएली लोकांनी राजाची मागणी केली तेव्हा शमुवेलाने राजाच्या हक्कांविषयी विश्‍लेषण केले. त्याने सांगितले की राजा आपल्या प्रजेतील माणसांना आपले रथ व घोडे यांची चाकरी करायला लावील, काहींना आपली शेते नांगरण्याच्या तर काहींना लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामाला लावील. (१ शमुवेल ८:४-१७) यहोवाच्या मंदिराच्या बांधकामादरम्यान विदेश्‍यांना सक्‍तीची मजूरी करायला लावण्यात आले, “पण इस्राएल लोकांपैकी कोणासहि शलमोनाने दास करून ठेविले नाही; ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापति आणि रथ व स्वार यावरचे अधिपति होते.”—१ राजे ९:२२.

बांधकाम प्रकल्पांत काम करणाऱ्‍या इस्राएलांविषयी १ राजे ५:१३, १४ यात सांगितले आहे: “शलमोन राजाने सर्व इस्राएलातल्या लोकांवर बिगार बसविली, ही बिगार तीस हजार मनुष्यांची होती. लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहादहा हजार बिगारी त्याने पाठविले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत.” एका विद्वानाने सांगितल्यानुसार, “बांधकामाच्या प्रकल्पांत तसेच आपल्या मालकीच्या जमिनींवर, मजूरी न देता काम करवून घेण्यासाठी इस्राएली व यहुदी राजांनी वेठबिगारीचा उपयोग केला यात शंका नाही.”

शलमोनाच्या राज्यात लोकांवर भारी ओझे लादण्यात आले होते. या अत्याचाराला लोक इतके कंटाळले की रहबामाने त्यांच्यावर आणखी ओझे लादण्याची धमकी दिली तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी बंड पुकारले आणि राजाने वेठीस लाविलेल्या लोकांची देखरेख करणाऱ्‍याकरता ज्याला नेमले होते, त्या अधिकाऱ्‍याला त्यांनी दगडमार करून ठार केले. (१ राजे १२:१२-१८) पण यामुळे ही प्रथा संपुष्टात आली नाही. रहबामाचा नातू, आसा याने गिबा व मिस्पा या शहरांच्या बांधणीच्या कार्याकरता यहूदातील सर्व लोकांना बोलावले, त्याने “कोणाला सोडिले नाही.”—१ राजे १५:२२.

रोमी शासनाखाली

डोंगरावरील प्रवचनावरून असे दिसून येते की पहिल्या शतकातील यहुद्यांना ‘वेठीस धरले जाण्याची’ कल्पना नवीन नव्हती. आगारेव्हो या ग्रीक शब्दाचे भाषांतर असलेली ही संज्ञा मुळात पर्शियन निरोप्यांच्या कामाशी संबंधित होती. सरकारी काम लवकरात लवकर करण्यासाठी माणसे, घोडे, जहाजे किंवा आणखी जे काही लागेल त्याचा उपयोग करण्याचा या निरोप्यांना अधिकार देण्यात आला होता.

येशूच्या काळात इस्राएलवर रोमी लोकांचे शासन होते आणि त्यांच्यामध्येही हा प्रघात होता. पौर्वात्य प्रांतांत नेहमीचे कर सरकारला देण्याव्यतिरिक्‍त, सर्वसाधारण लोकांकडून नियमितपणे किंवा एखाद्या वेळी अचानक सक्‍तीने काम करण्याची मागणी केली जाऊ शकत होती. साहजिकच लोकांना हे काम नकोसे वाटे. शिवाय, सरकारी अधिकाऱ्‍यांच्या प्रवासाकरता लोकांची जनावरे, गाड्या किंवा गाडी चालवणारी माणसे अनधिकृतपणे ताब्यात घेतले जाणे सर्वसामान्य होते. इतिहासकार मायकल रस्टॉफट्‌सिफ सांगतात, की प्रशासकांनी “[या प्रथेवर] नियंत्रण करण्याकरता काही नियम लादण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही; जोपर्यंत ही व्यवस्था अस्तित्वात राहिली तोपर्यंत तिचे दुष्परिणाम टाळता येण्यासारखे नव्हते. वेठबिगारीच्या व्यवस्थेमुळे लोकांवर होणारा जुलूम व अत्याचार बंद करण्याच्या प्रामाणिक हेतूने अधिकाऱ्‍यांनी कितीतरी कायदे बनवले . . . पण तरीसुद्धा या प्रथेतून लोकांवर अत्याचार होतच राहिला.”

