व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगा!

ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगा!

ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगा!

“जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्‍वराविषयी तो बाळगावा.”१ करिंथकर १:३१.

१. धर्माप्रती लोकांमध्ये अलीकडे कशाप्रकारची मनोवृत्ती दिसून येत आहे?

“धार्मिक अनास्था.” धर्मविषयक बाबींच्या एका भाष्यकाराने अलीकडेच लोकांच्या आपल्या धर्माप्रती असलेल्या मनोवृत्तीविषयी टिपणी करताना ही संज्ञा वापरली. ते म्हणाले: “आधुनिक काळात धर्माप्रती लोकांमध्ये एक नवीनच प्रवृत्ती पाहायला मिळते. हिचे वर्णन धार्मिक अनास्था असे करता येईल.” याविषयी अधिक खुलासा करताना ते म्हणाले की लोकांना “स्वतःच्या धर्माबद्दल तितकिशी आस्था राहिलेली नाही असे दिसून येते.” त्यांच्या मते, बऱ्‍याच लोकांचा “देवावर विश्‍वास आहे . . . ; पण ते त्याच्याविषयी फारसा विचार करत नाहीत.”

२. (क) धर्माप्रती लोक उदासीन बनले आहेत ही आश्‍चर्याची बाब का नाही? (ख) बेपर्वा मनोवृत्ती ख्रिश्‍चनांकरता धोक्याची का आहे?

ही अनास्था पाहिल्यावर बायबलचा अभ्यास करणाऱ्‍यांना आश्‍चर्य वाटत नाही. (लूक १८:८) सर्वसामान्यपणे धर्माचा विचार केल्यास अशी अनास्था अपेक्षितच आहे. खोट्या धर्माने मानवजातीला शतकानुशतके पथभ्रष्ट केले आहे व त्यांची निराशा केली आहे. (प्रकटीकरण १७:१५, १६) पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत पाहू जाता, सर्वत्र दिसणारी ही बेपर्वा वृत्ती आणि आवेशाची उणीव धोकादायक ठरू शकते. आपण आपल्या विश्‍वासांविषयी अशी उदासीन मनोवृत्ती बाळगू शकत नाही; देवाच्या सेवेकरता व बायबलमधील सत्याकरता आपला आवेश मंदावून चालणार नाही. येशूने अशा निरुत्साही मनोवृत्तीसंबंधी पहिल्या शतकातील लावदिकिया मंडळीला असा इशारा दिला: “तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू . . . कोमट आहेस.”—प्रकटीकरण ३:१५-१८.

आपण कोण आहोत हे ओळखणे

३. ख्रिस्ती स्वतःविषयी कोणत्या गोष्टींचा अभिमान बाळगू शकतात?

आध्यात्मिक अनास्थेला तोंड देण्याकरता, ख्रिश्‍चनांनी आपण कोण आहोत याची जाणीव बाळगली पाहिजे; आणि त्याविषयी काही अंशी अभिमान देखील बाळगला पाहिजे. यहोवाचे सेवक आणि ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने बायबलमध्ये आपले निरनिराळ्या प्रकारे वर्णन करण्यात आले आहे. आपण यहोवाचे “साक्षी” आहोत; आणि “देवाचे सहकारी” या नात्याने कार्य करत असताना इतरांना आवेशाने “सुवार्ता” सांगत असतो. (यशया ४३:१०; १ करिंथकर ३:९; मत्तय २४:१४) आपण “एकमेकांवर प्रीति” करणारे लोक आहोत. (योहान १३:३४) खरे ख्रिस्ती अशा व्यक्‍तींपैकी आहेत की “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.” (इब्री लोकांस ५:१४) आपण ‘जगात ज्योतीसारखे’ आहोत. (फिलिप्पैकर २:१५) आपण नेहमी “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले” ठेवण्यास झटतो.—१ पेत्र २:१२; २ पेत्र ३:११, १४.

४. आपण कोणासारखे नाही हे यहोवाचा एक उपासक कसे ठरवू शकतो?

