व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही इतरांबरोबर स्वतःची तुलना करता का?

तुम्ही इतरांबरोबर स्वतःची तुलना करता का?

तुम्ही इतरांबरोबर स्वतःची तुलना करता का?

असा कोण आहे, ज्याला आपल्यापेक्षा देखणी, अधिक लोकप्रिय, तल्लख बुद्धी असणारी किंवा शाळेत अधिक गुण मिळवणारी व्यक्‍ती भेटली नाही? कदाचित इतरांचे स्वास्थ्य अधिक चांगले असेल किंवा त्यांना समाधानकारक नोकरी असेल, ते अधिक यशस्वी असतील किंवा त्यांना अधिक मित्र असतील. किंवा त्यांच्याजवळ भरपूर मालमत्ता, रगड पैसा, अत्याधुनिक गाडी असेल किंवा ते आपल्यापेक्षा अधिक आनंदी वाटत असावेत. या गोष्टींचा उल्लेख करताना आपण दुसऱ्‍यांबरोबर स्वतःची तुलना करण्याचा प्रयत्न करतो का? तुलना करणे अनिवार्य आहे का? अशी कोणती कारणे असू शकतात, की ज्यांमुळे ख्रिश्‍चन व्यक्‍तीने असे करण्याचे टाळावे? इतरांबरोबर तुलना न करता आपण समाधानी कसे होऊ शकतो?

आपण तुलना कशाविषयी व केव्हा करतो

लोक स्वतःची तुलना दुसऱ्‍यांबरोबर का करतात? एक सिद्धान्त असे सुचवतो, की असे ते आपली स्वप्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी करतात. सोबत्यांइतके यशस्वी असल्यास बऱ्‍याच लोकांना समाधान मिळते. तुलनेचा दुसरा उद्देश स्वतःबद्दल वाटणारे संदेह कमी करणे, आपण काय करू शकतो हे जाणून घेणे व आपल्या मर्यादा ओळखणे हा आहे. दुसऱ्‍यांनी काय मिळवले याचे आपण निरीक्षण करतो. ते जर बऱ्‍याच क्षेत्रांत आपल्यासारखे असतील व त्यांनी काही उद्दिष्टे मिळवली असतील तर आपणही त्यासारखे लक्ष्य प्राप्त करू शकतो असे आपल्याला वाटेल.

तुलना बहुधा बरोबरीच्या व्यक्‍तींमध्ये होते. सारख्या लिंगाच्या, एकाच वयाच्या व सामाजिक स्तरातील व्यक्‍ती ज्यांची एकमेकांशी ओळख आहे यांच्यात तुलना केली जाते. जी व्यक्‍ती आपल्यापेक्षा फारच वेगळी आहे अशा व्यक्‍तीबरोबर सहसा आपण स्वतःची तुलना करत नाही. दुसऱ्‍या शब्दांत, एक साधारण किशोरवयीन मुलगी स्वतःची तुलना आपल्या शाळेतील मुलींशी करण्याऐवजी एखाद्या प्रख्यात मॉडेलशी करण्याची शक्यता कमी आहे. तसेच एक मॉडेल स्वतःची तुलना एका किशोरवयीन मुलीशी करण्याची शक्यता नाही.

कोणकोणत्या बाबतीत तुलना केल्या जातात? कोणतीही वस्तू किंवा विशेष गुण ज्याला समाजात मोलवान समजले जाते; बुद्धी, सौंदर्य, धन, कपडालत्ता यांसारख्या गोष्टींच्या आधारावर तुलना केली जाते. पण सहसा आपल्या आवडीच्या गोष्टींविषयी आपण तुलना करण्याची जास्त शक्यता असते. उदाहरणार्थ, आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्‍तीने जमा केलेल्या तिकिटांविषयी आपल्याला हेवा वाटणार नाही, जोपर्यंत तिकिटं जमा करण्याबद्दल आपल्याला विशिष्ट आवड नाही.