एक ग्रीक विद्वान सांगतात, की “सैनिकांचे सामानसुमान विशिष्ट अंतरापर्यंत उचलण्याकरता कोणालाही वेठीस धरले जाऊ शकत होते; तसेच अंमलदारांनी दिलेले कोणतेही काम करण्याची कोणत्याही माणसावर सक्‍ती केली जाऊ शकत होती.” हेच शिमोन नावाच्या कुरेनेकर मनुष्याच्या बाबतीत घडले. रोमी शिपायांनी त्याला येशूचा वधस्तंभ वाहण्याकरता “वेठीस धरले.”—मत्तय २७:३२.

रब्बींच्या लिखाणांतही या अनिष्ट प्रथेचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ, एका रब्बीला मर्टल नावाची सुगंधी वनस्पती एका राजवाड्यात नेण्याकरता वेठीस धरण्यात आले. कधीकधी मजूरांना त्यांच्या मालकांकडून घेऊन इतर कामे करण्यास लावले जायचे. मालकांना मात्र त्यांच्या मजूरांना ठरल्याप्रमाणे मजूरी द्यावी लागत. सामान वाहून नेणाऱ्‍या जनावरांना किंवा बैलांना जबरदस्तीने ताब्यात घेतले जाऊ शकत होते. यदाकदाचित ते परत करण्यात आलेच, तर तोपर्यंत ते आणखी काम करण्याच्या लायक नसत. त्यामुळे वेठीस धरणे हे जवळजवळ हडप करण्यासारखेच होते. एका यहुदी म्हणीप्रमाणे “आगारिया म्हणजे साक्षात मृत्यू.” एक इतिहासकार सांगतो: “ओझे वाहण्याकरता असलेल्या जनावरांऐवजी नांगरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या बैलांना बळजबरीने नेल्यामुळे कधीकधी सबंध गाव उजाड व्हायचे.”

अशा सक्‍तीच्या कामाचा लोकांना किती तिटकारा वाटत असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता; त्यातल्या त्यात ही कामे करवून घेणारे सहसा लोकांशी उद्धटपणे वागत व त्यांच्यावर अन्याय करत. यहुद्यांना नाहीतरी त्यांच्यावर प्रभुत्व करणाऱ्‍या विदेशी लोकांबद्दल द्वेष होता; त्यात, अशाप्रकारचे जबरदस्तीचे काम करावे लागण्याचा नाईलाज असल्यामुळे ते त्यांचा आणखीनच राग करायचे. एका नागरिकाला ओझे वाहून नेण्याकरता कितपत भाग पाडले जाऊ शकत होते हे त्याकाळच्या ज्ञात असलेल्या कोणत्याही कायद्यावरून आपल्याला कळायला मार्ग नाही. साहजिकच कायद्यानुसार जे आवश्‍यक होते त्यापेक्षा एकही पाऊल पुढे जाण्यास बहुतेक लोक तयार नसतील.

पण याच प्रथेच्या संदर्भात येशूने म्हटले: “जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्तय ५:४१) येशूचे हे बोलणे कदाचित बऱ्‍याचजणांना पटले नसेल. पण त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता?

ख्रिश्‍चनांनी कशी प्रतिक्रिया व्यक्‍त करावी?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, येशू आपल्या श्रोत्यांना हे सांगत होता की जर एखाद्या अधिकाऱ्‍याने त्यांना कायदेशीर सेवा करण्यास भाग पाडले तर त्यांनी ती स्वखुषीने व कोणताही राग न बाळगता करावी. त्यांना “कैसराचे ते कैसराला” द्यायचे होते; अर्थात ‘जे देवाचे आहे ते देवाला’ देण्याकडे दुर्लक्ष न करता.—मार्क १२:१७. *

शिवाय, प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना अशी आज्ञा केली: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो; तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; . . . जर तू वाईट करिशील तर त्याची भीति बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करीत नाही.”—रोमकर १३:१-४.