आपण कोण नाही याचीही यहोवाचे खरे उपासक जाणीव राखतात. आपला नेता येशू ख्रिस्त याच्यासारखेच ते देखील “जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) ‘ज्यांच्यात अज्ञान उत्पन्‍न होऊन जे देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत’ अशा ‘परराष्ट्रीयांपासून’ ते अलिप्त राहतात. (इफिसकर ४:१७, १८) परिणामस्वरूप, येशूचे अनुयायी “अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्‍तीने” वागतात.—तीत २:१२, १३.

५. ‘परमेश्‍वराविषयी अभिमान बाळगण्याचा’ काय अर्थ होतो?

आपण कोण आहोत व सबंध विश्‍वाच्या सार्वभौम प्रभू यहोवाशी आपले काय नाते आहे हे स्पष्टपणे ओळखल्यास आपण आपोआपच ‘परमेश्‍वराविषयी अभिमान बाळगण्यास’ प्रवृत्त होऊ. (१ करिंथकर १:३१) हा कोणत्या प्रकारचा अभिमान आहे? खरे ख्रिस्ती या नात्याने यहोवा आपला देव आहे याविषयी आपल्याला अभिमान वाटतो. आपण देवाच्या या आज्ञेचे पालन करतो की “[अभिमान] बाळगावयाचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्‍वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा.” (यिर्मया ९:२४) आपल्याला देवाची ओळख घडली आणि इतरांना मदत करण्याकरता तो आपला उपयोग करून घेत आहे याचा आपण “अभिमान” बाळगतो.

हे सोपे नाही

६. ख्रिस्ती या नात्याने आपण कोण आहोत याविषयीची सुस्पष्ट जाणीव सतत मनात बाळगणे काहींना कठीण का जाते?

पण ख्रिस्ती या नात्याने आपण कोण आहोत याची सुस्पष्ट जाणीव सतत बाळगून चालणे तितके सोपे नाही हे कबूल करावे लागेल. ख्रिस्ती कुटुंबातच लहानाचा मोठा झालेला एक तरुण यासंदर्भात आपला अनुभव सांगतो. एकेकाळी तो निदान काही काळपर्यंत आध्यात्मिकरित्या कमजोर झाला होता. तो सांगतो “काहीवेळा, मी एक यहोवाचा साक्षीदार का आहे हे देखील मला कळायचे नाही. अगदी लहानपणापासून मी सत्यात होतो. कधीकधी मला वाटायचे की हा देखील इतर सुस्थापित धर्मांसारखाच आणखी एक धर्म आहे.” इतरांनी कदाचित, मनोरंजन विश्‍व, प्रसार माध्यमे आणि जीवनाविषयीचा लोकांचा सर्वसामान्य दृष्टिकोन यांसारख्या गोष्टींचा स्वतःवर प्रभाव पडू दिल्यामुळे, आपण कोण आहोत याविषयीची त्यांची जाणीव अस्पष्ट झाली असेल. (इफिसकर २:२, ३) काही ख्रिस्ती अधूनमधून स्वतःविषयी साशंक होतात आणि आपण जीवनात ज्या गोष्टींना महत्त्व देतो, जी ध्येये आपण ठेवली आहेत ती खरोखरच योग्य आहेत किंवा नाहीत याविषयी पुनर्विचार करू लागतात.

७. (क) देवाच्या सेवकांनी कोणत्या प्रकारचे आत्मपरीक्षण करणे योग्य आहे? (ख) यासंदर्भात कोणता धोका लक्षात घेतला पाहिजे?