तुलना केल्याने विविध प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण होतात; समाधानापासून निराशेपर्यंत, प्रशंसा व अनुकरण करण्याच्या इच्छेपासून अस्वस्थता व वैमनस्यापर्यंत. यातील काही भावना हानीकारक आहेत व ख्रिस्ती गुणांच्या सुसंगतेत नाहीत.

स्पर्धात्मक तुलना

दुसऱ्‍यांच्या तुलनेत “यशस्वी” होण्यास झटणारे बरेचजण स्पर्धात्मक प्रवृत्ती प्रदर्शित करतात. दुसऱ्‍यांपेक्षा वरचढ होण्याची त्यांची इच्छा असते व आपण वरचढ आहोत असे जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही. अशा लोकांबरोबर राहण्यास नकोसे वाटते. यांच्या बरोबर मैत्री औपचारिक असते व नातेसंबंध तणावाचे असतात. अशा लोकांमध्ये नम्रतेची उणीव तर असतेच पण त्याचबरोबर ते, सहसा आपल्या सोबत्यांवर प्रीति करण्याविषयी बायबलमध्ये दिलेला सल्ला पाळत नाहीत. कारण त्यांच्या अशा मनोवृतीमुळे साहजिकच दुसऱ्‍यांना कमीपणा व अपमानास्पद वाटू लागते.—मत्तय १८:१-५; योहान १३:३४, ३५.

लोकांना “अयशस्वी” असल्याचे भासवल्याने आपण त्यांच्या भावना दुखावतो. एका लेखिकेनुसार “आपल्या सारख्याच परिस्थितीचा सामना करणाऱ्‍या व्यक्‍तीने आपल्याला हवे असलेल्या गोष्टी मिळवल्याचे भासते तेव्हा आपल्या कमतरता अधिकच दुःखदायी वाटू लागतात.” अशारितीने स्पर्धात्मक प्रवृत्तीमुळे एखाद्या व्यक्‍तीच्या मालकीच्या वस्तूंविषयी, त्याच्याठायी असलेली सुसंपन्‍नता, त्याचे स्थान, नावलौकिक, त्याला मिळणारे लाभ व इतर गोष्टींविषयी मत्सर, चीड व असंतोष उत्पन्‍न होतात. यामुळे अधिक स्पर्धा निर्माण होते व समस्या पहिल्याहून अधिक चिघळते. ‘एकमेकांना चिथावणी देणाऱ्‍यांचा’ बायबल धिक्कार करते.—गलतीकर ५:२६.

प्रतिस्पर्धकाचे कार्य कमी लेखून द्वेष करणारे स्वतःची दुखावलेली स्वप्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रतिक्रिया क्षुल्लक वाटतात तरीही त्यांना ओळखून, सुधारले नाही तर द्वेष दुष्कर्म करण्याकडे निरवू शकतो. द्वेषामुळे घडून आलेल्या घटनांचे बायबलमधील दोन अहवाल लक्षात घ्या.

पलिष्ट्यांमध्ये राहात असताना इसहाकाला आशीर्वादीत करण्यात आले. “[तो] कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला; तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले.” यावर त्यांनी इसहाकाचा बाप अब्राहाम याने ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व बुजविल्या व त्यांच्या राजाने इसहाकास तेथून जाण्यास सांगितले. (उत्पत्ति २६:१-३, १२-१६) त्यांचा द्वेष, कपटी व विध्वंसक होता. इसहाक समृद्ध होत चालला आहे हे त्यांना बघवत नव्हते.