अशाप्रकारे राजाच्या किंवा सरकारच्या मागण्या पूर्ण न करणाऱ्‍यांना शिक्षा देण्याचा त्यांना अधिकार असल्याचे येशूने व पौलाने कबूल केले. कोणत्या प्रकारची शिक्षा? सा.यु. पहिल्या व दुसऱ्‍या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्टेटस याचे उत्तर पुरवतो: “अचानक एखाद्या सैनिकाने तुमच्या गाढवाची मागणी केल्यास, त्याला ते नेऊ द्या. प्रतिकार करू नका, कुरकूर करून नका नाहीतर तुम्हाला फटकेही खावे लागतील आणि गाढवही हातून जाईल.”

अर्थात प्राचीन व आधुनिक काळातही काही प्रसंग असे उद्‌भवतात की जेव्हा ख्रिस्ती व्यक्‍तींच्या विवेकबुद्धीने त्यांना सरकारच्या मागण्या पूर्ण करण्याची परवानगी दिली नाही. काहीवेळा याचे अतिशय गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले. काही ख्रिश्‍चनांना तर मृत्यूही पत्करावा लागला. इतरांनी जी कार्ये त्यांच्या तटस्थ भूमिकेच्या विरुद्ध होती ती करण्यास नकार दिल्यामुळे अनेक वर्षे तुरुंगात काढली आहे. (यशया २:४; योहान १७:१६; १८:३६) इतर प्रसंगी, ख्रिश्‍चनांना सरकारच्या मागण्या पूर्ण करण्यात काही गैर आढळले नाही. उदाहरणार्थ, नागरिक प्रशासनाच्या हाताखाली सार्वजनिक कल्याणासाठी विविध सेवा करण्यात काही ख्रिस्ती शुद्ध विवेकबुद्धीने सहभागी होतात. वयोवृद्धांना किंवा अपंगांना साहाय्य, अग्नीशामक दलासोबत कार्य, समुद्रकिनाऱ्‍याची स्वच्छता करण्याचे काम, अथवा बगिचे, अरण्ये किंवा ग्रंथालय यांत काम करणे इत्यादी.

साहजिकच प्रत्येक देशातील परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे कोणतीही मागणी पूर्ण करावी किंवा नाही हे ठरवताना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने बायबलनुसार प्रशिक्षित केलेल्या आपल्या विवेकाचे साहाय्य घ्यावे.

दोन कोस जाणे

कायदेशीर मागण्या स्वखुषीने पूर्ण करण्याचे जे तत्त्व येशूने शिकवले ते केवळ सरकारच्या मागण्यांच्या संदर्भात नव्हे तर दररोजच्या व्यवहारांतही समर्पक आहे. उदाहरणार्थ, अधिकारपदी असलेली एखादी व्यक्‍ती तुम्हाला एखादे काम करण्यास सांगते असे समजा. कदाचित ते काम करण्याची तुमची मुळात इच्छा नसेल, पण ते देवाच्या नियमांच्या विरोधातही नाही. मग अशावेळी तुमची काय प्रतिक्रिया असेल? कदाचित तुम्ही विचार कराल, की या कामासाठी मी माझा वेळ व शक्‍ती का खर्च करावी? आणि त्यामुळे तुम्ही चिडून प्रतिक्रिया व्यक्‍त कराल. परिणामस्वरूप, वितुष्ट निर्माण होईल. याउलट जर तुम्ही कसेतरी दातओठ खात ते सांगितलेले काम केले तर तुमची मानसिक शांती तुम्ही गमावून बसाल. मग यावर काय उपाय आहे? येशूने सांगितल्याप्रमाणे करा—एक कोस जाण्याची मागणी केली असता, दोन कोस जा. तुम्हाला जे करायला सांगितले आहे, केवळ तेच करू नका तर त्याहीपेक्षा जास्त करा. आणि ते स्वखुषीने करा. अशी मानसिकता बाळगल्यास, कोणीतरी आपला फायदा उचलतोय असेही तुम्हाला वाटणार नाही, शिवाय तुम्ही आपल्या मनाप्रमाणे ते काम करू शकाल.