वेळोवेळी विचारपूर्वक आत्मपरीक्षण करणे अयोग्य आहे का? नाही. पौलानेही ख्रिश्‍चनांना स्वतःचे परीक्षण करत राहण्याचे उत्तेजन दिले होते हे तुम्हाला आठवत असेल. तो म्हणाला: “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा [“करत राहा,” NW]; आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथकर १३:५) काळाच्या ओघात आपल्या व्यक्‍तिमत्त्वात एखादा आध्यात्मिक दोष उत्पन्‍न झाला असल्यास तो शोधून काढण्याच्या व दुरुस्त करण्याच्या हेतूने आत्मपरीक्षण करण्याचे प्रेषित पौल या ठिकाणी उत्तेजन देत होता. आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याविषयी परीक्षा करताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीने आपले वागणेबोलणे आपल्या विश्‍वासांच्या सामंजस्यात आहे किंवा नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आत्मपरीक्षणाचा वेगळाच अर्थ लावून जर आपण स्वतःचे “व्यक्‍तित्ववैशिष्ठ्य” स्थापित करण्याच्या उद्देशाने आत्मपरीक्षण करू लागलो; किंवा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाशी अथवा ख्रिस्ती मंडळीशी संबंधित नसलेली उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो तर अशाप्रकारचे आत्मपरीक्षण निरर्थक ठरू शकते आणि आध्यात्मिकरित्या नाशकारक देखील. * आपण असे काहीही करू इच्छित नाही की ज्यामुळे आपले ‘विश्‍वासरूपी तारू फुटेल!’—१ तीमथ्य १:१९.

आव्हाने आपल्यासमोरही येतात

८, ९. (क) मोशेने आपली आत्मविश्‍वासाची उणीव कशी व्यक्‍त केली? (ख) मोशेच्या कमीपणाच्या भावनांना यहोवाने कशाप्रकारे प्रतिसाद दिला? (ग) यहोवाच्या आश्‍वासनांचा तुमच्यावर कसा परिणाम झाला?

स्वतःविषयी ज्यांना कधीकधी शंका वाटते त्यांनी असा निष्कर्ष काढावा का, की आपण आध्यात्मिक जीवनात अपयशी ठरलो आहोत? मुळीच नाही! किंबहुना, या भावना नवीन नाहीत, तर पुरातन काळातल्या देवाच्या विश्‍वासू सेवकांनाही त्यांना तोंड द्यावे लागले होते हे जाणणे त्यांच्याकरता सांत्वनदायक ठरू शकते. उदाहरणार्थ मोशेचा विचार करा. त्याने असामान्य विश्‍वास, निष्ठा व भक्‍तिभाव दाखवला. पण अतिशय कठीण भासणारे कार्य त्याच्यावर सोपवण्यात आले तेव्हा तो कचरला व म्हणाला “मी कोण?” (निर्गम ३:११) अर्थातच, मनातल्या मनात तो असा विचार करत होता, की ‘मी अगदीच सर्वसामान्य आहे!’ किंवा ‘मी लायक नाही!’ मोशेच्या जीवनातील पूर्वीच्या अनुभवांमुळे कदाचित त्याला अशा कमीपणाच्या भावना आल्या असाव्यात: जसे की तो अशा एका राष्ट्राचा सदस्य होता, की जे गुलाम होते. इस्राएल लोकांनी त्याला झिडकारले होते. तो बोलण्यात निपुण नव्हता. (निर्गम १:१३, १४; २:११-१४; ४:१०) तो एक मेंढपाळ होता. इजिप्शियन लोकांना हा धंदा अगदीच किळसवाणा वाटे. (उत्पत्ति ४६:३४) या सर्व कारणांमुळे, देवाच्या लोकांना दास्यातून सोडवण्याची जबाबदारी स्वीकारण्यास आपण लायक नाही असे मोशेला का वाटले हे आपण समजू शकतो.

यहोवाने मोशेला दोन जबरदस्त आश्‍वासने देऊन त्याचे मनोबल वाढवले: “खचित मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठविले याची तुला खूण हीच. तू लोकांस मिसरांतून काढून आणिल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.” (निर्गम ३:१२) मोशेला आत्मविश्‍वास नव्हता पण देव त्याला सांगत होता की मी सदोदीत तुझ्यासोबत असेन. शिवाय, यहोवा येथे असेही आश्‍वासन देत होता की आपल्या लोकांची मी कोणत्याही परिस्थितीत सुटका करेन. त्यानंतरच्या शतकांतही देवाने अशी अनेक आश्‍वासने पुरवली. उदाहरणार्थ, इस्राएल राष्ट्र प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेच्याद्वारे त्याने त्यांना सांगितले: “खंबीर हो, हिंमत धर, . . . कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्‍वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही.” (अनुवाद ३१:६) यहोशवालाही यहोवाने अशी हमी दिली: “तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; . . . तुझ्याबरोबरहि मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (यहोशवा १:५) ख्रिश्‍चनांनाही तो हेच वचन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्री लोकांस १३:५) इतका मोठा आधार लाभल्यावर ख्रिस्ती असण्याचा आपल्याला निश्‍चितच अभिमान वाटायला हवा!