काही शतकांनंतर, दावीदाने युद्धभूमीवर नाव कमावले. “शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले” असे गात इस्त्राएली स्त्रियांनी त्याच्या पराक्रमांची स्तुति केली. शौलाची काही प्रमाणात स्तुती करण्यात आली तरीही त्याला ती तुलना अपमानास्पद वाटली व त्याच्या मनात द्वेष उत्पन्‍न झाला. तेव्हापासून त्याने दावीदाप्रती वाईट संकल्प जोपासले. लवकरच त्याने दावीदाला ठार मारण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर कित्येक वेळा तो असाच प्रयत्न करत राहिला. द्वेषामुळे केवढी दुष्टता निर्माण झाली!—१ शमुवेल १८:६-११.

तेव्हा, इतरांनी केलेले पराक्रम किंवा त्यांना मिळत असलेल्या फायद्यांबरोबर स्वतःची तुलना केल्याने जर तुमच्या मनात द्वेष किंवा प्रतिस्पर्धेच्या भावना उत्तेजित होत असतील, तर सावधान! या नकारात्मक भावना आहेत ज्या देवाच्या विचारांच्या सुसंगतेत नाहीत. अशा प्रकारच्या मनोवृतीचा कसा विरोध करता येईल याचे परीक्षण करण्याआधी आणखी एक गोष्ट विचारात घेऊ या ज्यामुळे तुलना करण्याची प्रवृत्ती उत्पन्‍न होते.

आत्मपरीक्षण व समाधान

‘मी बुद्धिमान, आकर्षक, कार्यक्षम, निरोगी, अधिकारयुक्‍त, प्रेमळ आहे का? व कितपत?’ क्वचितच आपण आरशासमोर उभे राहून स्वतःला असे प्रश्‍न विचारतो. पण एका लेखिकेनुसार “अशा प्रकारचे प्रश्‍न वेळोवेळी आपल्या मनात येतात व मनातल्या मनातच का होइना समाधानकारक उत्तरे निर्विवादपणे मिळतात.” आपण काय साध्य करू शकतो याचा अंदाज काढू इच्छिणारी व्यक्‍ती द्वेष किंवा काही स्पर्धात्मक ओढ नसताना या गोष्टींचा विचार करू शकते. ती स्वतःचे फक्‍त आत्मपरीक्षण करत असते. त्यात काही चुकीचे नाही. पण आत्मपरीक्षण करण्याकरता, इतरांबरोबर स्वतःची तुलना करणे योग्य नाही.

अनेक कारणांमुळे आपल्यात विविध क्षमता आहेत. नेहमी आपल्यापेक्षा अधिक निपुण कोणी ना कोणी असेलच. म्हणून त्यांचा द्वेष करण्याऐवजी आपण आपल्या कार्याची तुलना देवाच्या धार्मिक स्तरांच्या संबंधात करू शकतो, कारण योग्य व अयोग्य याविषयी ते खात्रीशीर मार्गदर्शन पुरवतात. आपण व्यक्‍तिगतरित्या काय आहोत यात यहोवा देवाला आस्था आहे. त्याला इतरांबरोबर आपली तुलना करण्याची जरूरी भासत नाही. प्रेषित पौलाने आपल्यासाठी सल्ला दिला: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलतीकर ६:४.

हेव्यावर मात करणे

सर्व मनुष्य अपरिपूर्ण असल्यामुळे हेव्यावर मात करण्यासाठी कठोर परीश्रम व दीर्घकाळ प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना” हे शास्त्रवचन माहीत असणे सोपी गोष्ट आहे पण ते लागू करणे कठीण आहे. पौलाने पापी प्रवृत्तीकडे असलेला त्याचा झुकाव ओळखला. त्यावर मात करण्यासाठी त्याला ‘[त्याचे] शरीर कुदलून त्याला दास’ करणे भाग पडले. (रोमकर १२:१०; १ करिंथकर ९:२७) आपल्याकरता याचा अर्थ स्पर्धात्मक विचारांचा विरोध करून त्याच्या जागी सकारात्मक भावना जोपासणे हा आहे. “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका” हा सल्ला पाळण्यास आपल्याला यहोवा देवाकडे प्रार्थनेकरवी मदत मागण्याची गरज आहे.—रोमकर १२:३.