एक लेखक म्हणतो, “बरेच जण आयुष्यभर केवळ तीच कामं करतात की जी करण्यास त्यांना भाग पाडले जाते. अशा लोकांकरता जीवन एक खडतर प्रवास ठरतो आणि कधीही पाहावे तर ते थकलेले दिसतात. इतरजण मात्र, निव्वळ कर्तव्याची मर्यादा पार करतात आणि स्वखुषीने इतरांची सेवा करतात.” सांगण्याचे तात्पर्य असे, की जबरदस्तीने एकच कोस जावे अथवा स्वखुषीने दोन कोस जावे या दोन्हीत निवड करता येईल असे अनेक प्रसंग आपल्यासमोर येतात. पहिल्या परिस्थितीत एक व्यक्‍ती केवळ आपल्या हक्कांचा विचार करते. दुसरा पर्याय निवडल्यास त्या व्यक्‍तीला अतिशय समाधानदायक अनुभव येऊ शकतात. तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्‍ती आहात? जर आपल्या कार्यांकडे केवळ कर्तव्य, किंवा नाईलाज या दृष्टीने पाहण्याऐवजी तुम्ही असा विचार केला की मला हे कार्य करायचे आहे तर तुम्हाला खूप आनंद व सफलता अनुभवता येईल.

आणि जर तुम्ही स्वतः अधिकारपदी असलेली व्यक्‍ती असाल तर? मग शिकण्यासारखा धडा हा आहे, की आपल्या अधिकाराचा वापर इतरांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काही करायला लावण्याकरता करणे हे प्रेमळपणाचे नाही आणि ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभणारेही नाही. येशूने म्हटले: “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकहि अधिकार करितात.” पण ही ख्रिस्ती पद्धत नाही. (मत्तय २०:२५, २६) अधिकाराच्या बळावर कामे करवून घेता येतात; पण तेच जर प्रेमळपणे योग्य विनंत्या केल्या आणि त्यांना आदरपूर्वक व आनंदाने प्रतिसाद मिळाला तर सर्व संबंधित व्यक्‍तींमध्ये किती उत्तम नातेसंबंध कायम राहतील! होय एकाऐवजी दोन कोस जाण्याची तयारी दाखवल्यास तुमचे जीवन खरोखर समाधानदायक ठरेल.

[तळटीप]

^ परि. 18 “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या” हे शब्द ख्रिस्ती लोकांना कोणत्या अर्थाने लागू होतात याची सविस्तर चर्चा टेहळणी बुरूज, मे १, १९९६ अंकात पृष्ठे १५-२० वर केली आहे.

[२५ पानांवरील चौकट]

वेठबिगार प्रथेचा प्राचीन काळी होणारा दुरुपयोग

वेठबिगारीशी संबंधित असलेल्या अत्याचारांना आळा घालण्याकरता जे नियम वेळोवेळी स्थापित करण्यात आले त्यांवरून दिसून येते की या प्रथेचा सहसा लोकांकडून कामे करवून घेण्यासाठी दुरुपयोग केला जात असावा. सा.यु.पू. ११८ साली ईजिप्तच्या टोलमी युअरजटीज याने असा नियम बनवला की त्याच्या अधिकाऱ्‍यांनी “कोणत्याही नागरिकास आपल्या वैयक्‍तिक कामांसाठी वेठीस धरू नये किंवा स्वतःच्या उपयोगासाठी त्यांच्या गुराढोरांची मागणी (आगारेयन) करू नये.” तसेच: “स्वतःच्या उपयोगासाठी कोणीही कोणत्याही कारणाने बोटींची . . . मागणी करू नये.” ईजिप्तच्या, महान मरुवनाच्या मंदिरात सा.यु. ४९ सालच्या एका लेखात रोमी अधिकारी व्हरगीलीअस कॅपीटो याने कबूल केले सैनिकांनी लोकांकडून बेकायदेशीर मागण्या केल्या होत्या. आणि त्याने असा नियम स्थापित केला की “माझ्याकडून लेखी परवानगी मिळवल्याशिवाय कोणाकडूनही कोणतीही वस्तू घेऊ नये किंवा तिची मागणी करू नये.”

[२४ पानांवरील चित्र]

शिमोन नावाच्या कुरेनेकर मनुष्याला वेठीस धरण्यात आले होते

[२६ पानांवरील चित्र]

अनेक साक्षीदारांना आपल्या ख्रिस्ती भूमिकेविषयी खंबीर राहिल्यामुळे तुरुंगवास झाला