१०, ११. यहोवाच्या सेवेची कदर बाळगण्यासंबंधी योग्य मनोवृत्ती बाळगण्यास लेवी असणाऱ्‍या आसाफाला कशाप्रकारे मदत मिळाली?

१० मोशेनंतर जवळजवळ पाच शतके उलटल्यावर, आसाफ नावाच्या एका विश्‍वासू लेव्याने अगदी प्रामाणिकपणे आपल्याला वाटणाऱ्‍या शंकांविषयी लिहिले. सरळ मार्गावर चालत राहण्यात खरोखर अर्थ आहे का याविषयी तो साशंक झाला होता. तो अनेक परीक्षांशी व मोहांशी झगडत देवाला विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करत होता; पण काहीजण मात्र देवाची निंदा करतात आणि तरीसुद्धा समाजात ते दिवसेंदिवस अधिक प्रतिष्ठित व समृद्ध होत जातात हे आसाफने पाहिले. याचा आसाफवर कसा परिणाम झाला? तो कबूल करतो, “माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.” यहोवाचा उपासक असण्याचा काय उपयोग असेही त्याला वाटू लागले. त्याने विचार केला, “मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ; कारण मी दिवसभर पीडा भोगिली आहे.”—स्तोत्र ७३:२, ३, १३, १४.

११ या अस्वस्थ करणाऱ्‍या भावनांना आसाफने कसे तोंड दिले? त्याने त्यांकडे दुर्लक्ष केले का? नाही. तर त्याने प्रार्थनेत त्या देवाजवळ व्यक्‍त केल्या, जसे आपण ७३ व्या स्तोत्रात वाचतो. आसाफने देवाच्या मंदिराला भेट दिली तेव्हा त्याच्या मनोवृत्तीत लक्षणीय बदल घडून आला. तेथे त्याला जाणीव झाली की देवाची उपासना करणे हाच जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे. पुन्हा एकदा झालेल्या या आध्यात्मिक जाणीवेमुळे त्याला समजले की यहोवाला दुष्टाईची घृणा वाटते आणि योग्य वेळी दुष्टांना शिक्षा मिळेल. (स्तोत्र ७३:१७-१९) अशा रितीने, आपल्याला यहोवाचा सेवक बनण्याचा केवढा मोठा बहुमान मिळाला आहे, या सुस्पष्ट जाणीवेने आसाफाला बळकटी मिळाली. तो देवाला म्हणाला: “मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखविशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करिशील.” (स्तोत्र ७३:२३, २४) आसाफ पुन्हा पूर्वीसारखाच देवाविषयी अभिमान बाळगू लागला.—स्तोत्र ३४:२.

आपण कोण आहोत याची त्यांनी सतत जाणीव ठेवली

१२, १३. देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी अभिमान बाळगणाऱ्‍या बायबलमधील काही व्यक्‍तींची उदाहरणे द्या.

१२ आपण ख्रिस्ती आहोत या गोष्टीची कदर वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे अशा निष्ठावान उपासकांच्या विश्‍वासाचे परीक्षण व अनुकरण करणे, की ज्यांनी संकटांना तोंड देतानाही देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी अभिमान बाळगला. याकोबाचा मुलगा योसेफ याचे उदाहरण घ्या. अगदी कोवळ्या वयात त्याच्याशी विश्‍वासघात करण्यात आला व त्याला एक गुलाम म्हणून विकण्यात आले; त्याला त्याच्या देवभीरू पित्यापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी, ईजिप्तमध्ये नेण्यात आले जेथे त्याची आपली माणसे नव्हती, कुटुंबियांचा आधार नव्हता. ईजिप्तमध्ये असताना, ईश्‍वरी सल्ला मिळवण्याकरता तो कोणत्याही मनुष्याकडे जाऊ शकत नव्हता; शिवाय त्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले की जिच्यामुळे त्याची नीतिमत्ता आणि देवावरच्या त्याच्या भरवशाची परीक्षा झाली. पण आपण देवाचे सेवक आहोत ही जाणीव सतत मनात बाळगण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला आणि जे योग्य आहे हे त्याला माहीत होते त्याचे त्याने विश्‍वासूपणे पालन केले. प्रतिकूल परिस्थितीही त्याला यहोवाचा उपासक असण्याचा अभिमान होता आणि आपल्या भावना त्याने बेधडक व्यक्‍त केल्या.—उत्पत्ति ३९:७-१०.