बायबलचा अभ्यास व त्यावर मनन केल्यानेही मदत मिळते. उदाहरणार्थ, देवाने अभिवचन दिलेल्या भविष्यात येणाऱ्‍या परादीसचा विचार करा. तेव्हा सर्वांना शांती, चांगले स्वास्थ्य, विपुल अन्‍न, सोईस्कर घरे, समाधानकारक काम मिळेल. (स्तोत्र ४६:८, ९; ७२:७, ८, १६; यशया ६५:२१-२३) त्या वेळी कोणाची एकमेकांशी स्पर्धा करण्याची इच्छा होईल का? मुळीच नाही. असे करण्यास काहीच कारण नसेल. जरीही यहोवाने तेव्हाच्या जीवनाबद्दल बारीक सारीक माहिती पुरवलेली नाही तरीही समजबुध्दीने आपण समजू शकतो की सर्व जण त्यांच्या आवडीचे छंद व कौशल्ये जोपासू शकतील. कोणी खगोलशास्त्राचा अभ्यास करेल तर कोणी सुंदर पोशाख बनवेल. ते एकमेकांचा द्वेष कशाला करतील? आपल्या सोबत्यांचे कार्य, कटुता निर्माण करणारे नव्हे तर प्रेरक ठरेल. कटुतेच्या भावना पूर्वीच्या गोष्टी बनतील.

जर अशा प्रकारचे जीवन जगण्याची आपली इच्छा आहे तर तशीच मनोवृती जोपासण्यास आता झटायला नको का? आजही आपण आपल्या भोवतालच्या जगाच्या समस्यांपासून मुक्‍त, आध्यात्मिक परादिसचा आनंद उपभोगत आहोत. देवाच्या राज्यात स्पर्धात्मक प्रवृत्ती नसल्याने, आतापासूनच ती टाळण्यासाठी आपल्याकडे ठोस कारण आहे.

पण मग, आपली तुलना दुसऱ्‍यांबरोबर करण्यात काही चुकीचे आहे का? किंवा असे काही प्रसंग आहेत का जेव्हा असे करणे योग्य आहे?

योग्य तुलना

बरेचदा तुलनेमुळे कटुता किंवा उदासीनतेच्या भावना निर्माण होतात, पण नेहमीच असे होईल असे नाही. या संबंधात प्रेषित पौलाच्या सल्ल्याकडे लक्ष द्या: “विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री लोकांस ६:१२) पुरातन काळातील यहोवाच्या विश्‍वासू सेवकांच्या गुणांचे अनुकरण केल्यामुळे सकारात्मक परिणाम होईल. अर्थात, तसे करतानाही काही प्रमाणात तुम्हाला तुलना करावीच लागेल पण या तुलनेतून अशा उदाहरणांचे आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो व कोणत्या क्षेत्रात सुधार करणे गरजेचे आहे हे पाहण्यास मदत मिळेल.

योनाथानाबद्दल विचार करा. एका अर्थाने, हेवा करण्यासाठी त्याच्या जवळ ग्राह्‍य कारण होते. इस्राएलचा राजा शौल याचा थोरला मुलगा यानात्याने योनाथानाने एक समयी राजा होण्याची अपेक्षा केली असेल, पण यहोवाने त्याच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या दाविदाला निवडले. मनातल्या मनात कुढण्याऐवजी, योनाथानाने निःस्वार्थ मैत्री व यहोवाने नियुक्‍त केलेला राजा म्हणून दावीदाला पाठिंबा पुरवण्याद्वारे स्वतःला वेगळे असे साबीत केले. योनाथान खरोखर एक आध्यात्मिक प्रवृत्तीचा व्यक्‍ती होता. (१ शमुवेल १९:१-४) योनाथान त्याच्या पित्याच्या विपरीत होता; या गोष्टीत यहोवाचा हात असल्याचे त्याने ओळखले होते व तो यहोवाच्या मर्जीच्या अधीन झाला. ‘दाविदच का? मी का नाही?’ असे म्हणून त्याने आपली तुलना दाविदाबरोबर केली नाही.