१३ जवळजवळ आठ शतकांनंतर सिरियन सेनाधीश नामान याची गुलाम बनलेली एक बंदिवान इस्राएली मुलगी होती; या मुलीनेही आपण यहोवाचे उपासक आहोत याचा विसर पडू दिला नाही. संधी मिळताच तिने, यहोवाविषयी साक्ष दिली. अलीशा हा खऱ्‍या देवाचा संदेष्टा आहे असे तिने सांगितले. (२ राजे ५:१-१९) यानंतर कित्येक वर्षांनंतर योशिया नावाचा एक राजा होता. तो अद्याप लहानच होता आणि तेव्हाचे वातावरण अतिशय भ्रष्ट होते, तरीपण योशियाने अनेक धार्मिक सुधार घडवून आणले, देवाच्या मंदिराची दुरुस्ती केली आणि राष्ट्राला पुन्हा यहोवाकडे परत नेले. आपला विश्‍वास व उपासना याविषयी त्याला अभिमान होता. (२ इतिहास, अध्याय ३४, ३५) दानीएल व त्याचे तीन इब्री साथीदार, बॅबेलोनमध्ये असताना आपण यहोवाचे सेवक आहोत हे ते क्षणभरही विसरले नाही; त्यांच्यावर दबाव आला व मोहात पाडणारे प्रसंग उद्‌भवले तरीसुद्धा त्यांनी हातमिळवणी केली नाही. यहोवाचे सेवक असण्याचा त्यांना निश्‍चितच अभिमान होता.—दानीएल १:८-१०.

ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगा

१४, १५. ख्रिस्ती असण्याविषयी अभिमान बाळगण्याचा काय अर्थ होतो?

१४ देवाचे हे सेवक यशस्वी ठरले कारण देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी त्यांनी योग्य प्रकारचा अभिमान बाळगला. आज आपल्याविषयी काय? ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगण्यात कशाचा समावेश आहे?

१५ सर्वप्रथम, यात यहोवाचे नाव धारण केलेल्या लोकांपैकी असण्याविषयी, त्याचे आशीर्वाद व संमती लाभल्याविषयी मनःपूर्वक कदर असण्याचा समावेश आहे. आपल्या लोकांना यहोवा चांगल्याप्रकारे ओळखतो. प्रेषित पौल धार्मिक वर्तुळात बराच गोंधळ असलेल्या एका काळात राहात होता, त्याने लिहिले: “प्रभु आपले जे आहेत त्यांना ओळखतो.” (२ तीमथ्य २:१९; गणना १६:५) ‘जे आपले आहेत’ त्यांच्याविषयी यहोवाला अभिमान वाटतो. तो असे घोषित करतो: “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो [माझ्या] डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जखऱ्‍या २:८) यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे याविषयी काहीही शंका नाही. तेव्हा आपला त्याच्यासोबतचा नातेसंबंध देखील त्याच्याबद्दल वाटणाऱ्‍या गहिऱ्‍या प्रेमावर आधारित असावा. पौलाने लिहिले: “जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.”—१ करिंथकर ८:३.

१६, १७. लहानमोठे सर्व ख्रिस्तीजन आपल्या आध्यात्मिक वारशाबद्दल अभिमान का बाळगू शकतात?