ख्रिस्ती बांधवांमध्ये कोणी आपल्यापेक्षा वरचढ होऊ पाहत आहे किंवा आपली जागा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे अशी भीती आपल्याला कधीही वाटायला नको. प्रतिस्पर्धा करणे अनुचित आहे. प्रौढ ख्रिश्‍चन विशेषतः परस्परांस साहाय्य करतात, ऐक्य व प्रीती राखतात, ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनत नाहीत. समाजशास्त्रज्ञ फ्रान्शेस्को ऍलबरोनी म्हणतात “प्रीती, द्वेष मिटवते. आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो, तेव्हा त्याचे चांगले व्हावे अशी आपली इच्छा असते, तो यशस्वी व आनंदी झाल्यावर आपल्यालाही आनंद होतो.” म्हणून ख्रिस्ती मंडळीत कोणत्याही विशेष अधिकारासाठी कोणा दुसऱ्‍याची नियुक्‍ती झाल्यास, त्यात संतोष मानणे ही एक प्रेमळ गोष्ट आहे. योनाथानानेही असेच केले. यहोवाच्या संस्थेत जबाबदार पदी सेवा करत असलेल्या विश्‍वासू सेवकांना पाठिंबा दिल्यास आपल्यालाही योनाथानासारखे आशीर्वाद प्राप्त होतील.

ख्रिस्ती सोबत्यांनी मांडलेल्या उत्कृष्ट उदाहरणांची योग्य प्रशंसा केली गेली पाहिजे. माफक प्रमाणात तुलना केल्याने आपल्याला त्यांच्या विश्‍वासाचे चांगले अनुकरण करण्यास उत्तेजन मिळेल. (इब्री लोकांस १३:७) असे करत असताना जर आपण सावधगिरी बाळगली नाही तर अनुकरण, स्पर्धेत बदलू शकते. आपल्या पसंतीच्या कोणा व्यक्‍तीचे अनुकरण करत असताना ती आपल्यापेक्षा वरचढ होत असल्याचे वाटल्यास आपण तिची बदनामी किंवा टीका केली तर आपण अनुकरण नव्हे तर त्या व्यक्‍तीचा द्वेष करतो.

कोणताही अपरिपूर्ण मनुष्य एक सिद्ध नमुना सादर करू शकत नाही. बायबल सांगते, “देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” तसेच, “ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (इफिसकर ५:१, २; १ पेत्र २:२१) यहोवा व येशूचे गुण जसे प्रेम, कळकळ, सहानुभूती व नम्रता यांचे अनुकरण करण्यास आपण झटले पाहिजे. त्यांच्या गुणांशी, उद्देशांशी व कार्य करण्याच्या पद्धतीशी आपली तुलना करण्यास आपण वेळ काढला पाहिजे. अशा तुलनेमुळे आपले जीवन समृद्ध होईल व त्याकरवी खात्रीदायक दिशा मिळेल, स्थैर्य व सुरक्षितता प्राप्त होईल आणि प्रौढ ख्रिस्ती पुरूष व स्त्रिया होण्यास आपण सिद्ध होऊ. (इफिसकर ४:१३) त्यांच्या परिपूर्ण उदाहरणांचे अनुकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास आपले सर्वस्व लावल्यास, सोबत्यांबरोबर तुलना करण्याकडे आपला कल राहणार नाही.

[२८, २९ पानांवरील चित्र]

शौल राजा दावीदाचा द्वेष करू लागला

[३१ पानांवरील चित्र]

योनाथानाने आपल्यापेक्षा लहान असलेल्या दावीदाला कधीही प्रतिस्पर्धी मानले नाही