१६ जे यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबातच लहानाचे मोठे झाले आहेत अशा तरुणांनी परीक्षण करून पाहिले पाहिजे की देवासोबत घनिष्ठ वैयक्‍तिक नातेसंबंध असल्यामुळे ख्रिस्ती असण्याविषयीची त्यांची जाणीव दिवसेंदिवस बळावत चालली आहे किंवा नाही. ते आपल्या आईवडिलांच्या विश्‍वासावर विसंबून राहू शकत नाहीत. देवाच्या प्रत्येक सेवकाबद्दल पौलाने असे लिहिले: “तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्‍न आहे.” म्हणूनच पौल पुढे म्हणतो: “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:४, १२) साहजिकच, केवळ कौटुंबिक परंपरा पुढे चालवण्याकरता जर कोणी यहोवाचा उपासक असेल, तर तो यहोवासोबत एक घनिष्ठ, दीर्घकालीन नातेसंबंध राखू शकत नाही.

१७ सबंध इतिहासात, यहोवाचे अनेक साक्षीदार होऊन गेले आहेत. जवळजवळ ६० शतकांआधी होऊन गेलेल्या विश्‍वासू हाबेलापासून आधुनिक काळातील साक्षीदारांच्या ‘मोठ्या लोकसमुदापर्यंत’ आणि भविष्यातही यहोवाचे असंख्य उपासक सार्वकालिक आशीर्वादांचा उपभोग घेतील. (प्रकटीकरण ७:९; इब्री लोकांस ११:४) विश्‍वासू उपासकांच्या या यादीत आपण सगळ्यात अलीकडचे आहोत. किती समृद्ध असा आध्यात्मिक वारसा आपल्याला लाभला आहे!

१८. आपले आदर्श व स्तर, या जगापासून आपण वेगळे आहोत हे कशाप्रकारे दाखवतात?

१८ ख्रिस्ती असण्यात, त्या सर्व आदर्शांचा, गुणांचा, स्तरांचा व वैशिष्ट्यांचाही समावेश आहे की ज्यांमुळे आपण ख्रिस्ती म्हणून ओळखले जातो. हाच “मार्ग” आहे, यशस्वीरित्या जगण्याचा व देवाला संतुष्ट करण्याचा एकमेव मार्ग. (प्रेषितांची कृत्ये ९:२; इफिसकर ४:२२-२४) ख्रिस्ती ‘सर्व गोष्टींची पारख करतात’ आणि ‘चांगले ते बळकट धरतात.’ (१ थेस्सलनीकाकर ५:२१) खरा ख्रिस्ती विश्‍वास आणि देवापासून विलग झालेल्या या जगात किती मोठे अंतर आहे हे आपण स्पष्टपणे ओळखतो. खऱ्‍या व खोट्या उपासनेत यहोवा स्पष्टपणे फरक दाखवतो. आपला संदेष्टा मलाखी याच्याद्वारे त्याने असे घोषित केले: “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.”—मलाखी ३:१८.

१९. खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत कोणती गोष्ट कधीही घडणार नाही?

१९ या गोंधळलेल्या जगात यहोवाबद्दल अभिमान बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग आपल्या देवाबद्दल आणि ख्रिस्ती असण्याबद्दल योग्य प्रकारचा अभिमान बाळगण्यास कशामुळे आपल्याला साहाय्य मिळेल? पुढील लेखात काही साहाय्यक सूचना दिल्या आहेत. या सूचना विचारात घेत असताना तुम्ही खात्री बाळगू शकता की खरे ख्रिस्ती कधीही ‘धार्मिक अनास्थेला’ बळी पडणार नाहीत.

[तळटीप]

^ परि. 7 येथे केवळ आध्यात्मिक संदर्भात माहिती दिली आहे. काहीजणांच्या बाबतीत, मनोविकारांमुळे उद्‌भवलेल्या समस्यांवर योग्य तज्ज्ञांकडून उपचार करून घेण्याची गरज असू शकते.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ती कशाप्रकारे ‘परमेश्‍वराविषयी अभिमान’ बाळगू शकतात?

• मोशे व आसाफ यांच्या उदाहरणांवरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• बायबलमधील कोणत्या व्यक्‍तींनी देवाची सेवा करण्याविषयी अभिमान बाळगला?

• ख्रिस्ती असण्याबद्दल अभिमान बाळगण्यात कशाचा समावेश आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

काहीकाळ मोशेला आत्मविश्‍वासाची कमी जाणवली

[१५ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या अनेक प्राचीन सेवकांनी आपण कोण आहोत याविषयी अभिमान बाळगला